राम राम मंडळी,
आज आमच्या मातोश्रींची एक पाकृ तुम्हाला सांगणार आहे. हा पदार्थ खास आमच्या कोकणातला असून तुम्हाला सर्वांना हा पदार्थ आवडेल अशी आशा करतो. तशी आमची म्हातारी सुगरण आहे बरं का! :)
पाकृचा स्त्रोत - वैदेही अभ्यंकर.
शब्दांकन - तात्या अभ्यंकर.
साहित्य (तीन ते चार इसमांना पुरेल इतपत) -
एक वाटी चणाडाळ, साधारण दोन इंच सुक्या खोबर्याचा तुकडा, थोडीशी खसखस, तेल, तीखट, मीठ, हळद, गोडा मसाला, चिंच, गूळ, एक वाटी खोवलेला ताजा नारळ, कोथिंबीर, कढिपत्ता.
सुकं खोबरं व खसखस छानशी भाजून घ्यावी व एकत्र वाटून त्याची पूड करून ठेवावी.
कृती -
चण्याची डाळ दोन तास भिजत टाकावी. त्यानंतर पाण्यातून उपसून ती पाट्यावर किंवा मिक्सरवर भरडशी वाटून घ्यावी. (आम्ही शक्यतोवर पाट्यावरच वाटतो. ती चव मिक्सरला नाही!) त्यानंतर त्यात चवीनुसार तिखट, मीठ, हळद, खोबरं-खसखशीची पूड व मोहन म्हणून दोन-तीन चमचे कच्चं तेल घालावं व सुपारीएवढ्या आकाराचे गोळे वळून घ्यावेत. गोळे नीट वळले जावेत म्हणून हाताशी थोडं चण्याच्या डाळीचं पीठ घ्यावं व छान गोळे वळून घ्यावेत.
आता पातेलं गॅसवर (आमच्या कोकणात आम्ही चुलीवरच करतो, चुलीची चव गॅसला नाही!) ठेवून नेहमी करतो तशी तेल, मोहरी, हळद व कढीपत्ता यांची चांगली चरचरीत फोडणी करावी. फोडणी झाल्यावर त्यात अंदाजानुसार तीन ते चार वाट्या पाणी घालावे. त्यानंतर त्या पाण्यात चवीनुसार चिंचेचा कोळ, गूळ, तिखट, मीठ, गोडा मसाला घालावा व पाणी चांगले उकळू द्यावे.
आता त्या उकळत्या पाण्यात मगाशी केलेले गोळे हळूहळू सोडावे. आता ते मिश्रण मुळीच ढवळू नये. गोळ्यांना त्या उकळत्या पाण्यात बिलकूल डिष्टर्ब न करता चुपचाप शिजू द्यावे. गोळे शिजले की आपोआप वर येतातच. आता सर्वात शेवटी त्यात एक वाटी एकदम बारीक, सुपर फाईन वाटलेला नारळ घालावा, मिश्रण सारखे करून घ्यावे, व चांगल्या एक दोन उकळ्या आल्या की ग्यॅस बंद करावा. वरून ताजी चिरलेली कोथिंबीर घालावी.
गोळ्यांची आमटी तैय्यार! :)
गरमागरम पोळीसोबत किंवा वाफाळलेल्या भातासोबत देवाचे आभार मानत अगदी पोटभर जेवून तृप्त व्हावे व नंतर दोन तास निवांत झोपावे! :)
बराय तर मंडळी, निघतो आता! अनुष्काला हीच पाकृ शिकवायला जायचं आहे! गधडी स्वैपाकात अगदीच ढ आहे! :)
तात्या.
प्रतिक्रिया
9 Jun 2008 - 12:41 pm | स्वाती दिनेश
मस्त आहे, माझी आवडती..
आणि फोटू सुध्दा झक्कास!
स्वाती
9 Jun 2008 - 12:48 pm | ईश्वरी
वा, मस्त आहे रेसिपी. आणि फोटो पण झकास आलाय. नक्की करुन बघणार.
धन्यवाद तात्या.
अवांतरः आमच्याकडे डाळीच्या पीठाचे गोळे बनवून अशी आमटी करतात. आमटीत चिंच, गूळ , ओला नारळ न घालता कांदा, आले , लसूण, सुके खोबरे , काळा मसाला ह्याचे वाटण करून घालतात. आमच्याकडे ह्या प्रकाराला चकोल्या म्हणतात.
ईश्वरी
9 Jun 2008 - 1:07 pm | पद्मश्री चित्रे
मी पण करते, फक्त शेवटी कांदा-खोबरे भाजुन, वाटुन घालते..
फोटो मस्त!
अशा थंड हवेत ही छान ,गरमा-गरम आमटी आणि भात...
आहा.......
9 Jun 2008 - 1:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोळ्याची आमटी आणि पोळी पाहुन तोंडात पाचक रस तयार झाला :)
पाककृती विभागातील आपल्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा !!!
अनुष्काला हीच पाकृ शिकवायला जायचं आहे! गधडी स्वैपाकात अगदीच ढ आहे!
अनुष्कावन्सला गोळ्याची आमटी आणि स्वैंपाक करण्याची गरज राहणार नाही, ते सर्व आपल्यालाच करावे लागेल. आणि एक घास चिऊचा, एक घास काऊचा, असे करत करत घास भरवतांनाचे फोटो मिपावर आम्हाला दिसल्यास नवल वाटणार नाही :) (ह.घ्या )
-दिलीप बिरुटे
9 Jun 2008 - 5:36 pm | विजुभाऊ
एक घास चिऊचा, एक घास काऊचा, असे करत करत घास भरवतांनाचे फोटो मिपावर आम्हाला दिसल्यास नवल वाटणार नाही =)) =))
=)) =))
बिरुटे गुरुजी एकदम फुल्ल टू फॉर्म मधे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
9 Jun 2008 - 1:53 pm | प्रगती
गोळ्यांच्या आमटीची रेसिपी एकदम छान दिसतेय सोपी पण आहे , तेव्हा लवकरंच करायला हवी.
"आता ते मिश्रण मुळीच ढवळू नये. गोळ्यांना त्या उकळत्या पाण्यात बिलकूल डिष्टर्ब न करता चुपचाप शिजू द्यावे. गोळे शिजले की आपोआप वर येतातच. " ह्म्म हे मात्र अगदी लक्षात ठेवावे लागेल, नाहीतर आम्हाला सारखं ढवळाढवळ केल्याशिवाय चैनच पडत नाही . :S
11 Jun 2008 - 12:10 pm | प्राजु
फोटोच इतका भारी आहे की... त्यावरूनच त्या आमटीचा बाज लक्षात येतो आहे.
तात्या, डन!! तुमच्या घरी आले ना मी, की अनुष्कावहीनींना अश्शीच आमटी करायला सांगा...
कमिंग टू द पॉइंट.. : रेसिपी मस्त आहे. अगदी साधी आणि सोपी. आपल्या मातोश्रींना धन्यवाद सांगा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Jun 2008 - 1:55 pm | गिरिजा
वाह..
गोळ्याची आमटी.. मस्त च लागते..
इकडे मेस मध्ये हे सगळ मिस करतेय.. :(
बघुन / वाचुनच तोंडाला पाणी सुटतय.. :P
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
9 Jun 2008 - 2:05 pm | सहज
गोळ्याची आमटी माझी आवडती आहे.
धन्यु तात्या!!
9 Jun 2008 - 5:27 pm | वरदा
गोळ्यांची आमटी..भाजी आणली नसेल तेव्हा हमखास करते मी....
तात्या मस्त पा. क्रु.
9 Jun 2008 - 6:14 pm | अभिषेक पटवर्धन
तात्या, ह्या इतक्या सुन्दर पाक्रु ईथे देउ नका हो. या अरबान्च्या देशात रहाणार् या माझ्या सारख्याला या पाक्रु नुसत्या वाचण म्हन्जे शिक्शा आहे. बाकी गोळ्याची आमटी अप्रतीमच असते हे नक्कि.
(आमटी घरी करुन बघायचा मोह अनावर होतोय पण ती केल्यावर मलाच खावी लागणार असल्यामुळे धीर होत नाहीये)
9 Jun 2008 - 6:22 pm | वरदा
अगदी आरामात करुन पहा..खसखस खोबरं एखादेवेळी नसलं तरीही छान होते ही आमटी...जनरली खूप सोपी पाक्रु असल्याने नाही बिघडत....
9 Jun 2008 - 6:33 pm | विसोबा खेचर
खसखस खोबरं एखादेवेळी नसलं तरीही छान होते ही आमटी...
खसखस-खोबरं नसेल तर त्या ऐवजी जिर्याची पूड घालावी. असे केल्यानेही आमटी छानच लागते असा निरोप आमच्या म्हातारीने दिला आहे! :)
तात्या.
9 Jun 2008 - 6:43 pm | वरदा
धन्यु तात्या.....खरंतर काकूंना धन्यु सांगा...
9 Jun 2008 - 10:33 pm | चकली
तात्या,
मस्तच आहे पाककृती, आणि फोटोपण मस्तच आहे.
पाणी सुटलं तोंडाला !!
चकली
http://chakali.blogspot.com
9 Jun 2008 - 10:59 pm | प्रभाकर पेठकर
व्वा तात्या, मस्त पाककृती आहे. मातोश्रींना विचारुन सर्व 'कोकणी खजीना' आमच्यासाठी खुला करावा आणि आम्हांस उपकृत करावे.
मातोश्रींना सर्व मिपाकरांचा नमस्कार सांगावा, त्यांचा आशिर्वाद मस्तकी असो द्यावा.
10 Jun 2008 - 1:21 am | चतुरंग
गोळ्यांची आमटी लगोलग करुनच बघायला हवी. फर्मास प्रकार दिसतो आहे!
आपल्या मातोश्रींना आणि आपल्याला धन्यवाद! :)
चतुरंग
10 Jun 2008 - 9:07 am | विसोबा खेचर
प्रतिसाद देणार्या सर्व वाचकांचे माझ्यातर्फे आणि माझ्या म्हातारीतर्फे मनापासून आभार... :)
तात्या.
10 Jun 2008 - 9:20 am | चित्रा
छान फोटो आहे हो! तुमच्या आईंना धन्यवाद, अशा सुरेख पाकृ. बद्दल.
10 Jun 2008 - 5:38 pm | शितल
हो माझी आजी ही गोळ्या॑ची आमटी करायची आणि का॑दाही चुलीत भाजायची आणि खोबर॑ ही आणि मस्त चव यायची.
10 Jun 2008 - 6:17 pm | प्रियाली
आम्हीही गोळ्याची आमटी करताना कांदा चुलीत भाजतो. त्याची लज्जत काही और असते. अमेरिकेत हॉटप्लेटमुळे भाजणे अशक्य झाल्याने आमटी कित्येक वर्षांत केली नव्हती. गॅस आल्यावरही आमटी करायचे विसरले होते. तात्या, पाककृती मस्त आहे. मातोश्रींना धन्यवाद सांगा. त्यानिमित्ताने गोळ्याची आमटी करता येईल.
10 Jun 2008 - 6:57 pm | चित्रा
आमच्याकडे कांदा चुलीत भाजून मसूराची आमटी करायचे. ती पावाबरोबर छान लागते.
मी इथे पण करते. आणि मी नेहमीच्या oven मध्ये (मायक्रोवेव्ह नव्हे) कांदा भाजते. खाली डाग पडायला नको असले तर aluminum foil मध्ये कांदा गुंडाळायचा.
10 Jun 2008 - 7:10 pm | मनस्वी
पाटा-वरवंट्याची चव मिक्सरला नाही..
चुलीची चव गॅसला नाही..
..काय मस्त रेसिपी दिलीये तात्या!
चाखत चाखत करतोय असे वाटतं :)
सुफळ संपूर्ण पाककृती.
मस्तच आहे की. वाचूनच करावीशी वाटतीये.. मातोश्रींना निरोप सांगा :)
अजूनही येउद्यात कोकणी पाककृती.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
10 Jun 2008 - 11:32 pm | स्वाती राजेश
तुमच्या आईंना आमचे धन्यवाद सांगा....आणि अशाच सोप्या नविन नविन कोकणातील पाककृतींची वाट पाहात आहोत असे सांगा....:)
तात्या, बाकि तुम्ही खरच भाग्यवान!!!!
आईच्या हाताला काही वेगळीच चव असते नाही?
बाकी रेसिपी मस्तच आहे, फोटो सुद्धा....:)
11 Jun 2008 - 1:36 am | भाग्यश्री
फोटो आणि रेसिपी खरच मस्त आहे!! आज्जीच्या हातची गोळ्याची आमटी आठवली!
एकदा नक्की करून पाहीन..!
http://bhagyashreee.blogspot.com/
11 Jun 2008 - 8:30 am | यशोधरा
आज्जीच्या हातची गोळ्याची आमटी आठवली!
मला पण!! माझी आई पण मस्त करते ही आमटी :)
पुण्याला जायला हवं................ :?
11 Jun 2008 - 8:15 pm | प्रभाकर पेठकर
कालच केली होती 'गोळ्यांची आमटी'. मस्त झाली होती. धन्यवाद, तात्या.
12 Jun 2008 - 4:07 am | पिवळा डांबिस
मस्तच दिसतेय रेसेपी, कारभारणीला सांगितली पाहिजे करायला....
आम्ही गोळ्याची आमटी करतो पण ओली डाळ वाटून नाही, पीठ घालून (आमच्याकडे पाटा नाही ना!:))
गोळ्यांना त्या उकळत्या पाण्यात बिलकूल डिष्टर्ब न करता चुपचाप शिजू द्यावे. गोळे शिजले की आपोआप वर येतातच.
शूऽऽऽ!! आवाज करू नका!! गोळे शिजतायत!! शिजले की आपोआप (फुगून) वर येतील, तेंव्हा बोला त्यांचाशी....
मस्त कल्पना आहे. :)) अजून येऊ द्या...
(अवांतरः तात्या आता आपण टग्या-टोणग्या लोकांनी रेसेप्या द्यायला सुरवात केल्यामुळे समस्त ताईलोकांची झोप उडाली असेल काय रे!:))
खट्याळ,
पिवळा डांबिस
12 Jun 2008 - 8:50 am | यशोधरा
समस्त ताईलोकांची झोप उडाली असेल काय
कायतरीच हां तुमचा डांबिसकाका.... ताईलोकांकडे खूप रेसिप्ये आसत :)
3 Jul 2008 - 6:18 pm | खादाड_बोका
ऑफीस मधे वाचुन घरी गेल्यावर पहीले करुन पाहीली. खुप चवदार आहे. बाबा इथे अमेरीकेत आले आहेत. त्यान्चेही मन खावुन त्रुप्त झाले.
धन्यवाद विसोबाना :)
3 Jul 2008 - 6:32 pm | संदीप चित्रे
तात्या -- काकूंना धन्स सांग...
फोटू पाहूनच खाऊन पहावासं वाटतंय :)
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------
3 Jul 2008 - 10:23 pm | श्रीकृष्ण सामंत
असा काय तात्यानु,आवडेल म्हणजे काय ?
आम्ही हंयसर अमेरिकेक पण नचुकता करतो गोळ्यांची आमटी.
उकड्या तांदळाचो भात -इकडे बास्मती खावचो लागता तां सोडा-आणि ही गोळ्याची आमटी
म्हणजे आमका पक्वान्न की हो!
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
8 Jul 2008 - 3:53 pm | शिप्रा
तात्या कपया तुमच्या आई ला विचारुन मसाला कसा करायचा ते सांगा ना.
खादाड चिंटी
8 Jul 2008 - 3:53 pm | शिप्रा
तात्या कपया तुमच्या आई ला विचारुन मसाला कसा करायचा ते सांगा ना.
खादाड चिंटी
15 Feb 2018 - 9:34 am | shital
फोटो नाही दिसत आहे.