दोन दिवसांपूर्वी ड्राइववे जवळ्च्या वाफयातून डॅफोडिल्सचे कोवळे कोंब डोकावताना दिसले. 'चला थंडी लवकरच पळणार तर' अस म्हणत मी उत्साहाने बियाणांचे कॅट्लॉग उघडले. पण मिडवेस्टची थंडी अशी सुखसुखी थोडीच जाणार? काल पुन्हा एकदा रेन, स्लीट, स्नोचे नाटक झाले. दोन तास उशीरा भरणार्या शाळेनेही 'विंटर वेदर वॉच' वर शिक्कामोर्तब केले.
'मॉम, वुई नीड सम कंफर्ट फूड.' लेकाची भूणभूण. कंफर्ट फूड म्हटले की माझ्या डोळ्यासमोर येतो गरम गरम मऊ भात, साजूक तूप, मेतकुट, पोह्याचा भाजलेला पापड. पण लेक पक्का हुझिअर. त्यामुळे फर्माइश झाली चिकन पॉट पायची. जोडीला मदतीचे आश्वासनही होते. तेव्हा थंडीवर उतारा म्हणून काल बेत होता चिकन पॉट पायचा.
साहित्यः
१ कप गाजराच्या चकत्या
१ कप मटार
१/२ कांदा बारीक चिरुन
१ मध्यम आकाराचा बटाटा
२ बोनलेस स्किनलेस चिकन ब्रेस्ट
२ १/२ कप चिकन स्टॉक
१/३ कप मैदा
२/३ कप दूध
३ टे स्पून बटर
२ टी स्पून तेल
१ चमचा मिरे पावडर
१/२ चमचा मीठ
२ पिल्सबरी पाय क्रस्ट
१/२ चमचा सेलरी सीड किंवा थाईम(नसली तरी चालेल)
कृती.
प्रथम एका पातेल्यात गाजराच्या चकत्या आणि चिकन स्टॉक गरम करत ठेवा. उकळी आली की त्यात मटार घाला. पाच मिनीटांनी आचेवरून उतरवा. झार्याने स्टॉकमधील गाजर आणि मटार बाहेर काढुन बाजूला ठेवा. आता त्याच स्टॉकमधे चिकन ब्रेस्ट घालून परत भांडे आचेवर ठेवा. वर झाकण ठेऊन चिकन शिजवून घ्या. एकीकडे बटाटा मायकोव्हेव मधे उकडून घ्या. गार झाला की सोलून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. शिजलेले चिकन स्टॉकमधुन बाहेर काढा आणि त्याचे छोटे तुकडे करा. स्टॉक बाजुला ठेवा.
आता ओवन ४२५ फॅ ला तापत ठेवा. पाय क्रस्ट फ्रीज मधून बाहेर काढून ठेवा. मोट्या भांड्यात मध्यम आचेवर तेल तापत ठेवा. तेल तापले की त्यत कांदा घालून ३-४ मिनिटे परता. आता त्यत बटर घाला. बटर वितळले की मैदा घालुन दोन मिनिटे परता. दूध घालुन ढवळा. आच मंद करा. नीट ठवळुन मैद्याच्या गुठळ्या मोडुन घ्या. एकजीव मिश्रण झाले की त्यात बाजूला ठेवलेला स्टॉक, मीरेपूड, वापरत असल्यास सेलरी सीड घालून मंद आचेवर शिजू द्या. खाली लागू नये म्हणुन अधून मधून ढवळा. सॉस घट्ट व्हायला लागले की त्यात मीठ आणि बाजूला ठेवलेल्या भाज्या घालुन ढवळा आणि आच बंद करा.
आता ९ इंच व्यासाची खोल पाय प्लेट किंवा ९ इंचाचे चौकोनी भांडे घ्या. त्यात पायक्रस्ट तळाला आणि बाजूला लावून घ्या. आता त्यात चिकन पसरा. त्या वर भाज्या घातलेले सॉस पसरा. त्यावर दुसरा पाय क्रस्ट पसरा. कडा आत दुमडून घ्या. वाफ जाण्यासाठी पाय क्र्स्टला सुरीने ६-८ चिरा द्या. आता हा पाय ओवन मधे ३०-३५ मिनिटे मधल्या रॅकवर ठेऊन भाजा.
गरम गरम पाय बाहेर काढुन त्याचे तुकडे करा. वाढताना खालचा आणि वरचा दोन्ही क्रस्ट येतील असे वाढा.
प्रतिक्रिया
26 Feb 2011 - 6:28 pm | Mrunalini
हे... मस्त आहे ग.... नक्की try करते... :)
26 Feb 2011 - 6:54 pm | कच्ची कैरी
पाय क्रस्ट काय असते मला माहित नाही तेव्हा जरा यावर प्रकाश टाकु शकाल तर माझी अडचण दूर होईल.
26 Feb 2011 - 7:28 pm | स्वाती२
पायचे फिलिंग भरण्यासाठी जी पिठाची पोळी वापरतात, त्याला पाय क्रस्ट म्हणतात. घरी करता येतो पण मी विकतचा वापरते. त्या ऐवजी पॅस्ट्री क्रस्टही वापरता येइल.
26 Feb 2011 - 8:51 pm | प्राजु
मस्त आहे प्रकार.
हेच स्टफिंग पेस्ट्री शिट्स मध्ये भरूनही पफ्फ्स करता येतील बहुधा.
पण छान वाटतोय प्रकार. नक्की ट्राय करेन मी.
27 Feb 2011 - 7:33 am | शुचि
अप्रतिम स्वाती.
27 Feb 2011 - 12:21 pm | वेताळ
मज्जा आहे तुमची.
27 Feb 2011 - 6:51 pm | JAGOMOHANPYARE
पाय खात नाय .. थोडं बदल करुन काही वेज जमलं तर बघू
27 Feb 2011 - 6:54 pm | यशोधरा
भारी! फोटोसकट :)
27 Feb 2011 - 10:14 pm | सानिकास्वप्निल
खुपच छान पाकृ आहे :)
1 Mar 2011 - 5:04 am | चित्रा
फारच छान आला आहे. आता नक्की करून बघेन.
1 Mar 2011 - 5:22 am | विंजिनेर
असेच बोल्तो.
1 Mar 2011 - 5:02 pm | स्वाती२
धन्यवाद!