नंदा खरे यांचा मानसपुत्र 'अंताजी'विषयीच्या या धाग्यावर नुकतीच झालेली चर्चा ताजी असतानाच योगायोगानं १९५० सालचा ‘पुढचं पाऊल’ हा चित्रपट अंशत: पाहण्यात आला आणि पुन्हा एकदा त्या चर्चेची आठवण झाली. चित्रपटाचं ढोबळ कथासूत्र इथे वाचता येईल. त्यात मांडलेला विचार आणि तो मांडण्याची पद्धत रोचक वाटते. प्रमुख पात्र असणारा गावातला किसना महार सालस, गुणी, कष्टाळू पण भडक माथ्याचा असतो. गावात झालेला अपमान सहन न होऊन तो पैसे कमवायला मुंबईत येतो. पैसे कमवून गावी जमीन घ्यावी आणि मग आपल्या हक्काची शेती पिकवण्यात खुशाल आपला घाम गाळावा, असा त्याचा विचार असतो. तिथं एका हॉटेलमालकाशी त्याची ओळख होते. ‘मामा काणे’ धाटणीचा हा ‘मामा चिपळूणकर’ असतो. त्याच्यामुळे किसनाला जेवणखाण मिळतंच, पण एक हितचिंतकसुद्धा मिळतो. वरवर कठोर आणि हिशेबी वाटणारा हा मामा आतून खोबऱ्यासारखा गोड असतो. किसनाला तमाशात ढोलकी वाजवण्याचं काम मिळतं, पण तमासगीर बाई त्याला फसवते. त्यानं तमाशात कमावलेले पैसे तमासगीर बाई हडपते. किसना रस्त्यावर येतो. तेव्हा एक चवलीही न घेता हा मामा त्याला आपल्या हॉटेलात रहायला जागा देतो आणि त्याच्या जेवणाची सोय करतो. इतकंच नव्हे, तर पेचात पडलेल्या आणि निराश किसनाला सल्लाही देतो की कोणताही धंदा हलका नसतो; त्यामुळे किसनानं तमाशात काम करणं यात काहीही गैर नाही. पण काही माणसं वाईट असू शकतात आणि ती कोणत्याही धंद्यात असू शकतात. किसना शिकलेला असता आणि थोडा सावधपणानं वागता तर त्याचे पैसे असे गेले नसते. त्यामुळे किसनाला हुरूप येतो. पुरेशी कमाई करून तो गावी जातो. अखेर सगळं काही चांगलं होतं.
चित्रपट अर्थात सामाजिक आशय मांडणारा आहे: महारानं आपला स्वाभिमान आणि सचोटी सोडू नये; शिक्षण घ्यावं; मग तो नाडला जाणार नाही. सर्व व्यवसाय प्रतिष्ठेचे असतात. शहरात खेड्याइतकी जातपात पाळली जात नाही; शहरात संधी असतात; कुणीही तिथं येऊन मेहनतीची कमाई करू शकतं. पण मग शहरात येऊन पैसा आणि शहाणपण कमावलेल्या अशा माणसांनी पुन्हा खेड्यात जाऊन तिथली परिस्थिती बदलावी, वगैरे शिकवण चित्रपटाच्या माध्यमातून दिलेली आहे. शहरात महाराला मदत करणारा, माया देणारा आणि व्यवहारोपयोगी सल्ला देणारा मामा ब्राह्मण असतो. म्हणजे ब्राह्मणानं आपलं शहाणपण इतरांना दिलं की अंत्योदय होतो आणि मग एकंदर समाजाची प्रगती होते. थोडक्यात, पुरोगामी, उदारमतवादी आणि सर्वसमावेशक विचार चित्रपटात मांडलेला आहे.
या चित्रपटाच्या निर्मितीमागे कोण कोण होतं हे पाहिलं तर काही गोष्टी अधिक प्रकर्षानं लक्षात येतात. किसना महाराची मुख्य भूमिका पु.लं.नी केली आहे. मामाच्या भूमिकेत राजा परांजपे आहेत. तेच दिग्दर्शक आहेत. शिवाय किसनाच्या भावाच्या भूमिकेत विवेक (बहुधा अभ्यंकर; चू.भू.दे.घे.) हा तेव्हाचा लोकप्रिय नट आहे, तर किसनाचे विशालहृदयी वडील ग.दि.माडगूळकर आहेत. गीतं त्यांनीच लिहिली आहेत. संगीत सुधीर फडके यांचं आहे. पटकथा बहुदा व्यंकटेश माडगूळकरांची असावी. बाकी फक्कड करमणुकीसाठी हंसाबाई वाडकर तमासगीर आहेत. ‘झाला महार पंढरीनाथ’ सारख्या भजनाबरोबर दिलखेचक ‘जाळीमंदी पिकली करवंदं’, शेतावर रोमॅन्टिक युगलगीत ‘मोट चालली मळ्यामंदी’ वगैरे सर्व लोकप्रिय मालमसाला यात आहे. एकंदर हा मुख्य प्रवाहातला, रंजक आणि आता बाळबोध वाटू शकेल असा साधासरळ चित्रपट आहे; समांतर किंवा प्रायोगिक चळवळीतला गहन वगैरे चित्रपट नाही.
अंताजीच्या धाग्यावर शिवाजीच्या राजवटीतली जी लोकहितकारक सर्वसमावेशकता उल्लेखली होती, ती पुन्हा इथे १९५०साली अवतरलेली दिसते. सर्वसमावेशक भारतीय स्वातंत्र्यलढा आणि महाराष्ट्रातली प्रबोधनाची चळवळ हे यामागचे कारणीभूत घटक असावेत असं वाटतं. पण मग हे पहाता काही प्रश्न पडतात:
गदिमा-सुधीर फडके-पुलं-राजा परांजपे अशी सगळी मंडळी आजही मराठी समाजमनाच्या ‘गेले ते सोनेरी दिवस’छाप स्मरणरंजनात वंदनीय असणारी नावं आहेत. पण पुरोगामी, उदारमतवादी वगैरे आज शिव्या असाव्यात असं मराठी संकेतस्थळं, ब्लॉग वगैरे पाहता वाटत राहतं. हिंदू संस्कृती, अंधश्रद्धा, परप्रांतीय, स्त्रिया, वगैरे अनेक गोष्टींबाबत अजूनही अत्यंत बाळबोध स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप आणि वाद-प्रतिवाद घडत शतकी प्रतिसादांचे धाग्यांमागून धागे इथे (म्हणजे या आणि इतर संकेतस्थळांवर) निघत रहातात. म्हणजे शिवाजीच्या काळात गिरवलेला धडा आपण उत्तर पेशवाईत विसरलो (आणि मग त्याचा फायदा इंग्रजांना झाला,) तसंच आता पुन्हा होत आहे का? की प्रतिगामी ते पुरोगामी आणि मग पुन्हा प्रतिगामी अशा आवर्तनांत आपण फिरत राहतो? पण मग समंजस, सर्वसमावेशक जनहितात आपलं दीर्घगामी हित होतं (शिवाजीचं स्वराज्य, स्वातंत्र्यचळवळ वगैरे) हे आपण पुन्हापुन्हा विसरतोय का? आणि तसंच असेल तर मग इतिहासापासून धडे घेण्यात मराठी माणूस कमी पडतो असा सरसकट निष्कर्ष काढावा का?
यावर इथल्या इतर वाचकांना काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल.
प्रतिक्रिया
18 Apr 2011 - 4:40 pm | प्रकाश घाटपांडे
काळानुसार बदलणारा हा ब्राह्मण समाजा बद्दल नामदेव ढसाळ एकदा बातम्यात म्हणाले होते. कुठे गेले ते साडेतीन टक्के? ते तर केव्हाच उडाले सिलिकॉन व्हॅली मधे जाउन बसले. १९५० च्या पार्श्वभुमीवर असलेल्या समाजाच चित्रण अगदी सार्थ ठरणार्या 'पुढच पाउल' मधे आहे. शहरात अर्थकारणामुळे जाती अस्पृश्य भेद ग्रामीण भागाच्या तुलनेने अतिशय कमी झाला. हॉटेलात शेजारी कोण बसलाय काय माहिती? ट्राम / बस मधे कोण आहे शेजारी काय माहिती?
समाजात असणारी विविधता ही जेव्हा शोषणव्यवस्थेच्या पातळीवर घेतली तर ती विषमता होते. विषमता शब्दालाच काळी छटा आहे. इतिहासातुन आपण धडा घेणार की नाही? हा प्रश्न आपण ऐतिहासिक चौकटीतुन न पहाता वर्तमानकालीन चौकटीत पहात असतो. त्यामुळे त्याचे आयामही वेगळेच असतात. भुतकाळ ते वर्तमान या प्रवासात तो प्रसंग वा कृती हे चुक किंवा बरोबर ठरते. कारण निरिक्षक वर्तमानात आहे. तसच चुक कि बरोबर सुद्धा सापेक्ष आहे.
इतिहासातील चुकांची पुनरावृती होताना वा त्यांना टाळून प्रवास होताना नवा इतिहास घडतच असतो. असेच हे चक्र चालायचे काय बोध घेणार?
18 Apr 2011 - 9:10 pm | शुचि
मिसळपाववरील विज्ञाननिष्ठ आणि पुरोगामी विचार करणारे विचारवंत हे खूप कौतुकास्पद आहेतच. मला नाही वाटत इथे अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्यांचा टिकाव लागतो. कारण विज्ञाननिष्ठ विचारांची धुरा वाहणारे खूप समर्थपणे आणि कडवेपणाने हा मार्ग चोखाळत आहेत. मी तर म्हणेन स्वतःचे अंधश्रद्धाविषयक विचार तपासून आणि बदलून घेण्याकरता हे अतिशय उत्तम संस्थळ आहे.
या संस्थळाने माझ्यात खूप चांगले बदल घडवून आणले.
आणि तुमचे विचार बदलले की तुमचं आयुष्य बदलतं,कुटुंबाला वळण लागतं, समाजच हळूहळू असाच बदलत असतो.
20 Apr 2011 - 6:50 pm | टारझन
पुर्वी कुठे तरी "मिसळपाव" ऐवजी उपक्रम" घालुन तंतोतंत असाच प्रतिसाद कुठेतरी वाचल्याचे स्मरते :)
- नारद
------------------------------------------------------------------------------------
नारदु गस्त , घालुन राहिला
सायंकाळी गेला , कळलावोनिया
20 Apr 2011 - 7:17 pm | शुचि
उपक्रमविषयक मी वेगळं लिहीलं होतं. असा प्रतिसाद तेथे दिला नव्हता. आणि तरी जर तुमचा मुद्दा तुम्हाला सिद्ध करायचा असेल तर तो प्रतिसाद चोप्य्-पेस्त करावा.
अंधश्रद्धाविषयक लिखाण मी उपक्रमवर केलच नाही तर तेथे कोरडे कोठून ओढले जाणार? मिपावरच माझं "तशा" प्रकारचं लिखाण झालेलं आहे.
20 Apr 2011 - 7:22 pm | टारझन
चॅलेंज ?
20 Apr 2011 - 7:32 pm | शुचि
चोप्य पस्ते करा.
18 Apr 2011 - 10:12 pm | मुक्तसुनीत
१९५० च्या चित्रपटात दाखवलेल्या मूल्यांचं पुढे काय झालं ? या प्रश्नाला सहोदर असलेला - किंबहुना त्याची आईच म्हणायला पाहिजे असा "लार्जर इशू" म्हणजे १९४७ साली जो नियतीशी करार केला त्या कराराचे काय झाले ? असे म्हणण्यासारखे आहे. मात्र ती महाचर्चा आहे. अनेक पातळ्यांवर , अनेक पुस्तकांद्वारे आणि दशकानुदशके होत राहिलेली आहे.
अर्थातच प्रस्तुत संदर्भात जंतू यांनी "आर्थिक/सामाजिक प्रश्नांचे काय झाले" यापेक्षा, "प्रागतिक विचारसरणी"चे काय झाले ? असा प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न "मराठी माणसा"च्या - पर्यायाने महाराष्ट्राच्या - संदर्भात विचारला गेलेला आहे.
या करताही एकंदर साठ सत्तर वर्षांच्या संपूर्ण ऐतिहासिक डिसकोर्सकडे वळावे लागेल. प्रस्तुत ठिकाणी ते शक्य नाही. सुचतील तसे मुद्दे मांडतो. उपरोल्लेखित डिसकोर्सच्या अभावामुळे या मुद्द्यांचे स्वरूप फुटकळ बनते. ( हे फुटकळ मुद्देही पुन्हा महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहेत. )
- काँग्रेसबद्दलचा भ्रमनिरास. शहरी भागात उमटलेली प्रतिक्रिया - विशेषतः मुंबईत - आणि नंतर त्याचे पसरलेले लोण.
- गिरणीकामगार आणि संबंधित कामकरी वर्गामधल्या लाल बावट्याचा उतरलेला रंग. शिवसेनेच्या उजव्या विचारप्रणालीला मिळालेला पाठिंबा. भगव्याचा झालेला उदय.
- शिवसेनेच्या दुभंगण्यानंतर तिचीच जुळी बहीण वाटावी अशा दुसर्या सेनेचा उदय.
हे अत्यंत ठळक मुद्दे आहेत आणि पुरेसे नाहीत. पण या मर्यादित अवकाशात हे मांडण्याजोगे आहेत.
तर जंतुंनी ज्याना "प्रतिगामी" आवर्तन म्हण्टलेले आहे त्याच्या खुणा मला उजव्या विचारसरणीच्या उदयामध्ये दिसतात. माझा निर्देश फक्त सेना आणि तिची सावत्र बहीण इतक्यापुरताच मर्यादित अर्थातच नाही. जातीपातीच्या राजकारणाला चुचकारण्याचं काम काँग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसनेही नीटच केलेले आहे.
उजव्या शक्तींचा उदय आणि विकास डाव्या/प्रागतिक विचारसरणीच्या मानल्या गेलेल्या शक्तींच्या पीछेहाटीशी संबंधितच आहे. किंबहुना हा राजकीय व्हॅक्युम भरण्याचाच प्रकार आहे असं मला वाटतं
19 Apr 2011 - 5:31 am | Nile
समाजाची सरासरी काढली तर समाज १९५० पेक्षा प्रगत झाला असावा असे मला वाटते. माझे मत थोडेसे आशावादामुळीही असु शकेल. कदाचित अश्या शिव्या देणारी मंडळी ही अर्धज्ञानी असावीत. अशिक्षिताने असे काही केल्यास तितके आश्चर्य वाटत नाही पण शिकल्या-सवरलेल्यांची मत पाहून अचंबित व्हायला होते खरे. शिक्षणाने त्यांच्यात अनेक चांगले बदल आणले आहेत पण अजून विकासास पूष्कळ वाव आहे,मात्र प्रगतीकडेच वाटचाल चालू असावी असे वाटते.
वर मुसुंनी म्हणल्याप्रमाणे चूकीच्या विचारसरणीला खतपाणी घालणारे स्रोत समाजात आहेत या बाबत वाद नाही. प्रबोधनाची गरज आहेच, आम्ही घालत असलेले वाद हे खारीचा तरी वाटा ठरावेत याच इच्छेने खटाटोप.
19 Apr 2011 - 10:19 am | सहज
१९५० पासुन आजवर बराच सकारात्मक फरक पडला आहे असे मला तरी वाटते, दळणवळणाची साधने, तंत्रज्ञान यामुळे बराच वर्ग पूर्वीपेक्षा जास्त "माहीतगार" झाला आहे. पण केवळ माहीती असल्याने कट्टरता कमी होतेच असे नाही. उलट नव्या जोमाने वकीली प्रतीवाद होतो. ज्याअर्थी कट्टर लोकांच्या संघटना अजुन आहेत व त्यांना अनुयायी मिळतात त्यात असेच दिसते की संघटना चालवणे हे व्यावसायीक कौशल्य आहे व जे ह्या माहीतीयुगात सोपे झाले आहे.
मनुष्याची भौतीक गरीबी विविध निकषांवर तपासुन, १९५० पासुन आजवर प्रगती झाली आहे सिद्ध करता येते. आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरीक आहोत ह्या वाढत्या जाणीवेमुळेच 'माझे मत', 'माझे हक्क', 'माझे अधिकार' यांचा जाणीवपूर्वक वापर प्रत्येक जण करताना दिसतो. मनुष्याच्या मुळच्या अहंभाव, असुया गुणांमुळे हे स्वातंत्र हट्टी व स्वैराचारी दिसते. मग आपसूक वाटते की १९५०मधे तशी परिस्थीती तर आज अशी का?
१९५० मधे वृत्तपत्र व अन्य माध्यमातुन फक्त वरच्या नेत्यांच्या आवाज, मते जनतेपर्यंत जायची, आज प्रत्येकजण आपापल्यापरीने आपला आवाज दाखवून देत आहे त्यामुळे हा पुरोगामी, प्रतिगामी गोंधळ वाटतो. त्याकरता ज्या पुरोगामी लोकांना काही आक्षेपार्ह वाटते त्यांनी खरे तर प्रतिगामी लोकांच्यात मिसळून शक्त तितक्या सामंजस्याने आपले मत मांडले पाहीजे. पण असे किती पुरोगामी प्रत्यक्षात संशयीत प्रतीगाम्यांना जवळ करण्यास तयार आहेत? बरेचदा भेट टाळतात असेच दिसले आहे.
पुरोगामी लोकांच्यात देखील कट्टरता जास्त वाढली आहे हे दिसून येते का? मग मुळचा "हा! आले मोठे शहाणे आम्हाला अक्कल शिकवायला!" हा अहंभाव जागृत होउन 'हो! आहे पुराणमतवादी! काय उखडाल!' उत्तर येते. बरं, हे उत्तर आहे म्हणजे खर्या आयुष्यात १९५०च्या आसपास असलेले मत आजच्या 'प्रतिगामी वाटणार्या लोकांच्यात' असेलच असे नाही. भले ते संस्थळावर चर्चेत दिसले म्हणुन काय झाले? संस्थळाचा वापर टाईमपास करण्याकरता देखील होत असतो.
पुन्हा एकदा वाटते की मराठी संस्थळावर काथ्याकूट करणारा वर्ग हा तसा समाजातील 'आहे रे' घटक आहे. जर त्यांच्यातच इतके मतभेद दिसत असतील तर तो लाडावलेल्या आहेरे वर्गाचा टाईमपास आहे. समाजातील मुख्य व खरा मुद्दा नाहीच.
मनुष्य एकतर हुशार (धूर्त व कपटी) प्राणी आहे व कायम उक्रांत होत आहे. मराठी माणूस त्यातुन जालावर दिसणारा मराठी माणूस इतिहासापासुन खूप काही शिकतो व शिकत आहे. बर्याचश्या फॅक्टस कडे (ऐतीहासीक सत्याकडे) कानाडोळा, दुर्लक्ष जरुर करत असेल पण त्याचा त्याला विसर पडला आहे असे वाटत नाही. उलट त्याला तसे दुर्लक्ष करण्याचा अधिकार्/हक्क आहे असे समजून, अभ्यासक्रमात ऑप्शनला टाकलेला विषय समजतो इतकेच. इतिहासाकडे पाठ फिरवून बसला तर जालावर येऊन काथ्याकुट करत बसायच्या योग्यतेचा झाला नसता.
थोडक्यात जाल उक्रांत होत आहे, जालावरचे निष्कर्ष खरे निष्कर्ष समजण्यात धोका आहे. प्रतिगामी-पुरोगामी फरक जगातल्या सगळ्याच समाजात आहे. ६०%च्या वरचे सगळे फर्स्टक्लास वाले निकषाप्रमाणे जालवापरकर्ते सगळेच पुरोगामी. :-)
जगातील तथाकथीत सर्वात पुढारलेला पुरोगामी, लोकशाही देश अमेरिकेत हा प्रतिगामी, पुरोगामी भेद केवढा दिसुन येतो तर विकसनशील देशात दिसल्यास काय नवल?
बर 'पुढे काय' हा नक्की सल / प्रश्न का पडतो?
असे झाले आहे का? की वृत्तपत्र, माध्यम, शिक्षण व्यवस्था, सरकार/प्रशासन यातुन उद्याचा 'सुजाण नागरीक' घडावा असा एक प्रवास मधेच थांबवुन सुजाण नागरीकाच्या जागी उद्याचा 'उत्तम उपभोक्ता' बनावा हे अंतीम उद्दीष्ट ठरले. त्यामुळे ज्या सत्ताधारी लोकांना (यात फक्त राजकीय नेतृत्व नव्हे तर पैसेवाले, उद्योगधंदेवाले) समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र, वैयक्तीक मानवी अधीकार नावाखाली हा सत्ताधारी पक्ष जितके बुद्धीभेद, जितके मतप्रवाह करुन जिंतका गोंधळलेला समाज. तितका तो नागरीक गोंधळापासुन स्व:ताला वाचवायला 'उपभोग घेण्याच्या मोड' मधे टाकतो?
---------------------------------------
सदर प्रतिसाद आजकाल गायब असलेले मेगाबायटी लेखक डोन्राव व गिगाबायटी लेखक श्री इंद्राजसाहेब यांना समर्पीत! आहेत कुठे हे दोघे?
19 Apr 2011 - 12:20 pm | नितिन थत्ते
कोणताही माणूस पूर्ण प्रतिगामी असा नसतो.
आज जालावर जे प्रतिगामी वाटतात तेही स्वतःला (पक्षी-पोटापाण्याच्या व्यवसायात) झळ पोचणार नाही इतपतच प्रतिगामी आणि रूढीप्रेमी असतात.
आमच्या रूढींमध्ये नक्कीच काहीतरी विज्ञान होते असे कितीही ओरडून सांगितले तरी श्रावणात महिनाभर दाढी न करता ऑफिसला जाण्याचा हट्ट कस्टमर फेसिंग व्यवसायातला मनुष्य (उदा- सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह) करणार नाही.
त्याउलट लग्न विधीपूर्वक करणे किंवा मुलांची मुंज वगैरे करणे या रूढीत कसलीच झळ पोचत नाही. म्हणून तेथे ही मंडळी रूढीप्रियता दाखवतील.
19 Apr 2011 - 5:37 pm | पंगा
याउलट, 'या रूढींना फाट्यावर मारा' असे जाहीर म्हणणारी मंडळी प्रत्यक्षात म्हणावीत तितकी पुरोगामी असतीलच, असे सांगता येण्याबद्दलही साशंक आहे.
(अनेकदा, 'या रूढींना फाट्यावर मारा' असे जाहीर म्हणणे हा 'आपण पुरोगामी आहोत' किंवा 'आपण अमूकअमूक रूढींना फाट्यावर मारले आहे म्हणून आपण पुरोगामी आहोत' हे स्वतःलाच पटवून देण्याचा क्षीण प्रयत्न असावा का?)
त्यामुळे, व्यत्यासाने, 'कोणताही माणूस हा पूर्ण पुरोगामी असा नसतो' असेही म्हणता येईल का?
19 Apr 2011 - 1:44 pm | राही
मराठी आंतरजालावर सध्या वावरणारा वर्ग हा 'आहे रे' कॅटेगरीतला आणि लाडावलेला आहे हे पटते. हा वर्ग सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करीत नाही त्यामुळे त्याची मतेही प्रातिनिधिक नसतात.
काँग्रेसबद्दलचा भ्रमनिरास हा सार्वत्रिक नाही. आजही मुंबईचे बहुसंख्य खासदार हे काँग्रेसचे आहेत.
जातीपातीचे राजकारण काँग्रेसविरोधकांकडूनही होते, अंमळ अधिकच होते. उदा. उत्तरप्रदेश.
काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला लोक विटले असले तरी ते सध्याच्या विरोधकांबाबत फार आशावादी नाहीत. उलट लोक असे बोलताना आढळतात की सत्तेपासून दीर्घकाळ दूर राहिलेले हे विरोधक जर सत्तेवर आले तर हपापलेले असल्यामुळे अधिकच खाबूगिरी करतील.
आज सामान्य माणूस अधिक माहितगार झाला आहे हे अगदी खरे पण ही माहिती जेव्हा ज्ञानाच्या पातळीवर पोचेल, म्हणजे माहितीचे विश्लेषण करून योग्य तो निष्कर्ष काढणे,माहितीचा अन्वयार्थ लावणे हे जेव्हा शक्य होईल तेव्हा समाज प्रगल्भ झाला, एक पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल.
तरीही १९५० पेक्षा आज स्थिती अधिक बरी आहे असे वाटते.वाहतुकीची आणि संपर्काची साधने वाढली आहेत, आर्थिक उन्नतीच्या संधी १९५० पेक्षा अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. सामाजिक अभिसरण अधिक होते आहे, आंतर्जातीय विवाहही पुष्कळच वाढले आहेत.त्यामुळेच खाप पंचायतींसारखी प्रतिगामी तत्वे अधिक हिरीरीने त्यांचा किल्ला लढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. संयुक्त कुटुंबपद्धतीच्या बालेकिल्ल्यात म्हणजे राजस्थान उ.प्र. मधे बायका पुढे येऊन,प्रसंगी प्राणांची किंमत देऊन त्यविरुद्ध बंड करताहेत.(हे पुन्हा चांगले की वाईट?)अन्यायाला वाचा फोडणारी शोधपत्रकारिता थोड्या प्रमाणात तरी आहे.
आशावादी राहाण्यास जागा आहे.
चर्चेचा कॅन्वस विस्तृत आहे. एकेका मुद्द्यावर वेगवेगळी चर्चा होऊ शकेल.
19 Apr 2011 - 6:19 pm | sagarparadkar
'मतपेटी' / 'मतपेढी' केंद्रीत राजकारणाला एखादा चांगला पर्याय उभा राहिला तर सामाजिक परिवर्तन (आणि त्या अनुषंगाने समानता) वेगाने प्रत्यक्षात येईल असं वाटतं. कारण सध्याच्या काळात जातीय अभिनिवेष हे आपापल्या मतपेढया सुरक्षित राखण्यासाठीचं एक हुकमी साधन बनवलं गेलंय.
एखाद्या हॉटेलात किंवा टपरीवर खादाडी करत असताना भटारखान्यातल्या 'शेफ्'ची जात काय असेल असा प्रश्नं तरी कधी मनात येतो का? नाही ना? मग अवतरली की समता आणखी काय हवं ?
19 Apr 2011 - 6:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा लेख खूपच निराशावादी वाटला. माझी व्यक्तीगत मतं एवढी निराशावादी नाहीत लेखकाची अनुमानं मला पूर्णपणे पटली नाही.
चित्रपटावरूनच समाजाबद्दल कल्पना येते का? १९५० साली 'पुढचं पाऊल' चित्रपट आला तेव्हा समाज खरोखर प्रागतिक, पुरोगामी होता काय? "का हे असं फक्त चित्रपटातच होतं" अशी भावना तेव्हाही होती? पण हा मुद्दा मला गौण वाटतो.
मराठी इंटरनेटवरचे लोकं म्हणजे संपूर्ण समाज का? शब्दशः उत्तर नाही. पण सांख्यिकी विदा जमवण्यासाठी पुरेशी विविधता या गटात आहे. शिक्षण, आर्थिक कुवत, वय, जात, राजकीय आणि धार्मिक विचार या बाबतीत मराठी आंतरजालावर पुरेशी विविधता आहे. त्यामुळे मराठी समाजाचं प्रतिनिधित्त्व या गटात आहे. यांच्यापैकी आज कोणी आर्थिकदृष्ट्या हलाखीत असेल असं नाही, पण आपल्यापैकी काहींनी / अनेकांनी एकेकाळी आर्थिक हलाखी पाहिलेली असणार. त्यामुळे मराठी आंतरजालाकडे पाहून मराठी समाजाचं चित्रं बघता येतं हे मला पटतं.
शिवाजीच्या काळापासून महाराष्ट्रात काही वेगळं आणि अभिमान बाळगण्यासारखं सुरू आहे. (उच्चभ्रूंची गीतेवरची, तत्वज्ञानावरची मक्तेदारी संपवण्यामुळे ज्ञानेश्वरांपर्यंतही काळात मागे जाता येईल.) पेशव्यांच्या काळात त्याचा विसर पडला हे ही मान्यच. पुन्हा स्वातंत्र्यलढ्यात सोनेरी क्षण आणि पुन्हा बाळबोध स्वरूपाचे वाद दिसतात. एक प्रकारे इतिकर्तव्यतेची भावना येऊन मग समाज उतरणीला लागतो आहे असं दिसत आहे. पण आता आपण, समाज म्हणून, खरोखरच उतरणीला आहोत असं म्हणावं का असा प्रश्न आहे.
साठ वर्षांपूर्वी हा चित्रपट आला तेव्हा किती लोकांच्या हातात स्वतःला व्यक्त करण्याचं माध्यम होतं? फारच थोड्या आणि उच्चभ्रू वर्गातल्या लोकांकडे (ज्यांचा उल्लेख जंतू "गेले ते सोनेरी दिवस’छाप स्मरणरंजनात वंदनीय असणारी" मंडळी असा करतात.) हे माध्यम होतं. आज माध्यमांच्या स्फोटामुळे प्रचंड प्रमाणात लोकांना स्वतःच्या भावना मांडणं शक्य आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी रोज भेटणार्या लोकांपर्यंत आपले विचार पोहोचत होते, आज आंतरजालामुळे हजारो लोकांपर्यंत पोहोचता येतं. जसे आपण लोकांपर्यंत पोहोचतो, तसेच लोक आपल्यापर्यंत पोहोचणारच. साठ वर्षांपूर्वी उदारमतवादी आणि इतर अशाही चर्चा होतच असणार, आज त्यांची scale बदलली आहे. कदाचित साठ वर्षात शक्य होती तेवढी प्रगती आपण केली नसेलही. पण साठ वर्षांपूर्वी किती स्त्रिया, "कनिष्ठ" जातींमधले लोक उघडपणे आपली मतं मांडू शकत होते? किती लोक उघडपणे निरीश्वरवादी होते?
साठ वर्षांपूर्वी जेव्हा फारच कमी लोकांच्या हातात, विचार व्यक्त करण्याची माध्यमं होती, तेव्हा विरोधी मतप्रदर्शन किती प्रमाणात होत असे? आज परस्परविरोधी विचार उघडपणे मांडले जातात ही प्रगती नाही का?
माध्यमांच्या स्फोटामुळे विचार करण्याची कुवत निर्माण होऊन, तिची वाढ होण्याच्या आतच व्यक्तता असण्याचा तोटा असू शकतो. रस्ते मोठे होण्याच्या आधीच, वाहतूकीचे नियम शिकण्याच्या आधीच प्रचंड प्रमाणात लोकांच्या हातात स्कूटर्स, चारचाकी गाड्या आल्या त्याचा परिणाम रोजच्या रोज प्रवास करणार्यांना दिसतोच, तसंच काहीसं. आपण आपलं वहान चुकीच्या पद्धतीने चालवतो आहोत याची माहितीच नसणं, आणि आपल्याला आपला आणि स्वतंत्र विचार करता येतो तेव्हा आळस झटकून विचार करावा, हे ही माहितीच नसणं हे मला खूपच समांतर वाटतं.
अजून आपल्याला, समाज म्हणून, बरंच अंतर गाठायचं आहे हे मान्य आहे. पण म्हणून परिस्थिती खूपच विदारक आहे असं वाटत नाही. (निदान हा प्रतिसाद प्रकाशित करेपर्यंत इथे पुरोगामी, उदारमतवादी वगैरे शिव्या असाव्यात असं लिखाण या धाग्यावर आलेलं नाही.)
या सगळ्यात मराठी माणसालाच वेगळं काढण्याचं कारण समजलं नाही. ही गोष्ट संपूर्ण भारताच्याच बाबतीत लागू पडत नाही काय?
प्रतिसाद खूपच विस्कळीत झाला आहे, पण मुळात विचार विस्कळीतच असल्यामुळे बांधीव प्रतिसाद देता येणं शक्य नाही.
19 Apr 2011 - 7:07 pm | चिंतातुर जंतू
आतापर्यंत उपस्थित झालेल्या काही मतांना माझे प्रतिसाद:
राजकीय पक्षांकडून झालेला भ्रमनिरास – हा भ्रमनिरास मला मान्य आहे, पण सुशिक्षित समाजानं पुरोगामीपणाची आपल्यामध्ये झालेली पीछेहाट या घटकावर लादणं म्हणजे आपल्याला राजकारण्यांच्या डावपेचांनी फसायला होतं असं मान्य करणं आहे. म्हणजे एक प्रकारे आपला निर्बुद्धपणा मान्य करण्यासारखं आहे. तो तसा मान्य आहे का? नाहीतर सगळ्या दोषांचं उत्तरदायित्व राजकारण्यांवर टाकणं हा एक पलायनवाद होईल.
समाज १९५०पेक्षा आज प्रगत आहे – हेदेखील मान्य आहे. १९५०मध्ये अस्पृश्यता जितकी होती तितकी आता नाही वगैरे ठीक आहे, पण माझा प्रश्न वेगळाच आहे.
आज जालावर जे प्रतिगामी वाटतात तेही स्वतःला झळ पोचणार नाही इतपतच प्रतिगामी आणि रूढीप्रेमी असतात. – हेदेखील कदाचित खरं असेल, पण माझा प्रश्न वेगळाच आहे. तो असा:
पुरोगामित्वाची कसोटी ज्यावर लागते ते घटक प्रत्येक काळात वेगवेगळे असतात. पण त्यापलीकडे जाऊन अशी अपेक्षा ठेवता येईल का? --- अधिकाधिक लोक जसे सुशिक्षित होतील, त्यांचा जगाशी संपर्क वाढेल तशी त्यांची समज व्यापक होईल आणि त्यामुळे एकंदरीत पुरोगामित्व या गुणाला अधिक प्रतिष्ठा लाभेल असं अपेक्षित होतं (सगळ्या नव्हे पण बऱ्याच पाश्चिमात्य देशांत तसं झालं). मी असं म्हणतो आहे की पुरोगामित्व हे मूल्य म्हणून इतर समाजापर्यंत ज्यांनी पोहोचवावं तो समाजघटक आता ते करत नाही, पण १९५०मध्ये तो ते अगदी मुख्य प्रवाहात राहून करताना दिसतो.
19 Apr 2011 - 9:08 pm | मुक्तसुनीत
पुरोगामित्वाची कसोटी ज्यावर लागते ते घटक प्रत्येक काळात वेगवेगळे असतात. पण त्यापलीकडे जाऊन अशी अपेक्षा ठेवता येईल का? --- अधिकाधिक लोक जसे सुशिक्षित होतील, त्यांचा जगाशी संपर्क वाढेल तशी त्यांची समज व्यापक होईल आणि त्यामुळे एकंदरीत पुरोगामित्व या गुणाला अधिक प्रतिष्ठा लाभेल असं अपेक्षित होतं (सगळ्या नव्हे पण बऱ्याच पाश्चिमात्य देशांत तसं झालं). मी असं म्हणतो आहे की पुरोगामित्व हे मूल्य म्हणून इतर समाजापर्यंत ज्यांनी पोहोचवावं तो समाजघटक आता ते करत नाही, पण १९५०मध्ये तो ते अगदी मुख्य प्रवाहात राहून करताना दिसतो.
१. १९५० चा एक चित्रपट पाहून " पुरोगामित्व हे मूल्य म्हणून इतर समाजापर्यंत ज्यांनी पोहोचवावं तो समाजघटक त्याचं काम बजावत होता " हा निष्कर्ष काढू शकतो का ? माझ्या मते , नाही.
२. सर्वच पाश्चात्य देशांबद्दल मी बोलू शकत नाही. अमेरिकेबद्दल बोलतो. एकंदर काही संदर्भांत प्रतिगामी समजल्या जाणार्या लोकांचा जोर अगदी निश्चितच आहे. (पहा : सेरा पेलिन आणि टीपार्टीज). २००४ साली जॉर्ज डब्लू बुश यांना मिळालेले बहुमत २००० च्या पार्श्वभूमीवर अतिशय निर्विवाद होते. ( यामागे सप्टेंबर ११ आणि युद्धखोरी हा भाग आहेच परंतु इथे मुद्दा प्रतिगामित्वाच्या प्रभावाचा आहे.)
३. पोलिटिकल करेक्टनेस चे प्रमाण : काहीही झालं तरी पाश्चात्य देशांमधल्या प्रतिगामी समजल्या जाणार्या घटकांची तीव्रता याची तुलना भारतातल्या प्रतिगामित्वाच्या तीव्रतेशी होऊ शकत नाही. वंशवाद, गुलामगिरी, स्त्रियांच्या मूलभूत हक्कांच्या नकाराबद्दल कुणीही उघडपणे एक शब्द जरी उच्चारला तर त्याची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते. शिवतीर्थावरून वेगवेगळ्या पिढ्यांनी वेगवेगळ्या जमातींबद्दल , अन्य भाषकांबद्दल हजारोंच्या संख्येसमोर केलेल्या वक्तव्यांना पाश्चात्य देशात स्थान मिळालेच तर पोलिटिकली फ्रिंज एलिमेंट्स सारखे मिळेल - मेनस्ट्रीम मधे मिळणे माझ्यामते अशक्य. थोडक्यात , मला पाश्चात्य नि भारतातली परिस्थिती यात काहीतरी मॅग्निट्यूड चाच फरक आढळतो.
थोडक्यात सांगायचे तर मला जंतुंनी एकाच एका चित्रपटावरून काढलेला निष्कर्ष अपुरा वाटतो.
राहता राहिला मराठी संकेतस्थळांवर आढळणारा वेगवेगळ्या ब्रँड्स चा कडवेपणा. हा निराळा विषय आहे. त्याची चर्चा अतिशय सहजपणे गॉसिपच्या जवळ जाऊ शकेल आणि त्या सगळ्या चर्चेतून फार महत्त्वाचे हाती न लागता नेहमीची भाऊबंदकी होईल अशी मला शक्यता वाटते त्यामुळे माझ्यापुरता तो विषय वर्ज्य आहे.
19 Apr 2011 - 9:10 pm | राही
आपल्याइथली सामाजिक ठेवण,रचना अशी होती की त्यामुळे शिक्षण आणि त्याद्वारे आधुनिक विचार ,पुरोगामित्व समाजाच्या एका घटकाकडे मक्तेदारीने (हेतुतः असे वाटत नाही) आपोआप आले.त्या घटकानेही हे विचार दूरवर पोचवण्याची जबाबदारी आपली मानली. पण आता सुमारे साठ वर्षांनंतर,जेव्हा हे लोण समाजाच्या इतर घटकांपर्यंत पोचले आहे तेव्हा पुरोगामित्वाची जड धुरा आपल्या एकट्याच्याच खांद्यावर बाळगण्याची जरूर उरलेली नाही हे उमजून हा घटक आपणहून बाजूला झाल्यासारखा वाटतो. किंवा कदाचित नेतृत्वाचा उगम अन्य घटकांमधेही झाल्यामुळे हा घटक बाजूला पडला असेल. दोन्हीपैकी काहीही घडले असले तरी संपूर्ण समाजाचा विचार करता ही एक सकारात्मक आणि उमेद वाढवणारी घटना आहे.
19 Apr 2011 - 7:34 pm | यशोधरा
आज जालावर जे प्रतिगामी वाटतात तेही स्वतःला झळ पोचणार नाही इतपतच प्रतिगामी आणि रूढीप्रेमी असतात.
किंवा, हेच वाक्य आज जालावर जे पुरोगामी वाटतात तेही स्वतःला झळ पोचणार नाही इतपतच पुरोगामी आणि रूढीविरोधी असतात, असेही चपखल लागू पडते. संकेतस्थळं आणि तिथे मांडली जाणारी सर्वच मतं सर्वार्थाने जनमानसाचं प्रतिनिधीत्व करतात, असं वाटत नाही.
19 Apr 2011 - 8:47 pm | राजेश घासकडवी
हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे. आत्ता या क्षणाला ज्या काही परंपरा आहेत त्या सांभाळल्या पाहिजेत असं परंपरावादी म्हणतात. तर अजूनही सुधारणा करायला वाव आहे असं पुरोगामी म्हणतात. पण काळ बदलतो तसतसे परंपरावादीही बदलत असतात. एकेकाळी 'म्हारडे कसे देवळाजवळ येतात बघतोच' असं कुऱ्हाडी परजत म्हणणारे परंपरावादी आता स्त्रिया मंदिरात शिरल्याबद्दल तक्रारही करत नाहीत. आणि यातच खरं सुधारणेचं गमक आहे. 'काळ बदलला पण परंपरावादी प्रवृत्ती बदलताना दिसत नाहीत.' हा तुमचा मुद्दा अॅब्सोल्यूट प्रकारे सत्य नसून रिलेटिव्ह प्रकारेच सत्य आहे.
संस्थळांची तुलना चित्रपटांशी करणं केवळ मुद्दा उपस्थित करण्यापुरतंच ठीक. आत्ता जशा संस्थळांवर चर्चा होतात तसं १९५० साली काय होत असे? त्यातल्या त्यात जवळ येणारी गोष्ट म्हणजे वर्तमानपत्रांमधून होणाऱ्या चर्चा. त्या एकतर इतक्या विद्युतवेगाने होत नसत, हा तांत्रिक फरक सोडला तरी त्या आत्तापेक्षा वेगळ्या असत का? पुढचं पाऊल ची तुलना सातच्या आत घरात शी करून प्रतिगामीत्वाने कशी उचल खाल्ली आहे हे म्हणणं सोपं आहे. पण तसं करणं म्हणजे आउटलायर्सची तुलना करणं होईल. १९५० साली (किंवा त्या दशकात) निर्माण झालेल्या व २००० साली (किंवा त्या दशकांत) निर्माण झालेल्या सिनेमांमधून तत्कालीन रूढी बदलण्याचा संदेश कसा आला आहे याचा अभ्यास करणं जास्त योग्य ठरेल.
उदारमतवादी, पुरोगामी यांना विचारवंत या शिवीने हिणवलं जातं हे खरं आहे. पण अशा शिव्या देणाऱ्यांवरून संपूर्ण विचारधारेचा कल ठरवणं हे मूठभर अतिरेक्यांच्या वागण्यावरून एखाद्या समाजाला बदनाम करण्यासारखं आहे. शिवाय १९५० मधल्या परंपरावाद्यांनी याच शिव्या देणाऱ्यांना अतिरेकी पुरोगामीपणाबद्दल शिव्या दिल्या असत्या हे लक्षात घेतलं तर 'देवा त्यांना क्षमा कर, कारण त्यांच्या पणजोबांनी केली नसती' असंच म्हणावं लागतं.
19 Apr 2011 - 9:10 pm | मुक्तसुनीत
वि स खांडेकर त्यांच्या नेहमीच्या बाळबोध शैलीत म्हणत असत : "आहो , भारताची प्रगती ही मालगाडी आहे हो , 'मेल'गाडी नाही. ती आपल्या वेगानेच जायची !" ;-)
19 Apr 2011 - 11:37 pm | चिंतातुर जंतू
माझा मुद्दा हा निव्वळ एका चित्रपटाचा नव्हता, तर राजा परांजपे, पु.लं. अशा लोकमान्य व्यक्तींच्या मुख्य प्रवाहात राहून केलेल्या पुरोगामी अभिव्यक्तीबद्दलचा होता. अशा व्यक्ती आता दिसतात का? त्यांना सुशिक्षित समाजाकडून अशी लोकमान्यता मिळते का? मला तसं दिसत नाही.
तसाच माझा मुद्दा हा संकेतस्थळं आणि चित्रपट अशी ढोबळ तुलना करण्याचादेखील नव्हता. मी ज्या समाजघटकाबद्दल बोलतो आहे तो त्या काळात चित्रपट, आकाशवाणी, वृत्तपत्रं, साहित्यलेखन अशा विविध प्रकारे व्यक्त होत होता, त्यातून समाज प्रबोधन करत होता आणि त्यामुळे पुरोगामी विचाराला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देत होता. आज असा समाजघटक आंतरजालाच्या नव्या माध्यमातून व्यक्त होत आहे, पण तिथं पुरोगामी विचाराला प्रतिष्ठा आहे असं दिसत नाही. (इतर माध्यमांमध्ये परिस्थिती फार वेगळी नसावी).
:-) मी जेव्हा ‘सगळ्या नव्हे पण बऱ्याच पाश्चिमात्य देशांत’ असं वर म्हटलं होतं तेव्हा अमेरिका अपवाद म्हणून माझ्या मनात होती. उदा: प्यू रिसर्चतर्फे केल्या गेलेल्या या तौलनिक अभ्यासात धर्म हा अमेरिकेत जितका महत्त्वाचा आहे तितका युरोपात नाही असं म्हटलं आहे. या लेखात एका तक्त्यात अमेरिकन लोकांचा परंपराप्रेमी दृष्टीकोन दाखवला आहे. देश, कुटुंब किंवा धर्म या बाबतीत अमेरिकन लोक इतर पाश्चिमात्य देशांहून अधिक पारंपरिक वृत्ती बाळगतात असं त्यात दिसतं.
हे मान्यच आहे, पण माझा मुद्दा हा विशिष्ट समाजघटकाच्या उत्तरदायित्वाबद्दल होता. पाश्चिमात्य समाजात हा घटक असा समाज प्रबोधनापासून दूर गेला आहे किंवा पुरोगामी विचारांची हेटाळणी करण्यात धन्यता मानतो आहे असं वाटत नाही. ‘वंशवाद, गुलामगिरी, स्त्रियांच्या मूलभूत हक्कांच्या नकाराबद्दल कुणीही उघडपणे एक शब्द जरी उच्चारला तर त्याची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते.’ हा तुमचा मुद्दा तेच म्हणतो आहे.
पण पुढचं पाऊल हा आउटलायर नव्हता हाच मुद्दा आहे. त्या काळात पुलं-गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे हे आउटलायर नव्हते, तर लोकमान्य होते (म्हणून त्यांच्याबद्दल आज स्मरणरंजन होतं).
20 Apr 2011 - 2:55 am | मुक्तसुनीत
आजच्या काळात असे कोण समाजमान्य घटक आहेत त्याची व्याख्या करणं योग्य ठरेल असं वाटतं. ती व्याख्या केल्यावर मग त्यांच्या कृती आणि वक्तव्ये प्रागतिक ठरतील का नाही याचा उहापोह करता येईल.
मला गमतीची एक गोष्ट वाटते : सध्याच्या मराठी चित्रपटाचे धुरिणत्व निश्चितच उजव्या विचारसरणीच्या लोकांकडे गेल्याचा भास मला होतो. (पहा : "मी शिवाजी राजे भोसले बोलतोय" किंवा "झेंडा" ) इतर जी सन्मानप्राप्त नावे आहेत त्यांच्या राजकीय बाजू संदिग्ध तरी आहेत किंवा आपल्याला राजकीय चळवळ किंवा एकंदर समष्टीशी काही देणेघेणे नाही असं उघडपणे म्हणणारे लोक सध्या दिसतात (उदा. सचिन कुंडलकर). काहीही झालं तरी जब्बार पटेल आणि इतर डाव्या/प्रागतिक मानल्या गेलेल्यांच्या फळीचा प्रभाव निश्चितच कमी झालेला आहे. "डोंबिवली फास्ट" सारख्या चित्रपटाचा स्टान्स जरी सरळसरळ उजवा नसला तरी "मराठी माणसाच्या हिंसेचा उद्रेक" या अजेंड्याला काही विधायक स्वरूपाचा वास नाही.
डाव्या समजल्या जाणार्या जयंत पवारांसारख्या लोकांची नाटकं जेव्हा "उजव्या"लोकांच्या हाती चित्रपट बनवायला जातात तेव्हा त्यांचं काय नि कसं होतं ते मी अजून पाहिलेलं नाही पण फार बरं होत असेलसं वाटत नाही :)
20 Apr 2011 - 10:50 am | निनाद
असं वाटणं म्हणजे "जब्बार पटेलांच्या काळातले सोनेरी काही तरी होते ते आता नाही" असे का? :)
20 Apr 2011 - 1:01 pm | चिंतातुर जंतू
हा हा हा! प्रतिसाद आवडला. बाकी मुद्द्यांना सावकाश उत्तर देईन.
20 Apr 2011 - 6:07 pm | मुक्तसुनीत
असं वाटणं म्हणजे "जब्बार पटेलांच्या काळातले सोनेरी काही तरी होते ते आता नाही" असे का? Smile
असे सोनेरीपण तुम्हाला कुठे (किंवा कसे !) दिसले ते सांगावे.
20 Apr 2011 - 3:00 am | धनंजय
चांगली चर्चा व मुद्दे. वाचत आहे.
20 Apr 2011 - 7:04 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
20 Apr 2011 - 9:09 am | नितिन थत्ते
समाजात प्रबोधनाचं* काम नेहमीच आहेरे आणि नाहीरे आर्थिक वर्गाच्या सीमेजवळचे पण सीमेच्या आहेरे बाजूस असलेले लोक (मध्यमवर्ग) करतात असे मला वाटते. १९५० च्या सुमारास एका विशिष्ट सामाजिक गटातला बराच नवसुशिक्षित वर्ग या कॅटेगरीत होता. त्याही काळी उच्च मध्यमवर्ग (उच्च पदांवरील सरकारी अधिकारी, वकील, डॉक्टर) प्रबोधन वगैरे भानगडीत पडत नसे. तो वर्ग कुठेतरी देणग्या देऊन मोकळा होत असे आणि सामाजिक ऋण फेडल्याचे समाधान मानीत असे.
आज त्यावेळचा हा (विशिष्ट सामाजिक गटातला) वर्ग या सीमेवर राहिलेला नसून आहेरे सीमेच्या बराच आत (उच्च मध्यमवर्ग) शिरला आहे. त्यामुळे तो वर्ग प्रबोधनाच्या कामातून पूर्वीप्रमाणेच बाहेर पडला आहे. आणि ती जागा दुसर्या सामाजिक वर्गांनी घेतली आहे.
That is why liberals appear to have become Tory.
*प्रबोधन = समाज कसा असावा/नसावा याची चर्चा.
20 Apr 2011 - 12:40 pm | अविनाशकुलकर्णी
९२ पुर्विचा समाज व नंतरचा समाज अशी विभागणी आहे..
समता..पुरोगामी हे समाजवादी लोककल्याण राजवटीच्या कल्पना होत्या..
टी.व्ही मुक्त झाला..ईतर्नेटचा उदय या मुळे सा~यांना एक व्यास पिठ मिळाले..
आज पुरोगामी व परंपरावादी. दोघानाहि अभिव्यक्ति साठी समान व्यास्पिठ आहे..
पुरोगाम्यांचे खरे रुप समोर आले आहे..
आंफुशा च्या नावाचा गजर करीत..मंदीर समित्या..पतपेढ्या..सावकारी करीत लोकांना लुटायचे..जाति पातिचे राजकारण सारेच लोकांना समजले आहे..धर्म निरपेख्शतेचे बेगडी स्वरुप हि समजले आहे..
आता सत्ता..पैसा.हितसंबंध याच्या रक्षणाच्या लढाया आहे...असे चित्र दिसत आहे.
20 Apr 2011 - 2:28 pm | योगप्रभू
इतिहासापासून धडे घेण्यात मराठी माणूस कमी पडतो असा सरसकट निष्कर्ष काढावा का?
..स्पष्टपणे होय.
समाजातील प्रवाहांचे प्रतिबिंब चित्रपटांतून पडते, की चित्रपटातील कल्पितापासून समाजाला बदलांची प्रेरणा मिळते, याबद्दल माझ्याच विचारांचा गुंता आहे. आधी कोंबडी, की आधी अंडे, असा हा मनोसंघर्ष आहे. त्यामुळे त्याबाबत काही बोलत नाही.
कोणत्याही समाजात प्रबोधनाची सुरवात ही अभिजनवर्गातून होते आणि नंतर बदलाची मानसिकता तळाच्या वर्गांपर्यंत झिरपत जाते. (पर्कोलेशन थिअरी) मराठी समाज याआधी याच वाटेने गेलेला आहे. आज मात्र बदलांचा उत्प्रेरक ठरणारा हा उच्चवर्ग सामाजिक सुधारणांपासून खूप दूर गेला आहे. कासवाप्रमाणे त्याने आपले डोके आणि पाय कवचात आकसून घेणे पसंत केले आहे. आणि त्याला तसेच करणे भाग पडावे, अशी स्थितीही निर्माण केली गेली आहे. त्याचा एक दुष्परिणाम असाही दिसतोय, की जातीअंताची भावना प्रबळ होण्यापेक्षा जात्याभिमानाची टोके अधिकच तीक्ष्ण होत आहेत. एकूण मराठी समाजाची वीण उसवत असताना कुणालाही त्याची फिकीर नाही. म्हणजेच समाज म्हणून आपण एकसंध राहिलेलो नाही.
जेव्हा 'तुम्ही तुमच्यापुरते बघा, आमच्यात लक्ष घालू नका' ही भावना प्रबळ असते तेव्हा प्रबोधन कोण, कुणाचे आणि का करणार?
20 Apr 2011 - 5:33 pm | चिंतातुर जंतू
मी थोडा उलट तर्क चालवून असं म्हणतो आहे: आजच्या काळात पुरोगामी म्हणता येतील असे कोणते घटक आहेत? आणि त्यांना किती समाजमान्यता आहे? तर मला कुणी दिसत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि त्यावरून उठलेलं रान हा पटकन आठवणारा ताजा प्रकार. एरवी लोकमान्यता असणारे जयंत नारळीकर या आणि राशिभविष्य अशा दोन मुद्द्यांवर लोकमान्य नाहीत. बाकी मग एवढ्यातेवढ्याशानं अस्मिता/भावना दुखावणं बोकाळलं आहे आणि त्याविरोधात जे बोलतात त्यांना लोकमान्यता नाही.
पूर्वीचा मध्यमवर्ग आता उच्च झाला आणि आपली सामाजिक बांधिलकी हरवून बसला:
मला असं वाटतं की आर्थिक उतरंड पाहण्यापेक्षा समाजातला बुद्धिजीवी वर्ग कोणता असं पहावं. अगदी पाश्चिमात्य समाजातदेखील आर्थिक उतरंडीत सर्वजण वर सरकले तरी पुरोगामित्वाची धुरा (आता सधन झालेला) बुद्धिजीवी वर्ग सांभाळतो असं दिसतं. हे आता आपल्याकडे का होत नाही?
सध्याचा मराठी चित्रपट: एखादा परेश मोकाशी पुरोगामी म्हणता येईल अशी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ बनवतो, पण त्याला पुढे स्मरणरंजनाला पुरेशी ठरेल अशी लोकमान्यता नाही.
अवांतर: जयंत पवारांच्या 'अधांतर'चं ‘लालबाग परळ’ हे दु:स्वप्न म्हणता येईल असं भयाण रूप होतं!
20 Apr 2011 - 6:34 pm | मुक्तसुनीत
पुरोगामी विचारांना समाजमान्यता नाही असे म्हणणे या विधानात नाही म्हण्टलं तरी सरसकटपणा हा येतोच.
लोकप्रिय असलेल्या काही पुरोगामी गोष्टींची उदाहरणे विचारात घेऊ.
१. अनिल अवचट : कृपया ज्ञानदा देशपांडे यांचा लेख पाहावा ;-)
२. "अधांतर" सारख्या गोष्टींचा चित्रपट बनवून जरी मातेरे केलेले असले तरी , गिरणी कामगारांचा प्रश्न मांडणार्या कलाकृतीकडे धंद्याच्या दृष्टीने लक्ष देणे हेच अशा गोष्टींच्या लोकप्रियतेचे द्योतक बनते.
३. युनिक फीचर्स, राजहंस प्रकाशन , लोकवाङ्मय गृह यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघतात. एकंदर वाचक संस्थेच्या मानाने हा आकडा तोकडा असला तरी अशा गोष्टींची वाढती मागणी कशाची द्योतक आहे ?
४. अण्णा हजारे :) संख्याबळावरच लोकप्रियता मोजायची असल्यास , हे उदाहरण चालू शकेल का ?
20 Apr 2011 - 9:54 pm | सुधीर१३७
इतका गहन गंभीर विषय व त्यावरील अति गहन अति गंभीर चर्चा वाचून अंमळ थकवा आला.............. :(
पण ह्या प्रतिक्रियेने काडी करायची संधी दिली, बरे वाटले.......... :)
>>>>>>४. अण्णा हजारे :) संख्याबळावरच लोकप्रियता मोजायची असल्यास , हे उदाहरण चालू शकेल का ?
...........
.... खरे तर चालायला काय, पळायला पण हरकत नव्हती; पण (संख्याबळाबाबत) अण्णांनाच विचारले तर बरे... :wink:
21 Apr 2011 - 10:19 am | नंदन
विचार करायला लावणारा लेख आणि प्रतिक्रिया. बरेचसे मुद्दे वर येऊन गेले आहेतच मात्र पूर्वीच्या बुद्धिजीवी/अभिजन वर्गाने - अनास्थेपोटी म्हणा किंवा एक प्रतिक्रिया म्हणून म्हणा - स्वीकारलेले फाऊस्टियन बार्गेन हा एक भाग झाला. अलीकडेच एका जालस्नेह्याशी झालेल्या चर्चेत ओरहान पामुकच्या एका लेखाची आठवण निघाली होती. दुसरी बाजू म्हणून त्यातला हा परिच्छेद विचारात घ्यावा असा -
That said, the drama (पहिल्या महायुद्धात अर्मेनियन लोकांविरूद्ध तुर्की सैन्याने चालवलेली जिनोसाईड तुर्कस्तानचे सरकार/मीडिया/सामान्य जनता नाकारत आले आहेत. पामुकने त्याविरूद्ध मत मांडल्यावर त्याच्याविरूद्ध राष्ट्राच्या प्रतिमेला काळं फासल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ह्या एकंदरीत घटनाक्रमाला उद्देशून तो ड्रामा म्हणत असावा.) we see unfolding is not, I think, a grotesque and inscrutable drama peculiar to Turkey; rather, it is an expression of a new global phenomenon that we are only just coming to acknowledge and that we must now begin, however slowly, to address. In recent years, we have witnessed the astounding economic rise of India and China, and in both these countries we have also seen the rapid expansion of the middle class, though I do not think we shall truly understand the people who have been part of this transformation until we have seen their private lives reflected in novels. Whatever you call these new élites—the non-Western bourgeoisie or the enriched bureaucracy—they, like the Westernizing élites in my own country, feel compelled to follow two separate and seemingly incompatible lines of action in order to legitimatize their newly acquired wealth and power. First, they must justify the rapid rise in their fortunes by assuming the idiom and the attitudes of the West; having created a demand for such knowledge, they then take it upon themselves to tutor their countrymen. When the people berate them for ignoring tradition, they respond by brandishing a virulent and intolerant nationalism. The disputes that a Flaubert-like outside observer might call bizarreries may simply be the clashes between these political and economic programs and the cultural aspirations they engender. On the one hand, there is the rush to join the global economy; on the other, the angry nationalism that sees true democracy and freedom of thought as Western inventions.
अवांतर - अमेरिकन राजकारणाचा वर उल्लेख आला आहे, त्या अनुषंगाने ह्या लेखातील पाचवा धडा/मुद्दा रोचक ठरावा.
21 Apr 2011 - 10:50 am | चिंतातुर जंतू
मी वर म्हटलं होतं त्याप्रमाणे पुरोगामित्वाची कसोटी ज्यावर लागते ते घटक प्रत्येक काळात वेगवेगळे असतात. त्या अर्थानं मला अवचट (किंवा नारळीकरसुद्धा) गेल्या पिढीचे पुरोगामी वाटतात. म्हणजे 'पुलंनंतर अवचट' ही उतरंड बरोबरच वाटते, कारण ते अजूनही १९७०च्या दशकातले पुरोगामी असल्यासारखी मतं मांडत असतात. उदा: हे पहा. आता एकविसाव्या शतकात हे जरा बाळबोध होऊ लागतं.
पण अशा प्रश्नांवरच्या चित्रपटाला लोकमान्यता मिळताना दिसत नाही.
पण असं खरंच आहे का? मला माझ्या आसपासचा मराठी माणूस असं फार काही वाचतो असं आढळत नाही. जे वाचतात ते मुख्यतः जुन्या पिढीचे असतात (वय वर्षं ५०-६० आणि पुढे) आणि थोडे अपवादात्मक तरुण. पण लोकमान्यता दिसत नाही.
अवांतरः आमच्या पिढीला इतिहासाचं ओझं नाही किंवा सामाजिक म्हणजे चांगलं हे फार दांभिक आहे असं म्हणणारा सचिन कुंडलकर कदाचित आजचा पुरोगामी आहे, पण त्याला लोकमान्यता नसावी.
21 Apr 2011 - 5:56 pm | चिंतातुर जंतू
पामुकच्या (तुर्की) समाजाला ज्याविषयी भाष्य करणंदेखील अप्रिय वाटतं त्या आर्मेनिअन वंशसंहाराविषयी आवाज उठवणारा पामुक माझ्या लेखी पुरोगामी आहे आणि नोबेल पुरस्कार मिळूनदेखील त्याला तुर्कीमध्ये किती लोकमान्यता आहे याविषयी मला शंका आहे. शिवाय, मला मूळ लेखात अभिप्रेत असणार्या आपल्याकडच्या नेमस्त, उदारमतवादी आणि सर्वसमावेशक पुरोगाम्यांशी त्याचं नातं लागतं अशीही माझी धारणा आहे. त्यामुळे लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद.
पाश्चिमात्य आधुनिकता आणि कडवं देश/संस्कृतीप्रेम या दोन दरडींवर काहीशा अवघडलेल्या अवस्थेत पाय ठेवून महासत्ता बनू पाहणार्या आपल्या या लाडक्या मध्यमवर्गाचं सच्चं चित्रण जोवर आपल्या वाङ्मयात होत नाही तोवर त्यांना समजून घेणं अवघड आहे, हे त्याचं मतदेखील अत्यंत रोचक आहे. याच अंगानं मला नारळीकर किंवा अवचट जुन्या पिढीचे वाटतात. त्यांच्याविषयी तुच्छता न बाळगता आणि या नव-मध्यमवर्गाविषयीही तिटकारा न बाळगता ज्यांना हा वर्ग उमजेल, असे नेमस्त पुरोगामी मला स्वत:लासुद्धा महाराष्ट्रात पहायला आवडतील. म्हणून पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.