भारताला गरज भरताची

चेतन सुभाष गुगळे's picture
चेतन सुभाष गुगळे in काथ्याकूट
1 Nov 2011 - 7:48 pm
गाभा: 

http://www.amhimarathi.com/diwali2007/lekh/l8.html

http://jaalavaani.blogspot.com/2010/08/blog-post_4332.html

भारतीय नागरीक आपल्या पुराण पुरूषांच्या / देवतांच्या बाबतीत जरा जास्तच हळवे असतात. त्यांच्या विषयी कुठे काही वादग्रस्त छापून आले तर लगेच आक्रमक होऊन दंगल / जाळपोळ करतात. पण हेच भक्त लोक आपल्या आदर्शांचे गुण स्वत:च्या अंगी बाणविण्याबाबत तितकेसे उत्साही नसतात. रामायणातील राम व महाभारतातील कृष्ण हे आपल्यापैकी बहुतेकांचे आदर्श. मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा चमत्कारी श्रीकृष्ण बनणे हे आजच्या जमान्यात कुणालाच शक्य नाही. त्यापेक्षा रामायणातला किंवा महाभारतातला भरत बनणे आपल्याला जमू शकेल. किंबहुना आजच्या भारताला राम किंवा कृष्णापेक्षा भरताचीच जास्त गरज आहे.

रामायणातील भरत हा आद्यकाळातील विश्वस्त (Trustee) म्हणता येईल. हाताशी आलेले अयोध्येचे राज्य त्याने आपल्या थोरल्या बंधुसाठी नाकारले. पण त्याहूनही विशेष म्हणजे रामाच्या आग्रहावरून त्याने चौदा वर्षे राज्यकारभार चालविला, तोही राजा बनुन नव्हे तर राजाचा प्रतिनिधी म्हणून, त्याच्या पादुका गादीवर ठेवुन. तो स्वत: राजसिंहासनावर कधीच बसला नाही. चौदा वर्षे त्याने विश्वस्त म्हणून निष्ठेने राज्य चालविले आणि त्यानंतर राम वनवासावरून परत येताच ’इदं न मम’ या वृत्तीने ते रामाच्या सुपूर्त केले.

महाभारतातील भरताचे काम तर रामायणातील भरताहूनही अधिक कठीण होते. रामायणातील भरताला राज्यासाठी उत्तराधिकारी निवडण्याची गरज नव्हती. राम येताच अयोध्येचे राज्य त्याला सुपूर्त करावयाचे हे भरताला ठाऊक होते. परंतू महाभारतातील भरताला वानप्रस्थाश्रमास जाण्यापुर्वी आपला उत्तराधिकारी निवडायचा होता. महाभारतातील भरत हा राजा दुष्यंत व शकुंतला यांचा पुत्र, हस्तिनापूरचा सम्राट, चंद्रवंशी राजा भरत होय. असे म्हणतात की याच्याच नावावरून आपल्या देशाचे नाव भारत असे पडले. ह्या भरताला आठ पुत्र होते. आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून तो ह्या आठांपैकी कुणाचीही निवड सहज करू शकला असता. त्याकाळी राजेशाही पद्धत अस्तित्त्वात असल्याने त्यात कुणाला काही खटकण्यासारखेही नव्हते. परंतू आपल्या आठही पुत्रांपैकी कुणीही राजगादीसाठी पात्र नसल्याचे लक्षात येताच त्याने आपल्या राज्यातील एका योग्य तरूणाची (शंतनू) आपला राजकीय वारस म्हणून निवड केली. आपल्या रक्ताच्या पुत्रांना डावलून एका परक्या तरूणाला राज्याभिषेक करण्याचे धाडस सम्राट भरत दाखवू शकले ते केवळ त्यांच्या अंगी असलेल्या विश्वस्त वृत्तीमुळेच.

राजा भरताची ही विश्वस्त वृत्ती हस्तिनापूरच्या पुढील राज्यकर्त्यांना जोपासता आली नाही. सरसकट सर्वांनी आपल्या पुत्रांना राजगादीवर बसविले. सरळ मार्गाने पुत्र झाला नाही तर व्यभिचाराने पुत्रांना जन्म दिला. (आठवा व्यासांपासून राणी अंबिकेला झालेला अंध धृतराष्ट्र, तर अंबालिकेला झालेला रोगट पंडू). पण यापैकी एकालाही आपणदेखील सम्राट भरताप्रमाणेच राज्यातील एखाद्या होतकरू तरूणाला आपला राजकीय वारस नेमावे असे वाटले नाही.

आजच्या जमान्यात तर लोकशाही सत्ता पद्धत अस्तित्त्वात असून देखील आपल्या अपात्र चिरंजीवांना सत्तेत आणण्याची धडपड करणारे नेते पाहता, त्या काळातही घराणेशाही जनतेवर न लादण्याचा सम्राट भरताचा निर्णय केवळ स्तुत्यच नव्हे तर अनुकरणीय देखील वाटतो.

आपण राज्याचे मालक नसून विश्वस्त आहोत व ही सत्तेची खिरापत आपल्या घराण्यातील लोकांना वाटण्यासाठी नसून हे पद विश्वस्त वृत्तीने काम करू शकेल अशा लायक व्यक्तीला सोपविणे ही आपली जबाबदारी आहे हे आजच्या लोकप्रतिनिधींनी समजून घेतले पाहिजे. खरेतर अनेकांना ही बाब कळते पण वळत नाही. ह्याला कारण पुत्रप्रेम माणसाला अंधत्व आणते व त्याला कर्तव्य दिसत नाही. संभाव्य उमेदवारांमध्ये आपला पुत्रही असेल तर साहजिकच त्याला झुकते माप दिले जाते. महाभारतातही पुत्र की पुतण्या हा निर्णय घेताना धृतराष्ट्राला निष्पक्षपातीपणा दाखविता आला नाही. तीच चूक आजचे नेतेही करीत आहेत. नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वरीष्ठ सनदी पोलीस अधिकारी देखील पोलीस दलात घराणेशाही आणत आहेत. (आठवा लोकसेवा आयोग परीक्षा घोटाळा).

अर्थात पुत्राला आपला उत्तराधिकारी नेमले नाही तरीही अडचणच. लोक तिकडूनही नावे ठेवतात. (महात्मा गांधींची चारही मुले फारशी चमकली नाहीत; त्यावेळी गांधींनी मुलांसाठी काहीच केले नाही, ते आपल्या पितृधर्माला जागले नाहीत, अशी त्यांच्यावर टीका करणारेही अनेक जण सापडतील). तसेच गृहस्वामिनीचा रोषही पत्करावा लागतो. याशिवाय राजकारण काही पुर्वीइतके सरळ राहिलेले नाही. हल्लीच्या जमान्यात सरळमार्गी माणसालाही कधी कधी चौकटीबाहेर जाऊन काही कामे करावी लागतात. अशा व्यक्तीची ही जगापासून गुप्त असलेली व त्याला अडचणीत आणू शकणारी रहस्ये त्याच्या पुत्राला नक्कीच ठाऊक असतात. पुत्राला दुखविणे हे सर्वनाशालाच निमंत्रण ठरू शकते. (पाहा - अमिताभ बच्चन यांचा सरकार हा चित्रपट). म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती.

त्यामूळे बरेचदा राज्यकर्त्यांना अनेकदा अनिच्छेनेच आपल्या अपात्र पुत्रांनाही आपला राजकीय वारस घोषित करावे लागते. ’अत्यूच्च पदी थोरही बिघडतो’ अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे. हा थोर बिघडतो तो बहुधा या पुत्रप्रेमा अथवा पुत्रदबावामूळेच.

सम्राट भरताची विश्वस्त वृत्ती अंगी बाणवायची असेल तर सार्वजनिक क्षेत्रात मोठी जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी स्वत:ला अपत्य होऊ न देण्याचा कठोर निर्णय घेणे हेच इष्ट. अनेकांना हे विधान धाडसाचे वाटू शकेल, परंतू मोठ्या पदाची मनीषा बाळगून असलेल्या व्यक्तींनी एवढा किमान त्याग तरी केलाच पाहिजे. हा विचार जगावेगळा, बहुमताच्या विरुद्ध वाटण्याची शक्यता आहे. परंतू एक लक्षात ठेवले पाहिजे की जग हे अतिसामान्य विचारसरणीच्या बहूसंख्य लोकांमुळे चालले नसून असामान्य, लोकोत्तर विचारसरणीच्या संख्येने अत्यल्प असलेल्या लोकांमुळेच चालले आहे. बसमध्ये साठ प्रवासी असतात, परंतू बस चालविण्याचे काम एकटा चालकच करीत असतो. साठही प्रवासी उतरून गेले तरीही चालक एकटा बस पुढे नेऊ शकतो. पण साठ प्रवासीदेखील चालकाशिवाय बस चालवू शकत नाहीत. प्रत्येकानेच अशा प्रकारे वर्तन करावे अशी अपेक्षा नाही, परंतू भारताच्या एक अब्ज लोकसंख्येतून निदान असा एकतरी भरत निर्माण व्हावा ही अपेक्षा चूकीची आहे काय?

प्रतिक्रिया

पैसा's picture

1 Nov 2011 - 9:07 pm | पैसा

भारताच्या अब्जात पोचलेल्या लोकसंख्येत लोककल्याणकारी आणि विश्वस्त भरत तयार व्हावा ही इच्छा, अपेक्षा वाजवीच आहे, पण असा भरत शेकडो, हजारो वर्षांतून एखादाच जन्माला येतो. ती परिस्थिती कधी येईल कोण जाणे, पण आमच्यासारखे अनेकजण तोपर्यंत वाट बघत राहतील हे नक्की.

"राजा हा प्रजेचा उपभोगशून्य स्वामी" असावा ही अपेक्षा, पूर्वी तसा असेही, पण आताचे राजे (अर्थात नेते/पुढारी) पाहता या सगळ्या गोष्टी फक्त पुस्तकात राहणार की काय असं वाटू लागतं. भीष्मांनी सांगितलेलं "राजा कालस्य कारणं" हे सार्वकालिक सत्य आहे. जेव्हा कधी भारतात परत एक भरत जन्म घेईल, तेव्हा परिस्थिती आपोआप बदलू लागेल.

भास्कर केन्डे's picture

2 Nov 2011 - 1:32 am | भास्कर केन्डे

भरताप्रमाणे तेजस्वी राज्यकर्ते जेव्हा जेव्हा भारताला लाभले तेव्हा तेव्हा आपल्या देशाचा सर्वांगीन विकास झाला आणि आपली पताका परदेशात पोचली - चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य, शालीवाहन, यादव ते थेट आपल्या शिवरायांपर्यंत.

सम्राट भरताची विश्वस्त वृत्ती अंगी बाणवायची असेल तर सार्वजनिक क्षेत्रात मोठी जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी स्वत:ला अपत्य होऊ न देण्याचा कठोर निर्णय घेणे हेच इष्ट.
-- हे न करता सुद्धा आजच्या राजकारणात यशस्वी होता येते हे गांधीजी, शास्त्रीजी आणि अडवाणीजींवरुन दिसुन येते. आजकाल ठाकरे, पवार, चव्हाण, मुंढे, हे बडे नेते त्याकडे डोळेझाक करत आहेत हा मुख्य दोष.

मन१'s picture

1 Nov 2011 - 11:12 pm | मन१

"....आपल्या राज्यातील एका योग्य तरूणाची (शंतनू) आपला राजकीय वारस म्हणून निवड केली."
ओ भौ, चक्रवर्ती चांद्रवंशी राजा भरत ह्याने आपला उत्तराधिकारी म्हणून शंतनूची निवड केलेली नाही.
"भारद्वाज हुमन्यू" का काहितरी नाव असणार्‍या एका तरुणाची निवड केली. पुढे ह्याच भारद्वाज हुमन्यूचा वंश काही पिढ्या चालला. त्यातच राजा शंतनू जन्मास आला.(शंतनूच्या आधी ययाती, नहुष,पुरुरवा हे सगळे राजे भरत आणि शंतनू ह्यादरम्यानच्या काळात होउन गेले.)

.... सरळ मार्गाने पुत्र झाला नाही तर व्यभिचाराने पुत्रांना जन्म दिला. (आठवा व्यासांपासून राणी अंबिकेला झालेला अंध धृतराष्ट्र, तर अंबालिकेला झालेला रोगट पंडू). पण यापैकी एकालाही आपणदेखील सम्राट भरताप्रमाणेच राज्यातील एखाद्या होतकरू तरूणाला आपला राजकीय वारस नेमावे असे वाटले नाही.

ह्याबद्दल असे ऐकले आहे की तेव्हा व्यभिचाराच्या व्याख्या आजच्यापेक्षा फार म्हणजे फारच वेगळ्या होत्या.
आपण "नियोग" हा शब्द ऐकलाय काय?

प्रचेतस's picture

2 Nov 2011 - 9:46 am | प्रचेतस

सहमत आहे.
छोटासा बदल. तो हुमन्यू नसून भूमन्यू आहे. भारद्वाज ऋषींच्या पौरोहित्याखाली केलेल्या यज्ञात हा पुत्र प्राप्त झाला असे महाभारतात लिहिले आहे.

नहुषपुत्र ययाती हा भरताच्या खूप आधीचा होता. ययाती चांद्रवंशीय, त्याच्यापासून पुढे यदुवंश, पुरुवंश, भरतवंश सुरु झाले.
भरतानंतर सुहोत्र, अजमीढ, कुरु, प्रतिप, शांतनू असे बरेच राजे झाले.

नियोग त्याकाळी सर्वमान्य होता. त्याला व्यभिचार म्हणणे अनुचित. नियोगाचेही नियम ठरलेले होते.

चेतन सुभाष गुगळे's picture

2 Nov 2011 - 11:39 pm | चेतन सुभाष गुगळे

<< ओ भौ, चक्रवर्ती चांद्रवंशी राजा भरत ह्याने आपला उत्तराधिकारी म्हणून शंतनूची निवड केलेली नाही.>>

ही चूक मान्य आहे. तो भारद्वाज भूमन्यु होता.

<< व्यभिचाराच्या व्याख्या आजच्यापेक्षा फार म्हणजे फारच वेगळ्या होत्या.
आपण "नियोग" हा शब्द ऐकलाय काय? >>

नियोग ठाऊक आहे. त्यात होणारी स्त्री मनाची घुसमट ही ठाऊक आहे. म्हणूनच त्यास असा शब्द जाणूनबुजून वापरलाय. जी समाजव्यवस्था विवाहाशिवाय / विवाहबाह्य संबंधांना गैर मानते तीच समाजव्यवस्था केवळ राज्याला वारस मिळावा ह्या करिता पुन्हा असे संबंध ठेवायला परवानगी देते व सक्तीही करते तिला निश्चितच निकोप म्हणता येत नाही.

मी दिलेल्या उदाहरणात अंबिका व अंबालिका यांच्या मनात असे संबंध ठेवण्याचे नव्हते आणि त्यामुळेच त्यांचे पुत्र सव्यंग जन्मल्याचा दाखला दिला आहे.

अर्थात हे सर्व प्राचीन काळात घडले. वारस मिळविण्याकरिता उत्तर भारतात कुठल्या थराला जाणारे प्रकार घडतात ते (राज बब्बर, स्मिता पाटील, अमृता सिंग, राज किरण व कुलभूषण खरबंदा यांच्या) वारिस चित्रपटात दाखविले आहेत.

अर्थात माझ्या लेखाचा मुद्दा इतकाच आहे की हा सर्व खटाटोप करून वारस पैदा करण्यापेक्षा "बाहेरच्या" व्यक्तीला (अर्थातच ती पात्र असेल तरच) वारस म्हणून घोषित करणे (जसे सम्राट भरत यांनी केले)केव्हाही सोयीस्कर नाही का?

सोत्रि's picture

2 Nov 2011 - 10:25 am | सोत्रि

ह्या 'नियोगा'वर कोणी जाणकार अधिक माहिती देऊ शकणार का?

- (अज्ञानी) सोकाजी

प्रचेतस's picture

2 Nov 2011 - 10:40 am | प्रचेतस

एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल तर ते नियोगाद्वारे प्राप्त करण्याची मुभा होती. मुख्यतः राजवंशांमध्येच गादीच्या वारसासाठी ही प्रथा होती. जनसामान्यांत ही प्रथा उपलब्ध होती का नाही याची निश्चित माहिती मिळत नाही.
नियोग हा शक्यतो दिराकडून अथवा जवळच्या नातेवाईकांद्वारे केला जायचा. व्यासांचा नियोग हा ते ऋषी होते म्हणून नाही तर सत्यवतीपुत्र ह्या नात्याने झाला होता. (भीष्म प्रतिज्ञाबद्ध असल्याने भीष्माने नियोग केला नाही)
पांडवांची उत्पत्ती देवांकडून नियोगाद्वारेच झाली (देव म्हणजे उत्तरकुरु अथवा हिमालयातील एक जमात असा अर्थ घ्यावा ;)) अर्थात पांडूच्या अधिक पुत्रमोहापायी तिथे नियोगाचे नियम फेटाळले जाउन जास्त पुत्रांना जन्म दिला गेला.

नियोगाद्वारे एकच पुत्र प्राप्त करायची मुभा होती. मुलगी झाली तर पुत्र प्राप्त होईपर्यंत नियोग केला तरी चालायचा. नियोगानंतर त्या पुरुषाशी पुन्हा कधीही संबंध न ठेवण्याची सक्ती असे.

अगदी आतापर्यंत सातवाहन, गुप्तकाळापर्यंत नियोगाची प्रथा प्रचलित होती.

आनंदी गोपाळ's picture

3 Nov 2011 - 1:00 am | आनंदी गोपाळ

इकडे ही नजर टाकून पहा!

चेतन सुभाष गुगळे's picture

3 Nov 2011 - 1:21 am | चेतन सुभाष गुगळे

आनंदीजी,

तिकडचा वणवा दाखवून कशाला उगाच इकडच्या लोकांना प्रेरणा देताय? एकाच वेळी दोन आघाड्यांवर मला लढता येईल का? तिकडे त्या प्रियालीला उत्तरे देताना माझा संगणक कळफलक आणि दहाही बोटे गारद व्हायच्या मार्गावर आहेत.

आनंदी गोपाळ's picture

3 Nov 2011 - 1:27 am | आनंदी गोपाळ

अशाने माझ्या पॉपकॉर्न विकण्याच्या दुकानाचं काय होईल?
माझ्या वारसांना काय देऊन जाईन मी? :(

चेतन सुभाष गुगळे's picture

3 Nov 2011 - 1:38 am | चेतन सुभाष गुगळे

तिकडची ओळख काय म्हणायची तुमची?