वेगवेगळ्या ओल्या,सुक्या चटण्यांचे प्रकार ह्या धाग्यात लिहिले तर हव्या त्या चटणी साठी एकत्र कलेक्शन मिळेल.तुम्हाला काय वाटते?
१)शेंगदाणे +तीळ+लसूण चटणी
१ वाटी शेंगदाणे,१/२ वाटी तीळ, १०ते १२ सुक्या लाल मिरच्या,१ मध्यम गड्डी लसूण,मीठ
शेंगदाणे व तीळ वेगवेगळे खमंग भाजणे.गॅस न लावताच लाल मिरच्या दाणे तीळ भाजलेल्या गरम कढल्यात घालून थोड्या परतणे.कढल्याच्या तेवढा गरमपणा पुरतो.
मिक्सर मध्ये तीळ आधी फिरवून घेणे त्यावर दाणे, मग मिरच्या आणि शेवटी लसूण घालणे. भरडच वाटणे.
घट्ट झाकणाच्या काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवणे.
अतिशय खमंग ऑलपरपज चटणी तयार.भाकरीपासून वड्यापर्यंत कशाही बरोबर मस्तच!
२)चणाडाळीची चटणी
१ वाटी चणा डाळ(हरबराडाळ) ,५ते ६ हिरव्या मिरच्या,१ पेराएवढं आलं,३ते ४ लसूण पाकळ्या,मीठ,फोडणीचे सामान
डाळ ३ ते ४ तास भिजत घालणे व नंतर वाटणे.वाटताना आले,लसूण व मिरच्याही त्यात घालून भरड वाटणे.
तेलावर खमंग फोडणी करणे.कढीलिंबाची ४,५ पाने फोडणीत घालून चुरचुरीत होतील असे पहाणे.मग ही फोडणी भरड वाटणावर घालणे.मीठ घालणे व कालवणे.
इडली,डोसा,उत्तपा इ. प्रकारांबरोबर ही चटणी फार छान लागते.
३)ओल्या खोबर्याची चटणी
ओले खोबरे १ वाटी, ४ते ५ सुक्या लाल मिरच्या,लसूण १० ते १२ पाकळ्या,१पेरभर आलं,मीठ,फोडणीचे सामान
ओले खोबरे वाटणे,लालमिरच्या घालून वाटणे,लसूण व आले घालून वाटणे,मीठ घालून परत एकदा मिक्सर फिरवणे.
तेलाची खमंग फोडणी करणे,कढीलिंबाची पाने चुरचुरीत करुन घेणे आणि हवी असल्यास पाव चमचा उडदाची डाळ घालणे व तीही खमंग होईल असे पहाणे.वाटणावर ही फोडणी ओतून चांगले कालवणे.
इडली,डोसा,उत्तपा इ. बरोबर ही चटणीही फर्मास लागते.
प्रतिक्रिया
2 Jun 2008 - 2:04 pm | स्वाती दिनेश
पहिल्या प्रकारच्या चटणीत मीठ घालायचे राहिले :)
लसणीनंतर मीठ घाला आणि परत एकदा मिक्सर फिरवा.सगळे भरडच वाटा.
2 Jun 2008 - 2:26 pm | मनस्वी
व्वा स्वातीताई.. एकदम मस्त धागा सुरु केलास!
च ट णी म्हणजे माझा एकदम आवडता प्रकार. झणझणीत आणि चविष्ट चटणी जेवणाला नेहेमीच रंगत आणते.
मला आवडेल या धाग्यातून नवीन नवीन चटण्यांचे प्रकार शिकायला :)
कढीपत्त्याची चटणी
साहित्य :
१ जुडी कढीपत्ता (साधारण २ मुठी)
१ चमचा तेल
४ चिंचेची बुटुकं
१/२ चमचा मीठ
४ वाळलेल्या लाल मिरच्या / १ चमचा तिखट
२ चमचे तीळ
कृती :
(१) कढीपत्ता धुवून वाळवा. १ चमचा तेलावर खरपूस परतून घ्या.
(२) तीळ भाजून घ्या.
(३) कढीपत्ता, तीळ, मीठ, मिरच्या / तिखट, चिंच सर्व मिक्सरमधून काढून घ्या.
ही चटणी पोळी / डोसा / उत्तप्पा बरोबर छान लागते.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
2 Jun 2008 - 4:21 pm | प्रभाकर पेठकर
कढीपत्ता धुवून वाळवा.
कढीपत्ता (खरे पाहता कढीलिंबाची पाने) सावलीत वाळवावी. उन्हात वाळवू नये. स्वाद कमी होतो, रंग बदलतो.
2 Jun 2008 - 5:04 pm | मनस्वी
काका, अहो कढीपत्ता आणि कढीलिंब यात फरक आहे ना.
कढीपत्ता - म्हणजे आपण भाज्यात फोडणीत वगैरे टाकतो तो.
कढीलिंब - आपण गुढीपाडव्याला गुढीला बांधतो, उंच डेरेदार झाड असते तो.
??
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
2 Jun 2008 - 9:10 pm | प्रभाकर पेठकर
ह्याचे उत्तर इतर प्रतिसादांतून मिळाले आहेच. 'कढीपत्ता' हे 'कढीलिंबांच्या पानांचे' हिन्दी नांव आहे.
2 Jun 2008 - 5:11 pm | स्वाती दिनेश
तो कडुलिंब ग मनस्वी..
2 Jun 2008 - 5:18 pm | मनस्वी
अस्सं होय!
:)
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
2 Jun 2008 - 5:11 pm | वरदा
कढीलिंब - आपण गुढीपाडव्याला गुढीला बांधतो, उंच डेरेदार झाड असते तो.
त्याला कडुलिंब म्हणतात आणि कढिलिंब आणि कढिपत्ता सेमच...
स्वाती मस्त धागा...
आम्ही नुसत्या तीळाचं तीळकूटही करतो...बाकी क्रुती तीच पण लसूण नाही घालत आणि डायरेक्ट लाल तिखट घालतो...
नारळाच्या चटणीत फोडणी नंतर थोडं लिंबू साखर घालून पण मस्त चव येते....
बाकी चटण्या खाण्यात सॉलीड मजा येते हे खरं....
3 Jun 2008 - 12:58 pm | प्राजु
कांद्याची चटणी :
१ मध्यम आकाराचा कांदा मोठा चिरलेला
लाल मिरचीची पावडर १ चहाचा चमचा
दाण्याचे कूट १ च. चमचा
कोथिंबीर मूठ भर
चिंच बोराइतकी
गूळ चिंचे इतकाच
मिठ..
वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून भरड वाटून घ्यावं गूळ आणि चिंचे सकट. ही तिखट, आंबट गोड चटणी वडे, भजी, पराठे, सँडविच सोबत एकदम फन्डू लागते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Jun 2008 - 4:40 pm | प्रभाकर पेठकर
चिंच बोराइतकी
चनिया-मनिया बोरं की अहमदाबादी बोरं????
4 Jun 2008 - 11:47 pm | वरदा
:))
अवांतर : चणीया मणीया बोरं खायला कसली मज्जा येते ना...छे मला अत्ताच खावीशी वाट्टायत...काय आठवण केरुन दिलीत काका....
5 Jun 2008 - 12:38 pm | प्राजु
चेन्या मेन्या नाहि हो. फार तर लिंबा इतकी म्हणा... (आता कागदी लिंबू की इड्लिंबू?? असे म्हणू नका)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Jun 2008 - 9:58 am | प्रभाकर पेठकर
(आता कागदी लिंबू की इड्लिंबू?? असे म्हणू नका)
हा: हा: हा:....! ठीक आहे नाही म्हणत.
2 Jun 2008 - 5:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चटण्यांचा धागा मस्त आहे. शेंगादाणे+ मिरची+मिठ +लसनाची = चटणी लै भारी.
हिरव्या मिरच्या मीठ अन् लसनाची चटणी ( पुर्वी गाडग्यात ठेवायचे, वरतून गोडतेल टाकून) काय भारी लागायची :)
कढीलिंबाची अन् कडुलिंबाची चर्चा आवडली :)
3 Jun 2008 - 11:42 am | मनस्वी
मी असा करते :
५-६ हिरव्या मिरच्या
३-४ लसूण पाकळ्या
४ चमचे भाजलेले शेंगदाणे
चवीपुरते मीठ - साधार्ण १/२ चमचा
४ चमचे तेल
तव्यावर तेल टाकून गरम झाले की त्यावर मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे टाकावेत. जाड वाटीच्या बुडाने तव्यावरच ठेचावे. मीठ टाकून परत एकजीव करावे. खमंग वास आल्यावर गॅस बंद करावा.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
2 Jun 2008 - 6:01 pm | राजे (not verified)
:)
छान रेसेपी व खालील उपयुक्त माहीती प्रतिसाद.
धन्यवाद चटणी साठी.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
2 Jun 2008 - 6:19 pm | स्वाती राजेश
दोडक्याच्या शिरांची चटणी:
१ वाटी दोडक्याच्या शिरा
१/२ वाटी सुके खोबरे
१/४ वाटी तीळ
१०-१२ हिरव्या मिरच्या चिरून
१ टे.स्पून तेल व फोडणीचे साहित्य
दोडक्यची भाजी करताना चिरण्यापूर्वी दोडक्याची साल किसणीवर किसून काढावीत.
लोखंडी कढईत १ टे.स्पून तेलाची फोडणी करावी त्यात मिरच्यांचे तुकडे परतावेत. त्यावर कीस घालून परतावे.कीस चांगले परतला गेला कि सुके खोबरे व तीळ घालून खमंग भाजेपर्यंत परतावे. चवीनुसार मीठ साखर घालावी...
2 Jun 2008 - 11:42 pm | वरदा
पडवळाच्या बियांची चटणी करायची
पडवळाच्या बिया त्यात भिजवलेलं डाळं, मिरची, मीठ, जिरं, तीळ घालून वाटायच्या आणि मग वरुन साधी फोडणी द्यायची...काय झक्कास लागते...
भोपळ्याच्या सालीची चटणी पण मस्त लागते....
5 May 2009 - 3:00 pm | नितिन थत्ते
या दोन चटण्यांचा उल्लेख आमचे देशस्थ मित्र आम्हा कोकणस्थांच्या कंजूषपणाची टिंगल करण्यासाठी करीत. =))
खराटा
(रंग माझा वेगळा)
3 Jun 2008 - 8:10 am | ईश्वरी
छान धागा आहे ग स्वाती.
शेंगदाणा कूटाची दह्यातील चटणी :
१ वाटी दही , ६-७ चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट, १-२ हिरव्या मिरच्या (चिरून) , २-३ लसूण पाकळ्या , थोडीशी कोथिंबीर , १ छोटा चमचा साखर , मीठ चवीनुसार.
दही खूप घट्ट असेल तर घोटभर पाणी घालून सर्व पदार्थ मिक्सर मधून फिरवून घेणे.
इडली , पराठे, पालक पुर्या , तिखट मीठाच्या पुर्या याबरोबर छान लागते. चटणी आवडीनुसार घट्ट वा पातळ ठेवावी.
पुदीना चटणी :
१ जुडी पुदीन्याची पाने, पुदीन्याच्या अर्धी कोथिंबीर , २-३ हिरव्या मिरच्या (तुकडे करून), छोट्या आकाराचा कांदा (अर्धाच घेणे -चिरून), ३-४ चमचे लिंबू रस, मीठ चवीनुसार, थोडेसे पाणी (साधारण ५-६ चमचे.).
सर्व पदार्थ मिक्सर मधून फिरवून घेणे.
चिंच गूळ खजूराची चटणी :
१/२ कप चिंचेचा कोळ , १/२ कप मऊ खजूर (तुकडे करून ) , १/४ कप किसलेला गूळ , लाल मिरची पूड / तिखट (आवडीनुसार अर्धा ते १ चमचा) , जिरेपूड १ चमचा , मीठ चवीनुसार , बडीशेप पूड अर्धा चमचा (ऐच्छिक)
सर्व पदार्थ मिक्सर मधून फिरवून घेणे.
वेगवेगळ्या प्रकारचे चाट, भेळ यासाठी वापरावी.
टीप : ख़जूर वाळलेला , कोरडा असेल तर साधारण २० मिनिटे पाण्यात भिजत घालावा व मग वापरावा.
हमस : (काबूली चण्यांची चटणी)
४०० ग्रॅम काबूली चणे (रात्रभर पाण्यात भिजवून नंतर उकडून पाणी काढून टाकलेले) , १/२ कप लिंबू रस, १/२ कप पाणी , १/२ कप तिळाची पेस्ट , २-३ लसूण पाकळ्या (ठेचून) ,१ चमचा ऑलीव्ह तेल , मीठ चवीनुसार.
तिळाची पेस्ट करण्यासाठी : १/२ कप ती़ळ भाजून पूड करून घेणे. मिक्सर च्या भांड्यात दीड दोन चमचे लिंबू रस, १ चमचा ऑलीव्ह तेल, १/४ कप पाणी घालून एकदा फिरवून घेणे. मग थोडी थोडी तिळाची पूड घालून परत सर्व एकजीव करून घेणे. हे मिश्रण घट्ट क्रीम सारखे दिसले पाहीजे. पातळ वाटल्यास अजून थोडी तिळ पूड घालून मिक्सर मधून फिरवून घेणे.
आता हमस करण्यासाठी वरील सर्व पदार्थ मिक्सर मधून फिरवून घेणे.
लेबॅनीज , अरेबिक खाण्यात ह्या चटणीचा वापर करतात. पिटा ब्रेड , सँडविचेस यासाठी हमस (स्प्रेड म्हणून) वापरतात तसेच वेगवेगळ्या प्रकरचे चिप्स बुडवून खाण्यासाठी (डिप म्हणून ) पण वापरतात.
ग्वाकामोले (Guacamole)- अवोकाडो ची चटणी :
अवोकाडो (avocado) हे हिरव्या खडबडीत जाड सालीचे आणि आत मऊ हिरवा गर असलेले मेक्सिकन फळ आहे. पिकलेले अवोकाडो बाहेरून काळपट हिरव्या रंगाचे दिसते. फळात मधोमध एकच तपकिरी रंगाची मोठी बी असते. अवोकाडो चे जे रेलिश वा डीप बनवतात त्याला ग्वाकामोले म्हणतात. आपण रहात असलेल्या ठिकाणी अवोकाडो मिळत असेल तर ग्वाकामोले जरूर करून बघा. झटपट बनते.
साहित्यः २ पिकलेले अवोकाडो, १ लिंबू, १ छोटा कांदा बारीक चिरून वा किसून, १ टोमॅटो बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरलेली, १-२ चमचे सावर क्रीम (ऐच्छिक), १ किंवा २ लसूण पाकळी (बारीक ठेचून वा किसून) , मीरपूड व मीठ चवीनुसार
कृती: अवोकाडोची साल सोलून आतील बी काढून टाकावे . एका भांड्यात गर काढून घ्यावा. तो चमच्याने वा सरळ हाताने कुस्करून घ्यावा. त्यात एक आख्ख्या लिंबाचा रस घालावा. कांदा, टोमॅटो आणि इतर उरलेले जिन्नस घालून मिक्स करा.
ग्वाकामोले मेक्सिकन खाण्यात (टॅको , एनचिलाडा , कसाडिया वगैरें बरोबर) तोंडीलावणे (साईड डिश ) म्हणून असते. ब्रेड वर टॉपींग म्हणून पण वापरतात. अवोकाडोची चव आवडत असेल तर ग्वाकामोले नुसते ही खाल्ल्यास छान लागते.
ईश्वरी
3 Jun 2008 - 7:14 pm | वरदा
अवाकाडोचा गर काढक्यावर लगेच लिंबु नाही पिळलं तर ते काळं पडतं म्हणून लगेच लिंबू पिळावे...
3 Jun 2008 - 2:30 am | वरदा
असं करतात होय हमस्..इथे तयार मिळते ती आणून खाते मी नेहेमी.....सह्ही गं इश्वरी..
3 Jun 2008 - 3:04 am | ईश्वरी
पंचामृत : अतिशय चविष्ट आणि करायला सोपा असा हा प्रकार आहे.
साहित्य : ७-८ बुटके चिंचेचा कोळ , पाऊण वाटी भाजलेल्या तीळाचा कूट , १/२ वाटीला थोडा कमी असा भाजलेल्या दाण्याचा कूट, ६-७ हि. मिरच्या (तुकडे करून), २-३ चमचे किसलेला गूळ (गूळ मऊच असेल तर किसता येणार नाही..कुस्करून घेणे), १ चमचा काळा मसाला (किंवा गोडा मसाला), मीठ चवीनुसार
फोडणीसाठी: २ चमचे तेल , मोहरी , ५-६ कढीलिंबाची पाने , हळद , चिमूटभर हिंग
कृती : कढईत तेल गरम करणे. त्यात मोहरी टाकणे. मोहरी तडतडली की हळद, हिंग, कढीलिंबाची पाने घालणे. मिरच्या घालणे. मिरच्या परतून घेणे. मग चिंचेचा कोळ घालणे. मीठ घालणे. १ वाटी पंचामृत करायचे असल्यास साधारण १ वाटी पाणी लागते. चिंचेचे पाणी कमी वाटल्यास थोडेसे साधे पाणी घालावे. पाण्याला उकळी येऊ देणे. उ़कळी आली की त्यात तिळकूट , दाण्याचा कूट घालणे. काळा मसाला घालणे. चांगले हलवणे. खूप घट्ट झाले आहे असे वाटल्यास परत थोडेसे पाणी घालून चांगले हलवून घेणे. गॅस मंद करून २-३ मिनिटे शिजू देणे. जरा घट्टसर झाले की गूळ घालणे. परत चांगले हलवून घेणे. एखाद दुसरा मिनिट अजून शिजू देणे. गॅस वरून भांडे उतरवले की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे.
(चिंचेचा कोळ तयार करण्यासाठी ७-८ बुट़के चिंच स्वच्छ धुवून १ वाटीभर गरम पाण्यात भिजत घालावी. साधारण २० मिनिटे भिजू द्यावी. चिंच हाताने कुस्करून, घट्ट पिळून चोथा टाकून द्यावा . वाटीत राहीलेले चिंचेचे पाणी म्हणजे चिंचेचा कोळ. पाण्यात चिंचेचे तंतू वगैरे आल्यास पाणी गाळून घेऊन वापरावे.)
ईश्वरी
3 Jun 2008 - 4:12 am | वरदा
माझी मावशी करायची हे लहान असताना खाल्ल्याचं आठवतय्... मस्त गं इश्वरी...धन्यु
3 Jun 2008 - 7:54 am | मीनल
साहित्यः लाल मिरची पावडर,तेल ,मीठ,मोहरी.
कृती: तेलात मोहरी घालून फोडणी करावी.
गॅस बंद करून जरा वेळ वाफ जाऊ द्यावी.
लगेचच ती गरम फोडणी लाल मिरची पावडरीवर घालावी.
मीठ घालून एकजीव करावे.
झट्पट तिखट तयार होते.गरम फोडणीमुळे लाल मिरची पावडर खरपूस होते .चांगली लागते.
आवडत असेल तर लसूण बारीक करून फोडणीत घालावा.तो तळून ब्राऊन झाला की मग गॅस बंद करून ती गरम फोडणी लाल मिरची पावडरीवर घालावी.
मीनल.
3 Jun 2008 - 8:58 am | पिवळा डांबिस
ए स्वाती१, स्वाती२, वरदा, ईश्वरी, आणि मनस्वी (?) तायांनो,
हसू नका हं!
आम्हाला पण एक चटणी माहिती आहे. एकदा काकूने मुळीच करणार नाही असं म्हटल्यावर रागाच्या तिरिमिरीत शिकून घेतली होती.......
सोड्याची चटणी
एक वाटी सोडे
दोन टीस्पून लाल तिखट पावडर
चवीसारखं मीठ (सांभाळून, सोड्याला मुळातच थोडं मीठ असतं!)
एक टीस्पून हळद
कृती:
सोडे तव्यावर तेल न घालता चांगले भाजावे. थंड करावे. सोडे थंड झाल्यावर कुरकुरीत होतात. ड्राय ग्राईंडरमध्ये घालून त्यांची कोर्स पावडर करावी. जास्त भुगा करु नये कारण मग तेल सुटते. त्या पावडरीत हळद, तिखट आणि मीठ घालावे व बाटलीत भरून ठेवावे.
चटणी खातांना त्यात कांदा बारीक चिरून घालावा. ही चटणी पटणीच्या भाकरीबरोबर वा वालाच्या बिरड्याबरोबर खायला मस्त लागते. बाहेर पाऊस पडत असेल तर मग विचारूच नका....
आपला,
डांबिसकाका
3 Jun 2008 - 10:24 am | मनस्वी
मस्तच हो डांबिसकाका.. झकास रेसिपी... तोंडाला चव आली एकदम :)
अजून येउदेत सोड्याच्या अन् बोंबलाच्या रेसिपीज तुमच्याकडून!
चटणी प्रकारात मोडत नसेल तर वेगळ्या धाग्यात द्या वाटल्यास..
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
3 Jun 2008 - 11:20 am | ईश्वरी
डांबिसकाका मस्तच. छान सांगितली रेसिपी. ह्यावरून मला अजून एक चटणी आठवली. सुकटाची. करायला एकदम सोपी आणि चवीला बेस्ट च. साधारण रेसिपी सोड्याच्या चटणी सारखीच .
२ वाट्या स्वच्छ केलेली सुकट , १ मोठा कांदा बारीक चिरून, तेल , लाल मिरची पूड १ ते दीड चमचा..तिखटाच्या आवडीनुसार, मीठ बेताने..चव बघून
कढईत तेल गरम करणे . तेलात कांदा परतून घेणे, त्यात सु़कट , लाल मिरची पूड , मीठ घालून परतून घेणे. जरा कुरकुरीत झाली की गॅस वरून खाली उतरवणे.
टीपः सुकट कांद्यावर घालताना हाताने थोडी चुरून घालावी.
ईश्वरी
3 Jun 2008 - 11:30 am | ऋचा
हा आधी मी दिला होता पण ह्या धाग्यात परत देते.
(आंबट-गोड टक्कू)
कैर्या-३
कांदे-२
साखर-५ चमचे
मीठ-३ चमचे (चहाचे असतात ते)
कृती- कैरी आणि कांदा कीसून घ्यायचा. एकत्र करुन त्यात साखर आणि मीठ घालायचं .
झाला तुमचा टक्कू तय्यार..
पोळी बरोबर किंवा नुसता पण छान लागतो.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
3 Jun 2008 - 11:38 am | स्वाती दिनेश
चटण्यांचे मस्त कलेक्शन होते आहे..
मनस्वी,कढीलिंबाची चटणी+मेतकूट+तूप+भात..काय बिश्शाद तोंडाला चव येणार नाही?
डॉ.साहेब,काय आठवण काढलीत हो,गाडग्यातली लसणाची चटणी ,व्वा!
स्वाती,दोडक्याच्या शिरांची चटणी लई म्हणजे लईच आवडती ..:)
पडवळ बियांची चटणी माहिती नव्हती ग मला वरदा,वा..
आणि ईश्वरी,तू तर ऍवोकाडो चटणी देऊन मजा आणलीस.पंचामृत...अम्म्म..वावा..
सुलेशबाबू,तुम्ही काकू नाही म्हणाल्या म्हणून का असेना सोड्यांची चटणी केलीत आणि ती ह्या धाग्यात गुंफलीत,मजा आ गया..
ऋचा,टक्कू तर ऑलटाईम फेवरिट मध्येच आहे..
मंडळी.. चटण्यांचे संमेलन मस्त आहे,:)
आता अजून काही भर..
कांद्याचे तिखट
साहित्य- २ मध्यम कांदे,४ते ५ पाकळ्या लसूण,चिंचेचं एक लहान बुटुक,तेल,मीठ,२ ते ३ चहाचे चमचे तिखट
कृती- कांदा चौकोनी चिरुन घ्या. लसूण पाकळ्या बारीक चिरा. चिंचेचं बुटुक कुस्करा. तेलावर कांदा गुलाबी परता,तिखट घाला आणि परता.लसूण घालून परता.चिंच घाला आणि परता. मीठ घाला आणि परता. हवे असल्यास अजून तिखट घाला आणि थोडे परता.
तिखटपणा आपल्याला हवा तसा कमी जास्त करा.झणझणीत केले तर मस्तच लागते.. विशेषतः भाकरीबरोबर,:)
स्वाती
3 Jun 2008 - 12:20 pm | स्वाती दिनेश
वाटीभर फ्रेश क्रिम मधे थोडे मीठ, एक चमचा साखर घालणे. एक मिरची व मूठभर पुदिना [किंवा अन्य सिमीलर ग्रीन हर्बज] वाटून घालणे आणि चांगले कालवणे. चटणी कम डिप तयार! विशेषत: मुग भजी, कटलेट इ.बरोबर खायला झकासच!
3 Jun 2008 - 7:20 pm | वरदा
सावर क्रीम मधे पालक, किंचीत लसूण आलं पेस्ट, मिरची टाकून स्पिनॅच डिप पण करता येतं...
3 Jun 2008 - 12:49 pm | वेलदोडा
ह्या प्रांतात मी ही जरा लूड्बूड करतोय..चालेल ना?
>>मनस्वी,कढीलिंबाची चटणी+मेतकूट+तूप+भात..काय बिश्शाद तोंडाला चव येणार नाही?
गरम गरम वाफाळता भात , त्यावर तूपाची धार आणि मेतकूट..अहाहा ..झकास कॉम्बीनेशन.
मेतकूटात घातले जाणारे पदार्थ साधारण माहीतेय पण प्रमाण नेमके माहित नाही म्हणुन जालावर शोधले. चटण्यांच्या संग्रहात अजून एक भर.
मेतकूट
साहित्यः हरभरा डाळ - १ कप , उडीद डाळ - १ कप , तांदूळ १/२ कप, गव्हाचे पीठ - १/४ कपाला जरा कमी , मोहरी १/४ कप,
जीरे - २ चमचे , धने २ चमचे, हींगः १/२ ते पाऊण चमचा, हळद - अर्धा ते पाऊण चमचा, सूंठ - १ चमचा, सुक्या लाल मिरच्या २-३
एक पसरट भांडे गरम करा. त्यात हींग , हळद , सूंठ हे पदार्थ सोडून इतर सर्व पदार्थ कोरडेच भाजून घ्या. गार झाल्यावर उरलेले पदार्थ मिक्स करा आणि ग्राईंडर मध्ये वाटून घ्या. हवाबंद डब्यात ही पावडर भरून ठेवा.
भात , मूग+तांदुळ खिचडी बरोबर मेतकूट खातातच. शिवाय दह्यात मेतकूट, किंचीत साखर , मीठ , बारीक चिरलेली कोथिम्बीर घालून रायत्याप्रमाणे खा.
अंड्याची चटणी: हाटेलातील नाव बूर्जी . आमच्याकडे अंड्याची चटणी म्हणतात.
४ अंडी, १ कांदा, हि. मिरच्या २-३ , १ टोमॅटो, मीठ , गरम मसाला अर्धा चमचा, कोथिम्बीर, तेल
पसरट भांड्यात तेल गरम करा. हि. मिरच्या चिरून घाला. परता. कांदा बारीक चिरलेला घाला. मीठ घाला. कांदा मऊ झाला की चिरलेला टोमॅटो घाला. गरम मसाला घाला. जरा वाफ आली की अंडी फोडून घाला. (आधीच अंडी फेटून ठेवली असल्यास उत्तम) सर्व मिश्रण भरभर हलवा. भांड्याला चिकटता कामा नये. मिश्रण घट्ट घट्ट होत जाते. फार कोरडे फडफडीत नको पण अंड्याचा ओलावा पूर्णुपणे गेला की कोथिम्बीर घाला व ब्रेड / चपाती बरोबर गरमागरम खा.
कांद्याची चटणी : घरात भाजीला काही नसले की आई ही चटणी करायची. गरम गरम भाकरी बरोबर छान लागते.
३-४ कांदे बारीक चिरून घ्या. (हेच ह्यातील अवघड काम), १-२ हि. मिरच्या बारीक चिरून घ्या.
पातेलीत ३-४ चमचे तेल गरम करायला ठेवा, त्यात मोहरी टाका, मोहरी तडतडली की मिरच्या परतून घ्या. मग कान्दा घाला. मीठ घाला. हलवून घ्या. कान्दा शिजण्यासाठी पातेली वर झाकण ठेवुन १ वाफ आणा. अधुनमधून झाकण काढून हलवुन घ्या. म्हणजे कांदा जळणार नाही. कांदा मऊ झाला की लाल तिखट घालणे - १ चमचा. काळा मसाला वापरणार असाल तर काळा मसाला अर्धा ते पाऊण चमचा व लाल तिखट अर्धा चमचा असे प्रमाण घ्या. भाजलेल्या दाण्याचा कूट साधारण ३ चमचे घाला. सर्व परत हलवून घ्या. १ वाफ घ्या. कोथिम्बीर घालून सजवा.
कांदा छान मऊ झाला पाहीजे पण काळपट , कडक , कुरकुरीत नको.
गरम गरम भाकरी / चपाती बरोबर झकास लागते. काही लोक दाण्याचा कूटाऐवजी बेसन पीठ पेरून घालतात. पण दाण्याचा कूट घातलेली कांद्याची चटणी जास्त छान लागते असे माझे मत आहे.
3 Jun 2008 - 7:17 pm | वरदा
बेसन घालून चटणी करुन पाहिन नक्की...मस्त
3 Jun 2008 - 12:58 pm | स्वाती दिनेश
माळेतला कांदा चौकोनी चिरा. हिरवी मिरची तेल लावून भाजून चुरडून घ्या.कांदा व मिरची दह्यात कालवा. चवीला मीठ घाला,थोडी कोथिंबिर घाला.(माळेतला कांदा नसेल तर साध्या कांद्यावर काम भागवा,:))
मस्त भरीत कम चटणी तांदळाच्या भाकरीशी झक्कास लागते.
ही माझ्या आजोबांची रेशिपी बरं का ..
स्वाती
वेलदोडा,तुम्ही दिलेल्या चटण्याही मस्तच,त्यातली कांद्याची चटणी वाचून तर मला हे आठवले,:)
3 Jun 2008 - 1:08 pm | प्राजु
तू ही आता सुगरण या सदरात मोडू म्हणजे शिजवू किंवा (चटण्या) वाटू लागलीस.. :)
सह्हीयेत एकेक रेसिपिज..
स्वाती... तुझे किती आभार मानू.... चल या निमित्त मी तुला अमेरिकेला माझ्या घरी निमंत्रण देते.. खास ..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Jun 2008 - 9:39 pm | पक्या
मुंग्यांची चटणी खाल्ली आहे का कोणी ? ;)
सिंगापूरात मिळते. चव चाखलेली आहे..आम्बटसर लागते.(अर्थात आवडली नाही पण उत्सुकतेपोटी चव बघीतली होती)
लाल मुंग्या द्रोणात गोळा केल्या जातात. भाजून की कुटून (?) त्यात मीठ , तिखट पूड , मोहरी तेल वगैरे घालतात. भारतातही कुठलीशी जमात अशी चटणी बनवते असे कधीतरी वाचनात आले होते.
4 Jun 2008 - 2:39 pm | जयवी
ए काय मस्त चटण्या दिल्यात गं तुम्ही........ अगदी संग्रही ठेवण्यासाऱखा धागा आहे.
तुम्ही डीप्सना पण सुरवात केलीये ना.........त्यातली माझं हे एक डीप.
लबनाह्.......म्हणून एक प्रकार इथे आखातात मिळतो......आपला चक्का म्हणूया त्याला
पिंक डीप
लबनाह -१ वाटी
दही- अर्धी वाटी
काळी द्राक्षं- ४-५
लसूण- ३-४ पाकळ्या
वॉलनट पावडर - १ टेबल्स्पून
मीठ- चवीनुसार
ह्या सगळ्या गोष्टी मिक्सर मधून पेस्ट करुन घ्याव्यात. नाजूक गुलाबी रंगाचं डीप खूप छान लागतं. डॉरिटोज, नॅचोज, फ्रेश व्हेजीटेबल्स...... ह्या सोबत एकदम झकास लागतं.
4 Jun 2008 - 4:55 pm | विसोबा खेचर
व्वा! एकापेक्षा एक सरस चटण्या!
चटण्यांच्या दुनियेत वावरताना मौज वाटली! :)
तात्या.
4 Jun 2008 - 5:00 pm | प्रभाकर पेठकर
पाकिस्तानी चटणी...
साहित्यः
पुदीना, दही, मीठ, जीरे पावडर, मिरच्या, कोथींबीर (वैकल्पिक)
पुदीना,मिरच्या, मीठ, एकत्र वाटून घ्यायचे. त्यात दही, जीरे पावडर आणि (वापरल्यास) कोथिंबीर बारीक चिरुन घालायची. चटणी फार पातळ नाही पण प्रवाही असावी.
तंदूर चिकन, कबाब (व्हेज्-नॉन.व्हेज दोन्ही), भज्यांबरोबर मस्त लागते.
लेबनीझ चटणी...
फ्रेश घट्ट क्रिम, लसूण, मीठ, दूध
लसूण किसून, ठेचून पाणी घालून (एक टेबलस्पून) मिसळून, घ्यावा. हे पाणी गाळून घ्यावे.
घट्ट क्रिम मध्ये मीठ आणि लसूणाचे पाणी मिसळावे. जरूर भासल्यास थोडे दूध मिसळावे (एक टेबलस्पून).
टीपः लसूण अगदी किंचित चव लागेल इतपत असावा. लसूणाने क्रिमवर वरचढपणा करू नये. (तसेच मीठाचेही.)
ही क्रिम चटणी चिकन कबाब बरोबर झकास लागते.
8 Jun 2008 - 3:10 am | चित्रा
चटण्या छान!
आणि सर्व पाककृती एकत्रित असल्याने मिळण्यासाठी सोप्या.
धन्यवाद!
8 Jun 2008 - 9:51 am | नंदन
धागा मस्त आहे. वर दिलेल्या तिसर्या क्रमांकाच्या चटणीत (ओल्या खोबर्याच्या) लाल मिरच्यांऐवजी कैरी किसून घातली तर त्याचा वेगळा प्रकार होऊ शकेल ना? हल्लीच्या भारतफेरीत आंबोळ्यांसोबत खाल्लेली चटणी तशीच केली असावी असा अंदाज आहे :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
8 Jun 2008 - 10:02 am | प्रभाकर पेठकर
लाल मिरच्यांऐवजी कैरी किसून घातली तर त्याचा वेगळा प्रकार होऊ शकेल ना?
वेगळा प्रकार नक्कीच होईल. पण 'तिखटा'ला 'आंबट' पर्याय योग्य वाटत नाही. 'चटणी' म्हणायचे आणि 'तिखट अजिबात नाही' असे काहीतरी होईल.
10 Jun 2008 - 1:49 am | अभिता
बोंबिलाची चटणी
साहित्यः-१०० ग्रॅम म्हणजे अंदाजे ७/८ मध्यम आकाराचे सुके बोंबिल,२ टोमॅटो,२कांदे,१च्.तिखट्,१च. कांदा-लसुण मसाला,मीठ
कृती:-कांदे टोमॅटो बारीक चिरुन घ्यायचे.बोंबिल पोह्यासारखे धूवुन निथळत ठेवावे.मग बारीक तुकडे करावे.२च.तेल गरम करुन त्यात कांदा,टोंमॅटो मऊ होईपर्यत परतवा.त्यात तिखट्,मसाला,चवीपुरते मीठ घालावे.मग तुकडे केलेले बोंबिल घालुन वाफ येऊ द्यावी.थोडे पाणी घातले तर चालेल्(वाफ येण्यापुरती).वरुन कोथिंबिर पेरावी.
10 Jun 2008 - 2:00 am | अभिता
पावसाळ्यासाठी किंवा बाळंतिणिसाठि केली जाणारी चटणी
साहित्यः-१ वाटी सुके खोबरे,लसुण्,मिरी,मीठ
कृती:-खोबरे किसुन घ्यायचे.त्यात लसुण्,मिरी मीठ घालुन मिक्सरवर किंवा खलबत्यात कुटावी.
लसुण,मिरी, मीठ चवीनुसार
5 May 2009 - 11:56 am | अश्विनीका
खूप छान धागा आहे हा.
इथे कोणाला टोमॅटो ची दक्षिण भारतीय करतात तशी चटणी माहित आहे का?
5 May 2009 - 3:56 pm | साक्षी
एक वाटी शेंगदाण्यात एक चमचा जिरे, आवडीप्रमाणे तिखट, चवीपुरते मीठ व चिमुटभर साखर घालून भरड वाटावे.
हिरवी मिरची भाजून घ्यावी. त्यात मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, दही घालून व्यवस्थित कालवून घ्यावे.
~साक्षी