नवीन लेखकांना मार्गदर्शन करता येईल का?

चित्रा's picture
चित्रा in काथ्याकूट
29 Aug 2011 - 7:41 am
गाभा: 

नेहमीच मिसळपावावर काही नवीन सदस्य येत असतात. अशांपैकी काही सदस्यांना आपले लेख आणि कविता तसेच प्रतिक्रिया मिपावर देण्याची इच्छा असते. मात्र उत्साहाने लिहीलेल्या लेखांना आणि कवितांना अपेक्षित प्रतिक्रिया आल्या नाहीत, किंवा वात्रट किंवा तिखटही प्रतिक्रिया आल्या की नवीन लेखक निरुत्साही होतात किंवा कधीकधी चिडतातही. जुन्या मिपाकरांना अशा प्रतिक्रिया नवीन नाहीत. पण नवीन लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असल्याने आणि मराठी संस्थळांवर घडलेल्या घडामोडींबद्दल आणि जुन्या सदस्यांच्या पूर्वानुभवांविषयी कसलीही माहिती नसल्याने कधी नव्याजुन्या सदस्यांचे प्रतिक्रिया आणि साहित्यावरून वाद होतात, खटके उडतात, आणि यांचे स्वरूप तीव्र होते असे दिसते. या वादांची कारणे सर्वच चुकीची असतात असे नाही. सर्वच बरोबर असतात असेही नाही. यातील सर्व वादांची कारणे दूर करता येणे शक्यही नाही आणि गरजेचेही वाटत नाही. पण यापैकी अनेक वाद हे केवळ लेख किंवा प्रतिसाद कशा पद्धतीचे असावे ह्याची कल्पना नसल्यामुळे झालेल्या वादावादीतून घडलेले असतात असे लक्षात येते. म्हणून सर्वांनाच काही प्रश्न विचारत आहे. त्याची उत्तरे आपापल्या विचाराने द्यावी. या धाग्याचा उपयोग इथले आपले लेखन अधिक चांगले आणि वाचकांसाठी आकर्षक कसे होईल यासाठी मार्गदर्शन किंवा सल्ला म्हणून करावा. नवीन सदस्यांना जसा याचा उपयोग होईल तसा जुन्याही सदस्यांना आपले लेखन सुधारण्यासाठी याचा उपयोग होईल असे वाटते. यातून जे काही कळेल ते संक्षिप्त स्वरुपात मांडण्याची जबाबदारी माझी.

काही प्रश्न मांडते, माझी विस्तृत उत्तरेही नंतर देईनच. नवीन लेखकांनीही सहभाग घ्यावा, परंतु जुन्या मिपाकरांकडूनही अधिक कल्पना येतील अशी आशा आहे.

१. कुठचेही लेखन संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे?
२. चांगल्या ललित लेखनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी.
३. सार्वजनिक संकेतस्थळांवरील लेखन, प्रतिक्रिया आणि स्वतःच्या ब्लॉगवरील लेखन आणि प्रतिक्रिया यात काय फरक आहे?
४. एका लेखकाकडून येणार्‍या लेखनाची वारंवारिता काय असावी?
५. एक लेख किती लांबीचा असावा? लेखन भागांमध्ये असले तर दोन भागांमध्ये किती दिवसांचे/वेळेचे अंतर असावे? मोठ्या लेखाचे किंवा साहित्याचे जास्तीत जास्त किती भाग असावेत? आणि
६. न आवडलेल्या साहित्यास प्रतिक्रिया देताना काही वेगळी विशेष काळजी घेण्याची गरज आहे का?

माझी (सध्या) संक्षिप्त उत्तरे:

१. होय. नव्या-जुन्या लेखकांनी प्रमाणलेखनाकडे विशेष लक्ष पुरवावे असे वाटते.
२. लेखकाच्या स्वतःच्या अशा नजरेतून/अनुभवांतून आलेले असे सकस, शब्दांची अचूक निवड करून केलेले लेखन.
३. बराच फरक आहे. स्वतःच्या ब्लॉगवर काय प्रतिक्रिया दिसतील यावर आपला अधिकार असतो. संकेतस्थळांवर तसा तो नसतो. जे येते ते आपले म्हणावे लागते. :)
४. कठीण प्रश्न आहे. काही लोक फार कमी लिहीतात तर काही फार जास्त. काही एकदम बरेच लिहीतात आणि मग अनेक दिवस काहीच लिहीत नाहीत. पण जे संकेतस्थळांवर कार्यरत आहेत अशांकडून आठवड्यातून फारतर दोन लेख किंवा एखादी कविता हे ठीक वाटते.
५. माझे मत लेख वाचण्यासाठी नेहमीच्या ब्राऊजरवर फार खाली स्क्रोल करावे लागू नये. एखादा लेख मोठा असला तरी पाच-सहा भागांत असावा. फार अंतर असू नये - एखाद्या दोन दिवसांचे अधिकाधिक अंतर असावे.
६. माझ्या मते आवडलेले सांगणे सोपे असते, नावडलेले सांगताना आपले स्वभाव मध्ये येतात. न आवडलेले सांगताना काय आवडले नाही, आणि का आवडले नाही हे स्पष्टपणे आणि अवमानकारक भाषा टाळून सांगितल्यास लेखकांना पुढील लेखनास मार्गदर्शन होते.

प्रतिक्रिया

आम्ही पामर काय मार्गदर्शन करणार?
आम्हालाच मार्गदर्शनाची गरज आहे........नवीन नसूनही.;)
मी बरेच दिवसात काही लिहिले नाही की लोक 'किप इट अप' चे व्य. नि. करतात.
नवीन सदस्य हे बरेचदा वाचनमात्र असतात. मिपावरचा दंगा पाहून आल्याआल्या आपणही दंगा करायला लागावे असे काहिसे वाटत असते पण आधी सगळ्यांशी प्रतिसाद देवून ओळख करून घेतल्यास आपल्या लेखांना प्रतिसाद खेचक बनवणे सोपे होते. नाहीतर चांगले लेखन प्रतिसादाशिवाय गेलेले दिसते, तसेच निरर्थक विषय शतक ठोकून जातात हे पहायला मिळते. बाकी लेखनाच्या पातळीची माझा संबंध फारसा आला नाही हे सगळ्यांनाच माहितिये.
(ही माझ्या पुढील धाग्याची झायरात आहे असे समजण्यास हरक नाही.)

पंगा's picture

29 Aug 2011 - 8:09 am | पंगा

मी बरेच दिवसात काही लिहिले नाही की लोक 'किप इट अप' चे व्य. नि. करतात.

लिहिले नाही की? आणि 'कीप इट अप'???

"बर्‍याच दिवसांनी काहीतरी लिहिले की" असे तर म्हणायचे नाही ना आपल्याला? नाही काय आहे, की सध्याच्या शब्दयोजनेने अर्थाचा अनर्थ होतो असे वाटते... पहा बुवा विचार करून.

रेवती's picture

29 Aug 2011 - 6:47 pm | रेवती

होय, बरोबर लिहिले आहे.
मी लिहिलेले वाचवत नाही म्हणतात.

पैसा's picture

29 Aug 2011 - 8:25 pm | पैसा

तू फक्त नावं सांग रेवती, त्यांच्या धाग्यांवर सगळ्या पाशवी शक्ती बहिष्कार टाकतात की नाही बघ!

स्वानन्द's picture

29 Aug 2011 - 11:22 pm | स्वानन्द

ओ ताई, पाशवी शक्ती वगैरे काही नसतं. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत :P

मुक्तसुनीत's picture

29 Aug 2011 - 11:27 pm | मुक्तसुनीत

"ह्या सगळ्या" म्हणजे कोणकोण बरे ? पण नकाच नावे घेऊ. "नाम लो और पाशवी हाजिर" असं होईल.

(हलके घ्यावे. विशेषतः सर्व पाशवींनी. )

पैसा's picture

29 Aug 2011 - 11:29 pm | पैसा

आज अमावस्या आहे. जास्त बोलू नको. सगळे आत्मे झाडं शोधायला बाहेर पडलेत!

आमच्या सारख्या नवमिपाकरांसाठी धागा वर काढत आहे .
:-)

राजेश घासकडवी's picture

29 Aug 2011 - 8:15 am | राजेश घासकडवी

चर्चाप्रस्तावात मांडलेले मुद्देही संस्थळांवरील लेखनाच्या दृष्टीने कधीतरी विचारले गेले पाहिजेत, व त्यांची सर्वसामान्यपणे सर्वमान्य उत्तरं मिळाली पाहिजेत हे पटतं. प्रस्तावात दिलेली उत्तरंही प्राथमिक पातळीवर ग्राह्य आहेत.

मात्र ही विचारणा चित्रा यांनी सामान्य सदस्य म्हणून केलेली आहे की संपादक म्हणून केलेली आहे हे स्पष्ट होणं आवश्यक आहे. या दोनमध्ये फार मोठा फरक आहे. जर मनमोहन सिंगानी अण्णांशी चर्चा करताना पंतप्रधान म्हणून चर्चा करत आहेत की एक सर्वसामान्य नागरिक म्हणून चर्चा करत आहेत हे स्पष्ट केलं नाही तर जो गोंधळ होईल, तोच आत्ता आहे.

मिसळपावचं आधिकारिक धोरण असं आहे की सदस्यवर्तन कसं असावं हे ठरवण्याचे सर्वाधिकार व्यवस्थापनाकडे आहेत. संपादक मंडळ हा व्यवस्थापनाचा मोठा भाग आहे. धोरणविषयक चर्चा करण्यास सामान्य सदस्यांना बंदी आहे. त्यामुळे सामान्य सदस्यांच्या वर्तनाविषयीची चर्चा ही पर्यायाने धोरणविषयक चर्चा होते.

दुसरी गोष्ट अशी की या बाबींबद्दल मार्गदर्शन करण्याची संपादक मंडळाची जबाबदारी आहे. सदस्य येतात व जातात. मात्र काही प्रश्न (चर्चेत म्हटल्याप्रमाणे) कायम रहातात. मराठीत कसं टंकावं याविषयी मार्गदर्शन उपलब्ध आहे. तसंच मार्गदर्शन चर्चा कशा व्हाव्यात, प्रतिसाद कसे असावेत याबाबतीत संपादक मंडळाने द्यायला हवं. चित्रा जर संपादक म्हणून हा प्रश्न मांडत असतील तर हे विचार मंडळाचे आहेत, व्यवस्थापनाचे आहेत की एका संपादकाचे आहेत हे कळायला काही मार्ग नाही. त्यामुळे इथे विचार मांडले तरी व्यवस्थापन त्याची दखल घेणार की नाही याविषयी खात्री नाही.

चित्रा जर संपादक म्हणून नव्हे तर सदस्य म्हणून हा चर्चाप्रस्ताव मांडत असतील तर थोडा प्रश्न निर्माण होतो. कारण मग उद्या कोणी सोम्यागोम्या उठून मिसळपाववरील वर्तन अमुक अमुक प्रकारचं असावं असा चर्चाप्रस्ताव मांडू शकेल. व्यवस्थापनाला त्याचा कधीतरी विरोध होईलच. मग चित्रा यांना झुकतं माप मिळतं आहे का असाही प्रश्न उपस्थित होऊ शकेल.

खरं तर ही चर्चा संपादक मंडळ, सरपंच किंवा व्यवस्थापन अशा आयडीतून आली असती तर बरं झालं असतं. या चर्चेतून जे फलित निघेल त्यावर व्यवस्थापन विचार करून मार्गदर्शक तत्वं मांडेल अशी आशा तरी निर्माण झाली असती.

आत्ता वांझ चर्चा किंवा नवे विरुद्ध जुने असा वाद निर्माण होण्यापलिकडे काय होणार?

पंगा's picture

29 Aug 2011 - 8:16 am | पंगा

.

सहज's picture

29 Aug 2011 - 8:17 am | सहज

मनमोहन देसाईंनी अण्णांशी चर्चा करताना पंतप्रधान ..

हे काय? उगाच? देसाई की सिंग?

हे पहा गुर्जी -
मागील काही महीन्यातील तुमच्या ' भंगार परफॉर्मन्समुळे 'मुडीज व पूअर' या मानांकन संस्थेने तुमचे रेटींग 'XXX' वरुन 'PG 14' करायचा निर्णय घेतला आहे. याबद्दल आपली प्रतिक्रिया काय?

हे काय? उगाच? देसाई की सिंग?

त्यांनी तेवढ्यात दुरुस्ती केली आहे. (म्हणूनच तर आमचा वरील प्रकाटाआ.)

नितिन थत्ते's picture

29 Aug 2011 - 8:33 am | नितिन थत्ते

घासुगुर्जींशी सहमत आहे.

सहज's picture

29 Aug 2011 - 8:41 am | सहज

हो नवसदस्यांना मार्गदर्शन होते, प्रत्येक सदस्याचा मार्गदर्शक सोनार वेगळा असतो. आणी बाकी वेळी प्रतिसादकर्त्यांची आंतरीक उर्मी कशी दाबून ठेवणार? ते अतिशय अवघड आहे.

प्रत्येकाने लिहताना असे याआधी ह्या संकेतस्थळावर येउन गेले आहे का? याचा शोध घेतला. किंबहुना गुगल सारखे शोधयंत्र प्रभावी वापरले तरी बरेच लेखन कमी होइल.

धनंजय, नंदन व परा या तिघांनी शोधयंत्राचा वापर कसा करावा याबाबत जरुर लिहावे. बरेचदा लोक फक्त एखादा शब्द टाकून शोध घेतात पण कोणता शब्द देवनागरीत, कोणता रोमन लिपीत व सर्च स्ट्रींग काय द्यावी यातील बारकावे या तिघांनी जरुर सांगावेत.

मुक्तसुनीत's picture

29 Aug 2011 - 8:53 am | मुक्तसुनीत

माझी आजवरच्या अनुभवावरून बनलेली मते :

१. दखल घ्यावे असे लिखाण थोडे असते. बाकीच्या लिखाणावर प्रतिक्रिया द्यावी असं वाटत नाही. "मला अमुक तुमक लिखाण फार वाईट वगैरे वाटले" अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मला रोचक वाटतात. रुचिभिन्नतेमुळे एकंदर ठराविक प्रमाणातलं नि ठराविक स्वरूपाचंच लिखाण आपल्यापैकी सर्वाना आवडणार हे उघड आहे. मुद्दाम जाऊन निगेटीव्ह प्रतिक्रिया देणं क्वचितच सयुक्तिक असतं.

२. आवर्जून दखल घ्यावी, प्रतिक्रिया द्यावी, प्रतिवाद करावा अशा प्रकारच्या लिखाणाला वर्गवारी, लांबी, लेखनप्रकार याचं कसलंही बंधन असतं असं मला वाटत नाही. हा वैयक्तिक रुचिचा , जिव्हाळ्याच्या वाटलेल्या विषयांचा मामला आहे.

३. न आवडलेल्या मतांचा, विचारांचा प्रतिवाद करताना किंवा अशा दृष्टिकोनांना आव्हान देताना आपली भाषा कशी असावी यामागचा विचार हा , पुन्हा एकदा सामान्यपणे "अ‍ॅडल्ट कॉन्व्हर्सेशन्स" कशी असावीत याचे जे सर्वसामान्य संकेत आहेत त्याला धरूनच असला पाहिजे. मिपासारख्या संकेतस्थळांवरील वैयक्तिक मानहानी, निंदाव्यंजक मजकूर , असभ्य भाषा, हीन स्वरूपाची टीका यांच्या संदर्भात जे नियम आहेत त्याला अनुसरून संपादकीय कारवाई होतेच. परंतु या कायदेकानूच्या कक्षेत न येणारं परंतु सुसंस्कृत संभाषणाच्या संकेताना अनुसरणारं बरचसं काही असतंच. ( हा विषय बर्‍यापैकी संवेदनशील असल्यामुळे इथे कुणाचा तोल जातो का , लोक abrasive लिखाण करतात का, परस्परांवर - अगदी कायदेकानूच्या कक्षेत राहूनही - ओचकारे बोचकारे काढतात का या बाबींवर - सोदाहरण किंवा तात्विक - चर्चा करण्याची ऊर्जा माझ्यात नाही हे मी नम्रपणे नमूद करतो. )

चिंतातुर जंतू's picture

29 Aug 2011 - 10:48 am | चिंतातुर जंतू

मुक्तसुनीत यांच्याशी सहमत. त्याशिवाय अजून एक मुद्दा:

नव्या-जुन्या लेखकांच्या अतिसामान्य म्हणता येईल अशा लेखनावर पुष्कळदा गोडगोड प्रोत्साहनपर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसतो. 'ही माझ्या मताची पिचकारी. त्यामागे कसलाही विशेष विचार किंवा अभ्यास नाही. माझ्या लिखाणाला इतके प्रतिसाद मिळत असताना आणि मला इतकी लोकप्रियता मिळत असताना मला त्याची गरजही वाटत नाही. आणि याचाच मला अभिमान वाटतो.' असा अभिनिवेश एकदा घेतला की मग त्यामुळे लेखनाचा एकंदर दर्जा खालावणं अपरिहार्य आहे. त्याच त्याच प्रकारच्या अतिसामान्य आणि अभिनिवेशी अभिव्यक्तींच्या या कल्लोळाचा सध्या इतका कंटाळा आला आहे की वाचनमात्र असावं असंदेखील सध्या वाटत नाही, आणि काही लिहिण्याचा तर विचारसुद्धा करवत नाही. त्यापेक्षा करण्यासारख्या अनेक (विधायक आणि टाईमपासदेखील) गोष्टी जगात आहेत.

वेगवेगळ्या विषयांवर काही वेगळे विचार/मतप्रवाह/उहापोह यांना इथं स्थान असावं असं वाटत असेल तर चालक/मालक/संपादक आणि सामान्य वाचकांनी या मुद्द्याचा विचार करावा अशी विनंती. धाग्याबद्दल चित्राताईंचे आभार.

सहज's picture

29 Aug 2011 - 11:01 am | सहज

या कल्लोळाचा सध्या इतका कंटाळा आला आहे की वाचनमात्र असावं असंदेखील सध्या वाटत नाही,

हे एकवेळ पटण्याजोगे आहे

आणि काही लिहिण्याचा तर विचारसुद्धा करवत नाही.

हे मात्र समजत नाही. उलट चिंतातुर जंतू यांच्या सारख्या लेखकाचे लेखन/ मते वाचायला लोकांना आवडते. हे म्हणजे सकस अन्न तुम्ही देणार नाही वर लोक काय फास्ट फूड हाणत असतात म्हणून बोलायचे? :-( खर्‍याखुर्‍या समाजसुधाकर, विचारवंतांनी प्रत्यक्षात केवढा संघर्ष केला असतो. इथे तुलनेत काहीच त्रास नसताना, इतका करुन का घ्यायचा? व द्यायचा म्हणतो मी?

वेगवेगळ्या विषयांवर काही वेगळे विचार/मतप्रवाह/उहापोह यांना इथं स्थान असावं असं वाटत असेल ..

इथे नाही आहे किंवा वेगळे विचार्/मतप्रवाह.उहापोह यांचे जोरदार संपादन होते आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला? स्पष्ट सांगा बॉ. मला तरी वाटते की स्थान नक्कीच आहे. बाकी प्रतिगामी, पुरोगामी संघर्ष तर कालातीत आहेच. नेमका मुद्दा कळला नाही आहे.

५० फक्त's picture

29 Aug 2011 - 11:04 am | ५० फक्त

याच स्टाइलने नविन प्रतिसादकांना पण मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, इथं येणारा प्रत्येक जण लेखक नसतो हे मान्य पण त्यानं लेखक असावं ही अपेक्षा गैर आहे हे देखिल मान्य, परंतु याचा अर्थ सदस्यत्व मिळाले म्हणजे आपण कुठेही काहीही लिहायला आणि कुणालाही काहीही सांगायला मोकळॅ झालो असा घेतला जातो ते बरोबर नाही.

तसेच, बाकीचे प्रतिसाद वाचुन, इतर सदस्यांच्या खरडवह्या वाचुन, मागचे पुढचे संदर्भ न पाहता किंवा घेता प्रतिसाद दिले जातात, नविन लेखकांचा या मुळॅ सुद्धा हिरमोड होउ शकतो. ते मागे पडु शकतात. इथल्या जुन्या जाणत्या सदस्यांचे प्रतिसाद कॉपी पेस्ट केले म्हणजे आपण सुद्धा तसेच मोठे मानले जाउ अशा भ्रमात राहणारा एक प्रतिसादक वर्ग असतो, इथंच नाही सगळीकडेच. या गोष्टी सुरुवातीला मी सुद्धा केल्या आहेत, पण लगेच त्यातला फोलपणा जाणवल्याने सोडुन दिल्या, त्यामुळे, प्रतिसाद प्रसिद्ध करण्यापुर्वी, 'तुम्हाला हे आणि हेच टंकायचे आहे काय, पुन्हा एकदा विचार करा' असा एक मेसेज देण्याची जर व्यवस्था करण्यात आली तर त्याचा बराच उपयोग होईल असे वाटते, जसे आपण घरात / हापिसात, ' तुम्ही जाण्यापुर्वी सर्व लाईट, पाण्याचे नळ, पंखे बंद केले आहेत का ते पहा' असा बोर्ड लावतो तसे. लाईट पंखे बंद करायची सवय आपल्याला असतेच, पण तरीही कधी कधी घाई गडबडीत असे बोर्ड फार उपयोगी पडतात.

मृत्युन्जय's picture

29 Aug 2011 - 11:49 am | मृत्युन्जय

लेखनाची माझ्या मते ४ प्रकारात क्रमवारी करता येइलः

१. अतिषय उत्कृष्ट / ओघवत्या शैलीत लिहिलेले लेख / कथा / कवित वगैरे
२. प्रतिसाद देण्यासारख काहीही खास नसलेले लेखन
३. जिलब्यापाडु लेखन
४. सुमार लेखन

यातल्या पहिल्या लेखनावर नेहेमीच चांगले प्रतिसाद पडतात. खुप प्रतिसाद नाही आले तरी साधारण कोणी हुर्यो उडवत नाही.

दुसर्‍या वर्गातल्या लेखावर प्रतिक्रियाच पडत नाहीत. पण तुम्ही एखाद्या विशिष्ट कंपुतले असाल तर कदाचित काही प्रतिक्रिया येउ शकतात,

जिलब्यापाडु लेखनाची नेहेमीच टर उडवली जाते आणि हलवाई उगाच कंपुबाजी म्हणुन गळे काढतात.

सुमार लेखन करणारा जर जिलब्या पाडायला लागला तर टीकेचा धनी होतो. अन्यथा लोक लेखनाकडे दुर्लक्ष करतात किंवा प्रोत्साहनपर ४ शब्द सांगतात किंवा सरळ आवडले नाही म्हणुन टीका करुन मोकळे होतात.

लेखन सुमार असुनही जर कंपुबाजीमुळे त्याला चान चान प्रतिक्रिया मिळाल्या तर ते लगेच कळुनही येते. धागाकर्त्यालादेखील. पण या गुडी गुडी कंपुबाजीला कोणाचा विरोध आहे असे दिसत नाही.

विरोध दिसतो तो हलवायाला जिलब्या अळणी झाल्या म्हणुन सांगितले की. पण मग मी म्हणतो की च्यायला आपल्याला स्वयंपाक येत नाही हे ४ लोकांनी सांगुन झालेले आहे, आपण तळलेल्या जिलब्या आपल्याला स्वतःला देखील खाववत नाही हे आपल्याला कळते आहे, पण केवळ दिसामाजी काहितरी लिहित जावे म्हणुन मिपावर जिलब्या पाडाव्यात हे काही मला पटत नाही. १९ वर्षांपुर्वीच्या अर्थसंकल्पावर मी आज का आनंद मध्ये लिहिलेला सुमार लेख जर मिपासदस्यांच्या माथी मारायला लागलो आणि माझ्या मोठ्या भावाने प्रेमाने मला प्रोत्साहनपर लिहिलेली पत्रे जर मी त्या लेखात डकवायला लागलो तर लोक तोंडात शेण नाही का घालणार? एवढाच जर लिखाणाचा सोस असेल तर डायरी लिही ना रे बाबा.

दुसरा एक वात आणणारा प्रकार म्हणजे स्वतःच्या ब्लॉग वरुन लेख आणुन मिपावर प्रसवायचे. टाका मिपावर, चांगले लिहिले असेल तर आनंदच आहे. गवि, विनित संखे यांनी स्वत:च्या ब्लॉग वरुन असे लेख इथे डकवलेच आहेत. आणि अल्पावधीत त्या दोघांचीही इथल्या लोकांनी भरपुर प्रशंसा देखील केली आहे. मिपाचा फॉर्मेट कळल्यावर या दोघांनीही लेख डकवण्यात थोडे अंतर देखील ठेवले आहे. मध्यंतरी विनीतच्या करण आणी फ्रेंड्स नी असाच उच्छाद मांडला होता (संपुर्ण वाचुन मलाही त्यांच्या लिखाणाचे कौतुक वाटले होते आणी तसे मी त्यांच्या शेवटच्या भागात सांगितले देखील होते. इतकेच काय ऑर्कुट आणि गूगल डॉक्स वर जाउन त्यांची पुर्ण २३० पानी कादंबरी वाचली देखील). मिपा उघडले की पहिल्या पाचात त्याचेच ३ लेख दिसायचे. कोणीतरी ही बाब त्याच्या नजरेस आणून दिलावर त्यांनी तसे करणे थांबवले देखील होते. सूचना सगळेच लोक असे योग्य स्पिरीट मध्ये का घेत नाहीत.

मिपावर कंपुच्या लोकांना खुप प्रतिसाद मिळतात अशी ओरड नेहेमीच होते/ गवि नेमके कुठल्या कंपुत आहेत म्हणुन त्यांच्या लेखाला प्रतिसाद मिळतात? रामदास काका नक्की कुठल्या कंपुत आहेत? थॉदक्यात चांगल्या लेखांना कुठल्याही कंपुत नसुन प्रतिसाद मिळतात. बेक्कार लिखाणाला जर तुम्ही कंपुत असाल तर प्रतिसाद मिळु शकतील पण ते प्रतिसाद देखील तितकेच मुळमुळीत असतात. आता तुम्ही कंपुतही नाही, बेक्कारही लिहिता आणि वर गोग्गोड प्रतिसादही हवेत हा कसला हट्ट. केवळ फालतु लिहुन काही मूठभर इतरा लोकांना प्रतिसाद मिळतात म्हणुन मलाही मिळावेत हा मुर्खपणाचा हट्ट झाला.

असो तर थोडक्यात सांगायचे तर सगळ्याच नविन लेखकांना डिसकरेज केले जात नाही. जे जिलब्याच पाडायला आलेले असतात त्यांनी अजुन काही जास्त अपेक्षा करणेच चुकीचे आहे. चांगल्या लेखकांच्या चांगल्या लेखांचे कौतुकच होते. मग ते नविन असोत वा जुने. गुगळे, विनित, गवि यांच्या चांगल्या लेखांना मिपाकरांनी नेहेमीच भरभरुन प्रतिसाद दिले आहेत आणि कौतुक केल आहे. लेखाचा मापदंड त्यामुळे लेखकाने आणि मिपाकरांनीच ठरवायचा आहे. हे काही रॉकेट सायन्स नाही की याची नियमावली तयार करता येइल. प्रत्येकाने स्वतःचे डोके वापरावे.

नन्दादीप's picture

29 Aug 2011 - 11:58 am | नन्दादीप

+१ पुर्ण प्रतिसादाला. पण......>>
<<बेक्कार लिखाणाला जर तुम्ही कंपुत असाल तर प्रतिसाद मिळु शकतील पण ते प्रतिसाद देखील तितकेच मुळमुळीत असतात>>
याला १++.

देवाक काळजी...!!!

गवि's picture

29 Aug 2011 - 12:25 pm | गवि

गवि, विनित संखे यांनी स्वत:च्या ब्लॉग वरुन असे लेख इथे डकवलेच आहेत.

मिपाचा फॉर्मेट कळल्यावर या दोघांनीही लेख डकवण्यात थोडे अंतर देखील ठेवले आहे.

विनीतचं माहीत नाही पण मी अगदी सुरुवातीच्या काळात तयार लेख धडाधड डकवले होते. मग मात्र मला वाटतं साधारण दोनेक महिन्यांनंतर नवीन लिहून ब्लॉगवर आणि इथे समांतर पब्लिश करणं चालू झालं. पण ब्लॉगवर मिपाच्या काही मिनिटे आधी. (मूळ लेखन कोणाचे /प्रथम कधी लिहिले गेले इ इ याचा संभ्रम राहू नये. म्हणून...)

आता मात्र गेल्या काही महिन्यांत माझं तरी उलट झालंय. माझं लिखाण आधी इथे येतंय आणि नंतर ब्लॉगवर. बहुधा त्याच दिवशी, पण अनेकदा ब्लॉगवर एकदोन दिवस उशीरानेसुद्धा आलेलं आहे.

त्यामुळे इथल्या कोणा गविचं लिखाण तुम्ही उचलता असा आरोप ब्लॉगवर येण्याची वाट पाहतोय. ;)

नन्दादीप's picture

29 Aug 2011 - 11:59 am | नन्दादीप

प्र. का. टा. आ.

योगप्रभू's picture

29 Aug 2011 - 12:28 pm | योगप्रभू

उत्तम लेखनाचे रहस्य समर्थ रामदासांनी एका ओळीत सांगून ठेवले आहे.
'दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे.'

हळू हळू चमत्कार घडत जातो. पिलाला पंख फुटतात आणि ते सुळकांड्या मारु लागते. सगळेच लेखक याच मुशीतून घडले आहेत.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Aug 2011 - 12:33 pm | परिकथेतील राजकुमार

१. कुठचेही लेखन संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे?

पातळी किंवा प्रमाण काय असावे हे कोण ठरवणार ? उद्या रामदास काकांच्या लेखनाची पातळी मी ठरवायला गेलो तर पब्लिक मला जोड्यानी मारणार नाही काय ? ;)

पातळी आणि प्रमाण बघण्यापेक्षा लेखकाने ते काय स्फुर्तीने टाकले आहे ते बघावे. बर्‍याचदा पहिले लिखाण हे भिती चेपण्यासाठी 'अमुक तमुक ह्यांना श्रद्धांजली' किंवा 'मदत पाहीजे आहे' ह्या स्वरुपात असते, तर नव्या बाटलीतल्या जुन्या दारुकडून झालेले लिखाण हे 'मिपावर प्रवेश दिल्याबद्दल अभार' 'अमकी ढमकी पाकृ हवी आहे' ह्या प्रकारचे असते. इथे सर्वात मोठा रोल हा संपादकांचा आहे. त्यांनी ह्या लेखनाची पातळी ठरवुन कारवाई करायला हवी.

स्पष्ट बोलायचे तर बरेच संपादक ह्या सर्वातून अंग काढून घेतात. त्यांना एकतर कोणाला दुखवायची इच्छा नसते अथवा सध्या आपण संपादन कार्याला रामराम ठोकला आहे, वाचनमात्र आहोत असे दाखवायचा प्रयत्न देखील असू शकतो. मात्र अशा प्रकारच्या धाग्यांवर संपादक कधीही ठाम भुमिका घेत नाहीत हे खरे आहे. त्यामुळे मग 'चलता है' म्हणत अशा धाग्यांचा ओघ चालु राहतोच.

२. चांगल्या ललित लेखनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी.

चार ओळी वाचल्यावर जो धागा बंद केला जात नाही ते आमच्या दॄष्टीने चान चान लिखाण. पण आजकाल काही धागे ३ ओळींचेच असतात हे दुर्दैव.

३. सार्वजनिक संकेतस्थळांवरील लेखन, प्रतिक्रिया आणि स्वतःच्या ब्लॉगवरील लेखन आणि प्रतिक्रिया यात काय फरक आहे?

ब्लॉगवरील प्रतिक्रिया उडवून अथवा प्रकाशित न करुन स्वतःचा अहंगंड कुरवाळता येतो :) संस्थळावर ते शक्य नसते.

४. एका लेखकाकडून येणार्‍या लेखनाची वारंवारिता काय असावी?

क्रमश: लिखाण असेल तर निदान २४ तास, आणि इतर लिखाणासाठी कमीत कमी ४८ तास.

५. एक लेख किती लांबीचा असावा? लेखन भागांमध्ये असले तर दोन भागांमध्ये किती दिवसांचे/वेळेचे अंतर असावे? मोठ्या लेखाचे किंवा साहित्याचे जास्तीत जास्त किती भाग असावेत? आणि

ते लेखकाने ठरवावे. पण उगाच 'दिसामाजी..' च्या मोहाला बळी पडून चार ओळी खरडू नयेत ही अपेक्षा. बाकी लेखन किती भगात करावे हे लेखकाने ठरवावे. वाचक कंटाळले की आपोआप त्याला सत्य कळून जाते. मात्र अशावेळी प्रामाणीकपणे 'आपले लिखाण लांबल्याने, अथवा फसल्याने ते वाचकांना आता नकोसे आहे' हे मान्य करता यायला हवे. उगाच 'अनेक मिपाकरांनी व्यनी करून आग्रह केला' वैग्रे खोटी कारणे देत ते भाग लांबवू नयेत आणी जुने भाग सतत प्रतिसाद देऊन वर आणू नयेत.

६. न आवडलेल्या साहित्यास प्रतिक्रिया देताना काही वेगळी विशेष काळजी घेण्याची गरज आहे का?

का ?
एखादा लेख वाचून जे वाटले ते प्रामाणिकपणे व्यक्त करताच येत नसेल तर ते वाचावे कशाला ? आणि ज्यांना बर्‍या वाईट प्रतिक्रिया सहनच होत नाहीत त्यांनी लिहावेच कशाला ?

वर एखादी प्रतिक्रिया पटली नाही, आवडली नाही तर तुम्ही उपप्रतिसादात त्याचे खंडन करू शकता, अयोग्य वाटली तर संपादकांना सांगून उडवु शकता. मुळात प्रतिक्रियांच्या अपेक्षानी लेखन करावेच का ? अशी अपेक्षा ठेवल्यानेच मग त्रास होतो. ह्याची पुढची पायरी म्हणजे मग एखाद्याला आपल्यापेक्षा जास्ती प्रतिसाद मिळाले की मग तो कंपूबाज, आम्ही वाळीत टाकलेले ह्या पुरातन रडगाण्याला सुरुवात होते.

मी आधी देखील बर्‍याचदा आमच्या नानाचे वाक्य सांगीतले आहे, परत सांगतो 'लेखकाने आपले लिखाण प्रसिद्ध केले की 'गंगार्पणमस्तु' म्हणावे आणि पुढील लेखनाच्या विचाराकडे वळावे, पुन्हा मागे वळून त्या लेखाचे काय झाले बघू नये.'

अर्थात प्रतिक्रियांच्या विषयी मागे वळून बघु नये. त्या लेखावर काही सूचना असतील तर त्यांचा विचार मात्र जरुर करावा.

विनायक प्रभू's picture

29 Aug 2011 - 1:23 pm | विनायक प्रभू

नविन लेखकावर रॅगिंग होणारच.
त्याला इलाज नाही.
मला पण झाले होते.
ज्यांनी केले तेच आता मित्र आहेत.
जिवाभावाचे.
ह्यातच सर्व काही आले.

प्रियाली's picture

29 Aug 2011 - 3:10 pm | प्रियाली

येथे नवीन म्हणजे कोण? संकेतस्थळावर वयाने नवीन की संकेतस्थळावरील अनुभवाने नवीन? काहीजण "आम्ही मिपा गेली वर्षभर बाहेरून वाचत होतो पण आताच लॉग-इन करून लिहायला लागलो." असे सांगतात. बहुधा ते स्वतःला नवीन समजत नाहीत पण इतर सदस्य त्यांना नवीन समजतात.

नवीन माणसाने एखाद्या नवीन स्थळी गेल्यावर बिचकून किंवा घाबरून राहावे असे नसते पण नवीन माणसाने एखाद्या नव्या स्थळी सावध मात्र निश्चितच राहावे. नवीन असूनही सकस आणि दखल घेण्याजोगे लेखन करणार्‍यांना इथे त्रास दिल्याचे ऐकलेले नाही पण असो.

१. कुठचेही लेखन संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे?

या पातळीचा उहापोह मिपाच्या धोरणांत नसल्याने किंवा संपादकांकडून तशी तंबी न आल्याने अशी कुठलीही पातळी राखावी असा आग्रह करणे गैर वाटते.

२. चांगल्या ललित लेखनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी.

पास. तूर्तास वेळ नाही आणि शब्द वाया घालवायचा मूडही.

३. सार्वजनिक संकेतस्थळांवरील लेखन, प्रतिक्रिया आणि स्वतःच्या ब्लॉगवरील लेखन आणि प्रतिक्रिया यात काय फरक आहे?

मिपावर तसा फारसा फरक नाही, मिपाच्या धोरणांतही फरक केलेला नाही पण फरक असावा हे योग्य. चालक संपादकांनी याबाबत एक निवेदन देणे योग्य ठरेल असे वाटते.

४. एका लेखकाकडून येणार्‍या लेखनाची वारंवारिता काय असावी?

सांगता येत नाही. तसे कोणतेही धोरण नाही. कालच मी एका कथेचे चार भाग अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने टाकले. या वारंवारितेवर अंकुश येणार असेल तर कळवावे.

५. एक लेख किती लांबीचा असावा? लेखन भागांमध्ये असले तर दोन भागांमध्ये किती दिवसांचे/वेळेचे अंतर असावे? मोठ्या लेखाचे किंवा साहित्याचे जास्तीत जास्त किती भाग असावेत? आणि

वाढदिवसांच्या शुभेच्छा, श्रद्धांजली, चौकशी किंवा तत्सम धागे किती लांबीचे असावेत ही अपेक्षा आहे? मोठ्या लेखाचे/ साहित्याचे किती भाग असावेत ही अपेक्षा आहे. पुन्हा, मिपाच्या धोरणांत तसे काही नसल्याने अशी अपेक्षा करणे अयोग्य वाटते.

६. न आवडलेल्या साहित्यास प्रतिक्रिया देताना काही वेगळी विशेष काळजी घेण्याची गरज आहे का?

न आवडलेल्या साहित्याकडे दुर्लक्ष करावे पण दुर्लक्ष कितींदा करणार? रोज कोणी पकवू लागले तर आता "पकलो" हे सांगण्याचा हक्क सदस्यांना असावा.

मला वाटते की मूळ प्रॉब्लेम हा नाहीच त्यामुळे चित्रा यांच्या लेखाचे प्रयोजन कळत नाही. तरीही त्यांना आणि इतरांना पुढले काही प्रश्न (राखाडी उत्तरे माझी आहेत) -

१. एखादा लेखक टुकार परंतु धोरणांत बसणारे धागे काढत असता त्याला संपादकांकडून समज दिली किंवा मार्गदर्शन केले जाते का? फारसे नाही. काही संपादक वैयक्तिक पद्धतीने तसे करतात असे वाटते पण त्यातून त्यांना स्वतःलाच त्रास झाला अशी उदाहरणेही सापडावीत.

२. एखादा टुकार किंवा रुचीहीन धागा काढणार्‍याला कंपूबाजीने वाहवा केली जाते किंवा व्य. नि. लिहून त्यांना चिथावले जाते अशा लोकांना समज देणे किंवा मार्गदर्शन केले जावे का? नाही. तसे होत नसावे, करणे कठीणही असावे पण अशा लोकांमुळे संकेतस्थळावर अनावश्यक साहित्य राहून, इथे हे सर्व चालते असे म्हणण्यास वाव मिळतो.
३. लोकांनी काय आवडत नाही हे सांगण्यासाठी आपला वेळ वाया घालवावा का? मला वाटतं बरेचसे लोक जेव्हा काही आवडत नाही तेव्हा हॅ! बंडल!! असे म्हणून निघून जातात आणि जेव्हा अति होते तेव्हा वैतागून त्या पुढली प्रतिक्रिया देतात.

४. हे आणि असे धागे संपादकांना दिसत नाहीत काय? दिसत असतील तरी प्रत्येक ठीकाणी कार्यवाही करता येत नाही किंवा त्यात काही हृदय हेलावणारे प्रतिसाद आहेत म्हणून ते तिथे आहेत असे उत्तर असेल तर इतर लोकांनी भविष्यात असेच धागे टाकले तर त्यांना रोखणार कसे? ज्या गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत त्या हाताबाहेर गेल्या आहेत हे स्वीकारण्यात मला शहाणपणा वाटतो. त्यावर येणार्‍या चर्चा व्यर्थ वाटतात. मिपाकरांच्या भाषेत जिलब्या वाटतात असेही म्हणण्यास हरकत नाही. असो.

अवांतरः रिअ‍ॅलिटी शोमध्ये हल्ली प्रत्येकाला आपण आशा, लता, किशोर असल्यासारखे वाटत असते. त्यांच्या या अत्युच्च आत्मविश्वासाला जमिनीवर आणण्याचे उपाय कोणाकडे आहेत काय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Aug 2011 - 9:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मोठ्ठी प्रतिक्रिया लिहीली होती. पण "मिपा म्हणजे अखील मराठी आंतरजालाच्या बौध्दीक चर्चेचं केंद्र आहे असाही कुणाचाच समज नाही" असं मालकांनी लिहील्यावर उगाच का आपली अल्पमती खर्च करायची म्हणून प्रतिसाद उडवला.

ज्या गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत त्या हाताबाहेर गेल्या आहेत हे स्वीकारण्यात मला शहाणपणा वाटतो. त्यावर येणार्‍या चर्चा व्यर्थ वाटतात.

प्रियालीशी शहाणपणाने सहमती.

तिमा's picture

29 Aug 2011 - 4:52 pm | तिमा

सध्या चाललंय ते ठीक आहे. टीका झालीच पाहिजे, त्याशिवाय कुणाच्याही लेखनात सुधारणा कशी होणार ? फक्त ती पुलंसारखी असावी, आचार्य अत्र्यांच्या भाषेत असू नये असे वाटते.

चित्रा's picture

29 Aug 2011 - 6:41 pm | चित्रा

सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. जरी मतांतरे झाली तरी अशा प्रतिक्रियांमधून वाचकांना घेण्यासारखे बरेच असते. म्हणून सहभागाबद्दल आभार.

प्रतिक्रियांचा गोषवारा:
१. सुरुवातीस ओळखी केल्याने प्रतिसाद मिळणे सोपे जाते.
२. प्रतिसादकर्त्यांची आंतरीक उर्मी दाबून ठेवणे अवघड आहे.
३. तेच तेच लेखन टाळावे. प्रत्येकाने लिहताना असे लेखन याआधी ह्या संकेतस्थळावर येउन गेले आहे का? याचा शोध घेतला किंवा गुगल सारखे शोधयंत्र प्रभावी वापरले तरी बरेच लेखन कमी होईल.
४. आवर्जून दखल घ्यावी, प्रतिक्रिया द्यावी, प्रतिवाद करावा अशा प्रकारच्या लिखाणाला वर्गवारी, लांबी, लेखनप्रकार याचं कसलंही बंधन असतं असं नाही. हा वैयक्तिक रुचिचा , जिव्हाळ्याच्या वाटलेल्या विषयांचा मामला आहे.
५. न आवडलेल्या मतांचा, विचारांचा प्रतिवाद करताना किंवा अशा दृष्टिकोनांना आव्हान देताना आपली भाषा कशी असावी यामागचा विचार सामान्यपणे प्रौढ व्यक्तींच्या संवादाचे जे सर्वसामान्य संकेत आहेत त्याला धरून असला पाहिजे.
६. अतिसामान्य म्हणता येईल अशा लेखनावर पुष्कळदा गोडगोड प्रोत्साहनपर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसतो. त्यामुळे लेखनाचा एकंदर दर्जा खालावणं अपरिहार्य आहे. त्याच त्याच प्रकारच्या अतिसामान्य आणि अभिनिवेशी अभिव्यक्तींच्या कल्लोळामुळे चोखंदळ वाचक कंटाळून जाऊ शकतात म्हणून चांगल्या लेखनाकडेही दुर्लक्ष होऊ शकते.
७. बाकीचे प्रतिसाद वाचून मागचे पुढचे संदर्भ न पाहता किंवा घेता प्रतिसाद दिले जातात. लेखकांचा या मुळे हिरमोड होऊ शकतो. प्रतिक्रिया देण्याआधी हीच प्रतिक्रिया द्यायची आहे का असा विचार करावा.
८. चांगल्या लेखकांच्या चांगल्या लेखांचे कौतुकच होते. मग ते नविन असोत वा जुने. केवळ दिसामाजी काहीतरी लिहावे म्हणून मिपावर लेखांमागून लेख लिहीत जाऊ नये. विषय सद्यकालीन किंवा 'रिलेवंट' असावे. प्रतिसादकांच्या सूचना योग्य 'स्पिरीट'ने घ्याव्या, म्हणजे मनाला लावून न घेता लेखनात सुधारणा कराव्या.
९. 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे.' (टीपः मात्र दिसामाजी लिहीलेले सर्वच मिपावर टाकण्याची गरज आहे असे नाही! :) खालील मत (१०) पहावे. )
१०. पातळी आणि प्रमाण बघण्यापेक्षा लेखकाने ते काय स्फूर्तीने टाकले आहे ते बघावे. (संपादकांनी ठरवून फुटकळ धाग्यांना काढून टाकण्याचा निर्णय घ्यावा). लेखकांनी उगाच 'दिसामाजी..' च्या मोहाला बळी पडून चार ओळी खरडू नयेत ही अपेक्षा. बाकी लेखन किती भागात करावे हे लेखकाने ठरवावे. वाचक कंटाळले की आपोआप त्याला सत्य कळून जाते. मात्र अशावेळी प्रामाणिकपणे 'आपले लिखाण लांबल्याने, अथवा फसल्याने ते वाचकांना आता नकोसे आहे' हे मान्य करता यायला हवे. लेखन आवडले असे कळवणार्‍या केवळ प्रतिक्रिया येतील अशा अपेक्षांनी लेखन केल्याने त्रास होतो. ह्याची पुढची पायरी म्हणजे मग एखाद्याला आपल्यापेक्षा जास्ती प्रतिसाद मिळाले की मग तो कंपूबाज, आम्ही वाळीत टाकलेले अशा प्रकारे रडगाण्याला सुरुवात होते.
११. नविन लेखकाला थोडेसे रॅगिंग होणारच. पण अनेकदा असेच प्रतिसादक संकेतस्थळावर मित्र होतात असे दिसते. तेव्हा टीका सकारात्मक दृष्टीने घ्यावी.
१२. नवीन माणसाने एखाद्या नव्या स्थळी सावध मात्र निश्चितच राहावे. नवीन असूनही सकस आणि दखल घेण्याजोगे लेखन करणार्‍यांना त्रास होताना दिसत नाही. लेखनाच्या किमान पातळीचा आग्रह असण्याची गरज नाही. लेखनाची वारंवारिता, लांबी इ. गोष्टी धोरणात नसल्याने त्यावरून आग्रह नको. रोज कोणी पकवू लागले तर आता "पकलो" हे सांगण्याचा हक्क सदस्यांना असावा. बरेचसे लोक जेव्हा काही आवडत नाही तेव्हा हॅ! बंडल!! असे म्हणून निघून जातात आणि जेव्हा अति होते तेव्हा वैतागून त्या पुढली प्रतिक्रिया देतात.
१३. टीका झालीच पाहिजे, त्याशिवाय कुणाच्याही लेखनात सुधारणा कशी होणार ?

याव्यतिरिक्त माझी व्यक्तिगत मते.
१४. मिपावर प्रमाणलेखनाचा आग्रह किंवा अभिनिवेश नाही, परंतु आपले लेखन सुसह्य व्हावे, वाचावेसे वाटावे म्हणून तरी प्रत्येकच ओळीत र्‍ह्स्व दीर्घाच्या, आणि व्याकरणाच्या चुका असणे योग्य नाही.
१५. मुख्यत्वे वैचारिक लेखनात फाफटपसारा टाळावा, सुसूत्रता असावी. काय म्हणायचे आहे ते दोनतीन भागात व्यवस्थित सांगता येत नसेल तर लेखनाचा फेरविचार करावा. लघु कादंबर्‍या किंवा अनेक भाग असलेल्या लेखनाचा खरोखरच अधिक विचार करावा. वीस पंचवीस भागांमध्ये रस घेता येईल इतका जीव कादंबरीत आहे का, का ती कथा स्वरूपात ठेवता येईल याचाही विचार व्हावा. आपले लेखन, आपल्या कविता आपल्याला आवडणे किंवा त्याविषयी आत्मीयता वाटणे साहजिक आहे, पण म्हणून क्रिकेटच्या मॅचप्रमाणे धावा काढून फलक हलता ठेवण्याची गरज नाही असे वाटते.

------------------
येथे संपादक म्हणून मी ही चर्चा सुरु केली नाही. तर मिपावर गेली तीन वर्षे तरी वाचक असल्याने सुरु केली आहे. संपादक म्हणून मी वैयक्तिक कारणाने सुटीवर आहे हे संपादक मंडळास माहिती आहे, तसेच माझ्या खरडवहीत आहे. संपादकांनी जे केले पाहिजे ते काहींनी वरील प्रतिसादांमध्ये सुचवले आहे (परा, राजेश घासकडवी आणि प्रियाली) ते मला तत्वतः मान्य आहे पण या धाग्यामध्ये माझ्या संपादक/संपादिका/मॉडरेटर/मिपास्वच्छता कामगार असण्याचा काही प्रश्न येत नाही. कारण यातून जे सुचवले जाईल ते लेखकांनी तसेच्या तसे पाळावे हा आग्रह नाही. हे केवळ मार्गदर्शन आहे. ऐकावे जनाचे या विचाराने केलेले. यातून पुढेमागे काही धोरण तयार होईल आणि आधिकारिक धोरण बनेल याचीही शक्यता शून्य वाटते आणि तशी अपेक्षा, किंवा इच्छा नाही. मात्र नवीन लेखन करताना या चर्चेतून पुढे आलेल्या मतांचा नव्यांनी तसेच जुन्यांनी विचार करावा असे वाटते.

पाषाणभेद's picture

30 Aug 2011 - 5:41 am | पाषाणभेद

>>> १. सुरुवातीस ओळखी केल्याने प्रतिसाद मिळणे सोपे जाते.

प्रतिसादांसाठी ओळखी करणे हे पटत नाही. ओळखी आपोआप होतात. अन प्रतिसाद यायलाच पाहिजे हे कोणी सांगितले? प्रतिसाद येतील न येतील.
अवांतरः तुम्ही शिक्षकी पेशात आहात काय?

नगरीनिरंजन's picture

30 Aug 2011 - 7:39 am | नगरीनिरंजन

ओळखी करून प्रतिक्रिया मिळवणे मान्य नाही आणि नसावे. जे काही आपण लिहितो त्याच्यावर ते कोणी लिहीलंय हे न पाहता प्रामाणिक प्रतिक्रिया देणार्‍यांच्याच प्रतिक्रिया खर्‍या. बाकी ओळखीच्या लोकांनी शतक ठोकले तरी त्यातून खरे मूल्यमापन होईलच असे नाही.

पहिली मानसिक प्रसुती कुठं झाली याच्या निश्चित नोंदी नसल्या तरी नाममात्र किंमतीत (काहीवेळा आग्रह करून फुकट) जी पुस्तकं मिळतात त्यांना त्या-त्या काळात झालेल्या प्रसुत्यांचे पेशंट हिस्ट्री रिपोर्टस मानायला हरकत नाही. या मानसिक प्रसुत्यांचे पेशंट हिस्ट्री रिपोर्ट आज पाहायला मिळत असले, तरी मुळात गर्भ राहिला कुणामुळे हेही पाहावं लागेल. तर गर्भ राहाण्याची कारणे तशी लक्षावधी आहेत. शरीरशास्त्राच्या दृष्टीने स्त्री हीच फक्त गर्भधारणा करीत असेल; पण मानसशास्त्राच्या दृष्टीने गर्भधारणेकरिता स्त्री-पुरूष एवढेच काय पण क्लिबसुध्दा सक्षम आहेत. जाणता अजाणता बोलणे, पाहाणे, ऐकणे, कल्पीणे घडत असताना संग घडून जातो; त्याची आठवण देखील राहात नाही, एवढंच काय पण मानसिक गर्भधारणा झाल्यानंतर आपण गर्भ वागवतोय हे सुध्दा जाणवत नाही. कधीतरी दिवस भरतात आणि हाती पडेल तो कागद-लेखणी वापरून आणि तेही उपलब्ध नसल्यास कुठल्याही मानव प्राण्यासमोर, ध्वनीवर्धकासमोर मुखावाटे शब्द करून मानसिक प्रसुती उरकली जाते.
आता एकदा अशा मानसिक गर्भधारणा आणि प्रसुतीचा अनुभव गाठीस आला, तरी पुढच्या मानसिक गर्भधारणेचे काटेकोर व्यवस्थापन सहसा केले जात नाही. कारण स्पष्ट आहे. मानसिक संग करणे आणि मानसिक प्रसुती या संकल्पनाच एवढ्या सूक्ष्म आणि दृष्टी अगोचर आहेत की गर्भधारणा-वाढ-प्रसुती या प्रक्रियांचा आलेख काढण्याची कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही. एक मार्ग असतो - पण तो प्रसुती पश्चात आणि क्रौर्यसंपन्न आहे. यात प्रसुती होऊ देऊन अपत्याचे मूल्यमापन करावे लागते आणि ते पसंतीस उतरले नाही तर आपोआपच हातून भ्रूणहत्त्या नव्हे तर बालहत्त्या घडते !
रात्रन रात्र जागून, अनेक वेळा मानसिकदृष्ट्या प्रसूत होऊन, अनेक बालकांची हत्त्या करून जे असे व्यवस्थापन करतात त्यांची बाळे रंगीत वेष्टणात गुंडाळून अनेक प्रतींमध्ये विकली जातात. आता बाळ तुम्ही विकत घेतले असले, थोडक्यात दत्तक घेतले असले तरी तुम्ही त्याचे मातापिता नसल्याने तुम्ही त्याला समजून घेऊ शकालच अशी खात्री नसते. तर असा हा लोकव्यवहार अनादि काळापासून सुरू आहे.
माणसाचे जग जस-जसे विकसीत होत गेले तस-तशी मानसिक गर्भधारणा-प्रसुतीची गरज वाढत गेली आणि या प्रक्रियेला आखीव-रेखीव रूप मिळाले. पूर्वी जो मानसिक गर्भधारणेचा कालावधी अमर्यादित होता, तो आता घटला. गेली तीस वर्षे गर्भवती राहून सहाशे (??) पृष्टांच्या बाळाची डिलेव्हरी झालेली मिशाळ माता आणि दररोज प्रसुत होणार्‍या दैनंदिनप्रसुतीकारांच्या तुलनेतून हीच परिस्थिती स्पष्ट होते.
शिवाय मानसिक गर्भवती/प्रसुत माता यांची संख्या अतोनात वाढल्याने, बाळ झालंय हे क्षणार्धात जगजाहिर करणारी, एकमेकांची बाळे एकाच जागी पटकन पाहुन घेण्याची यंत्रणा देखील अस्तित्वात आली. मानसिक गर्भधारणा-वाढ-प्रसुती ही एकत्रितपणेच रूग्णालयात व्हावी याही संकल्पनेने जोर धरल्याने चित्रविचित्र नावांची हास्पिटलेही या यंत्रणेपूर्वी आकाराला आली - पण तिथे जाणे अजूनही बर्‍याच मानसिक गर्भवती टाळतात. यामागे कारणे अनंत आहेत. बाळ झाल्यानंतर तिथे होणारे अतोनात कौतुक, होणारी अतोनात टीका आणि मानसिक गर्भपात, अनंत विषयोपभोगातून जन्मास येणारी लुळी-पांगळी-आंधळी अपत्ये, अस्फूट मानसिक गर्भधारणेतून चाललेला काथ्याकूट ही ह्रदयद्रावक परिस्थिती पाहून नवख्या माता सहसा या हॉस्पिटल्सच्या खिडकीतून डोकावतात जरूर, पण स्वत: मात्र तिथे प्रसूत होत नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करता मानसिक प्रसुतीशास्त्राचा उगम, विकास, सद्यस्थिती आणि संभाव्यता यात संशोधनाला भरपूर वाव आहे.

पैसा's picture

29 Aug 2011 - 8:33 pm | पैसा

चित्राचा लेख आणि इतर अनेकांच्या प्रतिक्रियांतून छान चर्चा झाली आहे, ज्या नवलेखकांना असे धागे वाचायची गरज आहे, त्यांनी ही चर्चा वाचून यातून योग्य तो धडा घेतला असेल अशी आशा करूयात!

बाकी हा धागा चित्राने संपादक म्हणून काढलेला असो, किंवा सदस्य म्हणून, त्याने फार फरक पडतो असं वाटत नाही. या लेखातून ज्याला जे घेण्यासारखं असेल त्याने ते घ्यावं! सिंपल!

लेख/प्रतिसादातून चांगली मते सांगितलेली आहेत.

१. कुठचेही लेखन संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे?

होय. किमान पातळीचे असावे खरे. पण मोठ्या बँडविड्थच्या मुक्तपीठावर आपल्यापैकी नवशिके लिहायचा प्रयत्न करतो. त्यामुळे पातळी कमीअधिक असणार. मला वाटते, की पातळी व्यक्तिगत ठरवावी. नवशिक्यांना आधी शिकायचे असते, ते म्हणजे आपला आत्मविश्वास जागवणे. पण एकदा तो जागवल्यावर मग फाजिल आत्मविश्वासावर काबू मिळवावा लागतो! पहिलेवहिले लेखन दिल्याचे धैर्य पाठीशी असल्यावर सदस्यांनी एक सवय लावून घ्यावी. "साठवा"वरती टिचकी देण्यापूर्वी दोन-दोनदा तरी आपलेच लेखन वाचून बघावे.

२. चांगल्या ललित लेखनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी.

चांगले ललित लेखन वाचकाच्या भावनांपाशी पोचते. आता भावनांपाशी पोचण्याकरिता रसिकाच्या भावनांशी काहीतरी कमीतकमी सुसंवाद असेल. पण तरी तोवर ती भावना त्याच आर्ततेने रसिकाने अनुभवलेली नसते. त्या नाविन्यामुळे एक तर रसिकाचे आदलेच भावनाविश्व समृद्ध होते, किंवा आधी जिथपर्यंत त्याच्या भावनांची पोच नसते, तिथपर्यंत भावनाविश्व रुंदावते. येथे "भावना", "आर्त" वगैरे शब्द वापरले असतील, तरी विनोदभावना आणि हलकेफुलके प्रकारही ललितमध्ये मोडतात. उदाहरण म्हणून सदस्य ब्रिटिश यांची एक कथा देऊ शकतो - माज्या आज्याचा दारूचा धंदा. या विषयाच्या काहीशा गलिच्छपणातही लेखनातला एका प्रकारचा निरागसपणा मला भावतो. (खरे तर या प्रश्नमालिकेत प्रश्नाचा संदर्भ मला नीट समजलेला नाही. उत्तर भरकटलेले असल्यास क्षमस्व.)

३. सार्वजनिक संकेतस्थळांवरील लेखन, प्रतिक्रिया आणि स्वतःच्या ब्लॉगवरील लेखन आणि प्रतिक्रिया यात काय फरक आहे?

चित्रा यांच्या मूळ उत्तरासारखेच.

४. एका लेखकाकडून येणार्‍या लेखनाची वारंवारिता काय असावी?

समाजात वावर होतो, खूप दोस्तमंडळीमध्ये एकत्र गप्पा मारताना हाच प्रश्न येतो : एकाच व्यक्तीने सारखे-सारखे किती बोलायचे? हे बरेचसे त्या व्यक्तीच्या रंजकतेवर अवलंबून असते. अगदी रंजक वक्ता असला तरी त्याने प्रत्येक वाक्याआड बोलता कामा नये. पण कंटाळवाण्या वक्त्यापेक्षा त्या रंजक वक्त्याने अधिक बोलावे, असेही वाटते. आपल्या गप्पांना येणार्‍या प्रतिक्रियांवरून आपणापैकी कित्येकजण लहानपणीच किती बोलावे, कधी थांबावे, हे शिकतो. संकेतस्थळावर मात्र हे शिकता येत नाही - आपली शिकायची लवचिकता गेलेली असते :-)

५. एक लेख किती लांबीचा असावा? लेखन भागांमध्ये असले तर दोन भागांमध्ये किती दिवसांचे/वेळेचे अंतर असावे? मोठ्या लेखाचे किंवा साहित्याचे जास्तीत जास्त किती भाग असावेत? आणि

हे मुद्दे खूपच तांत्रिक आहेत. या चर्चाविषयासाठी किचकट वाटतात. मला खुद्द संगणक-पटल दोनदा सरकवेपर्यंत (पेज-स्क्रोल करेपर्यंत) बरे वाटते. म्हणजे ५००-१००० शब्द. मी खुद्द लेखाचे ५पर्यंत भाग केलेले आहेत. एकदा हे भाग फक्त वाचनीयतेकरिता केले होते - म्हणजे लेख सरकवता-सरकवता अती लांबू नये, म्हणून. असे सर्व भाग मी एकाच दिवशी चढवले होते. आता विचार करता असे जाणवते, की हे कदाचित चूक होते. "नवीन लेखन"मध्ये एकदम चार-पाच ओळी मी व्यापल्या... या बाबतीत सुयोग्य वर्तन काय याचे उत्तर देण्याबाबत "पास".

६. न आवडलेल्या साहित्यास प्रतिक्रिया देताना काही वेगळी विशेष काळजी घेण्याची गरज आहे का?

वातावरण खेळीमेळीचे ठेवायचे असल्यास खेळीमेळीने नावड सांगावी. कोण्या लेखकास प्रोत्साहन द्यायचे असेल, आणि सवड असेल, तर लेखनातील चांगले मुद्देही सांगावेत, सुधारणा सुचवाव्यात. समसमान पातळीवरून अधूनमधून अटीतटीने वादही घालता येतो.

चित्रा's picture

1 Sep 2011 - 8:04 am | चित्रा

अशीच चर्चा अपेक्षित होती.

. (खरे तर या प्रश्नमालिकेत प्रश्नाचा संदर्भ मला नीट समजलेला नाही. उत्तर भरकटलेले असल्यास क्षमस्व.)

उत्तर भरकटलेले नाही, उलट अतिशय आवडले. (ब्रिटिश यांच्या लेखनामधला निरागसपणा आणि स्वतःची अशी छाप मलाही फार आवडते.)

आशु जोग's picture

18 Sep 2011 - 10:30 pm | आशु जोग

मला एक खरच कळत नाहीये

इथे नवीन आणि जुने म्हणजे काय ?

अहो सदस्य म्हणून तो जुना असेल पण लेखक म्हणून त्याचे वय किती हे कसे ठरवणार.

आणि या न्यायाने कोणताही लेखक चि वि जोशी, पु लं, गदिमा यांच्यासकट
जेवढा वयाने कमी तितका सकस लिहितो असा अनुभव आहे

--

नवा आणि जुना असा फरक संपादकही करताना दिसत नाहीत
त्यामुळे पहिले काही दिवस तुम्ही शिकाऊ ट्रेनी. असे होत नाही

--

लेख लिहीणार्‍याला जर काही शिक्षणाची आवश्यकता असेल तर
प्रतिसाद लिहीणार्‍याकडूनही काही अपेक्षा आहेत

काही महाभाग प्रत्येक वेळी शेम टू शेम शब्दात त्याच त्याच प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

दुसरी बात

म्हणे आपल्या ब्लॉगवरून आणलेले लेखन नको . लेकाच्या तूझ्यासाठी नवीन असेल तर वाच,
नाहीतर हो की चालता. बाकीच्यांना वाचू दे
.

बाय द वे,

इथे काय असावं आणि काय नसावं हे सांगण्याचा अधिकार मालक आणि संपादकांचा आहे

--

एखादा लेखक हा दुर्गंधी प्रतिक्रियांमुळे मिसळ सोडून निघून गेला म्हणून त्याचे फार काही
नुकसान होते का ?

आणि जे घर समजून इथे मुक्काम करतात त्यांना साहित्यातील नोबेल मिळणार आहे का ?

--

अलिकडे तर एक अतिशय घातक प्रकार इथे येऊ लागला आहे

तो म्हणजे एखादा लेखक जरा बरा आहे असं दिसले तर त्याच्या लेखनाला प्रतिसाद देण्याऐवजी

त्याला उत्तर म्हणून नवीन धागा सुरु करणे

--

(बाकी चालू द्या जोरात)

चेतन सुभाष गुगळे's picture

19 Sep 2011 - 11:32 am | चेतन सुभाष गुगळे

आशु जोग,

आपण मांडलेल्या सर्वच मुद्यांशी पूर्णत: सहमत.

<< म्हणे आपल्या ब्लॉगवरून आणलेले लेखन नको . लेकाच्या तूझ्यासाठी नवीन असेल तर वाच,
नाहीतर हो की चालता. बाकीच्यांना वाचू दे. >>

<< एखादा लेखक हा दुर्गंधी प्रतिक्रियांमुळे मिसळ सोडून निघून गेला म्हणून त्याचे फार काही
नुकसान होते का ?

आणि जे घर समजून इथे मुक्काम करतात त्यांना साहित्यातील नोबेल मिळणार आहे का ? >>

या बद्दल विशेष अभिनंदन!

राजेश घासकडवी's picture

30 Aug 2011 - 3:28 am | राजेश घासकडवी

(या प्रतिसादातले बहुतांश शब्द इथून घेतलेले आहेत. त्यात वाङमयचौर्याचा हेतू नसून एकाच नाण्याला दोन बाजू कशा असतात हे दाखवण्याचा प्रयत्न आहे)

मुळात छापील माध्यम आणि संस्थळे ह्यात मूलभूत फरक आहेच. तत्काळ हवे ते लिहून प्रसिद्ध करणे आणि लोकांसमोर आणणे ही या माध्यमाची खासियत आणि म्हणूनच आकर्षण ठरते आहे. अर्थात या प्रकारामुळे काय प्रसिद्ध व्हावे/करावे यात अगदी काटेकोर अंकुश असणे अवघड होते. त्यातून लेखक/प्रतिसादक हे विनावेतन, वेळमिळेल तसे लेखन करत असल्याने जे काही सध्या दिसते ते होते. परंतु अजिबात कचरा लेखन येण्यापेक्षा ही परिस्थिती बरीच बरी आहे.

थोडी सबुरी ठेवली तर गचाळ, जिलब्याळ धागे आणि त्याचे लेखक काही दिवसातच आपोआप मागे पडतात व नवीन पुढे येतात असे गेल्या दीड वर्षाच्या माझ्या सदस्य कालावधीमधे मला निदर्शनास आले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2011 - 3:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गचाळ, जिलब्याळ धागे आणि त्याचे लेखक काही दिवसातच आपोआप मागे पडतात व नवीन पुढे येतात असे गेल्या दीड वर्षाच्या माझ्या सदस्य कालावधीमधे मला निदर्शनास आले आहे.

याचंच तर दु:ख आहे ना!

प्रियाली's picture

30 Aug 2011 - 3:40 am | प्रियाली

गप र्‍हावा की, काय टुरटुर करून र्‍हायला?

मिपा म्हणजे अखील मराठी आंतरजालाच्या बौध्दीक चर्चेचं केंद्र आहे असाही कुणाचाच समज नाही.

असं स्पष्ट सांगितलं आहे ना तर मग पुढे चर्चा करण्याचं प्रयोजनच काय? या लेखात म्हटलेल्या -

  • मिपावर प्रमाणलेखनाचा आग्रह किंवा अभिनिवेश नाही, परंतु आपले लेखन सुसह्य व्हावे, वाचावेसे वाटावे म्हणून तरी प्रत्येकच ओळीत र्‍ह्स्व दीर्घाच्या, आणि व्याकरणाच्या चुका असणे योग्य नाही.
  • तेच तेच लेखन टाळावे.
  • अतिसामान्य म्हणता येईल अशा लेखनावर पुष्कळदा गोडगोड प्रोत्साहनपर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसतो. त्यामुळे लेखनाचा एकंदर दर्जा खालावणं अपरिहार्य आहे
  • नवीन माणसाने एखाद्या नव्या स्थळी सावध मात्र निश्चितच राहावे.
  • मुख्यत्वे वैचारिक लेखनात फाफटपसारा टाळावा, सुसूत्रता असावी. काय म्हणायचे आहे ते दोनतीन भागात व्यवस्थित सांगता येत नसेल तर लेखनाचा फेरविचार करावा.

वगैरे वगैरेला मिपा बौद्धिक चर्चेचं केंद्र नाही असे जाहीर केल्यावर फारसा अर्थ उरत नाही असे वाटते.

पिवळा डांबिस's picture

30 Aug 2011 - 3:52 am | पिवळा डांबिस

वरती मुक्तसुनीत, प्रियाली, धनंजय वगैरे जाणकारांनी प्रतिसाद दिलेलेच आहेत तेंव्हा त्यात नवीन भर काय टाकणार?
परंतु नवे आणि जुने याबाबत एक मुद्दा मांडायचा झाला तर मिपावर जुने म्हणता येतील असे म्हणजे आयडी नंबर १ ते २०० धारण करणारे जे (१५-२०;)) लोक आहेत तेच खरे जुने. तेच लोक की जे मनोगताच्या मेफ्लावरवरून इथे आले आणि मिपा सुरु करण्यात ज्यानी हातभार लावला ते! आद्य प्युरिटन!!!:)
बाकी सगळे नवेच!!!!

१. कुठचेही लेखन संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे?
इथे मी चित्राशी सहमत आहे. केले लेखन हे लेखनाचे किमान नियम तरी पाळून केलेले असावे. अन्यथा एरवी बरी असलेली 'मोकलाया दाही दिशा' सारखी कविता केवळ चुकीच्या टंकलेखनामुळे हास्यास्पद ठरते...
२. चांगल्या ललित लेखनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी.
इथे मी पराशी सहमत आहे. जे सुरवातीपासून शेवटपर्यंत वाचवलं जातं ते चांगलं ललित लेखन! ललितच का पण कोणत्याही लेखनाला हे लागू पडतं! मग तो ललित असो की वैचारिक असो....
३. सार्वजनिक संकेतस्थळांवरील लेखन, प्रतिक्रिया आणि स्वतःच्या ब्लॉगवरील लेखन आणि प्रतिक्रिया यात काय फरक आहे?
स्वतःच्या ब्लॉगवर प्रतिकूल प्रतिक्रिया उडवायचं लेखकाला स्वातंत्र्य असतं. सार्वजनिक संकेतस्थलावर ते नसतं आणि नसावं. म्हणूनच ज्यांना प्रतिकूल प्रतिक्रिया सहन होत नसतील त्यांनी खुशाल त्यांच्या ब्लॉगवर त्यांचं लिखाण प्रकाशित करावं. पण सार्वजनिक संकेतस्थळावर जर लिखाण प्रकाशित करायचं असेल तर मग प्रतिकूल प्रतिक्रिया आल्या म्हणून रुसुन बसू नये.
सार्वजनिक संकेतस्थळावरही प्रतिकूल प्रतिक्रिया आल्यास लेखनकर्त्याला ३ पर्याय उपलब्ध असतात...
१. जर टीका सत्य/ योग्य असेल तर मान्य करून स्वसंपादन करून लिखाणात तशी सुधारणा करणे.
२. जर टीका मान्य नसेल तर तिचा प्रतिवाद (रिबटल) करणे.
३. प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करणे.
हे न करता प्रतिकूल टीकेबद्दल कांगावा करणे, 'मी (अमका) अमूकतमूक असूनही माझ्या (त्याच्या) लिखाणावर टीका करता म्हणजे काय?' असली विधाने करणे, दुसराच विषय असलेल्या इतर धाग्यावंर जाऊन टोमणे मारत बसणे वा संपादकांकडे तक्रार नेणे हे माझ्या मते वैचारिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे.

४. एका लेखकाकडून येणार्‍या लेखनाची वारंवारिता काय असावी?
असा काही नियम नसावा. जर लेखन सकस असेल तर ते वारंवार आलं तरी मिपाकर त्याचं स्वागत करतात. किंबहुना नव्या सभासदांना आपण आपलं लेखन किती वारंवारितेने मिपावर टाकावं असा जर प्रश्न पडला असेल तर त्यांनी आपल्या आधी टाकलेल्या लेखनाला आलेले प्रतिसाद काळजीपूर्वक वाचावेत. तो खरा आरसा आहे. बर्‍याच वेळा काय होतं की नवीन मिपाकर सभासद झाल्या झाल्या आपलं इतरत्र प्रकाशित झालेलं लेखन दणादण मिपावर टाकतात. पण प्रत्येक संकेतस्थळाचा आपला असा एक स्वभाव असतो त्याप्रमाणे मग प्रतिक्रिया मिळतात. नगरमंदिरात वाहवा मिळवलेलं प्रवचन जर कुणी कॉलेजकट्ट्यावर करू लागलं तर त्याचं जे होईल तेच मग अशा लिखाणाचं होतं!!:)
५. एक लेख किती लांबीचा असावा? लेखन भागांमध्ये असले तर दोन भागांमध्ये किती दिवसांचे/वेळेचे अंतर असावे? मोठ्या लेखाचे किंवा साहित्याचे जास्तीत जास्त किती भाग असावेत?
लेखनाला लांबीचे बंधन नसावे. तसेच त्याचे किती भाग असावेत हा प्रश्नही माझ्या मते गौण आहे. लेखन वाचनीय असेल तर अनेक भागात असूनही ते लोकप्रिय होतंच. उदा. बसंतचं लग्न ही लेखमालिका....
दोन भागांमध्ये किती अंतर ठेवावे हा वाचकांचा नसून लेखकाचा निर्णय असावा. जर पुढले भाग लिहून तयार असतील तर ते टाकण्यात दिरंगाई नसावी. पण कधीकधी लेखकही (संपादकांप्रमाणेच) इतर कार्यबाहुल्यात गढलेले असतात त्यामुळे त्यांना पुढील भाग टाकण्यात उशीर लागू शकतो ही जाण असू द्यावी. काही काही लेखक तर म्हणे "कथा उंचावर नेऊन ठेवतात आणि मग क्रमशः करतात!!" असे ऐकुन आहे. अशा लेखकांना इथे मिपावर "पुढला भाग कधी?" या शाब्दिक चाबकाने वारंवार फोडून काढले जाते!!!:)
आणि
६. न आवडलेल्या साहित्यास प्रतिक्रिया देताना काही वेगळी विशेष काळजी घेण्याची गरज आहे का?
लेखन वाचून जे मनात आलं ते लिहिणं यालाच उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणतात आणि तीच खरी महत्वाची! जसं चांगलं लेखन वाचल्यावर 'वा! क्या बात है!!" हे निघतं तसंच बेक्कार लेखन वाचल्यावर 'श्या! काय बेक्कार आहे!!' किंवा "काय थापा मारल्या आहेत!!" असं निघतं. दुसरं म्हणजे नुसत्या 'लिखाण आवड्लं/ नावडलं' अशा प्रतिक्रिया माझ्या मते निरूपयोगी आहेत. त्या वाचून फारतर अहंकार सुखावला/ दुखावला जातो पण लेखक म्हणून तुमच्या हाती काही लागत नाही. लिखाण आवडलं तर त्यातलं काय आवडलं आणि जर आवडलं नाही तर त्यात काय आवडलं नाही हे सांगण्याची सवय आपण सर्व मिपाकरांनी लावून घेतली पाहिजे.

आशु जोग's picture

2 Sep 2011 - 12:29 am | आशु जोग

पिवळा डांबिस
छान लिहीलेत !

श्रावण मोडक's picture

30 Aug 2011 - 11:44 pm | श्रावण मोडक

सहमत होण्याशिवाय पर्याय नाही.
तिसऱ्या क्रमांकावर जे लिहिलंय ते लोकांनी समजून घेतलं तर अर्धेअधिक प्रश्न संपतील. ते समजून घेतल्यानंतर तसे वागून जे टिकतील ते मावळे, बाकीच्यांना उडून जाऊ द्यावे.

प्रत्येक संकेतस्थळाचा आपला असा एक स्वभाव असतो

अगदी खरं आहे. कुठं मंगळागौरीचं वातावरण असतं, कुठं दिवाळीतला अड्डा, कुठं शिमगा, तर कुठं श्राद्धाचं वातावरण.

आशु जोग's picture

2 Sep 2011 - 12:31 am | आशु जोग

अवघड आहे !

चित्रा's picture

1 Sep 2011 - 8:12 am | चित्रा

दोन मुद्दे अतिशय महत्त्वाचे वाटले.

१. नव्या सभासदांना आपण आपलं लेखन किती वारंवारितेने मिपावर टाकावं असा जर प्रश्न पडला असेल तर त्यांनी आपल्या आधी टाकलेल्या लेखनाला आलेले प्रतिसाद काळजीपूर्वक वाचावेत. तो खरा आरसा आहे.
२. लिखाण आवडलं तर त्यातलं काय आवडलं आणि जर आवडलं नाही तर त्यात काय आवडलं नाही हे सांगण्याची सवय आपण सर्व मिपाकरांनी लावून घेतली पाहिजे.

आता अजून एक -
काही काही लेखक तर म्हणे "कथा उंचावर नेऊन ठेवतात आणि मग क्रमशः करतात!!" असे ऐकुन आहे. अशा लेखकांना इथे मिपावर "पुढला भाग कधी?" या शाब्दिक चाबकाने वारंवार फोडून काढले जाते!!

तुमचे पुढले लेखन कधी?! :)

जयंत कुलकर्णी's picture

30 Aug 2011 - 7:59 am | जयंत कुलकर्णी

काही वाक्ये आठवली -
Let 100 flowers Bloom
Let people pass - हे लो़कांवर इकडून तिकडे जाण्याच्या प्रवृत्तीवरच्या बंधनाला उद्देशूह्न म्हटले आहे... कोणी ते आठवत नाही. पहिले अर्थातच माओने म्हटले आहे.

नवीन लेखकांना मार्गदर्शन करता येईल का?

हो , आवडलेल्या लिखानाला आपले प्रामाणिक मत दिले तर नक्कीच नविन लेखकांना मार्गदर्शन होइल..

समजा एखादे आपल्याला आवडले नाही, पण दूसर्याला आवडले तरी तो त्यास प्रामाणिक प्रतिक्रिया देइन..
बस्स येव्हडेच जरी झाले तरी ते ठिक आहे...

---------------

आणि जरा वेगळी उदाहरणे देतो ( कारण येथे विचारलेले प्रश्न हे लिखानासंबंधी आहेत, नविन लेखकाच्या प्रोत्साहनासाठी नाहित असे वाटते.

१. कवितेविषयी

एका फक्त वाचकाला, जर कुठल्याही कवितेचे रसग्रहण करायचे असेल तर त्याने इतर ठिकांणांच्या कवितेचे रसग्रहन करण्यापेक्षा येथीलच एका चांगल्या आणि शक्यतो नविन कवीच्या उत्कृष्ट कवितेचे रसग्रहन केले तर आपोआपच त्या कवीला, इतर सदश्यांना आणि मिपा ला पण ते चांगलेच वाटेल .. एक खेळकर नाते प्रस्थापित होयील..

मला आठवते, मागे चित्रा यांच्या कवितेवरच बरेच जणे कश्याची कविता आहे , आनि त्यांना काय वाटते हे लिहित होते .. नक्कीच तुम्हाल ते चांगले वाटत असेन, माझ्यासाठी तेंव्हा चित्रा ही नविन कवयत्री होती...

दूसरी अशी गोष्ट जी परा ने बर्याच दा सांगितले आहे, की कविता भाराभार लिहितात येथे लोक, प्रतिथयश लोक, जुने लोक ही खुप छान कविता देतात.. अहो पण फक्त कविता देण्यासाठी तो सेक्शन नाहि, तो इतर कवींच्या कविता वाचण्यासाठी पण आहे हे का लक्षात घेत नाहित लोक..
स्वताच्या कवितेवर रिप्लाय हवेत , मात्र इतर कवितेंवर स्वता रिप्लाय द्यायचा नाहि असे का ?

२. कलादालन :
स्वताची एक कला.. जी स्वता अनुभवताना आनंद घेतला असेल तरच येथे दिली तर नविन काय जुने काय वाचक भरभरुन प्रतिसाद नक्की देतोच.. नविन सदश्यांनी उगाच द्यायचे म्हणुन गच्चीवरील फोटो येथे लावल्यास त्यांना प्रोत्साहन मिळणार नाही .. आणि आम्ही खुप जुने जाणते म्हणुन दारुच्या बाटल्यांचे फोटो देणे ही उचित नाही...

निसर्ग हा एकच असा कलाकार आहे, ज्यास अहम नसतो, त्याच्याप्रमाणे जर येथे वावर करणार असाल तर मस्तच वाटेल .. कलादालन हा आपल्या कलेसाठी एक योग्य स्त्रोत आहे.. मला वाटते नविन सदश्यांनी भंपक मी आलो आहे .. धन्यवाद असले धागे काढण्यापेक्षा.. स्वता रिप्लाय देवुन किंवा कलादालनातुन येंट्री केली तर ते एकदम छान उदाहरण होते.

उदा> अमोल (जातिवंत भटक्या.. आणि त्यानी काढलेले फोटो, ट्रेक चे लिखान) .. प्रोत्साहन मागणार्या नविन सदश्य ही येथे प्रोत्साहन देवु शकतात हे या उदा. कळेलच.

३. चर्चा
चर्चा व्यव्स्थीत विषय घेवुन, अआणि पुढच्याचा विचारांचा आदर ठेवुन जर केली असेन तर ती नक्कीच योग्य आहे, भले मते वेगळी असली तरी, नविन सदश्यांनी उगाचच चर्चेचे धागे टाकुन बोळवन करण्यापेक्षा, नविन चर्चांवर आपले व्यव्स्थीत मत देवुन, आपली उल्लेखनिय उपस्थीती दाखवावी ...

जनातल मनातल मध्ये वरती उदा> आले आहेत.

लेखन हे पुढच्याला आपलेसे करणारे असावे, नविन सदश्यांनी रिप्लाय मधुन एक वाचक असल्याची जाण दाखवुन दिली तर त्यांना ही आपल्या लेखनासाठी चांगले वाचक हवे आहेत असे म्हणण्याची वेळ येणार नाही असे वाटते..

म्हणुन प्रत्येक सदश्यांने उत्कृष्ट वाचक व्हावे.. पुढे त्याला प्रोत्साहन मिळतच राहिन

लेखक नवीन की जुना या चर्चेला काहीच अर्थ नाही

लिखाण सकस आहे की भंकस
ही चर्चा झाली तर बरे होइल.

आज मिसळीची गंभीर अवस्था नवीन लोकांमुळे होत असेल
तर

यापुढे नवीन लोकांना प्रवेशच देऊ नये
सगळेच जुने. प्रश्नच मिटला

आशु जोग's picture

20 Sep 2011 - 11:03 pm | आशु जोग

नवीन म्हणजे कोण ?

राघव's picture

20 Sep 2011 - 1:14 pm | राघव

मार्गदर्शक चर्चा मनापासून आवडली.

बहुतेक ठिकाणी पिडांकाकांशी सहमत आहे. काही बाबतीत थोडे अधिक लिहावेसे वाटले -
- कुठचेही लेखन संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे?

प्रत्येकाची पातळी वेगळी. त्याचे मोजमाप करून काहीही हाती लागणार नाही. मिपा हे जरी मुक्त संस्थळ आहे तरीही सगळ्यांची पातळी सुधरवण्याची जबाबदारी मिपावर येते असे मला वाटत नाही. हा मुद्दा कितीही म्हटले तरी वैयक्तीकच राहतो. वाचनमात्र राहून, अगोदरचे इतरांचे लेखन वाचून आपण लिहिलेले त्याच्या[पातळी]शी ताडून बघीतले तर आपले लेखन प्रसिद्ध करण्याचे प्रमाण बरेच कमी होईल. कोणाला काय आवडेल हा जरी अवघड प्रश्न असला तरीही सर्वसाधारणपणे असे मान्य व्हायला हरकत नसावी.

- एका लेखकाकडून येणार्‍या लेखनाची वारंवारिता काय असावी?
तसा नियम असेल असे वाटत नाही. पण साधारणपणे २ आठवड्यांचे अंतर घेऊन लिहिले तर लिखाणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल असे वाटते. अर्थात्‌ काही तत्कालीन बाबतीत [सध्याचा एखादा ज्वलंत मुद्दा, महत्त्वाची बातमी वगैरे.] हे शक्य नाही हे मान्य आहे.

- एक लेख किती लांबीचा असावा? लेखन भागांमध्ये असले तर दोन भागांमध्ये किती दिवसांचे/वेळेचे अंतर असावे? मोठ्या लेखाचे किंवा साहित्याचे जास्तीत जास्त किती भाग असावेत? आणि

कुणीतरी म्हटले आहे - Simplicity is the most Complex thing to achieve.

सहजसोप्या भाषेत, कुणालाही दुखवण्याचा अभिनिवेश न आणता, कमीत-कमी शब्दांत लिहिणे आले पाहिजे. जे आपणांस लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे ते तस्सेच पोहोचले पाहिजे. जर तसे होत नसेल तर स्वत:साठी लिहिलेले लेखन स्वत:जवळच ठेवावे, संस्थळावर लिहून उपयोगच काय?

- न आवडलेल्या साहित्यास प्रतिक्रिया देताना काही वेगळी विशेष काळजी घेण्याची गरज आहे का?

मला वाटते संयुक्तीक, अभिनिवेशाविना प्रतिक्रिया देणे शक्य असेल तर जरूर द्यावी. चाबकाने मारण्यासारख्या प्रतिक्रिया देण्याची गरज अपवादात्मक असावी.

राघव