डांबिसकाकूची रेसेपी श्री. पेठकरकाकांनी आग्रह केला म्हणून इथे देत आहे.....
साहित्यः
मटण १ किलो, बासमती अख्खा (तुकडा नव्हे) तांदूळ सहा वाट्या, पाच कांदे (दोन तळण्यासाठी, दोन मटणासाठी व एक छोटा वाटणात घालण्यासाठी), दोन मध्यम आकाराचे बटाटे (तळण्यासाठी),
वाटण: अर्धा कांदा, १०-१२ लसूण पाकळ्या, बोटभर आले, अंदाजे एक टेबलस्पून पुदिन्याची पाने (फक्त पाने, देठ नव्हेत), एक हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, एक टिस्पून बडिशेप, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टिस्पून मिरी व दोन लवंगा
गरम मसाला पावडर, हळद तिखट, मीठ
केशर, बदामाचे काप, पिस्ते, काजू बेदाणे
मटणासाठी व भातासाठी: लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र (आपल्या चवी-आवडी प्रमाणे)
तेलः रिफाईंड
कृती:
मटणासाठी वाटणः
अर्धा कांदा, १०-१२ लसूण पाकळ्या, बोटभर आले, अंदाजे एक टेबलस्पून पुदिन्याची पाने, एक हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, एक टिस्पून बडिशेप, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टिस्पून मिरी व दोन लवंगा हे सर्व थोड्या पाण्यात बारीक वाटून घ्यावे.
मटण कृती:
मटण साफ करून त्याला हळद, तिखट आणि मीठ लावून दोन तास तरी मॅरिनेट करावे. तेलावर लवंग, मिरी, दालचिनी व तमालपत्रे घालून फोडणी करावी. त्यावर चौकोनी चिरलेले दोन मोठे कांदे घालून चांगले बदामी ब्राऊन होईपर्यंत परतावे. त्यावर वरील मटणाचे वाटण अर्धे घालून १-२ मिनीटे परतावे. चांगला वास सुटल्यावर मटण घालून कमीतकमी दहा मिनीटे परतावे. अर्धी वाटी पाणी घालून झाकून शिजवावे. मटण पूर्ण शिजू द्यावे. मटण शिजल्यावर त्याला उरलेले वाटण घालून व अर्धा चमचा गरम मसाला घालून एक उकळी काढून घ्यावी. शिजलेल्या मटणाला थोडासा रस्सा असू द्यावा पण फार पातळ करू नये.
लेयरसाठी तयारी:
कांदा पातळ लांबट चिरून थोड्याच तेलावर अगदी ब्राऊन होईपर्यंत पॅनमध्ये तळून घ्यावा. बाजूला काढून त्यावर थोडे मीठ व किंचितसी गरम मसाला पावडर टाकावी. बटाट्याचे साल काढून असेच लांबट पातळ काप करुन त्याच पॅनमध्ये थोड्या तेलावर गुलाबी होईपर्यंत तळून घ्यावेत. बाजूला काढून त्यावर थोडे मीठ भुरभुरावे. त्याच पॅनमध्ये बदामाचे पातळ काप, काजू व पिस्तेही परतून घ्यावेत. त्यात बेदाणेही घालावेत पण बेदाणे तळू नयेत.
भातः
बासमती तांदूळ पाण्यात धूवून अर्धा तास निथळत ठेवावे. दोन टेबलस्पून तेलामध्ये लवंगा, मिरीदाणे आणि तमालपत्र परतून त्यावर भिजवलेले बासमती तांदूळ घालून दाणे मोडू न देता अलगदपणे सुमारे पाच मिनीटे परतावे. तांदळाच्या दीटपट पाणी घालून एक दाणा कमी शिजवावेत. भात शिजतांना त्यात थोडे मीठ व अर्धा चमचा गरम मसाला घालावा. चव सुंदर येते. भात शिजल्यावर ताबडतोब पातेल्यातून काढून परातीत मोकळा करावा. एका वाटीत दोन टीस्पून पाणी व एक टीस्पून तेल घेऊन त्यामध्ये पाव ते अर्धा चमचा केशराच्या काड्या घालून त्या बोटाने चुराव्यात. केशराचा चांगला रंग उतरल्यावर हे मिश्रण भातावर पसरून त्या भाताला हलक्या हाताने रंग लावावा.
लेयरिंगः
एका ओव्हनप्रूफ बेकिंग डिशला साजूक तुपाचा हात लावून घ्यावा. त्यावर भात, मटण, तळलेले कांदे/ बटाट्याचे स्लाईस आणि किसमिस याचे थर घालावेत. भांड्याच्या आकाराप्रमाणे दोन ते तीन थर घालावेत. वरून झाकण ठेवून ओव्हनमध्ये ३०० एफ ला पंधरा मिनीटे ठेवावे. चांगली वाफ येऊ द्यावी पण शिजवू नये.
सर्व्ह करतांना लेयर मोडून प्लेटमध्ये सर्व्ह करावे. या कृतीमध्ये अगदी कमी तेल (तेही रिफाईंड) वापरलेले असल्याने बिर्याणी हेवी होत नाही.
प्रतिक्रिया
7 Jun 2008 - 10:16 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद श्री. पिवळा डांबिस,
बिर्याणीची पाककृती छान वाटते आहे. आता एक दिवस करून पाहतो. मग पुन्हा प्रतिसाद देईन.
7 Jun 2008 - 10:25 pm | आसावरी जोशी
बिर्यानी सहीच आहे. करून पाहीन.
Thank you Mr. Dambis.
7 Jun 2008 - 11:01 pm | ईश्वरी
डांबिसकाका मस्त रेसिपी. काकूंना धन्यवाद.
ईश्वरी
7 Jun 2008 - 11:03 pm | यशोधरा
मस्त रेसिपी! काकूंना धन्यवाद, रेसिपी देण्यासाठी, आणि काका, तुम्हांलाही , इथे लिहिण्यासाठी :)
8 Jun 2008 - 3:08 am | चित्रा
हेच म्हणते.
11 Jun 2008 - 6:11 am | विसोबा खेचर
डांबिसा,
मस्तच पाकृ रे! डांबिसका़कूंना आपला सलाम...
त्यांना म्हणावं तात्या लवकरच तुमच्या हातची बिर्याणी खायला येणार आहे! :)
आपला,
(बिर्याणीप्रेमी) तात्या.
12 Jun 2008 - 12:07 am | स्वाती राजेश
मटण बिर्यानीची रेसिपी,
या प्रकारे नक्की करून पाहीन...
काकूंना धन्यवाद सांगा..आणि तुम्हालाही!!! आमच्यापर्यंत छान रेसिपी पोचवण्याची जबाबदारी पार पाडलीत.....:)
नविन रेसिपी त्यांना विचारून लिहा....लवकरच...:)
वाट पाहात आहे....
10 Aug 2008 - 6:15 am | समीरतलार
अगदि झकास
10 Aug 2008 - 7:06 am | प्राजु
अगदी बारकाव्यांसह दिली आहे रेसिपी. एकदम सोपी वाटते आहे. प्रत्येक स्टेप बाय स्टेप सुंदर मार्गदर्शन.
काका, तुम्ही करता का हो कधी अशी बिर्याणी??
काकूंना धन्यवाद सांगा. आणि ही पुतणी येणार आहे बिर्याणी खाण्यासाठी म्हणून सांगा. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
स्वगत : सध्या श्रावणात मटणा ऐवजी, सोयाबीनचे न्युट्रीला किंवा टोफू घालून करायला हरकत नाही.
18 Nov 2008 - 7:28 pm | SAGAR
वाचुन तोडाला पानि सुटले.