सुधारक सावरकर

विकास's picture
विकास in विशेष
27 Feb 2011 - 4:16 am
मराठी दिन

आत्ता माझ्याकडे २६ तर भारतात २७ फेब्रुवारी आहे. सावरकरांचा निर्वाणदिन आणि कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीची सुरवात... सर्वप्रथम, या दोन्ही विभुतींना प्रणाम!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

“Leaders are visionaries with a poorly developed sense of fear and no concept of the odds against them.” असे रॉबर्ट जार्विक नामक शास्त्रज्ञाचे वाक्य आहे. या शास्त्रज्ञाने म्हणूनच का काय ते माहीत नाही पण कृत्रिम हृदयाचा शोध लावला असावा! असो विनोद राहूंदेत, सावरकरांच्या दूरदृष्टीस नमस्कार करताना असेच म्हणावे लागते की, त्यांच्या बाबतीत,"poorly developed sense of fear and no concept of the odds against them" हे तंतोतंत पटते.

हिंदूत्व हा सावरकरांनी तयार केलेल्या शब्दाचा समजून अथवा न समजून विपर्यास जसा त्यांचे विरोधक करतात तसाच स्वतंत्र भारतात, त्यांनी हेतूपुरस्सर स्वतः विसर्जीत केलेली "अभिनव भारत संघटना", पुर्नप्रस्थापित करणारे आणि त्यांचे समर्थक म्हणवणारे देखील करतात असे म्हणावेसे वाटते. पण या लेखाचा हा उद्देश नाही आणि त्यावर चर्चा करायची असल्यास वेगळा धागा काढावात ही विनंती! :-)

सावरकरांचे जे काही विज्ञाननिष्ठ निबंध म्हणून प्रसिद्ध आहेत, ते त्यांनी नक्की कुठल्या काळापासून ते कुठल्या काळापर्यंत लिहीलेत ह्याची मला कल्पना नाही. पण जन्मतःच कुशाग्र आणि स्वतंत्र बुद्धी असलेल्या सावरकर हे अचानक बदलले असे म्हणण्याऐवजी सतत डोळस राहून विचार करत स्वतःचे विचार घडवत राहीले. अर्थात त्याचे अगदी लहानपणापासून मूळ होते ते पारतंत्र्य आणि असे का व्हावे हा पडलेला प्रश्न. कसाही उलटसुलट विचार केला तरी परत परत एकच उत्तर मिळत होते की ज्यावेळेस हिंदू समाजाने स्वतःवर वैचारीक आणि कृतीच्या मर्यादा ओढावून घेतल्या, तेंव्हापासून त्याचे सर्वार्थाने आकुंचन घडत गेले. मग त्यातून पुढे आक्रमणे होत गेली आणि त्यांच्याशी लढायच्या ऐवजी आपण त्यांना मदत करत एकमेकांत लढत बसलो. थोडक्यात समाज/राष्ट्र/देश म्हणून जर परत मोठे होयचे असेल तर विज्ञानाचा आधार घेऊन (त्यांच्याच शब्दात) "अप-टु-डेट" बनायला हवे असे त्यांचे मत होते. त्याचा प्रत्यक्ष परीणाम म्हणून समाजाने अनेक रूढींना सोडणे गरजेचे होते...

रत्नागिरीस झालेल्या स्थानबद्धतेचा आणि राजकारणापासून अलीप्त रहाण्याच्या शिक्षेचा त्यांनी यासाठी वापर केला. किर्लोस्कर मध्ये तसेच इतरत्र त्यांचे अनेक लेख छापले गेले होते. सावरकरांची विज्ञाननिष्ठा म्हणजे, "गाय हा उपयुक्त पशू आहे" इतकीच बर्‍याचदा माहीत असते. म्हणून, आज सावरकर पुण्यतिथीनिमित्ताने खाली त्यांच्या अशाच काही निबंधातील मोजके संदर्भ, त्यांच्याच शब्दात देत आहे.

"कोणती गोष्ट राष्ट्राच्या उद्धारणार्थ आज आवश्यक आहे, ते बहुदा चटकन सांगता येते. प्रयोगाने प्रत्यक्षपणे सिद्ध करून देता येते. पण कोणची गोष्ट शास्त्रसंमत आहे ते ब्रम्हदेवाला देखील सांगता येत नाही. आम्ही कोणचाही ग्रंथ अपरिवर्तनीय आणि त्रिकालाबाधित मानत नाही. श्रूतिस्मृतीप्रभृती सारे पुरातन ग्रंथ आम्ही अत्यंत कृतज्ञ आदराने आणि ममत्वाने सन्मानतो, पण ऐतिहासीक ग्रंथ म्हणून. अनुल्लंघ धर्मग्रंथ म्हणून नव्हे. त्यातील सारे ज्ञान, अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि त्यानंतर आज राष्ट्रधारणास, उद्धारणास जे अवश्य वाटेल ते बेधडक आचरणार. आम्ही अद्ययावत बनणार, अप-टू-डेट बनणार."
- दोन शब्दांत दोन संस्कृती

सावरकरांची कडक भाषा याच "दोन शब्दांत दोन संस्कृती" लेखात आधी केवळ विद्युतवाहीनीस होणार्‍या विरोधाला विरोध करताना दिसते:

"जेंव्हा वीज ठाऊक नव्हती, आगपेटी निघाली नव्हती, तेंव्हाच्या अडाणी पद्धतीने धरून विस्तवाचे मडके नेऊन पावसात मधेच विझते आहे, मधून पुन्हा ढोसली जात आहे अशा त्या श्रूतिस्मृतीपुराणोक्त चितेवरच आम्ही आजही प्रेते जाळणार! जर कोणा भाविक मनुष्यास सांगितले की, तुझे प्रेत आटोपशीर पेटीतून नेऊन अद्ययावत विद्युतगृहात झटकन जाळले जाईल, तर त्या बातमीसरशी तो जिवंतपणी मेल्याहून मेला होईल. नि मृत्यूपत्रात लिहून ठेवील की, माझ्या प्रेताची दुर्दशा होता कामा नये, त्या करकरत्या तिरडीवर, ती लुटलुटती मान नन्ना करीत असतानाच, ते विद्रूप तोंड उघडे ठेवून त्या लाकडी चितेवर तसेच ढोसले जात जात माझे प्रेत जाळले जावे. कारण! तेच श्रूतिस्मृतिपुराणोक्त असून परलोकी सद्गती देते! खरोखर, या अपरिवर्तनीय शब्दनिष्ठ धर्मग्रंथांनी हजारो वर्षांच्या अडाणीपणास अमर करून ठेवले आहे! "

काही सनातनी धर्मपरिषदांमध्ये असे म्हणले गेले की, "आज जर पेशवाई असती तर सुधारकांना हत्तीच्या पायाखाली तुडवले गेले असते!" या वाक्याचा समाचार घेताना सावरकरांनी म्हणले"

"भुक्कडांची मनोराज्ये भुक्कडच! कुंभाराच्या मनोराज्यात गाढवेच गाढवे! गाढवांच्या मनोराज्यात उकीरडेच उकीरडे! तसेच आजच्या या करंटक पिढीच्या मनोराज्यातसुद्धा सुधारकांना हत्तीच्या पायाशी देण्यापेक्षा अधिक लोभनीय असे कोणतेच दृश्य दिसत नाही! "आज जर पेशवाई असती तर सुधारकांना हत्तीच्या पायाखाली तुडवले गेले असते!" इतकेच ह्या दळभद्र्यांना सोयरसुतक!"

मात्र सावरकरांच्या मनोराज्यात पेशवाई येणे म्हणजे दुसर्‍या बाजीरावाची नव्हती तर चंद्रगुप्तासारखी, शिवाजीसारखी अथवा पहील्या बाजीरावासारखी होती... दुसर्‍या बाजीरावासारखी अथवा संभाजी- शाहूमहाराजांनंतरच्या दुबळ्या छत्रपतींसारखी नव्हती. ते म्हणतात:

"कारण, पहील्या बाजीरावाच्या वा शिवरायाच्या सहानभुतीचे टिपण कोणा सोम्यागोम्या भटजींच्या अथवा चंद्रराव मोर्‍यांच्या टिपणापेक्षा आम्हा संघटनीय सुधारकांच्याच टिपणाशी जुळते हे उघड आहे..... आमच्या सनातनी बंधुंनी हे विसरू नये की, पराराज्यापेक्षा स्वराज्यात सामाजिक नि धार्मिक सुधारणा बहुदा अधिक सुलभतेने नि त्वरेने घडू शकते. जपानात स्वराज्य होते तोच जपान जागे झाले म्हणून एका पन्नास वर्षात ते युरोपच्या बारशास जेऊ शकले... हिंदुपदपादशाहीचे धुरंधरही युरोपच्या पोचापाचास शिकू लागले होते. सैनिक संचलन आणि तोफांचे कारखाने मराठ्यातही युरोपाच्या धर्तीवर चालू झाले होते. मुद्रणाच्या शोधाकडे नाना फडणविसास्सारख्या चतुरस्त्र पुरूषाचे लक्ष वेधत होते. ... यंत्राच्या नि विज्ञानाच्या मागोमाग सामाजिक सुधारणाही दासीसारखी धावत आलीच पाहीजे. सध्याचा प्रत्यक्ष पुरावा पहा. जे थोडे अर्धवट स्वराज्य उरले आहे तिथेच सुधारणा झाली, तेव्हा झटपट झाली का नाही ते पहा. बडोद्याच्या सयाजीरावानी राज्याची भाषा हिंदी करूनसुद्धा टाकली. अनेक प्रगत निर्बंध (कायदे) राज्यभर चालू करून कित्येक अहितकारक नि दुष्ट धार्मिक रुढी तडाक्याससरशी दंड्य ठरवल्या. "अस्पृश्य" हा शब्द माझ्या राज्यातून सीमापार व्हावा! असे उद्घोषणारा पुरूष कोल्हापुरचा छत्रपती होऊ शकतो!... "

"खरा सनातन धर्म कोणता?" हे लिहीताना सावरकर मनुस्मृतीतील अनेक वचने सांगत म्हणतात की,
"वरील प्रकारच्या सार्‍या मोठ्या, धाकट्या, व्यापक, विक्षिप्त, शतावधानी, क्षणिक आचारविचारांच्या अनुष्टुपांच्या अंती अगदी ठसठशीतपणे ही एकच राजमुद्रा बहुदा ठोकून दिलेली असते की, "एष धर्मस्सनातनः!" आपल्यच धर्मग्रंथात ही खिचडी झालेली नसून जगातील इतर झाडून सार्‍या अपौरूषेय म्हणविणार्‍या प्राचीन आणि अर्वाचीन धर्मग्रंथांचीही तीच स्थिती आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या मोसेस पैंगबरापासून ते अगदी आजकालच्या अमेरिकेतील मोर्मन पैगंबरापर्यंत सर्वांनी, मनुष्याच्या उठण्याबसण्यापासून दाढी-मिशा, शेंडीच्या लांबीरूंदीपासून वारसांच्या, दत्तकांच्या, लग्नाच्या निर्बंधापासून तो देवाच्या स्वरूपापर्यंत आपल्या सार्‍या विधानांवर "एष धर्मस्सनातनः!" हीच राजमुद्रा आणि तीही देवाच्या नावाने ठोकलेली आहे!..." असे म्हणत ते शेवटी सारांशात म्हणतात, " जे सृष्टीनियम विज्ञानास प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगान्ती सर्वथैव अबाधित, शाश्वत, सनातन असे आढळून आले आहेत तेच काय ते खरे सनातन धर्म होत. ... मनुष्याचे झाडून सारे ऐहीक व्यवहार, नीती, निर्बंध हे त्यास या जगात हितप्रद आहेत की नाहीत या प्रत्यक्षनिष्ठ कसोटीनेच ठरवले पाहीजेत, पाळले पाहीजेत, परिवर्तिले पाहीजेत. 'परिवर्तिनि संसारे' ते मानवी व्यवहारधर्म सनातन असणे शक्यच नाही. इष्ट नाही..."

सुरवातीस म्हणलेले गायीसंदर्भातील सावरकरांचे विचार वाचताना हसायला देखील येते आणि त्यातील मुद्दा देखील समजतो:

"आमच्या 'गायी' वरील लेखाचा ज्या आमच्या गोभक्त बांधवांना राग आला असेल, त्यांनी असा शांतपणे विचार करावा की, आम्हा हिंदूंच्या संस्कृतीचा उपहास जर कोणाचा कागद करीत असेल तर तो आमच्या लेखाचा नसून गायीत तेहतीस कोटी देवता कशा नांदतात हे दाखवणारा तो सर्वत्र आढळणार्‍या चित्राचा कागद. पंढरपूरच्या यात्रेच्या रामगड्यांच्या दिवसात तिसर्‍या वर्गातील आगगाडीच्या डब्यात वारकरी जसा धर की कोंब चालू होते, तसे या गायीच्या शरीरात देवांची रगडारगडी, कोंडमार झालेली आहे! विष्णू, ब्रम्हा, चंद्र, सूर्य, यम, कोणी कंठात, कोणी दातांवर , कोणी नाकात ज्याला जिथे साधेल तिथे तो लटपटला. पृष्ठवंशात तर इतकी दाटी आहे की, कोणी सनातनीही रागाने जेंव्हा उनाड गायीच्या पाठीत दोहताना तिने लाथ झाडताच हटकून एक काठी घालतो तेंव्हा दहापाच देव तरी लंबे झाल्यावाचून राहूच नयेत! ..."

याहूनही अधिक बरेच काही.

"गोमुत्राने अमके तमके रोग बरे होतात. शेण हे उत्तम खत आहे! इतकेच असेल तर त्या रोगांनी पछाडलेल्या रोग्यांस गोमुत्र पिउंद्यात. घोड्याचे मुत्र, गाढवीचे दूध, कोंबडीची विष्ठा हि ही औषधी आहेत. मनुष्यमुत्रातही काही गुण आहेत. त्या त्या रोग्यावर ती ती घेतात तसे गोमुत्र घ्या. पण कोंबडीची विष्ठा सर्पदंशावर उतारा मानतात म्हणून श्रद्धाच्यादिवशीही थोडीशी चटणीसारखी सेवावी काय?"

मात्र हे सारे गायीचे महत्व सांगण्यासाठी पसरवलेल्या अंधश्रद्धांना. त्यांनी गोरक्षणाला वावगे म्हणले नव्हते, तर गोपुजनास वावगे म्हणले होते. त्याच बरोबर केवळ हिंदूंना पूजनीय म्हणून झालेल्या इतिहासातील गोहत्येस केवळ "उपयुक्त पशूस मारले" इतके कस्पटासमान देखील मानले नव्हते, हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.

असो... लिहावे तितके थोडेच आहे. पण या सर्व सुधारकी आणि विज्ञाननिष्ठ लिखाणात एक गोष्ट दिसून आली. एकतर स्वत: पण पालन करणे, दुसरे म्हणजे त्यांनी जी काही आवाहने दिली ती सामान्य माणसांस न देता त्यावेळेस हिंदू धर्माचे जे काही संस्थांत्मक ढुढ्ढाचार्य होते त्यांना दिली. सनातन्यांवर विखारी टिका केली तरी शेवटी सनातनीबंधू असे म्हणत गोंजारत सुधारण्याचा प्रयत्न देखील केला.

असे म्हणतात की सावरकरांना कल्पना होती की आपण टोकाची भुमिका घेतली तर लोकं थोडीफार मध्यापर्यंत येतील.. त्यांनी ज्या बंद्या मोडल्या पाहीजेत असे म्हणले त्यातील सर्व बंद्या मोडल्या आहेत. ते होण्यास किती वेळ लागला आहे आणि आजही काय अवस्था आहे, हा एक मोठा चर्चेचा विषय आहे.

तरी देखील हा प्रश्न पुरेसा सुटला नाहीच... सावरकरांसारखे परखड आज भरपूर आहेत. तरी देखील, अंधश्रद्धा आहेच, धर्मांधता आहेच.. मग हे वेगळ्या पद्धतीने सांगायला हवे का अजून काही? का हम नही सुधरेंगे म्हणत स्वतःपुरते बदलून बाकी जग गेले खड्ड्यात असे म्हणायचे?

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2011 - 4:55 am | राजेश घासकडवी

सावरकरांचे विज्ञाननिष्ठ विचार समग्र कधीतरी वाचायचे बरेच दिवस म्हणतो आहे. पण ही झलक छान वाटली. शब्दप्रामाण्य न मानणारा, विज्ञानावर नितांत निष्ठा ठेवणारा, कणखर व सडेतोड बोलणारा अशी त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहाते. आगरकरांची सुधारकी विचारसरणी व टिळकांचा निर्भीडपणे स्वराज्य मागण्याचा आग्रह या दोन्हीचा संगम दिसतो.

अजून अंधश्रद्धा आहेत हे मान्य आहे, पण ज्या काळी त्यांनी लिहिलं त्यापेक्षा आज कमी आहेत असं म्हणू धजावतो. जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था काही प्रमाणात खिळखिळी झाली आहे (पूर्ण गेली नाही हे माहीत आहे). आज सनातनी असते तर तथाकथित शूद्रांमुळे इंटरनेट विटाळते असं म्हणाले असते. तसं कोणी म्हणत नाही, सेलफोन घेताना जात दाखवावी लागत नाही हेही नसे थोडके. आजारी पडल्यावर भोंदू बाबांकडून मंत्र म्हणून घेण्याऐवजी परिणामकारक औषधं घेण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पंगा's picture

27 Feb 2011 - 5:30 am | पंगा

आज सनातनी असते तर तथाकथित शूद्रांमुळे इंटरनेट विटाळते असं म्हणाले असते. तसं कोणी म्हणत नाही

नक्की?

कदाचित "शूद्र"करिता काही नवी, वेगळी, पोलिटिकली करेक्ट (किंवा नॉट-सो-पोलिटिकली-करेक्ट) टर्म वापरून असे करणे अगदीच अशक्य असावे काय?

वाहीदा's picture

27 Feb 2011 - 11:47 pm | वाहीदा

प्रतिसाद मनापासून आवडला !

अप्पा जोगळेकर's picture

27 Feb 2011 - 9:43 am | अप्पा जोगळेकर

अजून अंधश्रद्धा आहेत हे मान्य आहे, पण ज्या काळी त्यांनी लिहिलं त्यापेक्षा आज कमी आहेत असं म्हणू धजावतो.
हो. पण यापैकी परिस्थितीच्या ताणतणावामुळे ( जसे - रोज हपिसात गेल्यावर परजातीय सहकार्‍याबरोबर जेवणे किंवा अशाच प्रकारे घराबाहेर पडून सगळ्यांबरोबर वावरल्यामुळे घडून येणारी आंतरजातीय लग्नं या परिस्थितीच्या रेट्यामुळे घडलेल्या सुधारणा होत ) मोडून पडलेल्या अंधश्रद्धा किती आणि अज्ञान दूर होउन शहाणे झाल्यामुळे नष्ट झालेल्या अंधश्रद्धा किती हे मोजून पाहिले पाहिजे.
जागतिकीकरण, औद्योगिकीकरण, वाढते शहरीकरण यांमुळे लोकं घराबाहेर पडले, एकमेकांमध्ये मिसळले, स्त्रियासुद्धा घराबाहेर पडल्या आणि त्यामुळे का होईना अनेक खुळ्या कल्पना नष्ट झाल्या. हे चांगलेच झाले. पण अज्ञान दूर होउन शहाणे होण्याची प्रक्रिया घडायला हवी होती त्या प्रमाणात घडली नाही.
म्हणूनच तर शिकलेल्या लोकांमधीलसुद्धा अंधश्रद्धा ठायी ठायी दिसतात. जसे - गणपतीने दूध पिणे, नाडी पट्टी इत्यादी.
त्यामुळे त्याकाळापेक्षा आज कमी प्रमाणात अंधश्रद्धा दिसतात ही काही फार कमेंडेबल गोष्ट नाही असे वाटते.

विकास's picture

27 Feb 2011 - 7:43 pm | विकास

आगरकरांची सुधारकी विचारसरणी व टिळकांचा निर्भीडपणे स्वराज्य मागण्याचा आग्रह या दोन्हीचा संगम दिसतो.

मला माहीत आहे की आपल्याला जे वाटले ते आपण लिहीले आहे. पण गंमत म्हणजे १९४७ साली लिहीलेल्या "माझ्या आठवणी" मध्ये सावरकर लिहीतातः

राजकारणात टिळक, चिपळूणकर हे आमचे गुरू, समाजकारणात रानडे, आगरकर हे आमचे गुरू. त्या उभयंतांच्या मतांचा यथाशक्य समन्वय हे आमचे धोरण...

अजून अंधश्रद्धा आहेत हे मान्य आहे, पण ज्या काळी त्यांनी लिहिलं त्यापेक्षा आज कमी आहेत असं म्हणू धजावतो.

सहमत आहे. पण कधी कधी वाटते स्वरूप बदलत आहे. तुर्त वेळेअभावी इतकेच म्हणतो.

नगरीनिरंजन's picture

27 Feb 2011 - 9:09 am | नगरीनिरंजन

सावरकरांचे विचार त्या काळात तर क्रांतीकारी होतेच पण ते अजूनही बरेच टोकाचे वाटावेत हे दुर्दैव आहे. पण त्यांच्या सुधारणावादी आणि बुद्धीनिष्ठ विचारांचा गोषवारा मांडणारा हा लेख आवडला.

नितिन थत्ते's picture

27 Feb 2011 - 10:34 am | नितिन थत्ते

विज्ञाननिष्ठ निबंधांची पारायणे १५-२० वर्षांपूर्वी केली होती.

त्यातील विचार कदाचित तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे ही असतील परंतु विचार करण्याची दिशा योग्य होती यात शंका नाही.

(रोचक विरोधाभास: सदर निबंधलेखन + रूढीभंजनाचे कार्य सावरकरांनी १९२३-३७ या काळात केले. या काळातल्या लेखात "जेथे थोडेफार स्वराज्य आहे तेथेच सुधारणा होतात" असे सावरकर म्हणतात. तर त्याच्या तीसएक वर्षे आधी "स्वराज्य नाही म्हणून सुधारकांच्या गमजा चालू आहेत" असे टिळक म्हणतात. ब्रिटिश आमचा धर्म बुडवणार अशा समजापासून ३० वर्षांत क्रमाने ब्रिटिशांना आमचा धर्म सुधारण्यात खरोखरचा रस नाही असे रिअलायझेशन आले असावे).

विकास's picture

27 Feb 2011 - 10:32 pm | विकास

त्यातील विचार कदाचित तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे ही असतील परंतु विचार करण्याची दिशा योग्य होती यात शंका नाही.

सहमत. म्हणूनच सावरकर म्हणतात की कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नाही, ती वर्तमानातील विज्ञानाच्या कसोटीला जर उतरली तर योग्य. त्यासंदर्भात त्यांचे अनुवांशिकतेसंदर्भातील काही मुद्दे वैज्ञानिकदृष्ट्या आज कदाचीत पटणार नाहीत पण ते ज्या संदर्भात आहेत (जातीयता आणि जातीभेद) ते आजही पटणारेच आहे.

तर त्याच्या तीसएक वर्षे आधी "स्वराज्य नाही म्हणून सुधारकांच्या गमजा चालू आहेत" असे टिळक म्हणतात.

टिळक या शब्दात म्हणाले होते का आणि कशाच्या संदर्भात ते पहायला हवे. त्यांचा आणि आगरकर/सुधारकांचा जो वाद होता तो, "घर आधी मिळवून साफ करायचे" का "घर साफ केले की ते आपोआप मिळेल" या संदर्भात. अर्थात "सुधारणा केल्या की लोकं आपोआप स्वातंत्र्यासाठी तयार होतील आणि मिळवतील" का "स्वातंत्र्य मिळाल्यावर सुधारकांना (आणि समाजाला) समाजसुधारणा करणे योग्य" असा होता.

सावरकरांनी दिलेल्या उदाहरणात असेच दिसते की जिथे जिथे जे काही स्वातंत्र्य आहे तेथे सुधारणा करणे शक्य झाले. अर्थात टिळकांच्या मताशी विरोधाभास नसून त्यांचा मुद्दाच त्यात सिद्ध झाला असे दिसते.

त्याव्यतिरीक्त अजून या संदर्भात सावरकर टिळकांच्याबद्दल अजूनही बोलले आहेत. पण ते नंतर वेळ मिळाला की लिहीन.

इन्द्र्राज पवार's picture

27 Feb 2011 - 7:17 pm | इन्द्र्राज पवार

जागतिक मराठी दिनानिमित्य "सावरकरांची विज्ञानदृष्टी' हाच विषय घेण्यात तुम्ही जे औचित्य दाखविले ते नोंदविण्यासारखे आहे. खुद्द सावरकरांनी मराठी भाषेला आपल्या वाङ्मयानेदेखील जो देखणेपणा दिला आहे त्याची पारायणे शालेय अभ्यासक्रमात होणे नीतांत गरजेचे होते, पण होते असे की सावरकरांची राजकीय मते (त्यांच्या हयातीत आणि त्यानंतरही...) सत्ताधार्‍यांना कधीच पटली नसल्याने त्यांच्या वाङ्मयीन लिखाणावरही (ते खणखणात नाणे असूनही) शिक्षण खात्यातील 'रावसाहेबां'ची सातत्याने वक्र नजर पडली आहे. आज सावरकर म्हणजे 'सागरा प्राण तळमळला....' इतपतच विद्यार्थ्यांना माहीत असते, पण त्याचबरोबर वर धाग्यात उल्लेखलेली त्यांच्या विज्ञानदृष्टीबद्दल आज शालेय तर राहू देच पण अगदी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या किती युवकयुवतींना माहिती असेल? [ज्याना असेल ती त्याना वर्गखोल्यातील शिकवणीतून नक्कीच मिळाली नसणार, याबद्दलही खात्री आहेच.]

हे तर सर्वानाच माहीत आहे की सावरकर गीता-वेद-उपनिषदे यांचे महत्व जाणत होते, पण त्याचवेळी त्यानी असेही म्हटले आहे की, "पाच हजार वर्षांपूर्वीच्या पोथ्यात सांगितलेली प्रत्येक गोष्ट आता आम्ही जर अद्ययावत विज्ञानाच्या कसोटीवर पारखून न घेतली तर आपले हिंदू राष्ट्र व हिंदू धर्मही पाच हजार वर्षंइतकाच मागासलेला राहून या विज्ञानाच्या टकराटकरीत आपण टिकाव धरू शकणार नाही..." हा विचार १९३५ सालातील...आणि आज १०० वर्षे होत आली...विचारातील ताजेपणा कायम राहिला आहे.

"...सावरकरांसारखे परखड आज भरपूर आहेत. तरी देखील, अंधश्रद्धा आहेच, धर्मांधता आहेच.. मग हे वेगळ्या पद्धतीने सांगायला हवे का अजून काही?..."

~ परखड असतील आजही, पण 'सावरकर' करिष्मा नसलेलेच सर्व़जण असल्याने त्यांची याबाबतीतील शिकवण अरण्यरुदन ठरत आहे. 'धर्मांधता' तर कधीच नष्ट होणार नाही या देशातून, फक्त अंधश्रद्धाच्याबाबतीत काही करता येईल असे वाटले की पुढे लगेचच अमावास्येला काळा दोरा, बिब्बा, लाल मिरची, लिंबू आपल्या कारला, टू व्हीलरला बांधून 'भुताची नजर' पडू नये म्हणून नारळ वाढवून सायन्स कॉलेजमधील प्रॅक्टिकलला चाललेला युवक दिसतो. त्यामुळे आता वेगळ्या पद्धतीने सांगायचे तर मर्यादा ह्या पडतातच....!

इन्द्रा

नितिन थत्ते's picture

27 Feb 2011 - 9:37 pm | नितिन थत्ते

>>~ परखड असतील आजही, पण 'सावरकर' करिष्मा नसलेलेच सर्व़जण असल्याने त्यांची याबाबतीतील शिकवण अरण्यरुदन ठरत आहे. .....

करिष्मा असलेल्या सावरकरांचेही हे म्हणणे तत्कालीन समाजधुरीणांना मान्य नव्हतेच. आजही या कारणासाठी सावरकरांना मानणारे थोडेच असतील.

पैसा's picture

28 Feb 2011 - 10:47 am | पैसा

आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. २६ तारखेला सावरकरांचा निर्वाण दिन होता. हा लेख दोन्ही दिवसांसाठी अत्यंत समयोचित असा झालाय. धन्यवाद!