मराठीतले काही उच्चार.

स्वतन्त्र's picture
स्वतन्त्र in काथ्याकूट
10 Mar 2011 - 10:51 am
गाभा: 

मराठीत काही शब्दांचे वेगवेगळे उच्चार वेगवेगळ्या प्रकारे लोक करतात.
उदा.:- 'बसणार' चा उच्चार 'बश्णार' असे करतात.तर काही 'बसणार' असेच करतात.
तसेच
असणार-अश्णार
'च','ज' चा उच्चार देखील वेगवेगळा करतात.
तर अशा काही शब्दांचे स्वच्छ मराठीत योग्य उच्चार कोणते आहेत यावर माहितगारांनी प्रकाश टाकावा.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

10 Mar 2011 - 11:43 am | अवलिया

काळजी नसावी, सर्व उच्चार योग्यच आहेत.

जोपर्यंत तुमच्या तोंडातुन बाहेर पडणार्‍या शब्दाने ध्वनित होणार अर्थ समोरच्याला समजत आहे तोपर्यंत तो शब्द शुद्ध आहे की अशुद्ध याची फिकीर नसावी.

तो शब्द कसा लिहायचा यावर काही वैयाकरणी तुमची शिकवणी घेतील, त्यांचे कितपत मनावर घ्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.

वरिल मत हे केवळ बोलीभाषांना लागू आहे. विशेष प्रयोजनासाठी तयार केल्या गेलेल्या भाषांसाठी नाही हे ज्यांना बोली आणि कृत भाषांमधला फरक कळत नाही त्यांच्यासाठी खुलासा देणे आवश्यक असल्याने सांगितले.

पिवळा डांबिस's picture

10 Mar 2011 - 12:05 pm | पिवळा डांबिस

परंपूज्य श्री. अवलियामहाराजांशी सहमत!

बाकी
तर अशा काही शब्दांचे स्वच्छ मराठीत योग्य उच्चार कोणते आहेत
मराठीचे नागरी मराठी, ग्रामीण मराठी हे प्रकार माहिती होते...
पण स्वच्छ मराठी?
मग उरलेली काय अस्वच्छ मराठी?
असं लिहू नका हो!
हे म्हणजे स्वच्छ आई आणि अस्वच्छ आई असं वाचल्यासारखं वाटतं!!!:(
आई ती आई, ती नेहमी स्वच्छ आणि पवित्रच असते!!!

स्वतन्त्र's picture

10 Mar 2011 - 12:42 pm | स्वतन्त्र

स्वच्छ चा इथे अर्थ वेगळा आहे.स्वच्छ म्हणजे ज्याला आपण व्याकरणाच्या चौकटीत बसवू शकतो ती.
बाकी कोणता हेतू नाही.
तसं तर आपल्या महाराष्ट्रात, आपली मराठी वेगवेगळ्या रुपात आहे.
तिचा ढंग,बाज प्रत्येक प्रांतात वेगळा आणि तितकाच विलोभनीय.

पिवळा डांबिस's picture

11 Mar 2011 - 12:05 am | पिवळा डांबिस

खुलाशाबद्दल अनेक धन्यवाद.

नितिन थत्ते's picture

10 Mar 2011 - 1:06 pm | नितिन थत्ते

सहमत.

अरुण मनोहर's picture

10 Mar 2011 - 12:01 pm | अरुण मनोहर

मराठीतल्या काही शब्दांचे अर्थ देखील लोक वेगवेगळे घेतात. कधी कधी ह्यामुळे निरागसपणे शब्द वापरणारा देखील अडचणीत येतो. पण खरं तर वापरणारा नव्हे, तर खराब का(म)नाने ऐकणाराच वाह्यात असतो.
तेव्हा काळजी करू नका. हा तुमचा आमचा किंवा मराठीचा दोष नव्हे, तर समोरच्याचा दोष असतो.

उदा- जेव्हा कोणी "काय बसणार का" असें विचारतो, तेव्हा ऐकणारा विविध अर्थ घेऊ शकतो. उभा राहीलेला बसू शकतो, किंवा बसलेला (थोड्या वेळाने) तरंगू शकतो.

किंवा झोपू देखील शकतो!
मराठी अशीच आहे! पण ज्यांना हा फरक कळवून घ्यायचा नाही, त्यांच्यासाठी खुलासा कसा द्यायचा?

परिकथेतील राजकुमार's picture

10 Mar 2011 - 12:21 pm | परिकथेतील राजकुमार

'काय बसणार का' ह्या वाक्याचा अर्थ काही गल्ल्यांमध्ये फारच वेगळा असतो ;)

असो...

सूड's picture

10 Mar 2011 - 12:53 pm | सूड

:D

श्रीरंग's picture

10 Mar 2011 - 12:35 pm | श्रीरंग

"सध्या यंग जनरेशनमधे वर्ल्ड कपचं फ़ीवर खूप हाय आहे." असली म.टा पुरवणी छाप भाषा वापरण्यापेक्षा, बसणार,/बशणार/, बषणार/, बस्नार, काही बोललेलं परवडलं.

बेसनलाडू's picture

11 Mar 2011 - 12:19 am | बेसनलाडू

'परवडलं' मुळे येणारी नकारात्मक छटा वगळता मूळ प्रतिसादाशी सहमत.
(सहमत)बेसनलाडू

जो पर्यंत समोरचा 'हा ताळ्यावर आहेना? अस का असंदब्ध बोलतोय' असा विचार करत नाही अन जो पर्यंत तुमचे विचार दुसर्‍या पर्यंत सहज पणे पोहोचतात (जो की भाषेचा सर्व प्रथम वापर आहे) तोवर तुमचे उच्चार थोडे वेगळे असले तरी चालतात.

तुमचे निरीक्षण आहे, म्हणून विचारतो. यात काही प्रादेशिक खुबी आहे काय?

आत्मनिरीक्षणाने म्हणतो -
संथ लयीत बोलत असल्यास "बस्-णार्" असा उच्चार करतो; द्रुतलयीत "बष्णार्" असा उच्चार करतो.

लयीप्रमाणे वेगवेगळे संधी होणे (किंवा संथ लयीत न होणे) अपेक्षितच आहे, असे वाटते. हे माझ्या ओळखीच्या सर्व भाषांमध्ये होते.
उदाहरणार्थ इंग्रजीतले : संथ लयीत "ह्वॉट् आर् यू डूइंग्?" हे द्रुतलयीत "वऽय्य् डूय्ङ्" असेच उच्चारणे बरे. नाहीतर कानाला खटकते : "व्ह्ड्र्य्ड्व्ङ्ग्" असा संथलयीतली सगळी व्यंजने वापरायचा हव्यास केला तर ऐकू आलेले काही समजतही नाही.

तीच गोष्ट मराठीतही लागू आहे, नाही का?

इन्द्र्राज पवार's picture

11 Mar 2011 - 10:04 am | इन्द्र्राज पवार

"...संथ लयीत बोलत असल्यास "बस्-णार्" असा उच्चार करतो; द्रुतलयीत "बष्णार्" असा उच्चार करतो...!

~ श्री.धनंजय, या ना त्या निमित्ताने मीदेखील राज्यातील विविध प्रांतात फिरलो आहे, तरीही "बसणार" चे (कोणत्याही लयीत असो) "बष्णार" - पोटफोड्या ष - उच्चार रूप मला ऐकू आले नाही, शिवाय त्याची मुद्रीत साक्षही कुठे आढळली नाही. तरीही एक चर्चेचा विषय म्हणून या धाग्याकडे पाहताना असे निरिक्षण नोंदवितो की बर्‍याच ठिकाणी (परत मौखिक) 'ब' प्रामुख्याने कानी पडते. उदा. 'देवा...आज बरपूर कामं जाली'....इथे 'भ' आणि 'झ' लोप पावले नसून त्यांचे भाषेच्या दृष्टीने त्याच घरातील "सौम्य" रूप आले, पण ऐकणार्‍याला खटकणार नाही. उलट एका ठिकाणी मी 'गौतम' या गेयता असलेल्या नावाचे चक्क "ऐ घवत्या' अशी तारस्वरातील हाकही ऐकली. 'ग' चे रौद्र रूप येऊनही कार्यभाव साधला गेला होत.

"....संथलयीतली सगळी व्यंजने वापरायचा हव्यास केला तर..."

~ व्यंजना ही तर शब्दांची एक शक्तीच आहे ('अभिधा" आणि "लक्षणा" नंतर) त्यामुळे इथे द्रुत आणि संथ या लयीपेक्षा त्या उच्चारातून प्रकट होणारा 'व्यंगार्थ' महत्वाचा असे मानायला हवे. येथे उच्चारलेल्या वाक्याचा मूळ अर्थ समजतो. पण बोलणार्‍याला तोच अर्थ अभिप्रेत असेल असे नाही. धागाकर्ते श्री.स्वतंत्र यानी 'बसणार' हा उच्चारी शब्द येथे उदाहरणादाखल दिला आहे. तोच पुढे घेऊ. "तुम्ही धनंजय यांच्याबरोबर चर्चेला बसणार काय?" असे विचारल्यावर 'बसणार' या स्थितीला अन्य छटा प्राप्त होणार नाही; कारण "चर्चा" उद्देश्य प्रश्नातच आला आहे, पण त्याचवेळी त्या ठिकाणी "तुम्ही धनंजय यांच्याबरोबर बसणार काय?" असे म्हटले तर मात्र 'बसणार' ला विविध अर्थ प्राप्त होऊ शकतात. घेणारे (पक्षी : ऐकणारे) कोणताही अर्थ घेतात. त्यामुळे वाक्यांची चिरफाड होऊ नये यासाठी सूचकता, ध्वन्यार्य, व्यंजना यांची योग्य वापर करणे हे भाषेच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते.

इन्द्रा

ध्वनींची जोडणी केल्यामुळे ते ध्वनी थोडेफार बदलतात, याची आपल्याला जाणीव असते. यातील बहुतेक फरक जीभ एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात असताना "आपोआप*" होतात.
*"आपोआप"ची गंमत अशी - जीभ कशी वळते, कंठमणीतून घोष कसा बदलतो, याबद्दल जीवशास्त्रातून ढोबळ नियम "आपोआप" मिळतात, पण प्रत्येक भाषेच्या लकबी, म्हणजे अगदी बाळपणापासून मिळालेली वळणे असतात. म्हणूनच सर्व भाषांमध्ये स्वतःस्वतःचे असे खास संधीनियम असतात.

मराठी भाषेच्या अभ्यासात संधीनियमांकडे त्या मानाने लक्ष कमी दिले गेलेले आहेत. आता कोणी अभ्यास केला नाही म्हणून काय संधी होणार नाहीत? तसे मुळीच नाही. कारण जीभ "मराठी वळणाने" (किंवा आडवळणाने!) एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जात असताना ध्वनी बदलणार तो बदलणारच. अभ्यास करायचा म्हणजे काय? मराठमोळे जिभेचे वळण हे संस्कृत वळणापेक्षा वेगळे असते, इंग्रजीपेक्षा वेगळे असते ते ओळखून मराठीची वैशिष्ट्ये नोंदवणे.

संधीचा अभ्यास करण्यात संस्कृत व्याकरणकार फार पुढे होते, त्याचे मोठे कारण म्हणजे संस्कृत पठनपाठनाची दीर्घ मौखिक परंपरा, होय. शिष्ट समाजात काळजीपूर्वक* बोलली गेलेली रूपे हीच - आणि सर्वच - "मूळ साधुरूपे" होत. त्यांच्यापैकी एक रूप "मूळ" आणि बाकी रूपे "बोली-म्हणून-टाकाऊ" अशी नव्हती.
*"काळजीपूर्वक" म्हणजे धापा टाकत, दारूच्या नशेत बरळत, गाण्याच्या ताना घेताना अघळपघळ, खोकत-उचक्या-येत... अशी सर्व उच्चाररूपे वगळून.

लेखी रूपे मिळाल्यानंतर भाषकांची प्रचंड सोय झाली, खरी. संस्कृत भाषेचे प्रमाणीकरण लेखनप्रसाराच्या आधीचे आहे. म्हणून संस्कृताच्या प्रमाणलेखनात सर्व संधिरूपे लिहिण्याची मुभा आहे. मराठी आणि अन्य अर्वाचीन भाषांमध्ये प्रमाणीकरण लेखनप्रसाराच्या नंतर झाले. शिकण्या-शिकवण्याच्या सोयीसाठी कुठलेतरी एक "सुटे" रूप लिहायची-वाचायची आपल्याला सवय लागली. मात्र त्यामुळे ते सुटे रूपच "मूळ" आणि संधीमध्ये होणारे फरक व्याज आणि कुठल्याशा प्रकारे चुकलेले असल्याचा गैरसमज आपणात पसरू लागला.

"बष्णार" असे रूप म्हणून कुठेही वाचनात येणार नाही. इतकेच काय, मी स्वतः हे रूप वापरतो, याबद्दल मी बहिरा होतो. म्हणजे "बष्णार" असा उच्चार करताना आपण "बस्-णार्" असेच म्हणत असल्याचे मला वाटत होते. या लेखाच्या निमित्ताने मी ते रूप वेगवेगळ्या वाक्यांत आणि संथ-मध्य-द्रुतलयींत म्हणून बघितले.

(लेखात "बशणार" असा उल्लेख आहे. हे माझ्या जिभेचे वळण नाही. लहानपणापासून मी "कष्ट, उष्टे" वगैरे उच्चार करतो, मात्र अन्य लोक "कश्ट, उश्टे" वगैरे उच्चार करतात. मी ज्या लयीत "बष्णार" उच्चार करतो, त्या लयीत ते लोक "बश्णार" उच्चार करत असावेत.)

या ठिकाणी स्->ष् हा बदल जिभेच्या वळणाने अपेक्षितच आहे. हे वर्णन पाणिनीने देखील संस्कृतमध्ये केलेले आहे. (ष्टुना ष्टु: ।) पुढे येणार्‍या मूर्धन्य "ण"साठी जीभ वळू लागते, तसा स् ऐवजी ष् हा उच्चार होऊ लागतो. मराठीत हे वळण कमीअधिक प्रमाणात दिसून येते. आदल्या पिढीतील काही अभिजन "पोष्ट" म्हणीत असत, त्यानंतरसुद्धा काही द्विभाषिक लोक मराठीमध्ये "पोष्ट" तर इंग्रजीमधे "पोस्ट" म्हणीत असत. मी स्वतः मराठीमध्ये सुद्धा नेहमीच "पोस्ट" म्हणतो. (जिभेच्या वळणाचे जीवशास्त्र ढोबळ आहे. मराठी उच्चाराच्या लकबी गेल्या काही दशकांत बदललेल्या आहेत.)

आता हा उच्चार तुम्ही ऐकला नाही असे म्हणता - मी विनंती करतो की पुनर्विचार करा. (१) हा लेख वाचण्यापूर्वी माझ्या स्वतःच्या लक्षातही आले नव्हते. निरीक्षणाचा प्रश्न आहे. (२) या लेखाच्या चर्चाप्रस्तावकाने हा उच्चार ऐकलेला आहे. त्यांच्या निरीक्षणाला थोडेतरी वजन देऊया. (३) मराठीतील "पोष्ट" आणि संस्कृतातील संधिनियमाकडे - अन्य भाषांतही हाच नियम आहे - लक्ष देऊन आपण तपासून तर बघूया... अर्ध्यामुर्ध्या प्रमाणात हा नियम मराठीतही असावा.

- - -

तरीही एक चर्चेचा विषय म्हणून या धाग्याकडे पाहताना असे निरिक्षण नोंदवितो की बर्‍याच ठिकाणी (परत मौखिक) 'ब' प्रामुख्याने कानी पडते. उदा. 'देवा...आज बरपूर कामं जाली'....इथे 'भ' आणि 'झ' लोप पावले नसून त्यांचे भाषेच्या दृष्टीने त्याच घरातील "सौम्य" रूप आले, पण ऐकणार्‍याला खटकणार नाही. उलट एका ठिकाणी मी 'गौतम' या गेयता असलेल्या नावाचे चक्क "ऐ घवत्या' अशी तारस्वरातील हाकही ऐकली. 'ग' चे रौद्र रूप येऊनही कार्यभाव साधला गेला होत.

:-)
हे बदल अनियमित नसून फक्त विशेष ध्वनिपरिस्थितीमध्ये होतात. तुमचे निरीक्षण चाणाक्ष आहे. आता असाच अभ्यास व्हायला पाहिजे.
उदाहरणार्थ घेऊया, तो मोठा डोळस अभ्यासक पाणिनी : संस्कृतात शब्दातला पहिला अल्पप्राण (म्हणजे गजडदब पैकी) हा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये महाप्राण (म्हणजे घझढधभ पैकी) उच्चारला जातो.
उदाहरणार्थ "दोहणारा" या अर्थी "दुघ्" ऐवजी संस्कृतभाषक "धुक्" असा उच्चार करत असत. हा बदल नेमका कधी होतो, ते पठ्ठ्याने शोधून काढले! (एकाचो बशो भष् झशन्तस्य स्ध्वो: ।)

गंमत म्हणजे "महाप्राणाचे विचलन होऊ शकते" हा जीवशास्त्रीय नियम आहे - पण कुठल्या दिशेने विचलन होते, त्याची लकब वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी आहे. हिंदीत महाप्राण शब्दाच्या शेवटाकडून अलीकडे सरकू बघतो.
उदाहरणार्थ : बाष्प -> भाप
कन्नडामध्ये अलीकडचा पाठीमागे सरकू बघतो.
उदाहरणार्थ : भारत -> (कन्नडभाषक उच्चारताना) बार्‍हत् किंवा बारथ्

- - -
"व्यंजना"
अभिधा, लक्षणा आणि व्यंजना यांचे अर्थप्रक्रियेतल्या विवेचनात फारच महत्त्व आहे. ध्वनिप्रक्रियेच्या अभ्यासात जी "व्यंजने" आहे त्या शब्दाचा अर्थप्रक्रियेतील "व्यंजना" हिच्याशी व्युत्पत्तिजन्य संबंध आहे. मात्र या दोहोंचा त्याहून मूलभूत संबंध असावा, ही कल्पना गमतीदार असली तरी तथ्यातली नव्हे. खरे तर तसे केल्यामुळे भल्याभल्यांचा तात्त्विक गोंधळ होतो. नागेश हा संस्कृत वैयाकरण अर्थप्रक्रियेत "लक्षणा" मानत नाही तर "व्यंजना" मानतो. (नैयायिकांचे मत उलट आहे.) आणि पुरावा म्हणून व्यंजनांचे ध्वनी देतो! तो युक्तिवाद निष्फळ आहे. ध्वनी हे अर्थाशिवायही उत्पन्न होतात. त्यांचे क्षेत्र वेगळे - जीभ वळणे, श्वासाचा घोष होणे... अर्थप्रक्रियेचे क्षेत्र वेगळे.
उदाहरणार्थ : "आई" शब्दात ध्वनि-व्यंजन एकही नसले, तरी त्याची अभिधा, लाक्षणिक अर्थ, व्यंग्य अर्थ या सर्वांचा विचार करायला जागा आहे.

तुमचे उदाहरण अर्थप्रक्रियेतले आहे खास - तुमचा गोंधळ मुळीच झालेला नाही. परंतु अर्थप्रक्रियेची व्याप्ती या उच्चाराबाबतच्या चर्चाप्रस्तावापेक्षा इतकी वेगळी आहे, की वेगळ्या धाग्यात चर्चा केलेली बरी. (तो धागा काढायला उशीर होईस्तोवर हा त्रोटक प्रतिसाद : )

'बसणार' ला विविध अर्थ प्राप्त होऊ शकतात. घेणारे (पक्षी : ऐकणारे) कोणताही अर्थ घेतात. त्यामुळे वाक्यांची चिरफाड होऊ नये यासाठी सूचकता, ध्वन्यार्य, व्यंजना यांची योग्य वापर करणे हे भाषेच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते.

"कोणताही" अर्थ घेत नाहीत, असा माझा अनुभव आहे. सूचकता, व्यंजना वगैरे शब्द न शिकता यांच्याबद्दल क्रियाशील प्रशिक्षण आपल्याला लहानपणापासून मिळत असते. त्यामुळे एखादी अर्धशिक्षित व्यक्ती, किंवा प्राथमिक शाळेतले मूलसुद्धा सूचकता, तिरकस बोलणे समजू जाईल असे वापरणे या बाबतीत पटाईत असतात. आणि पैकी कुठला अर्थ अभिप्रेत आहेत, हे समजून घेण्यातही पटाईत असतात.
मात्र अपवादात्मक प्रसंगी वाक्यांची चीरफाड होते. कधीकधी होते, त्याबाबत मी तुमच्याशी सहमत आहे. अशा प्रसंगी बोलणारा आणि ऐकणारा यांच्यात प्रामाणिक बेबनाव झाला - एकाला लाक्षणिक अर्थ अभिप्रेत होता, दुसर्‍याने वाच्यार्थ समजला... तर त्या प्रसंगाचे स्पष्टीकरण म्हणून हा अभ्यास अतिशय उपयोगी पडतो. सहमत. कुठल्याही भाषेत हा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. सहमत.

"व्यंजना"
अभिधा, लक्षणा आणि व्यंजना यांचे अर्थप्रक्रियेतल्या विवेचनात फारच महत्त्व आहे. ध्वनिप्रक्रियेच्या अभ्यासात जी "व्यंजने" आहे त्या शब्दाचा अर्थप्रक्रियेतील "व्यंजना" हिच्याशी व्युत्पत्तिजन्य संबंध आहे. मात्र या दोहोंचा त्याहून मूलभूत संबंध असावा, ही कल्पना गमतीदार असली तरी तथ्यातली नव्हे. खरे तर तसे केल्यामुळे भल्याभल्यांचा तात्त्विक गोंधळ होतो. नागेश हा संस्कृत वैयाकरण अर्थप्रक्रियेत "लक्षणा" मानत नाही तर "व्यंजना" मानतो. (नैयायिकांचे मत उलट आहे.) आणि पुरावा म्हणून व्यंजनांचे ध्वनी देतो! तो युक्तिवाद निष्फळ आहे. ध्वनी हे अर्थाशिवायही उत्पन्न होतात. त्यांचे क्षेत्र वेगळे - जीभ वळणे, श्वासाचा घोष होणे... अर्थप्रक्रियेचे क्षेत्र वेगळे.
उदाहरणार्थ : "आई" शब्दात ध्वनि-व्यंजन एकही नसले, तरी त्याची अभिधा, लाक्षणिक अर्थ, व्यंग्य अर्थ या सर्वांचा विचार करायला जागा आहे.

अधोरेखित केलेले वाक्य नक्की तसेच अभिप्रेत आहे का? कारण आनंदवर्धन ध्वन्यालोकात वेगळेच काही सांगत आहे असा माझा समज होता आणि तिथे ध्वनि म्हणजे स्वर किंवा व्यंजन असे अभिप्रेत नसुन शब्दांमधुन निघु शकणारा सरळ अर्थ आणि व्य़ञ्जना याला ध्वनि असे संबोधले आहे असे मला वाटते. यावरुनच आपण मराठीत ध्वनित होणारा अर्थ असे वाक्यप्रचार उपयोगात आणतो.

अधिक जाणून घ्यायला आवडेल.

"ध्वनित होणारा अर्थ" वगैरे रूपकात्मक आहे. "आवाज-या-अर्थी-ध्वनी"शिवाय अभिधा नाही, की लक्षणा नाही की व्यंजना नाही.

व्यंजना म्हणजे फोडणीसारखा (पुन्हा उपमेचा मलाही आश्रय घ्यावा लागला!) नुसत्या सामीप्याने मूळ पदार्थाची अवघीच "चव" बदलून टाकणे. असल्या कुठल्याही प्रकारच्या संबंधासाठी "व्यंजना" हा शब्द वापरतात. मग त्या-त्या वेगवेगळ्या विषयसंदर्भात संदर्भात ती उपमा रुळून गेली, की त्या-त्या वेगवेगळ्या क्षेत्रात "व्यंजना" हा थेट-अर्थाचा-तांत्रिक शब्द होतो. शब्द उपमास्वरूप आहे, हे पुन्हा-पुन्हा आठवत राहायची आवश्यकता त्या-त्या क्षेत्रातल्या तंत्रज्ञांना आपापसात बोलताना वाटत नाही. मात्र वेगवेगळ्या क्षेत्रात रुळलेले "व्यंजना"-हे-तांत्रिक-शब्द म्हणजे एकच थेट अर्थ नव्हे. सर्व क्षेत्रांत मूळ उपमा एकच असली, तरी. "मूळ उपमा एकच = व्युत्पत्तिजन्य अर्थ".

ध्वनिशास्त्रातील ... (फोनेटिक्समधील, व्याकरणाच्या वर्णातील असे म्हणायचे आहे, जर तुम्हाला "ध्वनी" हे चिह्न "ध्वनित अर्थ/लक्षणा" वगैरे अर्थांनी वापरायचे असेल, तर या ठिकाणी "मानवी भाषांत होणार्‍या आवाजांचा आवाज म्हणून अभ्यास" यासाठी तुम्ही जो काय शब्द वापरता तो योजावा.)

१. ध्वनिशास्त्रातील क्-ख्-...ह्-ळ् ही फार थोडा काळ राहातात, स्वरांचा नाद मात्र त्या मानाने बराच काळ चालू राहातो. (ध्वनिमुद्रण करून तपासले, तर व्यंजन-स्वर-मिळालेल्या अक्षराच्या उच्चारणात कालमर्यादेच्या अर्ध्याअधिक अंश फक्त स्वराचे अस्तित्व दाखवता येईल. अर्थात, कानाला सराव असला, तर ध्वनिमुद्रणाची गरज नाही.)
पण ऐकणार्‍याला काय संवेदना होते? जवळच्या क्-ख्-...ह्-ळ् स्वर पुरताच "रंगून" (पुन्हा रूपक वापरावे लागले!) जातो. म्हणून उपमेने क्-ख्-...ह्-ळ् यांना "व्यंजन" हे नाव आले. आता मात्र "व्यंजन" हा तांत्रिक शब्द इतका रुळलेला आहे, की हे अभ्यासक्षेत्र आहे असा संदर्भ माहीत असल्यास उपमेची स्मृती न होता आपण "व्यंजन" हे चिह्न-शब्द वापरतो, आणि त्याने क्-ख्-...ह्-ळ् यांचा बोध होतो.

२. भाषेच्या सर्वसमावेशक तत्त्वज्ञानातही "व्यंजना" ही उपमा वापरलेली दिसते. भाषा वापरताना वेगवेगळ्या आवाजांची एक माळ बोलली-ऐकली जाते, आणि त्यातून एकसंध असा काहीतरी संकेत मग एकसंध अशा अर्थाशी जोडला जातो. हे जे काय एकसंध असते, त्याला "स्फोट" म्हणतात. आवाजांच्या त्या मालिकेत कुठल्याही आवाजात तो "स्फोट" नसतो. पण त्या अवाजांच्या मालिकेचे सान्निध्य नसले, तरी तो नसतो. म्हणजे आवाजांची मालिका ही व्यंजना घडवते, आणि स्फोट हा व्यंग्य असतो. याचे तपशीलवार वर्णन भर्तृहरी या तत्त्वज्ञ-वैयाकरणाने केलेले आहे. येथेसुद्धा आधी "व्यंजना" ही उपमाच होय. पण वरील क्-ख्-...ह्-ळ्="व्यंजन" या थेट अर्थापेक्षा वेगळ्याच कुठल्या अर्थाने तो तांत्रिक शब्द रूढ झाला आहे.

३. अर्थप्रक्रियेमध्ये अभिधा-लक्षणा-व्यंजना. ही अर्थप्रक्रिया म्हणजे सर्वसमावेशक तत्त्वज्ञान नव्हे. कारण सर्वसमावेशक तत्त्वज्ञानात अवघ्या वाक्यातूनच स्फोट व्यंग्य असतो, पण येथे या क्षेत्रात फक्त काही थोड्या ठिकाणीच व्यंजना असते, अन्य ठिकाणी मात्र व्यंजना नसून अभिधा असते. म्हणजे या दोन क्षेत्रात "व्यंजना" शब्द विलक्षण वेगवेगळ्या तांत्रिक ठिकाणी जाऊन बसला आहे. या "अभिधा-लक्षणा-व्यंजना" तीन "वृत्तीं"पैकी प्राचीन भारतात ऐकमत्य नव्हते. उदाहरणार्थ नैयायिक प्रतिपादन करतात की अभिधा आणि लक्षणा म्हणजे असे काही आहे; व्यंजना म्हणून असे काहीच नाही. वैयाकरण मानतात की अभिधा-व्यंजना या दोन गोष्टी आहेत, पण लक्षणा असे काही नाहीच. तुम्ही म्हणता तसे ध्वन्यालोकात आणखी काही सांगितलेले असेल.

- - -

खुद्द अर्थप्रक्रियेच्या अभ्यासाचा आवाका फार मोठा असल्यामुळे कधीकधी (२) आणि (३) मध्ये गोंधळ होणे शक्य असते. तो टाळलेला बरा. अभ्यास करताना ज्या ठिकाणी (२) आणि (३) दोन्ही क्षेत्रांची तत्त्वे लागू करायची आहेत, त्या ठिकाणी अशा शब्दांमुळे केवळ शाब्दिक गोंधळ होऊ नये, म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. नागेश नावाच्या वैयाकरणाने नैयायिकांचे खंडन करताना असाच गोंधळ केलेला आहे. नैयायिक क्षेत्र-२ मधील व्यंजना मानतातच. तुम्ही कुठेतरी व्यंजना आहे असे मानता म्हणून त्यांनी क्षेत्र-३ मधील व्यंजना मानलीच पाहिजे, असा नागेशाचा युक्तिवाद आहे. हा युक्तिवाद कोणाला बरे पटेल? मात्र युक्तिवादातली चूक त्याने लिहिलेल्या परिच्छेदांत गोलमाल हरवून जाते, गोंधळ होऊन चूक लक्षात येत नाही.

क्षेत्र-२ आणि क्षेत्र-३ मध्ये गोंधळ होणे मी समजू शकतो (गोंधळ होऊ नये, चूक आहे, पण चूक सुधारली तर समजण्यासारखी आहे.) पण क्षेत्र-१ आणि उर्वरित दोन क्षेत्रांमध्ये गोंधळ झाल्याबद्दल मी आश्चर्यचकित झालेलो आहे. कारण क्षेत्र-१ कमालीचे मर्यादित आहे, त्याच्या सीमा सुस्पष्ट आहेत. क्षेत्र-२ किंवा ३ मधील तांत्रिक अर्थाचा वापर चुकून होण्याची पाळी काशी यावी?

- - -

माझ्या वाचनात आनंदवर्धनाचे ध्वन्यालोक नाही. त्यातील थोडे विस्तृत उद्धरण देऊ शकाल काय? (म्हणजे आगेमागेची दोन-तीन वाक्ये.) त्याचे अर्थप्रक्रियेतले "ध्वनित होणे" आणि "ध्वनि=आवाजशास्त्र" यांचे क्षेत्र-संदर्भ वेगवेगळे आहेत (आणि हे त्यालाही माहीत होते), असे दिसून येईल असे मला वाटते.

अवलिया's picture

14 Mar 2011 - 1:02 pm | अवलिया

आता तुम्हाला नक्की काय म्हणायचे होते हा स्पष्ट विचार समजला.

एक नम्र विनंती अशा विषयांवर तुम्ही संस्कृतमधुन प्रतिसाद दिलात तर चटकन कळेल आणि तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते कळेल. कित्येकदा तुमचे वेगळ्या धाटणीचे मराठी नीट समजत नाही :)

***
आनंदवर्धनच्या ध्वन्यालोकातले दोन कारिका आणि वृत्तीतले काही वाक्य देत आहे.

काव्यस्यात्मा ध्वनिरिति बुधैर्यः समाम्नातपूर्वस्तस्याभावं जगदुरपरे भास्तमाहुस्तमन्ये |
केचिद् वाचां स्थितमविषये तत्वमूचुस्तदियं तेन ब्रुमः सहृदयमनःप्रीतये तत्स्वरुपम् || प्रथम उद्योत १

योऽर्थः सहृदयश्लाघ्य: काव्यात्मेतिव्यवस्थितः |
वाच्यप्रतीयमानाख्यौ तस्य भेदावुभौ स्मृतौ || प्रथम उद्योत २

प्रथमेहि विद्वांसो वैयाकरणा: व्याकरणमूलत्वात् सर्वविद्यानाम् | ते च शृयमाणेषु वर्णेषु ध्वनिरिति व्यवहरन्ति | तथैवान्यैस्तन्मतानुसारिभि: सूरिभि: काव्यतत्वार्थदर्शिभिर्वाच्यवाचकसम्मिश्रः शब्दात्मा काव्यमिति व्यपदेश्यो व्यञ्जकत्वसाम्याद ध्वनिरित्युक्तः |

लवंगी's picture

11 Mar 2011 - 9:35 am | लवंगी

काहि अगदि निश्पाप शब्दांचे उच्चार जरा बदलले तरी कहर होऊ शकतो..

स्वतन्त्र's picture

11 Mar 2011 - 3:23 pm | स्वतन्त्र

१००% सहमत.

विजुभाऊ's picture

11 Mar 2011 - 1:06 pm | विजुभाऊ

मोडक या आडनावाचा उच्चार मी एकदा मोडकं असा केला होता.

मराठीत अंतीम अक्षरावर अध्याऋत अनुस्वार असलेले बरेच शब्द आहेत. पूर्वे हे असे शब्द अंतीम शब्दावर मात्रा लिहून उच्चारले जात उदा : मोडकं या शब्दाचा मूळ शब्द ( लेखी) मोडके असा आहे.
उच्चारात शेवटची मात्रा कालौघात गळून गेली. असे अनेक शब्द आहेत. फार कशाला चाळीस एक वर्शापूर्वीच्या मराठीतले बरेचसे शब्द आता वेगळ्या पद्धतीने लिहीले जातात. उच्चारले जातात. उदा: पूर्वीचे "लेखक सुलभेने असे केले" किंवा "प्रभेला बांगड्या आवडतात" " जयंताला गावी जायचे होते " "रामाच्या दुकानी खाउ मिळेल"अशी वाक्ये लिहायचे
हेच वाक्ये हल्ली सुलभाने असे केले . प्रभाला बांगड्या आवडतात , जयंतला गावाला जायचे होते ( या वाक्यात विभक्ती प्रत्यसुद्धा बदलेला आहे) , " रामच्या दुकानात खाऊ मिळेल " ( "ई" हा सप्तमी विभक्तीचा प्रत्यव " त" या पत्यात बदललेला आहे)
भाषा ही प्रवाही असते. ती प्रवाही राहिली तरच टिकते अन्यथा मृत होते.
भाषा बोलत असताना कमीतकमी श्रमात बोलले जाते.
"काय चालले आहे "हे वाक्य हल्ली लिहीतानाही "काय चाल्लय" असे लिहीतात. दोन्ही वाक्ये नागरी मराठीतच आहेत.
जोवर बदलेल्या उच्चाराने अर्थात फरक पडणार नसेल आणि समोरच्या त्या उच्चाराच्या अर्थाने योग्य अर्थबोध होत आहे तो वर शब्दांचे उच्चार बदलत राहतील.
पुण्यात बरेच ठीकाणी "कुठे" या शब्दाचा उच्चार "कुढं" असा ऐकू येतो.
अहमदनगरकडे "कुढं येवु र्‍हायला" असे विचारले जाते.
वही सापडली का या ऐवजी वही भेटली का असे विचारले जाते.
कालौघात ( हा शब्दसुद्धा जवळजवळ हद्दपार झालाय ( "झाला आहे?") ) बरेच शब्द हद्दपार होतात त्यांची जागा नवे शब्द घेतात.
खाली काही शब्द देतोय ( देत आहे) त्यांचा वापर तुम्ही किती वर्षात बोलण्यात लिहिण्यात वाचण्यात केलेला आहे ते सांगा
१)एकसमयावच्छ्द्देकरून
२)अंम्मळ
३) काकतालीय न्याय
४) वदतोव्याघात
५)नडगी
६)उचंबळून
७)उच्श्रुंखल
८) भंजाळणे
९)दुरीत
१०)दुंदुभी
११) हसरा
१२) हितगूज
१३) कालवण
१४) वार्ताहर
१५)विपर्यास
१६) निर्हेतूक
१७) मिळमिळीत/ मुळमुळीत
१८)प्रज्ञाचक्षू
१९)एवंगुणविशीष्ठ

नगरीनिरंजन's picture

11 Mar 2011 - 2:12 pm | नगरीनिरंजन

१,३,४,१८,१९ सोडले तर बाकीचे सर्रास वापरले जाणारे शब्द आहेत.

स्वतन्त्र's picture

11 Mar 2011 - 1:41 pm | स्वतन्त्र

'भंजाळणे' हा शब्द सर्रास वापरतो.

शिल्पा ब's picture

12 Mar 2011 - 1:16 am | शिल्पा ब

बापरे केवढे ते प्रतिसाद अन केवढी ती चर्चा...चालु द्या...थोडंफार कळतंय.

मृगनयनी's picture

14 Mar 2011 - 2:26 pm | मृगनयनी

ह्म्म्म! मला कुणी सान्गेल का... की "चुचु" हा शब्द मराठीत कसा उच्चारावा?
"च" चा उच्च्चार "चिमट्या"च्या "च" सारखा आहे की "चमचा"तल्या "च" चा आहे?
की दोन्ही "च"चे कॉम्बिनेशन आहे? :|

नारयन लेले's picture

14 Mar 2011 - 11:48 am | नारयन लेले

बोलतानाचि नको एव्हडि काळजि पण लिहिताना माञ काळजि घ्या नाहितर बरेच प्रश्न्न निर्माण होतिल हो.

विनित