'घुटे'

इष्टुर फाकडा's picture
इष्टुर फाकडा in पाककृती
9 Feb 2011 - 4:31 am

नमस्कार मिपाकरांनो...

गेल सुमारे वर्षभर मी मिपावरच लेखन, पाककृती सगळ वाचतो आहे. आज पहिल्यांदाच काही लिहिण्याची (अशुद्ध मराठीत) हिम्मत करतो आहे. मिपावरच लेखन, प्रतिक्रिया या सगळ्या उच्च कोटीतल्या असल्याने पहिल्याच प्रयत्नात तस उंच काही लिहिता येईल अस नाही. पण बर्याच दिवसांपासूनचा किडा आज इतक मस्त (झणझणीत) जेवण झाल्यामुळे बाहेर पडू पाहत आहे. त्याला वाट द्या :)
मी आज 'घुटे' या अस्सल मराठी (मावळी) आमटीच्या प्रकाराची पाककृती देत आहे. ही आमटी मी मिपावरच कधीतरी वाचली आहे पण हा फक्त (माझ्यादृष्टीने) पाककृतीत सांगून संपवायचा पदार्थ नाहीये, याला एक सुंदर गावाकडची पार्श्वभूमी आहे. मी ‘शिवापूर’ या पुण्याजवळच्या एका ऐतिहासिक खेड्यातला. छत्रपती इथे लहानपणी काही वर्ष राहिलेले. जिजाऊ साहेबांच्या चोळी-बांगडीच्या वहिवाटीचे आणि बलात्कारी गुजर पाटलाचे गाव रांझे, शिवापूरच्याच बाजूला निसवलेले. दादोजींनी वसवलेली आमराई आणि तिच्यातालाच एक आंबा धन्याच्या अपरोक्ष खाल्ला म्हणून बाराबंदीची एक बाही कापली गेलेली माझ्याच गावाने पहिली. या आमराईला आता ‘खेड-शिवापूर बाग’ अस म्हणतात. आता इथले आंबे नव्हे तर अंजीर आणि भेळ प्रसिद्ध
झाले आहे :)
मिर्झा राजा जयसिंह, दिलेरखान, मुरार जगदेव, शाहिस्ताखान यांची घोडी शिवापूरच्याच पाठीवरून गेलेली. कारण शिवापुराहून जरा टाचा उंच करून पाहिलं कि पुरंदर, तोरणा, राजगड, सिंहगड, वरंध यांचे खांदे दिसायला लागतात. दीड कोसांवर कोंढणपुरची तुकाई देवी आणि पुढे अर्ध्या कोसावर कोंढाणा तोलून असलेली कल्याण आणि अवसरवाडी हि गावं. याच तुकाई देवीच्या जत्रेत राजांनी अनेक वेळा पागोट्यानच्या कुस्त्या पाहून जाताना तुकाईची साडी चोळी केलेली.
तर अशा या सर्व शिवाकालाच्या ठेवी माझा गाव अजूनही छाती फुगवून राजांनी बांधलेली मंदिरे, बांध अशा गोष्टींमार्फत येणाऱ्या जाणार्यांना दाखवण्याचा प्रयत्न करीत असते. तशाच काही चालीरीतीतून आणि तेव्हाच्याच चुलींवरून झिरपत झिरपत अजूनही शेतात दरवर्षी हजेरी लावणारी, फक्त पळसाच्या पानांनी काड्यांचे टाके मारून जोडलेल्या पत्रावळीत चव आणणारी आणि बैलांच्या मागच्या हकार्यानी, भातलावणीच्या अस्सल गवळणीनी नादावलेली हि घुट-भाताची पाककृती लिहिताना मला आज इतक्या वर्षांनतरही चारही बाजूंनी हिरव्या डोंगरांनी घेरलेल्या शेतातल्या भात खाचरांमध्ये डोक्यावरून इरलं घेऊन चालतानाचा कातर प्रत्यय येतोय. हि मेजवानी शेतात काम करणाऱ्या, बोलवून आणलेल्या गडी माणसांना दुपारच्या जेवणात भातलावणीच्या वेळी देतात. उडदाची डाळ हि सर्व डाळीमध्ये श्रीमंत !! म्हणून घुट याच डाळीच होत असावं.
हि एवढी वातावरण निर्मिती पुरे होईल असं समजून मुद्द्यास हात घालतो. (वाचक सुद्न्य बल्लव आहेत, ह्या हिशोबाने प्रमाण देत आहे. बाकी मीही भावनांना समजूनच पाककृती प्रत्यक्षात उतरवत आलो आहे !)

साहित्य : एक वाटी उडीद डाळ, (वैयक्तिक)उग्रपणानुसार आले, लसूण आणि हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता.
फोडणीसाठी: तेल, मोहरी, हिंग आणि जिरे.

कृती: आधी उडीद डाळ शिजवून, घोटून घ्या. मध्यंतरामध्ये आले, लसूण आणि हिरव्या मिरच्या, कोथिंबीर यांचे मस्त
वाटण करून घ्या. तापलेल्या (प्रधान्येकरून) लोखंडी भांड्यात फोडणी करून वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.
शिजवून घोटलेली डाळ घाला. आपल्या अंदाजानुसार मीठ घाला. एक उकळी आली कि कोथिंबीर पेरून पुन्हा एक
उकळी पर्यंत वाट बघा. आली कि उतरवा आणि बाह्या मागे सारून भाताबरोबर किंवा शिळ्या भाकरीबरोबर ओरबाडा :)
(हीच पद्धत मुगाच्या डाळीसही लागू पडू शकते.)

ता. क. : घुटे खाऊन तृप्त होई पर्यंत हि पाककृती जगास ओरडून सांगावी हे आमच्या मंद बुद्धीस न उमगल्यामुळे या पाककृतीचे फोटू काढू शकलो नाही, गरिबास येक वेळ माफी करावी. तरी हा प्रयत्न जगून वाचून आपल्या पसंतीस उतरलाच तर आमच्या खजिन्यातील बाकी सर्व रत्नांचा तुम्हास चित्रमय प्रवास घडवू या वचनावर आमच्या मिशीतील अनेक केस उधार राहण्यास तयार आहेत :) हे कळावे. धन्यवाद !

प्रतिक्रिया

गोगोल's picture

9 Feb 2011 - 5:28 am | गोगोल

नो कॉमेंट्स....

सुनील's picture

9 Feb 2011 - 5:39 am | सुनील

धन्यवाद!

उडीद डाळ फक्त उपम्याच्या फोडणीसाठीच वापरीत असल्यामुळे संपता संपत नाही. आता करून बघायला हवे हे "घुटे".

मिपावर मागे एकदा शाल्मलीनं ही पाकृ दिली होती.
बरेच दिवस मनात आहे ही पाकृ...... आता प्रत्यक्षात उतरवायला हवी.
फोटू न दिल्याबद्दल एकडाव माफी दिली आहे.;)

स्वाती दिनेश's picture

9 Feb 2011 - 12:58 pm | स्वाती दिनेश

मलाही तेच आठवले,
कोकणात टिपराला हे उडदाचं वरण करतात - (संदर्भ: स्मृतिगंध)
तुमची वातावरण निर्मिती आवडली, पाकृं बरोबर तुमचे अन्य लेख वाचायलाही आवडेल.
स्वाती

उडदाचं वरण करतात त्याला काय म्हणतात कोकणात ते आठवत नाहीये. (उडदाचं वरणच म्हणत असावेत.)

मस्त पाकृ. सुनील यांच्याशीही सहमत आहे. करून बघायला हवी. वातावरणनिर्मितीही छान केली आहे. अजून लिहा गावाबद्दल वगैरे! :)

पुढल्यावेळेपासून पाकृसोबत फोटो येऊ द्या अन्यथा पाकृ गच्चीवर वाळत घालण्यात येईल. ;)

प्रचेतस's picture

9 Feb 2011 - 9:57 am | प्रचेतस

झकास पाककृती.

>>>>>पण बर्याच दिवसांपासूनचा किडा आज इतक मस्त (झणझणीत) जेवण झाल्यामुळे बाहेर पडू पाहत आहे. त्याला वाट द्या

पटकन डोळ्यांसमोर टार्‍याचे मसाला प्रार्थना कीटक्स तरळून गेले.

छान लिहलय...अजुन तुमच्या गावा बद्द्ल हि वाचायला खुप आवडेल

कच्ची कैरी's picture

9 Feb 2011 - 10:59 am | कच्ची कैरी

जोशीले यांच्याशी मीही सहमत !शीवकालीन इतिहासाची साक्ष देणार्या तुमच्या गावाविषयी अजुन जाणुन घ्यायला खरच आवडेल.

घुट मी माझ्या एकटी पुरत करुन खाते. धनी अन पोर फारसा इंटरेस्ट दाखवत नाहीत ना म्हणुन, पण खर सांगु हे घुट मी एकटी जरी असले तरी चवदार लागत हो. पाक क्रुती बद्दल धन्यवाद. निदान खाउन झाल्यावरचा समाधानी मिश्शीवाला चेहरा तरी फोटोत टाकाय्चा होता, तेव्हढाच एक मावळा बघीतल्याच समाधान!

चिंतामणी's picture

11 Feb 2011 - 3:22 pm | चिंतामणी

घुट मी माझ्या एकटी पुरत करुन खाते.

मीच एकटा आवडीने खात असल्याने फार कमी वेळा होते. आणि करायचे झालेच तर मीच बनवतो.

पाक क्रुती बद्दल धन्यवाद. निदान खाउन झाल्यावरचा समाधानी मिश्शीवाला चेहरा तरी फोटोत टाकाय्चा होता,

फोटु बघुन उधारीचा केस निवडुन (select असे मराठीत लिहीतो. नाहीतर गैरसमज व्हायचा ;) ) ठेवतो.

लॉरी टांगटूंगकर's picture

9 Feb 2011 - 11:51 am | लॉरी टांगटूंगकर

निदान खाउन झाल्यावरचा समाधानी मिश्शीवाला चेहरा तरी फोटोत टाकाय्चा होता, तेव्हढाच एक मावळा बघीतल्याच समाधान!

वाअह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह

जोशीले व कच्ची कैरी यांच्याशी मीही सहमत.

व्वा ! करुन बघते आजच :)

माझी एक मैत्रिण घुटं म्हणुन जे काही करते त्यात तांदूळ पण असतात. तुम्ही सांगितलेली कृती तशीच पण डाळ शिजवताना डाळीच्या अर्धे तांदूळ पण घालते ती. मग दुसरं काही करायची गरजच नाही !

तांदूळ घातले की सूप म्हणून घ्यायला हरकत नाही.

RUPALI POYEKAR's picture

9 Feb 2011 - 12:57 pm | RUPALI POYEKAR

तुम्ही तुमच्या गावची माहिती देवुन कड्क फोड्णी दिलीत

मस्त , माजेहे सासवडची मावशी करायची कायम ,
आवडते मलाही खुप हे,
बर्याच दिवसानी घुट शब्द ऐकला.

गावाच्या माहिते बद्दल धन्यवाद

गणपा's picture

9 Feb 2011 - 1:24 pm | गणपा

एक शंका. उडदाच्या डाळी मुळे हा पदार्थ बुळबुळीत नाही का लागत? (कधी कधी मुगाच्या डाळिच वरणही किंचीत बुळबुळीत लागत. पण पचायला हलक असत अस म्हणतात.)

बाकी लेख वजा पाकृ आवडली.
तुमच्या गावा बद्दल अजुन लिहा.

(मा की दालच्या वाट्यास न जाणारा ) -गणा

धिन्गाना's picture

10 Feb 2011 - 1:27 pm | धिन्गाना

मुग किवा उडिद डाळ नुसतिसुधा तेलाशिवाय भाजुन चालते

निवेदिता-ताई's picture

9 Feb 2011 - 1:42 pm | निवेदिता-ताई

@एक शंका. उडदाच्या डाळी मुळे हा पदार्थ बुळबुळीत नाही का लागत? (कधी कधी मुगाच्या डाळिच वरणही किंचीत बुळबुळीत लागत. पण पचायला हलक असत अस म्हणतात.)

ह्यासाठी उडिद्डाळ आधी किंचित तेलावर भाजून घ्यावी. मग कुकरला लावावी...म्हणजे छान शिजते आणी
बुळबुळीत नाही लागत...आम्ही यात आले नाही घालत..थोडे ओले किंवा सुके खोबरे व जिरे वाटणातच
घालते.हो आणी यात गूळ अज्जिबात घालू नये.आंणी गरम गरम घुटके घ्यावेत.
कोणाला सर्दी झाली असेल तर जालिम उपाय.

गणपा's picture

9 Feb 2011 - 1:48 pm | गणपा

धन्स निवेदिता-ताई. :)

प्राजक्ता पवार's picture

9 Feb 2011 - 4:23 pm | प्राजक्ता पवार

थँक्स निवेदिता ताई , छान टीप दिलीत तुम्ही.
मलादेखील गरम गरम घुटे आवडते.

खुपच मस्त. मी पण मावळातीलच आहे. आमचे गाव पुण्याजवळील तळेगाव दाभाडे. माझी आई हे घुटे नेहमी करायची. अगदी असेच. पण ह्या घुट्या मधे साल असलेली काळी उडदाची डाळ वापरतात ना??
म्हणजे माझी आई तर तीच डाळ वापरायची.
मी हे घुट इकडे पण करते. पण एकटी साठी. निशांतला आवडत नाही.

श्रीकान्त ताकवले's picture

9 Feb 2011 - 3:55 pm | श्रीकान्त ताकवले

पाककृती उत्तम,

घुट्या बरोबर तव्यातला हिरव्या मिरचिचा खर्डा खुपच झकास लगतो.

श्रीकान्त ताकवले

स्वाती२'s picture

9 Feb 2011 - 9:22 pm | स्वाती२

छान!

इष्टुर फाकडा's picture

9 Feb 2011 - 11:20 pm | इष्टुर फाकडा

धन्यवाद :)
आमच्या तोडक्या मोडक्याला तुमची पावती मिळाली, पामर धन्य जाहला :) काही गोष्टी राहिल्या... म्हणजे, खोबरं हवं होतं लिहायला, ते राहिलं. पुढील वेळेस फोटो सहित निर्दोष पाककृती देण्याचा प्रयत्न करेन.
आणि माझ्या गावाबद्दल वाचायची तुम्हांस इच्छा आहे हे वाचून भरून पावलो :) करेन प्रयत्न तुमचा आशीर्वाद असू द्या :)

दीपा माने's picture

10 Feb 2011 - 4:55 am | दीपा माने

निवेदीताताई, माझ्या आजोळी, फलटणला तुमच्या पध्दती प्रमाणेच घुटं करायचे.
सागर, मला तुमचीपण पाक्रु आवडली. आभारी आहे.

पिलीयन रायडर's picture

6 Feb 2017 - 2:48 am | पिलीयन रायडर

अचानक आज हा पदार्थ आठवला. मिपावर असणारच ह्याची खात्री होती. तुमच्या रेसेपीने केला. पण उडीड दाळ आधी उगाच पाण्यात भिजवली आणि मग प्रतिक्रिया वाचायला बसले. त्यात निवेदिता ताईंचा डाळ परतुन घेण्याचा सल्ला पाहुन आता काय करावं हा प्रश्न पडला. मग पुन्हा वाटीभर डाळ परतुन घेऊन ह्या रेसेपीने घुटं केलं.
आता भिजत पडलेल्या उडदाच्या डाळीचा अजुन एक पदार्थ करावा लागेल.

हा फटु.. अत्यंत खमंग पदार्थ!!

ghuta

संजय पाटिल's picture

6 Feb 2017 - 6:22 am | संजय पाटिल

तोंपसु....
@आता भिजत पडलेल्या उडदाच्या डाळीचा अजुन एक पदार्थ करावा लागेल....इडल्या ...

पिलीयन रायडर's picture

7 Feb 2017 - 7:39 pm | पिलीयन रायडर

इडलीसाठी तांदुळ भिजवत बसावे लागले असते. कोण इतकं काम करणार. ;)

दुसर्‍या दिवशी सरळ डाळ मिक्सर मधुन काढली आणि आप्पे केले सांबार सोबत. उत्तम झाले.

चौकटराजा's picture

6 Feb 2017 - 6:41 am | चौकटराजा

आमच्याकडे कोकणस्थ ब्राह्मणात हा पदार्थ आमच्या खेरीज कुणाही नातेवाईकाकडे कधी केलेला पाहिला नाही . आम्हीही हा पदार्थ ब्राह्मणेतर शेजार्‍याकदून शिकलो.
यात वाटण करताना आम्ही खालील पदार्थ टाकतो.
१. भाजलेला कांदा.
२. कोथिंबीर,
३. भाजलेले खोबरे
४. आले
५. लसूण
६ हिरव्या मिरच्या.
या एकही जण जर गैरहजर असेल तर ते आम्हाला चालत नाही. उडीदाची सालासकट डाळ घेतल्यास घुट्याला काळा रंग येतो . पण चिकटपणा कमी येतो.
हे एक फर्मास असे तोंडीलावणे आहे जे भात ,चपाती भाकरी कशाबरोबरही भुर्कून घेता येतेच शिवाय हे मला तर सुपासारखे प्यायलाही चालते.

फेदरवेट साहेब's picture

7 Feb 2017 - 6:54 pm | फेदरवेट साहेब

खास कोकणस्थ ब्राह्मण असा उल्लेख करायचे काय खास प्रयोजन ? हे काही कळले नाही. ब्राह्मणेत्तर शेजाऱ्यांकडून शिकण्याचाही उल्लेख यायचे कारण समजले नाही. अन्न ते अन्न अन खवय्या तो खवय्या, वैयक्तिक आवडीने, बंधनाने कोणी शाकाहारी मांसाहारी किंवा मिश्रहारी असू शकतो. पण एकंदरीत एखाद्या डाळीचे सणसणीत झणझणीत वरण/आमटी सुद्धा ब्राह्मण अन ब्राह्मणेत्तर असतात हे वाचून मौज वाटली.

असो. सातारा जिल्ह्यात घुटे हे बऱ्याचवेळी देवीचा/ग्रामदेवतेच्या भंडाऱ्यातला खास पदार्थ असतो/असे. तिखट जाळ घुटे सोबत भात अन गोड म्हणुन गुळवणी खाल्याच्या बालपणीच्या आठवणी ह्या निमित्ताने पुनरुज्जीवित झाल्या. (आजकाल असे भंडारे कमी झालेत तरी बहुदा आजकाल जरंडेश्वराकडे अन जावळीत तुरळक ठिकाणी अजूनही हा बेत असतो असे ऐकिवात आहे)

पण एकंदरीत एखाद्या डाळीचे सणसणीत झणझणीत वरण/आमटी सुद्धा ब्राह्मण अन ब्राह्मणेत्तर असतात हे वाचून मौज वाटली.

पदार्थ ब्राह्मण-ब्राह्मणेतर नसतात, करण्याची पद्धत असते. ताकाची कढी करण्याची पद्धत, टोमेटोचं सार करण्याची पद्धत, एवढंच काय नेहमीच्या आमटी-वरणात सुद्धा फरक असतो.

काही पदार्थ काही खास जातींत आवर्जून केले जातात आणि त्यात काही वाईट वाटून घेण्यासारखं नसतं. ह्या बाबतीत अज्ञान असलं की उल्लेख खटकतात. मला या बाबतीत कोणी जातीचा उल्लेख केला तरी काही विशेष वाटत नाही.

म्हणुन मी कॉमेंटकर्त्याला काही प्रश्न (खोचक नाही) विचारले होते. तुम्हाला मिरच्या झोम्बायचं कारण काही झेपलं नाही. अर्थात नावच 'सूड' असल्यावर अजून काही अपेक्षा करणे बादच आहे.

कित्ती चान चान गप्प बसवले नाही तुम्ही मला.

अकलेचा फर्मास टेंभा , आवशेच्या रातच्या माळावरल्या येताळागत मिरवून घेतल्याबद्दल अभिनंदन.

पिलीयन रायडर's picture

7 Feb 2017 - 10:46 pm | पिलीयन रायडर

बेअरिंग फार लवकर सुटत गेलं तुमचं ह्यावेळेस..

फेदरवेट साहेब's picture

7 Feb 2017 - 11:07 pm | फेदरवेट साहेब

हॉय. पास झालो मराठी भाषा प्रवेशिका म्हणून शुद्ध बोलायला लागलो. बाकी बेरिंगचं काय नाय हो, मेला तो पारशी+इंग्रज ऍक्सेन्ट कीबोर्डवर उमटवता उमटवता बोटांचा पिट्टा पडतो म्हणून म्हणले जय महाराष्ट्र, अन घातला चुलखंडात ऍक्सेन्ट अन बेरिंग.

नाकारण्यात काय हशील :)

अकलेचा फर्मास टेंभा , आवशेच्या रातच्या माळावरल्या येताळागत मिरवून घेतल्याबद्दल अभिनंदन.

आम्ही त्याक्षणी योग्य वाटेल ते बोलतो. तुम्हाला टेंभा मिरवल्यागत वाटत असेल तर इलाज नाही. महाराष्ट्रात बोलीभाषा आणि खाणंपिणं जातीनिहाय थोडाफार फरक दाखवतं आणि हे ज्यांना माहीत आहे, त्या लोकांना असे उल्लेख खटकत नाहीत. खाली स्रुजातैंनी म्हटल्याप्रमाणे ते उल्लेख 'इटालियन लोक पास्ता बनवतात' इतक्या सहज आलेले असतात.

चौकटराजा's picture

8 Feb 2017 - 5:46 pm | चौकटराजा

आमच्या शेजारी एक ब्राहमण रहातो. त्याची बायको केरळी खिस्च्चन आहे. तिला मी विचारले " तुला खरवस माहीत आहे का "? तर तिने मला " होय खरवस मला फार आवडतो !!" असे उत्तर दिले! हा मला धक्काच होता. पण तो धक्का नव्हता हे तिने नंतर स्पष्ट केले की" केरळातील ख्रिस्च्न किम्वा मुसलमानाना हा पदार्थच माहीत नाही. तिचे लग्न झाल्यावर नवर्यामुळे तिला अनेक पदार्थे महाराष्ट्रात किती उत्तम बनतात हे कळल्याचे सांगितले. माझ्या हाताखालीही एक सुरेश नावाचा केरळी मुलगा काम करत असे त्याला " श्रीखंड" हा पदार्थ माहीत नव्हता !

चौकटराजा's picture

8 Feb 2017 - 6:39 am | चौकटराजा

निरनिराळे पदार्थ हे निरनिराळ्या जातीमधे लोकप्रिय असतात हे त्रिवार सत्य आहे. मुसलमान लोक घरी इडली सांबार त्या प्रमाणात करीत नाहीत ज्या प्रमाणात हिंदू. चाकवतातील भाजी ताकातील करतात हे माझ्या एका मराठा मित्राच्या पत्नीला माहीतही नव्हते. आता बोला. " ते वाटण सारस्वती ब्राहमण पद्धातीचे आहे" असा उल्लेख ज्या वेळी बायका करतात त्यावेळी त्या अशाच अर्थाने जात हा शब्द वापरीत असतात.तेंव्हा.......

+ १, पटेश. इथे जातीचा उल्लेख "पास्ता इटालियन लोकं करतात" इतक्याच निर्लेप पणे होतो आणि तसाच तो घ्यावा.

अप्पा जोगळेकर's picture

8 Feb 2017 - 12:49 pm | अप्पा जोगळेकर

पेपरवेट साहेब,
आग्री खानावळ, धनगरी मटण इत्यादी उल्लेख ऐकले आहेत का ?

इथे मिपावर जातीयवादाच्या नावाने ऊर बडवता येतो हो. आगरी खानावळ बघून असं का लिहीलंत विचारलं तर 'पोकल बांबूचं' खाद्य मिळायची शक्यता जास्त!! =))

हायला! घुटाची पाकृ मिपावर असेल असं वाटलं नव्हतं!

जिजाऊ साहेबांच्या चोळी-बांगडीच्या वहिवाटीचे आणि बलात्कारी गुजर पाटलाचे गाव रांझे, शिवापूरच्याच बाजूला निसवलेले.

टायपो नसेल तर - हे "निसवणे" काय असतं? वसवणे आणि निसवणे यामध्ये काही फरक आहे का?

राही's picture

8 Feb 2017 - 12:07 pm | राही

'निसवणे'हा शब्द खूपच वर्षांनी दिसला.
'निसवणे' ही 'प्रसवणे'चीच एक वेगळी छटा आहे.
केळीला बोंड फुटते तेव्हा केळ 'पोसवली' (प्रसवली) असे म्हणतात. केळीचे खोड (rhizome) हे जमिनीखालून पसरत जाऊन लगतच दुसरा कोंब बाहेर येतो तेव्हा 'केळ निसवली' म्हणतात.
सध्याच्या संदर्भात सबर्बन वस्ती वाढते तेव्हा 'शहर निसवले' म्हणता येईल.
हे दोन्ही शब्द समान अर्थाने वापरलेलेसुद्धा ऐकले आहेत. पण अधिकतर, निसवणे म्हणजे बाहेर टाकणे.

आदूबाळ's picture

8 Feb 2017 - 2:08 pm | आदूबाळ

धन्यवाद! मस्त शब्द आहे!

कॅल्शिअमसाठी डॉक्टरनी घुटं खायला सांगितली. बरी मिळाली रेसिपी !
पण एक वाटी उडीद डाळीचं भरपूरच होईल ना ? मोठं भांडं गच्च भरून !

रुपी's picture

9 Feb 2017 - 12:40 am | रुपी

हे घुटं मला फार आवडतं.. थंडीच्या दिवसात किंवा सर्दी झालेली असली तर घुट्यात तूप घालून भुरके मारुन प्यायला मजा येते. तुमच्या गावाबद्दल लिहिलेलेही आवडले.

मला वाटतं छावा की कुठल्यातरी कादंबरीत या उडदाच्या डाळीच्या घुट्याचा उल्लेख आला आहे.

रुपी's picture

9 Feb 2017 - 12:40 am | रुपी

हे घुटं मला फार आवडतं.. थंडीच्या दिवसात किंवा सर्दी झालेली असली तर घुट्यात तूप घालून भुरके मारुन प्यायला मजा येते. तुमच्या गावाबद्दल लिहिलेलेही आवडले.

मला वाटतं छावा की कुठल्यातरी कादंबरीत या उडदाच्या डाळीच्या घुट्याचा उल्लेख आला आहे.