साहित्य:-दोडक्याच्या शिरा.
थोडे शेंगदाणे
थोडे खवलेले खोबरे.
कोथिंबीर.
मिठ.
चवीपुरता साखर.
लिंबाचा रस.
हिरवी मिरची.(ऐपतीप्रमाणे)
एक चमचा तेल.
कृती :-प्रथम पॅनमध्ये तेल घेऊन त्यावर शेंगदाणे घालून चांगले परतावे.
त्यावर दोडक्याच्या शिरा व हिरवी मिरची घालून परतावी.
परतलेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात खवलेले खोबरे,कोथिंबीर,मिठ्,साखर घालून चटणी
वाटून घ्यावी.वाटलेली चटणी भांड्यात काढून त्यावर आंबटपणासाठी लिंबू पिळावे.चटणी तयार.
प्रतिक्रिया
17 Sep 2011 - 4:46 pm | खादाड
छान आहे चट्णी !
माझी आई कुरकुरीत चट्णी बनवते ह्या शिरांची ! :)
18 Sep 2011 - 12:24 pm | सोत्रि
मी दोडक्याची चटणी कुरकुरीतच खाल्ली आहे, दोडक्याच्या भाजीपेक्षा चटचीच जास्त आवडते.
ही चटणीही आवडेल खोबरे आणि लिंबु असल्यामुळे, मस्त पाकृ !
- (कुरकुरीत) सोकाजी
19 Sep 2011 - 9:24 pm | पांथस्थ
एकदम एकदम!
17 Sep 2011 - 10:42 pm | ५० फक्त
हिरवी मिरची ऐपती प्रमाणे म्हणजे सोसेल इतपत असे म्हणायचे आहे का तुम्हाला, ऐपत ही आर्थिक असते.
18 Sep 2011 - 4:30 am | शिल्पा ब
तुम्ही जरा गपा हो ५० फुगळे...
मस्त दिसतेय गं चटणी...करुन बघेन.
23 Sep 2011 - 1:05 am | Nile
=)) =))
18 Sep 2011 - 4:32 am | सानिकास्वप्निल
मस्त :)
थोडे कोरडे भाजलेले तीळ घालूनही छान लागते चटणी :)
18 Sep 2011 - 9:15 am | निवेदिता-ताई
आमची पद्धत --
दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या, मिक्सरमध्ये एकदाच फिरवायच्या , तिळ भाजून घ्यायचे, फोडणी करुन त्यावर
शिरा परतुन घ्यायच्या- -- कुरकुरीत होईपर्यंत, नंतर त्यात मिरचीपावडर आवडी प्रमाणे , मिठ चवीनुसार, चिमुटभर साखर,
भाजलेले तिळ, थोडेसे शेंगदाणा कुट घालून पुन्हा थोडावेळ परतून घेणे, कुरकुरीत चटणी तयार, आमच्याकडे ही चटणी भाजी सारखी खातात. :)
18 Sep 2011 - 10:43 am | स्पंदना
मला फार आवडते ही चटणी . पण दोडका वा त्याची भाजी नाही आवडत्.त्या मुळे लहाणपणी ज्या दिवशी दोडका असेल त्या दिवशी फक्त चटणी वर ताव !
18 Sep 2011 - 11:24 am | गवि
झक्कास.. भातासोबत खाल्ली की इतर काही नको.. :)
दोडक्याच्या भाजीपेक्षा ही शिरांची चटणीच जास्त छान वाटते. शिरा काढून उरलेला दोडका वाया जाऊ नये म्हणून त्याची भाजी करायची झालं..
18 Sep 2011 - 12:26 pm | सोत्रि
अगदी मनातले बोललात!
- (वाया गेलेला दोडका) सोकाजी
23 Sep 2011 - 1:04 am | Nile
>> झक्कास.. भातासोबत खाल्ली की इतर काही नको..
>>>>अगदी मनातले बोललात!
सहमत आहे.
बाकी कालच सोकाजी स्वतःला भोपळा म्हणत होते आणि आज अचानक दोडका कसे ब्वॉ? डायटिंग वर काय सोकाजीपंत? ;-)
18 Sep 2011 - 12:39 pm | जाई.
मस्तच
19 Sep 2011 - 6:58 am | रेवती
तीळ घालून कुरकुरीत चटणी माहीत होती. हा प्रकार नवीनच!
कोरडी चटणी केल्याकेल्या संपते असे नव्हे तर कमी पडते म्हणून त्यात सुके किसलेले खोबरे मिसळतात तेही छान लागते व पुरवठा येते.
19 Sep 2011 - 1:20 pm | शुभांगी कुलकर्णी
आम्ही दोडक्याच्या शिरा एखादी हिरवी मिरची व लसणाच्या ४-५ पाकळ्या घालुन मिक्सरमधुन काढतो. त्याच्या बरोबरीने सुक्या खोबर्याचा किस, निम्मे पांढरे तीळ, मीठ घालुन तेलावर परततो. मस्त कुरकुरीत चटणी तयार.
अशीही करुन बघेन.
22 Sep 2011 - 8:42 pm | प्राजु
ती काळपट रंगाची कुरकुरीत चटणी खाल्ली आहे.
तीळ, सुके खोबरे.. मिरची घालून केलेली.
आईकडे कामाला एक बाई येतात त्यांच्याकडे, दोडक्याच्या शिरा, भोपळ्याच्या साली... यांच्या चटण्या करतात त्यात सुकलेली लाल मिरची, लसूण, जीरं , शेंगदाणे आणि बहुतेक तेलावर परतलेला कांदा घालतात. ती ही तिखट तिखट छान लागते.