बॅचलर्स भाजणीचे वडे

सूड's picture
सूड in पाककृती
13 Apr 2011 - 8:51 am

कुंदन यांचा कट्ट्यावरचा उतारा, स्पा यांची भेळ वैगरे पाकृ पाहून आमचे (पक्षी: माझे) हात शिवशिवू लागले. त्यात स्पाने तर कहरच केला, माणसाने फेमस व्हावं पण किती?? त्यांनी आयोजित केलेला कट्टा अगदी सुफळ संपूर्ण झाला हे पाहून आमची जळजळ आणिकच वाढली. कट्टा केला तोही पुरेपूर कोल्हापूरमध्ये ?? यावरून आम्ही गणित बांधले की हा माणूस कानामागून येऊन भलताच 'तिखट' होऊ बघतो आहे आणि मग पूर्वी जसं असुर, दैत्य .....नको आपण मराठीत डेमॉन्स म्हणूया. हां, तर पूर्वी जसं या डेमॉन्स मंडळीनी तप सुरु केलं की, इंद्राला....म्हणजे देवराज इंद्रा, पवारा'ज इंद्रा नाही. तर, जसा इंद्राला चिंतायुक्त भीतीयुक्त राग यायचा तसा आम्हालाही आला. आम्ही जर पक्या पेताड असतो तर एव्हाना सुरेच्या पिंपातच उडी मारते झालो असतो आणि गप्प बसलो असतो. पण आमच्याने ते शक्य नव्हते. मग याचे प्रत्युत्तर द्यायचे कसे ? आम्ही एक निरीक्षण नोंदवले की या माणसाने फेमस होण्यासाठी सुरुवातीपासूनच खाण्यासंबंधी वजनासंबंधी धागे काढले आहेत. उशिरा का होईना आमच्या लक्षात आले की आम्हालाही अन्नपूर्णेचा वर आहे. मग काय?? घेतली पळी आणि राहिलो उभे. विष्णु, ब्रम्हदेव वैगरे मंडळीना राग आला की त्यातून जसे असुर (मराठीत डेमॉन्स) जन्माला यायचे तशी ही पाकृ जन्माला आली, बॅचलर्स भाजणीचे वडे.
तर हे वडे करताना राग येणं अथवा रागीट असणं सर्वात महत्त्वाचं, नाहीतर वडे फुगत नाहीत म्हणे !!

साहित्य:
अर्धा किलो वड्यांची भाजणी (इकडे* तयार मिळते)
एक मोठा कांदा.
सुपारी एवढा गूळ किंवा दोन (चहाचे) चमचे साखर
चिमुटभर हळद
चवीला मीठ.
तळणीसाठी तेल.

कृती:
एक मोठा कांदा परातीत किसून घ्यावा. त्यात सुपारी एवढा गूळ किंवा दोन (चहाचे) चमचे साखर घालावी. अंदाजे मीठ घालावे, म्हणजे कांद्याला नीट पाणी सुटेल. चिमुटभर हळद घालून मग अर्धा किलो वड्यांची भाजणी हळूहळू त्या कांद्यात मिसळावी. कांद्याच्या अंगच्या पाण्यात भाजणी नीट मिसळून घ्यावी. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालत साधारण घट्ट भिजवावे. आता हे मिश्रण एका भांड्यात उबदार जागी ५-६ तास ठेवून द्यावं.

आता वडे करायला घावेत, कसे ? सांगतो, तर केळीचं पान (इकडे* मिळतं) अथवा प्लास्टिकची पिशवी आपल्या सोयीच्या आकारात फाडून/ कापून घ्यावी. आता भिजवलेल्या मिश्रणाचा लिंबा एवढा गोळा पाण्याचा हात लावून घ्यावा आणि तो गोलाकार थापत/ पसरत न्यावा. बरेच लोक वडा थापून झाला की त्याला मध्यभागी छिद्र पाडतात, पण गविंनी म्हटलेलंच आहे छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति. म्हणून मी काही छिद्र पाडलं नाही. म्हटलं छिद्र पाडलं नि वडा कढईच्या तळाशी जाऊन बसला तर काय सांगा??

आता एका कढईत तेल तापत ठेवावं, आम्ही नमनालाच घडाभर तेल घातल्याने जे काही बेतास बात तेल शिल्लक होतं ते ओतलं. आता हे तेल नीट तापलं की वडे मध्यम आचेवर बदामी/ सोनेरी/ खरपूस अश्याच कुठल्याशा रंगावर तळावेत.

खाताना काळ्या वाटाण्याची उसळ या वड्यासोबत वाढावी, सामिषाहारींनी त्यांना जे आवडेल ते वड्यांसोबत खाण्यासाठी घ्यावं.

वाटाण्याच्या उसळीची पाकृ नंतर सवडीने देण्यात येईल.

टीप: 'फोटोतली कढई कडेला जराशी काळसर दिसत्ये, नीट घासली नाही का ??' असा खवचट प्रतिसाद कृपया कोणी देऊ नये. वडे तळून झाल्यावर ती नीट घासून ठेवण्याची खबरदारी घेण्यात आलेली आहे.

पोटटीप: हे वडे तांदळाच्या खिरीसोबत छान लागतात असा माझा अनुभव आहे. अर्थात कुणी कसं खावं हे सांगायचा अधिकार मला नाही, मी फक्त निरिक्षण नोंदवलं.

तळटीप:
हे बॅचलर्स वडे आहेत म्हणून मी भाजणी कशी करावी हे दिलेलं नाही, मला माहित असलेलं भाजणीचं साहित्य व कृती खालीलप्रमाणे;
अर्धा किलो गहू,
पाव किलो साधे तांदूळ,
पाव किलो उकडा तांदूळ,
पाव किलो ज्वारी,
१२५ ग्रॅम हरभरा डाळ,
१२५ ग्रॅम उडीद डाळ,
थोडे धने बडीशेप.
आता गहू वगळता इतर सर्व साहित्य धुवून वाळवून घ्यावे आणि मंद आवेवर खरपूस भाजावे. थंड झाले की मिसळून भरड दळून आणावे. ( इकडे* भैयाला वड्यांची भाजणी आहे म्हटलं की नीट दळून देतो.)

यात गणपाभौ, जागुतै आदि बल्लवाचार्य/ सुगरण मंडळींनी काही ज्ञानात भर घातल्यास उत्तमच.

जाता जाता: फोटु कसेही आले असले तरी चव उत्तम होती, फोटो काय खाता येतात का ?

शब्दार्थ: इकडे*= बदलापूर (याचाच अर्थ तिकडे म्हणजे अदर दॅन बदलापूर).

प्रतिक्रिया

स्पा's picture

13 Apr 2011 - 9:24 am | स्पा

भाजणीचे वाडे हि त्यातल्यात्यात दुर्लक्षित पाक्रु दाखवल्याबद्दल हभीणन्दन
हे वडे तांदुळाच्या खिरी बरोबर झकास लागतात

फोटो जरा चांगले टाकता आले असते, असो पण तळ टीप (पक्षी : टीपा)टाकल्यामुळे नो कमेंट्स :)

गवि's picture

13 Apr 2011 - 9:58 am | गवि

फोटोत काय वाईट आहे रे स्पावड्या. सगळे काय तुझ्यासारखे प्रोफेशनल असतात काय.

मला तर फोटो अत्यंत चांगले आणि स्पष्ट वाटले.

पाककृतीविषयी..

प्रत्यक्ष बनणारे वडे खमंग असतील याची खात्री फोटोंवरुन पटते आहेच पण रेसिपी लिहायची स्टाईल तर त्याहून अत्यंत जास्त खमंग आहे. अशा खुसखुशीत पद्धतीने लिहिलेली पाकृ वाचताना पदार्थ खाल्ल्याचा अर्धा आनंद मिळतो.

* इकडे = बदलापूर हे फार्फार आवडले. इतके दिवस मी मिपावर पाकृ आणि प्रक्रि वाचताना नुसतेच "इकडे अमुक मिळत नाही", "इकडे तमुक मिळते" एवढेच वाचायचो, आणि हे इकडे म्हणजे नेमके कुठे या बुचकळ्यात पुढे वाचत राहायचो. एकूण परदेश एवढं कळायचं आणि आपण साले इथेच बावडीत पोहणारे बेडूक असं फीलिंग यायचं.

बदलापूरलाही "इकडचा" दर्जा मिळाल्याचा हर्ष जाहला. आता मीही इकडे पोह्याचे पापड, बोंबलाची चटणी वगैरे कसे छान मिळतात ते लिहू शकेन. ;)

झक्कास पाकृ रे सूड.

इकडे = बदलापूर हे फार्फार आवडले. इतके दिवस मी मिपावर पाकृ आणि प्रक्रि वाचताना नुसतेच "इकडे अमुक मिळत नाही", "इकडे तमुक मिळते" एवढेच वाचायचो, आणि हे इकडे म्हणजे नेमके कुठे या बुचकळ्यात पुढे वाचत राहायचो. एकूण परदेश एवढं कळायचं आणि आपण साले इथेच बावडीत पोहणारे बेडूक असं फीलिंग यायचं.

हॅ हॅ हॅ

ये बाकी खरं :d

मृत्युन्जय's picture

13 Apr 2011 - 10:04 am | मृत्युन्जय

पाकृ आवडली की नाही ही दुय्यम गोष्ट. साला आपल्याला लेख लै भारी आवडला. *तिकडे पण भाजणी तयार मिळते बरं का

*तिकडे = पुणे (या प्रतिसादाकरिता) :)

सविता's picture

13 Apr 2011 - 10:40 am | सविता

लयच भारी...खमंग.. पाकॄ आणि लेख पण!

लवकरच प्रयोग करण्यात येईल.

पियुशा's picture

13 Apr 2011 - 11:52 am | पियुशा

मस्त हो का का :)

नगरीनिरंजन's picture

13 Apr 2011 - 12:30 pm | नगरीनिरंजन

पाकृ सर्वार्थाने आवडली. फोटोही चांगलेच आहेत. वडे पाहून वडेसागोती खाण्याची अनावर इच्छा निर्माण झाली आणि खळ्कन पाणी जमा झालं तोंडात.
वड्यांसारखेच खुसखुशीत वर्णन. विशेषतः इकडे-तिकडे, असुर-डेमन्स आणि गविंच्या (सहीतल्या) छिद्राचा वापर करून केलेली टिप्पणी तर लईच खास.

नंदन's picture

13 Apr 2011 - 12:56 pm | नंदन

पाकृ सर्वार्थाने आवडली. फोटोही चांगलेच आहेत. वडे पाहून वडेसागोती खाण्याची अनावर इच्छा निर्माण झाली आणि खळ्कन पाणी जमा झालं तोंडात.
वड्यांसारखेच खुसखुशीत वर्णन. विशेषतः इकडे-तिकडे, असुर-डेमन्स आणि गविंच्या (सहीतल्या) छिद्राचा वापर करून केलेली टिप्पणी तर लईच खास.

पूर्ण सहमत!

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2011 - 12:40 pm | परिकथेतील राजकुमार

छान छान
ह्या विकांतास करुन बघितल्या जाईल.

महत्वाचे :- हे वडे सदर लेखकानेच बनवले असल्याचा पुरावा काय ? ;)

अवांतर :- पाकृच्या आडून आपण बॅचलर असल्याची केलेली जाहिरात खटकली.

>>महत्वाचे :- हे वडे सदर लेखकानेच बनवले असल्याचा पुरावा काय ?
त्याचं कायै, पाकृ करतानाचे फोटु टाकलेच तरी फोटुतील व्यक्ती सदर लेखकच आहे कशावरुन हा प्रश्न उद्भवण्याचं नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील पाककृतीत पॅनकार्ड, पासपोर्ट इत्यादिंची स्कॅन्ड कॉपी पुराव्यादाखल जोडण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करु. ;)
>>अवांतर :- पाकृच्या आडून आपण बॅचलर असल्याची केलेली जाहिरात खटकली.
ती सदर जुन्या-जाणत्या प्रतिसादकास जाहिरात वाटली याहून दुसरा खेद तो काय.

अतिअवांतरः इथे बॅचलर पाकृ टाकणार्‍यांची लग्नं हा हा म्हणता सहज ठरतात म्हणे अशी बातमी उडत उडत आली खरी !! अर्थात म्हणून आम्ही ही बॅचलर पाकृ टाकली असा समज कोणाही प्रतिसादकाने/ प्रतिसादकीणीने करुन घेऊ नये.

गणपा's picture

13 Apr 2011 - 12:56 pm | गणपा

आमच्या घरी अगदी असेच करतात. फक्त कांद्या ऐवजी काकडी वापरतात.
मस्तच. रविवार दुपार, असे टम्म फुगलेले वडे, सोबत मटण/कोंबडीचा रस्सा आणि सोलकढी. नंरत चंचु तशीच उघडी पद लांबवियले...... करत घेतलेली वामकुक्षी.
बास अजुन काय पाहिजे. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच. :)

मराठमोळा's picture

13 Apr 2011 - 1:06 pm | मराठमोळा

अरे वा.. :)

पण हे वडे आहेत की पुर्‍या? ;)

सूड's picture

13 Apr 2011 - 3:10 pm | सूड

मी वडेच केलेले आणि वडे म्हणूनच पाकृ टाकलीये. तुम्ही पुर्‍या समजून वाचलेत, पाहिलेत, केलेत तरी हरकत नाही. ;)

रमताराम's picture

13 Apr 2011 - 1:37 pm | रमताराम

छान. या निमित्ताने आमच्या मेव्याने केलेल्या भाजणीच्या वड्यांची नि 'तेराव्याचे वडे खाणार्‍या' आमच्या ग्रुपची आठवण झाली. :)

मेघवेडा's picture

13 Apr 2011 - 4:00 pm | मेघवेडा

ओ काका, आठवण करू नका हो देऊ.. हल्ली बरेच दिवस झाले काही कांट्र्याक मिळालेलं नाहीये.. ग्रुपही तसा शांत झालेला दिसतो.

रमताराम's picture

13 Apr 2011 - 9:47 pm | रमताराम

पाडा की विकेट एखादी. आणि हो अलिकडे एका आयडीने आत्महत्त्या केली असे ऐकले. त्या आयडीचे कांट्र्याक नाय गावले का. आम्ही वाट बघू र्‍हायलोय राव. ;)

(नाना वाचत असशील तर ह. घे रे बाबा. नाहीतर माझ्याच तेराव्याचे वडे खायला घालशील सम्द्याना.)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Apr 2011 - 5:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>आम्ही जर पक्या पेताड असतो तर एव्हाना सुरेच्या पिंपातच उडी मारते झालो असतो आणि गप्प बसलो असतो.
मी तर ऐकलेय की सुरेच्या अमलाखाली माणूस गेला की गप्प बसत नाही. काही ना काही बोलतो, करतो.

बाकी पहिला परिच्छेद उत्कृष्ट. शालजोडीतले छान मारले आहेत. इतर पंचेस पण भारी. मस्त शैली. लोकांच्या जळजळीतून इनो चे बुडबुडे निर्माण होतात, तुझ्या जळजळीतून हे वडे निर्माण झाले हे उत्तम झाले.

पुढच्या कट्ट्याला असलेच वडे बनवून आण. म्हणजे आम्ही नव"वडे"परिप्लुत होऊ :-)
(वरील कोटी अत्यंत भिकार आणि चुकीची असूनसुद्धा करण्याचा मोह आवरला नाही)

वि.मे.

>>> मी तर ऐकलेय की सुरेच्या अमलाखाली माणूस गेला की गप्प बसत नाही. काही ना काही बोलतो, करतो.

:) :) :)

सानिकास्वप्निल's picture

13 Apr 2011 - 5:53 pm | सानिकास्वप्निल

मस्त आहे पा़कृ आणी लेख :)

प्रभो's picture

13 Apr 2011 - 6:43 pm | प्रभो

झ का स!!

पैसा's picture

13 Apr 2011 - 6:45 pm | पैसा

वडे चांगले झालेले दिसतायतच , पण पाकृ सुद्धा मस्त खमंग झालीय. वाटाण्याची उसळ बनवून झाली का नाही?

असुरांना डेमन्स म्हणणार्‍या सुध्याचा झाईर णीसेद!!! लेका, तुझ्या वड्यांच्या पारिपत्यासाठी लंकेहून एक डिव्हिजनच पाठवतो आता!! :-)

लेख जमलाय फक्कड, वडेही असेच जमून आले असतील तर झ्याक्स!!!
पराशी अपूर्णांकात सहमत, म्हणजे बॅचलर असल्याच्या झाईरातीसाठी सहमत पण खटकण्याबद्दल नाय!!!

तुझी झायरात चालू दे रे सुध्या, अशीच दणदणीत झाईरात झाली पायजेल!!!! :D

--असुर
क्याप्टन,
101st सिंहलद्वार डिव्हिजन,
लंका (रावणाची), बु.

पुष्करिणी's picture

13 Apr 2011 - 7:31 pm | पुष्करिणी

पाकृ छानच, वाटाण्याची उसळही पटकन येउदेत

एक नंबर सूड..... वडयाचा ले़ख आणि लेखाचा वडा.. उत्तम केला.......

धमाल मुलगा's picture

13 Apr 2011 - 10:17 pm | धमाल मुलगा

वांग्यांचं तेल वड्यावर म्हणावं का? ;)

रें सुधांशुंऽऽ,
बरें लिहितोंस कीं! मग हांत आखडतां कशांस असतों बरें? ;)

दीविरा's picture

13 Apr 2011 - 10:20 pm | दीविरा

ह्यालाच मालवणी मंडळी कोंबडी वडे म्हणतात बहुदा .

झकास :)

मेघवेडा's picture

13 Apr 2011 - 10:24 pm | मेघवेडा

अज्ञानात सुख असतं म्हणे! :)

पाकृच्या आडून काय काय चाल्लंय ब्यॅचलरांचे?? आत्ताच तर नि दे च लग्न झालं.
आता मेव्या, स्पावड्या आणि हा सुधांशु..! हम्म चालूद्या.

बाय द वे.. या वड्यामध्ये लाल मिरची पावडर अजिबात नाही घातली?? का?

धमाल मुलगा's picture

13 Apr 2011 - 10:26 pm | धमाल मुलगा

सुरुवात तर प्रभ्यानं केली होती ना? ;)

सूड's picture

14 Apr 2011 - 8:40 am | सूड

>>बाय द वे.. या वड्यामध्ये लाल मिरची पावडर अजिबात नाही घातली?? का?
नाही घातली कारण मला ही अशीच पद्धत माहीत आहे, एकदा तुम्ही म्हणता तसं करुन बघेन. तसंही, तिखट खाण्याच्या बाबतीत मी मुळातच मागे असतो. गोड हवं तेवढं वाढा !! :D

रेवती's picture

13 Apr 2011 - 10:54 pm | रेवती

भाजणीइतकीच खमंग पाकृ!
ब्याचलर्स म्हटले की सगळ्या गोष्टी माफ! उदा. वड्यांचा आकार, रंग, तेलाचे प्रमाण इ. मग ते इकडचे ब्याचलर्स असू दे नाहीतर तिकडचे! पाकृ सांगण्याची भाषा बघितल्यास पुणेरी लोकांपेक्षा तुम्हा बदलापूरच्या लोकांना खोचकपणा कसा बरोब्बर जमतो त्याचा लिखित पुरावाच जणू!;)
हाच प्रतिसाद धागाकर्त्यास हवा त्याप्रकारे टंकून मिळेल पण त्यासाठी वडे पार्सल करावे लागतील.;)

पुणेरी लोकांपेक्षा तुम्हा बदलापूरच्या लोकांना खोचकपणा कसा बरोब्बर जमतो त्याचा लिखित पुरावाच जणू!

और ये लगा रेवतीका सिक्सर!!

मृत्युन्जय's picture

14 Apr 2011 - 3:40 pm | मृत्युन्जय

_/\_ _/\_ _/\_

सूड's picture

14 Apr 2011 - 4:01 pm | सूड

>>पाकृ सांगण्याची भाषा बघितल्यास पुणेरी लोकांपेक्षा तुम्हा बदलापूरच्या लोकांना खोचकपणा कसा बरोब्बर जमतो त्याचा लिखित पुरावाच जणू!

या कॉम्प्लिमेंटसाठी धन्यवाद रेवतीताई. पानं वाढली, माणसं जेवायला बसली की ज्यांनी स्वयंपाक केला ती मंडळी, मीठ नीट पडलंय ना, साखर-गूळ जास्त काही नाही ना झालं असं विचारत उभी असतात आणि एकदा सगळं नीट असल्याच्या होकारार्थी माना हलल्या, भुर्क्यांचे आवाज येऊ लागले की निर्धास्त होऊन एक समाधानी हास्य येतं तसं माझं हा प्रतिसाद वाचून झालंय. हा प्रतिसाद न येतो तर काही कमी पडलंय का अशी उगीच रुखरुख राह्यली असती. :)

काय बाबा मज्जाये, एका मुलाची, स्वयंभू लोकांनी पण मान्य केलंय आता बदलापूरवाले सुद्धा कमी नाहीत ते , पक्षी तश्या पावत्या दिल्यात बर्याच जणांनी

अग्गो बाऽऽई, मुलगा खरंच मोठा झाला, शहाणा झाला हो! :)

रेवती's picture

14 Apr 2011 - 8:10 pm | रेवती

जरा जास्तच शहाणा झालाय तो! हॉलमध्ये येउ नको म्हणून सांगितले होते त्याला.......
त्याने भेळेचा धागा काढून स्वत:ची झायरात करून घेतली. आता सुधांशुचा नंबर (झायरात करण्याचा) असताना पुढेपुढे करायचे म्हणजे काय? होईल बाबा, तुझंही लग्न होइल जरा थांब की! त्या भेळेच्या चटण्या करून चव घ्यायला मुलींना वेळ तर देशील की नाही? दुसर्‍यांच्या मुली पाहण्याच्या कार्यक्रमात असा बिब्बा घालणं चांगलं नव्हे. बरं, याला सगळ्याच मुली पसंत.
ते काही नाही, पुढच्या दाखवण्याच्या कार्यक्रमाला एक मुलगा सोडून बाकीच्यांना किर्तनाला पाठवून द्यायचं बरं का यशोधरा!;)

स्पा's picture

14 Apr 2011 - 8:14 pm | स्पा

रेवती आजी,

तुझ्या त्या नातीच्या मैत्रिणीच काय झालं ग पुढे?

रेवती's picture

14 Apr 2011 - 9:48 pm | रेवती

जाऊ दे! तिचा विचार सोडून दे.
पसंत केलय तिनं एका ..........मुलीला!

शिल्पा ब's picture

15 Apr 2011 - 2:13 am | शिल्पा ब

नसतं पसंत केलं दुसर्‍या मुलाला तर स्पाचा विचार केला असता का हा स्पा उगाच लैच मोठ्या उड्या मारु र्‍हायलायं? ;) त्याच्या औट ऑफ द लीग का काय म्हणतात ते...सहज आपली चॉकशी केली.

यशोधरा's picture

14 Apr 2011 - 9:11 pm | यशोधरा

LOL रेवती!

अग्गो बाऽऽई, मुलगा खरंच मोठा झाला, शहाणा झाला हो!
धन्यवाद
:D
हे शालजोडीतले समजावे का?

स्पा, तुझी काहीतरी गल्लत होते आहे. मी प्रतिसाद सुधांशूच्या प्रतिसादावर (जो त्याने रेवतीला दिलाय) त्यावर दिलेली आहे.
तुला नव्हे.

तू शहाणाच काय, पण पक्का बेरकी आहेस हे तू पहिला धागा काढून बर्‍याच जणांना घोळात घेतले होतेस तेह्वाच लक्षात आले! :D आता, हे शालजोडीतले. :D

रामदास's picture

15 Apr 2011 - 7:53 am | रामदास

माझी सासुरवाडी.
वडे चांगले झाले आहेत.

शिल्पा ब's picture

14 Apr 2011 - 7:17 am | शिल्पा ब

वडे पुर्यांसारखे झाले दिसताहेत...तुम्ही म्हणता वडे तर वडे!!
आमच्या "इकडे " गहू मिळत नसल्याने भाजणी करायला जमणार नाही आणि तयार पीठसुद्धा मिळत नाही त्यामुळे फोटोवरच समाधान. (फोटो बरे आलेत.)

ब्याचलर असण्याची अशी जाहीरात करण्यापेक्षा मंडळात नावनोंदणी केलेली बरी पडेल.;)

चिंतामणी's picture

14 Apr 2011 - 9:36 am | चिंतामणी

ह.ह.पु.वा.

=))

हे वडे तांदुळाच्या खिरी बरोबर झकास लागतात

हे लिहून काय सुचवत आहात??? ;)

धमाल मुलगा's picture

14 Apr 2011 - 12:14 pm | धमाल मुलगा

तांदळाची खीर करणारी कोणी सुगरण तुमच्या पाहण्यात आहे का जिला लग्नासाठी स्थळं पाहतायत. ;)

__/\__

मुग गिळून बसणे उत्तम

प्राजक्ता पवार's picture

14 Apr 2011 - 3:30 pm | प्राजक्ता पवार

झक्कास आहे पाकृ व लेखदेखील .

sneharani's picture

15 Apr 2011 - 10:19 am | sneharani

झकास!! लेख पण मस्त!

स्मिता.'s picture

14 Apr 2011 - 9:48 pm | स्मिता.

काय मस्त दिसत आहेत ते वडे! एकूण एक वडा फुगला आहे... मस्तच.
पाकृ आधी वाचली तेव्हा घाईत असल्याने आता उशीराने प्रतिसाद देत आहे.

एक प्रश्नः वड्यांची भाजणी नेहमीच्या भाजणीपेक्षा वेगळी असते का?

प्रचेतस's picture

15 Apr 2011 - 8:58 am | प्रचेतस

वडे एकदम झकास झालेत. सुड, पाठवून दे इकडं,

पाकृ लिहीताना मी जेवढी एन्जॉय केली नसेल तेवढी प्रतिसाद वाचताना केली. प्रतिसाद वाचताना एकूणच लहानपणी खेळायचो त्या कानगोष्टी खेळाची आठवण झाली. असो.
@ पैकाकू, पुष्कातै वाटाण्याची उसळ नाहीतर तांदळाच्या खीरीची पाकृ नक्की टाकेन पण सवडीनं. हां...आता तिच्यात खवचटपणा, खोचकपणा नसेल कदाचित, खमंगपणा टिकवायचा प्रयत्न करेन.

@ स्मिता नेहमीची भाजणी म्हणजे मला लक्षात नाही आलं. चकलीची भाजणी करत असाल तर जेवढे तांदूळ घ्याल त्याच्या निम्मी हरभरा डाळ आणि हरभरा डाळीच्या निम्मी उडदाची डाळ. दळायला देताना चार कडीपत्त्याची पानं वरचेवर गरम करून त्यात घाला. थालीपीट, उपासाची भाजणी यांच्याबद्दल कुणीतरी मलाच सांगेल तर बरं. :)

जे काही लिहीलं ते हलकेच आणि हसत हसत घेतलंत त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

चिंतामणी's picture

15 Apr 2011 - 4:07 pm | चिंतामणी

@ पैकाकू, पुष्कातै वाटाण्याची उसळ नाहीतर तांदळाच्या खीरीची पाकृ नक्की टाकेन पण सवडीनं. हां...आता तिच्यात खवचटपणा, खोचकपणा नसेल कदाचित, खमंगपणा टिकवायचा प्रयत्न करेन.

म्हणजे ही पाकृ खवचटपणाने लिहीली होती हे सिध्द होत आहे. :D

जे काही लिहीलं ते हलकेच आणि हसत हसत घेतलंत त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

अनेक विद्वान सभासदांची क्षमा मागून म्हणतो तुझा "खवचटपणा" किती जणांच्या लक्षात आला आहे हे प्रतिक्रीयांवरून कळत आहे. ;)

स्वाती दिनेश's picture

18 Apr 2011 - 11:06 am | स्वाती दिनेश

वडे आवडले आणि लेखही,
स्वाती

दीप्स's picture

5 May 2011 - 10:47 am | दीप्स

झक्कास पाकृ आणि लेखहि. लवकरात लवकर वाटाण्याच्या उसळीची पाकृ पाठवा . वाट पहाटत आहे . वाचताना पोट भरले आणि मनही.