कोलीम समुद्रात तसेच खाडीत मिळतो. समुद्रातील कोलीम पांढरट असतो तर खाडीतला काळा असतो. खाडीतल्या कोलमाला जास्त चव असते. कोलीम म्हणजे कोलंबीच्या जन्माची पहिली स्टेप. कोलिमाचे कालवण मी अजुन ऐकले नाही पण कोलिमाची वडी करतात. सुक्या कोलमाच्या पापडासारख्या पण थोड्या जाड वड्या बाजारात विकत मिळतात. त्यांना पेंडी म्हणतात. त्या पेंडी तव्यावर किंवा चुलीत भाजुन खायला मजा येते.
पहिला कोलीम निवडून घ्यायचा. एक माचिसची/अगरबत्तीची काडी घेउन किंवा बोटाने थोडे थोडे कोलीम सारुन (तांदूळ निवडतो तसे) कोलीम निवडावा लागतो. त्यात कधी कधी पाखर असतात किंवा काही प्लास्टिक वगैरे मिक्स झालेले असतात म्हणून. ही पाखरे अगदी छोटी असतात. आता कशासारखी लिहीली तर तुम्ही इ.. करुन आणणार नाहीत किंवा किळस वाटेल पण तसे काही नाही ही पाखरे घाणेरडी नसतात. तांदळात पडलेल्या टोक्यांप्रमाणे ही काडीला चिकटून किंवा चिमटीत धरुन काढून टाकायची.
काही जण कोलिम धुवत नाहीत त्याची चव जाते म्हणून पण जर आपले मन साशंक असेल तर पिठाच्या चाळणीत किंवा रुमालात ठेउन हा कोलिम धुवावा.
हा आहे कोलिम
लागणारे साहित्य:
कोलिम तिन ते चार वाटे
दोन मध्यम आकाराचे कांदे चिरुन
७-८ लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
मसाला
कोकम किंवा आंबोशी
मिठ
एक हिरवी मिरची मोडून
थोडी कोथिंबीर चिरुन
तेल
पाककृती:
भांड्यात तेलावर लसूणाची फोडणी द्यावी व त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत शिजवावा. मग त्यात हिंग, हळद मसाला हे नेहमीच जिन्नस घालून त्यावर कोलीम टाकावा. आता भांड्यावर झाकणात पानी ठेउन कोलिम वाफेवर शिजु द्या. मधुन मधुन झाकण काढून परतवा. ७-८ मिनीटांनी त्यात मिठ, मोडलेली मिरची, कोकम किंवा आंबोशी, कोथिंबीर टाका व परतुन परत एक वाफ येउ द्या. मग गॅस बंद करा आणि भाकरी सोबत खा.
हा आहे तयार कोलिम
प्रतिक्रिया
23 Feb 2011 - 3:56 pm | गवि
पाकृ अफलातूनच..
एकदम हटके माहिती देण्याची परंपरा पुढे चालू ठेवली त्याबद्दल आभार.
वाटच पहात होतो बरेच दिवस.
या कोलीमबद्दल एक शंका आली. हे सर्व मोठे होऊन प्रॉन्ज बनले असते का? अति लहान स्टेजला पकडल्याने तेवढे प्रॉन्जचे उत्पादन कमी नसेल का होत?
23 Feb 2011 - 4:02 pm | वसईचे किल्लेदार
आमच्याकडे करतात कोलिम.
आम्हि त्यात आल्याचे (भरपुर) काप करुन टाकतो. छान लागतात.
भरपुर आले टाकुन कोलिम ८-१० महिने टिकविला सुद्धा जातो.
टिकविलेल्या कोलमाचि आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
23 Feb 2011 - 4:02 pm | टारझन
जागु इज बॅक अगेन .. विथ समथिंग ण्यु अँड इन्क्रिडिबली इन्नोव्हेटिव्ह पाकृ :) :)
23 Feb 2011 - 4:04 pm | जागु
गगनविहारी धन्स. हा प्रकार अगदी पारंपारीक आहे. खुप आधीपासुनच कोलिम पकडतात अजुन माश्यांच्या उत्पादनात काही फरक पडलेला नाही ह्याने. आणि हातात काही सगळाच कोलिम येत नसाणार पकडणार्याच्या.
23 Feb 2011 - 4:07 pm | विजुभाऊ
तुम्हाला माश्याच्या नक्की किती पाक कृतीज म्हैती आहेत?
ग्रेट....
चाखून पहायलाच हवी
काही शंका: बाजारात सुके मासे , सुकट म्हणून जे मिळते ते कोणत्या प्रकारचे मासे असतात?
कोकणात श्रीवर्धनच्या आसपास काही लोकानी चपटे मासे ( चंदेरी रंगाचे ) सुकवायला ठेवले होते. ते नक्की कोणते मासे?
मांदेली हे काय असते?
23 Feb 2011 - 4:08 pm | जागु
किल्लेदार प्लिज रेसिपी द्या आल्याच्या कोलिमाची.
टारझन काय स्वागत आहे ? आवडल. धन्स.
23 Feb 2011 - 5:25 pm | वसईचे किल्लेदार
आधि तव्यावर ताद्ळाचे पिठ (जेव्ह्डे कोलीम असेल तेव्हडेच) लालसर होइपरयन्त भाजुन घ्या.
आल्याचे बारिक काप (साधारण १ थाळि कोलमासाठि १५० ग्राम आले) करुन कोल्मात टाका. आता भाजलेले पिठ आणि कोलिम एकजिव करा. बाकि रेसिपि ताईन्नि सागितलि तशिच.
23 Feb 2011 - 4:16 pm | जागु
विजुभाऊ चंदेरी सुकत ठेवलेले मासे म्हणजे मोदकं, त्याला टेंगळी सुकट म्हणतात.
नुसती सुकट सुक्या करंदीला म्हणतात म्हणजे कोलंबिच्या आधीची स्टेप. कोलंबीच्या सोललेल्या सुक्याला सोडे म्हणतात.
सुक्या मास्यांमध्ये खारवलेले बांगडे, घोळ, पापलेट, बोंबिल, जवळा, वाकटी हे प्रकार असतातच. अजुन आठवले की सांगेन.
मला किति मासे माहीत आहेत हे सांगण कठीण आहे. जो पर्यंत रेसिपी लिहीणाचे काम संपत नाही तोपर्यंत आकडा सांगता येणार नाही.
23 Feb 2011 - 4:34 pm | स्पा
खतरनाक.........
पाक्रु.. जागू
"वाम" च्या प्रतीक्षेत ;)
23 Feb 2011 - 4:36 pm | Mrunalini
"वाम" च्या प्रतीक्षेत मी पण...
नदीची किंवा समुद्राची... कुठलीही चालेल. ;)
वा... वाम चे फक्त नाव एकुन तोंडाला पाणी सुटले.
23 Feb 2011 - 6:12 pm | कच्ची कैरी
मस्त जागु !कधी एकलीही नव्हती ही डीश पण तुझ्यामुळे माहिती झाली .धन्यवाद!
23 Feb 2011 - 6:52 pm | स्वाती२
जागू, आज दिवसाची सुरुवात इनो घेऊन! माझी आई कोलिमची भजी करते.
23 Feb 2011 - 7:12 pm | प्रियाली
मलाही भजीच आठवली. :) आम्ही चाळणीतून धुवून घेतो.
23 Feb 2011 - 7:30 pm | प्राजु
नावही नवीन.. पाकृही नविनच.
हे प्रकरण वेगळंच दिसतंय. छान रेसिपी.
23 Feb 2011 - 9:27 pm | पिंगू
साला लहान असताना कोलिमाच्या वड्यांवर खुपच जीव होता आणि आता मात्र मांसाहार सोडल्याने हे सर्व बंद. बाकी टेस्ट भारीच लागते..
- (भूतपूर्व मासेखाऊ) पिंगू
24 Feb 2011 - 2:48 pm | इरसाल
कालच अंबाडी सुकटीची भाजी खाल्ली.
कोलिम तर जाम भारी