आत्ताच "हमे तो लूट लिया मिलके हुस्नवालोंने" हे http://www.youtube.com/watch?v=wWN5GVOS1JY इथे पूर्ण ऐकलं.
मूळचा मी राहणारा औरंगाबादचा. जुनं औरंगाबाद म्हणजे धाकटं हैद्राबादच म्हणता येइल. निजामाची मराठवाडा प्रांताची राजधानी. नवीन औरंगाबाद मध्ये राहिलो तरी तिथली ती खास मोगलाइ ष्टाइल, नवाबी कारभार ह्याचं थोडं थोडं दर्शनही झालच; .
पण ती तिथली खास अशी वाटणारी मुसलमानी भाषा, त्या त्यांच्या टपर्यांवर लागलेल्या वेगवेगळ्या कव्वाल्या....
पुण्यात पोटापाण्यासाठी आल्यापासून कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं. तिथं रमजानचा भोंगा कधी कधी भल्या पहाटे त्रस्त करतोय असं वाटायचं. पण कधी कधी त्यातल्या लोकांना रमजानच्या "सेहरा"साठी का कशासाठीतरी उठवायला लागलेली काही गाणी, कव्वाल्या, घोषणा ह्याही आवडायच्या.
विशेषतः एखाद्या कव्वालीत सामान्य माणसाच्या मनातले भाव , त्याचे प्रकट केलेले राग्-लोभ मनाला भावतात.
कधी कधी अस्सल उर्दु गझल किंवा कव्वाली उर्दुशी फारसा परिचय नसल्यानं पूर्ण समजली नाही तरी काहितरी आवडतच. "लाहोल मिलाकुवत" किंवा "क्या ब्बाsssत" हे तोंडातून निघुन जातच जातं.
आता वरती दिलेला दुवाच बघा की. सगळ्या लावण्यवतींबद्दल असलेली तक्रार अगदि सुरेल मांडलीए.
गोड दिसणार्या पण दुष्ट, क्रूर( ,पाशवी) आणि नजरेने कत्ल करणार्या रूपगर्वितांबद्दलची तक्रार ह्याहून अचूक ती काय मांडणार?
अगदि साधी पेटी-तबला-डफ अशी वाद्ये वापरलेली दिसताहेत. पण शब्दरचनेसाठी अगदि अचूक ठेका, अचूक चाल!
आपण तर बुवा गाण्यावर फिदा झालोय. बस्स इतकच सांगायचं होतं. आवर्जून ऐका असं सुचवायचं होतं, म्हणून इथे धागा टाकतोय. संगीतातल्या जाणकारांनी भर घातल्यास उत्तम.
Please don't miss this. This is an all time great piece of music.
दुवा पुन्हा देतोयः-http://www.youtube.com/watch?v=wWN5GVOS1JY
प्रतिक्रिया
27 Sep 2011 - 6:28 pm | तिमा
हे गाणं लहानपणापासून लक्षात राहिले आहे आणि आवडले आहे. फक्त लहानपणी अर्थ कळत नसल्यामुळे मी
'काले काले गालोंने, गोरे गोरे बालोंने' असं म्हणायचो.
27 Sep 2011 - 8:24 pm | पैसा
लिंकसाठी धन्यवाद! हे गाणं 'अल हिलाल' सिनेमातलं आहे हे माहित होतं पण नट कोण वगैरे काही माहिती नव्हतं. जास्त शोधाशोध केली तेव्हा महीपाल आणि शकिला यांचा सिनेमा आहे असं कळलं. खरं तर गायकही फार प्रसिद्ध नसावा, पण गाणं फार गाजलेलं आहे.
27 Sep 2011 - 11:19 pm | मन१
अल हिलाल मधीलच आहे. विषय काहीतरी इस्लामिक लोककथांशी, इतिहासाशी संबंधित पिक्चर दिस्तोय.(बहुतेक मोझेस आणि इज्प्तच्या राजाची-फेरो ची लढाई वगैरे.)
गायक प्रसिद्ध कव्वाल आहेत हो. भलेही त्यांची इतर फिल्मी गाणी नसतील फार. कव्वालीच्या क्षेत्रातलं इस्माइल आझाद हे एक महत्वाचं नाव आहे तेव्हाचं. अगदि उच्चार शैलीही बघा, ती साधारण हिंदी पिक्चरच्या गाण्यासारखी नाही; खास वर्षानुवर्षे कव्वाली सादर करणार्या माणसाच्या आवाजाच पोत आणि ढंग जाणवतोय.
27 Sep 2011 - 8:38 pm | मदनबाण
कव्वाली साठीचे बहुगुणी यांचे धागे पहा...
त्यातलाच हा एक :---
http://www.misalpav.com/node/13506
27 Sep 2011 - 11:23 pm | मन१
तेव्हा वाचूनही काढली होती बरीचशी.
27 Sep 2011 - 10:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> मूळचा मी राहणारा औरंगाबादचा.
काय म्हणता ? कधी बोलला नाहीत. ;)
मालक, रमजानच्या काळात रोशनगेटच्या परिसरात चमचमीत काही खायला मिळतं का म्हणून आमची भटकंती होतीच. बाकी, आपल्या औरंगाबाद शहरातील काही भाग मला मिनि पाकिस्तानच वाटतो. मुस्लीम स्त्रीयांची खरेदीसाठी चाललेली धावपळ, बुरख्याच्या आडून आपल्याच कडे पाहात आहेत असे वाटणार्या त्या भिरभिरणार्या नजरा, तो अत्तरांचा घमघमाट, इ.इ. बाकी, कव्वाल्या, निजामी राजवटीतील मराठवाड्याच्या वाटेला आलेले भोग, भाषा आणि मराठवाड्यातील तुमच्या, माझ्या, यशवंत आणि आंद्या सारख्या प्रेमळ लोकांबद्दल ही कधी तरी लिहा राव :)
-दिलीप बिरुटे
27 Sep 2011 - 11:12 pm | मन१
>> काय म्हणता ? कधी बोलला नाहीत.
अर्रर्र...चुकुन बोलून गेलो का काय. गुपित फुटलं म्हणायचं.
>> बाकी, आपल्या औरंगाबाद शहरातील काही भाग मला मिनि पाकिस्तानच वाटतो. मुस्लीम स्त्रीयांची खरेदीसाठी चाललेली धावपळ, बुरख्याच्या आडून आपल्याच कडे पाहात आहेत असे वाटणार्या त्या भिरभिरणार्या नजरा, तो अत्तरांचा घमघमाट, इ.इ.
एक आक्षेप.व्यनि करतोय.
>> बाकी, कव्वाल्या, निजामी राजवटीतील मराठवाड्याच्या वाटेला आलेले भोग, भाषा
भोग आले हे खरेच. रझाकारांनी भलताच उच्छाद मांडला होता. पण एक वेगळिच माहिती समजली काही जुन्या लोकांशी , विशेषतः सनदी अधिकारी किंवा मूळचे निझाम्-स्टेट मधले कर्मचारी आणि नंतर भारत सरकारात सामावले गेलेले असे सगळे, आणि काही तत्कालिन जनसामान्य ह्यांच्याशी बोलताना. आपल्याकडे समज आहे तसा/तितका हैद्राबादचा निजाम क्रूर आणि धर्मांध नव्हता.Head Of State म्हणून त्याची राज्याची सुव्यवस्था सांभाळायची जिम्मेदारी त्याने नीट पार पाडली नाही हे खरे, पण तो सामान्यजनांच्या घराघरात घुसुन संपत्ती लुटुन घेउन चाल्लाय असे जहाल गटाकडून चित्र रंगवले जाते, ते चूक आहे. निजामाच्या काळात, विशेषतः ४०च्या दशकात जगणे मुश्किल झाले हे खरे, पण त्याचे कारण रझाकार ही संघटना होती. म्हणायला ती निजामाची चाकरी करी, पण दडपशाहीच्या जोरावर ह्यांनी आख्खी शासनयंत्रणाच ताब्यात घेतली. हिंदु-मुस्लिम दंगे भडकवणे, त्यात मुस्लिमांची बाजू उचलून हिंदुंना झोडपणे असा काही त्याचा स्वतःचा अजेंडा नव्हता; तो रझाकार ह्या संघटनेचा होता. म्हणूनच १७ सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद पडल्यावर रझाकारांचा प्रमुख होता, त्याला युद्धगुन्हेगार समजून शासन झाले.(बहुतेक देहांत) आणि निजामाला मात्र शासन न करता पुन्हा भारतात सामील झालेल्या हैद्राबाद स्टेटचा कार्यकारी प्रमुख/governer म्हणून नियुक्त केले. ह्यालाही काही जनतेने फार विरोध केला असे नाही. State Bank Of Hyderabad ही त्याच्या राज्याची reserve bank होती. हरेक लक्ष्मीपूजनाला निजाम स्वतः सोवळे/कद नेसून हिंदुंच्या प्रथेप्रमाणे लक्ष्मीची पूजा करत असे ह्या बॅंकेच्या मुख्य कचेरीत.
हे झाले मराठवाड्याच्या नशीबी आलेल्या भोगाबद्दल. आणि भाषेबद्दल लिहायच तर तुम्हीच मनावर घेतलं पाहिजे बुवा.
>> आणि मराठवाड्यातील तुमच्या, माझ्या, यशवंत आणि आंद्या सारख्या प्रेमळ लोकांबद्दल ही कधी तरी लिहा राव
मराठवाड्याच्या समृद्धीबद्दल काय लिहिणार हो. इथल्या सर्वसाधारण माणसांबद्द्ल व्यंकटेश माडगूळकरांनीच ह्या संतांच्या भूमीबद्द्ल आणि इथल्या समृद्ध संस्कृतीबद्द्ल लिहिलय "मराठवाडा मोलाचा" अशा काही शीर्षकाचा एक लेख. आणि हो, व्यक्तिगत म्हणाल तर यश्वंत , आंद्या, तुम्ही ही सगळी प्रेमळ मंडळी त्यांच्या लिखाणातून खणखणीत बोलतच आहेत की.
28 Sep 2011 - 9:20 am | मराठी_माणूस
मराठवाड्या बद्दल अजुन लिहा, वाचायला उत्सुक.
28 Sep 2011 - 11:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> एक आक्षेप.व्यनि करतोय.
व्य.नि. अजून आला नाही. पण, बहुसंख्य मुस्लीम असलेल्या भागाला मी मिनी पाकिस्तान म्हटले यावर आक्षेप आहे काय ?
मनातल्या मनात : बिकाचीही खरड आली आहे. काय भानगड असेल बरं ?
-दिलीप बिरुटे
28 Sep 2011 - 4:56 pm | निखिल देशपांडे
हम्म्म
28 Sep 2011 - 5:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सॉरी सर, आपल्याला विसरुन गेलो होतो.
जरा लिहा की आपल्या मराठवाड्याबद्दल. :)
-दिलीप बिरुटे
28 Sep 2011 - 12:46 am | चित्रगुप्त
आणखी एक अविस्मरणीय कव्वाली:
चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा: अजीज नाजा
http://www.youtube.com/watch?v=duFDy6Rwq9Q
28 Sep 2011 - 3:29 am | शुचि
अगदी अगदी
28 Sep 2011 - 4:36 pm | नन्दादीप
ही कव्वाली सर्वप्रथम ट्रेन मधे ऐकली होती. साला एवढा पागल केला त्याने, त्याला १०+१० असे २० रुपये देवून परत गायला सांगितल. मस्त आहे... मधेच कधितरी ऐकत असतो. मजा येते.
28 Sep 2011 - 6:29 am | ५० फक्त
मस्त लिहिलंय रे, अजुन थोडं जास्त वाचायला आवडलं असतं,
28 Sep 2011 - 11:52 am | समीरसूर
छान लेख!
कव्वाली आणि गझल निराळ्याच विश्वात घेऊन जाते हे खरं.
गुलाम अलीची 'चुपके चुपके...' ऐकली की असं एक वातावरण तयार झाल्यासारखं वाटतं.
"दोपहर की धूप में, मेरे बुलाने के लिए
वो तेरा कोठे पे, नंगे पाव आना याद हैं"
असं वाटतं खरंच कुठली तरी मोठी हवेली आहे आणि एक लावण्यवती आपल्याला दुपारच्या रखरखत्या उन्हात भेटायला येतेय. तहानेने व्याकुळलेल्या जीवाला गार पाण्याच्या घोटाने जसे वाटते तसे तिच्या चेहर्याकडे बघून वाटते..
"तेरी निगाह से ऐसी शराब पी मैने, के फिर ना होश का दावा किया कभी मैने
वोह और होंगे जिन्हे मौत आ गयी होगी, निगाह-ए-यार से पायी हैं जिंदगी मैने"
पंकज उधासच्या मधाळ आवाजात हा शेर ऐकला की वाटतं खरंच कुणीतरी नजरेचे बाण चालवणारी आहे, तिला बघून, तिच्या नजरेची धार बघून हृदयाला छिद्र पडतात...तिच्या मानेवर रुळणार्या केसांचे रेशमी पीस डोळ्यांवरून फिरते....
"मैं तेरी मस्त-निगाही का भरम रख लुंगा
होश आया भी तो कह दुंगा मुझे होश नही"
अजून एक नजरेने घायाळ करणार्या सौंदर्यवतीचे कौतुक करणारा शेर! अगदी वेगळ्याच जगात घेऊन जातात हे स्वर, हे शब्द, या व्हायोलिनच्या सरसर फिरणार्या सुरावटी...स्वप्नवत!
"मैं तेरा कुछ भी नही हूं, मगर इतना तो बता
देखकर मुझको तेरे जहन में आता क्या हैं?
एक नजर मेरे तरफ भी, तेरा जाता क्या हैं
अपनी तसवीर को आँखों से लगाता क्या हैं"
गुलाम अलीचे आर्त स्वर घायाळ करून जातात.
एक छोटेखानी घर. घरासमोर एक अलिशान महाल. छोट्या घराच्या खिडकीतून मी महालाच्या गवाक्षाकडे बघतोय. तितक्यात तिथे एक सुंदर तरुणी येते. तिच्या गोर्या-गोर्या चेहर्यावर केसांच्या बटा पहारा देत आहेत; पाणीदार डोळे नितळपणे बाहेरचे दृष्य बघत आहेत; तिची मान म्हणजे एखाद्या मद्याचा चषक! कंबर म्हणजे एखाद्या चमचमत्या मासोळीचे सरसरते अंग! गोरापान गळा म्हणजे आसुसलेल्या ओठांसाठी अत्युच्च स्पर्शसुखाचा स्वर्ग! बघणार्याचा श्वास अडकेल आणि त्यातच मृत्यूशी हवीहवीशी गळाभेट होईल अशा रीतीने होणारी तिच्या छातीची मंद, संथ हालचाल! तिचे माझ्याकडे लक्ष जाते...केसांना एक हलकाच झटका देऊन ती दुसरीकडे बघू लागते..मी एकटक तिच्याचकडे बघतोय...थोड्या वेळाने ती बांगड्या सारख्या करण्यासाठी खाली बघते आणि तिची नजर सर्रकन खाली वळते...वळतांना माझ्यावर आनंदाचे असंख्य तुषार बरसावेत अशी तिची नजर अर्ध्या क्षणापुरतीच माझ्या नजरेत अडखळते...काही वेळाने ती निघून जाते. दुसर्या दिवशी तोच सिलसिला....मी तिच्या गवाक्षात येण्याची वाट बघतो. ती आता दिवसातून सात-आठ वेळा गवाक्षात येते...बघते...माझा कडेलोट होतो आणि मी तिला नजरेनेच विचारतो....देखकर मुझको तेरे जहन में आता क्या हैं?
खूप वर्षे लोटतात, गावे बदलतात, गवाक्षसुंदरी हरवते, मनात कालवाकालव होते, आठवण येते कधी-कधी, मन हळवे होते...जर-तरची भाषा नागिणीसारखी मनाला डसत राहते. भाषाच ती, ती थोडीच काळाइतकी सामर्थ्यवान की गेलेला काळ पुन्हा जसाच्या तसा उभा करू शकेल. मग तिची आठवण जपून ठेवण्याखेरीज हातात काहीच उरत नाही. तिची आठवणच किती मनोहारी, किती मलमली! हलकेच तिच्या आठवणीची भरजरी शाल काढली की मनाला तिच्या गोर्या गळ्याचा, भुरभुरत्या चितचोर केसांचा मखमली स्पर्श जाणवू लागतो.
"किसी नजर को तेरा इंतजार आज भी हैं
कहां हो तुम के ये दिल बेकरार आज भी हैं"
असे म्हणत पुन्हा कामाला लागायचे, ती पुन्हा कधीच दिसणार नाही हे माहित असून...कारण मनाची दुनिया आठवणीवर चालते, तिथे भविष्याची चिंता नसते...
गझलांची ही ताकद खरच वंदनीय आहे! कल्पनेच्या जगात घेऊन जाऊन तिथेच अलगद सोडण्याची ही किमया गझलच करु जाणे!!
--समीर
28 Sep 2011 - 12:54 pm | आत्मशून्य
माझी अत्यंत आवडती गझल आहे चूपके चूपके रात दीन.. खरच.. एक वेगळच विश्व उभं राहतं डोळ्यासमोर. आणी त्यात गूलाम अलीची गायकीही अप्रतीम.
28 Sep 2011 - 2:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
काय लिहीलय! काय लिहीलय!!
दिल खुश हो गया जनाब!!
गझल ही तर आमची पहीली सखी... गालीब, अहमद फराज, निदा फाजली ही आमची आवडती मंडळी...
सगळ्यात जास्त आवडतो तो गालीब!! साला काय चीज होता... त्याचे शेर डायरेक्ट काळजात घुसतात.
उनके देखेसे जो आ जाती है मुहपे रौनक |
वो समझते है बिमार का हाल अच्छा है ||
खल्लास!! काय thought आहे.
होता नाही एहसास-ए-खुशबू जब वो गुजरता है पाससे
मुद्द्तो आती ही खुशबू उसके जाने के बाद.
काय बोलावं?
गझलेचे जग निराळं, तिथली वळणं निराळी....
28 Sep 2011 - 2:18 pm | शाहिर
तिची मान म्हणजे एखाद्या मद्याचा चषक! कंबर म्हणजे एखाद्या चमचमत्या मासोळीचे सरसरते अंग! गोरापान गळा म्हणजे आसुसलेल्या ओठांसाठी अत्युच्च स्पर्शसुखाचा स्वर्ग! बघणार्याचा श्वास अडकेल आणि त्यातच मृत्यूशी हवीहवीशी गळाभेट होईल अशा रीतीने होणारी तिच्या छातीची मंद, संथ हालचाल
ग्ग ..ग.ग...ग्ग...
काय हे वर्णन .....
28 Sep 2011 - 4:40 pm | अविनाशकुलकर्णी
'काले काले गालोंने, गोरे गोरे बालोंने' असं म्हणायचो.
ठार झालो
28 Sep 2011 - 4:43 pm | बिपिन कार्यकर्ते
कव्वाली छान आहे! पण तुम्ही ऊर्दूचा खून केलात! ;)