आत्ताच श्रीखंडाची रेसिपी वाचली,भारी आहे पण म्हटले चला होळी आहे तर पुरण पोळी हवीच नाही का.(रेसिपी रिपीट असली तर रिपीट चालवून घ्यालच अशी अपेक्षा!)
साहित्य :हरबरा डाळ १ कप ,
अडीच कप पाणी ,
१ कप किसलेला गुळ,
२ कप गव्हाचे पीठ ,
१ चमचा एव्हरेस्ट दुध मसाला/वेलची पूड
कृती :
हरबरा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी.
त्यातले पाणी काढून त्यात किसलेला गुळ घालावा व मंद आचेवर गरम करायला ठेवावे.त्यात एक चमचा दुध मसाला घालावा याची चव मस्त येते.
नाहीतर वेलची पूड घातली तरी चालेल.
वरील मिश्रण घट्ट झाले की थंड होवू द्यावे.वर मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
एक चमचा तेल लावून कणिक सैलसर मळून घ्यावी.
कणकेची पारी करून पुरणाचा गोळा भरून सर्व बाजूनी पारी बंद करावी.मी मोदकाचा आकार देवून पारी बंद करते.
मग पोळी लाटावी आणि तव्यावर खरपूस तूप लावून भाजावी.
दुध किंवा दह्याबरोबर मस्त लागते पुरण पोळी.
उन्हाळ्यात हापूस आंब्याच्या रसासोबत तर विचारायलाच नको!
प्रतिक्रिया
17 Mar 2011 - 11:16 pm | टारझन
सगळ्या पाककृती हल्ली डाएट ची डॉली करणार्या येत आहेत !! केवढं तुप आहे ते ... आठवड्याच्या क्यालर्या एकाच दमात :)
बाकी पुरणपोळी मला लहाणपणी आवडायची. पण एकदा होळीच्या दिवशी मी एक अॅक्सिडेंड पाहिला तेंव्हा आई ने घरी पुरणपोळी केली होती. तेंव्हा पासुन पुरणपोळीवरुन जे मन उडालंय ते आज तागायत,
- विली
18 Mar 2011 - 1:50 am | रेवती
तुला पहिलाच प्रतिसाद असा द्यायची काय गरज होती रे?
चिली.
17 Mar 2011 - 11:30 pm | प्राजु
पुरणपोळी दह्यासोबत खातात?? कल्पना नव्हती. जनरली, दही/ताक आणि गूळ एकमेकासोबत खाऊ नये असे म्हणतात.
मला दूधाऐवजी, साजूक तूप आणि कटाच्या आमटीसोबत आवडते पुरणपोळी.
कणकेच्या पारीमध्ये पुरणाचा उंडा(गोळा) मोदकासारखा भरत नाहीत. कणिक इतकी सैल असावी लागते की, फिरवत फिरवत पारी उंड्याच्या वर्-वर चढवावी लागते आणि सगळा उंडा पूर्णपणे कणकेत भरला गेला की मग अगदी हलक्या हाताने लाटावी लागते. म्हणून त्याला पुरणाची पोळी म्हणतात, पुरणाचा पराठा नाही.
18 Mar 2011 - 10:22 am | पियुशा
प्राजुताइ शि सहमत :)
बाकि पुरन्पोळी झक्कास!
18 Mar 2011 - 12:17 am | मीली
तिखट प्रतिसाद येणार म्हणूनच जास्त गुळ घातला आहे.
तसे पण आज गप्पा मारायचा भारी मूड आहे.
आणि नेहेमी नेहेमी काय डायट करायचे.साजूक तूप सांध्यांसाठी चांगले असते टारोबा!
आणि प्राजू, मी कणिक सैल नाही मळत.कारण मग जास्त पीठ लावावे लागते लाटताना.
नेहेमी पेक्षा किंचित सैल ठेवते.मग मोदक पण छान होतो. आता राहिले, स्टेप बाय स्टेप फोटू नाही काढले गणपा सारखे ! पोळी मध्ये पुरण आहे ना मग झाली आमची पुरणपोळी (पुरण पराठा! :-) )
18 Mar 2011 - 8:51 am | टारझन
आहो मिली ताई , तसं नाही ! माझा म्हणायचा उद्देश होता हल्ली येणार्या पाककृत्या सगळ्या हेवी आहेत. आता श्रीखंडंच बघा ना :) बाकी पुरणपोळी ९९% लोकांना आवडत असावी ;)
सांध्यांना तुप उपयोगी असते हे नव्या ने कळले.
@ रेवती : आता पहिला प्रतिसादक मी होतो हा एक अनफॉर्च्युनेट योगायोग होता ;)
- जेली
18 Mar 2011 - 1:31 am | पक्या
पुरणाची डाळ मिक्सरमध्ये वाटलीये. ह्म्म.
पुरणाची डाळ चांगली घट्ट असावी लागते. पाणी अजिबात असता कामा नये त्यात. आणि अशी घट्ट डाळ मिक्सर मध्ये अजिबात चांगली वाटली जात नाही. जाडसर रहाते.
वरील रेसिपी वाचून तंतोतत कृती करू नये. कारण ही अस्सल पुरणपोळीची रेसिपी वाटत नाहिये.
18 Mar 2011 - 1:36 am | सानिकास्वप्निल
मी ही प्राजूशी सहमत आहे, पुरणपोळी दह्यासोबत खातात हे मलाही माहीत नव्हतं
असो होळीच्या शुभेच्छा :)
18 Mar 2011 - 1:55 am | रेवती
पुरणपोळी दह्याबरोबर?
नवीनच माहिती.
नारळाच्या दुधाबरोबर किंवा तूपसाखरेबरोबर चांगली लागते असे ऐकून आहे.
फोटू तर छानच आलाय.
माझ्याकडे पुरणयंत्र आहे म्हणून ठीक आहे नाहितर मिक्सरमध्ये वाटणे जरा अवघड आहे.
हिरव्या लोकांपैकी कुणी पुरणयंत्रासारखे दिसणारे बटाटा मॅशर वापरून पाहिले आहे काय?
18 Mar 2011 - 6:54 am | आनंदयात्री
>>बटाटा मॅशर
काय म्हणुन चौकशी करु ? बायकोने प्रोजेक्ट पुरणपोळीच्या शनिवारच्या प्रॉडक्शन रिलिज साठी आज युएटी घेतली. सहाजिकच मिक्सर वापरले. काय पोटॅटो मॅशर म्हणुन चौकशी करु का ?
-
(पोपटी) आंद्या
18 Mar 2011 - 5:34 pm | रेवती
हो 'फूड मिल' म्हणून चौकशी करू शकतोस.
18 Mar 2011 - 2:11 am | मेघवेडा
भूक चाळवल्या गेली! झकास!
18 Mar 2011 - 2:26 am | गणपा
कणिक वापरुन केलेली पुपो असल्याने दिसायला जरी पोळी कम पराठा असला तरी फोटो वरुन ती मउसुत असणार असच वाटतय.
माताय आज काय टेस्ट रन होती की काय मीली आणि सानिकाकडे.
दोघींनी ताबडतोब दोन दोन पुपो सँपल म्हणुन पाठवुन द्याव्या.
मग आम्ही अंतिम निर्णय देउ. ;)
18 Mar 2011 - 2:33 am | अनामिक
पुरणपोळी दह्या बरोबर? काहीतरी विचित्रच वाट्टंय.... तेच आंब्याच्या रसाबरोबरही... ना धड रसाची मजा, ना पुरणपोळीची!
विदर्भ - मराठवाड्यातली पुरणपोळी ही पुणे-मुंबईकडच्या पुरणपोळीपेक्षा वगळी असते असं काही आहे का? विदर्भ - मराठवाड्यातल्या पुरणपोळीतलं पुरण ओलं, आणि मऊ असतं आणि पोळीतही खचाखच भरलेलं असतं. अशी पुरणपोळी करणे एक कलाच आहे! त्यापेक्षा पुण्यामधे खाल्लेल्या पुरणपोळीतलं पुरण हे जरा अती कोरडं, आणि भुसभुशीत होतं. पोळीचा घास तोडला की कोरडं पुरण बाहेर पडतं. ते मला स्वतःला आवडत नाही. पण त्या बरोबरची कटाची आमटी मात्र अप्रतीम!
18 Mar 2011 - 2:46 am | रेवती
पुण्यामधे खाल्लेल्या पुरणपोळीतलं पुरण हे जरा अती कोरडं, आणि भुसभुशीत होतं
अगदी सहमत.
आपण विकतची पुपो खाल्ली होती काय?
तसे असल्यास आपले म्हणणे बरोबर आहे.
तश्याही या पोळ्या दोन दिवस टिकतात पण अजून एखादा दिवस जास्त टिकाव्यात म्हणून मंद आचेवर भाजून थोड्या कोरड्या करतात. त्याने सगळी मजा जाते.
नुकतीच मुंबैला मिळणार्या पुपो मैत्रिणीने आणल्या होत्या. निदान त्या तरी ओल्या असतील असे वाटले होते पण तश्याच कोरड्या होत्या. घरी केली जाणारी (हो, अगदी पुण्यातही;)) पुपो आपण म्हणता तशी जरा जाडसर (विदर्भातील जरा जास्त जाड असते) आणि ओले पुरण असणारी असते.
मी एकदा चितळ्यांकडून तीन पाकिटे पोळ्या हिरव्या देशात आणल्या होत्या. निघण्यादिवशी खरेदी करताना ताज्या आहेत असे सांगितले (ते कशाला सांगतील शिळ्या आहेत म्हणून!) पण येईपर्यंत बुरशी आली होती. तसे त्यांच्या दुकानात फोन करून कळवल्यानंतर नाव लिहून घेतले आणि पुढच्यावेळी तीन पाकिटे मिळतील म्हणून सांगितले. नंतर जाणे झाले नाही हा भाग वेगळा.
18 Mar 2011 - 3:57 am | अनामिक
नाही गं तै... एका कोब्रा मित्राच्या घरीच खाल्ली होती पुपो. शिवाय मी नांदेडला शिकत असताना शेजारी एक सातार्याचं कुटूंब रहायच, त्यांच्या कडेही अशी कोरडी पुपो खाल्ली होती. मला वाटतं कटाची आमटी करण्याकरता शिजवलेल्या डाळीतलं पाणी काढून घेतात म्हणून पुरण कोरडं होत असावं का?
माझ्या बाबांचे अमरावती भागातले मित्र आहेत. त्यांच्याकडे ओल्यापुरणाने अगदी खच्चाखच्च भरलेली पोळी करतात आणि करताना तव्यावरुन वरचे वर उडवून परततात. ती पुपो जरा अजून वेगळी वाटली.
18 Mar 2011 - 5:37 pm | रेवती
माझ्या माहेरी जाडसर पुपो करतात.
प्रत्येक गावाचे पुपोचे नियम थोडे वेगळे असावेत असे वाटते.
जसे कि नितळ, पातळ पुपो आणि जाडसर पुपो यांचे कौतुक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे.;)
18 Mar 2011 - 2:53 am | सानिकास्वप्निल
काही ठिकाणी तूरडाळीची पुपो करतात. त्याचे पुरण ओलसर असते आणी म्हणून पोळी पातळ न लाटता जाडसरच लाटावी लागते.
18 Mar 2011 - 10:45 am | मुलूखावेगळी
+१००
मराठवड्यातली पुरणपोळी मधलं पुरण ओलं आनि फक्त साखरेचेच असते. आनि शक्यतो तुपासोबत खातात गरम पुरणपोळी आनि शिळी पुरणपोळी दूधात थंड /गरम आवडीप्रमाने आनि त्यात थोडे गरम तूप टाकुन खातात.
18 Mar 2011 - 5:58 am | चित्रा
मला तरी वरची पुरणपोळी छान, मऊ वाटते आहे. शिवाय कणीक तिंबण्याचे कष्ट कमी वाटत आहेत. पुरणपोळी थोडी कमी श्रमांची वाटते आहे.
दह्याशी कशी लागेल कल्पना नाही, पण मला दुधातही जेमतेम बुडवायला आवडते.
पुण्याकडे असे माहिती नाही, मी मुंबईकडेही अशीच कोरडी पुरणपोळी पाहिली आहे. पण त्यात गूळ नसतो, साखर असते असे वाटते. खूप पदरी पुरणपोळी करायची असल्यास त्यात मैदाच वापरत असावे आणि तेलही भरपूर असावे.
मालती कारवारकरांच्या पुस्तकात प्रचंड तेल घालून, मैदा घालून, पुरणपोळ्या सुगरण बायका करतात त्यांची थोडी थट्टाच केली आहे. आधी माझे याबद्दलचे मत असे होते की एकदा कधीतरी जन्माच्या कर्माला पुरणपोळ्या वर्षातून खायच्या त्या एवढा विचार करून हेल्दी करून कशाला? पण नंतर मला कारवारकर बाईंचे म्हणणे पटले. जर पक्वान्ने नेहमीच होत असली (जशी आजकाल होतात) तर ती जरा बेताने केलेली बरी.
ही आता पुरणपोळीवरून वेगळीच चर्चा चालली आहे तर त्यात भर घालते. :)
मी एकटी स्वयंपाक करू लागले तेव्हा मला नेहमीचे पदार्थ सोडले तर काहीही येत नसे. आमच्या घरातून हे असे ठरवून गृहशिक्षण देण्याचे प्रमाण वगैरे कमीच होते. :)
नंतर मी माझीच शिकले. पुस्तकांत बघून, घरी फोन करून विचारून वगैरे. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षात केलेल्या माझ्या पुरणपोळीला पराठा काय, नवरा पुरणाची भाकरी केली आहे असे म्हणाला. आमच्या सासरी पुरणपोळी करतात, ती वर म्हटल्याप्रमाणे भरपूर, ओले पुरण घालून. शिवाय सासरी सगळ्या बायका भारी सुग्रणी. त्यामुळे नवर्याला काय खायला लावले अशी मला जरा लाजच वाटली. आता मात्र मला बर्यापैकी पुरणपोळ्या करता येतात.
हा मी केलेल्या पुरणपोळ्यांचा मागे कधीतरी मिपासाठीच काढलेला फोटो. (आता परत करायला हव्यात).
![](https://lh4.googleusercontent.com/_N-9w9fYTrYE/R-RihVzi8gI/AAAAAAAAAlo/cnLQlfnv14k/s400/100_0482.JPG)
18 Mar 2011 - 6:57 am | मीली
प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद !
![](https://lh6.googleusercontent.com/_xN5UGPFkg2I/TYKyEJoTkZI/AAAAAAAACOI/HnJtTYhI8jE/s512/IMG_0458.JPG)
![](https://lh3.googleusercontent.com/_xN5UGPFkg2I/TYKyEef7XNI/AAAAAAAACOQ/7msLgDinTJM/s640/IMG_0460.JPG)
माझ्याकडे पुरण यंत्र न्हवते त्यामुळे मिक्सर जिंदाबाद! मागच्या वर्षी पण मिक्सर मध्ये
पुरण करायचा प्रयत्न फसला होता नुसता गर्र आवाज यायचा आणि डाळ तशीच.
ह्या वर्षी इडली चे डाळ ,तांदूळ दळण्यासाठी म्हणून "Osterizer 14 Speed" घेतला त्यात तर पुरण पण छान दळले गेले.कारण डाळ शिजवल्यावर जरी पाणी काढून घेतलेले असले तरी गुळ मिक्स केल्यावर गरम करताना पुरणाचे मिश्रण पातळ होते,५,७ मिनिटे गरम केल्यावर थोडे घट्ट होते तेव्हाच मिक्सर मध्ये फिरवले.
कि असे पुरण तयार झाले.
मला पण कटाची आमटी आवडते पण पाणी आटून गेल्याने कटाला कट मारावा लागला!
मला तर आमरसाबरोबर पुरणपोळी आवडते !:-) दही हा फक्त एक पर्याय होता.माझी आजी आणि मावशी ह्या दह्याबरोबर खातात.खानदेशात खात असावेत.
' दही/ताक आणि गूळ एकमेकासोबत खाऊ नये असे म्हणतात.'
मी तर ऐकले होते कि वांग्याच्या भाजीबरोबर किंवा माश्यांबरोबर दुध खात नाही.
दही ,ताकात जशी साखर घालतो तसा गुळ घातल्याने काही विशेष फरक पडत नसावा.
ज्यांना नुसती पुरणपोळी खायची असेल ते नुसती पण खावू शकतात!
18 Mar 2011 - 6:10 pm | टारझन
तो वरच्या चित्रातला कुकर भारी आहे . कोणत्या ग्रोसरी मधुन घेतला ? इकडे अमेरिकेत कुठे मिळेल असा कुकर ?
- कुली
18 Mar 2011 - 6:29 pm | रेवती
ए, तो मिक्सर आहे.
झाला का तुझा टारगटपणा सुरु?
18 Mar 2011 - 8:25 am | विनायक बेलापुरे
पुरणपोळी आणि दही हे एक डेडली कोंबिनेशन आहे.
तूप,दूध किंवा कटाच्या आमटी पुरणपोळी खातात.
खाउन पहा चांगले लागेल.
होळीच्या मनःपुर्वक शुभेच्छा !
18 Mar 2011 - 9:59 am | पिंगू
मी तरी पुरणपोळी दह्यासोबत कधी टेस्ट केली नाही. आता टेस्ट करुन पाहतो.. म्हणजे उद्याच..
बाकी पुरणपोळी आवडली.
- पिंगू
18 Mar 2011 - 1:10 pm | सूड
पुरणपोळी आणि दही हे कॉम्बिनेशन काही तरी निराळंच वाटतंय !! पुरणपोळी आणि तिच्यावर नको-नको म्हणत असताना बळे-बळे वाढलेलं भरपूर साजूक तूप ही माझ्या दृष्टीने पुरणपोळी खाण्याची खरी मज्जा !!
(पंगतीला बसल्यावर पाचेक पुरणपोळ्या सहज रिचवणारा)
18 Mar 2011 - 1:29 pm | इरसाल
आई & आजीच्या हात्च्या खापरा वरच्या पुपो काय झक्कास......................................
18 Mar 2011 - 4:21 pm | कच्ची कैरी
मला पण खापरावरच्या पूरणपोळ्याच जास्त आवडतात .
खापरावरची पूरणपोळी सोबत आंब्याचा रस आणि कटाची आमटी -भात व भजे,कुरडई ,पापड व्वा मस्तच बेत होईल :)
18 Mar 2011 - 4:49 pm | परिकथेतील राजकुमार
दही आणि पुरणपोळी ? छान छान !
मध्ये एकदा कोकम सरबात घालुन रम पिली होती. तशीच चव लागेल बहुदा ह्याची.
18 Mar 2011 - 8:26 pm | कलंत्री
खांदेशाच्या मांडाच्या पोळीची पण शिफारस करायला हवी होती. मांडाच्या पोळीची मजा पण काही वेगळीच असते. १९७९ च्या सूमारास मी जळगावला शिकायला गेलो असताना वसतीगृहातीला मावशींनी मांडाच्या पूरणपोळीची सिद्धता केली होती. आज मनापासून त्याना धन्यवाद द्यावेशे वाटते.
पूरणपोळीला जवळपास ७००+ वर्षाचा इतिहास आहे.
मीली ताईंनी कालोचित लेख प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.
सौ नी आताच एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. आताच्या काळात ( सिझन) मध्ये गहू आणि चणादाळ नवी आली असते. त्या अन्नपदार्थांना मान म्हणून सुद्धा पुरणपोळी केली जाते. ( घ्या पुपो चा इतिहास ७०००+ वर्षापर्यंत गेला की....)
18 Mar 2011 - 10:22 pm | गोगोल
पुण्याजवळ झालेल्या उत्खननात फॉसिलाईज्ड पुरण पोळ्या सापडल्या, त्यातील पुरण अजूनही ओले होते.
घ्या पुपो चा इतिहास ७००००+ वर्षापर्यंत गेला की....
18 Mar 2011 - 10:21 pm | गोगोल
दिस्तेय पुरण पोळी.
23 Mar 2011 - 10:54 pm | रश्मि दाते
मी आपली आणी सानीकाची रेसेपी वाचुन १ दा पुरणपोळी केली होती,छान झाली होती धन्यवाद