राम राम मंडळी.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची पटपडताळणी महाराष्ट्रात काही ठिकाणी सध्या सुरु आहे. शाळेत बोगस पटसंख्या दाखवून सरकारचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटणार्या शिक्षणसंस्थांचा शोध घेतला जाणार आहे. शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, केवळ नावाला संस्था आणि त्यांच्या शाळा आहेत. नावाला केवळ शिक्षक आहेत. आणि शासनाचे कोट्यवधी रुपये या शाळांवर खर्च होत आहे. विद्यार्थी नसतांना शाळेवर प्रचंड खर्च करावा लागतो, असे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे पट्पडताळ्णीची मोहीम सुरु करण्यात आली आहे.
सदरील पटपडताळणीसाठी शिक्षणाधिकारी,गट शिक्षणाधिकारी, महसुल अधिकारी, व इतर कर्मचारी यांची पथके नेमण्यात आली आहेत. सदरील कार्यवाही आज शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत असली तरी ही मोहीम उद्या विविध शाखांच्या सर्वच पदवी-पदव्युत्तर वर्गापर्यंत राबविल्या जाण्याची शक्यता आहे. सदरील पटपडताळ्णीमुळे बोगस शाळा जिथे चालतात म्हणजे जिथे विद्यार्थीच नाहीत आणि वेतन मात्र शिक्षकांना नियमित दिल्या जाते, अशा बोगस संस्थावर कार्यवाही करण्यात येत आहे. एका वर्ग तुकडीसाठी शाळेत नवीन नियमानुसार किमान वीस (शाळा-महाविद्यालयाची संख्या वेगवेगळी असू शकते) विद्यार्थी संख्या एका तुकडीसाठी असावी लागते. अशा वेळी जास्तीची विद्यार्थी संख्या दाखवून वर्ग तुकड्या वाढवून अनुदान लाटण्याचा प्रकार घडतो. वाढीव तुकड्यांच्या शिक्षकांचे वेतन शासनास विनाकारण करावे लागते.
कागदावरील विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहून संच मान्यता, शिक्षकांच्या विविध पदांना मान्यता यापूर्वी शिक्षणाधिकारी देत होते तेव्हा असे अचानक काय घडले की, पटपडताळणीची गरज पडली. पटपडताळणी अगदी योग्यच आहे, त्याबाबत काही शंका नाही. पण ही मोहीम किती दिवस चालेल असा प्रश्न आहे. सदरील पटपडताळणीमुळे जिथे विद्यार्थी संख्या कमी होती तिथे पटपडताळणी केल्यामुळे त्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे त्या अतिरिक्त ठरणा-या शिक्षकांचे समायोजन शासन करणार असले तरी महाराष्ट्रातील केवळ एका नांदेड जिल्ह्यात तीन हजार शिक्षक अतिरिक्त ठरल्याची बातमी वाचनात आली होती. पटपड्ताळणी दरवर्षीच होत असते. परंतु कागदावर होणारी आणि साटेलोटे करुन चालणारी ही प्रक्रिया आता बदलत आहे. विद्यार्थ्यांची पळवा-पळवी होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या एका बोटाला मतदानावेळी लावता ती शाई लावल्या जाते. एका जिल्ह्यात एकाच वेळी ही पटपडताळणी केल्या जाते तेव्हा अन्य जिल्ह्यातील विद्यार्थी एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात नेता येऊ नये म्हणून जिल्हा नाकाबंदीही केल्या जाते. शाळेत आणि कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी नियमित असावेत. बोगस विद्यार्थी दाखवून शिक्षकांची पदे भरण्याला आळा बसावा. शासनाचा शिक्षणावरील अतिरिक्त वाढणारा खर्च कमी व्हावा, असलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आणि सवलती मिळाव्यात, असे असले तरी खासगी मान्यता प्राप्त शाळा-महाविद्यालये ही पुढा-यांचीच आहे, वेतनेतर अनुदान संस्थांचालकांना सध्या मिळत नसले तरी विविध पदांच्या माध्यमातून आणि अशा बोगस शाळांमधून संस्थाचालकांना आर्थिक लाभ होत असतात अशा वेळी ही मोहीम कितपट टीकेल ही शंकाच आहे. तेव्हा-
१) पटपडताळणीमुळे शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा शासन जिथे रिक्त पदे उपलब्ध आहेत तिथे अशा शिक्षकांचे समायोजन करतील, परंतु सर्वांचेच समायोजन करण्यात शासन यशस्वी ठरेल काय ?
२) पटपडताळणीमुळे काही शाखांच्या वर्ग तुकड्या बंद होतील तेव्हा खासगी शाळांमधे (विनाअनुदानित) विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागेल, आणि शिक्षणाच्या मूलभूत हक्काच्या प्रश्नाबाबत काही समस्या निर्माण होतील काय ?
३) पटपडताळणीमुळे संस्थाचालकांची बोगसगिरी उघडकीस येणार असली तरी भविष्यात संस्थाचालक/ नेतेमंडळी यावर कोणता मार्ग शोधतील ?
४) महसुल अधिकारी कर्मचारी स्वच्छ कारभार करतील यावर कितपत विश्वास ठेवता येईल ?
५) विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत शुद्धतेची एक प्रक्रिया सुरु झाली आहे, सर्वच क्षेत्रातून या पटपडताळणीला पाठिंबा मिळेल, असे आपणास वाटते काय ?
प्रतिक्रिया
27 Sep 2011 - 6:14 pm | रेवती
लेखन मुद्देसूद झाले आहे.
विद्यार्थ्यांची पळवापळवी (तात्पुरती का होईना) करणे हे शिक्षणसंस्थांचे खरे रूप दाखवून देतात.
आपण उल्लेख केले शासकीय अधिकारी या कामावर नेमले तर ते नवे कुरण झाले.
जादाच्या शिक्षकांना सामावून घेताना कसरत होणार आहे.
त्यातही आपली वर्णी लागावी म्हणून काय करतील हे सांगायला नको.
म्हणजे काय तर हा प्रकल्प फार चालणार नाही. चाललाच तर यशस्वीरित्या पुर्णत्वाला जाणार नाही.
आपल्यासाठी यशाची व्याख्या आणि शासकीय अधिकार्यांसाठी 'यशाची' व्याख्या वेगळे असल्याने तिथेही वाद उद्भवतो.;)
27 Sep 2011 - 9:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>जादाच्या शिक्षकांना सामावून घेताना कसरत होणार आहे.
अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मोठा गंभीर होणार आहे. ज्या शिक्षक सेवकांना अजून तीन वर्ष पूर्ण झाली नाहीत त्यांची नियमित होणारी सेवाही सध्या धोक्यात आली आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना एकदा सेवेत सामावून घेईपर्यंत नुकत्याच नियुक्त झालेल्या शिक्षक सेवकांचे भवितव्य अंधारातच आहे.
एक उदाहरण-
'तुला शिक्षक करतो फक्त माझ्या भावाच्या मुलीशी लग्न करावे लागेल' संस्थेच्या व्यवस्थापनात असलेल्या एका सदस्याने एका गुरुजीला अट टाकली. मुलगी गणगोतातील असल्यामुळे थोडी फार तडजोड करुन, फारसे आढेवेढे न घेता गुरुजीही नोकरीच्या आमिषाने बोहल्यावर उभे राहण्यासाठी तयार झाले. विवाह ठरल्याप्रमाणे व्यवस्थित झाला. ठरल्या अटीप्रमाणे सदरील गुरुजी शिक्षण सेवक म्हणून शाळेत रुजूही झाले. शिक्षण सेवकाचा प्रस्ताव मान्यतेसाठी शिक्षण विभागाकडे गेला. पण आता पटपडताळणीच्या भानगडीत म्हणजे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय नव्या पदांना मान्यता द्यायची नाही असे धोरण ठरल्यामुळे गुरुजीच्या मान्यतेचा प्रस्ताव सध्या प्रलंबित आहे, आता गुरुजींची मोठी पंचायत झाली आहे.
-दिलीप बिरुटे
27 Sep 2011 - 9:42 pm | रेवती
हा हा हा.
याला धोंड गळ्यात बांधून घेणे म्हणत असावेत.;)
आपली वर्णी लागावी म्हणून हेही करत असतील याची कल्पना नव्हती.
27 Sep 2011 - 6:24 pm | विसुनाना
-हेच सर्वप्रथम मनात आले. बाकी शिक्षण हा 'व्यवसाय' असल्याने त्यास इतर चांगल्या/वाईट व्यवसायांचे सर्व नियम लागू होतात.
27 Sep 2011 - 6:24 pm | वेताळ
नोकरशाहीने सुरुवात केलीच आहे.कोल्हापुर भागात तर मोहिम ३/४/५ ऑक्टोबरला राबवणार आहेत पण चलाक नोकरशाहीने आपल्या व्यवसाय बंधुवर कोणतीही आफत येवु नये म्हणुन योग्य काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.
27 Sep 2011 - 8:48 pm | पैसा
केवळ अनुदान लाटण्याच्याच उद्देशाने जर कोणी शिक्षणसम्राटानी पटसंख्या जास्त दाखवली असेल तर त्याचा निषेध झालाच पाहिजे. पण या प्रश्नाची दुसरी बाजू अशी की जर ४/५ मुलं कमी आहेत म्हणून वर्ग बंद करण्यात येणार असेल तर त्या वर्गातल्या बाकीच्या १५/१६ मुलांनी कुठे जावं? पाठीवरची दप्तराची ओझी सावरत घरापासून ४/५ किलोमीटर पयपीट करायची वेळ कोणत्याच चिमुकल्यांवर येऊ नये.
मोजणीसाठी नाकाबंदी, वगैरे गोष्टी विचित्र वाटतात खर्या, पण हे काही ठिकाणी सर्रास चालत असावं. नाहीतर असं करण्याची गरज का भासावी? एका जिल्ह्यातले विद्यार्थी दुसर्या जिल्ह्यात नेणे हेही विचित्र वाटतं, पण अनुदान मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही थराला जात असावेत.
पण याचीही दुसरी बाजू जरा बघा. माझे वडील आणि ते गेल्यानंतर आई एका खेडेगावातल्या लहानशा शाळेचे मुख्याध्यापक होते. खेडेगावातल्या गरीब मुलांकडून येणारी फी अगदीच नगण्य. अशा वेळेला माझे आईवडील दोघेही काही मुलांची फी भरत असत, शिवाय स्वतःच्या पदरचे पैसे शाळेच्या गरजांसाठी खर्च करत असत. अशा परिस्थितीत सापडलेल्या मुख्याध्यापकांनी शिक्षक कमी होऊ नयेत म्हणून पटसंख्या जास्त दाखवण्यासाठी आटापिटा केला तर त्यात काय चूक?
नोकरशाहीबद्दलचे मुद्दे तर सर्वमान्यच आहेत! 'तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे' या विरक्त भावाने ते काय करतात पाहूयात. कदाचित त्यातून काही चांगलंही बाहेर पडेल!
27 Sep 2011 - 11:25 pm | चित्रा
१) पटपडताळणीमुळे शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा शासन जिथे रिक्त पदे उपलब्ध आहेत तिथे अशा शिक्षकांचे समायोजन करतील, परंतु सर्वांचेच समायोजन करण्यात शासन यशस्वी ठरेल काय ?
नाही. बहुतेक सगळीकडे यशस्वी ठरेल असे नाही.
२) पटपडताळणीमुळे काही शाखांच्या वर्ग तुकड्या बंद होतील तेव्हा खासगी शाळांमधे (विनाअनुदानित) विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागेल, आणि शिक्षणाच्या मूलभूत हक्काच्या प्रश्नाबाबत काही समस्या निर्माण होतील काय ?
शाखांच्या?! :)
का? खासगी शाळांना हे वर्ग सामावून घेण्यासाठी अनुदान दिले गेले तर? मूलभूत समस्या होतील असे वाटत नाही. पण यापेक्षाही जर या वर्गांना खासगी शाळांमध्ये सामावून घेण्याची सक्ती केली गेली तर खासगी शाळांतले पालक काय म्हणतील याचा मला अधिक प्रश्न वाटतो.
>> ३) पटपडताळणीमुळे संस्थाचालकांची बोगसगिरी उघडकीस येणार असली तरी भविष्यात संस्थाचालक/ नेतेमंडळी यावर कोणता मार्ग शोधतील ?
विचार करते आहे.
५) विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत शुद्धतेची एक प्रक्रिया सुरु झाली आहे, सर्वच क्षेत्रातून या पटपडताळणीला पाठिंबा मिळेल, असे आपणास वाटते काय ?
मला तर हे माहितीही नव्हते. किती लोकांना माहिती आहे?
पाठिंबा मिळू शकेल. अर्थात शाळांचे पर्याय असले तर. नाहीतर आमच्याकडची शाळा बंद करता पण पर्याय देत नाही, किंवा पर्यायी शाळा अशा विद्यार्थ्यांना सामावून घेण्यास तयार नसल्यास पाठिंबा मिळणे अवघड जाईल.
28 Sep 2011 - 12:19 am | रेवती
खासगी शाळांमध्ये सामावून घेण्याची सक्ती केली गेली तर खासगी शाळांतले पालक काय म्हणतील
का काही म्हणू नये?
खासगी शाळेत मुलांना पाठवण्याची काही कारणे आहेत (चूक की बरोबर हा वेगळा प्रश्न).
वर्गात कमी मुले असणे हे अनेक कारणांपैकी एक असण्याची शक्यता जास्त आहे.
एखाद्या बर्या खासगी शाळेचे शुल्क लक्षात घेता या बाबीची पूर्तता होत नाही असे दिसताच पालक आक्षेप घेतील आणि तो घ्यायलाच हवा. नाहीतर भ्रष्टाचारी तर आपापल्या मार्गाने जातील आणि काही कारण नसताना ज्यासाठी पैसे भरले ती गोष्ट साध्य नाही. जी मुले सरकारी शाळेतून आली आहेत त्यांचे वेगळे प्रश्न निर्माण होवू शकतात. म्हणजे कोणीच समाधानी नाही.
2 Oct 2011 - 4:07 am | चित्रा
>>म्हणजे कोणीच समाधानी नाही.
खरे आहे. पण यापुढचा प्रश्न असा आहे (या चर्चेशी अवांतर होईल) की अशा शाळांमध्ये अशा बाहेरून आलेल्या मुलांचे वेगळे वर्ग केले (प्रत्येक वर्गातील संख्या साधारण तीच ठेवून) तरी पालकांना चालेल का?
अर्थात बिरुटेसरांच्या म्हणण्याप्रमाणे असा प्रश्नच येणार नाही, कारण ही अनुदाने खाजगी शाळांना नकोच आहेत.
3 Oct 2011 - 5:13 pm | नितिन थत्ते
>>ही अनुदाने खाजगी शाळांना नकोच आहेत
हे तितकेसे खरे नाही. अनुदानांबरोबर येणारे नियम* नको आहेत. म्हणून अनुदाने नको आहेत. नियम लागू न करता अनुदाने दिली तर ती सर्वांना हवी असतील.
*नियम नको आहेत कारण त्या नियमांमुळे शाळांचे काही यूएसपी धोक्यात येतील.
28 Sep 2011 - 2:03 am | पाषाणभेद
भारतातील शिक्षणक्षेत्र??? यावरील विश्वास उडालेला असल्याने काही बोलायचे नाही असे ठरवीलेले आहे. उगाच कशाला आपला बीपी वाढवून घ्या. त्यापेक्षा दुसर्यांदा बॉडीगार्ड बघीन.
30 Sep 2011 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पटपडताळणीची मोहीम अगदी काटेकोरपणे राबविली तर काही गोष्टी चांगल्या घडतील. एकतर बोगस विद्यार्थी पटावर येणार नाहीत. दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांच्या अधिकच्या वर्ग तुकड्या दाखविल्यामुळे शिक्षकांची जी पदे भरल्या जात होती ती पदे आता भरता येणार नाही. त्यामुळे विविध शाळांच्या विविध पदांवर होणारा सरकारचा खर्च टळेल. बोगस संस्थांना आळा बसेल. पडताळणीची मोहीम दरवर्षी अगदी काटेकोरपणे राबविली गेली तर अशा अनेक बोगसगिरींना कायमचा चाप बसेल.
खासगी मान्यताप्राप्त शाळा या अधिकतर विविध पुढार्यांच्या शाळा आहेत. आपल्या शाळा चालविण्यासाठी सदरील संस्थाचालक मंत्र्यांपुढे जाऊन विद्यार्थी संख्या कमी करण्याची अट घालतील. वर्ष-दोन वर्षाची संधी द्या आम्ही अगदी नियमाने शाळा चालवू म्हणून गटशिक्षणाधिकारी ते मंत्रालयापर्यंत एक अनाधिकृत व्यवस्थेच्या माध्यमाने ही चाललेली पटपडताळणीत भविष्यात काही पळवाटा निघतील असेही मला वाटते.
शाळांना जोडून असलेल्या महाविद्यालयांमधे (अकरावी-बारावी) विविध शाखांच्या म्हणजे, कला शाखा, वाणिज्य शाखा, आणि विज्ञान शाखांमधे काही ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या अगदी कमी आहे. प्रयोगशाळा नाही. व्यवस्थित वर्ग खोल्या नाही तरीही शाळांना जोडून असलेल्या वर्गांमधे विविध अधिकच्या वर्ग तुकड्यांना आणि पदांना मान्यता दिलेली आहेत त्या शिक्षकांच्या समायोजनेचा प्रश्न निर्माण होणार आहे. अर्थात नवीन पदांना मान्यताच देणार नसल्यामुळे अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांना टप्प्या-टप्प्याने सेवेत सामावून घेतील असे वाटते.
समायोजनाची प्रक्रिया दिसतांना फार सोपी वाटते पण ती प्रक्रिया मला तितकी सोपी वाटत नाही. (इथे मला अधिक माहिती घेतली पाहिजे.)म्हणजे एका शाळेतून एखादा शिक्षक दुसर्या शाळेत सहजपणे सामावून घेतल्या जाईल का ? शिक्षकांचे आरक्षण (आरक्षणाची बिंदु नामावली) असलेल्या ठिकाणी काय पद्धत असते हे मला नेमकेपणाने सांगता येणार नाही. उदा. एनटी-ब प्रवर्गातील अतिरिक्त ठरलेला शिक्षक खूल्या प्रवर्गातील रिक्त असलेल्या जागेवर त्याचे कसे समायोजन करतील ? इथे जरा गुंतागुंतीचा प्रश्न आहे.
अजून एक; बोगस शाळांची संखा कमी-अधिक प्रमाणात सर्वत्रच आहे. संस्था चालक पुनर्पडताळणीची मागणी करतील. पहिल्यांदा कमी असलेली विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते. तेव्हा अशा पुनर्पडताळणीच्या वेळ काढू धोरणात पटपडताळणी करणारे पथक वैतागून जाईल. आणि काही ’मध्यम’ मार्गाने पडताळणी संपेल. महसूल अधिकारी कर्मचा-यांची कॉपीमुक्त अभियानात मदत घेतल्या गेली होती. तिथे काही देवाण-घेवाण करण्याची संधी कमी होती. तुलनेत सद्य विषयात संस्थाचालकांनी पतपडताळणीच्या प्रक्रियेत त्यांना काही 'बक्षीस' दिले तर त्यांच्या कामातील काटेकोरपणा निघून जाईल. संस्थाचालकांना जो पर्यंत शिक्षक भरतीतून जी काही आर्थिक मदत होते त्या ठिकाणी संस्थाचालक संबंधित शिक्षकांना मदत करतील परंतु जिथे शिक्षकांकडून अशी मदत झालेली नाही. अशा शिक्षकांच्या बाबतीत संस्था चालकांना ते गेले काय राहीले काय याबाबत काही सोयरसुतक राहणार नाही असे मला वाटते.
विद्यार्थ्यांच्या समायोजनाचा काही प्रश्न निर्माण होणार नाही,तो प्रश्नच नाही. एका पेक्षा अधिक असलेल्या वर्ग तुकड्या कमी होतील विद्यार्थी आहे त्याच शाळेत राहतील. विनाअनुदानित शाळा अगदी आनंदात चालू आहेत. त्यांना ना शिक्षकांची पदे भरायची आहेत ना शासनाच्या अनुदानाची गरज आहे. ना ते कोणते विद्यार्थी सामावून घेतील.
पटपडताळणीच्या बाबतीत शाळेतील उपस्थिती कमी आहे, तेव्हा शाळेतील शिक्षकांना आणि कर्मचार्यांना विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याच्या हाता पाया पडून 'बाबा रे शाळेत ये' इतकाच हट्ट धरावा लागणार आहे. ग्रामीण भागातील अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला तर प्रवेशाबरोबर खताच्या गोण्या मोफत मिळतील असे अमिष दाखविणारे संस्थाचालक मला माहित आहेत, तेव्हा विद्यार्थ्यांची पटसंख्या अधिक व्हावी यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या पुढे येतील असे वाटते.
अजून एक; पटपडताळी करणार्या पथकावर होणारा शासनाचा खर्च हाही विषय पुढे चर्चिल्या जाईल. बोटावर लावणा-या जाणा-या शाईचा खर्च (आजच दै. सकाळला बातमी होती) वाहन खर्च, विविध भत्ते याचीही चर्चा होत राहील.
बाकी, काहीही असो, ज्या आश्रमशाळा की वस्तीशाळांच्या बोगसगिरीवरुन महाराष्ट्राभरातील शाळांच्या पटपडताळणीची मोहीम राबविल्या जात आहे, त्याचे सर्वच क्षेत्रातून स्वागत नक्कीच होईल. एक उत्तम प्रक्रिया ज्यांना सुचली त्यांचे कौतुकच केले पाहिजे आणि सर्वच क्षेत्रातील भ्रष्ट व्यवस्थेबद्दल चर्चा होत असतांना अजून तरी सदरील मोहीमेत कोणी अडथळा आणला नाही, हा एक सध्यातरी सुखद धक्का मानला पाहिजे असे मला वाटते.
चर्चेत सहभागी होणारे मिपाकर रेवती वहिनी, चित्रा, वेताळ, विसुनाना,पैसा, आणि पाषाणभेद यांनी आपापले मुद्दे मांडून चर्चेत भर घातली आपल्या सर्वांचे आणि वाचकांचेही मन:पूर्वक आभार...!!!
-दिलीप बिरुटे
30 Sep 2011 - 10:42 am | भडकमकर मास्तर
वेगळ्या प्रश्नाची जाणीव झाली... लेखाबद्दल \धन्यवाद
ग्रामीण भागातील अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला तर प्रवेशाबरोबर खताच्या गोण्या मोफत मिळतील असे अमिष दाखविणारे संस्थाचालक मला माहित आहेत,
हे फार आवडले...
1 Oct 2011 - 8:32 pm | इरसाल
साहेब आजच बातमी पहिली.
नुसत्या औरंगाबाद जिल्ह्यात १०७ शाळा बोगस सापडल्या म्हणजेच फक्त कागदोपत्री.
पाहूया आता पुढे काय होते.
2 Oct 2011 - 8:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> औरंगाबाद जिल्ह्यात १०७ शाळा बोगस सापडल्या म्हणजेच फक्त कागदोपत्री.
औरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून पटपडताळणी आहे. शिक्षण विभागाने वरील शाळांशी पत्र पटपडताळणीसाठी पत्रव्यवहार सुरु केल्यावर शिक्षण विभागाच्या लक्षात आलं की वरील शाळा-संस्था केवळ नावालाच आहेत. शाळेंचा जागेवर पत्ताच नाही. ना विद्यार्थी, ना शिक्षक, कागदावर शाळा चालू. इतक्या दिवस शिक्षण विभागाच्या लक्षात येऊ नयेत का अशी प्रकरणे ? असो, आता व्यवस्थापनाशी पत्र व्यवहार (पत्ता असेल तर ) चालू होईल. बोगस शाळांची अजून खूप प्रकरणे बाहेर येणार आहेत तेव्हा देखेंगे आगे आगे होता है क्या.
अवांतर : पटपडताळणी माझ्याही महाविद्यालयात असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना आम्हाला मदत करावी लागणार आहे. आम्हाला प्राचार्या साहेबांनी सक्त ताकीद दिली आहे, रजा घ्यायच्या नाहीत, शिस्त दिसली पाहिजे, वर्ग चालू दिसले पाहिजेत, आणि विद्यार्थीही दिसले पाहिजेत. कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांना मदत करण्यासाठी आम्ही गैरहजर असणा-या विद्यार्थ्यांचा पत्ता शोधत काही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आलो. [आम्हाला दोन दोन विद्यार्थी वाटून दिले आहेत] पटपडताळणीसाठी विद्यार्थी हवे आहेत तेव्हा, सदरील गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहीला पाहिजे यासाठी भरपूर थापा मारुन आलो हे नम्रपणे नमूद करतो. :)
-दिलीप बिरुटे