कोण तू ?

शरद's picture
शरद in काथ्याकूट
6 Nov 2011 - 12:35 pm
गाभा: 

आठ वर्षांचा पोरगेला शंकर गेले दोन दिवस गुहेसमोर हात जोडून बसला होता. आंणखी किती वेळ प्रतीक्षेत जाणार हेही त्याला माहीत नव्हते.पण ज्याकरिता आपण घर सोडून इतके दूर आलो ते आपले आराध्य समोरच्या गुहेच्या तमांत आहेत व तेच आपणाला प्रकाशाची वाट दाखवणार आहे याची त्याला खात्री होती. त्याला आपल्या खेडेगावातील बालपणाची आठवण झाली. त्या खेड्यात त्याचे बालपण खेळापेक्षा शिक्षणातच गेले म्हणावयास हरकत नव्हती. पाच वर्षांचा होण्याआधीच वडील निर्वतले. आईने धीराने त्याची मुंज करून गावातील गुरूजींकडे ज्ञानोपासनेकरता पाठवले. त्यांच्याकडील सर्व विद्या त्याने तीन वर्षांतच ग्रहण केली व तो स्वत:च इतर विद्यार्थांना शिकवत असे. पण त्याने त्याचे समाधान होत नव्हते. त्याला आत्मोन्नती करता सन्यास घेऊन ज्येष्ट गुरूंकडे पुढील ज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे होते. त्याला त्याच्या गुरूने पातंजल योगशास्त्र शिकवतांना सांगितले होते की नर्मदेच्या काठी गोविंदभगवत्पाद नावाचा महान योगी रहातो व लोक त्याला भगवान पतंजलीचा अवतार मानतात. या "शास्त्रेच परेच" श्रेष्ट गुरूचा शिष्य होण्याचे त्याने मनोमन ठरवले होते. पण नवरा वारलेला व एकुलता एक मुलगा सन्यास मागतो म्हटल्यावर आईने साफ नकार दिला. मातृभक्त शंकरला आईच्या परवांगीशिवाय घराबाहेर पडावयाचे नव्हते. काही दिवसांनी शंकर आणि आई नदीवर अंघोळीला गेले असतांना शंकराचा पाय एका मगरीने पकडला. आता सुटका नाही म्हटल्यावर शंकर आईला म्हणाला, " आता मी एवीतेवी मरणारच तर मला संन्यास घेण्याची परवांगी दे. मी मनाने संन्यास घेईन व माझा मरणोत्तर मार्ग सुलभ होईल." आई कष्टाने म्हणाली, " घे बाबा संन्यास". एव्हड्यात काही कोळी धावून आले. त्यांनी ढोसूनढोसून मगरीला हाकलून लावले. पायाला जखम झाली पण शंकर जीवानिशी सुटला. घरी आल्यावर "तुझ्या मृत्युसमयी मांडी द्यावयाला मी नक्की येईन " असे वचन मातेला देऊन बाळ शंकर केरळहून जंगले, दर्‍याडोंगर, नद्या ओलांडत नर्मदेच्या काठी पोचला. गावातल्या लोकांनी त्याला गोविंदपाद जेथे रहात त्या गुंफेचा पत्ता सांगितला. शंकर तेथे पोचला. गोविंदस्वामी काही दिवसांची अखंड समाधी घेत असत व अशा वेळी त्यांचे शिष्य तेथे थांबत नसत. अशाच वेळी शंकर तेथे पोचला. आता वाट पहाणे एवढेच त्याच्या हातात होते.

काही वेळाने स्वामींची समाधी उतरली. गुहेबाहेर कोणीतरी बसले आहे असे पाहून त्यांनी विचारले " कस्त्वं "? कोण तू? आनंदाने भारलेला शंकर उत्तर देणार तोच तो चमकून थबकला. आपण तर अज्ञान बालक ! आणि आपण आपली ओळख "शंकर", तो योग्यांचा योगी शंकर, त्याचे नाव घेऊन द्यावयाची ? हा मोठा उद्धटपणा नव्हे काय ? आणि स्वामींनी आपले नाव थोडेच विचारले आहे ? त्यांनी विचारले "तू कोण ?" क्षणभर थांबून, त्याने नम्रतेने पण आत्मविश्वासाने उत्तर दिले

मनोबुध्द्ह्ङ्कारचित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वै न च घ्राणनेत्र !
न च व्योमभूमिर्न तेजो न् वायु-
श्चिदानन्दरूप: शिवोsहं शिवोsहम् !! १ !!

न च प्राणसंज्ञो न च वै पञ्चवायु-
र्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश: !
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु-
श्चिदानन्दरूप: शिवोsहं शिवोsहम् !! २ !!

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभाव् !
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष-
श्चिदानन्दरूप: शिवोsहं शिवोsहम् !! ३ !!

न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खं
न मन्त्रो न तीर्थो न वेदो न यज्ञा : !
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानन्दरूप: शिवोsहं शिवोsहम् !! ४ !!

न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद:
पिता नैव मे नैव माता न जन्म !
न बन्धुर्न मित्रं गुरूर्नैव शिष्य-
श्चिदानन्दरूप: शिवोsहं शिवोsहम् !!५ !!

अहं निर्विकल्पो निराकाररुपो
विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् !
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेय-
श्चिदानन्दरूप: शिवोsहं शिवोsहम् !!६ !!

{व्योम्..आकाश्; चिदानन्द.. सत्,चित् आणि आनन्द ही ब्रह्माची तीन लक्षणे सांगितली आहेत. पंचवायु .. प्राण,व्यान, उदान, समान व् अपान हे शरीरस्थ पाच् वायु; सप्तधातु .. रस, रक्त, मांस, मेद, अस्ति, मज्जा, शुक्र हे सात धातु;अन्नमय,प्राणमय,मनोमय,विज्ञानमय आणिआनंदमय या पाच कोशांनी (आवरणांनी) आत्म्याला फ़ीवरूप प्राप्त होते. उपस्थ .. जननेंद्रिय, पायु ..गूदद्वार ; द्वेष,राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडरिपू; धर्म,अर्थ, काम, मोक्ष.. चार पुरुषार्थ; भोजन-भोज्य-भोक्ता ही त्रिपुटी दुसरे उदा. दर्शन-दृष्य-द्रष्टा.; विभुत्व.. मालकी,अधिकार , आसंग.. संबंध, आसक्ती, मेय.. मोजण्यासारखे }

शंकर आपण कोण ते सरळ सांगत नाही. त्याने उपनिषदांची नेति नेति हीच पद्धत उचलेली दिसते. ब्रह्म, आत्मा अशा संकल्पनांबद्दल बोलतांना हे सोपे जात असावे. चवथ्या ओळीतील ठाम विधानाचा विचार आपण पाचव्या कडव्याबरोबर घेऊ. आपण कोण नाही हे सांगतांना त्याने प्रथम मन बुद्धी व अहंकार व चित्त यांना नाकारले. हे चार कोठून आले ? त्याकरिता सांख्यांची तत्वगणना पहावयास् पाहिजे. ही तत्वे अशी :
(१) पुरुष, (२) प्रकृती, (३) महत, (४) अहंकार, (५)मन, (६,७,८,९,१०) पृथ्वी, आप, तेच, वायू व आकाश ही पंचमहाभुते, (११,१२,१३,१४,१५) शब्द,स्पर्श,रूप,रस व गंध ही पाच तन्मात्रे, (१६,१७,१८,१९,२०)नेत्र, श्रोत्र,घ्राण,रसना व त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये, (२१,२२,२३,२४,२५) मुख, हात, पाय, गूदद्वार व जननेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिये (योगसूत्राप्रमाणे ईश्वर हे सव्विसावे तत्व)

सांख्य व अद्वैत यांचे काही जुळत नाही. तेव्हा मन, अहंकार, कर्म-ज्ञानेंद्रिये, पंचमहाभुते इत्यादि तत्वे पहिल्यांदि नाकारली. क्षर शरीराला कारणीभूत असलेले पंचवायु, सप्तधातु इत्यादि म्हणजे मी नव्हे हेही सांगितले. त्या नंतर षडरिपू,पुरुषार्थ, पाप-पुण्य, सुखदुख:, तीर्थ, मंत्र, वेद व यज्ञ यांना निकालात काढले. त्रिपुटीची सुट्टी केली, जन्म-मृत्यु नाकारत असतांनाच कौटुंबिक-सामाजिक नातीगोती हीही सोडली. मग "मी कोण " याचे उत्तर दिले " निर्विकल्प, निराकार, अमेय, सर्व विश्वाचा विभाता, चिदानंदरूपी शिवाचा मी अंश आहे. "

शरद

प्रतिक्रिया

शरदकाका, ही घ्या तुम्हाला एक भेटः

सर्वदमन बॅनर्जीचा अभिनय अंमळ सखाराम गटणेछाप आहे..तो चालवून घ्या.

कवितानागेश's picture

6 Nov 2011 - 3:18 pm | कवितानागेश

:)
प्रत्येक कडव्यावर अजून लिहिता येण्यासारखे आहे.
हात आखडता घेतल्यासारखा वाटतोय.....

मदनबाण's picture

6 Nov 2011 - 4:31 pm | मदनबाण

ह्म्म्म...
लेख वाचुन मी आधी कधी ऐकलेल हे गाणं आठवलं :--- http://www.youtube.com/watch?v=wYaK2BGGoIw

हे आत्मषटक वाचून लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या.

श्लोकांच्या निर्मितीच्या प्रसंगाचे आख्यान माहीत नव्हते.

(आख्यानामुळे शब्दार्थ थोडा बोथट होतो, पण चालायचेच. अशा आख्यानांत स्वतंत्र गंमत असते.)

पैसा's picture

6 Nov 2011 - 9:23 pm | पैसा

या रचनेला निर्वाण षटक असंही नाव आहे ना? ऐकताना छान नादमधुर वाटतेच. आदि शंकराचार्यांच्या आणखी काही रचनांबद्दल लिहाल का? जसे की भवानी अष्टकम आणि भज गोविंदम वगैरे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2011 - 9:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अष्टकामागील कथा माहिती नव्हती. सर, आभारी आहोत. पण अजून अर्थ तपशीलवार पाहिजे होता हं.

आमच्या गावात स्वाध्यायनिमित्त प्रभात फेरी निघायची तेव्हा विविध अष्टकं म्हटल्या जायची तेव्हा मी अष्टक म्हणायचो. त्याची आठवण झाली.

न मे द्वेष रागो न मे लोभमोहो.....

माझ्या ठीकाणी कोणाचा द्वेष नाही. कोणाचा राग नाही.
कशाचा लोभ नाही. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थापैकी
कशाचीही अपेक्षा नाही. असा मी शिव चिदानंदरुप आहे.

असाच अर्थ आहे ना ? अहाहा. किती सुंदर. ..

-दिलीप बिरुटे
(धार्मिक)

पार्टनर's picture

6 Nov 2011 - 11:01 pm | पार्टनर

धन्यवाद शरद आणि यशवंत.

महाबळ's picture

6 Nov 2011 - 11:21 pm | महाबळ

असं छान काहीतरी वाचलं की पुन्हा एकदा वाटतं सत्याचा मार्ग नक्की कुठला... रोजचं धकाधकीचं जीवन सत्य की आपल्या अंतरीचा ठाव घेणारा हा मार्ग सत्य ?

तिमा's picture

7 Nov 2011 - 11:29 am | तिमा

हा लेख आहे की चर्चेचा विषय ? काथ्याकूटात टाकला आहे म्हणून विचारलं. बाकी प्रतिक्रिया द्यायला माझा त्यात अभ्यास नाही.

भलती भोळे's picture

7 Nov 2011 - 2:06 pm | भलती भोळे

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभाव् !
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष-
श्चिदानन्दरूप: शिवोsहं शिवोsहम् !! ३ !!

सुरेख ... धन्यवाद !!

धमाल मुलगा's picture

7 Nov 2011 - 4:57 pm | धमाल मुलगा

बर्‍याच दिवसांनी शरदरावांचा आणखी एक छानशा विषयावरचा उत्तम लेख.
बाकी शरदराव, हात आखडता घेतल्यासारखं वाटलं बुवा. अहो निरुपणच आहे ते, असं थोडक्यात का उरकता येतंय? :)

येउद्या आणखीही असेच.

रेवती's picture

7 Nov 2011 - 7:22 pm | रेवती

छानच. लेख आवडला.

विकास's picture

7 Nov 2011 - 8:08 pm | विकास

हे एक अवडते काव्य आहे. स्तोत्र म्हणावेसे वाटत नाही, कारण ते इश्वराचे वर्णन न करता स्वत:च्या (शंकराचार्यांच्या) अनुभुतीबद्दल सांगते..

ही कथा नवीन होती, आवडली. काही साम्य नसले तरी सत्यकामाची गोष्ट आठवली.

भास्कर केन्डे's picture

8 Nov 2011 - 2:37 am | भास्कर केन्डे

बाळ शंकर केरळहून जंगले, दर्‍याडोंगर, नद्या ओलांडत नर्मदेच्या काठी पोचला. गावातल्या लोकांनी त्याला गोविंदपाद जेथे रहात त्या गुंफेचा पत्ता सांगितला.
--- बाळ शंकरांनी त्यांच्या प्रवासात तसेच नर्मदेच्या काठी पोचल्यावर कोणती भाषा वापरली असेल? संस्कृत सामन्यांना समजत होती का?

पिवळा डांबिस's picture

8 Nov 2011 - 3:00 am | पिवळा डांबिस

लिखाण आवडलं. ते शंकरने दिलेलं उत्तरही आवडलं.

बाकी आम्ही जर आमच्या मास्तरांच्या 'तू कोण?' या प्रश्नावर वरील उत्तर दिलं असतं तर,
"डांबिसा शिंच्या, सरळ उत्तर देशील तर काय मरशील?" असं म्हणून सगळ्या वर्गासमोर आमच्या कानाखाली जाळ निघाला असता!!!! मग त्यापेक्षा जर पूर्वीच मगरीने खाऊन टाकलं असतं तर बरं झालं असतं असं आम्हाला वाटलं असतं!!!
असो.
मोठ्यांचं सगळंच मोठं!!!
:(

अनिवासि's picture

8 Nov 2011 - 6:18 pm | अनिवासि

हे आत्मषटक अगदि नीराळ्या प्रसन्गी ऐकण्यात आले.

येथे आपल्यापैकी कोणाचे नीधन झाले की crematorium मध्ये शवपेटी नेण्यात येते. तेथे hall मध्ये, नातेवाईक, मित्र मन्डळी बसततात. ह्या ठीकाणी फक्त अर्धा तासच तुम्हाला मीळतो त्यात धार्मीक विधी. गौरवपर भाषणे बसवावी लागतात. (बरेच धार्मीक विधी घरीच करुन मग crematorium मध्ये आलेलो असतो) त्यामुळे सर्व आटोपते घ्यावे लागते.
एका अशा वेळी कै. आबा पणशीकर पौरोहित्य करत असताना त्यानी हे षटक म्हटले आणि तेवहपासुन मराठी समाजात बरेच जण ही प्रथा पाळतात.

माझे मित्र- कनिटकर - बरेच वेळा अशा वेळा - विनामुल्य- पौरोहित्य करतात. बरेच वेळेला अनेक english मित्रही हजर असतात त्यान्च्यासाठी त्यानी ह्या षटकाचे english मध्ये भाषान्तर केले आहे व त्याच्या प्रती ते सर्वाना देतात.
एका प्रसन्गी मला त्यान्ची जागा घ्यवी लागली. आदल्या सन्ध्याकाळी काही मित्रान्बरोबर आम्ही ते वाचले आणि सर्वानी एका सुरात अन्त्ययात्र्येच्यावेळी म्हणावयाचे ठरले.
hall तुडुम्ब भरला होता-- अनेक युरोपिअन आणि मरठि मित्र -सर्वाना कागद दिले,

भाषणे व इतर सर्व झाले - शेवटी अतीशय गम्भीर- भावपुर्ण आवाजात षटक म्हणावयास सुरवात झाली. शवपेटी सरकत्या पट्यावर होति- crematorium च्या अन्तर्भागात जाणारा छोटा दरवाजा उघडला- सरकत्या पट्यावरील पेटी त्या घनगम्भीर आवाजात आत गेली-दरवाजा बन्द झाला- नीरोप दीला
युरोपीअन मित्रानच्या डोळ्य्यातहि अश्रु होते. आनेकानी भाषन्तरीत कागद आठवण म्हणुन नेला.

आज दहा वर्षे झाली- मिपा मुळे पुन्हा त्यान्ची आणि त्या समुदायाची आठवण झाली.
कदाचित बिषयान्तर झाले असेल माफी असावि.

चित्रा's picture

8 Nov 2011 - 6:45 pm | चित्रा

निर्वाणषटक म्हणण्यास अतिशय सोपे आणि सुरेख आहे.

(काही ठिकाणी सदोष श्चिदानंदरूप: झाले आहे, तेवढे कृपया सुधारून घ्यावे. )

भाग्यश्री कुलकर्णी's picture

8 Nov 2011 - 7:32 pm | भाग्यश्री कुलकर्णी

माझ्या मुलीच्या वेळी मला बेडरेस्ट होती त्या सात महिन्याच्या काळात दिवसाची सुरवात ह्याच स्त्रोत्राने होत असे.अभिला खुप आवडायचे हे. तो ह्याचा अर्थ सांगताना तल्लीन होत असे. काहिसा नास्तिक असणारा अभि मला हे स्त्रोत्र आवर्जुन म्हणायला लावायचा.

jaypal's picture

9 Nov 2011 - 10:33 am | jaypal

लेख खुप आवडला (पण जरा घाईघईत संपवल्यासार्खा वाटला)
अवांतर --मला तरी "भारत एक खोज" चालु होताना जी वेदिक प्रार्थना होती तीच्या जवळपास जाणार काव्य वाटत.

"भारत एक खोज" चालु होताना जी वेदिक प्रार्थना होती तीच्या जवळपास जाणार काव्य वाटत.

त्या ऋग्वेदातील ऋचा आहेत {ऋग्वेद(१०:१२९)}आणि ते त्याच भाषांतर असावे...
सुरुवात अशी आहे...

नासदासीन नो सदासीत तदानीं नासीद रजो नो वयोमापरो यत |
किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद गहनं गभीरम ||

सृष्टि से पहले सत नहीं था
असत भी नहीं
अंतरिक्ष भी नहीं

आकाश भी नहीं था
छिपा था क्या, कहाँ
किसने ढका था
उस पल तो
अगम अतल जल भी कहां था
संपूर्ण गीत इथे मिळेल :--- http://goo.gl/Si7wd

(सर्व तथाकथित विज्ञानवाद्यांची क्षमा मागून.)

शरदरावांनी वर त्रोटकपणे दिले आहेच.
परमार्थ म्हणजे परम 'अर्थ'. अर्थ या शब्दाचा एक अर्थ ' जे मिळवायचे ते' त्यामुळे, परमार्थ म्हणजे सगळ्यात उच्च प्रतीचे मिळवण्याचे ध्येय. हे मिळवण्यासाठी वरील आत्मषटकाचा कितपत उपयोग होतो ते बघायचं. अगदी १००% नाही तरी जीवनात जगत असताना त्याचा काय उपयोग करता येऊ शकतो हे तरी कळू शकेल.

हे काहीसं , नो द सिस्टीम, युज द सिस्टीम, गेट द रिझल्ट्स, फरगेट द सिस्टीम असे आहे. नाहीतर पांडित्याचा, आपल्या माहिती ज्ञानाचाच अहंकार येतो.

प.पू. शंकराचार्य म्हणतात, मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही.

अध्यात्मामध्ये काही गोष्टी मानायच्या असतात, श्रद्धेवर. (थोडंसं एच टु ओ म्हणजे पाणी ही श्रद्धा आहे असं)
अंतःकरण या घटकाचे चार भाग कल्पायचे आणि त्याच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार त्याला ते ते नाव द्यायचे.
संकल्प विकल्प करणारे ते मन. (चहा हवा की नको)
निर्णय करणारी ती बुद्धी (चहा हवा)
तो निर्णय साठवणारं ते चित्त. (चहा मिळेपर्यंत त्याचा विचार)
मी, मला हवं म्हणणारा तो अहंकार.

आपण म्हणताना म्हणतो, माझं मन मला सांगतं, माझ्या बुद्धीनं मला दगा दिला, माझ्या चित्तात फक्त एक आणि एकच विचार असतो. जर माझी असलेली गोष्ट मी नसेन (माझा मोबाईल, माझं पुस्तक इ.इ.) तर माझं मन म्हणजे देखील मी नाही हे सिद्ध होतं.
याच प्रकारे ' न च श्रोत्र जिव्हे'...., माझी ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये ही माझी असतील तर मी म्हणजे नाक, कान , डोळे, त्वचा नाही हे ही सिद्ध होते. डोळ्यासमोर दूध उतू जातं. डोळे उघडे असतात. पण डोळे या इंद्रियाद्वारे बघणारा 'डोळ्याचा डोळा' तिथं नसतो त्यामुळं समोर असून दिसत नाही.

न च व्योम भुमि न तेजो न वायु... पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही पंच महाभूते देखील मी नाही. ह्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत. जे जे जन्मले ते ते नष्ट पावणार आहे आणि मी तसा नाही असे आपले मत ठरते आहे. हात नसताना देखील एखादी व्यक्ती असतेच. तेच एक्स्टेन्शन करुन पूर्ण शरीर नसतानाही 'मी' असतो. त्यामुळे मी म्हणजे पृथ्वी, आप, तेज इ.इ. नाही.

असे करत करत मी प्राण नाही. पुन्हा 'माझे प्राण' आले. मी प्राण नसतो, माझे प्राण असतात.
सप्त धातु, अन्नमय कोष,मनोमय कोष इ.इ. मी नाही. असे सगळे आहे.

थोडासा व्यवहारी होऊन विचार करु या. या सगळ्याचा 'मला काय उपयोग'?
परमार्थी माणसाने स्वार्थी हो ऊन हा विचार सातत्याने करायचा आहे. सातत्यानं सुखी होण्याची साधनं गोळा करण्यापेक्षा एकदाच असं 'सुखरुप' होता येतं का की जेणेकरुन सारखं सारखं सुखी व्हायची गरज पडू नये असा विचार परमार्थात खर्‍या अ र्थानं करावा.

जर मी बुद्धी नसेन तर माझ्या बुद्धीनं केलेल्या निर्णयाचं खापर अथवा त्याचा अहंकार देखील आपण स्वतःवर का घ्यावा? मी कमी बुद्धीचा म्हणून न्यूनगंड आणि मी बुद्धीवंत म्हणून अहंगंड हे दोन्ही होणार नाही. 'सदा मे समत्वं' म्हणताना मी सगळीकडे समान प्रकारे असेन तर इकडे थोडा कमी तिकडे थोडा जास्त असे असेल का? जर ते तसे नसेल तर आपण १००% प्रयत्न करुन समोरच्या व्यक्तीने मिळवलेलं मिळवू शकेन की नाही? ते देखील समोरच्या व्यक्तीशी स्पर्धा, मत्सर, द्वेष न करता?

जर मी कान, नाक, डोळा इ.इ. म्हणजे शरीरच नाही तर मी उंच, जाड, बुटका, कमी वजनाचा (वय २४, वजन ४२), काळा, गो रा, सुंदर, कुरुप इ.इ. सगळ्याचा न्यूनगंड अथवा अ हंगंड बाळगण्याची, त्या मुळे खचण्याची, हुरळण्याची, स्व तःला कमी /जास्त, दुसर्‍याला कमी जास्त लेखण्याची गरजच राहणार नाही.

अहं निर्विकल्पो म्हणजे मी नि:विकल्प म्हणजेच दुसरा पर्याय नसलेला असा असेन तर स्पर्धा कुणाशी? का? कशासाठी?

अर्थातच, हातपाय गाळून बसलेली, हतबल मानसिकतेतून आलेली ही वाक्ये नाहीत. 'उठ आणि युद्ध कर' म्हणून आधी युद्ध कर, जिंक आणि मग काय ती ..... कर असे आहे. १००% प्रयत्न केल्यावर मगच मी हे बोलू शकेन.

अजून खूप काही सांगता येईल. सध्या इतकंच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2011 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून खूप काही सांगता येईल. सध्या इतकंच.

नै नै. अजून लिहा.

-दिलीप बिरुटे

मूकवाचक's picture

11 Jan 2012 - 2:00 pm | मूकवाचक

पुलेशु