मोदक
साहित्यः
सव्वा वाटी खवा
सव्वा वाटी पिठीसाखर
७-८ वेलदोड्यांची पूड
सव्वा पावशेर बारीक रवा
पीठ भिजवण्याकरता दूध
२ टे.स्पून कडकडीत तेल
तळण्याकरता तूप
१.खवा हाताने मोकळा करून कढईत मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजावा. कोमट असताना हाताने मळून पिठीसाखर मिसळावी व वेलदोडा पूड घालावी. हे झाले सारण.
२.सव्वा पावशेर बारीक रवा २ टे.स्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून दुधात घट्ट भिजवावा व तासभर झाकून ठेवावा.
३.तासाभराने पीठ घट्ट वाटले तर दुधाच्या हाताने मळावे, अथवा पाट्यावर वरवंट्याने कुटावे व छोट्या छोट्या लाट्या कराव्यात.
४.छोटी पुरी पोळपाटावर लाटून मुखर्या पाडाव्यात व खव्याचे सारण भरून मोदकाचे तोंड बंद करावे.
५.मंद आचेवर सर्व बाजूंनी गुलाबी रंगावर तळावेत.
मोदकाचे तोंड दुधाच्या हाताने बंद करावे. तळताना मोदक फुटता कामा नये. नाहीतर खवा तळणीत पसरून बाकी मोदकावर काळे डाग पडतात.
जर मोदक फुटलाच तर तेल गाळून पुन्हा वापरावे.
प्रसादाचे मोदक असल्याने लहान करावेत म्हणजे प्रसाद म्हणून देताना मोडून अर्धा देण्यापेक्षा एक छोटा चांगला वाटतो.
(ही रेसिपी माझ्या संग्रही वहीतील आहे.कदाचित कोणत्यातरी पुस्तकातील असू शकते.)
प्रतिक्रिया
12 May 2008 - 5:59 pm | वरदा
खरंच कीती थॅंक्यू म्हटलं तरी कमीच आहे....
एक शंका थोडा मैदा घालू का ह्यात? नुसता रवा खूप कुटावा लागेल ना...
ह्या विकेंडला करते आणि इथे फोटोच टाकते....खूप खूप खूप धन्यवाद!!!
12 May 2008 - 6:32 pm | स्वाती राजेश
तू रव्यात, मैदा/ कणिक घालून सुद्धा थोड्या करून पाहा. कारण वरील मोदक हे खुसखुशीत आणि किंचित कडक होतात. पण चावले जातात.चिवट लागत नाहीत.:)
मी करताना फक्त कणिक आणि थोडा रवा घालून पीठ मळते. हे थोडे मऊ होतात.
तु दोन्ही प्रयोग कर म्हणजे तुला लक्षात येईल कि तुला कसे करायचे ते!!!!!!!!!!!
12 May 2008 - 6:51 pm | स्वाती दिनेश
वरदा लवकर टाक बरं फोटो...वाट पाहते,:)
स्वाती,पाकृ छानच.. हे मोदक मस्तच लागतात,
स्वाती
12 May 2008 - 7:11 pm | वरदा
कणकीची आयडीया मस्त आहे...पहाते नक्की करुन...