हार्वर्ड, सुब्रमण्यम स्वामी आणि भाषणस्वातंत्र्य

विकास's picture
विकास in काथ्याकूट
5 Jan 2012 - 9:07 pm
गाभा: 

काल येथील रेडीओ बॉस्टन मधे एक चांगली चर्चा झाली, त्या निमित्ताने आणि भाषणस्वातंत्र्य या विषयासंदर्भातः

गेल्या जुलैमधली गोष्ट आहे. १३ जुलैला मुंबईत परत बाँबस्फोट झाले. त्या संदर्भात एकूणच गेले काही वर्षे सातत्याने चालू असलेल्या या दहशतवादाबद्दल स्वतःची मते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबईतील डिएनए या वृत्तपत्रातील त्यांच्या लेखात मांडली. बाह्यदेशातील इस्लामिक जिहादी प्रवृत्ती यामागे आहेत हे लक्षात घेऊन त्यांना वेगळे करण्यासाठी भारतीय मुसलमान समाजाने काय करायला हवे तसेच एकंदरीतच काय भारत आणि भारतीयांचे धोरण कसे असावे या संदर्भात त्यावर त्यांनी उहापोह केला होता. त्यातील काही मते ही अधुनिक भारतातच नव्हे तर अधुनिक काळासाठी कुठल्याही विकसीत आणि प्रगत समाजासाठी योग्य नव्हती असे माझे देखील मत आहे. हा लेख आता डिएनए ने त्यांच्या संस्थळावरून काढलेला असला तरी, येथे कोणीतरी ठेवला आहे. स्वामींच्या त्या लेखावर चर्चा अपेक्षित नाही कारण भरकटेल आणि तो मूळ मुद्दा नाही केवळ निमित्त आहे.

आता तुम्हाला (विशेष करून भारतातील मिपाकरांना) या लेखाबद्दल जर काही माहीत नसेल तर त्याला भारतीयांनी किती महत्व दिले हे कळलेच. नाही म्हणायला "दि हिंदू", "इंडीया टू डे" वगैरेनी त्यावर आपली मते मांडली. पण तेव्हढ्यापुरतीच. मी विचार करतोय की असला लेख जर सामना मधे आला असता, अथवा बाळासाहेब/उद्धव/राज यांच्यापैकी कोणीही बोलले असते तर केव्हढा धुमाकूळ झाला असता! पण मला वाटते सुदैवाने या लेखाची नुसतीच उपेक्षा झाली आणि कुठल्याही स्वरूपात वादळ घडले नाही . जसे होणे हवे होते तसेच झाले....आता तसे झाले हे सामाजीक अज्ञानाचे चिन्ह आहे, का सामाजीक प्रौढत्वाचे चिन्ह आहे, हा एका वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. पण त्याला महत्व दिले गेले नाही हे फलीत महत्वाचे. यात अर्थातच त्यांच्या लेखातील मुद्द्यांचा डिफेन्स करण्याचा प्रश्नच नाही, कारण वर म्हणल्याप्रमाणे ते पटणे शक्य नाही. त्याच बरोबर हे देखील लक्षात ठेवले पाहीजे की स्वामींच्या कुटूंबात विविध धर्मीय आहेत. त्यांची बायको पार्शी, मेव्हणा ज्यू, जावई मुसलमान आणि सून ख्रिश्चन आहेत.

पण जगाच्या दुसर्‍या टोकाला बॉस्टनमधे मात्र चित्र वेगळेच होते. एक वादग्रस्त राजकारणी म्हणून गेले काही दशके भारतीयांना स्वामी माहीत आहेत. पण साठच्या दशकात ह्याच स्वामींना हार्वर्ड विद्यापिठातून अर्थशास्त्राची डॉक्टरेट मिळाली आणि नंतर लगेचच ते तेथेच प्राध्यापक म्हणून नेमले देखील गेले होते. पण देशप्रेम म्हणा अथवा राजकारणाची हौस म्हणा, ते भारतात परतले. मात्र, अर्थशास्त्र/अ‍ॅकेडेमिक विद्वत्ता आणि राजकीय विद्वत्ता यात फरक असतो. त्यामुळे राजकारणात कायम राहू जरी शकले तरी यशस्वी झाले असे वाटत नाही.

हार्वर्ड जरी तेंव्हा सोडले तरी साधारण दहाएक वर्षांपुर्वी हार्वर्डने त्यांना परत एकदा येथील उन्हाळ्यातील (जून-सप्टेंबर) विशेष वर्गांना प्राध्यापक म्हणून बोलवले. तेंव्हा पासून ते ज्या विषयात तज्ञ/माहीतगार आहेत त्यात म्हणजे अर्थशास्त्र (Quantitative Methods in Economics and Business) तसेच भारत-चीन-अमेरीका (Economic Development in India and East Asia) या विषयांवर ते तीन महीने येऊन शिकवू लागले. जे काही ऐकले आहे, त्याप्रमाणे त्यांचे कोर्सेस (विशेष करून अभारतीय) विद्यार्थ्यांना आवडत असत.

पण वर उल्लेखलेल्या डिएनए मधील लेखानंतर हवा बदलली आणि येथील भारतीय विद्यार्थ्यांच्या सेक्यूलर तसेच काही मुस्लीम संघटनांनी आवाज उठवला आणि त्यांना काढून टाकायची मागणी केली. आता येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की अमेरीकेत भाषणस्वातंत्र्यास नुसते घटनासिद्धच नाही तर या देशाच्या जडणघडणीतला महत्वाचा भाग आहे. अ‍ॅकेडेमिक इन्स्टीट्यूशनमधील "फ्रिडम ऑफ स्पिच आणि थॉट्स" तर अतिशय पवित्र आणि संरंक्षित हक्क आहेत. त्याला धरूनच हार्वर्डच्या अध्यक्ष ड्र्यू फॉस्ट यांनी भाषणस्वातंत्र्याच्या हक्काचा मान ठेवत असल्या सगळ्या मागण्या नाकारल्या आणि स्वामींचे शिकवणे चालूच राहीले.

पण जी प्राध्यापकांची समिती पुढील वर्षाचे कोर्स ठरवते त्यांनी मात्र डिसेंबर ६ ला बैठक घेऊन निर्णय घेतला की स्वामीचे कोर्सेस काढून टाकायचे. ते करत असताना, त्यांनी स्वामींना कळवले देखील नाही. आणि तसे करायचे कारण हे त्यांचा तो लेख असे देखील नंतरच्या मत-वक्तव्यांमधून जाहीर केले.

काल या संदर्भात ज्या समितीने निर्णय घेतला त्या समितीच्या प्रमुख प्रा. डायना एक professor of comparative religion and Indian studies, Harvard Divinity School यांची, त्यांच्या निर्णयास (स्वामींची बाजू न घेता, स्वातंत्र्यावर घाला म्हणून) विरोध करणारे हार्वर्डचे काँप्यूटर सायन्सचे प्रा. हॅरी लूईस आणि अर्थातच डॉ. स्वामींच्या घेतल्या गेलेल्या मुलाखती रेडीओ बॉस्टनवर ऐकल्या.

प्रा. एक यांच्यामते त्यांचा लेख जहाल होता तसेच ते काही कायम स्वरूपी प्राध्यापक नाहीत तेंव्हा काही बिघडत नाही. स्वामी नुसते येऊन हार्वर्ड मधे बोलू शकतात पण प्राध्यापक म्हणून नाही. (अर्थात हे म्हणत असताना त्यांनी स्वामी कधीच या म्हणजे वादग्रस्त विषयावर आणि त्यांच्या मतांवर वर्गात बोलले नाहीत अथवा त्यांचे विषयच वेगळे आहेत हे सांगितले नाही!) . मुलाखतकर्तीने प्रा. डायना एकना विचारले की, " धार्मिक जहाल आणि अल्पसंख्यांकांना हानीकारक मते या कारणावरून त्यांचे कोर्सेस नाकारले गेले. पण सौदी अरेबियामधे अल्पसंख्यांकांना काहीच हक्क नाहीत, धार्मिक स्वातंत्र्य नाही, तर मग तेथील क्राऊन प्रिन्सने दिलेले $२० मिलियन्स हार्वर्डने कसे घेतले?" अर्थातच त्याला या प्राध्यापिकेकडे उत्तर नव्हते.

स्वामींच्या मते, नुसतेच कोर्सेस काढले असते तर प्रश्न नव्हता. तो हार्वर्डच्या समितीचा हक्क आहे. पण जे कारण काढून सांगितले त्यात त्यांची बाजू देखील ऐकली नाही अथवा त्यांना कळवले देखील नाही. हे चुकीचे आहे. अर्थातच मुलाखतर्तीने स्वामींना भारतात मतदान हक्क वगैरे वर त्यांनी जी मते मांडली होती त्यावर विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाहीत. पण त्यांच्या मताप्रमाणे त्यांचे लेखातील विचार हे (परकीय जिहादी मुसलमानांच्या जवळ जाणार्‍या) भारतीय मुस्लीम समाजाला जवळ कसे आणता येईल यावर उहापोह करत होते, थोडक्यात त्यांचा दॄष्टीकोन हा inclusive होता तर हार्वर्डने चर्चा न करता त्यांना दूर करणे हे exclude करणे झाले.

प्रा. हॅरी लुईस यांनी स्वामींच्या लेखाची बाजू घेतली नाही. पण त्यांचे म्हणणे होते की ते राजकीय लेखन होते आणि जर आपण राजकीय लेखनास संरक्षण देत नसलो तर ते अयोग्य आहे. त्यातून चुकीचे पायंडे पडतात. ज्या स्वामींच्या कोर्सेसना समर कॅटलॉगमधून काढले गेले आहे ते (अथवा तसेच) कोर्सेस हे स्प्रिंग सेमिस्टरमधे जो (अमेरीकन) प्राध्यापक शिकवतो आहे तो देखील वादग्रस्त आहे कारण तो मानवी हक्कांच्या विरोधात बोलला आहे. मग त्याचे देखील कोर्सेस काढणार का? त्याचा परीणाम इतर कायमस्वरूपी (टेन्यूअर) नसलेल्या प्राध्यपकांच्या विचारस्वातंत्र्यावर देखील होऊ शकतो आणि परीणामी विद्यापिठाच्या गुणवत्तेवर देखील होऊ शकतो.

हार्वर्डच्या भाषणस्वातंत्र्याच्या मार्गदर्शक तत्वांमधे सुरवातीसच म्हणले आहे, : "As a community we take certain risk by assigning such a high priority to free speech. We assume the long term benefits to our community will outweigh the short term unpleasant effects of sometimes noxious views."

आणि या संदर्भातच त्यांनी (प्रा. लुईस यांनी) व्होल्टेअर या १७व्या शतकातील फ्रेंच तत्वज्ञाचे एक सुप्रसिद्ध वाक्य वापरले, "I may not agree with what you say, but I will defend to the death your right to say it.” हे वाक्य ऐकले आणि भाषणस्वातंत्र्याच्या अर्थाची परत एकदा जाण झाली.

प्रतिक्रिया

रेवती's picture

5 Jan 2012 - 9:20 pm | रेवती

लेख छान झालाय. आवडला.
स्वामींना कळवायला हवे होते इतकेच म्हणू शकते.
न जाणो काही काळानंतर हाच विषय मुख्य अभ्यासाचा ठरू शकेल.

अन्या दातार's picture

5 Jan 2012 - 9:55 pm | अन्या दातार

सुब्रमणियम स्वामींच्या लेखावरुन माजलेले काहूर फक्त इंग्रजी मीडिया व दैनिकांपुरतेच मर्यादित राहिले. त्यावर आधारीत "डेविल्स अ‍ॅडवोकेट" हा करण थापरचा कार्यक्रमही बघितला. लेखातली मते पटली नाहीत. पण हार्वर्ड मधून केलेले निलंबन पटले नाही. जर ते शिकवत असलेला विषय धार्मिक नसेल तर काय हरकत आहे त्यांनी लेक्चर्स घ्यायला? शेवटी प्रत्येकाची व्यक्तिगत मते संस्थेला पटत असावीतच असे नाही ना. स्वामींनी उघडपणे बोलून दाखवली. एकूण यात हानी फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचीच झाली आहे.

पिवळा डांबिस's picture

6 Jan 2012 - 12:50 am | पिवळा डांबिस

हार्वडने डॉ स्वामींसारख्या वैश्विक अर्थतज्ञाचे कोर्सेस काढून टाकले (आनि च्यामारी ते बी दोन पैशाचं कार्ड टाकून न कळिवतां!!) याबद्दल हार्वडचा निषेध!! (इथे आमच्या सर्किटभौची लई लई आटवन येत आहे!!:()

या अन्यायाबद्दल बॉस्टनमधील सर्व भारतीय लोकांनी (जानेवारीत!!) ऑक्युपाय हार्वड आंदोलन सुरु करावे अशी आम्ही समस्त मिपाकरांतर्फे जाहीर मागणी करतो!!!

विकास's picture

6 Jan 2012 - 1:27 am | विकास

हा हा हा!

इथे आमच्या सर्किटभौची लई लई आटवन येत आहे!!

अगदी १००% सहमत! :-)

या अन्यायाबद्दल बॉस्टनमधील सर्व भारतीय लोकांनी (जानेवारीत!!) ऑक्युपाय हार्वड आंदोलन सुरु करावे अशी आम्ही समस्त मिपाकरांतर्फे जाहीर मागणी करतो!!!

हं, तुमचं काय जातयं म्हणायला! अंतस्थ हेतू समजतोय मला, तुम्ही बसलाय वेश्टकोष्टात... आणि आम्ही इष्टकोष्टात जानेवारीत ऑक्यूपाय करायचे म्हणजे आम्ही थंडीने काकडून जाऊ, मग युनिवर्सल हेल्थ केअर वापरावा लागेल, त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परत अनर्थ होणार, मग नोव्हेंबर मधे बिचार्‍या ओबामाचे हाल होणार... :-) अर्थात कदाचीत अर्थव्यवस्थेचे असे का झाले हे समजून घेण्यासाठी परत स्वामींना बोलावता येईल म्हणा! ;)

नंदन's picture

6 Jan 2012 - 6:26 am | नंदन

आहे! हा घोर अपमान आहे. डेव्हिडकाका प्लफना याबद्दल इमेल पाठवून (अ‍ॅक्सलरॉडने दगदग झेपत नाही म्हणून काम सोडलंनीत म्हणतात) समस्त अनिवासी भारतीयांनी - आणि खासकरून बोस्टनवासीयांनी दाद मागायला हवी :)

लेख छानच झालाय. अमेरिकेतील भाषणस्वातंत्र्य हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. "फ्रिडम ऑफ स्पिच आणि थॉट्स" हे अतिशय पवित्र आणि संरंक्षित हक्क आहेत असे म्हटले तरी कित्येकवेळा गैरसोयीचे बोलणार्‍याला जसे वागवले जाते, ते बघता हे हक्क केवळ तथाकथित आहे का असे कधीतरी वाटते. जसे मायकल मूरने ऑस्कर घेतांना दिलेल्या भाषणानंतर त्याला थोबाडीत मारली होती. व्हिडीओमधे वाकी लोकांचे चेहरे पहा. त्याचे भाषण इथे वाचता येईल -
http://psychoanalystsopposewar.org/resources_files/MichaelMooreAcceptanc...
आणि इथे बघता येईल -
http://www.youtube.com/watch?v=fc2dMHNk-1Q
लक्षात घ्या, हा व्हीडीओदेखील टीव्हीवरून केलेला आहे. आजही ह्या भाषणाचा ऑफिशियल व्हिडीओ सापडत नाही. मला वाटते, त्यांच्या मतांचा एक टॉलरन्स बॅंड आहे, त्या रेंजमधे(च) standard deviation होईल इतपत भाषणस्वातंत्र्य आहे. त्याबाहेरील मते मोठ्या खुबीने, गुढपणे गायब होतात.

Noam Chomsky हा असाच अजून एक गैरसोयीचे बोलणारा - त्याबद्द्ल माझ्या अमेरीकेतल्या सहकार्‍यांची मते ऐकली आणि असाच थक्क झालो होतो. त्याला कसे हस्यास्पद ठरवले जाते हे पाहिल्यावर मग आपल्या इथे किरण बेदी, अरविंद केजरीवाल ह्यांना सरकारने कसे निष्प्रभ केले हे सहज कळू शकते. तसेच कम्युनिझम बद्दल काहिही पॉसिटीव्ह बोलणे हा फार मोठा गुन्हा असल्यासारखे अमेरिकेत बघितले आहे. फार कशाला, त्यांच्या मिडीयाचे इंटरव्ह्यू काळजीपुर्वक बघितले की ते किती leading प्रश्न विचारतात हे सहजच दिसते. आपल्या इथे फार वेगळी परिस्थिती आहे असं नाही, पण तथाकथित भाषणस्वातंत्र्याची टिमकी वाचवणार्‍या अमेरिकेतील भाषणस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य हे 'within the limits of big brother watching' इतकेच आहे. सुदैवाने इंटरनेट आणि विकीलिक्समुळे फार काळ गोष्टी गुप्त राहू शकत नाही.

काही दशकांपुर्वी अनिल अवचटांना अमेरीकेत मॉल वगैरे बघून कसे वाटले हे विचारले होते (तेंव्हा आपल्याकडे मॉल्स फोफावले नव्हते) - त्यांनी बाकी भारतीयांसारखे 'खूप भव्या आहेत, खूप व्हरायटी आहे' अशा टाईपचे 'भारावलेले' उत्तर दिले नव्हते - पण 'माझ्या देशातील वाण्याशी जसे माझे जिव्हाळ्याचे संबंध अहेत, तसे काही मॉलमधे वाटत नाही' असे माध्यमांना गैरसोयीचे उत्त्र दिले होते (बहुदा माध्यमांनी तेंव्हा 'भारतीय लेखक अमेरीकेतील भव्य मॉल्स व सुविधा पहून भारावले' अशी काहीतरी हेडलाईन केली असेल). त्यांची प्रतिक्रिया अर्थातच छापली गेली नाही. त्यांच्याकडे मिडीयाला फार व्यवस्थित वापरून जनमत तयार केले जाते.

अमेरिकेत भाषणस्वातंत्र्य आहे, पण फार गैरसोयीचे झाल्यास पद्धतशीर मुस्कट्दाबी केली जाते. सुब्रमण्यम स्वामींबद्ल वाचून वाईट वाटले, पण फार आश्चर्य नाही वाटले. निदान अशा उदाहरणांवरून तरी जागतिक महासत्तेचे खरे रूप उघडकीस येईल.

- मनिष

जाता, जाता - आपल्याकडे सुब्रमण्यम स्वामी, चिदंबरम, स्वतः मनमोहन सिंग अशी सर्वार्थाने विद्वान आणि उच्चशिक्षित राजकारणी असतांनाही देशाचे हे हाल होतात हा त्यांच्या शिक्षणाचा पराभव की घाणेरड्या राजकारणाचे वर्चस्व हे काही कळत नाही. काहिही कारण असले तरी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशापुढच्या समस्या सोडवण्यासाठी होत नाही, हे आपले दुर्दैव! :(

विकास's picture

6 Jan 2012 - 5:50 am | विकास

मायकल मूरच्या वरील चित्रफितीबद्दल कल्पना नव्हती, नवीन माहिती कळली!

नॉम चॉम्स्कींच्या संदर्भात देखील सहमत! त्यांचे "Understanding Power: The Indispensable Chomsky" पुस्तक वाचण्यासारखे आहे. बरेच काही कळते... सगळे पटले नाही अथवा व्यावहारीक वाटले नाही तरी एक वेगळा दृष्टीकोन मिळू शकतो. पण अगदी लिबरल म्हणणारे पण सत्ताधीश झाल्यावर त्याला जवळ करणार नाहीत. अर्थात चॉम्स्कींना पण जवळ जायचे नसते हा भाग वेगळा! :-)

अनिल अवचटांचे "अमेरीका" पुस्तक प्रत्यक्ष वाचलेले नाही पण त्याचे परीक्षण वाचले आहे, इतरांकडून ऐकलेले आहे. त्याचा विचार केल्यास ते देखील टोकाचे वाटते. आपण सांगत असलेला आणि त्यांनी म्हणलेला जिव्हाळा येथे देखील कोणे एके काळी जेंव्हा "मॉम अँड पॉप स्टोअर्स" होती तेंव्हा होता. त्याची थोडी फिल्मि झलक You've Got Mail मधील मेग रायनच्या दुकानात दिसते. आमच्याकडे (बॉस्टन भागात) अशी काही दुकाने आजही आहेत. जेथे आवर्जून जाणारे आहेत. बाकी अवचटांनी जे बघितले अथवा जे काही एकूणच बदलले आहे, त्याचे कारण संपूर्ण बदललेली अर्थव्यवस्था आहे... अमेरीकेतील सामन्य जनता त्यांच्याच देशाच्या या अवाढव्य आणि यशस्वी अर्थव्यवस्थेची बळी झाली आहे. (Victim of their own nation's success) आणि त्याचा आपण विचार करणे महत्वाचे आहे असे वाटते.

सुब्रमण्यम स्वामींबद्ल वाचून वाईट वाटले, पण फार आश्चर्य नाही वाटले. निदान अशा उदाहरणांवरून तरी जागतिक महासत्तेचे खरे रूप उघडकीस येईल.

प्रामाणिकपणे मला आनंदही झाला नाही अथवा वाईटही वाटले नाही. कारण त्यांच्या लेखातील अनेक विचार मला न पटणारे होते. राहता राहीले भाषणस्वातंत्र्याची गळचेपी, ती महासत्तेच्या विद्वानांनी केली हे खरे आहे, पण त्याला जास्त करून कारण आपलीच इथली माणसे आहेत याचे वाईट वाटते - त्यात जसे विद्यार्थी आहेत तसेच (भारतीय वंशाचे) प्राध्यापकही आहेत, ज्यांना अशा मुस्कटदाबीची मागणी करताना काही वाटले नाही...

आपल्याकडे सुब्रमण्यम स्वामी, चिदंबरम, स्वतः मनमोहन सिंग अशी सर्वार्थाने विद्वान आणि उच्चशिक्षित राजकारणी असतांनाही देशाचे हे हाल होतात हा त्यांच्या शिक्षणाचा पराभव की घाणेरड्या राजकारणाचे वर्चस्व हे काही कळत नाही. काहिही कारण असले तरी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशापुढच्या समस्या सोडवण्यासाठी होत नाही, हे आपले दुर्दैव!

त्याचे प्रमुख कारण असे आहे की येथील जनतेला अमेरीका राहीली तर आपण राहू या साध्या वास्तवाचे भान आहे. त्यामुळे अमेरीकन स्वार्थ तो आपला स्वार्थ. अजून एक महत्वाचा भाग म्हणजे विविध विद्यापिठांचे (बॉस्टन, न्यूयॉर्क, पासून ते शिकागो, बर्कलीपर्यंत) विविध विषयातील तज्ञ आणि त्यांच्या हाताखाली तयार झालेले त्यांचे विद्यार्थी हे कधी ना कधी पब्लीक सर्विस मधे येतात अथवा अप्रत्यक्ष सहभागी होतात. त्यांच्या विचाराला मान मिळतो, एकमत होवो अथवा न होवो ऐकून घेतले जाते. आपल्याकडे माणसे आणि विद्वत्ता खरेच कमी नाही, पण असे होते असे वाटते का?

जळ्लं मेलं ते हवर्ड कि फिवर्ड इद्यापिठ...

पैसा's picture

6 Jan 2012 - 10:17 pm | पैसा

भारतात डीएनए किती लोकांपर्यंत पोचतं हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे भारतात फार ओरडा झाला नाही हे साहजिकच आहे, त्यातून "जोकर" अशी स्वामींची इमेज तयार झालेली आहे. ते अनेकदा वादग्रस्त विधाने करत असतात, त्यामुळे कोणी फार लक्ष दिलं नसावं. भारतात "गप्प बसा" संस्कृतीची फार मोठ्या लोकसंख्येला सवय असते, त्यामुळे भाषणस्वातंत्र्य, त्याचा संकोच हे भारतात फार मोठे मुद्दे होऊ शकत नाहीत.

अमेरिकेन दुटप्पीपणा काही नवा नाही. सगळीकडे कमी अधिक प्रमाणात हे चालतंच.