गेल्या काही दिवसातल्या घटना -
१) दर दोन महिन्यांनी मोठमोठ्या गर्जना करून टीम अण्णांनी भारतीय घटनेला आणि आपल्या सार्वभौम अशा संसदेला सो कॉल्ड जन-आंदोलनांच्या धारेवर धरणे,
२) टीम अण्णांकडून (आणि काही वेळेला खुद्द अण्णांकडूनही) झालेल्या बेताल वक्तव्यांमुळे,
३) जनलोकपालबाबत 'माय वे ऑर हाय वे..' अशा हुकुमशाही अडेलतट्टू आणि इगोइस्टिक भूमिकेमुळे,
४) सर्वच पक्षात भ्रष्टाचार बोकाळला असताना केवळ काँग्रेस पक्षाबाबतच 'अँटी करप्शन ऐवजी अँटी काँग्रेस' असा छुपा अजेंडा घेऊन आगपाखड केल्यामुळे, (आजतागायत लोकपालसंदर्भात भाजपने केवळ 'कुंपणावरची' अशी अत्यंत सोयिस्कर भूमिका घेतल्याचे आमचे मत आहे. 'अण्णाकंपनी यात काँग्रेसला शिव्या देतेच आहे ना, मग चांगलंच आहे!' असे म्हणून भाजपाला मनातल्या मनात उकळ्या फुटत आहेत. वास्तविक पाहता, काँग्रेस/भाजपा/शिवसेना/सप/बसपा इत्यादी कुणालाच तो लोकपाल मनापासून नको आहे ही वस्तुस्थिती आहे, परंतु सत्तेत सध्या काँग्रेस असल्यामुळे सर्वांनी एकट्या काँग्रेसच्या डोक्यावर मिर्या वाटणे व आपली पोळी भाजून घेणे हे राजकीयदृष्ट्या साहजिकच आहे. ह्या सार्यात आम्हाला 'लोकपाल नावाचा गडाफी हुकुमशहा मुळातच नको' अशी शिवसेनेने घेतलेली भूमिका आम्हाला कौतुकास्पद वाटली.)
५) भारताचे कृषीमंत्री शरद पवारांवरील हल्ल्याची खिल्ली उडवल्यामुळे (अर्थात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला त्याचा फायदाच झाला आणि महाराष्ट्रातील बहुतांशी नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली हा भाग वेगळा!)
६) फक्त आम्हा ५-६ लोकांनाच कायदा आणि घटनेतले काय ते समजते अशा थाटात टीम अण्णांची सततची चाललेली अरेरावी आणि ह्या ५-६ लोकांनी सारी घटना व संसद वेठीला धरण्याचा केलेला प्रयत्न,
७) आम्हा ५-६ लोकांकडेच काय ते १२० करोड भारतीय जनतेचे प्रतिनिधीत्व जाते असा घेतला गेलेला पवित्रा,
या आणि अशा अनेक कारणांमुळे टीम अण्णांच्या (आम्ही आमच्या सर्व लेखनामध्ये अधिक करून अण्णां ऐवजी 'टीम' अण्णांबाबतच वक्यव्ये केली आहेत. खुद्द अण्णा हे निस्पृह असून त्यांच्याबद्दल आम्हाला आजही आदरच आहे. परंतु हेच अण्णा आता 'टीम' अण्णांच्या कह्यात गेले आहेत अशी खात्रीलायक चर्चा आताशा बहुतांशी गोटातून होऊ लागली आहे. ह्याच टीम अण्णांच्या वतीने, ज्यांच्यावर वाळू-माफियागिरीचा संशय आहे, असे अण्णांचे सचिव सुरेश पठारेही आजकाल घटनातज्ञ असल्यासारखे वाहिन्यांवरून मुलाखती देत आहेत) आंदोलनाची धार बोथट झाली आणि परवापासून सुरू झालेले आंदोलन मुंबईकरांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे झक्कत मागे घावे लागले.
मुंबईतील थंडी (?), वर्षाखेर असल्यामुळे लोकांचे बाहेरगावी जाणे, अशी काही कारणे देऊन टीम अण्णा आपल्या तोंडघाशी पडलेल्या आंदोलनाचे समर्थन करू पाहात होती. त्यातच आंदोलनाला येऊ इच्छिणार्यांना बांद्रा आणि सायन स्थानकावर पोलिस अडवत आहेत असाही एक हास्यास्पद आरोप केजरीवालांनी करून पाहिला. परंतु ह्या आंदोलनाची धार आता बोथट झाली आहे ही वस्तुस्थिती स्विकारायला टीम अण्णांचे उद्दाम सदस्य अजूनही तयार नाहीत.
आंदोलनाला आलेल्यांना नाष्टा-जेवण देऊन, अनुपम खेर ह्या सिनेकलावंताला रंगभूमीवर पाचारण करून, बाबा रामदेवांना (बाबा आले नाहीत हा भाग वेगळा,) साद घालून टीम अण्णाने हे आंदोलन वाचवण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्याला यश आले नाही. दरदिवशी दीड-दोन लाख या दरानं भाडं भरून लाखभर पब्लिकच्या अंदाजाने घेतलेलं मैदान अवघ्या दोन-पाच हजार आंदोलकांचीच उपस्थिती दाखवू शकलं आणि मयंक गांधी आदी प्रभूतीमधील बिझिनेस सेन्स जागा झाला आणि मंडळींनी वेळीच आंदोलन आवरतं घेऊन उर्वरीत भाडं वाचवलं..! मुंबईतील आंदोलनाचा अशा रितीने फुगा फुटल्यावर 'जेलभरो'च्या आवाहनात आपण असेच मजबूत तोंडघाशी पडू अशी चतुर खूणगाठ टीम अण्णाने मनाशी बांधली व अण्णांना 'जेलभरो आंदोलन' मागे घेण्याचे आवाहनही करावयास लावले.
ह्या सगळ्यात एकच गोष्ट चांगली झाली आणि ती म्हणजे अण्णांचं उपोषण सुटलं. कारण अण्णा अत्यंत आजारी होते. अंगात बर्यापैकी ताप, रक्तदाबाचा त्रास, अशक्तपणा या सगळ्यात त्या वृद्ध माणसाला टीमने उपोषणाच्या ज्या दावणीला बांधलं होतं ती दावणी तरी सुटली. अण्णांची प्रकृती ही केव्हाही महत्वाचीच.
अपेक्षेप्रमाणेच काँग्रेसने नेहमीप्रमाणे सराईत डाव खेळून राज्यसभेत लोकपालाकरता मतदान होऊ दिले नाही आणि बजेटसत्रापर्यंत तरी लोकपाल विधेयक लटकले असे आता म्हणता येईल. अण्णाही आता राळेगणास रवाना झाले असून पुढील ३ दिवस ते मौनव्रतात जाणार आहेत. शिवाय डॉक्टारांनी त्यांना आता ८-१० दिवस पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले आहे. ह्या चार-आठ दिवसात अण्णांनी आता खरोखर चिंतन-मनन करावे आणि आपल्या टीमचे चाळे वेळीच ओ़ळखावेत. ह्या टीमने स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याकरता पुरेपूर उपयोग करून आपल्याला कसे तोंडघाशी पाडले, हेही ओळखावे.
उपोषण मागे घेताना अण्णांनी आता 'मतदार जागृती अभियान' चालवणार अशी घोषणा केली आहे. अण्णा, देअर यू आर.. !
आम्हीही नेमके हेच सांगायचा प्रयत्न करत होतो. इन फॅक्ट अण्णांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा करण्याआधीच आम्ही इथे मिपावर याबाबत भाष्य केले होते व आंदोलनापेक्षा मतदारांचे प्रबोधनच अधिक महत्वाचे आहे असे म्हटले होते. (संदर्भ - सन्मामनीय मिपा सभासद श्री पेठकर यांच्या एका प्रतिक्रियेला उत्तर देताना आम्ही इथे तसे म्हटले होते)
लोकपालानंतर अण्णांनी 'राईट टू रिजेक्ट' ह्याकरता आंदोलन करण्याचे ठरवले आहे असे कानावर आले. प्रथमदर्शनी तरी आम्हाला 'राईट टू रिजेक्ट' ह्यात काही वावगे वाटत नाही. तरी भारतीय घटनेला व संसदेला कुठेही धक्का न लावता जर असा कायदा पारीत करता येणं शक्य असेल असे आम्हास वाटले तर आम्हीही अण्णांच्या 'राईट टू रिजेक्ट' ह्या आंदोलनामागे आनंदाने उभे राहू!
असो..
तळटीप - ह्या तळटिपेद्वारा ज्यांना हे लेखन गरळ ओकणारे, फालतू, विखारी इत्यादी वाटेल अशा सर्व वाचकमित्रांचे आम्ही आगाऊ आभार मानत आहोत. त्यांच्या मताचा आदर आहेच!)
--कॉमॅ.
प्रतिक्रिया
30 Dec 2011 - 3:15 pm | निश
सहमत लेखातिल विचारांशी.
तुमच म्हणण व लेख बरोबर आहे.
त्यांचा असा फियास्को झाला ह्याबद्दल मला वाटत टीम अण्णा यांचा अति आत्मविश्वास नडला त्याना.
30 Dec 2011 - 3:30 pm | गणपा
तुमच्या विचारांबद्दल काही म्हणणं नाही.
पण एकंदर या विषयावर निघणारे धागे काथ्याकुट पहाता आता "जनलोकपाल" नको पण धागे आवरा असे म्हणावेसे वाटूलागले आहे.
आवंतर : हे केवळ तुमच्या धाग्याला उद्देशून नाही.
30 Dec 2011 - 3:44 pm | निश
गणपा साहेब
चांगल्या कामांचि सुरुवात विचार व चर्चा ह्यामधुन होते.
अजुन एक मि आपल्या मिपा वरिल पा़ककृति न चुकता करतो व करुनहि बघतो.
खुपच सुंदर असतात. आपण ज्या प्रकारे लिहिता त्या मुळे खुप सहज वाटतात करयला.
30 Dec 2011 - 3:49 pm | गणपा
अहो पण जी काही चर्चा करायची आहे ते एकाच फार फार तर २-३ धाग्यात करा की.
रोज सकाळी थोड फार शिर्षक बदलुन तेच गुर्हाळ चालू असतं. त्याचा वीट आलाय असे म्हणालो.
चर्चेला माझा आक्षेप नाही.
आवांतरा बद्दल धन्यवाद.
30 Dec 2011 - 4:05 pm | कॉमन मॅन
आदरणीय गणपासाहेब,
आपल्या मताचा आदार आहे, परंतु ज्या कलमांच्या आधारे आपण आपलं मत मांडलं आहे, आम्हीही त्याच कलमानुसार (भारतीय राज्यघटना -कलम १९, क्लॉज १, सबक्लॉज ए नुसार क्लॉज २ मधील अटींचे पालन) करूनच आमचा लेख लिहिला आहे.
आपला नम्र,
-- कॉमॅ.
30 Dec 2011 - 4:19 pm | गणपा
मी वर आधीच म्हटलं आहे की आपल्या विचारांबद्दल आणि केवळ या धाग्याबद्दल मी हे लिहिलेलं नाही.
पण गेल्या काही दिवसांत आलेले हे लेख पहा.
लोकपाल आणि भ्रष्टाचार...
अण्णा चक्रव्यूहातील अभिमन्यू !
"टिम अण्णा"ने दिले दिग्वीजयसींगना सडेतोड उत्तर
ऐका हो ऐका - 'टीम अण्णांच्या उपोषणाचा इव्हेन्ट उद्यापासून..!
आता मतदार जागृती अभियान. अण्णा, देअर यू आर..!
अन्ना हझारे आनि सच का सामना
संसदेतला गोंधळ
आंदोलन आणि फलित
सगळ्यांत थोड्या फार फरकाने तीच आणि तीच चर्चा चालू आहे.
तुमची चर्चा ही 'फांदी मोडायला' कारण झाली आहे. इतकच माझं म्हणण आहे.
30 Dec 2011 - 4:28 pm | कॉमन मॅन
खुलाश्याबद्दल खरोखरच कृतज्ञ आहे..
--कॉमॅ.
30 Dec 2011 - 4:17 pm | निश
गणपा साहेब
मिपासाख चांगल व्यासपिठ असल्यामुळे व आपल्या सारखे व कॉंमन मॅन सारखे विचार करणारे जाणकार वाचक व लेखक आहेत म्हणुन तेच तेच धागे परत येतात
30 Dec 2011 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"जनलोकपाल" नको पण धागे आवरा असे म्हणावेसे वाटूलागले आहे.
हाहाहा. सहमत आहे. :)
आवंतर : हे केवळ तुमच्या धाग्याला उद्देशून नाही.
हम्म, सहमत आहे.
-लेख वाचून नंतर प्रतिसाद डकवतो.
-दिलीप बिरुटे
30 Dec 2011 - 3:50 pm | पुण्याचे वटवाघूळ
आजपासून मी तर कॉमन मॅनच्या लेखांचा फ्यान.
(रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
30 Dec 2011 - 8:01 pm | daredevils99
संपूर्ण लेखाशी सहमत.
आम्ही आमच्या सर्व लेखनामध्ये अधिक करून अण्णां ऐवजी 'टीम' अण्णांबाबतच वक्यव्ये केली आहेत. खुद्द अण्णा हे निस्पृह असून त्यांच्याबद्दल आम्हाला आजही आदरच आहे
म्हणूनच मी टीम अण्णा ऐवजी गँग अण्णा असा शब्द नेहेमी वापरतो.
30 Dec 2011 - 10:08 pm | अर्धवटराव
कुठल्याश्या हातघाईच्या प्रसंगी एका माणसाची चड्डी सुटते.. ते बघुन दुसरा प्रचंड हसायला लागतो. नंतर कळते कि तो आरश्यात बघत होता... असला काहिसा एक विनोद आठवला...
बाकी गांधीबाबांना मानलं बुवा. आपली आंदोलने मागे घेताना "भारत अजुन स्वातंत्र्यप्राप्तीला तयार नाहि" अशी स्वच्छ भुमीका ते घेत असं म्हणतात. त्याचा अर्थ आता थोडा थोडा कळायला लागलाय.
(आम आदमी) अर्धवटराव
31 Dec 2011 - 1:41 pm | हंस
सुपर लाइक!!