गेल्या आठवड्यात मुंबईजवळील ठाण्यामध्ये एक हिंदी भाषिक पाणीपुरीवाला पुरीमध्ये उकडलेल्या मुगासमावेत जे तिखटगोड पेयजल घालून देतात आणि नंतर मिटक्या मारीत एकामागून एक पुर्या पोटात रिचवितात त्या पेयजलात आपली लघुशंका मिसळतांना पकडला गेला किंवा एका भांड्यात त्याने लघवी केली आणि तेच भांडे लोकांना पाणीपुरी खिलवितांना त्यांने वापरले अशा काहीशा संशयाने ठाण्यात आणि मुंबईत भीतीची आणि संतापाची लाट उसळली आणि जो दिसेल त्या पाणीपुरीवाल्यावर हल्ला करून त्याला अद्दल घडविण्यास जमाव प्रवृत्त झाला. अशावेळी रागाचा तात्कालिक भर ओसरल्यावर ज्या कारणासाठी आपण रागावलो आणि हिंसेस प्रवृत्त झालो, ते कारण नित्याचे नाहीसे कसे होईल याचा विचार लोकांनी केला पाहिजे. जर पुरीबरोबर पाणी म्हणून आपले मूत्र देऊन तो माणूस धंदा करीत असेल, तर ते प्रकरण अन्नात भेसळ करणे इतक्यापुरते मर्यादित रहात नाही. अल्प साधनांनी अल्पावधीत मोठा लाभ करण्यासाठी माणूस भेसळ करतो. ते अनैतिक आहे पण त्यामागे स्वार्थ आहे आणि तो परिस्थितीच्या प्रभावाने करावासा वाटला असे असू शकते; पण लघवी पाणी म्हणून पिण्यास देणे ही विकृती आहे.ती तेथल्यातेथे मोडून काढण्यासाठी त्याला कठोरातले कठोर शासन झाले पाहिजे.
त्याला दीर्घ सश्रम कारावास तर घडला पाहिजेच; पण अन्न या विषयाशी निगडित असे कोणतेही काम त्याला त्याचे पोट जाळण्यासाठी उर्वरित आयुष्यात करता येणार नाही, असे बंधन त्याचेवर घातले पाहिजे. आता रस्त्यावरचे खाणे आणि स्वच्छता हा विषय ऐरणीवर आलाच आहे तर तीनचार मुद्यांचा विचार गंभीरपणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुंबईत जेवढे लोक रहातात त्यांचेपैकी निम्म्या लोकांना रहाण्यास घर नसल्याने किंवा आहे ते नावापुरते असल्याने त्यांचे उदरंभरणम घराबाहेर होणार हे उघड आहे. ते रस्त्यावर गदळपणे होणार नाही याची काळजी महापालिकेने घ्यायची आहे. रस्त्यावर अन्न शिजवायला आणि ते विकायला सर्वोच्च न्यायालयाने बंदी केली आहे. ती कठोरपणे कार्यवाहीत आणावी. महिला उद्योजकांना ठिकठिकाणी झुणकाभाकर किंवा पोळीभाजी किंवा वरणभात खिचडी केंद्र स्थापन करण्यास प्रोत्साहन द्यावे. घरी शिजविलेले अन्न या केंद्रावर भुकेल्यांच्या पोटात सशुल्क घालावे. या व्यवसायात लाभाचे आणि अन्नाच्या गुणवत्तेचे प्रमाण ठरवून द्यावे आणि जो प्रमाणशीर रहाणार नाही त्यास परिणाम भोगण्यास भाग पडावे. केवळ खाण्याचेच पदार्थ नव्हे, तर अन्य अखाद्य पण जीवनोपयोगी वस्तू विकणारे अनेक छोटे विक्रेते मुंबईत रस्त्यावर जागा मिळेल तेथे आपले चार बांबूंचे विकान थाटून बसलेले विंâवा उभे दिसतात. त्यांच्यासाठी पुरेशी स्वच्छतागृहे उभी रहावीत म्हणून काही छोट्या अण्णा हजारेंनी महापालिका मुख्यालयासमोर आझाद मैदानावर उपोषणास बसून हा प्रश्न धसास लावला पाहिजे. पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने विक्रेत्यांचे अस्वच्छ हात जे विकतील ते आपल्याला पावन करून घ्यावे लागते. अशाप्रकारे किती घाणेरड्या वस्तू आपण आपल्या घरी आणतो आणि उपभोग घेतो याची कल्पना करता येईल. आता जी सुव्यवस्थित बांधणीची मोठी आणि सहकुटुंब आरामात बसून खाता येईल अशी उपाहारगृहे आहेत त्यांची स्वयंपाकगृहे स्वच्छतेचे न्यूनतम नियम पाळतात कि नाही हे तपासण्यासाठी महापालिकेच्या अन्न विभागाने त्यांचेवर धाडी घातल्या पाहिजेत. आपल्याकडे वेदकालापासून अन्न हे परब्रह्म आणि ते सेवन करणे म्हणजे यज्ञकर्म मानले आहे. दुर्दैवाने बरेच मोठे उपाहारगृहाचे धनी हा व्यवसाय पुण्यकर्म म्हणून करीत नाहीत. ते धंदा करतात. त्यांची स्वयंपाकगृहे आणि तेथील अस्वच्छता पाहिली, तर कोणत्याही शुद्धीवर असलेल्या माणसाला दोन दिवस जेवण जाणार नाही. चोरदरोडेखोर आणि हे शिजवलेल्या अन्नाचे व्यापारी यांच्यात काही फरक राहिलेला नाही. आपण बाहेर जे चवीने खातो ते आत किती घाणेरड्या परिस्थितीत बनवलेले असते याची खवय्यांना कल्पना नसते. जे अन्नाचे पावित्र्य राखत नाहीत त्यांना समाजाचे शत्रू मानले पाहिजे. शेवटचा मुद्दा म्हणजे श्रीमंतांची बाहेर खाण्याची सवय व्यसनात जाऊन बसेल काय अशी भयावह परिस्थिती आहे. पैसा खुळखुळतो. त्याचे प्रदर्शन करण्याची हौस असते आणि महिलांना स्वयंपाकगृहात वावरणे म्हणजे स्त्री स्वातंत्र्यावर घाला वाटतो. या कल्पना बदलल्या पाहिजेत. आईच्या आणि बायकोच्या हातच्या अन्नाची चव जगात दुसर्या कोणत्याही पदार्थाला येणार नाही. अर्थात दुर्गा भागवत म्हणत त्याप्रमाणे बायकांनीही जीव ओतून स्वयंपाक केला पाहिजे. आपण जे जेवलो त्याला थुंकीची चव नव्हती, असा विचार नवर्याच्या मनात आला, तर आपले आयुष्य फुकट गेले असे त्या बाईने समजून जावे. मग तथाकथित स्त्री स्वातंत्र्याच्या क्षेत्रात तिने कितीही झेंडे लावलेले असोत. ‘चला, पाने मांडून झाली आहेत' यासारखे सुंदर वाक्य मराठी साहित्यात दुसरे नाही असे पु.ल. देशपांडे एकदा म्हणाले होते. ते खरे आहे. आपण दमून भागून घराच्या वाटेवर असतो तेव्हा आपल्या पोटाला आणि जिभेला सुख लागेल असे अन्न शिजविण्यात कोणीतरी घरी मग्न आहे ही कल्पनाच किती मनोरम आहे. आता नवराबायको दोघेही घरी दमून भागून येतात. त्यावर उपाय बाहेरचे अस्वच्छ आणि अपथ्यकारक खाणे नव्हे. आहाराची शैली सुगम करणे आणि ती फलद्रूप करण्यासाठी दोघांनी कोण मोठे कोण लहान हा वाद न घालता आपापला न्याय्य वाटा आनंदाने उचलणे हा तो उपाय होय.
प्रतिक्रिया
1 May 2011 - 7:05 pm | अविनाशकुलकर्णी
त्या पाणी पुरी वाल्याला ७००० रु दंड झाला व आता तो फुले विकतो असे टी.व्ही वर बघितले..
फुले विकतो पाहुन अंमळ देवाची काळजी वाटली..
बर्याच मुद्द्यांचा उहापोह केला.....
लेख तळमळीने लिहिला आहे ....
2 May 2011 - 8:53 am | प्रचेतस
महाराष्ट्रदिनाच्या एकाच दिवसांत ४ लेख, अफाट व्यासंग आहे ब्वा तुमचा.
2 May 2011 - 12:01 pm | ब्रिजेश दे.
तो पाणीपूरी वाला सापडला म्हणून अडकला......
पण असे किती असतील जे सापडत नाहित...
१. वडेवाले - यान्च्या कडे मोठि कढई असते
२. सरबत वाले - यान्च्या कडे भरपूर वाव असतो....बरीच भान्डी असतात.