मुलाखत

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
10 Mar 2011 - 5:01 am
गाभा: 

मराठी विकिवर काम करतांना मुलाखत हा लेख लिहित आहे.
हा लेख लिहितांना असे वाटले की मिपावरही याची चर्चा व्हावी. त्या निमित्ताने काही अजून चांगले मुद्दे त्यात अंतर्भूत करता येतील. इथेही कदाचित काही सदस्यांना त्याचा उपयोग होईल. शिवाय काही भाग मला लिहायला जमले नाहीत. ते खाली दिले आहेत. त्या विषयीही चर्चा व्हावी ही अपेक्षा. ही चर्चा करतांना हे मुद्दे तुम्ही स्वतःच मराठी विकीच्या मुलाखत या पानावर नोंदवले तर अजून आवडेल. तसे जमत नसेल तर मी ते तेथे चिकटवण्यास तयार आहे.
या चर्चेतील मुद्दे विकिवर सगळ्यांच्या वापरार्थ देता यावेत या विचारानेच ही चर्चा करत आहे.

विकीवरील लेख

मुलाखत

एका व्यक्तिने दुसर्‍या व्यक्तीचे मनोगत जाणण्यासाठी विचारलेले प्रश्न म्हणजेही मुलाखत होय. तसेच अधिकारी वर्गाने पदावर नेमण्याआधी योग्यता तपासण्यासाठी घेतलेली प्रश्नोत्तरे म्हणजेही मुलाखत होय. प्रशिक्षित मुलाखतकार नेमले प्रश्न विचारुन व निरीक्षणे करुन व्यक्तिमत्त्वाचे अनेकानेक पैलू लक्षात घेत असतात. चारचौघांमध्ये मिसळून ज्याला संवाद साधता येतो तो व्यक्ती सहजपणे मुलाखत देऊ शकतो.

नोकरी विषयक

नोकरी विषयक मुलाखती मध्ये

  • हुशारी
  • चणाक्षपणा
  • लवचिकता
  • इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
  • भावनिक सक्षमता

या बाबी तपासल्या जातात. नेमलेल्याला कामाचे अधिकारपद देण्यापूर्वी उमेदवार ती भूमिका बजावण्यास लायक आहे की नाही हे जाणून घेतले जाते. बौद्धिक, मानसिक आणि कौशल्यवृद्धीची आवड मुलाखतीत दिसून आल्यास निवडीची शक्यता असते.

नेमके स्वरूप

मुलाखत देतांना आपला नैसर्गिक स्वभाव जसा आहे तसेच वर्तन केलेले योग्य असते. या मुळे मुलाखतही सहजतेने होते. म्हणूनच आपला नैसर्गिक स्वभाव न दाबता जे उमेदवार मुलाखतीस सामोरे जातात त्यांना निकालाची कधीच काळजी नसते. मुलाखतीत बहुदा स्वतःबद्दल बोलावे लागते. त्यासाठी उत्तम आत्मविश्वास असावा लागतो. आपण कोणकोणत्या विषयात आणि कौशल्यांमध्ये पारंगत आहोत हे व्यवस्थित जाणणे आवश्यक असते. त्यासाठी योग्य ते चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे. उमेदवाराला ज्या कामासाठी अर्ज केला आहे त्या क्षेत्रात आपण कसे योग्य आहोत हे पटवून देता आले पाहिजे. मुलाखतीत संभ्रमीत करणारे प्रश्न येऊ शकतात. कोणत्याही प्रश्नांचे उत्तरे किती शांतपणे आणि विचारपुर्वक देतो त्यावर उमेदवाराची हुशारी दिसून येते. उमेदवाराचा स्वभाव आणि एकंदरीत वागण्याची पद्धत यांचे निरिक्षण मुलाखत घेणारा करत असतो. उमेदवाराची कठीण परिक्षा घेण्यापेक्षा रिक्त जागेकरिता सर्वात चांगला उमेदवार निवडण्याची जबाबदारी मुलाखतकर्त्यावर असते. म्हणून त्या जागेकरिता 'मीच कसा योग्य आणि उपयुक्त आहे' हे कळत नकळतपणे मुलाखत देणाऱ्याने दखावून द्यायचे असते.

मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी तंत्र

  • स्वत:बद्दल सांगण्याची तयारी आरशासमोर करा. हे वारंवार करून त्यात नैसर्गिकता आणा
  • हसरा चेहरा महत्त्वाचा असतो. चेहऱ्यावर प्रसन्नता असू द्या. हसर्‍या चेहर्‍याची सवय करा.
  • योग्य व्यावसायीक पेहराव तुम्हाला उठाव देणारा असावा. योग्य कोट व टाय असल्यास चांगले परिणाम साधले जातात. काळी विजार व पांढरा शर्ट असल्यास उत्तम अथवा निळसर, करडे कपडे चालतात.
  • ही मुलाखत माझ्यासाठीच आहे आणि मी त्यात यशस्वी होणारच आहे असाच विचार करा.
  • मुलाखतीच्या ठिकाणी जाणवणाऱ्या गंभीर वातावरणात भांबावून जाऊ नका. आपण निवांत राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी संथ श्वसन करा ताण कमी होईल.
  • तुमच्या अवगत कौशल्यांबाबत सांगताना उत्साहाने त्या मध्ये केलेले कार्य सांगा. उदाहरणे द्या.
  • मुलाखतीत असत्य कधीही बोलू नका.
  • मुलाखतीत घाई गडबड न करता शांत चित्ताने प्रश्नांची उत्तरे द्या.
  • प्रश्न न समजल्यास विनयाने परत विचारा यात काही चुकीचे नाही.
  • मुलाखतकर्त्याच्या अपेक्षांची जास्तीत जास्त पूर्तता करता येईल याची काळजी घ्या.
  • मुलाखती नंतर विनम्रतेने आभार माना

व्यावसायिक मुलाखतीत बसणे, बोलण्याची पद्धत, शिष्टाचार, निटनेटकेपणा आणि प्रथमदर्शनी प्रभाव यांचा विशेष भाग असतो हे लक्षात घ्या. स्पर्धात्मक युगात इतरांपेक्षा सरस ठरण्याकरिता स्वत:चे वेगळेपण आणि विशिष्ट चमक दिसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वत:चा बायोडाटा किंवा करिक्युलम व्हिटे वेळोवेळी वर्तमान करत राहणे गरजेचे असते.

मुलाखतीतले सामान्य प्रश्न

  • तुमच्याबद्द्ल काही सांगा?

    (टेल मी समथींग अबाऊट युअरसेल्फ) या विशेष प्रश्नाकरीता बायोडाटा व्यतिरिक्त या नोकरीकरिता उपयुक्त असणारे स्वतबद्दलचं तुम्ही काय सांगू शकता, हे पाहिले जाते. या प्रश्नाची तयारी करण्यासाठी वारंवार याचे उत्तर देण्याची तयारी करा.

  • इथे का काम करायचे आहे? नेमकी कारणे द्या. त्यात अजून चांगला अनुभव आणि संस्थेसोबत स्वतःची प्रगती असेही सांगता येते.
  • पगाराची काय अपेक्षा आहे? - मोकळेपणाने अपेक्षा सांगा. येथे लाजू नका.
  • तुमच्या खुबी आणि तुमच्या कमतरता कोणत्या? - कोणतेही काम वेळेवर आणि परिपूर्ण करणे, कामाकडे लक्ष देणे, नव नवीन गोष्ती शिकणे, कंपनीच्या पद्धतींचा अभ्यास करण्याची हातोटी असणे, साध्या भाषेत महत्त्वाच्या गोष्टी समजावता येणे, फोनवर सहजतेने बोलता येणे अशा गोष्टी तुम्ही सांगू शकता. कमतरता सांगताना त्यातही चलाखीने खुबीच सांगा - जसे की, 'मला कोणतेही काम पूर्ण करायला आवडते त्यामुळे मला पर्फेक्शनिस्ट मानले जाते. अर्थातच मी कामाचा जरा ताण घेतो.'
  • अगोदरची नोकरी का सोडत आहात? - जे कारण आहे ते स्पष्टपणे द्या. वेळ कुणावरही आलेली असते.

संस्थेला किंवा कंपनी करता तुमचे योगदान काय असेल हे योग्यप्रकारे सांगितले तर चांगले मत बनू शकते.
वरील मुद्द्यांचा उपयोग केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग आदी परीक्षांमध्येही होऊ शकतो. अशा मुलाखती मध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानापेक्षा त्यांचे समकालीन वास्तव, त्यातील घडामोडी व कळीचे मुद्दे या विषयक दृष्टिकोन व भूमिका तपासली जाते.

खालील बाबींवर लिखाण हवे आहे. कुणी मदत करू शकेल काय?

  • दूरदर्शन वरील मुलाखत
  • रेडियो वरील मुलाखत
  • राजकीय मुलाखत
  • गाजलेल्या मुलाखती


तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग आदी सेवांच्या मुलाखती कशा होतात व त्यासाठी कशी तयारी केली पाहिजे यावर कुणी माहिती देऊ शकेल काय?

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

10 Mar 2011 - 11:22 am | शिल्पा ब

छान माहीती.

निनाद's picture

11 Mar 2011 - 4:38 am | निनाद

धन्यवाद!
पण असा कोरडा प्रतिसाद काय देता?
दोन ओळी तेथे देता येतील असे द्या ना लिहून जरा!
अगदी ' दूरचित्रवाणीवर होणार्‍या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाला मुलाखत असे म्हणतात. त्यात देह बोली आणि आवाजाची फेक तसेच चेहर्‍यावरील भाव आदी गोष्टींना महत्त्व असते' असे वगैरे तर नक्कीच जमेल! शिवाय दोन चार महत्त्वाच्या मुलाखती द्या शोधून.
देताय ना मग?

मुलूखावेगळी's picture

10 Mar 2011 - 1:30 pm | मुलूखावेगळी

+१

निनाद's picture

11 Mar 2011 - 4:39 am | निनाद

तोच वरचा प्रतिसाद तुम्हालाही लागू! ;)

धन्यवाद!
पण असा कोरडा प्रतिसाद काय देता?
दोन ओळी तेथे देता येतील असे द्या ना लिहून जरा!
अगदी ' दूरचित्रवाणीवर होणार्‍या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाला मुलाखत असे म्हणतात. त्यात देह बोली आणि आवाजाची फेक तसेच चेहर्‍यावरील भाव आदी गोष्टींना महत्त्व असते' असे वगैरे तर नक्कीच जमेल! शिवाय दोन चार महत्त्वाच्या मुलाखती द्या शोधून.
देताय ना मग?

आताच धागा वाचला ..

मस्त वाटले वाचुन ...

मदत करु इच्छित असलो तरी ईतके छान लिहिता येणार नाहिच आनि थोडेफार लिहिले तरी शुद्धलेखनाच्या चुकाच जास्त असतील त्यामुळे नाईलाजाने मदत करु शकत नाहिये

निनाद's picture

11 Mar 2011 - 4:35 am | निनाद

कोणत्याही चुकांची काळजी न करता लिहा. लेख येणे महत्त्वाचे आहे. कसेही असले तरी चालेल! किंवा येथेच लिहा. मी ते विकीच्या पानावर चिकटवेन.
शुद्धलेखनाची काळजी सध्या करूच नये. त्यासाठी मी फायरफॉक्सचे मराठी स्पेलचेकर अ‍ॅड ऑन वापरतो. येथे आहे -
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/marathi-spell-checker/
उत्तम आहे वापरून पाहा. लिखाण सोपे होते.

अर्थातच इलाज आहे, आता नाइलाज नसावा ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2011 - 9:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अधिव्याख्यात्यांच्या मुलाखती

अधिव्याख्यात्याच्या मुलाखती घेण्याचा एक योग येत असल्यामुळे मला वाटले ते लिहितो. सर्वप्रथम अधिव्याख्यात्यांच्या मुलाखतीसाठी येतांना आपण आपल्या सोबत शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती सोबत ठेवल्या पाहिजेत. मुलाखतीस कॅबीन अथवा मोठ्या दालनात प्रवेश केल्यानंतर गोंधळू नका. आपली कागदपत्रे शासनाचा प्रतिनिधी असतो त्याकडे द्यावयाची असतात. आपल्याला त्यांची ओळख नसते तेव्हा कोणी तरी आपल्याला कागदपत्रे मागणारच असतात. आपण गोंधळून जावून कोणाच्या तरी पुढे कागदपत्रे ठेवण्याची घाई करु नये. मुलाखत घेणा-यांनी बसायचे सांगितल्यावर पोक काढून, एकदम खूर्चीत आरामशीर आणि टेकून बसू नका. अजून एक गुडघ्यावर पाय टाकण्याचा प्रकार तर लय बेक्कार दिसतो. अनावश्यक हालचाली टाळा. विद्यार्थीनी असतील तर पायातली चप्पल हलवत किंवा पाय हलवत राहणे. विद्यार्थी असतील तर हातात पेन घेऊन पेनाच्या खटक्याशी खेळत राहणे. खिशाला पेन लावत बसणे. .बदकासारखी मान हलवत राहणे असे प्रकार टाळावेत.

आपला संपूर्ण परिचय करुन द्या म्हटल्यावर. फार मोठ्याने, फार हळू बोलू नका. सर्वांना ऐकू जाईल एवढा आवाज असावा. उगाच आवाजात चढउतार आणू नका. प्रश्नाचे उत्तर अगदी सहज द्या.

माझे पूर्ण नाव डिंगबर भास्कर गायकवाड . ९५ला एम.ए झालो. मला पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर साठ टक्के गुण आहेत. नेट परीक्षा दोन हजार ला उत्तीर्ण झालो. मांझं एम.फील सत्त्यान्नवला झाले आणि आता प्रा.डॉ.सहज कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी करतोय. माझ्या पीएच.डीचा विषय 'महाराष्ट्रातील वासुदेवांची गाणी एक चिकित्सक अभ्यास असा आहे.

शिकवण्याचा काही अनुभव : मी सरस्वती भुवन महाविद्यालयात तासिका तत्त्वावर दोन वर्षापासून पदवीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. द्वितीय भाषा मराठी आणि ऐच्छिक मराठीची एक अभ्यासपत्रिका मी शिकवतो.

एम.ए.ला शिकत असतांना कोणते पेपर होते असा प्रश्न विचारल्यावर ब-याच विद्यार्थ्यांना अभ्यासपत्रिकेचे नाव सांगता येत नाही असा माझा अनुभव आहे. तेव्हा जे लक्षात आहे तेच सांगा. उत्तर आले नाही तर आपलं काही खरं नाही. असा विचार मनातून काढून टाका. अभ्यासपत्रिका विचारण्याचे एक कारण असे की त्या अभ्यासपत्रिकेवर विषय तज्ञ प्रश्न विचारण्याची तयारी करत असतात.

दलित साहित्य,ग्रामीण साहित्य, कविता, भाषाविज्ञान, मध्ययुगीन मराठी वाड;मयाचा इतिहास यावर साधारणतः प्रश्न विचारले जातात. कधी कधी साहित्यातला आवडता प्रकार विचारुन त्यावर प्रश्न विचारले जातात. आवडत नसलेला उगाच आवडता म्हणून कोणतेही नाव सांगू नये.

प्रश्नाचे उत्तरे सांगतांना विषयांतराचे पाल्हाळ लावू नका. सर, चांगला प्रश्न विचारला असे तर बिल्कूल म्हणू नका. कवितेवरील प्रश्नाच्या उत्तरात कवितेच्या एखाद्या दोन ओळी सांगता आल्या तर सांगाव्यात. पूर्ण कविता तालासुरात म्हणू नये.

आपला आत्मविश्वास, बोलण्याची पद्धत, आणि अभ्यास हे मुलाखतीतून दिसलेच पाहिजे. असे झाले की यश जरा जवळ येते असे वाटते. असो, अजून ब-याच गोष्टी टाकायच्या राहिल्या आहेत. वेळ मिळाला की व्यवस्थित प्रश्नोत्तर डकवतो.

निनाद असेच अपेक्षित आहे ना ?

-दिलीप बिरुटे

निनाद's picture

16 Mar 2011 - 10:23 am | निनाद

सर, उत्कृष्ट माहिती दिलीत. ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. आणि तुम्ही तर परिक्षेचे आय एम पी दिलेत. मस्त!
या तल्या अनेक छोट्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. उदा. मुलाखत घेणा-यांनी बसायचे सांगितल्यावर पोक काढून, एकदम खूर्चीत आरामशीर आणि टेकून बसू नका. असे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही विस्ताराने दिले आहेत हे मह्त्त्वाचे आहे. अनेकदा मुलाखतीच्या ताणात यांचा विचारच होत नाही.
खालचे उदाहरण फार नेमके आहे, इतक्या विस्ताराने दिल्या बद्दल धन्यवाद!
पुढील भागाची वाट पाहतो.
मग हे सगळे 'मुलाखत' या पानावर डकवू या.