डोक्यात नेहमीप्रमाणेच गोंधळ झालाय.
पूर्वीची वर्णाश्रम पद्धती म्हणे आपण मोडीत काढलीये.
वर्ण - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आता नाहीत.
आश्रम - ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास हे देखील मोडीत.
ज्यावेळी ही पद्धत अस्तित्वात आली तेव्हा इतर पंथ अथवा प्रार्थना पद्धती नव्हत्या अथवा त्यांना तशी नावे नव्हती. इस्लाम, ख्रिस्ती इ.इ. वेगळे म्हणवणारे आणि बौद्ध, जैन इ. बंडखोर धर्म तेव्हा नव्हतेच.
(मी धर्म म्हणत नाहीये कारण धर्म म्हणजे माझ्यामते वस्तूचा स्वभाव असतो. अग्निचा उष्णता हा धर्म, बर्फाचा थंडपणा हा धर्म इ.इ.)
त्यामुळे सगळ्यांनाच या वर्णाश्रम पद्धतीचे जाणते अजाणतेपणी अनुकरण करणारे म्हणून अनुयायी म्हणायला प्रथमदर्शनी तरी प्रत्यवाय नसावा.
माझ्या माहितीप्रमाणे
ब्राह्मण म्हणजे यजन, याजन - यज्ञ करणारा आणि करवून घेणारा, अध्ययन अध्यापन करणारा, दान देणारा (ज्ञानदान, यज्ञदान, औषधांबद्दलचे ज्ञान वापरुन जीवनदान करणारा इ.) आणि घेणारा असा असणे अपेक्षित होते.
क्षत्रिय म्हणजे समाज व्यवस्था नीट चालावी म्हणून असणारा विश्वस्त अधिकारी, समाज रक्षण करणे, व्यवस्था नीट सांभाळणे इ. त्याची कामे.
वैश्य म्हणजे व्यापार करणारे, विविध प्रकारचे उद्योग धंदे करणारे आणि आपल्या साहित्य, मालमत्ता यांच्या रक्षणासाठी त्यातील नफ्याचा काही भाग कराद्वारे राजसत्तेला देणारे.
शूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.
जर ही व्यवस्था मोडीत निघाली असे आपण म्हणत असू तर आज चालू असलेली व्यवस्था ( भारताबाबत बर्याच प्रमाणात अव्यवस्था) कशी सुरु आहे?
अध्ययन अध्यापनाच्या क्षेत्रात काम करणारे शिक्षक, प्रोफेसर, डॉक्टर, इंजिनिअर इ.इ. आपल्या ज्ञानाचाही वापर करत असतात. दान करत असतातच. शास्त्रज्ञ अभ्यास करत असतात, संशोधन करत असतात.ते ब्राह्मण म्हणावेत का?
महार बटालियन म्हणवणारी सैनिकांची तुकडी क्षत्रिय नाहीतर आणखी काय? बरेच सरकारी, खाजगी क्षेत्रात काम करणारे नोकरशहा /व्यवस्थापक समाज व्यवस्था नीट चालावी म्हणून कार्यरत असतात. ते ही क्षत्रियच ना?
उद्योगधंदा करणारा 'कोणीही' वैश्य म्हणून म्हणायला काय हरकत आहे? त्यांच्या पैशावर राजसत्ता चालते हे खरे आहेच की!
या सगळ्यांना सेवा पुरवणार्या विविध संस्था शूद्र म्हणवाव्यात का? ( शूद्र आणि क्षुद्र या श ब्दातील साम्य चीड आणते खरे पण ते पूर्ण वेगवेगळे शब्द आहेत)
आपल्या समाजामध्ये अजूनही बव्हंशी जन्मावरुनच त्याचा वर्ण ठरवला जातो. (जरी त्या त्या वर्णातील गुणसंपदा माझ्याकडे नसेल तरी )
समजा मी जर जन्माने वैश्य वर्णात मोडणार्या जातीमध्ये जन्माला आलो असेन आणि मला सेवा उद्योगामध्ये काम मिळालेले असेल तर मी स्वतःला वैश्य म्हणवून घेण्यात काय हशील आहे? याउलट एखादा शूद्र म्हणवणार्या कुटुंबात जन्माला येऊन संशोधनाचे काम करत असेल तर त्याला शूद्रच म्हणायचे का? भगवदगीता देखील 'गुणकर्म विभागशः' म्हणते पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही.
प्रश्न असा पडलाय की मी नक्की कोण आहे?
आपण नक्की कोण आहोत?
जर जन्मकुल आणि गुणसंपदा यामध्ये विसंगती आढळत असेल तर मी ज्या कुळात जन्मलो त्याचा अभिमान, वैषम्य का बाळगावे? काय सांगता येईल?
प्रतिक्रिया
24 May 2011 - 12:04 pm | गवि
विचार चांगला. पण भलतेच वळण घेऊन तिसरीकडेच जाण्याचे जबरदस्त पोटेन्शिअल असलेला.
24 May 2011 - 12:27 pm | अन्या दातार
>>भगवदगीता देखील 'गुणकर्म विभागशः' म्हणते पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही.
तसे दिसत नाही कारण त्याचे इंप्लिमेंटेशन चुकिचे झालंय. तुमचे मुद्दे एकदम मान्य आहेत. पण इंप्लिमेंटेशन च्या दृष्टीने किचकट आहे म्हणून सरकारने जन्माधारित जात व्यवस्था केली.
24 May 2011 - 12:28 pm | रणजित चितळे
हे कामावरुन ठरवण्यात आलेले वर्ण कोठल्याही समाजव्यवस्थेत असतातच व आढळतात. त्याला नावे वेगळी दिली जातात, कोणता समाज न मानता वर्ण स्विकारतात. वर्ण जो पर्यन्त कर्मबंधन आहे तो पर्यन्त असणार.
एका वर्णाला वाटणे की तोच श्रेष्ठ व बाकीचे कनिष्ठ व तसे दुस-याला वागवणे हे चूक आहे. ही मानसिकता जायला हवी. ते खरे शिक्षण म्हणायचे. समाज धारणे साठी सारे वर्ण तेवढेच महत्वाचे आहेत. पण जेव्हा ब्राह्मणांना वाटायला लागले की तेच महत्वाचे व इतर गौण तेव्हा मग राम जन्माला येऊन रावणरुपी मानसिकतेला (दशग्रंथी ब्राह्मण) धडा शिकवायला लागला. क्षत्रियांना जेव्हा वाटायला लागले की तेच कायते त्राते आहेत तेव्हा परशुरामास जन्म घ्यावा लागला. हे चक्र चालूच राहणार.
सुज्ञपणा ह्यातच आहे की एक दुस-याच्या कामाचा आदर करणे. गौरव करणे.
24 May 2011 - 12:41 pm | नगरीनिरंजन
चांगला प्रतिसाद. आदर्श स्थितीत असं व्हायला पहिजे खरं पण वास्तवात ज्यांचा फायदा आहे असे लोक मग जन्माधारित वर्णव्यवस्थेलाच बळ देतात.
24 May 2011 - 1:18 pm | रणजित चितळे
आपल्याला धन्यवाद
24 May 2011 - 11:55 pm | हुप्प्या
सगळे व्यवसाय चांगले आणि उपयुक्त आहेत. त्यात नीच कनिष्ठ असा भेदभाव करु नये वगैरे म्हणणे सोपे आहे. पण काही उदाहरणे बघा. जरा टोकाची वाटतील पण मुद्दा स्पष्ट होईल.
सार्वजनिक स्वच्छतागृहाची सफाई करणारा आणि डॉक्टर ह्यांची बरोबरी होऊ शकेल का?
आपले काम कितीही चोख, प्रामाणिकपणे, प्रभावी पद्धतीने करणारा असला तरी एक सामान्य डॉक्टरसुद्धा त्याला आपल्या तोडीचा मानेल का? समाज तसे मानेल का? आपल्या शेजारच्या फ्लॅटमधे एक सार्वजनिक स्वच्छतागृहाचा सफाई कर्मचारी रहातो हे त्या डॉक्टरला आवडेल का? मला वाटत नाही.
(सरकारने नेमलेले) कचरा गोळा करून कचरा डेपोत नेणारे लोक, गुरांच्या प्रेतांची विल्हेवाट लावणारे लोक, खाटिक हे कधी तरी गावचा पाटील, मोठ्या देवळाचा पुरोहित, सिनेमाचा दिग्दर्शक, गायक, संगीतकार, बँकेचा उच्च अधिकारी, प्राध्यापक, राजकारणी नेते ह्यांच्या बरोबरीचे समजले जातील का?
समाजाला हे सगळे लोक लागतात. पण ह्यात उच्च नीच असा भेदभाव आहेच. काही कामेच अशी आहेत की कितीही तत्त्वज्ञानाचा मुलामा दिला तरी ती नीचच समजली जातील. अगदी जगभर.
मुलाचे हित चिंतणार्या पालकाला आपला मुलगा मोठा होऊन सफाई कर्मचारी बनावा असे कधीही वाटणार नाही. दुसरे काही जमत नसणारे लोकच असल्या व्यवसायात शिरतील.
अर्थातच संपन्न घरातील पालक आपल्या मुलाला "वरच्या" थरातील नोकरीधंदा शोधण्याचा प्रयत्न करतील. गरीब घरातील मुलाला "निम्न" थरातील व्यवसाय करावा लागण्याची शक्यता जास्त.
पण तुझा बाप अमक्या कामात होता म्हणून तूही तेच कर हे जे जातिव्यवस्थेत अभिप्रेत आहे त्याने "निम्न" थरातील माणूस कधीही वर येणार नाही. म्हणून ते वाईट आहे.
24 May 2011 - 2:09 pm | पिलीयन रायडर
तुम्हाला काय वाट्त ह्या पेक्षा लोक तुम्हाला कसे बघतात हे जास्त महत्वाच झालय...
मी जाती व्यवस्थेला मानत नव्हते. मला ना माझ्या जातीचा गर्व होता, ना माज... ना दुसर्या जाती मला दुय्यम वाट्त होत्या...
पण जेव्हा मला मरमर अभ्यास करुन.. चान्गले मार्क पाडुनही government college ला प्रवेश मिळाला नाही... आणि खूप कमी मार्क असणार्या दुसर्या व्यक्तीला मिळाला, तेव्हा मला कळाल की मी माझी जात मानली काय आणि न मानली काय... समाज मला माझ्या जातीनी ओलखतो, गुणवत्तेनी नाही....
24 May 2011 - 5:19 pm | आत्मशून्य
अत्यंत चूकीची संकल्पना. या जगात सर्वगोश्टी परफेक्ट नाहीतच. कधीना कधी आपल्याला बरेचदा अन्याय झाल्याची भावना विवीध प्रसंगातून नीर्माण होतच असते. प्रवेश न मीळणे ही काही एकमेव अन्यायकारक वाटणारी गोश्ट न्हवे. पण आरक्षणा सारखा वीषय जातीयवादाशी जोडू नये. हे राजकारणी लोकांच यश आहे. ह्या पासून आपल्यासारख्या सामान्यानी सावधच राहणे चांगले.
थोड अवांतर होतय पण कदाचीत हे बोलणं आवश्यक आहे. असं समजा जगमधे १० लोक आहेत. त्यातील २ जणांना पीढ्यानपीढ्या बौधीक श्रम घडल्याने यांचा मेंदू उरलेल्या ८ जणांपेक्षा सूपीक आहेच. आता काळ बदलला व अर्थाजनाच्या संधीही. ज्या बरेचदा केवळ बौध्दीक कश्टांवर अवलंबून आहेत (बूध्दीवादी करीयर, अथवा शीकून नोकरी मीळणे होय). मग आता मला सांगा की हे जे उरलेले ८ लोक आहेत जे पीढ्यांपीढ्यां केवळ शारीरीक कश्ट करूनच अर्थाजन करत राहीले त्यांना बूध्दीवादी करीयर करणे तूलनेने सोपं पडेल काय ? नक्कीच नाही मूळात केवळ बूध्दी वापरून आयूष्यभर पैसा कमवता येतो ही संकंल्पनाच जीथे पटणार नाही व शीकून काय करायचे अशी वीचारसरणी बनेल(हिच विचारसरणी स्त्रीयांबाबतही लागू झाली होती व दूर्दैवाने काही ठीकाणी अजूनही आहे, म्हणून त्यांनाही विवीध आरक्षणे दीली जात आहेत) त्यां लोकाना पूढे कसे आणनार ? यांना समान संधी कशी मीळणार ? मग आता सांगा बरे केवळ बौध्दीक गूणवत्ता आहे म्हणून तूम्ही समाजाचा तोल राखू शकणार आहात काय ? होय खरा प्रश्न नीट समजावून घ्या. खरा प्रश्न हा सामाजीक समतोल राखणे वा अनागोंदी टाळणे हाच आहे.. कारण हे जग थोड कठोर आहे....... आताच्या शीक्षण पध्दतीनूसार जर १० पैकी केवळ २ लोकच (वा त्यांच्या पिढ्या) सतत पूढे जात राहीले तर उरलेले ८ लोक आज ना उद्या या २ लोकांवर चक्क शारीरीक हल्ले करायला सूरूवात करतील.. यांच्या जीवाला धोका नीर्माण होइल. कारण हे कीती दीवस हे सहन केले जाइल की केवळ बूध्दी जास्त आहे म्हणून यांना चांगल्या नोकर्या मीळतात पैसा मीळतो ? आणी नेमकं यानेच सामाजीक समतोल ढासळेल. मग यावर उपाय एकच ते म्हणजे या उरलेल्या आठ पैकी ३ जणांना सवलत देऊन या हूशार २ जणांसोबत आणने ज्यामूळे यां लोकानासूध्दा बूध्दीवादी जीवनाची सवय जडेल, फायदे कळतील व ते बघून शीक्षणाचा अशाच इतर लोकांमधे प्रसार व्हायला मदत होइल, व महत्वाचे म्हणजे समाजीक असमतोल, अनागोंदीं माजण्याची भीती कमी होइल. शेवटी नक्षलवाद का जन्मला हे आपल्या समोर आहेच , म्हणून म्हणतो बघा काय बोललो ते पटतय का ? आरक्षण जातीशी संबंधीत आहेच पण त्याला जातीयवादाचे स्वरूप हे राजकरण्यांमूळे मीळाले आहे... तेव्हा थोडा सावध विचार हवा अशा ठीकाणी....... हे खरय की गूणवत्ता असून सूध्दा प्रवेश नाही मीळाला पण त्यामागचे रामायण बरेच गंभीर आहे. याचा वापर जाती मधे तेढ, नाराजी पसरण्यासाठी खरच होऊ नये. कारण याचा फायदा फक्त राजकारणी लोक सतत घेत राहतील. बाकी इतर काही साध्य त्यातून उपलब्ध नाही.
25 May 2011 - 3:47 pm | पिलीयन रायडर
किती दिवस आरक्षण देणार आहात? जेव्हा त्या २ लोकंची हळुहळु संधी हिरवल्या जाइल तेव्हा तेही पेटुन उठणारच..
अजुन एक... कुबड्या देउन एखाद्याला चालायला शिकवता येत नसतं... तो चालावा असं व।टत असेल तर आधी त्याचा हात सोडा...
६०+ वर्ष... अजुन किती??
जातीय राजकारण तर नकोच आहे हो.. पण संधी मात्र जात बघुन मिळ्ते.. एकीकडे तुम्ही आरक्षणाला बरोबर म्हणता.. एकी कडे जातीय राजकारणाला विरोध करता.. सगळच कस होइल हो...
इतरांच माहीत नाही, पण ब्राह्मण समाज मात्र तावुन सुलाखुन निघेल असच वाट्त.. मदत तर नाहीच पण जर प्रत्येक संधी साठी जास्त कष्ट घ्यावे लागणार असतील तर आपोआप गुणवत्ता व।ढणारच न?
25 May 2011 - 5:51 pm | आत्मशून्य
हो हे साध्य होऊ शकत जर समाजाचा व्यापक विचार केलात तर. आणी आरक्षणाची गरज का आहे याचा विचार जाती बाहेरच्या चश्म्यातून केला तर. बघा विचार करा, केवळ स्त्री आहे म्हणून सूध्दा आरक्षण मिळतं पण त्याबाबत जातीधारीत आरक्षणासारखी ओरड होत नसते, तेढ वा द्वेष नसतो. एकूणच सामाजाचा समतोल साधणे हा मूद्दा आपण लक्षात घेतला नाही हेच खरे. बाकी स्त्रीयांच्या आरक्षणाला आपण विरोध कराल काय ?
एकदम बरोबर बोललात. आणी या २ लोकांच्या उठावाला बळ यावं यासाठीच उरलेल्या ८ मधील ३ जणांना या २ लोकांप्रमाणे बनण्याची संधी सवलतीत दीली जाते. ज्यामूळे वैचारीक देवाण घेवाण व इतर गोश्टीमधील (सम्रूध्दता वगैरे) बाबतीत तफावत दूर व्हायला मदत होते. आणी ही दरी मिटणे समाजाचा व्यापक विचार करता समतोल साधण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण राजकारणी लोकांच्या आरक्षणा बाजूने वा विरोधी प्रचाराला बळी पडून आपण तेढ मात्र वाढवत आहोत आणी आरक्षणाची खरी गरज काय होती/ आहे याचा मोकळेपणाने विचार करण्याची कूवतच गमावून बसत आहोत.
सोपयं आरक्षण वापरून अथवा न वापरून प्रवेश घेतलेल्यांच्या गूणामधील तफावत अत्यंत जूजबी असेल तेव्हां याची गरज उरणार नाही. याला किती वर्षे लागतील यासाठी इतीहास , मानसशास्त्र, अर्थशास्त्र व जेनेटीक मधे तज्ञ असलेली व्यक्ती गाठा ती थोड फार मार्गदर्शन करेल. तूम्ही आणी मि हे ठरवायला अपात्र आहोत. थोडा विचार करा आज तूम्ही अथवा मी आर्थीक द्रुश्ट्या जीतके सूखी आणी संपन्न असू तीतकी संपन्नता समाजातील ५०% लोकांकडे तरी आहे काय ? मग कशाला ओरड करायची आपण ? आपण तूलनेने खरच सूखी नाही का ? भलेही जग परफेक्ट नसेल ?
24 May 2011 - 2:21 pm | नर्मदेतला गोटा
आपण नक्की ब्राह्मण हे नक्की
24 May 2011 - 2:29 pm | नर्मदेतला गोटा
म्हणजे आपण शूद् नसणार
म्हणजे ब्राह्मण
24 May 2011 - 2:58 pm | प्यारे१
कोण कोणास म्हणाले? काय लिहिले आहे काही कळेल का?
24 May 2011 - 4:27 pm | नाना बेरके
कोणाच्या दृष्टीने ? हे महत्वाचे.
म्हणजे वर्णभेदाच्या चष्म्यातून तुम्हाला स्वतःची वर्गवारी कुठे करावी असा प्रश्न पडला असेल तर माझ्या मते असा विचार करणे देखील चुकीचे आहे कारण तो कालबाह्य आहे. कर्माने तुम्ही मोठे असाल तर जातीने कुठलेही असा फरक पडत नाही.
जातपात न मानणार्या आपल्या सरकारच्या दृष्टीने जातीनिहाय वर्गवारी असणे महत्वाचे आहे.
24 May 2011 - 4:49 pm | प्यारे१
कालबाह्य??
कसे ते कळेल काय नाना? सरकारी आरक्षणे आणि त्या अनुषंगाने येणार्या गोष्टी तर सोडूनच द्या.
सामाजिक म्हणून जरी बघितले तरी हल्ली काय चालू आहे?
अधिक प्रखरतेने जातीविहाय ध्रुवीकरणे सुरु असताना दिसतात. संभाजी ब्रिगेड, महासंघ हे फार वरवरचे आणि आक्रमक असल्याने उदाहरण आहे ते सगळ्यांना स्पष्ट्पणे जाणवते. अगदी subtly बाकी सगळीकडे गोष्टी सुरु आहेत. उदाहरणे द्यायची झाल्यास ब्राह्मण महासभा, त्यातही चित्पावन, देशस्थ, कर्हाडे अशा पोटजातीचे वेगवेगळे कार्यक्रम होतात, श्रेष्ठ कनिष्ठ असे वाद इथेही प्रकर्षाने दिसतातच की.
कर्माने मोठे झालेले सगळे संत महापुरुष आज कुठल्या ना कुठल्या समाजाच्या वळचणीखाली बांधले गेल्याचे जाणवते.
न्हावी समाज सेना महाराज जयंती, मराठा आणि बहुजन तुकाराम बीज, शिंपी नामदेव पुण्यतिथी अशा वेगवेगळ्या समाजांतर्फे कार्यक्रम साजरे होतात.
मराठा समाज शिवाजी महाराज, ब्राह्मण -समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर, कुंभार- गोरा कुंभार, महार -चोखामेळा, माळी- सावता माळी आणि फुले, नवबौद्ध- बुद्ध आणि आंबेडकर आणि किती उदाहरणे देऊ?
कुठला महापुरुष संत जातीच्या नावाव्र मोठा झाला? पण आजचे चित्र काय दिसते आहे?
मुस्लिमांमध्ये सुद्धा बागवान, इनामदार वेगळे, शेख, काशिद वेगळे
डोके अधिकच भंजाळते.
24 May 2011 - 5:16 pm | Nile
नविन वर्णव्यवस्था हवीए कशाला? कुणालातरी ब्राह्मण, क्षत्रिय इ. म्हणलेच पाहिजे का? काहीही म्हणू नका. माणूस म्हणा, इतर भारतीय, मराठी वगैरे विशेषणं आहेत तीच खुप आहेत.
शास्त्रज्ञ म्हणा, इतर हवंय कशाला?
तुम्ही कोण तर तुम्ही माणूस. तिथून पुढे, लेखक, कलाकाश, शास्त्रज्ञ वगैरे. ही वर्णवस्था चांगली रुळलीए, जुन्या व्यवस्थेतील संज्ञांचा मोह सोडला पाहिजे.
24 May 2011 - 6:44 pm | आत्मशून्य
भूतकाळ साहेब भूतकाळ (ज्ञात आणी अज्ञात कालखंडाचा भूतकाळ) आड येतो. म्हणजे अस आहे की आपण आज जात मानत नाही म्हणतो पण... आता अशी कल्पना करा की मी एक धार्मीक, भक्तीमार्गी, श्रध्दाळू मनूष्य आहे. मला काही धार्मीक ग्रंथ वाचयची सवय आहे.. मग तीथे कथाच अशा असतात.. आटपाट नगर होतं तीथे एक गरीब ब्राम्हण/कूंभार/क्षत्रीय/न्हावी/माळी/(अथवा इतर जातोल्लेख असलेली व्यक्ती) रहात होता...... आता मी म्हणतो की तूम्ही जात-पात खरच मनापासून मानत नाही आहात. यातील फोलपणा तूम्हाला खरच पटलाय का ? मग हे जातीचे ऊल्लेख तूम्ही धार्मीक साहीत्यातून वगळाल काय ? यापूढे कोणतही धार्मीक साहीत्य छापलं जाइल तीथे केवळ आटपाट नगर होतं तीथे एक xy देवाचा भक्त रहात होता तो परीस्थीतीने फार गरीब होता... वगैरे वगैरे.... एव्हडच छापायच.... ही गोश्ट जमली तर तूम्ही जात व्यवस्था खरीखूरी नाकारली असं म्हणता येइल. कारण याला मूळावर घाव घालणे म्हणतात. जीथ गोश्ट सूरू झाली तीथच ती समूळ उपटली की पूढे फोफावणारच नाही. आणी जर इथच जातीचे ऊल्लेख टाळायला सूरूवात झाली तर मला वाटत नाही घडलेल्या अथवा येणार्या इतीहासात वर्चस्व कोणाचे ही असो.. ती गोश्ट व जातोल्लेख कधी वीशीश्ट जातीचा अभीमान/तीटकारा म्हणून वापरली जाइल. कारण जात ही तूमच्या कर्तूत्व वा व्यवसायाची नीशाणी कधीच नसेल.
आज जातीयवाद आर्थीक , राजकीय , सामाजीक, धार्मीक (परीणामी हींदू मानसीकते मधे उरलेला) स्वरूपात अस्तीत्वात आहे.
१) आर्थीक व राजकीय जोखडातून मूक्तता करायला विकास हाच एकमेव मंत्र आहे. त्याला पर्याय नाही. २) समाजीक वीचार केला तर महाराश्ट्राततरी तो तीतका प्रभावीपणे अस्तीत्वात नाही.
३) आणी धार्मीक म्हणाल तर तो अजून संपलाच नाहीये. केवळ सर्वठीकाणी प्रवेश मीळाला म्हणजे धार्मीक (परीणामी हींदू मानसीकते मधे उरलेला)जातीयवाद संपला असं म्हणताच येत नाही. कारण तो जीथे सूरू झाला तीथे नाकारला/वगळला गेला आहे काय ? म्हणजेच धार्मीक साहीत्यातून वगळला आहे काय ? आणी तो वगळणे म्हणजे हींदू धर्म बूडवणे न्हवे , कारण शेवटी असं आहे की... वर्णव्यवस्था हे काही मोक्ष प्राप्तीचे साधन न्हवे.
28 May 2011 - 6:22 am | गोगोल
प्रतिसाद.
24 May 2011 - 8:09 pm | तिमा
जाती, धर्म, ब्राह्मण, वर्ण इत्यादि चर्चा वाचून वीट आला आहे. भूतकाळ गाडून टाका आणि प्रत्येक व्यक्तिकडे फक्त माणूस म्हणून बघा.
24 May 2011 - 8:19 pm | नितिन थत्ते
१. भारतीय समाजात वर्ण नावाचं काहीही कधीही नव्हतं. होत्या त्या जातीच. जातींचं वर्गीकरण करण्यासाठी सांगितलेली काल्पनिक स्पष्टीकरणे म्हणजे वर्ण.
२. गुणकर्मानुसार वर्ण ही व्यवस्था ही इम्प्रॅक्टिकल असल्याने ती समाजात कधी अस्तित्वात असण्याची शक्यता नाही. गीतेमध्ये गुणकर्मानुसारी वर्ण असा जो उल्लेख आहे ते गुणकर्म सध्याच्या जन्मातले नसून मागच्या जन्मातले आहे. हे गीतेच्या सर्व भाष्यकारांनी मान्य केले आहे आणि त्याची पुष्कळ उदाहरणे स्मृतीग्रंथ आणि इतर धार्मिक वाङ्मयात आहेत. म्हणजे या जन्मातले गुणकर्म पाहून पुढच्या जन्मातला वर्ण ठरतो असा क्लेम आहे. किंवा दुसर्या शब्दात या जन्मीचा वर्ण पाहून मागच्या जन्मी चांगले/वाईट कर्म केले असल्याचा 'निष्कर्ष' काढायचा असतो. आणखी दुसर्या शब्दात सांगायचे तर ज्यांच्याकडे संपत्ती/समृद्धीआहे ते त्यांच्या मागच्या जन्मातील कर्मामुळे ती संपत्ती असण्याचे अधिकारी आहेत. (आणि याच्या उलट) असे विषमतेचे जस्टिफिकेशन आहे.
३. शिक्षण देतो/ज्ञानदान करतो तो ब्राह्मण आणि सेवा करतो तो शूद्र ही व्याख्यासुद्धा भोंगळ आहे. चांभार आपल्या मुलांना चांभारकाम शिकवतो तेव्हा तोही अध्यापन करत असतो. ब्राह्मण पौरोहित्य करतो तेव्हा यजमानाची सेवा करतो. परंतु त्या चांभाराला ब्राह्मणाचा दर्जा आणि पुरोहिताला शूद्राचा दर्जा दिला जाई का?
हा प्रतिसाद केवळ "कोणे एके काळी वर्ण गुणानुसार ठरत" आणि "थिअरी बरोबर आहे पण इम्प्लिमेंटेशन चुकले" अश्या प्रकारचे प्रतिसाद वर दिसले म्हणून दिला आहे.
बाकी चालू द्या.
24 May 2011 - 10:10 pm | अप्पा जोगळेकर
असेच म्हणतो. मागच्या जन्मामध्ये केलेल्या कर्मांनुसार या जन्मामध्ये इष्ट तो जन्म मिळतो असे म्हणणे म्हणजे पीडितांनी, गरीबांनी, अन्यायग्रस्त माणसांनी कायम पिडलेलेच राहावे, अन्यायग्रस्तच राहावे यासाठी केलेली सोय म्हणजे गुणकर्मानुसार वर्णाश्रम असे म्हणायला हरकत नाही.
त्यामुळे निदान आजच्या काळात तरी अशा व्यवस्थेचे थोडेही समर्थन करणे हास्यास्पद वाटते.
24 May 2011 - 9:11 pm | नर्मदेतला गोटा
जातीपातींचा फार बारीक विचार करता आपण
सगळीकडे जात दिसते तुमाला
पण लिहिणे मुद्देसूद नाही
शूद्र आणि क्षुद हे लिहिण्याची गरज होती का
हे ब्राह्मण स्वतःला काय समजतात काय माहित ?
24 May 2011 - 10:11 pm | अप्पा जोगळेकर
हे ब्राह्मण स्वतःला काय समजतात काय माहित ?
तर काय. नर्मदेतले गोटे आहेत सगळे एकजात.
24 May 2011 - 9:10 pm | नर्मदेतला गोटा
सेवा उद्योगामध्ये काम मिळालेले असेल तर मी स्वतःला वैश्य म्हणवून घेण्यात काय हशील आहे?
किती चूकीचे लिहिताहात
25 May 2011 - 2:15 am | अत्रुप्त आत्मा
आपण ग्रुहित धरलेली चातुर्वण्य व्यवस्थेची कल्पना तत्वतः बरोबर आहे.पण त्यामागे वैदिक धर्म व्यवस्थेला अभिप्रेत असणारा व्यवहार धर्म मात्र वेगळा आहे.प्रत्येक वर्णाला घालुन दिलेला व्यवहार,हा आपण आज ग्रुहित धरतो तसा (आधुनिक स्वरुपाचा) नाही.तो धर्माला मान्यच नाहि.एखादा क्षत्रीय राजा स्वतःच्या प्रजेला जुलुम अत्याचारानी वागवीत असला,तरी त्याच्या तसल्या प्रकारच्या सर्व व्यवहाराला समाज नियमनाचं अधिष्ठान धर्माच्या सारणीतुन घालुन देणं,हे खर ब्राम्हण वर्णाचं काम आहे.मनुस्म्रुतीतील दास्य,गुलामगिरीला चढवलेला धर्माचा मखमली मुलामा आपण नीट न्याहाळला तर आपल्याला हे कळु शकत.वैश्य म्हणजे व्यापारी ईतकच ग्रुहित नसुन विशेषतः सगळे जमिनदार,भांडवलदार यात अंतर्भुत आहेत.त्यांनी त्यांच्या मनानुसार केलेला सगळा व्यवहारही,मग तो कसाही असो आपण त्याविरुध्द बोलता कामा नये.कारण तो पवित्र धर्मानी मान्य केलेला समाजधर्म आहे(कारण तो राजाच्या फयद्याचा आहे)अता या तिघांचं हे ईतकं भलमोठ्ठं भलं होण्यासाठी,ज्यांनी विनाअट/विनातक्रार राबायच आहे,ते सर्व यांच्या अंगाखाली (सर्वांगानी) भरडले/चिरडले जाणारे सर्वसामान्य 'जन',म्हणजेच जनता,ही शुद्र आहे.वर्णाश्रम धर्माचं मुलभुत स्वरुप हे असं आहे.आता आजच्या काळातही आपण हे सर्व सहन करतो,वेळ पडली आणि जमलं तर त्याविरुध्द बंडही करतो.पण बिनबोभाट मान्य करत नाही,कारण आपल्या पाठिशी लोकशाहि आहे.पण प्राचिन भारतात हे सर्व सहज मान्य व्हावं,म्हणुन तर धर्माचा आधार घेतला गेला...आणि म्हणुनच गीतेसारख्या अनेक ग्रंथातुन गुणकर्म विभागशः सारखं फसवं तत्वज्ञान सांगितलं जाऊ लागलं..."गेल्या जन्मी चे तुझे गुण हे अमक्या प्रकारचे होते,म्हणुन या जन्मी तुझ कर्म तमक्या प्रकारचं आहे,आणि ते तु बिनबोभाट केलं पाहिजेस" असं गीतेचं आपल्याला सांगणं आहे. या जन्मीचे गुण पहा,कर्म पहा आणि त्यानंतर व्यक्तिला योग्यतेप्रमाणे वर्ण द्या,ईतकी नीट आणि सरळसोट व्यवस्था असती ,तर जाती जन्मानी ठरण्या ईतक्या शिल्लकच कशाला राहिल्या असत्या?
जो विद्वान आहे तो ब्राम्हण,शुर आहे तो क्षत्रीय,व्यापारकुशल आहे तो वैश्य,उत्तम सेवा पुरवणारा आहे तो शुद्र...असं फक्तं सभेमधे वादविवादामधे म्हणायचं असतं.प्रत्यक्षात आपल्या वर्णात कुणाला घेण्याच्या,आणि अयोग्य असल्यास योग्य वर्णात नेऊन सोडण्याच्या चळवळी प्राचीन भारतापासुन आजपर्यंत असतित्वात असत्या तर समतेचा मुद्दा किती सोपा झाला असता हो...किंबहुना तो उपस्थित व्हायचा प्रश्नच कशाला शिल्लक राहिला असता?...." हमारा साबुन कपडे का पीलापन हटाकर,उसे सफेद बना देता हे" असं फक्त प्रॉडक्ट विकताना बोलायचं असतं.आपण पिवळा कपडा घेऊन कंपनीकडे गेलो तर-ऊसे हररोज धोकर छाव मे सुखाना पडता है, असं सांगायला कंपन्या थोडच सोडतात...
म्हणुनच आपण कोण आहोत्?या प्रश्नाचं खरं उत्तर-हे सर्व सहन करणारे असु तर शुद्र,आपणही त्यातच सामिल होणार असु तर वैश्य,यांच्याशी लढणार असु तर क्षत्रीय,आणि जिंकल्यावर सर्वांच्या कल्याणाचा विचार प्रत्यक्षात आणणार असु तर ब्राम्हण असा घ्यायला हरकत नाही...थोडक्यात... हे चारही गुण कमी अधिक प्रमाणात प्रत्येक मानवात आहेत.म्हणुन आपण माणुस आहोत हेच खरं...........
पराग दिवेकर=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०
25 May 2011 - 7:16 am | नितिन थत्ते
_/\_
सुरेख प्रतिसाद.
26 May 2011 - 11:08 am | राही
सद्ध्या महाराष्ट्रात तरी व्यक्तीची ओळख त्याच्या पोटजात/जात/धर्मावरूनच होते हे सत्य आहे. ही काही आदर्शवत परिस्थिती नाही. ती बदलू शकते,बदलेल,बदलावी लागेल.व्यवस्थाबदल होताना थोडासा गोंधळ,कन्फ्यूजन होणे स्वाभाविक असते. तरीही, 'मी कोण' असा प्रश्न पडण्याइतपत गहन-गूढ असे काहीही नाही. आपण नाहकच स्वतःला जुन्या वर्णाश्रमांच्या चौकटीत ठाकून ठोकून बसवण्याचा प्रयत्न करीत आहोत. लेखातलेच उदाहरण घेतले तर व्यापार-उदीमावर उपजीविका करणार्या शूद्राला वैश्य का म्हणू नये किंवा तो शूद्र कसा हा प्रश्नच उद्भवू नये. शूद्र-व्यापारी अशी नवी संज्ञासुद्धा त्यासाठी टाकसाळीतून पाडू नये. तो एक यशस्वी/अयशस्वी व्यावसायिक गणला जावा. क्षत्रिय,शूद्र इ. जुन्या संज्ञांनीच संबोधण्याचा अट्टाहास कशासाठी? सद्ध्याची स्थिती बदलायची असेल(तशी ती एरवीही बदलणारच आहे म्हणा,ते कुणाच्या इच्छेवर वा राजी असण्यावर अवलंबून राहिलेले नाहीय) तर नवीन संज्ञा-संकल्पना स्वीकारायला हव्या.
पांढर्या शाईत : लेख वाचून असे वाटले की खरे तर लेखकाला पडलेले हे सर्व प्रश्न हे छद्म प्रश्न आहेत.त्याला सर्व उत्तरे माहीत आहेत. किंबहुना प्रश्न पडलेलेच नाहीत. प्रतिसादांद्वारे लेखातला अंतःप्रवाह बळकट करण्याचाच हा प्रयत्न आहे. लेखकाच्या हेतूविषयी शंका घेतल्याबद्दल क्षमस्व.
26 May 2011 - 5:16 pm | सुहास..
वाचतो आहे . वेळ आल्यावर (पडल्यास ) लिहीन
अवांतर : काही प्रतिसाद गमतीशीर आहेत, काही शिरियस ..पण हल्ली नान्या नसल्याने, अनुषंगाने, चर्चा आणि त्याचे परिणाम गंभीर होणार नाहीत याची मात्र नक्की दखल घेतली आहे ..असो ..