टॅमरिंड राईस/ पुलिओदराई/ चिंचेचा भात

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
29 Sep 2011 - 12:27 pm

.

साहित्यः
२ वाटया तांदळाचा शिजवलेला भात
पाऊण ते एक वाटी जाडसर चिंचेचा कोळ (आपल्याला आबंटपणा किती हवे, त्याप्रमाणे कमी-जास्त करणे)
१ टीस्पून चणाडाळ
१ टीस्पून उडदाची डाळ
१ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून हिंग
७-८ कढीपत्ता
२-३ लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टेस्पून शेंगदाणे
३ टीस्पून तीळ व १ टीस्पून मेथीदाणे कोरडेचे भाजून त्याची एकत्र पुड करून घेणे
मीठ चवीनुसार
तेल

.

पाकृ:

भांडयात तेल तापवून मोहरी, चणाडाळ व उडदाच्या डाळीची फोडणी करावी.

.

डाळींचा रंग बदलला की त्यात कढीपत्ता, लाल- सुक्या मिरच्या व हिंग घालावे.

.

मग त्यात शेंगदाणे व हळद घालून परतावे.

.

चांगले परतले गेले की त्यात चिंचेचा लागेल तसा कोळ घालावा. त्यात मीठ व तीळ+मेथीदाणेपूड घालावी. (कोळ फार पातळ नको नाहीतर भात ओलसर होतो.)

.

साधारण एक उकळी आली की त्यात शिजवलेला भात घालून एकत्र करणे.

.

भांडे झाकून एक वाफ द्यावी. गरमा-गरम टॅमरिंड राईस तयार. आवडत असल्यास त्यात धणे-पावडर ही घालू शकता :)

.

प्रवासात नेण्यासाठी सोयीचा होतो, चवीला छान लागतो :)

प्रतिक्रिया

मानस्'s picture

29 Sep 2011 - 12:35 pm | मानस्

सुंदर पाककृती ..झकास छायाचित्रे.
बेंगलोरला असताना खुप खायचो हा भात्.आवडता नाश्ता. :)

अहाहा.. नाश्त्याला हा भात असला की परमानंदम्..

पाककृतीबद्दल धन्यवाद. फोटोही एकदम खास.

इरसाल's picture

29 Sep 2011 - 12:42 pm | इरसाल

पाकृबद्दल काय बोलू?
स्वप्नीलचा फोटो पाहणे अत्यावश्यक झाले आहे. कधी डकवताय ?

मैत्र's picture

29 Sep 2011 - 1:47 pm | मैत्र

एम टी आर चा रेडीमेड मसाला वापरून एकदम सोपा वाटतो. इतक्या डिटेल मध्ये इतका मस्त हा भाताचा प्रकार बनवणं फारच अवघड...
पहिला आणी शेवटचा सेम फोटो अप्रतिम आहे...
एकच सुधारणा... पुलिओदराई नव्हे... पुलिओगरे... किंवा आंध्राकडे पुलिहोरा असंही म्हणतात...

सानिकास्वप्निल's picture

29 Sep 2011 - 1:55 pm | सानिकास्वप्निल

पुलिओदराई किंवा पुलिओगरे असे तामिळ लोकं (Iyengar) म्हण्तात :)

स्मिता.'s picture

29 Sep 2011 - 2:00 pm | स्मिता.

पुलिओगरे हा माझाही लिंबू भात (लाईम राईस) नंतरचा आवडता प्रकार! एकदम चटपटीत मस्त लागतो हा भात. बंगलोरला असताना बर्‍याच वेळा खाल्लाय. बरी आठवण करून दिलीस.
पण एवढे उपद्व्याप करण्यापेक्षा MTR चा तयार मसाला हे माझ्याकरता जास्त सोयीचे आहे ;)
(चला, आता पुलिओगरे मसाला शोधणे आले....)

प्रभाकर पेठकर's picture

29 Sep 2011 - 3:23 pm | प्रभाकर पेठकर

चिंचभाताची पाककृती आणि छायाचित्र मस्तच आहे. लवकरच करून पाहावा म्हणतो आहे. धन्यवाद.

एक विचार मनांत आला आहे. चिंचभातात गूळ घातला तर? कारण आंबट चिंचेला गुळाची जोड (प्रमाणात) चांगली वाटते.

प्राजक्ता पवार's picture

29 Sep 2011 - 3:38 pm | प्राजक्ता पवार

माझी आवडती रेसेपी :)

मोहनराव's picture

29 Sep 2011 - 5:58 pm | मोहनराव

खुप मस्त भाताचा प्रकार आहे हा!!!
बंगलोरला असताना खाल्लाय!!!
छायाचित्र मस्त काढली आहेत!!! तोंडाला अगदी पाणी सुटला हो!!! ;)

रेवती's picture

29 Sep 2011 - 5:58 pm | रेवती

मस्त फोटू!
हा प्रकार सगळ्यांचा आवडता आहे.
मीही अश्याच पद्धतीने करते.
पेठकरकाका, कृपया गूळ अज्जिबात घालू नका.

सानिकास्वप्निल's picture

29 Sep 2011 - 6:05 pm | सानिकास्वप्निल

तु सांगितलेस बरं केले :)
गुळ नकोच ....

प्रभाकर पेठकर's picture

1 Oct 2011 - 2:34 pm | प्रभाकर पेठकर

ठिक आहे. तुम्ही म्हणताय तर नाही घालत. धन्यवाद.

विशाखा राऊत's picture

29 Sep 2011 - 6:01 pm | विशाखा राऊत

गुळ अजिबात नको.. मेथी आणि चिंच एकदम सही लागते :)

बाकी तुझ्या पाककृतीला रितीप्रमाणे उत्तम, अप्रतीम, तोपासु वगैरे बिगैरे :)

जाई.'s picture

29 Sep 2011 - 7:06 pm | जाई.

मस्तच
एकदम सोप्पयं

५० फक्त's picture

29 Sep 2011 - 7:27 pm | ५० फक्त

भात हाच मुळात जीव की प्राण आहे माझा,

त्यात हा प्रकार म्हणजे सोलापुरच्या बालाजीच्या देवळात प्रसादाला असतो, माझं लग्न झाल्यावर तिरुपतीला जाणं शक्य नव्हतं म्हणुन सोलापुरच्याच देवळात भल्या पहाटे अभिषेक केला होता आणि त्यानंतर तिथल्या पुजा-यानं एक टोपलं भरुन हा भात प्रसाद दिला होता, एरवी जर मिळाला तर मुठभरच मिळायचा, त्याची चव आयुष्याच्या शेवटपर्यंत जिभेवर जपण्यासाठी त्यानंतर कधीच पुलिहोरा खाल्लेला नाही, खाण्याची इच्छा पण नाही.

सकाळी साडेपाच वाजता पत्रावळीत वाढलेला गरम गरम पुलिहोरा, नव्या नवरीच्या बाजुला बसुन खाण्याचं सुख हे कल्पनेपलीकडचं होतं, त्यात तेंव्हा बायकोला भात आवडायचा नाही ही दुधात साखर होती. त्या भाताला येणारा कापराचा वास आणि चव आता लगेच अ‍ॅक्टीव्हेट झालेत मेंदुत.

असो, पाकृच्या आणि फोटोंच्या उत्तमतेबद्दल पुन्हा पुन्हा तेच काय लिहीणार, वेगळं लिहायची गरज नाही आणि शक्यही नाही, एक शंका मात्र आहे, सानिकातै तुमच्याकडे भांड्याना व्हायब्रेटर बसवले आहेत का ओ हल्ली, नाही म्हणजे चमचे न दिसता फोडणी वगैरे हलवली जाते असं दिसतंय.

रेवती's picture

29 Sep 2011 - 8:22 pm | रेवती

वा!!
भारी आठवण सांगितलीत.

५०फक्त.

खूप सुंदर आठवण सांगितलीत. मला अक्षरशः डोळ्यासमोर दृष्य आणि वातावरण उभं राहिलं. तिथे जाऊन असा प्रसाद खायची इच्छा होतेय.

अशा छोट्या वाटणार्‍या आठवणीच खूप जास्त महत्वाच्या असतात.

प्रभो's picture

29 Sep 2011 - 8:17 pm | प्रभो

मस्त!!!

पुलिहारा हा भात खूप चविष्ट लागतो.

पुलियोगरे खायला जाम आवडतो ब्वा...

- पिंगू

मस्तच गं.... ह्यांचा लेमन राइस पण एकदम असतो. कॉलेजला असताना एक south indian friend हा लेमन राइअस आणायची. त्याची आठवण झाली. धन्स. :)

सुहास झेले's picture

29 Sep 2011 - 11:18 pm | सुहास झेले

ज ह ब ह र ह द ह स्त !!

फोटो तर जबरी आलेत, तोंडाला पाणी सुटले :) :)

सूड's picture

29 Sep 2011 - 11:39 pm | सूड

लै झाक रेशिपी. बाकी असे फोटु आम्हाला काढता येतील तोच सुदिन !!
५० फक्त, अहो आहे की चमचा, वरुन सातवा फोटो. भांड्यात भात घातल्यानंतरचा. इफ आयाम नॉट राँग तो लाकडी चमचाच आहे.

पल्लवी's picture

29 Sep 2011 - 11:44 pm | पल्लवी

मस्तच.. :) :) :)
आमच्या मातुश्री अप्रतिम बनवतात हा भात.. पाकृ डिट्टो !!

चिंतामणी's picture

30 Sep 2011 - 12:56 am | चिंतामणी

बाकी लिहायची जरूरीच नाही.

जबरदस्त!!! एम टी आर चा मसाला आणून हा भात करते मी नेहमी..
जाम आवडतो हा भात.

:)

ऋषिकेश's picture

30 Sep 2011 - 11:08 am | ऋषिकेश

तुमच्या तपशीलवार आणि त्यातील भारतात सहज मिळणार्‍या पदार्थांनी तयार होणार्‍या पाकृ वाचुन आपणही करू शकु अस विश्वास वाटतो :) हा भात अनेकदा तमिळ मंडळींकडे खाल्ला आहे. प्रचंड आवडतो. मात्र स्वतः करायची हिंमत केली नव्हती. आता येत्या विकांताला हा भात नक्की!

निवेदिता-ताई's picture

30 Sep 2011 - 1:17 pm | निवेदिता-ताई

पण मी अजुन हा भात एकदाही खाल्ला नाही...

करुनच पहाते....कन्येला आवडला म्हणजे बास.

मितान's picture

2 Oct 2011 - 5:10 pm | मितान

मस्त रेसिपी आणि फोटो तर जबरदस्त ! :)
खूप आवडता भात आहे हा माझा ! वर थोडी ओल्या नारळाची पखरण असेल तर अजूनच बहार !!!

आजवर केवळ ऐकुन आहे या प्रकारा बद्दल. कधी चाखण्याचा योग आला नाही.
आता करून पहावा म्हणतो. :)

कच्ची कैरी's picture

3 Oct 2011 - 4:23 pm | कच्ची कैरी

पाकृ. व फोटो छानच आहे याबद्दल पुन्ह सांगायला नको पण तु आणि गणपा आता एकाच माळेचे मणी झालेत अस म्हणायला हरकत नाही.

खादाड's picture

4 Oct 2011 - 6:06 pm | खादाड

फोटो एक नंबर !! पुलियार सादो !! हे मझ्या माहितीतल्या तामिळी कुटुंबात म्ह्टले जाते !!!

भलती भोळे's picture

3 Nov 2011 - 3:52 pm | भलती भोळे

अनेक वेळा या भाताबद्दल ऐकले आहे, आता नक्की करून बघणार, फोटो छानच आलेत . :)