वर्‍हाडी खिचडी

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
10 Feb 2011 - 3:03 am

मला आठवते, मी लहान असताना, मामाच्या गावाला गेले होते. माझे आजोळ म्हणजे, जळगाव मधील चाळीसगाव. तर, आम्ही सगळे माझ्या मामाच्या लग्नासाठी गेलो होतो. मी तेव्हा साधारण ३री मधे होते. लग्न लावुन आम्ही सगळे घरी आलो होतो. मी माझ्या मामे भावांसोबत खेळत होते. ते सगळेजण मला जेवायला घेउन गेले. तिथे मी सगळ्यात पहिल्यांदा ही खिचडी खाल्ली.
तेव्हा त्या सगळ्यांनी मला मसाले भात आहे असे सांगितले. मला आठवते, आम्ही सगळे अक्षरशः पराती मधे ही खिचडी घेउन मस्त ओरपली होती.
तेव्हा पासुन ही वर्‍हाडी खिचडी माझा अगदी weak ponit आहे. माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या मामीनी मला केळवण म्हणुन ही खिचडीच केली होती.
हा भात तसा गुरगुट्याच व तिखट असतो आणि तसाच मस्त लागतो. वर्‍हाडा मधे ते लोक ह्या खिचडी वर कच्चे तेल टाकुन व सोबत पापड आणि लोणचे असे खातात.
म्ह़णुन मी आज ही माझी सगळ्यात आवडती पाकॄ देत आहे. आशा आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल.

साहित्यः

तांदुळ - १ वाटी
तुरीची डाळ - १/२ वाटी
कांदा - १ लांब चिरुन
सुके खोबरे - १ इंचाचा तुकडा
लसुण - ३ पाकळ्या
लाल तिखट - २ चमचे
हळद - १ चमचा
पाणी - २-३ वाटी
मिठ - चवीनुसार

कृति :

१. तांदुळ व तुरीची डाळ २-३ वेळा चांगली धुवुन १/२ तास एकत्र भिजवुन ठेवावी.
२. सुके खोबरे, लसुण व लाल तिखट एकत्र mixer ला वाटुन घ्यावे.
३. पातेल्या मधे तेल गरम करुन त्यात हळद व खोबरे, लसुण, तिखट याचे वाटण टाकावे. हे निट परतुन घ्यावे.
४. पातेल्यामधे भिजवलेला तांदुळ व तुरीची डाळ टाकुन परतावे.
५. भाताच्या अंदाजा नुसार गरम पाणी व मिठ टाकुन झाकण ठेवुन १०-१५ मिनिटे भात मंद आचेवर शिजुन द्यावा.
६. भात शिजुन झाल्यावर आवडत असल्यास वरुन कच्चे तेल किंवा तुप टाकुन पापड व लोणच्या सोबत गरम serve करावे.

टिपः

१. आवडत असल्यास तुम्ही त्यात कडिपत्ता, बटाट्याच्या फोडि किंवा शेंगदाणे सुद्धा टाकु शकता.

varhadi bhat

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

10 Feb 2011 - 3:07 am | नगरीनिरंजन

कांद्याचं काय करायचं?

वर्हाडी खिचडी एकदम जोरदार ...
फोटु काय नैवेद्या साठी काढलाय का ? आणा इकडे ;)

ज्योति प्रकाश's picture

10 Feb 2011 - 4:51 pm | ज्योति प्रकाश

कांद्यानं तुमचा वांदा केला ली काय्?.अहो तेल तापलं कि कांदा घालून मऊ होईपर्यंत परता कि राव.
बाकी मॄणालिनी खिचडी म्हणजे माझाही weak point.फोटो मस्तच्.रातच्याला चाललं द्या धाडून.

कांदा तेलात परतायचा असेल कदाचित.
पाकृ अगदी छान!
खोबरे कच्चे घ्यायचे कि भाजून?

खोबरे कच्चेच घ्यायचे. कारण नंतर ते तेलात परतायचे आहे. :)

Mrunalini's picture

10 Feb 2011 - 3:14 am | Mrunalini

ओ ओ, सॉरी. लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. :)

पातेल्यामधे तेल गरम झाल्यावर त्यात आधी कांदा परतुन घ्यावा व नंतर हळद आणि खोबरे, लसुण, लाल तिखट याचे वाटण टाकावे. बाकि कृती वरील प्रमाणे.

शिल्पा ब's picture

10 Feb 2011 - 3:41 am | शिल्पा ब

छान दिसतेय खिचडी...करुन बघते.

सगळ्यानीं असली खिचडि सकाळि करुन बघणे जरुरीचे आहे.
तब्बेत चांगली रहाते त्यामुळे. त्याशिवाय नाश्ता ( breakfast) करु नये असे अमेरीकेतील अनेक विद्दापिठात वैद्दकिय संशोधन करुन सिध्द केलं आहे. आयुर्वेदातहि असे लिहिले आहे.

शिल्पा ब's picture

10 Feb 2011 - 8:49 am | शिल्पा ब

नाश्ता ( breakfast) करु नये? लिंका द्या बरं..

पंगा's picture

10 Feb 2011 - 9:04 am | पंगा

...'त्याशिवाय' असाही एक शब्द लिहिलेला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद.

(बाकी अमेरिकेतील विद्यापीठे खिचडीवर वैद्यकीय संशोधन कधीपासून करू लागली हा एक संशोधनाचाच विषय आहे म्हणा!)

मुलूखावेगळी's picture

10 Feb 2011 - 10:40 am | मुलूखावेगळी

आई कुठेय ? कधी येनारे?

वेदनयन's picture

10 Feb 2011 - 4:26 am | वेदनयन

वर्‍हाडी की खानदेशी? जळगाव / चाळीसगाव चा संर्दभ दिसला म्हणुन विचारले...

खानदेशात ही खिचडी चुलीवर करतात त्यामुळे एक वेगळीच चव येते.

वर्‍हाडी की खानदेशी? हे नक्की मला पण माहीत नाही. पण माझ्या मामीने तरी मला हेच नाव सांगितले होते आणि माझ्या मामाकडे सुद्धा ह्याला वर्‍हाडी खिचडीच म्हणतात. काही चुकले असल्यास माफ करावे. :)

वेदनयन's picture

11 Feb 2011 - 1:28 am | वेदनयन

एवढी छान रेसिपी टाकायची आणी वरुन माफी मागायची - बहुत नाइन्साफी है! इरसालने खाली दिलेले स्पष्टीकरण पटले...

मिपावर कोणी माफी मागत नाही आणि कोणी माफ करत नाही. आमच्यासारखे बरेच उगी काड्या टाकत हिंडत असतात. तुम्ही मिपावर त्यामानाने नविन आहात म्हणुन सांगितले.

माझ्या चुलतबहिणीच्या सासरी खानदेशी खिचडी होते (नंदुरबार, धुळे येथील पद्धतीने). त्यात कापलेला टोमॅटो नि (बर्‍यापैकी!!) सुक्या लाल मिरच्या घालतात. ते वरील खिचडीत नसल्याने ती वर्‍हाडी असावी, असा अंदाज करतो आहे. चू.भू.द्या.घ्या.
(अंदाजपंचे)बेसनलाडू

त्या खानदेशी खिचडीला सोनार खिचडी म्हणतात की वरील (बहुदा वर्‍हाडी) खिचडीला सोनार खिचडी म्हणतात?
(जिज्ञासू)बेसनलाडू

वरील खिचडी कधी करून पाहिली नाही किंवा खाल्ली नाही. आता नक्की करेन आणि खाईन :)
(खवय्या)बेसनलाडू

धन्यवाद. खिचडी कशी झाली, ते नक्की कळवा. :)

शिल्पा ब's picture

10 Feb 2011 - 8:51 am | शिल्पा ब

एकटेच खाउ नका , आम्हालापण बोलवा..

पुन्हा एकदा भात, इकडे बायको बोंब मारतेय माझ्या भात खाण्यावरुन आणि तुम्ही एका मागुन एक भाताचे प्रकार टाका, च्यायला अन्याव आहे नुसता, असो जातो आता नाहीतर फोडणीचा भात संपुन जाईल.

बाकी, आज रात्री करुन पाहेन व उद्या सांगेन.

हर्षद.

जोशी 'ले''s picture

10 Feb 2011 - 9:27 am | जोशी 'ले'

खिचडिचा हा प्रकार खान्देशी आहे या बरोबर घट्ट कढि असेल तर मजा येते, माझ्या महिति प्रमाने तसेच वरर्‍हाडात अमरावती कडे जी खिचडि करतात त्यात तिखट / मसाला नसतो व थोडि पातळसर असते...पन त्या बरोबर टमाट्या ची झनझनित रस्सा भाजि असते

पंगा's picture

10 Feb 2011 - 9:32 am | पंगा

तर, आम्ही सगळे माझ्या मामाच्या लग्नासाठी गेलो होतो. मी तेव्हा साधारण ३री मधे होते. लग्न लावुन आम्ही सगळे घरी आलो होतो. मी माझ्या मामे भावांसोबत खेळत होते.

हं?

नाही म्हणजे, 'झट् मँगनी, पट् ब्याह' वगैरेबद्दल ऐकले होते, पण हे म्हणजे जरा जास्तच झटपट झाले, नाही?

असो.

Mrunalini's picture

10 Feb 2011 - 12:27 pm | Mrunalini

हा हा हा.... खुप हसले मी तुमची ही comment वाचुन. आहो, मला ३ मामा आहेत. आणि आम्ही माझ्या सगळ्यात लहान मामाच्या लग्नाला गेलो होतो. तेव्हा बाकिच्या मामांच्या मुलां सोबत झेळत होतो. :)

पियुशा's picture

10 Feb 2011 - 10:15 am | पियुशा

व्वा झक्कास दिस्तेय :)

हि आहे खान्देशीच खिचडी पण ती लग्न वऱ्हाडाला करतात म्हणून तिला वर्हाडी खिचडी असे म्हणतात.त्यामागे एक कारण हेही असू शकते कि एकत्रित आलेल्या इतक्या माणसांसाठी रात्री वेगवेगळे काय पक्वान्न बनवणार म्हणून खिचडी पण लागते जाम भारी.
तलोद्याकडे ह्याबरोबर कढी आणि चवळीची कोरडी भाजी करतात ती पण मस्त.
ह्यावर जर शेंगदाणा तेल कच्चे आणि चीकनीचा पापड भाजलेला.............ओफ्फो ओफ्फो ........... विचारूच नका

जोशी 'ले''s picture

10 Feb 2011 - 10:44 am | जोशी 'ले'

चिकनी चा पापड आणि कच्चे शेन्गदाने......वा

कच्ची कैरी's picture

10 Feb 2011 - 11:20 am | कच्ची कैरी

हे इरसाल मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत आहे यावर शेंगदाण्याचे कच्चे तेल आणि चिकणि ,नागली किंवा उडद दाळीचा पापड व सोबत कढी वा मस्तच बेत. ही खिचडी तशी नेहमीच छान लागते पण लग्नात करतात ती खिचडी जरा जास्तच छान लागते आणि ती केळीच्या पानावर पंगतीत खायला तर अजुनच मजा येते.

प्राजु's picture

11 Feb 2011 - 2:08 am | प्राजु

कैरी बाई.. हे चिकणी/नागली.. काय प्रकार आहेत? नाचणी चा पापड आवडतो.. पण चिकणीचा कसा असतो?

चिंतामणी's picture

17 Feb 2011 - 12:11 pm | चिंतामणी

खान्देशीच खिचडी पण ती लग्न वऱ्हाडाला करतात म्हणून तिला वर्हाडी खिचडी असे म्हणतात.त्यामागे एक कारण हेही असू शकते

आपले तर्कशास्त्र आवडले. आणि पाकृसुद्धा.

बहुधा असेच असणार.

मनराव's picture

10 Feb 2011 - 10:47 am | मनराव

मस्त मेनू.........

दिपाली पाटिल's picture

10 Feb 2011 - 11:48 am | दिपाली पाटिल

चिकनी चा पापड.... व्वा....

सगळ्यांचे मनापासुन आभार. :)
इरसाल यांनी म्हटल्या प्रमाणे, ही खिचडी वर्‍हाडा साठी करतात, म्हणुन पण हीला वर्‍हाडी खिचडी म्हणत असतील. आणि ही खिचडी कच्चे तेला सोबत खायला मला तर खुप आवडते.

धिन्गाना's picture

10 Feb 2011 - 1:01 pm | धिन्गाना

म्हणजे काय?

परिकथेतील राजकुमार's picture

10 Feb 2011 - 1:22 pm | परिकथेतील राजकुमार

मृणालिनी सुगरीणी जरा तुमचा पत्ता द्या हो.

आणि परदेशात राहात असाल तर ती स्वातीतै हवापालट करायला चालली आहे, तीच्यासोबत जाउन या चार दिवस.

कृपया पाककृती विभागाला यातनाघर असे नाव द्यावे हि विनंती.

असुर's picture

11 Feb 2011 - 1:53 am | असुर

एकवेळ जबर्‍या वर्णन असेल तरी चालून जाते हो मृणालतै, पण चांगला फटू असेल तर केवळ यातना हो, यातना!

फार चांगल्या पाकृ आणि त्याचे जीवघेणे फटू या कारणास्तव गणपा आणि जागुतै यांना काळ्यापाण्याची सजा व्हावी असे कोर्टात अपील करायच्या बेतात आहोत, त्यात तुमचा नंबर लावायचा काय?? एक स्वातीतै केकमध्ये बुडवून मारायच्या बेतात आहे, ती यशो तिकडे कसल्या कसल्या उसळी करते आहे, आणि आता त्यात तुमची भर!!!

पाकृचे धागे उघडायचेच नाहीत अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती त्या ओल्या काजूंच्या उसळीनंतर. आज मोडली! आता किमान भाजी पोळी तरी करुन खावीच लागेल स्वहस्ते, प्रायश्चित्त म्हणून!!

--असुर

इरसाल's picture

10 Feb 2011 - 1:44 pm | इरसाल

लाल ज्वारीला चिकनी म्हणतात.त्यापासून हे पापड बनवतात खासकरून खानदेशातच मिळणारा हा पापडाचा प्रकार आहे.
तो खाण्याचा योग्य प्रकार म्हणजे चुलीत भाजून त्यावर कुटलेले तिखट (तीळ,मीठ,मिरच्या, शेंगदाणे मिश्रण) आणि थोडे तेल शिंपडून ..........मग काय मज्जा येते
अवांतर... काही तळीराम याचा चखना म्हणूनपण वापर करताना आढळतात

वेदनयन's picture

11 Feb 2011 - 1:36 am | वेदनयन

बिबडी नावाचा एक जिवघेणा प्रकार खानदेशात असतो. मिळाला तर जरुन खाऊन बघा.

बहुदा ज्वारी, गहु, काही डाळी आंबवुन करतात. नक्की काय काय असते सांगु शकत नाही पण चव खुप छान असते.

खिचडी म्हणजे माझा वीक पॉईंट.. बाकी खिचडी बनवणे म्हणजे उत्सव साजरा करणे हे मला तरी लागू पडतयं...

- (खिचडीवाला बल्लव) पिंगू

स्वाती२'s picture

10 Feb 2011 - 4:59 pm | स्वाती२

मस्तच!

स्वाती दिनेश's picture

10 Feb 2011 - 7:18 pm | स्वाती दिनेश

ही खिचडी माझी लाडकी, पण कच्च्या तेलापेक्षाही ह्या खिचडीवर फोडणी घालून मला जास्त आवडते,
मी ही हिचे नाव वर्‍हाडी खिचडी असेच ऐकले आहे, आता वर्‍हाड प्रांतातील की वर्‍हाडासाठीची खिचडी हे शोधायला लागेल..
स्वाती

हो ना. काय नक्की माहित नाही. पण लहानपणा पासुन हिचे नाव वर्‍हाडी खिचडी हेच ऐकले आहे.
:)

यशोधरा's picture

10 Feb 2011 - 7:37 pm | यशोधरा

मस्त दिसते आहे वर्‍हाडी खिचडी! :)
सुके खोबरे आधी परतून नाही का घ्यायचे?

नाही, सुके खोबरे तसेच वाटायचे. नंतर ते वाटण तेलात परतायचे आहे. त्यामुळे कच्चे घेतले तरी चालते.

निवेदिता-ताई's picture

10 Feb 2011 - 7:38 pm | निवेदिता-ताई

ए खूप खूप मस्त ह . :)

Mrunalini's picture

10 Feb 2011 - 8:16 pm | Mrunalini

thank u :)

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Feb 2011 - 8:21 pm | ब्रिटिश टिंग्या

खानदेशात याला फोडणीची खिचडी म्हणतात! कच्चे तेल, पापड अन् कांदा सोबतीला! :)

अरे वा .. याला वर्‍हाडी खिचडी बोलतात का?
आमच्याकडे याला मसाला भात बोलतात, १५ दिवसानी घरी गेल्यावर आईला गेल्यावर हा भात करायला सांगतोच सांगतो.
आणि
१ वर्षे शिरुर ला असताना घरी स्वयपाक करत होतो, तेंव्हा रोज आम्ही हाच मसाला भात करायचो.. काय धमाल होती तेंव्हा.

असो शब्द/नाव वेग़ळे असुद्या.. आस्वाद मात्र परिपुर्ण देतो हा भात.
आणि धन्यवाद

आणखिन एक यात कच्चे शेंगदाने पण घाला, शिजल्यावर मस्त लागतात.
बटाटे पण टाका खुपच छान होते यामुळे .

लिंबु पिळुन छान लागते,
पण दह्या बरोबर क्या कहेना ,...

धनंजय's picture

10 Feb 2011 - 9:23 pm | धनंजय

सोपा आणि रुचकर प्रकार दिसतो आहे.
करून बघायला पाहिजे.
आधी कांदा नंतर हळद परतल्यामुळे नक्कीच फरक पडत असावा. चरचरीत तळलेली हळद (माझा नेहमीचा प्रकार) आणि वाफेवर शिजलेली हळद यांच्यात नक्कीच स्वादाचा फरक आहे. मला दोन्ही आवडतात.

सहमत.
तळलेली (फोडणीत घातलेली) आणि भाजीत वरून मिसळलेली हळद लगेच लक्षात येते.
मला फोडणीत घातलेली आवडते. :)

गुंडोपंत's picture

11 Feb 2011 - 3:49 am | गुंडोपंत

झणझणीत खान्देशी खिचडी हा माझाही अतीव आवडता प्रकार.
ही खिचडी उरली तर दुसर्‍या दिवशी खायला फार मस्त लागते.
शेंगदाणे तर हवेतच हवेत. हा प्रकार इडली प्रमाणेच मी सातही दिवस हादडू शकतो.
मला ही खिचडी करायलाही आवडते.

ही बहुदा वर्‍हाडासाठीची खिचडी आहे. अनेकदा वर्‍हाडाचा पाहुणचार (सायंकाळी) याचाच असत असे पण हल्ली दिसत नाही.
- अवांतर रंजन -
उन्हाळ्याचे दिवस असतांना, रात्रीच्या जेवणासाठी मस्त वाफाळत्या खिचडीवर चिरलेली कोथिंबीर घालावी, वर लिम्बू पिळावे.
सोबत हाताने फोडलेला आमचा लासलगावचा लाल, गोड,असा मस्त कांदा असावा.
मित्रमंडळी - भाऊ बहिणी वगैरे आलेली असावीत. हास्यविनोद, गाणी, कविता वगैरे म्हणून झालेल्या असाव्यात. मस्त कडकडीत भूक लागलेली असावी. खिचडीचा सुवास दरवळत असावा.

मुलांनी पटापट पाणी वगैरे घ्यावे. मोठ्यांनी खिचडीचे भले मोठे पातेले अंगणात आणावे. बसण्याची आसने (पट्ट्या) घालून कुणीतरी वाढण्याची सुरुवात करावी. अंगणात झकास पैकी गप्पा मारत जेवण करावे.

जेवण झाल्यावर मस्त आले कोथिंबीर आणि सैंधव घातलेला मठ्ठा प्यावा! हा मट्ठा तयार होइ पर्यंत कुणीतरी सतरंज्या घालाव्यात आणि पत्त्यांचा डाव सुरु व्हावा, सोबत प्यायला ताक!

दहा वाजले मुले पेंगू लागली की कुणीतरी हलक्या आवाजात रेडियोची गाणी लावावीत. पत्त्याच्या डावातून एक एक जण गळत दोनचार भिडू उरावेत. मग डाव संपल्यावर परत अंगणातच सतरंजीवर गार पडलेली सोलापुरी चादर पांघरून पसरावे. आकाशातले तारे पहात भावा-बहीणींसोबत हलक्या आवाजात लहानपणच्या आठवणी जागवाव्यात... चिल्ल्यापिल्ल्यांची पांघरुणे व्यवस्थित करावीत आणि हळू हळू झोपेच्या अधीन व्हावे!

अहाहा! गेले हो हे दिवस. काय पण मजा होती. आयुष्य साधं सोप होतं पण ही त्यातली खास मजा होती.

मजा आली!
तुमच्या एका पाककृतीने किती तरी मधूर आठवणी जाग्या केल्या.

शतशः: धन्यवाद!

खरच. खुप खुप आभारी आहे. तुम्ही लिहलेले वाचुन मला पण लहानपणीच्या गोष्टी आठवल्या.
मोगँबो खुश हुआ. :) :) :)

चटोरी वैशू's picture

16 Feb 2011 - 12:15 pm | चटोरी वैशू

मस्त... खान्देशी पदार्थ .... हो वर्‍हाड लोकांसाठी करतात... म्हणुन वर्‍हाडी खिचडी....