कर्नाळा किल्ला तो पाहू..!!

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in भटकंती
28 Dec 2011 - 4:55 pm

सकाळी ४.१५ चा कर्ण-कर्कश गजर उशाशी ठेवलेल्या मोबाईलमध्ये वाजला धडपडून जागा झालो. पटापट सगळं आवरून बाईक काढली आणी मित्राला घेऊन पनवेलच्या वाटेला लागलो. मुंबईकरांना कधी तरी अनुभवायला मिळणार्या पहाटेच्या गुलाबी थंडीने चांगलाच जोर पकडला होता. समोरून वेगाने येणार्या हवेने पायाला आणी हातांना चांगलेच कणके बसत होते. पनवेलला पोहचेपर्यंत ६.१५ वाजले होते. दिलेल्या वेळेप्रमाणे स्पा त्याच्या मित्राला घेऊन कल्याण-शिळ मार्गे पनवेलला एस टी स्टँडला हजर होता. वाजणारी थंडी कमी करण्यासाठी 'कटिंग' ची ऑर्डर देण्यात आली. चहा पिताना थोड्याफार गप्पा चालू होत्याच मग त्या तात्पुरत्या थांबवून आम्ही निघालो.

पनवेलपासून कर्नाळा पक्षी अभयारण्याचं अंतर १० किमी आहे त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाला गाड्या लागताच अगदी १०-१२ मिनिटात अभयारण्याच्या पायथ्याशी येऊन आम्ही पोहचलो. तिकिट काउंटर पासून थोड्या अंतरावर आत जात एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली गाड्या लावल्या आणी पक्षी अभयारण्याच्या दिशेने पावले वळवली. उदयोन्मूख फोटोग्राफर प्रसन्न आपटे याचा कॅमेरा तोपर्यंत गळ्यात आला आणी फोटोग्राफी किडे सुरू झाले. :)

दुरवर दिसणारा किल्ल्यावरील सुळका.

बर्‍याच ठिकाणी झाडाची मुळं जमिनीतून अशी वर आलेली दिसतात काही ठिकाणी ती बोटाएवढी छोटी आहेत तर काही ठिकाणी एकदम भली मोठी. वर चढताना त्यांचा खुप मोठा आधार मिळातो.

किल्ल्याची जमिनीपासुनची उंची १४०० फुट आहे आणी जाण्याची वाट सरळसोट उभी चढण असल्याने थकवा पटकन येतो. काही ठिकाणी थोडा वेळ विश्रांती घेऊनच पुढे जावे लागते. त्याचबरोबर पाण्याच्या ४-५ बाटल्याही जवळ असु द्याव्यात. घरातून घाई गडबडीत निघताना पाण्याची बॉटल न घेण्याचा महामुर्खपणा मला चांगलाच नडला. त्यातल्या त्यात स्पावड्याने त्याच्या बॅगेत पाण्याच्या २ बॉटल आणलेल्या होत्या त्यामुळे तात्पुरतं काम भागलं. पक्षी अभयारण्य होतं खर एखादा पक्षी दिसणं तर दुरची गोष्ट पण त्याच साधं पीसही आम्हाला दिसलं नाही. सकाळचा पक्ष्यांचा किलकिलाटचं तेवढ्यापुरतं मनाला समाधान देत होता.

आम्ही वर मोकळ्या पठारावर येईपर्यंत सुर्यनारायण जमिनीच्या गर्भातून वर आले होते.

मग खालच्या विहगंम दृश्याचं फोटोसेशन उरकण्यात आलं. :)
फोटो क्रं. १

फोटो क्रं. २

खालच्या संपुर्ण मोकळ्या पठारावर धुक्याची दाट चादर पसरली होती.
फोटो क्रं. ३

फोटो क्रं. ४

फोटो क्रं. ५

हा बघा लाल कपड्यातला पाढंरा बगळा. बगळीण कधी मिळेल याचा विचार करत असावा बहुदा! ;)

पठारावर आल्यानंतर एका ठिकाणाहून किल्ल्यावरच्या सुळक्याचं असं दर्शन झालं आणी काही क्षणाकरता आम्ही रस्ता चुकलोय असं वाटलं.

पण जसं जसं पुढे सरकत गेलो तसं आम्ही योग्य दिशेने जात असल्याची खात्री पटली. पठारावरून सरळ पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला कणाई मातेचं एक छोटसं मंदिर आहे. आतली देवीची मुर्ती संपुर्ण काळ्या पाषाणाची आहे आणी मनाला प्रसन्न करणारी आहे. सिंहावर विराजमान असलेल्या अंबेने तिच्या चारही हातात शस्त्र धारण केलेली दिसतात. बारकाईने निरिक्षण केल्यास असे कळते कि ते मंदिर आणी त्यातील मुर्ती हे बरोबर अशा ठिकाणी आहेत कि जिथे उगवत्या सुर्याच्या कोवळ्या सुर्यकिरणांचा देवीला अभिषेक होत असावा.

जसाजसा पुढे जात गेलो तसा तसा किल्ला आमच्या नजरेच्या ट्प्प्यात येऊ लागला.

सकाळच्या कोवळ्या सुर्यकिरणांमुळे किल्ला सोनेरी प्रकाशात झळाळत होता.

किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून बाहेरचा भाग..

कर्नाळा किल्ला कधी बांधला असावा याबाबतची अचुक तारीख नाहीये पण याचा ताबा १२४८ ते १३१८ या काळात देवगिरी यादवांकडे होता आणी त्यानंतर तो १३१८ ते १३४७ तुघलक राज्यकर्त्यांच्या ताब्यात होता. त्यावेळी उत्तर कोकण आणी त्यासंबधीत साम्राज्याचं संरक्षण करण्यासाठी कर्नाळा ही राजधानी होती.

घाट आणी कोकण यामधील प्राचीन घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्यावर तीन दिशांना तीन बुरूज असंमातर ठिकाणी बांधलेले आहेत. किल्ल्याच्या जवळून वाघजाई, आंबेनळी आणी बोर या प्राचीन घाट मार्ग जातात.

तिन बुरूजांपैकी एक..

वरील बुरूजावर जाण्यासाठीचा मार्ग..

आणखी एक बुरूज...याच्या खालून किल्ल्यावर येण्याचा मुख्य मार्ग आहे.

किल्ल्याचा रस्ता शोधण्यासाठी आमच्या बॅगा वैगेरे सामान पाऊलवाटेवर एका ठिकाणी ठेवलेलं त्यामुळे किल्ल्यावर पोहचल्यानंतर जबरदस्त तहान लागली होती आणी आमच्या सुदैवाने दगडात खोदलेलं पाण्याचं टाकं दृष्टीस पडलं. किल्ल्यावरच्या या टाक्यात बाराही महिने स्वच्छ आणी निर्मळ पाणी मिळतं. त्याची एकूण रचना सातवाहनकालीन वाटते.

पाणी पिऊन मावळ्यांनी तिथेच थोडासा विसावा घेतला. :)

स्पावड्या....

किल्ल्याच्या मागील बाजुस..

१२५ फुट उंचीच्या या सुळक्याला आणी त्यावरच्या भल्या मोठ्या मधमाश्यांच्या पोळ्यांना पाहून काहितरी आठवत होतं. विचार करता हळूहळू लक्षात आलं जब्बार पटेलांच्या मास्टरपीस जैत रे जैतचं शुटिंग इथे झालं होतं. त्या सुळक्यावरून पाहिल्यास प्रबळगड आणी राजमाची हे दोन किल्ले अगदी स्पष्ट स्वरूपात दिसतात.

किल्ल्यावर मराठी आणी फारसी अशा दोन भाषेतले शिलालेख आढळतात. त्यापैकीच एक या दरवाज्याच्या आतील बाजुस आहे.

१७४० ला जेव्हा पेशवाई अंतर्गत किल्ल्याचा कारभार आला तेव्हा त्यांनी अनंतराव फडके यांना तिथे किल्लेदार म्हणून नेमलं. हे अनंतराव फडके म्हणजे शिरढोणचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा होय. १८१८ मध्ये ब्रिटिशांच्या १०००च्या सैन्याला किल्ल्यावर असलेल्या काही मोजक्याच मावळ्यांच्या मदतीने ३ दिवस झुंजत ठेवले होते.

एव्हाना खुप फिरल्यामुळे पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता त्यामुळे मग परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. चढताना जेवढी दमछाक झाली त्याच्या जास्त पटीने उतरताना झाली. संपुर्ण शरिराचा भार पायावर येत असल्यामुळे खुप सांभाळून उतरावं लागत होतं. जाताना वाटेत किल्ल्याकडे निघालेले बरेचशे ट्रेकर आणी "वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी" गळ्यात डि.एस्.एल्.आर कॅमेरे अडकवून पक्ष्यांच्या शोधात बोंबलत आलेले हौशी फोटोग्राफर भेटत होते. थोडासा टाईमपास व्हावा म्हणून आमच्या चौघांपैकी तिघांनी येणार्‍या प्रत्येकाला "मामा" बनवायला सुरूवात केली.

खाली उतरल्यानंतर जास्त वेळ न दवडता गाड्या काढून गविंनी सुचवलेल्या क्षणभर विश्रांती या हॉटेलात पोटपुजा करण्यासाठी पोहचलो. या तिथल्याच काही पाट्या..! :)

मला तरी ब्वॉ जेवण आवडलं म्हणून हा प्रपंच.! मनोसक्त पोटपुजा करूनच मग आम्ही मुंबईच्या मार्गाला लागलो.

चांडाळ चौकडी! :)

मुंबई पुण्याकडच्या लोकांसाठी विकांताला एक दिवसाच्या भटकंतीसाठी हा किल्ला आणी अभयारण्य चांगला पर्याय ठरू शकतो. मुंबईहून कर्नाळ्याचं अंतर ६५ किमी आहे.

(आमचे मित्र प्रसन्न आपटे आणी त्यांचे मित्र सौरभ यांचेकडून यातले बहुतांश फोटो साभार)

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

28 Dec 2011 - 5:02 pm | सुहास..

ग्रेटच !!

नेहमीप्रमाने उदयोन्मुख फटुग्राफर असल्याने फोंटो आवडले हे वेगळे सांगण्याची गरज नसावी ;)

अरे वा.. मस्त मजा केलीत लेको.. अर्थात आपल्याच्याने एवढे चढणे झालेच नसते..

स्पावड्याच्या पोझेस पाहून हा उत्तम मॉडेल इथे आमच्यासारख्या सामान्यांसोबत ब्लू कोरलात चहामिसळ खाण्यात दिवस वाया घालवतोय असं वाटलं.

फोटो फार मस्त.. पक्षी न दिसल्याचं आश्चर्य वाटलं...

पुढील ट्रिपला शुभेच्छा...

अन्या दातार's picture

28 Dec 2011 - 5:13 pm | अन्या दातार

मस्त सफर रे.
त्या शिलालेखाचा एखादा फोटो काढायचात की रे. एक गोष्ट नक्की सांगतो, की पक्षीनिरीक्षण करणे हे चालत्या-बोलत्या निरीक्षणासारखे सोपे नसते. ;) त्यासाठी नजर तयार व्हावी लागते आणि ती प्रयत्नानेच होऊ शकते. :)

(हौशी पक्षी निरीक्षक) अन्या

वपाडाव's picture

28 Dec 2011 - 5:16 pm | वपाडाव

चांगली सफर घडवली आहे.... लौकरच इथे (ही) जाउन यावे लागेल....

ता. क. = चहा पिताना थोड्याफार (येथे "गप्पा" हा शब्द विसरलाय का असा प्रश्न उपस्थित करावा वाटतोय ) चालू होत्याच मग त्या तात्पुरत्या थांबवून आम्ही निघालो.

फोटो तर एकदम भारी आलेले आहेत,

जैत रे जैत चे जब्बार पटेल, आमचे गाववाले आणि आमच्या शाळॅचे माजी विद्यार्थी त्यामुळं आणि त्यातल्या स्मिता पाटिलांच्या नैसर्गिक अभिनय अन दिसण्यामुळं तो पिक्चर एवढा डोक्यात बसलाय की तुमच्या प्रत्येक फोटोबरोबर त्यातले सिन डोळ्यासमोर येत होते.

फोटोंबद्दल धन्यवाद, ' अपने पैरोंपे खडे' होणं शक्य झाल्यावर लगेच एक ट्रिप इथं केली जाईल.

प्रशांत's picture

28 Dec 2011 - 5:22 pm | प्रशांत

चांगलीच मज्जा केली वाटते ;-)

मस्त लिहिलंय किसनद्येवा!

मजा केलीत लेको! फोटो भन्नाट!

गविंशी सहमत......

प्रचेतस's picture

28 Dec 2011 - 5:50 pm | प्रचेतस

लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला,
ठाकर गडे तिथं कधी नाय गेला...

मस्त फोटो आणि वर्णन.

गोनिदांच्या 'जैत रे जैत' कादंबरीतला एक उतारा द्यायचा मोह अनावर होतोय.
पावसाळ्यातल्या कर्नाळ्याचे अतिशय सुरेख वर्णन केलेय गोनिदांनी.

हे दोन अडीच महिने डोंगराचं दर्शन होणे कठीण. महादेवाचं ध्यान सुरू आहे. तो डोळे मिटून चिंतना करतोय. सगळीकडे पाऊस पडला की नाही. सगळी रानं जोगवली की नाही. अवघी धरित्री भिजली की नाही. कुठं उणं राहिलं असेल, तर त्या अंगाला तो मेंघांना पाठवतो. त्याच्यापाशी लई मेघ. त्याच्या दाराशी हुकमाची वाट पाहात ते उभे असतात. त्याच्या ध्यानात पटदिशी येतं, का अमुक एका डोंगराच्या घळीत पाऊस झाला नाही. तिथले ओढेनाले वाहिले नाहीत. खाचरं पाण्यानं तुडुंब भरली नाहीत. त्या रानचे बेडूक बोलू लागले नाहीत. तिथं काजवे लुक्लुकू लागले नाहीत. तिथल्या कड्यांना गवतं वाढली नाहीत. कड्यांच्या पोटांशी भारंगीचे ठोंब उगवले नाहीत. चवेणीच्या कंदांना हिरवी पानं धरली नाहीत. त्या रानाला अजून भुईकमळं दिसू लागली नाहीत.
मग महादेव ढगांचा ताफाच्या ताफाच तिकडे धाडतो. ढग तिकडे सरू लागतात. कधी घाईघाईनं. एकापाठोपाठ एक. कधी एकमेकांच्या अंगावर कोसळत. कधी सावकाश. चुकार कामकर्‍यासारखे. पण शेवटी ते तिथं पोचतात. बरसायला लागतात. न बरसून करतील काय? टंगळमंगळ केली तर महादेवाचा बिजलीचा चाबूक काडदिशी पाठीत बसतो. केवढा आवाज होतो. डोंगर गदगदा हलू लागतात. अशा रीतीनं चहू अंगांना पाऊस पडतो.
मग महादेवाच्या ध्यानी येतं, की आता चहूकडे हिरवं झालं आहे. गाईगुजी जोगवू लागल्या आहेत. शेरडं चरू लागली आहेत. खाचरं जळानं तुडुंबलेली आहेत. भाताचे लोंबे जळाच्या साईवर डोकी उचलीत आश्चर्यानं चहूदिशांना बघू लागले आहेत. असं अवघं शांत झालं आहे.
मग हळूहळू महादेव ध्यानातून बाहेर येतो. ध्यानाला बसला तेव्हा तो जख्ख म्हातारा होता. ध्यानातून बाहेर येतो तेव्हा तो जवान होऊन येतो. डुईवरचे केस पुन्हा हिरवेगार झालेले असतात. पापण्या पुन्हा ताज्यातवान्या झालेल्या असतात. तो आपल्या डुईत भुईकमळं खोचतो. रंगारंगाची. बहुधा सगळी गुलाबीतांबडी. पण महादेवाला पांढरा रंग आवडतो. म्हणून तो काही पांढरी भुईकमळं अंगावर वागवतो. असा तो कोवळा दरदरीत दिसू लागतो. त्याच्या अंगावरून गंगाबाई खाली उतरत असते. कुठं टंगळमंगळ करीत. कुठं धावत धडपडत. मग तो डुईवर एखाद दुसर्‍या ढगाची चिंधुकली वागवतो, तेवढंच. यापलीकडे मग बाकी ढगांना तो दूरच्या गंगनी धाडून देतो.
पावसकाळाभर महादेवाच्या गळ्यातला मधमाशांच्या पोळ्यांचा हार गडचीप असतो. पावसकाळा उलटला, की मग त्यांचं गाणं सुरू होतं. ते गुंग गाणं काही फार मोठ्यानं ऐकू येत नाही. पण तरी हजारपाचशे माशी एक्या ठायी झाली, की मग चांगला घुमारा ऐकू येतो. कधी त्या गगनात तिथल्या तिथं गाणं म्हणत घुमतात. कधी नाच करतात.

पैसा's picture

28 Dec 2011 - 6:49 pm | पैसा

फोटो आणि वर्णन लै आवाडलं. वल्ली, उतार्‍यासाठी धन्यवाद.

बगळ्याला ध्यान लावून बसण्याचा सल्ला देण्यात येत आहे, नंतर एखादी मासोळी गावेल. ;)

प्रचेतस's picture

28 Dec 2011 - 7:38 pm | प्रचेतस

गावलीय की रत्नांग्रीत.

पैसा's picture

28 Dec 2011 - 8:45 pm | पैसा

फक्त तेवढंच सोडून सगळ्या गावच्या गप्पा सांगतंय बकध्यान!

सुहास झेले's picture

28 Dec 2011 - 7:16 pm | सुहास झेले

मस्त किल्ला आहे हा.. पावसात वाट लागते वर चढताना :)

आणि अन्या म्हणतोय तसंच, पक्षीनिरीक्षण करायला वेगळीच नजर लागते. ते असे सहजासहजी दिसणारे नाहीत, तुम्हालाच त्यांना शोधावे लागते :) :)

धन्या's picture

28 Dec 2011 - 7:47 pm | धन्या

भारी आहे राव. मस्त वर्णन.

कधीतरी आम्हालाही दर्शन घडवा की. ;)

मस्त वर्णन किस्ना ..
फोटो ही छान !
बगळा बरोबर रत्नागिरीकडेच पाहत आहे असे दिसते आहे

अवांतर : अभयारण्य म्हणाला आहे म्हणुन बोलतो, जेंव्हा तेथे मी गेलो होतो (२ दा) तेंव्हा तेथे एक पाटी होती, येथील सर्व पक्षी आणि प्राणी हलवण्यात आले आहेत..

सोत्रि's picture

28 Dec 2011 - 8:23 pm | सोत्रि

छान ट्रिप आणि फोटो!

खासकरून फोटो क्र. ३ आणि ५ एकदमच अप्रतिम, भन्नाट !

- (भटक्या) सोकाजी

इनो घेतल्या गेले आहे. फटू क्रमांक तीन विशेष आवडल्या गेला आहे.

सुनील's picture

29 Dec 2011 - 12:37 am | सुनील

छान फोटो आणि वर्णन.

कर्नाळा परिसरातून असंख्य वेळा जाणे-येणे झाले आहे परंतु प्रत्यक्ष डोगरावर मात्र एकदाच जाणे झाले.

"क्षणभर विश्रांती" मधील तासभर विश्रांती तर नेहेमीचीच!

तिथूनच थोडे पुढे "तारा" ह्या गावात युसुफ मेहेरली सेंटर आहे. तिथेही जाऊन आला असतात तर, ट्रीप अधिक संपूर्ण झाली असती.

अतिअवांतर - १८१८ मध्ये ब्रिटिशांच्या १०००च्या सैन्याला किल्ल्यावर असलेल्या काही मोजक्याच मावळ्यांच्या मदतीने ३ दिवस झुंजत ठेवले होते.
इथे मावळा हा शब्द मराठी सैनिक अशा जेनेरीक अर्थाने वापरला असावा. कारण किल्ला कोकणात आहे तेव्हा त्यावरील सैन्य हे बहुधा कोकण्यांचे असावे, मावळ्यांचे (मावळ प्रांतीचे) नसावे. अर्थात, मावळा शब्द वापरण्याने फार काही बिघडत नाही!

मस्त. सोनेरी कील्ल्याचा फोटो जास्त आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Dec 2011 - 11:46 pm | अत्रुप्त आत्मा

फोटू,वर्णन,माहिती सगळच मेमरेबल...विशेष म्हणजे ती क्षणभर इश्रांती लै मेमरेबल झाली हाय...तिच्या पाटीमुळं :-)

पाषाणभेद's picture

29 Dec 2011 - 3:13 am | पाषाणभेद

फारच छान भटकंती अन फोटोही

हा धागा वाचलाच नव्हता.
किसना मस्त वृत्तांत रे.
फुल्ल टु धम्माल केलेली आहे तुम्ही लोकांनी.

दिपक's picture

29 Dec 2011 - 9:54 am | दिपक

वर्णन आणि फोटु मस्तच! :-)

क्षणभर विश्रांती या हॉटेलात एकदा जेवलो आहे. अनुभव वाईट होता. नाही आवडले जेवण :(

स्पा's picture

29 Dec 2011 - 10:34 am | स्पा

अनुभव वाईट होता. नाही आवडले जेवण

४५ घेऊन लहान बाळाची ताटली असते तेवढी मिसळ समोर आणून ठेवलेली पहिली आणि डोळे पाणावले , शिवाय एका चप्पट ब्रेड स्लाएस चा ४ रुपये असा भाव पाहून उर अभिमानाने भरून आला
शिवाय सर्विस अतिशय भिकार होती

प्रचेतस's picture

31 Dec 2011 - 8:49 am | प्रचेतस

पण चव तर चांगली होती ना?

स्पा's picture

31 Dec 2011 - 9:13 am | स्पा

चव ठीक होती .
त्यापेखा मामलेदार आणि मुनमुन कैक पटींनी श्रेष्ठ म्हणता येईल

प्रचेतस's picture

31 Dec 2011 - 9:46 am | प्रचेतस

म्हणूनच तर नाव आहे ना क्षणभर(च) विश्रांती.
क्षणभर थांबून कणभर खाऊन लगेच निघायचे.

अप्पा जोगळेकर's picture

31 Dec 2011 - 3:38 pm | अप्पा जोगळेकर

त्यापेखा मामलेदार आणि मुनमुन कैक पटींनी श्रेष्ठ म्हणता येईल
मामलेदारचीच मिसळ डब्यात भरुन मुनमुन मधे आणली जाते याची नोंद घ्यावी.

मामलेदारचीच मिसळ डब्यात भरुन मुनमुन मधे आणली जाते याची नोंद घ्यावी.

माहितीबद्दल अनेक धन्यवाद.. एकदा टेस्ट करायला जाणार होतो.. ठाणे ते डोंबिवली हा टल्ला वाचला..

स्पा's picture

29 Dec 2011 - 10:28 am | स्पा

आदल्या दिवशी Don २ नामक शॉट चित्रपट पाहून रात्री १ वाजता हबकलेल्या अवस्थेत घरी आलो , तेंव्हा सकाळी ४ ला उठू कि नाही याची शक्यता कमीच होती
पण उठलो बाबा ... कडाक्याची थंडी पडलेली होती , आणि एक यामाच ज्याकेट सोडल तर थंडीपासून बचावाचा दुसरा मार्ग नव्हता, बाईक ला किक मारून जेंव्हा शिळ रोड ला लागलो तेंव्हा थंडीने आणि वाऱ्याने कहर केलेला
handle वरचे हात अक्षरश: गोठलेले होते . कसबसं पनवेल गाठलं. बाईक वरून उतरल्यावर हूडहुडीच भरली :D
कडक चहा प्यायल्यावर जीवात जीव आला . किस्ना आलाच मागोमाग , वल्ली सरांनी सकाळी सकाळी फोन करून शुभेच्छा दिल्याच. नंतर निघालो थेट कर्नाळ्याच्या पायथ्याशीच थांबलो . सकाळी ७ वाजताच पोचल्याने, सर्वकडे सन्नाटा होता . एन्ट्री फी वेग्रे भरायचा प्रश्न आलाच नाही.. मावळ्यांनी घोडे तसेच वर चढवले :D . पण पक्षी सरकारी आदेश नुसार मुक्त केलेले आहेत अशी पाटी वाचल्यावर थोडा मूड गेला. पण समोरच जंगल खुणावत होत. चढायला सुरुवात केली . पक्षी प्राणी वेग्रे दिसणे दूर.. साधा किडा मुंगी पण दिसत नव्हते
नुसतंच रान माजलेल होत . १ तास चढून वर आलो , घामट निघालेलं होत आणि समोर किल्ला दिसायला लागला , च्याला आधी वाटल तो वेगळाच डोंगर आहे .... किस्न्याच्या श्या पण खाव्या लागल्या..
काहि फोटो

पण नंतर थोड पुढे चालत गेल्यावर कळलं कि नाही इथूनच वाट समोर जातेय. हुश्ह . माथ्यावरून दिसणार आजूबाजूच्या परिसराच दृश्य विलोभनीय होत. भरपूर भटकंती केली .
येताना मिपाकरांच्या प्रथेप्रमाणे खादाडी झालीच्च

अन्या दातार's picture

29 Dec 2011 - 12:48 pm | अन्या दातार

उपवृत्तांतही मस्तच.

तिथे भज्यांबरोबर जिलब्या नाही का मिळाल्या तुम्हाला? ;)

अवांतरः स्पाच्या प्रतिक्रियेत जिलब्यांच्या फोटो बघून इतकी सवय झालीये ना! ;)

उपवृत्तांतात किस्ना ष्टाईल फोटो पाहून डोळे पाणावल्या गेल्या आहे. ;)

मोदक's picture

10 Jan 2012 - 2:23 pm | मोदक

लोहगडावर पण किस्ना ष्टाईल फोटो काढल्या गेले आहेत. :-)

प्रभाकर पेठकर's picture

29 Dec 2011 - 1:31 pm | प्रभाकर पेठकर

वृत्तांत आणि छायाचित्रे मस्तच आहेत. अभिनंदन.

स्मिता.'s picture

29 Dec 2011 - 2:05 pm | स्मिता.

ट्रेक एकदम मस्त झालेला दिसतोय. फोटो आणि वर्णन आवडले.

पियुशा's picture

29 Dec 2011 - 2:25 pm | पियुशा

चला एकदाचा धागा आला :)
फोटु झक्कासच ,पण पक्षी अभयारण्यात पक्षी तुम्हाला पाहुन उडुन गेले काय ;)

किसन शिंदे's picture

29 Dec 2011 - 2:32 pm | किसन शिंदे

चला एकदाचा धागा आला

म्हणजे???

चिंतामणी's picture

29 Dec 2011 - 2:34 pm | चिंतामणी

मस्त. फटु आणि वर्णनसुद्धा.

वृत्तांत आणि छायाचित्रे एकदम धमाल.
बादवे, क्षणभर विश्रांती एकदम भुक्कड हॉटेल आहे असे माझे वैयक्तिक मत आह. तेथून पेणच्या दिशेने अगदि थोडेसेच पुढे गेल्यावर उजव्या बाजूला हॉटेल कर्नाळा आहे. तिथले गावरान चिकन व फिशकरी एकदा ट्राय मारून बघाच.

अभिज्ञ

अप्पा जोगळेकर's picture

31 Dec 2011 - 3:40 pm | अप्पा जोगळेकर

सगळेच फोटो आवडले.छानच.

मोदक's picture

10 Jan 2012 - 2:25 pm | मोदक

बातमी वाचली का रे..?

लोक कशाला नको ते धाडस करतात देव जाणे..

:-(

मोदक

मालोजीराव's picture

10 Jan 2012 - 2:41 pm | मालोजीराव

फोटू आनी ट्रेक दोनीबी झाक !

गोरगावलेकर's picture

21 Jul 2020 - 9:35 pm | गोरगावलेकर

गेल्या काही वर्षांपासून बऱ्याचदा येथे जाणे होते. खासकरून पावसाळ्यात आणि तेही १५ ऑगस्टला. (१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी प्रवेश, कॅमेरा, पार्किंग या सर्व गोष्टी नि:शुल्क असतात.)
अभयारण्यात प्रवेश करतेवेळी आपल्या सर्व बॅग तपासल्या जातात. कुठलीही प्लास्टिक पिशवी घेऊन जाऊ देत नाहीत. पाण्याच्या पातळ बाटल्या, डबे वगैरेची नोंद होते. परततांना या वस्तू दाखवाव्या लागतात / बॅग तपासल्या गेली व या वस्तू आढळल्याया नाहीत तर दंड होतो.

किल्ल्यासाठी जेथून चढण सुरु होते तेथे पायथ्याशीच उपहारगृह आहे जे स्थानिक महिला चालवतात. नाश्टा,जेवण सर्व मिळते त्यामुळे जास्त काही घरून बांधून आणायची गरज नसते. गरमा गरम कांदा/ बटाटा भजी, पिठलं भाकरी खायला मजा येते. किल्ल्यावर जाऊन परत येईपर्यंतच्या वाटेवर काहीही मिळत नाही. त्यामुळे पाणी, बिस्कीट, सुका मेवा सोबत असल्यास चांगले.

सगळ्यांनाच काही किल्ल्यापर्यंत चढून जाणे शक्य होत नाही. ज्याला जेव्हडे शक्य होईल तेव्हडे जावे. पावसाळ्यात लहान लहान ओढे खळाळून वाहत असतात त्यात भिजायला मजा येते. पायथ्याशी पिंजऱ्यात काही पक्षी ठेवलेले असतात तसेच आजूबाजूला पुष्कळ माकडे असतात ते पाहून लहान मुलं खुश होतात.
थोडक्यात लहानांपासून, मोठ्यांपर्यंत सगळ्या मुंबईकरांना भटकंतीसाठी जवळचे चांगले ठिकाण.
माझ्यासाठी अगदी जवळ असले तरी सद्य स्थितीत या १५ ऑगस्टला जाणे शक्य होईल असे वाटत नाही.