1970 च्या दशकातील काही वर्षे मी मुंबईला नोकरी करत असे. अंधेरीला राहून रोज सकाळी लोकल ट्रेन पकडायची. मुंबईच्या प्रसिद्ध डबेवाल्यांमार्फत आलेला डबा लंच टाईम मधे खायचा व संध्याकाळी परत एकदा लोकल ट्रेनमधला गर्दीचा प्रवास करायचा असा माझा मुंबईच्या इतर हजारो किंवा लाखो चाकरमान्यांसारखा दिनक्रम असे. त्या वेळी करमणुकीची काही फारशी साधनेच उपलब्ध नव्हती. सिनेमा म्हणजे बहुधा हिंदी सिनेमे, ते सुद्धा ठराविक ठशाचे, हिरो, हिरॉइन, खलनायक, गाणी शेवटी ठिश्यां ठिश्यां! आणि गोड अखेर, या धर्तीचे! मासिके सुद्धा फारशी नसत. आणि जी काय मिळत त्यांची छपाई तितपतच असे. याच काळात नंतर इंदिरा गांधीनी आणीबाणी लागू केली. सर्वसामान्य माणसाचे जीवन आणखीनच नीरस व कळाहीन बनले.
या सर्व काळात चेहर्यावर स्मिताची रेषा हमखास उमटवू शकतील अशा दोनच गोष्टी होत्या. यातली पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच आर.के लक्ष्मण यांची कॉमन मॅनची रोजची 'यू सेड इट' व्यंगचित्रे आणि दुसरी म्हणजे टाईम्स व इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया मधे प्रसिद्ध होणारी ' मारिओ मिरांडा' या व्यक्तीची व्यंग चित्रे. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे साधी - सोपी असत. त्यात एक किंवा दोन व्यक्ती असत. या उलट मारिओ मिरांडा यांची व्यंग चित्रे पानभर, त्यात शंभर, दोनशे तरी व्यक्ती व यातल्या अनेक व्यक्तींच्या तोंडातून निघालेली मुक्ताफळे, यामुळे एक व्यंग चित्र बघायला किंवा वाचायला निदान 15/20 मिनिटे तरी लागत. जितका जास्त वेळ हे व्यंगचित्र बघावे तितकी जास्त जास्त मजा येत असे. खूप विशाल वक्षस्थळे असलेली स्त्री, गांधी टोपी घातलेले पुढारी, मुंबईचा शेटजी किंवा गोव्यातली कोळीण ते इतक्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने काढत की मारिओ यांचे व्यंगचित्र आले आहे हे लगेच कळत असे.
गोव्यामधला मासळी बाजार किंवा मुंबईच्या रस्त्यावरचा सीन यांचे व्यंगचित्र म्हणजे एक संपूर्ण लेख किंवा कथा असे. लोकलमधून जाताना हातात मारिओचे व्यंगचित्र असले की प्रवास कधी संपत असे ते कळतच नसे.मारिओंनी साकार केलेल्या मिस निंबूपाणी सारख्या व्यक्तीरेखा मी आयुष्यात कधी विसरणे शक्य नाही.
टाईम्स ऑफ इंडिया मधल्या नोकरीतून निवृत्त झाल्यावर मारिओ मिरांडा हे गोव्यात रहात असत हे मला खूप वर्षे माहीतच नव्हते. अगदी अलीकडे काढलेली मुंबईचे रस्ते, प्रसिद्ध ठिकाणे याबद्दलची त्यांची व्यंगचित्रे सुद्धा इतकी अचूक असत की मी त्यांना मुंबईकरच समजत होतो.
आज वयाच्या 85व्या वर्षी या कलाकाराच्या हातातला कुंचला, चित्रे रंगवण्याचे काम सोडून एकदम थांबला आहे. मारिओ मिरांडा आता नाहीत.
तत्कालीन शासनाच्या तथाकथीत समाजवादी धेय धोरणांमुळे भारतात राहणार्या माझ्या पिढीच्या तरूणपणातील नीरस आणि कंटाळवाण्या आयुष्यात, आपल्या चित्रांनी आनंदाचे दोन क्षण आणणार्या मारिओना माझी श्रद्धांजली.
मला आवडलेली मारिओ यांची काही शेलकी व्यंगचित्रे या दुव्यावर बघता येतील.
प्रतिक्रिया
12 Dec 2011 - 9:48 am | चिंतामणी
यांना विनम्र श्रद्धांजली.
:"मिले सुर मेरा तुम्हारा" मधील नारळाचा झाडाखाली चित्र काढत बसलेले मारिओ अजून आठवतात.
12 Dec 2011 - 9:46 am | कुंदन
श्रद्धांजली.
आताच एक बातमी वाचली मटा मध्ये , मिरांडा यांना स्पेन सरकारच्यावतीनं सर्वोच्च नागरी सन्मान या बाबत
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11075371.cms
12 Dec 2011 - 11:30 am | राघव
छोटेखानी लेख खूप आवडला.
मारिओंची चित्रे म्हणजे पर्वणी. त्यांना माझीही आदरांजली.
आम्हाला आवडणारी दोन चित्रकार व्यक्तीमत्वे काळापल्याड गेलीत.
एक म्हणजे जॉन फर्नांडेझ अन् दुसरे मारिओ. :(
राघव
14 Dec 2011 - 7:50 am | पाषाणभेद
खरे आहे राघव. लहान मुलांच्या पुस्तकातल्या चित्रांखाली जॉन फ. सही बघीतली की मन हळवे होते हे नक्की. कलेच्या क्षेत्रातली मोठी माणसे होती ही. लहानपणाच्या हळव्या आठवणी आठवून त्यांना श्रध्दा सुमनांजली.
12 Dec 2011 - 12:24 pm | चतुरंग
मारिओ मिरांडा यांची ओळख पहिल्यांदा इलस्ट्रेटेड वीकलीमधूनच झाली. त्यांची चित्रशैली आवर्जून लक्षात राहवी अशीच होती. वरती चिंतामणींनि म्हंटलंय त्याप्रमाणे मलाही मिले सुर मेरा मधलेच मारिओ आठवले! :)
स्पेन सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान द्यावा याचे विशेष कौतुक वाटले.
(व्यंगचित्रांचा चाहता कॉमनमॅन) रंगा
12 Dec 2011 - 3:06 pm | प्रीत-मोहर
माझ्या घराजवळ त्यांच्या कलाकृतींचे संग्रहालय आहे.
12 Dec 2011 - 3:11 pm | चिंतामणी
तुमचे घर कोठे आहे? :~ :-~ :puzzled:
[मारिओ मिरांडाच्या कलाकृतींचे संग्रहालय आहे त्याच्या जवळ हे माहीत आहे] ;) ;-) :wink:
12 Dec 2011 - 8:55 pm | प्रीत-मोहर
पर्वरी- गोवा :)
12 Dec 2011 - 3:41 pm | प्रास
खूप लहान असताना जेव्हा एका पुस्तकात नारळी-पोफळीची, समुद्राची, कोळ्यांची, सुटातल्या ऑफिसर्सची आणि त्यांच्या सेक्रेटरीजची चित्र पहिल्याने पाहिली तेव्हाच आवडून गेली. बघताना ती चित्र काढायला सोपी वाटलेली पण जेव्हा प्रत्यक्ष रेखाटायला गेलो तेव्हा ती तितकीशी सोपी नाहीत याची जाणीव झाली. याच वेळी त्या चित्रांना व्यंगचित्रं म्हणतात हे आणि त्यांच्या चित्रकाराचं नाव, 'मारिओ मिराण्डा' आहे हेसुद्धा कळलं. तेव्हापासूनच 'मारिओ'च्या चित्रांचे आम्ही फ्यान झालो.

मारिओच्या व्यंगचित्रांखेरिजही मला त्याची इतर चित्रं आवडतात. त्यापैकी कोकण रेल्वेच्या औपचारिक उद्घाटनानंतरचं विशेष आवडतं आहे.
माझ्या मते 'मारिओ' त्याच्या चित्रांच्या माध्यमातून अजरामर आहे.
12 Dec 2011 - 8:32 pm | प्रदीप
मुंबईकरांना ७० -८० च्या दशकांत ज्या व्यक्तिंनी नियतकालिकांतून/ वर्तमानपत्रांतून अत्यंत आनंद दिला आहे, त्यांतील मारियो मिरांडा हे एक होत. त्यांच्या अत्यंत intricate चित्रांचे नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे. लेखांत त्यांतील वैशिष्ट्ये अचूक पकडली आहेतच. मला अजून एक त्यांतील भावलेले म्हणजे त्यांचा (बहुधा वॉटर) कलर्सच्या फटकार्यांचा उपयोग.
मारियो मिरांडा ह्यांची ग्राफिक्स तसेच आफटरनून कूरियरचे बेहराम काँट्रॅक्टर ह्यांचे शेवटचे पान, (बॉल्शॉय कुत्रा वगैरे) सदाबहार आहेत.
13 Dec 2011 - 1:45 am | हुप्प्या
ह्या महान चित्रकाराशी माझी पहिली ओळख बाल भारतीच्या पुस्तकांतून झाली. बहुधा इंग्रजी बालभारतीतील चित्रे यांची असत. नंतर कधीतरी कळले की ही काढणारा चित्रकार म्हणजेच मारियो मिरांडा.
पण हे माहित नसतानाही ही चित्रे बघायला खूप आवडायचे. झाडे आणि त्यांची पाने काढायची एक वेगळीच पद्धत, मुले, माणसे यांचे ठसठशीत चेहरे. आपणही असे काहीतरी काढू या असे म्हणून अनेकदा त्या चित्रांची कॉपी करायचा प्रयत्न केला (पण तो अर्थातच फसला). पण निदान अशी ऊर्मी निर्माण करण्याचे सामर्थ्य ह्या चित्रांत होते.
माझी ह्या कलावंताला श्रद्धांजली.
13 Dec 2011 - 9:16 am | सुनील
मिरांडा यांना श्रद्धांजली.
मुंबईत फोर्टमधील फाउन्टन रेस्टॉरन्टमधील भिंती मिरांडा यांच्या व्यंगचित्राने चितारलेल्या सुमारे १५ वर्षांपूर्वी पाहिल्या होत्या. त्यानंतर तिथे जाण्याचा योग आजवर आला नाही.
13 Dec 2011 - 10:08 am | गवि
कॅफे माँडेगारमधे आहेत भिंती भरलेल्या, मिरिंडांशी थेट भेट कधीच झाली नसली तरी माँडेगारच्या प्रत्येक भेटीत त्यांच्याशी मनाने भेट होतेच आणि होत राहील.
त्यांची ती भिंतभर कार्टून्स आणि बारकावे पाहताना थक्क व्हायला होतं आणि तासनतास मजेत जातात.
आदरांजली.
13 Dec 2011 - 11:04 am | jaypal
गोवा मासली बाजार

हा घ्या मारिओचा "खजिना"
13 Dec 2011 - 11:54 am | चिंतामणी
धन्यु.
13 Dec 2011 - 5:52 pm | अमृत
Bye Mario..Now make the Angels laugh... :-(
अमृत
13 Dec 2011 - 6:20 pm | गणपा
आर आय पी मारिओ.