हल्ली आंब्याच्या रसाचे डबे सहज उपलब्ध असतात. त्यामुळे हे पक्वान्न केव्हाही करता येते. आंब्याच्या रसाच्या रंगामुळे अतिशय सुरेख दिसते व चवही उत्तम लागते. फक्त वाफवून करायचे आहे, त्यामुळे तब्येतीस चांगले व पौष्टीकही आहेच! सीझन मधे आंबे मिळतात, तेव्हा त्यांचा ताजा, हापूस आंब्याचा रस वापरला तरी चालतो.
साहित्यः
२ वाट्या तांदळाचा रवा किंवा साधा रवा
२ वाट्या साखर
२ वाट्या हापूस आंब्याचा रस
१/२ वाटी दूध जरूरी नुसार
२ टी.स्पून लोणी
ताटाला लावण्यास साजूक तूप
१.प्रथम तांदळाचा रवा भाजून घ्यावा. तो जरा गार झाला कि पाण्याने धुवून पाणी पुर्ण निथळून द्यावे व तसाच अर्धा तास ठेवावा.
२.आता त्यात आंब्याचा रस, साखर, लोणी,मीठ घालून हाताने चांगले कालवावे. हे मिश्रण जरा सैलसर असावे, त्यासाठी जरूर वाटली तर दुध घालून ढवळावे. व तासभर तसेच ठेवावे.
३.तूप लावलेल्या ताटात मिश्रण ओतून ढोकळ्याप्रमाणे सांदणे उकडावीत.
४.गार झाल्यावर वड्या कापाव्यात.
टीपः आंब्याच्या रसाऐवजी फणसाचे गरे किंवा जून काकडी किसुन रस काढून घ्यावी किंवा गाजर किस घालूनही सांदणं चांगली होतात.
थोडे दुध घालून बारीक वाटून घ्यावे बाकि प्रमाण, कृती सारखीच.
प्रतिक्रिया
19 May 2008 - 6:20 pm | विसोबा खेचर
बाई गं मिपाच्या अन्नपूर्णे,
वा! आंब्याच्या सांदणाची पाकृ! मिपाचे रसोईघर आज तृप्त झाले, धन्य झाले! :)
आंब्याच्या सांदणाबद्दल मी काय लिहू? माझ्या मते ही अत्यंत शुभ, अत्यंत मंगलदायी अशी पाकृ आहे!
आम्ही कोकणात बहुत करून बरक्या फणसाची सांदणं करतो, तीही फारच सुरेख लागतात!
असो, सांदणं आंब्याची असोत वा बरक्या फणसाची असोत,
माझ्या मते 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते....' या यादीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यात सांदणांचा क्रमांक निश्चितच खूप वरचा लागतो!
तात्या.
19 May 2008 - 6:24 pm | स्वाती दिनेश
आंब्याची,फणसाची दोन्ही सांदणे मला फार आवडतात.. डब्यातल्या आंब्या,फणसाची सांदणे करायचे डोक्यातच आले नाही (तशी कधी गरज पडत नाही तिथे हे ही तितकेच खरे,:)) पण आता करून पाहिन ,:)
19 May 2008 - 6:27 pm | स्वाती राजेश
धन्यवाद!!!
काल गेट टुगेदर होते,त्यात मी केले होते, सगळ्यांना खूप आवडले...
एका ब्रिटीश बाईने माझ्याकडून रेसिपी घेतली......:)
19 May 2008 - 6:29 pm | स्वाती दिनेश
अग ,फोटू का नाही काढलास?तेवढेच नयन सुख!
19 May 2008 - 6:31 pm | विसोबा खेचर
एका ब्रिटीश बाईने माझ्याकडून रेसिपी घेतली......
वा वा! आमच्या कोकणची पाकृ गोर्या सायबिणीपर्यंत पोहोचली म्हणायची! :)
धन्यवाद स्वातीताई!
झंडा उंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा...! :)
आपला,
(आनंदीत!) तात्या.
19 May 2008 - 6:31 pm | यशोधरा
सांदणं...... आई गं...... अश्या सुंदर पाककृती टाकायच्या आणि मग मी बसते इथे =P~ आणि :(
का बरं असा छळवाद??? का? का?? का??? ~X(
19 May 2008 - 6:38 pm | राजे (not verified)
निषेध !!!!
पाक-क्रिया लिहणा-या सर्व मिपा सदस्यांचा निषेध !!!!
अहो असले काहीतरी लिहता व आमच्या जिवाची तळमळ होते... तुम्हाला काय माहीत आहे बहादुरच्या हातचे तेच तेच खाणे खाऊ विटलो आहे... जरा बाहेर हॉटेलमध्ये खावे तर दिल्ली मध्ये सगळ्याच पदार्थामध्ये पनीर असे भरलेले असते की असे वाटते हॉटेलला आग लावावी !
मस्त रेसेपी आहे ... पण चहा पावडर व साखर (चव बधून) ह्या अतीरिक्त मला स्वयंपाक घरातील काही कळत नाही ह्याचे आज खुप दुखः वाटत आहे !
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
19 May 2008 - 6:40 pm | यशोधरा
हो, हो, एकदम त्रिवारच निषेध!! :D
बंगलोरला तर हापूस मिळत पण नाही!! :(
19 May 2008 - 9:34 pm | वरदा
माझ्याकडे एक टीन उरलाय आमरसाचा करेन हे नक्की..मी आज्जीकडून ऐकायची नेहेमी पण कधी खाऊन नाही पाहिली कशी लागतात...