एस.एल.भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले अग्रगण्य कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ.
त्यांच्या आत्मचरित्राच्या "माझं नाव भैरप्पा" या मराठी अनुवादात दोन उतारे वाचण्यात आले.
एका उतार्यात त्यांनी दिल्लीला असताना तिथली परिस्थिती पाहून तयार झालेले मत प्रकट केले आहे. सदुसष्ट साली इंदिरा गांधी सत्तेवर असताना सिंडिकेट-इंडिकेटचा घोळ, काँग्रेसचे विभाजन, बँकांचं राष्ट्रीयीकरण आणि गरिबी हटाव घोषणेचं निवडणूक राजकारण वगैरे घडत असताना इंदिराजींनी स्वतःला 'देशकी नेता', 'गरिबांची माता' वगैरे रुपात अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी चालवलेली 'नाटकं' त्यांनी प्रत्यक्ष पाहिली असं ते म्हणतात.
रोजच्या रोज फुटपाथ व्यापारी संघ, ऑटोचालक संघ, झोपडपट्टी संघ वगैरे अनेक लोक रामलीला मैदानापासून त्यांच्या निवासस्थानी मिरवणुकीने जात आणि तिथे त्या त्यांच्यासमोर भाषण ठोकायच्या आणि सर्व वृत्तपत्रं आणि प्रसार-माध्यमं (पुस्तकात प्रचार-माध्यमं असा शब्द वापरलाय) त्या भाषणाला अत्यंत विचारप्रचुर भाषण असल्यासारखं महत्त्व देत असं ते नमूद करतात. अशाच एका मिरवणूकीत घुसून त्या मोर्चेकर्यांचा चालू दरही त्यांनी जाणून घेतला याचेही वर्णन त्यात आहे. इतर कॉग्रेसजनांपेक्षा आपण लोकप्रिय आहोत हे दाखवण्यासाठी त्या अवलंबत असलेल्या मार्गांची सगळ्या पत्रकारांना माहिती असूनही ते त्यांना पाठिंबा का देत होते असा प्रश्न पडल्याचं ते लिहीतात.
सरदार पटेलांनी संस्थानिकांना "तुमच्या हयातीत तुमच्या थाटात काही कमी पडू नये म्हणून सरकार तुम्हाला तनखा देईल. तुमच्या मुलांना त्याच्या निम्मा आणि त्यांच्या मुलांना त्याच्या निम्मा मिळेल" असा शब्द देऊन त्यांना एकत्र आणून भारत तयार केला होता आणि हैद्रबाद व जुनागड वगळता सगळे राजे यावर विश्वास ठेवून होते. या संस्थानिकांच्या तन्ख्यापोटी सरकार वीस कोटी रुपये द्यायचे असे नमूद करून इंदिरा गांधी विविध क्षेत्रांतून ज्या प्रमाणात लाच घेत त्याच्याशी तुलना करता ही रक्कम एक सहस्त्रांशही नव्हती अशी ते टिप्पणी करतात.
राजकीय स्वर्थासाठी हा नंतर बंद होत जाणारा तनखा तर त्यांनी अचानक बंद केलाच शिवाय या नंतर राजकीय स्वार्थासाठी त्या जे काही करत गेल्या त्यामुळे राष्ट्राचा नैतिक पायाच ठिसूळ होत गेला आणि समाजातल्या कुप्रवृत्ती जोमाने आणि अधिक वेगाने पोसल्या जाऊ लागल्या असा आरोप ते करतात. "माझ्या जीवनकालात भारतात उदय पावलेली अत्यंत नीतिनाशक शक्ती म्हणजे इंदिरा गांधी" असा स्पष्ट अभिप्राय ते व्यक्त करतात.
दुसर्या उतार्यात ते लालबहादूर शास्त्रींच्या, बँकेत अकाउंटंट असलेल्या मुलाशी झालेल्या भेटीचे वर्णन करून त्याने सांगितलेली माहिती लिहीतात. मुलांचं शिक्षण चालू असताना शास्त्रीजी केंद्रीय मंत्री होते पण त्यांनी मुलांना सरकारी गाडी वापरू दिली नाही. आपल्या मुलांच्या नावापुढे शास्त्री नाव लावू दिलं नाही. नोकरीसाठी अर्ज करताना आपलं नाव कोणाला सांगायचं नाही अशी सक्त ताकीदही त्यांनी मुलांना दिली होती वगैरे बर्याच लोकांना आधीच माहित असू शकेल असं वर्णन त्यात आहे. देशाला शास्त्रीजींसारखे पंतप्रधान अधिक काळ लाभते तर देशाची राजकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर अधोगती झाली नसती असं मत त्यात मांडलं आहे.
आता यावरून मला अनेक प्रश्न पडले.
१. त्या काळातल्या राजकीय वगैरे परिस्थितीची सखोल माहिती मला नसल्याने आणि भैरप्पा हे राजकीय विश्लेषक नसल्याने हे निरीक्षण कितपत खरं आहे?
२. या उतार्यांवरून "इंदिरा गांधींच्या आधी सगळं नीट होतं आणि त्यांनी सगळं बिघडवलं" असा जो अर्थ ध्वनित होतो तो कितपत खरा मानावा?
३. हे समजा खरं मानलं तरी इतर काँग्रेसजनांनी आणि पत्रकारांनी त्यांना विरोध न करणे हे कितपत पटते?
४. लालबहादूर शास्त्री खरोखर इतके निर्मोही होते काय? त्यांना सत्तेसाठी असले काही करायची गरज पडली नाही काय?
५. हे खरं मानलं तरी इंदिरा गांधींनी केलेल्या कार्यापुढे हे गंभीर आरोप गौण आहेत असे मानावे काय? तसं म्हटलं तर मोदींसकट सगळ्या राजकीय नेत्यांना हेच तत्त्व लागू करावे लागेल काय?
६. इंदिरा गांधींना भारतातल्या राजकीय भ्रष्टाचाराची माता म्हणावे काय?
जाणकार मंडळी या शंकांचं निरसन करतील अशी आशा आहे.
डिस्क्लेमर १: ज्यांना हा सगळाच प्रकार फालतू आणि अनावश्यक वाटतो त्यांनी प्रतिसाद लिहीण्याचे कष्ट घेतले नाहीत तरी चालेल.
डिस्क्लेमर २: वरील उतारे संदर्भ म्हणून उल्लेखलेले नाहीत तर ते वाचून हे प्रश्न निर्माण झाले आहेत म्हणून इथे त्यांचा उल्लेख आहे. त्यामुळे "मिपावरच्या नाटकांमधल्या ओळी संदर्भ म्हणून वापरता येणार नाहीत" अशा छापाची वाक्यं नाही लिहीली तरी चालेल.
प्रतिक्रिया
17 Sep 2011 - 10:58 am | नितिन थत्ते
>>लालबहादूर शास्त्री खरोखर इतके निर्मोही होते काय?
या एकाच प्रश्नाचं उत्तर थोड्याश्या वेगळ्या स्वरूपात देतो.
शास्त्री ९ जून १९६४ रोजी पंतप्रधान झाले आणि ११ जानेवारी १९६६ रोजी त्यांचे निधन झाले. म्हणजे सुमारे १९ महिने ते पंतप्रधान झाले. तेवढ्या कारकीर्दीत ते अतिशय लोकप्रिय असावेत असे एकूण वाटते. १९ महिन्यांच्या कारकीर्दीवरून त्यांच्या स्वच्छ चारित्र्याचा निष्कर्ष काढावा की नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो. तुलनात्मक दृष्ट्या पाहिले तर राजीव गांधी नोव्हेंबर १९८४ मध्ये पंतप्रधान झाले. त्यांच्याही सुरुवातीच्या काळात ते प्रचंड लोकप्रिय वगैरे होते. जानेवारी १९८७ मध्ये बोफोर्स प्रकरण बाहेर येण्यापूर्वी (२६ महिने) होण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असता तर तेही पुढच्या काळात शास्त्रींप्रमाणेच स्वच्छ, प्रामाणिक वगैरे वगैरे म्हणून ओळखले गेले असते.
मनमोहन सिंग आणि नरसिंहराव यांच्याही पहिल्या २ वर्षांबाबत असेच म्हणता येईल.
17 Sep 2011 - 11:46 am | परिकथेतील राजकुमार
थत्ते चाचा तुमच्या ज्ञानाविषयी आणि अभ्यासु प्रतिक्रियांविषयी खरच आदर आहे.
मात्र तुमच्या वरिल प्रतिसादातून तुम्ही असे ध्वनीत करत आहात, की एखादे प्रकरण उघडकीला यायच्या आधी शास्रीजींचा मृत्यु झाला म्हणून ते स्वच्छ प्रमाणिक गणले गेले.
अतिशय बेजबाबदार असे हे विधान आहे. तुम्हाला त्यांच्या अप्रामाणिकपणा विषयी काही पुराव्यानिशी माहिती असल्यास इथे द्या, उगाच असली विधाने करू नका.
त्यांच्या चारित्र्याचा निष्कर्ष तुम्ही काढणार ?

17 Sep 2011 - 12:42 pm | नितिन थत्ते
>>मात्र तुमच्या वरिल प्रतिसादातून तुम्ही असे ध्वनीत करत आहात, की एखादे प्रकरण उघडकीला यायच्या आधी शास्रीजींचा मृत्यु झाला म्हणून ते स्वच्छ प्रमाणिक गणले गेले.
नाही. (राजीव गांधींबद्दल) परसेप्शन काय होते ते सांगितले.
शास्त्रींची फ्यामिली पुढे राजकारणात सक्रिय राहिली असती तर कदाचित जालावर आपल्याला शास्त्रींच्या चारित्र्याचे हनन करणार्या ढकलपत्रांचा/व्हिडिओजचा/ब्लॉगचा पूर दिसला असता.
17 Sep 2011 - 1:22 pm | तिमा
परांशी सहमत. शास्त्रीजींची तुलना इतरांशी करणे हे चूकच आहे. इंदिरा गांधी याच राजमान्य भ्रष्टाचाराच्या गंगोत्री आहेत. पण निदान त्यांच्याकडे कर्तृत्व तरी होते. आता मागे राहिलेल्या भ्रष्ट राज्यकर्त्यांमधे तेवढेही नाही.
17 Sep 2011 - 8:37 pm | नगरीनिरंजन
>>पण निदान त्यांच्याकडे कर्तृत्व तरी होते
त्यात लष्करप्रमुख, सल्लागार वगैरेंचा वाटा बराच असणार. तशीच वेळ आली तर ममोसिंगही कर्तृत्व दाखवतीलच यात शंका नाही.
17 Sep 2011 - 12:50 pm | विसुनाना
इंदिरा गांधींवरील आरोपांच्या निमित्ताने (तरी निदान) लालबहादुर शास्त्री चर्चेत आले आहेत, हेही नसे थोडके.
लालबहादुर भारताचे रेल्वेमंत्री आणि पंतप्रधान होऊनही गरीबच राहिले यातच सारे आले. बाकी चालू द्या.
17 Sep 2011 - 8:30 pm | शाहिर
आणि एखाद्या निष्कलंक नेत्याविषयी असे विधान धाडसी वाटते..
सदस्यंता कालावधी
2 वर्षे 37 आठवडे
२ वर्षे होइ पर्यन्त थत्ते काका बरे होते . सुरुवातीच्या काळात ते प्रचंड लोकप्रिय वगैरे होते..
मनमोहन सिंग आणि नरसिंहराव यांच्याही पहिल्या २ वर्षांबाबत असेच म्हणता येईल.
21 Sep 2011 - 6:33 am | शिल्पा ब
तुमच्यासारख्या लोकांमुळेच अजुनही काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे.
कीती हि भक्ती. एवढी जर एखाद्या देवावर दाखवली असती तर आत्तापर्यंत तुम्हीच पंतप्रधान झाला असता..
17 Sep 2011 - 12:30 pm | चिरोटा
त्यांचा उदय होण्याआधीही भ्रष्टाचार होता. त्यांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराला बर्यापैकी राजमान्यता मिळाली आणि सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी लागणार्या घोषणाबाजीला ऊत आला असे म्हणता येईल.Populist politics पाया इंदिरा गांधींनी घातला आणि ईतर राजकारण्यांनी त्याचा कित्ता गिरवला.
17 Sep 2011 - 12:33 pm | नगरीनिरंजन
>>त्यांचा उदय होण्याआधी भ्रष्टाचार होता
हे कोणालाही मान्य होईल. पण त्याला असे उघड आणि राजमान्य स्वरूप आले होते का?
>>Populist politics
हा राजकीय भ्रष्टाचाराला सौम्य प्रतिशब्द तर नाही ना?
17 Sep 2011 - 4:03 pm | पिंगू
खुशवंतसिंग यांच्या चरित्रातही इंदिरा गांधींच्या भ्रष्टाचाराबद्दल थोडी माहिती दिली गेली आहे. पण ती मुळातच खूप त्रोटक आहे.
- पिंगू
17 Sep 2011 - 8:53 pm | पिवळा डांबिस
जाणकारांची मते वाचण्यास आवडेल.
त्यातही फक्त कोणीतरी लिहिलेली पुस्तके, वृत्तपत्रे वाचून आपली मते मांडणार्यांपेक्षा त्या काळाचे जे प्रत्यक्ष साक्षीदार होते त्यांची मते जाणून घेण्यास अधिक उत्सुक आहे.
श्रीमती इंदिरा गांघींचा काळ काही तसा फार जुना नाही. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीचे समकालीन सहज उपलब्ध व्हावेत.
18 Sep 2011 - 9:29 am | विकास
जाणकारांची मते वाचण्यास आवडेल.
मला वाटते, आपण येथे वाचू शकता. ;)
20 Sep 2011 - 3:45 pm | विसुनाना
दादा कोंडके यांच्या 'राम राम गंगाराम' चित्रपटाचे मूळ नाव 'गंगाराम वीस कलमी' असे होते आणि त्यात गाय-वासरू (नका विसरू - गाय वासरू) नोटा खात असल्याचे दाखवले होते असे स्मरते. (अर्थात सेन्सोरची कात्री टाळण्यासाठी ते बदलले गेले असावे.)
आठवणीतून सांगितले. यात जाणकार असण्याचा प्रश्न नाही. ;)
20 Sep 2011 - 7:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इंदिरा गांधींच्या लायसन्स राज आणि त्यातून उद्भवलेला भ्रष्टाचार, काँग्रेस पक्षासाठी व्यावसायिकांकडून देणग्या (खंडणी?) गोळा करणं इ.इ. गोष्टी काही काळापूर्वी वाचलेल्या आहेत. आता पुस्तकाचं नावही आठवत नाही आणि ते डीटेल्ससुद्धा.
साधारण पंडीत नेहेरू आणि इंदिरा गांधी अशी तुलना होती. नेहेरूंनी संरक्षणमंत्री नेमताना, लष्करातल्या बढत्या इ. बाबतीत भ्रष्टाचार (लाच असं नव्हे!) केल्याचा उल्लेख होता आणि इंदिरा गांधींनी सरळसरळच पैसा, ताकद यासाठी लायसन्सराजमार्फत भ्रष्टाचार शिष्टाचार बनवला अशा प्रकारचं विश्लेषण होतं. लेखक कोणी राजकीय पक्षाशी संबंधित नसून राजकारणाचा अभ्यासक किंवा पत्रकार असल्याचंही आठवत आहे.
पुस्तकाचं नाव आठवलं की खरड वा प्रतिसादातून कळवते.
21 Sep 2011 - 12:22 am | विकास
भ्रष्टाचार, राजकीय स्वार्थ वगैरे इंदिराजींच्या आधी, अगदी स्वातंत्र्याअधी देखील भारतात होतेच. त्या अर्थाने त्यांना जबाबदार धरणे योग्य ठरू शकत नाही.
सदुसष्ट साली इंदिरा गांधी सत्तेवर असताना सिंडिकेट-इंडिकेटचा घोळ,....
साधारण पन्नाशीला आलेल्या असताना इंदिराजी पंतप्रधान झाल्या. झाल्या ते एका अर्थी नेहरू घराण्यामुळेच झाल्या. पंतप्रधान होण्यासाठी हे वय तसे लहानच होते. त्यामुळे सुरवातीस त्यांना "गुंगी गुडीया" म्हणले गेले होते. (मला वाटते हा शब्दप्रयोग मधु लिमये यांनी प्रचलीत केला होता. पण त्यावर अत्र्यांनी "अधू बुद्धीचा मधू" म्हणत टिका देखील केली होती कारण लिमयांना राजकारण समजले नाही असे त्यांना वाटले.). जी काही काँग्रेसी तत्कालीन वयाने मोठी माणसे होती त्यांना इंदीराजींना बाजूस करायचे होते. त्यातूनच काँग्रेस फुटण्याचा इतिहास घडला. त्याला केवळ इंदिराजीच कारणीभूत नव्हत्या, तर पडद्यामागच्या राजकारणाची पद्धत कारणीभूत होती असे वाटते. (अवांतरः त्यावेळेस यशवंतरावांनी केलेला विश्वासघात हा इंदिराजींनी कायम लक्षात ठेवला आणि आणिबाणीनंतर जेंव्हा परत तोच अनुभव आला तेंव्हा नंतर त्याचा उपेक्षीत ठेवून कायमचा सूड घेतला)
बँकाचे राष्ट्रीयकरण, संस्थानिकांच्या तनखा रद्द करणे वगैरे यात राजकारण नसेल का? अर्थातच असणार. राजकीय व्यक्ती शिंकली तरी त्यात राजकारण असते असे वाटते... पण त्याच बरोबर समाजवादी मानसिकतेचा प्रभाव हे देखील त्याला कारण होते असे वाटते. तरी नशिब त्यांनी रशियास जवळ केले तरी कन्युनिझम आणि कम्युनिस्टांना जवळ केले नाही!
मात्र त्यातून (राजकारणातून) मिळालेल्या यशाची एक प्रकारची झिंग त्यांना चढली असे वाटते. हे असेच चालते, लोकांना असेच ताब्यात ठेवावे लागते, वगैरे जे काही आपण कुठल्याही स्तरावर कुणाच्याही बाबतीत बघू शकतो तेच येथे देखील झाले. आणि बघता बघता राष्ट्रीय चळवळीतून निर्माण झालेला काँग्रेस पक्ष हा "इंदीरा इज इंडीया" म्हणणार्या हुजर्यांचा पक्ष झाला. आणि त्या अर्थाने अधुनिक राजकीय घसरणीस आणि त्याचा परीणाम म्हणून तळागाळाला गेलेल्या भ्रष्टाचारास, "राजा कालस्य कारणम" या वचनाप्रमाणे, इंदिराजी जबाबदार आहेत असेच म्हणावेसे वाटते. पण तशा त्या होण्यासाठी काँग्रेसी मनोवृत्तीपण जबाबदार आहे असे वाटते.
लाल बहाद्दूर शास्त्री हे नक्कीच आदर्श आणि खर्या अर्थाने स्वच्छ चारीत्र्याचे नेते होते. तरी देखील त्यांचे रेल्वेला अपघात झाला म्हणून राजीनामा देणे हे काही बरोबर वाटले नाही, त्यामुळे चुकीच्या अपेक्षांचा पायंडा पडला असे वाटते.
हे खरं मानलं तरी इंदिरा गांधींनी केलेल्या कार्यापुढे हे गंभीर आरोप गौण आहेत असे मानावे काय? तसं म्हटलं तर मोदींसकट सगळ्या राजकीय नेत्यांना हेच तत्त्व लागू करावे लागेल काय?
नुसत्या आरोपांना महत्व देणे पटत नाही. अर्थात याचा अर्थ ते गौण आहेत असे देखील म्हणायचे नाही. आणिबाणीच्या पूर्वसंध्येस निवडणूक घोटाळ्यामुळे जरी न्या. जगमोहनला सिन्हा यांनी निवडणूक रद्द केली तरी (पुराव्या अभावी) इंदिराजींवर लाच घेतलेले आरोप त्यांनी मान्य केले नाहीत. म्हणून इंदिराजींच्या आणिबाणीच्या आणि इतर चुका कमी ठरत नाहीत.
मोदींच्या बाबतीत कायम आणले गेले आहे ते गोध्रा दंगल. त्या व्यतिरीक्त त्यांच्या राज्यात काही गैरव्यवहार झाल्याचे ऐकीवात आलेले नाही. गोध्रा दंगलीस ते मुख्यमंत्री म्हणून नक्कीच जबाबदार आहेत, जितके शिख दंगलीस राजीव गांधी आणि गांधी हत्येनंतरच्या महाराष्ट्रातील आणि इतर ठिकाणी झालेल्या दंगलीस नेहरू पंतप्रधान म्हणून जबाबदार असतील तितकेच. यात मोदींची बाजू घेण्याचा प्रश्न नाही. तसा उद्देशही नाही. पण पक्षनिरपेक्ष चुका बघण्याचा प्रयत्न आहे. असो.
21 Sep 2011 - 11:48 am | सुनील
गोध्रा दंगलीस ते मुख्यमंत्री म्हणून नक्कीच जबाबदार आहेत, जितके शिख दंगलीस राजीव गांधी आणि गांधी हत्येनंतरच्या महाराष्ट्रातील आणि इतर ठिकाणी झालेल्या दंगलीस नेहरू पंतप्रधान म्हणून जबाबदार असतील तितकेच
येथे "तितकेच" हा शब्द योग्य ठरत नाही.
देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मुख्य जबाबदारी राज्य सरकारांची असते. म्हणूनच मुख्यमंत्री ह्या नात्याने ही जबाबदारी जितकी येते तितकी ती पंतप्रधान ह्या नात्याला येत नाही. म्हणून, शिख विरोधी दंगल शमविण्यातील अपयशाला राजीव गांधी जितके जबाबदार ठरतात त्यापेक्षा जास्त जबाबदार मोदी गुजरात दंगल शमविण्यात आलेल्या अपयशाला ठरतात.
१९४८ साली भारतात पंतप्रधानांचे अधिकार काय होते याची निश्चित कल्पना नाही कारण तेव्हा भारताचा राज्य कारभार हा १९३५ च्या गवरमेन्ट ऑफ इंडिया अॅक्ट अंतर्गत सुरू होता (आपली राज्य घटना १९५० साली अस्तित्वात आली).
तेव्हा गुजरात दंगल शमविण्यात आलेले मोदींचे अपयश हे राजीव गांधींना शिख विरोधी दंगल शमविण्यात आलेल्या अपयशापेक्षा किंवा नेहेरू यांना गांधी हत्येनंतर झालेल्या दंगली शमविण्यात आलेल्या अपयशापेक्षा अधिक गंभीर ठरते.
21 Sep 2011 - 12:47 pm | नगरीनिरंजन
हे फक्त अपयश होते की मुद्दाम केलेला राजकीय भ्रष्टाचारही होता? कायद्याने अजूनही दोन्हीपैकी कोणावरही आरोप सिद्ध झालेले नाहीत.
जर हे फक्त अपयश नसेल तर आणखी वेगळ्या एका भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित होतो. कारण मोदींचा पक्ष आणि राजीव गांधींचा पक्ष यांची तत्त्वे वेगवेगळी आहेत.
21 Sep 2011 - 7:51 pm | विकास
येथे "तितकेच" हा शब्द योग्य ठरत नाही.
"तितकेच" म्हणायचे कारण म्हणजे प्रत्येक नेत्याकडून झालेले दुर्लक्ष आणि काहीसे जस्टीफिकेशन. मोदींनी गोध्रा रेल्वे प्रसंगानंतर जस्टीफिकेशन केले असे म्हणले जाते, राजीव गांधीनी देखील शिख हत्याकांडाचे असेच जस्टीफिकेशन केले. त्याचा परीणाम अथवा फायदा दंगलखोरांनी घेतला आणि दंगल शमवता आली नाही असे म्हणता येऊ शकेल. त्या अर्थाने नेतृत्व म्हणून ते जबाबदार ठरू शकतात असे म्हणणे होते. गांधीहत्येनंतरच्या दंगलीत नेहरूंनी अथवा काँग्रेस सरकारने नंतर काही कमिशन नेमणे, दंगलखोरांना शिक्षा आणि दंगलग्रस्तांना मदत/न्याय मिळवण्यासाठी काही केल्याचे कधीच वाचलेले नाही अथवा ऐकलेले नाही. मानवी हक्क वगैरे शब्द तेंव्हा नुकतेच (मला वाटते १९४५) अस्तित्वात आले असल्याने ते वापरले नाही म्हणून समजू शकतो, पण सगळी गुंडगिरी जशीच्या तशी पचवली.
21 Sep 2011 - 10:45 pm | सुनील
गुजरात दंगल शमविणे ही जशी मोदींची थेट जबाबदारी होती तशी राजीव गांधी अथवा नेहेरूंची (शीख विरोधी आणि गांधी हत्येनंतर) नव्हती. नैतीक जबाबदारी जरूर होती, पण थेट कायदेशीर जबाबदारी नव्हे.
तेव्हा मोदींची ह्या दोघांशी (दंगली शमविण्याबाबत) केलेली तुलना केवळ अप्रस्तुत आहे.
21 Sep 2011 - 11:04 pm | विकास
असहमत असण्यास काहीच हरकत नाही पण मी प्रस्तुत केलेला मुद्दा वेगळा होता/आहे:
मोदींविरुद्ध जी ओरड चालू आहे, त्याचे प्रमुख कारण ते दंगलीस / दंगल वाढण्यास कारणीभूत आहेत या आरोपासाठी. दंगल शमवण्यात कमी पडले म्हणून नाही.
आणि तसे देखील १९५६ ते १९९३ दिल्लीमधे राष्ट्रपती राजवटच होती, पक्षी केंद्र सरकारचे राज्य होते, पक्षी राजीव गांधींची दिल्ली शिख दंगलीत तितकीच जबाबदारी देखील होते.
21 Sep 2011 - 12:53 pm | नगरीनिरंजन
याबद्दल आणखी काही स्पष्टीकरण किंवा उदाहरणे देता येतील का? कारण शास्त्रीजीही काँग्रेसमध्येच होते आणि केंद्रीय मंत्री असताना किंवा पंतप्रधान असताना त्यांना या मनोवृत्तीचा त्रास का झाला नाही हे समजून घ्यायला पाहिजे. छोटी कारकीर्द हे एकमेव कारण असेल असे मला वाटत नाही.
21 Sep 2011 - 12:18 pm | परिकथेतील राजकुमार
बर्याच लोकांचे लेखन वाचून 'अमेरिकेची आर्थिक घडी, पुणे महानगरपालिका, उंदीर मारायचा विभागा' वैग्रे वैग्रे आठवले.
21 Sep 2011 - 9:44 pm | इरसाल
"पुणे महानगरपालिकेच्या उंदीर मारण्याच्या निर्णयामुळे विस्कटलेली अमेरिकेची आर्थिक घडी "
हा लेख माझ्या मनात मूर्त रूप धारण करू लागलाय.
(म्हणून नेने मंडळी भारतात परतत आहेत असा आपला अंदाज) टोकाचा टिकेकर