'धोबी घाट' - पाहण्याचा वेगळा नजरिया

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
6 Feb 2011 - 12:53 am
गाभा: 

‘पाहणं’ किंवा ‘पाहिलं जाणं’ या क्रियेशी एकाच संदर्भात खूप वेगवेगळे अर्थ जोडले जाऊ शकतात. एखाद्या बाईकडे एखादा पुरुष ‘काय माल आहे’ म्हणून अधाशासारखं पाहतो तेव्हा ती क्रिया त्याला आनंद देत असते; त्या बाईला ती क्रूर किंवा दुर्लक्ष करण्याच्या लायकीची वाटू शकते तर तिच्या मित्राला ती फाजील वाटू शकते आणि तो त्या परपुरुषाला दम देऊ शकतो.

किरण राव दिग्दर्शित ‘धोबी घाट’ या चित्रपटात आपल्याला मुंबईच्या पार्श्वभूमीवर काहीतरी ‘पाहणारी’ किंवा स्वत: ‘पाहिली जाणारी’ वेगवेगळी माणसं दिसतात.

Shaai

शाय (मोनिका डोग्रा) ही पारशी परदेशस्थित सुखवस्तू इन्व्हेस्टमेंट बँकर कदाचित काही व्यक्तिगत कारणांमुळे काही दिवस मुंबईत आली आहे. वेळ जाण्यासाठी तिनं मुंबईची छायाचित्रं काढण्याची एक असाईनमेंट घेतली आहे.

Arun Painter

अरुण (आमिर खान) हा चित्रकार आहे. त्याच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला शाय आणि त्याची भेट होते. दारूच्या नशेत ते एकमेकांजवळ येतात आणि एक रात्र एकत्र घालवतात. पण दुसऱ्या दिवशी ‘मला रिलेशनशिप नको आहे,’ असं अरुण सांगतो आणि ती काहीशी फुणफुणत निघून जाते. नंतर अरुण आपलं घर बदलून चक्क मोहंमद अली रोडवरच्या एका जुन्या घरात रहायला जातो. आता ही दोघं कधीच भेटणार नाहीत असं वाटतं. पण या दोघांमध्ये एक गमतीशीर दुवा असतो. तो म्हणजे त्यांचा धोबी मुन्ना (प्रतीक बब्बर).

Munna Dhobi

बिहारमधून आलेला स्थलांतरित मुन्ना आपला भाऊ आणि त्याच्या कुटुंबाबरोबर रहात सुखवस्तू लोकांचे कपडे धूत आपली गुजराण करत असतो. कधीतरी आपल्याला सिनेमात चान्स मिळेल हेच त्याचं एक स्वप्न असतं. मुन्नाच्या मदतीनं शाय अरुणचा नवा पत्ता हुडकून काढते. पण त्याला प्रत्यक्ष न भेटता चक्क चोरून त्याचे फोटो काढू लागते. पाहण्याच्या आणि पाहिलं जाण्याच्या वेगवेगळ्या अनपेक्षित क्रिया इथून सुरू होतात.

मुन्ना शायला मुंबईतली वेगवेगळी माणसं दाखवतो आणि तिच्या फोटो-प्रकल्पाला मदत करू लागतो. शिवाय तिच्याकडून आपला पोर्टफ़ोलिओसुद्धा काढून घेतो. म्हणजे शाय पाहणारी, दाखवणारा तो आणि पहिला जाणाराही तो. पण ते इथंच थांबत नाही. हळूहळू तो तिच्यात इतका गुंततो की तिच्याकडे पाहणाऱ्या लिफ्टमनला तो दरडावतो. म्हणजे शाय इतरांकडून पाहिली जाणं त्याला आता नकोसं होतं.

दुसरीकडे शाय अरुणला त्याच्या नकळत पाहते आहे आणि त्याच्यात गुंतते आहे. पण अरुण काहीतरी वेगळं पाहण्यात गुंतला आहे. कुणीतरी पूर्वी केलेलं व्हिडिओ चित्रीकरण त्याच्या नव्या घरात त्याला सापडतं. नवीन लग्न होऊन मुंबईत आलेल्या एका साध्याशा मुलीनं (कृती मल्होत्रा) आपल्या उत्तर प्रदेशातल्या माहेरी राहणाऱ्या भावाला लिहिलेली ती व्हिडिओपत्रं असतात. किंवा म्हटलं तर ती तिची डायरी असते.

Video Woman

तिच्याविषयीचे तपशील अरुणला आणि आपल्याला हळूहळू कळू लागतात. आता या पाहण्याच्या वेगवेगळ्या मितीही लक्षात येऊ लागतात. त्यात अंतर्भूत असणारा एक वर्गसंघर्ष जाणवू लागतो. त्या बरोबरच जाती, धर्म, वर्ग अशा गोष्टींना भेदून त्या पलीकडे जाण्याच्या, या अफाट आणि बहुविध जनसमूहाला पोटात घेणाऱ्या मुंबापुरीतच असणाऱ्या अशा काही शक्यतादेखील दिसू लागतात. पाहणारी शाय आणि पाहिला जाणारा मुन्ना यांच्यात इतकं अंतर असूनही ते एकमेकांच्या जवळ येऊ शकतील का? आणि आले तरी त्याला भविष्य काय? व्हिडिओ चित्रण करणारी (म्हणजे पाहिली जाणारी) साधी, निरागस, गोड मुलगी आणि तिचं आयुष्य पाहणारा, पण तुसडा, एकलकोंडा, माणूसघाणा अरुण तिच्यामुळे बदलेल का आणि कसा? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेवटी एका सनातन प्रश्नापुढे येऊन ठाकतात. ह्या अफाट दुनियेला चालतं ठेवण्यासाठी माणसांना एकमेकांविषयी विश्वास, प्रेम, अनुकंपा वाटायला लागणं अतोनात गरजेचं असतं. अशा अजस्र शहरात त्या गोष्टी मिळतात का? की सतत घरं बदलणारी, या शहरानं आपल्या प्राक्तनात लिहिलं असेल त्यानुसार भिरभिरणारी ही माणसं त्या गोष्टी मिळण्याच्या शक्यता स्वत:हून पुसून टाकत असतात? की मख्ख चेहेऱ्यानं समोर येईल ते पाहणारी पण कशावर काहीच प्रतिक्रिया न देणारी अरुणची म्हातारी शेजारीणच मुंबापुरीची पूर्वीपासूनची आणि खरी प्रतिनिधी आहे?

अशा प्रश्नांची उत्तरं सरळसोट नसतात. कारण हे प्रश्नच गहन आहेत. त्यांविषयीच्या काही शक्यता आपल्या जीवनदृष्टीनुसार दाखवून चित्रपट संपतो. वरवर पाहता किंचीतशीच गोष्ट सांगणारा म्हणून काहींना तो कंटाळवाणा वाटेल. पण त्यातली वातावरणनिर्मिती जर जाणवली तर तो आवडू शकेल. गर्दीत हरवून जाणारी, ओळखताही न येणारी, पण आपापल्या मार्गांची निवड अखेर ज्यांना एकेकट्यानंच करावी लागते अशी ही माणसं आणि समुद्राच्या लाटांनी क्षणार्धात पुसले जाणारे त्यांचे इरादे आणि त्यांची अस्तित्वं काहींना ओळखीची वाटतील. कारण म्हटलं तर ते सर्व आपल्यातच आहे. ‘लाईफ इन अ मेट्रो’सारख्या चित्रपटात अधिक ढोबळपणानं मांडल्या गेलेल्या आणि त्यामुळे काहीशा सनसनीखेज झालेल्या खास नागरी जाणिवा इथे अधिक शांत, तरल बनून येतात. सहज येऊन जाणारी महंमद अली रोड आणि धोबी घाटापासून एलिफंटा केव्ह्जपर्यंतची मुंबापुरीतली परिचित स्थळं उगीच न येता विशिष्ट जीवनदृष्टीतून आलेली आहेत हे जाणवतं. चित्रपटातले पाहणारे जसे पाहण्याच्या कृतीतून स्वत:ला समृद्ध करू पाहत असतात तद्वत चित्रपट पाहणाऱ्यालाही अंतर्मुख आणि समृद्ध करण्याच्या शक्यता त्यामुळे त्यात अधिक आहेत. एकंदरीत ढोबळ, उपदेशात्मक, संदेशपर चित्रपटांची रूढ चाकोरी हेतुपुरस्सर टाळणारा आणि तरीही सकस, सघन असा एक अनुभव देऊ पाहणारा असा हा चित्रपट आहे.

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

6 Feb 2011 - 1:16 am | मस्त कलंदर

वाटच पाहात होते या लेखाची. वाचून प्रतिक्रिया देतेच. त्या आधी ही नुसती पोच!!!

--------------------------------------------------------------------------------------------------------

‘लाईफ इन अ मेट्रो’सारख्या चित्रपटात अधिक ढोबळपणानं मांडल्या गेलेल्या आणि त्यामुळे काहीशा सनसनीखेज झालेल्या खास नागरी जाणिवा इथे अधिक शांत, तरल बनून येतात.

एकंदरीत ढोबळ, उपदेशात्मक, संदेशपर चित्रपटांची रूढ चाकोरी हेतुपुरस्सर टाळणारा आणि तरीही सकस, सघन असा एक अनुभव देऊ पाहणारा असा हा चित्रपट आहे.

दोन्ही वाक्यांशी सहमत.
चित्रपट आवडला होताच. पाहाणं आणि पाहिलं जाणं हे कुठेतरी समजलं होतं पण इतक्या स्पष्ट्पणे नीटसं उमगलं नव्हतं. त्या आधुनिकोत्तर संवेदना समजण्यास मदत केल्याबद्दल धन्यवाद. एक वेगळा प्रयोग म्हणून आणि हिंदी सिनेमात क्वचित असणारी सटल्टी असलेला म्हणूनही चित्रपट मनापासून आवडला.
या पाहण्याबद्दल आणि पाहिलं जाण्याबद्दल एक उदाहरण आठवलं:
यास्मीनच्या डायरीत ती मुंबईबद्दल जास्त आणि तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल कमी बोलते. तरी तिच्याकडच्या क्लिप्समधून हळूहळू तिचं बदलत जाणारं रूप, कमी होत जाणारं नवर्‍याचं अस्तित्व हे न बोलता बरंच काही सांगतं. तरीही ते हादरवणारं सत्य मात्र शेवटच्या क्षणी आमिरला कळण्याआधी एकच क्षण आधी समजतं हे ही विशेष.

यातली जवळजवळ सगळीच कॅरेक्टर्स छान आहेत. तरी विशेष उल्लेखनीय असं मला आवडलेलं आणखी एक पात्र म्हणजे लताबाईचं. मिनिटभराचीच भूमिका पण तिचं निर्व्याज हसणं, सहज वावर आणि अकृत्रिम अभिनय, सगळं अगदी मस्तच!!!!

माझे ६६०/- रुपये या चित्रपटासाठी उडाल्यानंतर हा चित्रपट समजला (चित्रपट पाहुन आता ह्या गोष्टिला २ किंवा ४ आठवडे झालीत)

टारझन's picture

8 Feb 2011 - 11:58 am | टारझन

एकनंबर चा भिकारदास , बिनडोक , आघाऊ , ओव्हरकॉन्फिडन्स , कसलाही आगापिछा नसलेला चित्रपट आहे हा ..
काय तो अमिरखाण पण .. छ्या .. च्यायला त्या पेक्षा परवा पाहिलेला "दिल तो बच्चा है जी " बरा होता :)

पिक्चर संपल्यावर मला वाटलं इंटर्वल झाला की काय .. नंतर कळलं .. अरे हो .. पिक्चर संपला =)) सुरुवातीला २० वेळा अमिर खान प्रोडक्शन आणि अमिर खान प्रेझेंट्स , किरन राव प्रेझेंट्स , इत्यादी चित्र वारंवार दाखवुनंच बोर मारायला सुरुवात केली आहे ती शेवट पर्यंत टिकवण्यात आमर्‍या आणि किर्नी यशस्वी झालेत ..

नंदन's picture

6 Feb 2011 - 1:08 am | नंदन

वेगळा 'दृष्टिकोन' देणारे परीक्षण अतिशय आवडले. पाहण्याच्या आणि पाहिल्या जाण्याच्या ज्या अनेक भूमिका या लेखात उलगडून सांगितल्या आहेत; त्या वाचून अपरिहार्यपणे तुम्ही लिहिलेल्या सुधीर पटवर्धनांच्या चित्रांच्या परि-ईक्षणाची आठवण झाली - मुंबई शहर, त्रयस्थ दृष्टिकोन, काहीसा वॉयरिझम ह्या थोड्या सामायिक गोष्टी.

ऐक शुन्य शुन्य's picture

6 Feb 2011 - 1:37 am | ऐक शुन्य शुन्य

हा चित्रपट मलासुद्धा वेगळा नजरिया देवुन गेला.

दोन कथा (मुन्ना आनी यास्मीन नूर) मला दोन वेगवेगळ्या चित्रासारख्या वाटल्या. मुन्नाच्या कथेला शायची चौकट तर यास्मीनच्या चित्राला अरुणची. अनी दोन्ही चौकटीला जोडणारे शायचे प्रेम...... जस की शाय्च्या फोटो मधुन मुन्नाची कथा उलगडते आनी अरुणच्या ऐकाकीपणातून आणी चित्रातून यास्मीनची
ऐ़खादी कथा ऐकताना जर ती त्याच्या मान्ड्णीमुळे फारच आवड्ली जाते..तस काहीतरी....
असाच वळू चित्रपट फक्त मान्डणीमुळे आवड्ला होता...

वाहीदा's picture

6 Feb 2011 - 2:06 am | वाहीदा

अजून हा चित्रपट पाहीला नाही But since you have suggested, really need to give a shot .
या चित्रपटाचा ट्रेलर पाहीला होता अन किरण राव चे सामान्य माणसांच्या देहबोलीचे निरिक्षण एक दिग्दर्शिका म्हणून असामान्य वाटले .

Chintatur Ji,
Kiran Rao is just like you.. she has a knack to Observe , Portray human behavior and present it in a best simplified manner :-)

स्वाती२'s picture

6 Feb 2011 - 2:26 am | स्वाती२

छान परीक्षण!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Feb 2011 - 2:38 am | निनाद मुक्काम प...

@लाईफ इन अ मेट्रो’सारख्या चित्रपटात अधिक ढोबळपणानं मांडल्या गेलेल्या आणि त्यामुळे काहीशा सनसनीखेज झालेल्या खास नागरी जाणिवा इथे अधिक शांत, तरल बनून येतात
अगदि सहमत

साहेब व त्याचे राज्य वाईट
.पण प्रशासकीय व्यवहार व नगर रचना ह्या बाबतीत त्याने मुंबा पुरी लय भारी करून ठेवली
.मानव निर्मित लेणी अनेक ठिकाणी विखुरली आहेत मुंबईत .
तिचे मनस्वी दर्शन घोबो घाट मधून दिसते .अगदी मोजक्या प्रसंगातून आमीर आणि त्याची आयोजक मैत्रीण हिचे नाते किंवा बलदंड धोबी व श्रीमंत शेठाणी चे संबंध दर्शविले आहेत .
मोहम्मद अली रोड तर अप्रतिम ( शक्यतो डिसेंबर किंवा नोव्हेबर मध्ये ईद च्या निमित्ताने भरणारी खाद्य जत्रा (त्यात खरपूस भाजलेला तितर ) मालपोआ
पुढे क्रोफार्ड मार्केट व चोर बाझार येथील भटकंती करण्यात कॉलेज चे सोनेरी दिवस सरले त्याची आठवण ह्या सिनेमा निमिताने होते .
s

चार ठिकाणी चार क्यामेरे लावून ठेवले आहेत .लावणार्‍या प्रत्येकाचे उद्देश वेगवेगळे. एकजण प्रोजेक्ट म्हणून. एकजण कलाकार म्हणून. एक जण फक्त नवीन अनुभव म्हणून कुठल्याही अभिनिवेशाशिवाय. एक जण प्रत्यक्ष जगणारा . हे सगळं वास्तव जगणारा आणि भोगणारा . ह्या सगळ्यांच्या निगेटिव्ह् एकमेकात मिसळल्या . अजून एक डायरेक्टर हा गुंता चिवडून आणि निवडून मांडते. एक मात्र भारी की एका निगेटीव मधून दुसरी बघणे ही एक मजेशीर रचना आहे . ( म्हणजे त्या मुलीच्या टेप चित्रकार बघतो). आता जे वास्तव या सगळ्यातून दिसते ते फार काय बांधून ठेवणारं वाटलं नाही.म्हणजे मी बसमधून क्याम्प-स्टेशन-डेक्कन-कोथरूड मार्गे खिडकीतून बाहेर बघत फिरलो की कसं वाटतं तसं वाटलं.

काही संवाद उगाच विनोदी केले आहेत असे वाटले. ( काही उगाच हसणारे लोक पण थेटरात होते). एक संवेदना हरवलेलं , भकास डोळ्यांनी पाहणारं (किंवा न पाहणारं) म्हातार्‍या स्त्रीचं पात्र पण आहे. त्या बधीरतेचे प्रयोजन काही समजले नाही. पण या सगळ्या क्यामेर्‍यांच्या सोबत कोणी नुसतंच रिकामं नळकांडं लावून ठेवावं हे कल्पक आहे.

चिंतातुर जंतूंचे लेखन नेहमी प्रमाणेच अप्रतिम, नवीन पैलू उलघडून दाखवणारे आहे.

आत्मशून्य's picture

6 Feb 2011 - 6:37 am | आत्मशून्य

पण चीत्रपट फालतू वाटत आहे. एकदम फडतूस प्रश्नाला अवास्तव मह्त्व दील्यासारखे वाटत आहे.

शुचि's picture

6 Feb 2011 - 7:14 am | शुचि

मला "अपीलींग" वाटला नाही. खरं पाहता "रिपेलींग" च वाटला. म्हणजे नंदन यांनी उल्लेख केलेले वॉयरिझम/त्रयस्थ दृष्टीकोन हे कसंतरीच वाटतं.
कदाचित "टू गेट इन्व्हॉल्व्हड/ अ सोलफुल कनेक्टेडनेस" अशा काही कल्पनांची माझ्यावर असलेली मोहीनी असेल पण माझ्या आवडीच्या विरुद्ध असा हा चित्रपट वाटतो.

सन्जोप राव's picture

6 Feb 2011 - 7:21 am | सन्जोप राव

चारचौघांना जे सहजासहजी कळत नाही, ते दर्जेदार ही कलाक्षेत्रातली मूलभूत व्याख्या आहे. तुम्हाला 'कणेकरी' वाचून कळते पण 'उत्सुकतेने मी झोपलो' या नावापासून काहीही कळत नाही, तर मग तुम्हाला कलेच्या क्षेत्रातलं काहीही कळत नाही. समोर भिंत आहे असे म्हणण्यापेक्षा 'समजा समोर भिंत आहे', किंवा 'समोर भिंत आहे असे मानू' असे म्हणणे हे जास्त रसिकपणाचे लक्षण आहे. मोनालिसाच्या चित्रात जर तुम्हाला तासनतास खिळवून टाकणारे काही दिसत नसेल, तर तुम्ही निव्वळ नर्मदेतला गोटा आहात. तुम्हाला एलकुंचवार आवडत नाहीत? मग तुम्ही नाटके बघू नयेत हे उत्तम. काय? तुम्हाला 'सही रे सही' आवडले? मग तर 'तुझ्या केसात उवा आहेत, तू आमच्यात खेळू नकोस'
'धोबी घाट' मला समजला नाही. मलबार हिलवरील बंगल्यात राहून मुंबईमधल्या जन्तेची दु:खं रेखाटण्याला एक विवक्षित पामेरियन प्रतिभा लागते. सौ. किरण राव या चेहर्‍यावरुन जितक्या वाटतात तितक्याच खरोखर गोंधळलेल्या असणार्‍या दिग्दर्शिकेकडे ही प्रतिभा ठासून आहे. कॉफी, व्हिस्की व वाईन पिणे , सिग्रेटी ओढणे, अगम्य चित्रे काढणे आणि सतत कुचमत राहाणे याखेरीज धंदा नसलेल्या अरुणला एक कानफटात मारुन 'तुझा काय प्रॉब्लेम आहे रे भाड्या?' असे विचारावेसे वाटते. 'लग्न नाही करायचं, नाही तर नाही, एक चांगलं बाई म्हणून ठेवायचं नाही... ढुंगण वर करुन झोप की रे निवांत..' हे शब्द आठवतात. शाय (हे नाव आहे की विशेषण, कुणास ठाऊक!) ही कशाच्या तरी शोधात आहे. कशाच्या ते सांगा आणि हजार रुपये मिळवा. तोकड्या चड्ड्या घालून अनोळखी पुरुषांसमोर वावरणे ( शी इज अ‍ॅन अमेरिकन, यू नो!), मुंबईतल्या धोब्यांचे, उंदीर मारणार्‍यांचे फोटो काढणे, घाणेरड्या गल्लीबोळातून मुन्नासारख्या टपोरी पोराबरोबर भटकणे - सुखाचे अजीर्ण झाले की माणसाला असे विकृत हवाबाण हरडे आवडत असावे. मुन्नच्या भूमिकेतल्या प्रतिक बब्बरचेही फार कौतुक झाले आहे. एकतर ही फुले उधळताना बहुतेक घसे 'आमच्या स्मिताचा मुलगा... बिच्चारा!' असे गदगदून आले आहेत. मिष्टर (आणि मिसही), राज बब्बर यांचा सहभाग विसरु नका! रबरी चेहरा आणि रबरी आवाज ही प्रतिकला बापाकडून मिळालेली भेट आहे. मुन्ना काय आहे? तो जिगोलो आहे, स्ट्रगलर नट आहे, धोबी आणि उंदीर मारणारा आहे आणि शायच्या प्रेमात पडलेला प्रेमीही आहे. मग? त्याचे एवढे काय? पण नाही... 'गोंधळ' ही मध्यवर्ती कल्पना ठेऊन काढलेल्या पंच्च्याण्णव मिनिटांच्या मध्यांतरविरहित प्रायोगिक पण व्यावसायिक चित्रपटात असे प्रश्न विचारायचे नसतात....
'चार स्वतंत्र आयुष्ये पण मुंबईतल्या धोधो पावसाच्या पार्श्वभूमीवर ती एक सलग, तुकड्यातुकड्यांचा, अखंड, चिरफाळलेला, एकसंध विस्कळित कोलाज तयार करतात. काहीतरी हातात येते, पण ते येतायेता राहून जाते. काहीतरी समजते, पण तरीही काहीतरी समजत नाही (साधारणतः 'होते, पण पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही' या धर्तीवर!), चित्रपट पाहून बाहेर पडताना आपण आनंदी असतो, पण अस्वस्थही. अस्वस्थ आनंदी की आनंदी अस्वस्थ - हे ज्याने त्याने ठरवावे ' असले काही लिहिले की जन्तेला काही घंटा कळत नाही. त्यातून आमीर खान. त्याच्याविषयी वाईट बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यातला प्रकार. मग जन्ता टाळ्या वाजवते. जन्ता भी खुष, आमीरभी खुष, किरणभी खुष. बच्चा भी खेलेगा, बच्चेका बापभी खेलेगा...

'धोबी घाट' मला समजला नाही. पण एक संवेदना हरवलेलं , भकास डोळ्यांनी पाहणारं (किंवा न पाहणारं) म्हातार्‍या स्त्रीचं पात्र पण आहे. त्या बधीरतेचे प्रयोजन काही समजले नाही याच्याशी मे असहमत आहे. मला ते समजले. ते प्रेक्षकांचे 'प्रतीक' आहे!

आत्मशून्य's picture

6 Feb 2011 - 7:51 am | आत्मशून्य

कणेकरचं माझी फील्लम्बाजी पूस्तकातली एक संदर्भ पूसटसा आठवत आहे. जी गोश्ट कमर्शीयल चीत्रपटाचा दीग्दर्शक ४५ ते ७५ सेकंदात दाखवून जातो तीच गोश्ट प्रेक्षकांना सांगायला हे तथाकथीत (खरंतर फडतूस) दीग्दर्शक अर्धा तास घेतात. ऊदा हीरो नीराश आहे हे कलात्मचीत्रपटात ऊगीच एक दीवा १० मिनिटे दाखव मग पूढची १० मीनीटे नूसतं त्यावर घोंगावणारा एक कीटक दाखव मग पूढची १० मीनीटे हीरो चा मख्ख चेहरा (जाणकारांच्या भाशेत अभीनय) बघायचा आन मग आपल्याला कळणार की हीरो गंडलाय बरका... हेच कमर्शीयल चीत्रपटात हीरो सटक्यात एक बाटली फोडतो(अर्थातच दारूची) .. सीन कट वीशय संपला आशय कळला .............. टाळ्या..... चला पूढे

शिल्पा ब's picture

6 Feb 2011 - 9:45 am | शिल्पा ब

तुमको ना काहीच नाही understand होत !!! very म्हणजे very च सामान्य बुवा तुम्ही..बाकी न कळलेले मांडणे हा सामान्यच गुण आहे , सर्वज्ञानी असतात त्यांची बातच different

बाकी पिच्चर बघितल्यावर प्रतिक्रिया देईन...परीक्षण अन तुमचा प्रतिसाद दोन्ही छान लिहिले आहे.

अर्धवटराव's picture

6 Feb 2011 - 10:10 am | अर्धवटराव

मला वाटलं कि मीच इतका मट्ठ कि हा चित्रपट इतका टुकार वाटला मला.
तुम्ही अगदी माझ्या मनातलं टंकलय. आयला... 'क्लासीकल' व्हायला अश्या चित्रपटांना झेलावं लागत असेल तर आपण आपलं सर्वसामान्यच बरे.
जाम डोकं दुखलं चित्रपट बघुन.

(धोबीपछाड) अर्धवटराव

अवलिया's picture

7 Feb 2011 - 6:06 pm | अवलिया

सहमत आहे. चित्रपट सहन करण्याच्या पलिकडचा आहे. मित्राने पिक्चरचे पैसे मी देतो पण माझ्याबरोबर चलच असा पसआग्रहकरुन नेल्यामुळे स्वतःचे पैसे गेल्याचे दु:ख नाही ;) मात्र बाहेर पडल्यावर मित्राचा यापेक्षा फोरासरोडला गेलो असतो तर परवडले असते हा शेरा बोलका आहे.

(पिटातला प्रेक्षक) नाना

तिमा's picture

6 Feb 2011 - 10:13 am | तिमा

रावांशी नेहेमीप्रमाणेच सहमत.
नुसते इतर मसाला सिनेमांपेक्षा वेगळे सिनेमे काढून कोणी 'सत्यजित रे' होत नाही.

आजानुकर्ण's picture

6 Feb 2011 - 12:54 pm | आजानुकर्ण

प्रतिसाद आवडला.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Feb 2011 - 1:01 pm | बिपिन कार्यकर्ते

बाब्बौ!

इन्द्र्राज पवार's picture

6 Feb 2011 - 3:22 pm | इन्द्र्राज पवार

"....एकतर ही फुले उधळताना बहुतेक घसे 'आमच्या स्मिताचा मुलगा... बिच्चारा!' असे गदगदून आले आहेत. ..."

~ अगदी रोखठोक तितकीच प्रभावशाली भाषाशैलीने मढलेली प्रतिक्रिया आहे. श्री.सन्जोप राव यांच्या वरील वाक्याने तर ही बाब अधिकच अधोरेखीत होते की, आपल्या खास अशा मराठी मनाने 'अमुक एकाचा मुलगा किंवा मुलगी' म्हणजे तिच्याविषयी गदगदून लिहिले/बोलले नाही तर 'त्या' व्यक्तीचा अपमान होणार हे गृहितक मांडलेले असतेच. स्मिता पाटीलचा मुलगा म्हणजे तो काकणभर सरस असणार असा लसावी काढूनच 'धोबीघाट' पाहायचा झाल्यास मग त्याने साकार केलेल्या भूमिकेबद्दल तटस्थतेने चर्चा करण्याच्या वाटा खुंटतातच.

आदिनाथ हा हृदयनाथांचा मुलगा....चांगलेच गाणार.....हेमंत भोसले हा आशाताईंचा मुलगा....चांगलेच संगीत देणार...किरण शांताराम, बोलूच नका...तो वडीलांपेक्षा छान चित्रनिर्मिती करणार....रोहन गावस्कर, सुनिलचे सर्व विक्रम मोडीत काढणारच....इ. इ. ~~ काळाने हे निर्विवाद सिद्ध केलेच आहे की, "सूर्याची पिल्ले" नावाची संकल्पना वारंवार प्रत्यक्षरूपाने साकारली जाते; तरीही 'प्रतीक' सम उदाहरण समोर आले की परत त्याच्या मात्यापित्याविषयीच्या आठवणीने गहिवरण्याचे प्रसंग जे येतात त्याचा श्री. सन्जोप राव यानी चांगला समाचार घेतलेला आहे.

श्री.चिं.जं...यांच्या परिक्षणाकडे एका चांगल्या लिखाणाचे उदाहरण म्हणूनच मी पाहिले आहे, कारण चित्रपट मी पाहिला आहे आणि माझे मत त्यांच्यासारखे नसल्याने काही लिहिणे योग्य नाही. आपल्या पत्नीची चित्रनिर्मिती म्हणून आमीरचा सहभाग या पलिकडे त्याच्या रोलकडे पाहता येत नाही. बाकी कथानकाबद्दल तर वर चांगलीच चर्चा केली आहे, श्री.राव यानीच.

इन्द्रा

गोगोल's picture

8 Feb 2011 - 5:55 am | गोगोल

या नाटकाला मी बरेच दिवस "सूर्याजी पिल्ले" असे वाचत होतो. मला वाटायच की साऊथ इंडियन माणसाच्या मुंबईतील स्ट्रगल वर आधारित आहे.

Pain's picture

7 Feb 2011 - 11:27 am | Pain

ह्याचे नाव धोबीघाट नसून धोबीपछाड असायला हवे..कारण हा रसिकांना घातला गेलेला धोबीपछाडच आहे. असंबद्ध, दिशाहीन कथानक आणि मारून मुटकून केलेला शेवट. हल्ली आमीर खानचा चित्रपटसुद्धा फालतू असू शकतो याचे आश्चर्य वाटले.

व्हिडिओ चित्रण करणारी (म्हणजे पाहिली जाणारी) साधी, निरागस, गोड मुलगी
अनोळखी माणसांसोबत बिनधास्त झोपणारी, अधूनमधून ड्रग्ज घेणारी मुलगी तुम्हाला साधी, सर्वसामान्य, निर्व्याज आणि निरागस वाटते ? कमाल आहे. उद्या अफजलखानाला हरिभक्तपरायण म्हणाल!

चुकीला चूक म्हणणे लांब राहिले वर असे धादांत खोटे बोलणे म्हणजे..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Feb 2011 - 12:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

व्हिडिओ चित्रण करणारी (म्हणजे पाहिली जाणारी) मुलगी म्हणजे यास्मिन, शाय नव्हे! शाय फोटोग्राफी करत असते, व्हीडीओग्राफी नाही.

चित्रपटाच्या शेवटी दोन्ही पुरूषपात्र बदलतात, अरूण यास्मिनमुळे बदलतो, मुन्ना शायबद्दलचं वास्तव मान्य करून तिचा मित्र बनतो. शायच्या बाबतीत मात्र एक ठोस असा लॉजिकल शेवट दाखवलेला नाही असं वाटलं. ती न्यूयॉर्कहून येताना काही शोधात आली आहे असं दाखवलं आहे, तो शोध थोड्या प्रमाणात यशस्वी ठरला आहे असं मलातरी वाटलं.

स्पा's picture

7 Feb 2011 - 12:21 pm | स्पा

प्रतिसाद ऑफ द इअर

संजोप राव.. सगळ्यांचा बाजार उठवलात , जियो
हॅ हॅ हॅ

ज्ञानेश...'s picture

6 Feb 2011 - 10:00 am | ज्ञानेश...

चित्रपट आणि त्याचे परीक्षण आवडले.
रावसाहेबांचा प्रतिसादही आवडला. :)

चित्रपटाचे नाव 'धोबीघाटः मुंबई डायरीज' असे आहे. एखाद्याची डायरी उघडून मधलीच काही पाने वाचली तर जसे काही कळेल, काही संदर्भ लागणार नाहीत, करमणूक होईल किंवा होणार नाही, वेळ वाया गेल्यासारखे वाटेल पण काळाचा एक तुकडा मात्र पहायला मिळेल. त्यातून 'करमणूक' सारखे ठोस काहीतरी हाती लागेलच असे नाही.
हेच सर्व माझे चित्रपट बघतांना झाले. मी हे दिग्दर्शिकेचे यश समजतो.

(कदाचित) थोडेसे अवांतर- विदेशातून आलेल्या एका तरूणीला मुंबई कशी दिसली हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख नक्की वाचा-

http://www.theaustralian.com.au/news/features/mad-for-mumbai/story-e6frg...

शहराजाद's picture

6 Feb 2011 - 10:28 am | शहराजाद

पाहणं’ किंवा ‘पाहिलं जाणं’ या क्रियेशी एकाच संदर्भात खूप वेगवेगळे अर्थ जोडले जाऊ शकतात

नेहमीप्रमाणेच सुरेख लेखन.
मी चित्रपट पाहिलेला नाही पण वेगळ्या दृष्टीकोनातून केलेलं परीक्षण आवडलं.

छोटा डॉन's picture

6 Feb 2011 - 11:10 am | छोटा डॉन

नेहमीप्रमाणेच सुरेख लेखन.
मी चित्रपट पाहिलेला नाही पण वेगळ्या दृष्टीकोनातून केलेलं परीक्षण आवडलं.

+१, हेच म्हणतो.
परिक्षण छान वाटले. :)

रावसाहेबांचा प्रतिसादही उत्तम, अगदी अचुक मर्मभेद करणारी थेअरीही पटणारी आहे.
मस्त धागा :)

- ( तुर्तास "उडान" न आवडल्याने जनक्षोभास सामोरा जाणारा ) छोटा डॉन

वेताळ's picture

6 Feb 2011 - 11:12 am | वेताळ

पिक्चर नक्की बघायला हवा.

स्वाती दिनेश's picture

6 Feb 2011 - 1:07 pm | स्वाती दिनेश

परीक्षण आणि प्रतिक्रिया वाचून सिनेमा बघावा की नाही याबाबत कन्फ्यूज्ड झाले आहे,
स्वाती

मुलूखावेगळी's picture

6 Feb 2011 - 1:33 pm | मुलूखावेगळी

परीक्षन छान अनि आवडले
आता ह्या अ‍ॅन्गल नी पिक्चर बघाय्ला जास्त इंटरेस्ट येइल
बरे झाले आतापर्यन्त नव्हता बघितला.
आता बघएल लवकरच
संजोपरावान्ची प्रतिक्रिया पन आवडली

मुलूखावेगळी's picture

6 Feb 2011 - 8:21 pm | मुलूखावेगळी

काहि कळत नाहिये हे का रीपीट होतेय

मुलूखावेगळी's picture

6 Feb 2011 - 1:44 pm | मुलूखावेगळी

चुकुन २दा आलाय

अहो हो!! मग दुसरा काढुन टाकुन तिथे स्पष्ट करायचं सोडुन अजुन एक तिसरा लिहायचा का?

चिंतातुर जंतू's picture

6 Feb 2011 - 3:35 pm | चिंतातुर जंतू

प्रस्तुत चित्रपटाच्या अनुषंगानं धाग्यात आतापर्यंत आलेल्या काही मुद्द्यांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो.

चित्रपटात जे मांडायचा प्रयत्न केला आहे त्याची शैली ही साध्याशा, दैनंदिन वाटणाऱ्या गोष्टी सांगता सांगता हळूच जाता जाता काही मुद्दे मांडायचे अशी काहीशी आहे. काहींना ती तरल वाटू शकते. काहींना ती फसवणूक वाटू शकते. (कारण शेवटी हाती काहीच लागत नाही अशी भावना निर्माण होऊ शकते.) हे हिंदी चित्रपटाच्या चौकटीत सवयीचं नसल्यामुळेसुद्धा भंजाळून टाकणारं वाटू शकतं. शेरेबाजी किंवा चेष्टा करून त्याला लाथा हाणून दूर लोटायचं की त्याच्या मुळाशी जायचा प्रयत्न करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो मी सोडवू शकत नाही. ज्यांना मुळाशी जाण्याचा प्रयत्न करण्यात रस आहे त्यांच्यासाठी थोडीअधिक मदत करण्याचा हा प्रयत्न आहे.

सत्यजित राय यांचा पाथेर पांचाली हा ‘निव्वळ भारतीय दारिद्र्याचं प्रदर्शन करणारा सिनेमा आहे’, किंवा त्या उलट ‘गरीब लोक चांगले आणि श्रीमंत वाईट’ अशी समाजवादी समीकरणं मांडणारा सिनेमा या प्रकारच्या टोकाच्या भूमिकांतून आपला सिनेमा आता बाहेर पडू पाहतो आहे. त्यात ‘दबंग’सारख्या, पिटातल्या प्रेक्षकाची रंजनाची भूक भागवणारा सिनेमा जसा आहे तसाच नागरी, तरुण मल्टीप्लेक्स-मॉलमध्ये वावरणाऱ्या लोकांच्या संवेदनांचे ‘धोबीघाट’सारखे चित्रपटही आहेत. प्रत्येकाला आपापली जागा आहे, असावी. कारण साधं आहे. एकाच मुंबईत मलबार हिल आणि धारावी दोन्ही आहेत. शिवाजी पार्क – विलेपार्लेचा सुखवस्तू मराठी समाज आणि परळ-बी.डी.डी. चाळीतला कष्टकरी मराठी समाज असे सुद्धा एकाच मुंबईत नांदतात. तद्वत ही प्रेक्षकांची विभागणीही समकालीन समाजात अपरिहार्य वाटते.

शिवाय, समकालीन नागरी समाजाच्या जगण्यात असलेले अनेक प्रश्न हे केवळ ‘पामेरियन’, ‘कुचमत राहाणे’ अशा शब्दांनी धुडकारावेत इतकेही ते आपल्यापासून दूर नाहीत. घटस्फोट, एकटेपणा, नैराश्य, आसपासच्या कंटाळवाण्या वास्तवापासून दूर जावंसं वाटणं अशा गोष्टींशी सामना करणारी माणसं माझ्या आसपास असायला मला मलबार हिलवर राहायची आज गरज नाही. हे वाईट असेल कदाचित पण हे आमचं आजचं वास्तव आहे. त्याच्याशी भिडणं आम्हाला हवं असो नसो, ते भाग पडतं आहे.

चित्रपटातली प्रत्येक प्रमुख व्यक्तिरेखा कशाच्या तरी शोधात आहे हे खरंच आहे. शाय (हो जगात काही लोकांची अशी नावं असतात; एदल्जी आडनावाच्या पारशिणीचं नाव सायली किंवा स्वाती नसतं; मुंबईत हेही एक वास्तव आहे.) ही इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. खूप पैसा मिळवूनही नक्की कशाला धरून राहिल्यानं जगण्याला दिशा मिळेल, आनंद मिळेल हे तिला कळलं नाही आहे. पण ते कळून घ्यायचा तिचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळेच आपले मित्र, कुटुंब यांच्या सुरक्षित, सवयीच्या वातावरणातून ती बाहेर पडते आहे. छायाचित्रं काढणं हा कदाचित एक मार्ग आहे. तो बावळटपणाचाही असू शकेल. पण तो प्रयत्न आहे. ती तिच्या परिसरात ‘मिसफिट’ आहे. अरुणसुद्धा तसा आहे. आजच्या कलाक्षेत्रात वावरण्यासाठी, जम बसवण्यासाठी जे काही करावं लागतं ते त्याला जमत नाही आहे; करायचंदेखील नाही आहे. त्यापेक्षा आपल्याशी संवाद साधण्यात आणि आपलं काम करण्यात तो मश्गुल आहे. पण सहवासाची आस त्यालाही आहे. बायको सोडून गेल्याचं त्याचं दु:ख धोब्यालाही दिसलेलं आहे. अशा माणसांना जगण्यात रस निर्माण होण्याचं कारण म्हणून (किंवा संप्रेरक म्हणून) एक मनमिळाऊ, गोड स्वभावाचा धोबी किंवा एक सर्वसामान्य स्थलांतरित निर्व्याज मुलगी चित्रपटाच्या रचनेत येणं हे हृद्य आणि तरीही साधं आहे. त्यात चित्रपटाची जीवनदृष्टी सामावलेली आहे. ज्यांना ती रुचेल त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे. त्यांना तो कळायला जड जात नाही आहे, हे मला दिसतं आहे. त्याचा मला आनंदही आहे. बाकीच्यांना शुभेच्छा.

टीप १: ज्यांनी चित्रपट पाहिलेला नाही त्यांना सगळं कथानक समजून जाऊन त्यांचा पहाण्यातला रस कमी होऊ नये म्हणून प्रसंगांची तपशीलात मांडणी केलेली नाही,. चर्चेत अधिक काही मुद्दे गांभीर्यानं आले तर अधिक तपशीलात मांडणी करता येईल.
टीप २: इतर कलाकृतींविषयीच्या आणि सरसकटपणे केलेल्या शेरेबाजीवजा टिप्पण्या धाग्यात उत्तर देण्यासारख्या वाटल्या नाहीत.

मुक्तसुनीत's picture

6 Feb 2011 - 10:15 pm | मुक्तसुनीत

मला हा चित्रपट खूपच आनंद देणारा वाटला होता. चिंतातुर जंतु यांनी दिलेले परीक्षण हे त्याला न्याय देणारे वाटले. (नो किडींग ! ;-) )

मुंबईच्या - किंवा सामान्यतः कुठल्याही महानगरी आयुष्यात अनेक वास्तवे एकाच वेळी वसत असतात; या एकसमयावच्छेदेंकरून वसणार्‍या लक्षावधी वास्तवांमधला हा एक क्रॉस सेक्शन आहे. प्रस्तुत चित्रपटाचा एकंदर ग्यामट या चार व्यक्तिंच्या एकमेकांमधे गुंतलेल्या अवकाशांच्या दर्शनाइतका आहे. हा आवाका प्रस्थापित केल्यानंतर जे काही हा चित्रपट मांडतो ते त्या अवकाशाच्या रंगरसगंधाला, पोताला कलात्मक न्याय देणारे आहे असे मला वाटले.

मला स्वतःला शाय, धोबी मुलगा आणि व्हिडीओ फिल्ममधली मुलगी या तिघांचीही कामे खूप आवडली. आमीर खान चे कामच थोडे "फिल्मी" वाटले. पण असो.

चित्रपट जे मुंबईचे दर्शन घडवतो ते अतिशय आवडले. कुठेही प्रचारकी न होता या शहरातल्या नागरी व्यवस्थेवर इथे भाष्य केलेले आहे. चार प्रमुख माणसांइतकेच मुंबई हेही एक पात्रच - कधी न झोपणारे, तारवटल्या डोळ्यांचे, प्रसंगी जीवघेण्या पावसाचे.

आमीरखानच्या चित्रकार पात्राला त्या विशिष्ट लोकवस्तीत राहावे का वाटावे , त्याच्या खिडकीतून दिसणारी दृष्ये का आवडावीत या गोष्टीचा विचार करताना एक खूप जुना किस्सा आठवतो. दीनानाथ दलाल हे एकेकाळाचे यशस्वी चित्रकार. अनेक वर्षे मुंबईच्या लोकलट्रेन मधे प्रवास करणार्‍या दलालांनी काही वर्षांनी गाडी घेतली आणि गाडीनेच स्टुडीओत जा ये करू लागले. त्यानंतर काही वर्षांनी ते थोडे आजारी असताना आपल्या एका मित्राला ( मला वाटते जयवंत दळवींनाच ) ते म्हणाले की हल्ली पूर्वी सारखी पोर्ट्रेट्स जमत नाहीत. त्यावर तो मित्र त्याना म्हणाला की दलाल , तुम्ही लोकलमधून जाणेयेणे बंद केल्याचा का परिणाम आहे ! दलाल पुन्हा अधूनमधून ट्रेनने जाऊ लागले आणि एके दिवशी पुन्हा एकदा जोमाने आपण पोर्ट्रेट्स काढू शकू असे त्याना वाटायला लागले ! असो.

भारतीय चित्रपटांमधे फारच दुर्मिळ असलेल्या अनेक गोष्टी मला इथे सापडतात. चित्रपट म्हणजे फ्रेम्स्च्या परिभाषेतून काव्याचा साक्षात्कार देऊ शकणारा एक अनुभव असू शकतो ही , (अगदी आजच्या, परिपक्व समजल्या जात असलेल्यासुद्धा ! ) भारतीय चित्रपटांमधे अभावानेच आढळणारी गोष्ट मला इथे सापडते. अनेकविध भाषांमधल्या अनेकविध नियतकालिक-काव्यसंग्रहातून आपण कविता वाचू शकतो, मात्र एखाद्या चित्रपटाचे हे प्रिमाईस असू शकते हे अजून आपल्या पचनी न पडल्याचे इथल्या काही प्रतिक्रियांमधून दिसतेच आहे. त्याबद्दल अधिक काय लिहिणें ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Feb 2011 - 11:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दोन तास निव्वळ करमणूकीची अपेक्षा ठेवून गेलेल्यांना 'धोबी घाट' का आवडणार नाही याची मला कल्पना आली. पण दिग्दर्शिकेने मुंबईत काय पाहिलं, किंवा तिला काय दाखवावंसं वाटलं हे पहायला मलातरी आवडलं.

मला हा चित्रपट खूपच आनंद देणारा वाटला होता.

मलाही ... पण ते नक्की का हे अजूनही नीट समजलं आहे असं म्हणता येणार नाही.

चिंतातुर जंतु यांनी दिलेले परीक्षण हे त्याला न्याय देणारे वाटले.

मूळ परीक्षण, जंतू, ज्ञानेश आणि मुसु यांच्या प्रतिसादांमुळे हा चित्रपट का आवडला याचा विचार करायला मदत होते आहे.

आमिर खानचे केस थोडे पांढरे दाखवले आहेत, हा बदल सुखावह.
अनेक क्लोजप्समधे चित्रात इंग्लिश वाक्यांप्रमाणे ओठ हलत होते आणि कानावर हिंदी येत होतं, हे खटकलं.
जाता जाता: मुन्नाच्या भावाचा चेहेरा थोडासा अमजद खानसारखा वाटला.

दबंग सारखे चित्रपट निव्वळ 'मास' साठी बनवले जातात. धोबीघाटचा प्रेक्षक वर्ग निश्चितच वेगळा आहे. त्यामुळे सामान्य प्रेक्षकाला तो आवडेलच अस नाही.
मला तो आवडला. का? कश्यासाठी? याची चिरफाड मला जमत नाही. :)

वाहीदा's picture

6 Feb 2011 - 10:33 pm | वाहीदा

टीप २: इतर कलाकृतींविषयीच्या आणि सरसकटपणे केलेल्या शेरेबाजीवजा टिप्पण्या धाग्यात उत्तर देण्यासारख्या वाटल्या नाहीत.
टाळ्या !!

त्यात ‘दबंग’सारख्या, पिटातल्या प्रेक्षकाची रंजनाची भूक भागवणारा सिनेमा जसा आहे

दबंगशी तुलनाच काय, त्याचा उल्लेखही करू नका. आम्हाला ते अभिप्रेत नाही. हा चित्रपट स्वतंत्ररित्या फालतू आहे.

श्रावण मोडक's picture

6 Feb 2011 - 7:21 pm | श्रावण मोडक

परिचयाचे लेखन आवडले. त्यावरची दुसरी बाजूही वाचली. तेही लेखन आवडले.
चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे बाकी गोष्टींवर बोलण्याचा अधिकार नाही. आता गोंधळ झाला आहे. तो निस्तरण्यासाठी चित्रपट पहावाच लागेल.
पाहू...
आला का पाहण्याशीच संबंध?
एकूण पाहणं (निरीक्षण या अर्थी, चित्रपटातही तोच अर्थ अभिप्रेत असावा असं कथेवरून वाटतंय) म्हटलं की, हेजेनबर्गच (हा उच्चार बरोबर आहे का?) आठवतो. :) निरिक्षक निरिक्षण केल्या जाणाऱ्या प्रणालीचा भाग बनतो आणि मग सारी निरपेक्षता संपुष्टात येते, वगैरे... परिचय आणि प्रतिसाद वाचून पाहण्याच्या क्रियेशी संबंधित ही एक गोष्ट छानच दिसून येते. ;) वेगळा नजरिया असं ज्याक्षणी म्हणतो त्याक्षणी तो नजरियाच मुळी त्या प्रणालीचा भाग बनल्यानेही काही भूमिका घेत तयार होत असावा...
जाऊद्या, हा आपला प्रांत नाही. नाही तर, चिंतातूर जंतू आणि रावसाहेब हे दोघंही फाडून खायचे. इथंच थांबावं.

भडकमकर मास्तर's picture

6 Feb 2011 - 8:37 pm | भडकमकर मास्तर

परीचय आणि त्यावरचा संजोपरावांचा प्रतिसाद आवडला... मज्जा आली... त्यावरचं उत्तरही आवडलं... सिनेमा अजून पाहिलेला नाही त्यामुळे बाकी काही लिहीत नाही...

अवांतर : जाने तू या जाने ना मधला "प्रतीक" अगदी ओवररेटेड बब्बर वाटला होता... धोबीघाटात कसा आहे माहित नाही

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Feb 2011 - 11:33 pm | निनाद मुक्काम प...

आम्ही पौगुंदा वस्थेत प्रवेश व त्या वेळी परकीय वाहिन्यांचे भारतात पदार्पण (डिश छत्र्या ) एकाचवेळी झाले .
परदेशी संगीत /सिनेमा ह्याची कवाड आमच्या साठी खुली झाली .
स्टार मुवीज अबिंका ताई ह्यांच्या कचाट्यात सापडला नव्हता .
त्यामुळे अनेक जगप्रसिध्ध सिनेमे पाहणे (काट छाट न करता ) पाहायचे पुण्य पदरात पडले .
जगाकडे पहायची दृष्टी व्यापक झाली .उपनगरिय माझे कुपमंडूक मन व्यापक झाले .
दर गुरवारी ऑस्कर विजेते सिनेमे दुपारी दाखवत असल्याने शाळा बुडवून ते पाहणे आलेच
खाली हिंदी सब टायटल ची सोय आम्हा मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होती .
हे सिनेमे पाहताना काही गोष्टी जाणवल्या .
ह्यात रोमहर्षक /चित्तवेधक /आकर्षक ./अद्वितीय असे काहीच घडत नाही .
ह्यात घडते ती सरळ सोपी कथा व नैसर्गिक रित्या अभिनय करणारी (जो अभिनय वाटतच नाही ) पात्रे. मुळात हे सिनेमे इटली /स्पेन ह्या युरोपियन देशातील त्यावेळचे सामाजिक जीवन जसेश्या तसे उभे करायचे .
माल गुडी डेज ह्याच पठडीत मोडले जाईन.
आपल्या कडे संमातर पठडीतले सिनेमे म्हणजे सिस्टम /वर्ण व्यवस्था / भांडवल शाही ह्य विरुध्ध बंड असे समीकरण होते .
त्यामुळे धोबी घाट ह्या सिनेमात असे काय वेगळे आहे ह्या पद्धतीची प्रतिक्रिया उमटणे साहजिकच आहे .( ह्यात जर अमीर व प्रतिक व नायिकेत प्रेम त्रिकोण ) किंवा सामाजिक विषमतेवर भाष्य /किंवा नायिकेच्या अनिवासी भारतीय असल्याने भारतावर परखड भाष्य / प्रतीकचे बॉलीवूड चा नायक बनण्यासाठी त्याच्या व्यक्तिरेखेला टाळ्या मिळवणारे ठासु संवाद अश्या अनेक गोष्टी सिनेमात हव्या होत्या किंवा अमीर चा घटस्फोट का झाला ह्यांचा संधर्भ द्यावा असे वाटले असावे . .
पण हा सिनेमा कोणताही संदेश देत नाही .मनोरंजन करत नाही /प्रबोधन करत नाही .
मुंबई भटकंती केलेल्या कोणालाही हा सिनेमा मुंबईचे अंतरंग काही प्रमाणात उलघडून दाखवतो .
ए दिल हे मुश्कील जिना यहा
सुनो मिस्टर सुनो बंधू
ये मुंबई हे मेरी जान

वाटाड्या...'s picture

8 Feb 2011 - 3:13 am | वाटाड्या...

निनाद...

मालगुडी डेजची आठवण करुन तु लय भारी काम केलस लेका...आजच बघतो कुठे त्याचे टोरेंट मिळते का ते?

- (नॉस्ट्ञल्जीक)वाट्या

एकदम टुकार पिक्चर
पैसे वाया गेले....

साला अप्नेकोतो तो दबंग जैसा फिल्म हीच भारी लगताय

हे असे कलात्मक दृष्टीकोण वगेरे तेल लावत गेले

साले ३०० रुपये काय फक्त ९० मिनिटांसाठी मोजायचे
बकवास

परिकथेतील राजकुमार's picture

7 Feb 2011 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार

चिंजं उत्तम लेखन.

'किरण रावला अरुणच्या भुमिकेसाठी अमीर कसा नको होता', किंवा 'त्याने रांगेत उभा राहून कशी स्क्रिन टेस्ट दिली' ह्या बातम्यांचा चॅनेल, वर्तमानपत्रे आणि इंटरनेटवरुन भडिमार चालु झाल्याबरोबरच ह्या चित्रपटावर मनातल्या मनात लाल फुली मारुन मोकळा झालो :)

चिंतातुर जंतू's picture

7 Feb 2011 - 5:57 pm | चिंतातुर जंतू

चित्रपट आवडणं न आवडणं ही गोष्ट खूप व्यक्तिसापेक्ष म्हणून थोडी बाजूला ठेवली, तरीही धाग्यावर एक गोष्ट लक्षात आली: काहींनी असं म्हटलं आहे की चित्रपट कळला नाही, किंवा मुद्दाम ग्रेट वाटावा म्हणून अनाकलनीय केला आहे किंवा गोंधळाचा/असंबद्ध/दिशाहीन आहे वगैरे. ज्यांना तो असा वाटला पण इतरांना का आवडला असेल याविषयी कुतूहल वाटत असेल त्यांच्यासाठी हा प्रतिसाद. ज्यांनी पाहिलेला नाही त्यांच्यासाठीही 'चित्रपट का आवडू शकेल' याची थोडं खोलात जाऊन चिकित्सा असंही म्हणता येईल.

चित्रपटातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा प्रवास पाहिला तर कदाचित गोंधळ दूर होण्याची पहिली पायरी गाठता येईल.

त्यातल्या दोन व्यक्तिरेखांचा प्रवास हा वरवर पाहता सर्वसाधारण परिस्थितीत सुरु होतो आणि दु:खद गोष्टींकडे जातो. मनमिळाऊ, हसरा मुन्ना हा आपल्या परीनं जगण्याची धडपड करतो आहे पण तो निराश नक्कीच नाही. कदाचित त्याचं हे मोकळेढाकळेपण चित्रपटात दोन स्त्रियांना त्याच्याकडे खेचतं – त्यातली एक निव्वळ त्याच्या शरीराची भुकेली आहे तर दुसरी त्याच्याकडे आधी मदतनीस आणि नंतर मित्र म्हणून पाहते आहे. शायकडून पैसे किंवा आर्थिक लाभ त्याला हवा असेल असं सुरुवातीला वाटू शकतं, पण हळूहळू त्याचं बुजरेपण आणि त्यातला गोडवा आपल्याला आणि शायलाही जाणवू लागतो. फोटोसेशनच्या वेळी, त्या निमित्तानं ‘मी चांगला दिसतो का?’ असं त्यानं हळूच विचारणं किंवा शर्ट काढणं हे शारीरिक जवळिकीच्या आशेनं केलं आहे असं वाटायला जागा आहे. पण तिनं ‘हो, तू चांगला दिसतो आहेस’ म्हटल्यावर त्याचा सहज खुलणारा चेहरा हा स्वीकार आणि प्रेमाच्या भुकेल्या कोणत्याही सामान्य मुला-मुलींसारखा तारुण्यसुलभ आहे. त्यामागे हिशेब नाही. आपल्यापेक्षा वरच्या वर्गातल्या, म्हणून एरवी अप्राप्य असणाऱ्या मुलीविषयीची निव्वळ वासना अशी त्यात दिसत नाही किंवा असेल तर ती हळूहळू अदृश्य होताना दिसते. नंतर जेव्हा तो शायचा गैरफायदा घेऊ शकत असतो (तिच्या घरी दोघे दारू पितात तो प्रसंग) तेव्हा तो तिच्या शरीराला स्पर्शही करत नाही. तेव्हा तर हे अधिकच स्पष्ट होतं. एकंदरीत त्याचं वागणं उमदं म्हणता येईल असं असतं. त्याच्या बावळटपणाचं हसू येऊ शकतं, पण ते क्रूर चेष्टेनं येणारं हसू नव्हे. मग अरुणविषयी त्याला असूया वाटणं हेही तारुण्यसुलभ आणि साहजिक वाटतं; म्हणून ते खपूनही जातं. थोडक्यात, प्रेक्षकांना पटकन आवडून जाणारा असा हा माणूस आहे. त्यामुळेच आकाश कोसळल्यासारखी संकटं सोसल्यावरसुद्धा मुन्ना चांगुलपणानं वागू शकतो का यावर कथानकातला कळीचा प्रसंग (किंबहुना चित्रपटातला मुख्य मुद्दाच म्हणता येईल असा) उभारलेला आहे. थोडक्यात, भाव खाऊन जाणारी अशीच ही व्यक्तिरेखा आहे.

सर्वसाधारण परिस्थितीतून सुरु होणारं दुसरं पात्र, म्हणजे यास्मीन नक्की काय आहे ते कळायला थोडा वेळ जातो. सुरुवातीला मरीन ड्राईव्ह, गेटवे, गणपती विसर्जन वगैरेंचं (मुंबईतल्या त्याच त्याच गोष्टी) चित्रण करणारी हौशी यास्मीन हळूहळू फक्त घरात दिसू लागते आणि मग तिचं एकटेपण खुपू लागतं. सुरुवातीला टॅक्सी चालवणाऱ्याशी गप्पा मारणारी अशी ती दिसलेली असते. भावाला लिहिलेल्या पत्रातूनही तिचा निर्मळ स्वभाव दिसत राहतो. रिकामं, भकास असं तिचं आयुष्य जसजसं दिसू लागतं तसं प्रेक्षकाचं तिचं नातं घट्ट होऊ लागतं. थोडक्यात जिच्याविषयी अनुकंपा वाटावी असं हे पात्र आहे.

इतकी सहज एकतानता किंवा अनुकंपा इतर दोन पात्रांविषयी किमान सुरुवातीला तरी जाणवेलच असं नाही.

अरुणची ओळख होते तेव्हा तो थोडा शिष्ट, फटकून वागणारा असा दिसतो. चित्र-प्रदर्शनाच्या पार्टीतला अरुण किंवा शायबरोबर रात्र एकत्र घालवल्यावर लगेच दुसऱ्या सकाळी ‘याहून जास्त नात्याची अपेक्षा वगैरे ठेवू नकोस’ असं तिला रोखठोकपणे सांगणारा अरुण प्रेक्षकांना दूरचा वाटणं साहजिक आहे. पण शाय चिडून/दु:खी होऊन निघून गेल्यावर 'तिच्या मागे जावं का' अशा विचारात तो दिसतो; लगेच दाराची घंटा वाजते तेव्हा कदाचित ती परत आली असेल म्हणून त्याची आशा पल्लवित होते. आपण वाईट वागलो हे त्याला कळतं. म्हणून नंतर तो शायला घरी बोलावतो. त्याचा माणूसघाणेपणा हा खरं तर थोडा वरवरचा आणि फसवा आहे; त्यालाही माणसांची, मैत्रीची आस आहे हे अशा छोट्याछोट्या गोष्टींतून दिसतं. अर्थात, यास्मीनच्या व्हिडिओ पत्रांमध्ये तो रस दाखवतो आणि तिच्या कहाणीनं तो भावुक होतो यावरून, किंवा बायको सोडून गेल्यावर त्याचं काय झालं होतं या मुन्नाच्या तोंडच्या कथनातून हळूहळू त्याचा हळवेपणा आणि संवेदनशीलता खूपच स्पष्ट होते.

शायसुद्धा सुरुवातीला स्वत:त मग्न सुखवस्तू एन.आर.आय. वाटते. सुखात मन रमत नाही म्हणून मग उगाच कलाक्षेत्रातल्या पार्ट्यांना जा, गरीब मुंबईचे फोटोच काढ अशा (फुटकळ आणि उथळ वाटू शकतील अशा) गोष्टी करताना दिसते. पण ती उथळ आणि फ्लर्ट नाही, तर प्रांजळ आणि अंतर्मुख आहे हे हळूहळू जाणवू लागतं. ‘कालच्या प्रकाराबद्दल सॉरी; मी उगाच दारूच्या नशेत तुझ्या जवळ आलो; पण हे इथेच बास.’ असं म्हणून अरुण तिला जेव्हा धुतकारतो, तेव्हा ती जखमी झाल्यासारखी त्या क्षणी त्याच्या घरातून बाहेर पडते. कारण जपून ठेवावं असं काहीतरी रात्री त्यांच्यात घडलेलं (तिच्या मते तरी) असतं. वाटेल त्याच्याबरोबर गंमत म्हणून झोपावं अशी ती 'चीप' नसते; तर तिच्या त्या रात्रीविषयीच्या संवेदनांची कदर न करता तिला जेव्हा असं वागवलं जातं तेव्हा तिला आपण 'चीप' झाल्यासारखं वाटतं आणि म्हणून ती दुखावते. याउलट मुन्नाकडून तिला नुसती मदतच मिळत नाही तर मैत्रीची, विश्वासाची उब मिळते. मुन्ना आणि स्वत:तलं वर्गभेदामुळे असणारं अंतर (तिच्या ख्रिश्चन नोकराणीची नापसंती दिसत असतानाही) ती म्हणून कमी करते. तिचं वागणं मनस्वी असतं. ती मुन्नाबरोबर भटकते, पण तिला तो शरीराची भूक भागवण्यापुरता एक भोगवस्तू म्हणून नको असतो. दुसऱ्या विवाहित स्त्रीचं आणि तिचं मुन्नाविषयीचं वागणं एकमेकांशेजारी दाखवूनही हा विरोध जाणवून दिला आहे.

मुन्ना आणि यास्मीनमध्ये प्रेक्षकांची भावनिक गुंतवणूक सहजपणे होते, तशीच परिस्थिती शाय आणि अरुणची या दोघांच्या बाबतींत होते. आपल्याला एरवी दूरची वाटू शकतील अशी ही इतर दोन पात्रंसुद्धा त्यामुळे, म्हणजे आपल्याला भावणाऱ्या व्यक्तींविषयीच्या त्यांच्या या वर्तनानं जवळची वाटू लागतात. कारण आपलं चित्रपट पाहताना जे होतं आहे तेच त्यांचंसुद्धा होताना दिसतं.

असो. चित्रपटातल्या व्यक्तिरेखांचा प्रवास समजला तर चित्रपट ज्यांना आवडला त्यांना तो का आवडला असेल, याचा थोडाबहुत अंदाज करता येईल इतपत मांडणी इथे केली आहे. चित्रपटात हे सगळं असं मांडलेलं पाहताना ते कळायला खूप अवघड आहे असं वाटलं नाही. ज्यांना इराणी सिनेमे आवडतात त्यांना हा चित्रपट आवडायला हरकत नाही असं मला चित्रपट पाहताना वाटलं होतं. आतापर्यंतची चर्चा वाचल्यानंतर अजूनही तसंच वाटतं आहे.

सन्जोप राव's picture

7 Feb 2011 - 7:14 pm | सन्जोप राव

एकुणात ’धोबी घाट’ प्रचंड आवडलेले आणि अजिबात न आवडलेले असे वरील प्रतिसादांचे वर्गीकरण करता येईल. अर्थात "धोबी घाट’ आवडला नाही ना, मग जा तिकडे ’दबंग’ बघायला!" असे कुणी घाऊक वर्गीकरण करुन टाकू नये. वरील लिखाणांत 'लाईफ इन अ मेट्रो' च्या बटबटीतपणा की ढोबळपणाचा उल्लेख आला आहे. त्या तुलनेत 'धोबी घाट' किती संयत , सटल आहे त्याचे उल्लेख आहेत.
महानगरातील ताणतणाव, नातेसंबंधातील हेलकावे, माणसाचा सतत स्वतःशी आणि समाजाशी चाललेला संघर्ष हे सगळेच मला 'ग्रीक' आहे अशातला भाग नाही. या विषयांवर मी थोडेफार वाचले आहे, थोडेफार लिहिले आहे. त्यामुळे माझी भूमिका ही निव्वळ बोचकारु टीकाकाराची नसून आस्वादकाचीच आहे. प्रश्न असा आहे की कलात्मकता आणि अनाकलनीयता यांमधली रेषा कुणी आणि कशी ठरवायची? प्रत्येक गोष्टीत प्रतिके बघायची असे ठरवले तर शर्टावर उडालेल्या चिखलाच्या शिंतोड्यांत कुणाला पिकासोचे पेंटिंग दिसेल. आणि या चित्रपटातील आमीर खानचे पेंटिंग तर मला बिलकुल कळाले नाही. नानू सरंजाम्याची कविता आणि मर्ढेकरांची कविता यातला फरक जाणू शकणारेही ’धोबी घाट’ कंटाळवाणा आहे असे म्हणू शकतील, आणि त्या म्हणण्यात तथ्य असू शकेल, इतकेच माझे म्हणणे.
लेखनसीमा.

वाटाड्या...'s picture

8 Feb 2011 - 3:19 am | वाटाड्या...

प्रतिसाद आवडला...बेसिकली अतिशय संयत...कारण उगाच आगपाखड न करता काय बघायच आणि काय नाही किंवा विरोधाला विरोध कसा चुकीचा किंवा असु नये ह्याचं एक प्रात्यक्षिकच आहे...

तर काका..कलात्मक चित्रपट कसे असतात ह्याचं एक उदाहरण देऊन सांगा ही विनंती...कदाचित ह्या निमीत्ताने तुम्ही म्हणता तसं कलात्मक चित्रपट आणि समजायला अनाकलनीय चित्रपट ह्यामधील धुसर रेषा निट दिसायला मदत होईल...

- (विद्यार्थी) वाट्या

चिंतातुर जंतू's picture

8 Feb 2011 - 10:54 am | चिंतातुर जंतू

प्रत्येक गोष्टीत प्रतिके बघायची असे ठरवले तर शर्टावर उडालेल्या चिखलाच्या शिंतोड्यांत कुणाला पिकासोचे पेंटिंग दिसेल.

मी चित्रपटाविषयी आस्वादक लिखाण करताना उपरोल्लेखित स्वरूपाच्या गोष्टी लिहिणे टाळतो. कारण साध्या सोप्या शब्दांत आणि लोकांना कळेल अशा रीतीने चित्रपटाविषयी लिहिणे शक्य असते असे मी मानतो. माझा अनुभवही तसे सांगतो. 'धोबीघाट'बद्दल लिहितानासुद्धा माझ्या मते मी हे पाळलेले आहे.

इतकेच नव्हे, तर चित्रपटाविषयीची माझी विशेषणेसुद्धा 'प्रचंड आवडलेला' वगैरे नाहीत, तर 'हृद्य', 'शांत', 'तरल', 'अंतर्मुख आणि समृद्ध करण्याच्या शक्यता' किंवा 'अनुकंपा वाटावी अशी पात्रं' अशा शैलीतली आहेत. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात ज्याविषयी सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे असा हा चित्रपट असल्याचा कोणताही दावा माझ्या लिखाणात मी केलेला नाही.

सबब, पुन्हापुन्हा या धाग्यात असे मुद्दे उपस्थित करणे अस्थानी वाटले आहे एवढे इथे नोंदतो. याहून अधिक तपशीलात अशा मुद्द्यांना प्रतिसाद देणे अनावश्यक वाटले हेही नोंदतो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Feb 2011 - 1:15 am | निनाद मुक्काम प...

थोडे अवांतर
मला धोबी घाट आवडला
पण लाइफ इन मेट्रो जास्त मनाला भिडला

निनाद's picture

8 Feb 2011 - 5:04 am | निनाद

चिंतातूर जंतू यांनी सुंदर परिक्षण केले आहे. चित्रपट पाहावासा वाटतो आहे.
मिळाला की नक्की पाहीन. चिंतातूर जंतू यांचे लेखन चित्रपट पाहण्याचा एक नवा आणि वेगळा दृष्टीकोन देते. थोडं अजून खोलातलं विश्लेषणात व्यक्तिरेखांचे तरल पदर उलगडून अजूनच बहार आणली आहे.
एका प्रतिसादातील टीप २: इतर कलाकृतींविषयीच्या आणि सरसकटपणे केलेल्या शेरेबाजीवजा टिप्पण्या धाग्यात उत्तर देण्यासारख्या वाटल्या नाहीत.
हे योग्य ते सांगून जातेच. चिंतातूर जंतूंनी अजून लिहित रहावे अशी विनंती.

वर नंदन आणि मुक्तसुनीत यांनीही नेमक्या शब्दात प्रतिसाद दिला आहे, तो आवडला.

पश्चिम जर्मनीतील निनाद म्हणतात, 'हे सिनेमे पाहताना काही गोष्टी जाणवल्या .
ह्यात रोमहर्षक /चित्तवेधक /आकर्षक ./अद्वितीय असे काहीच घडत नाही .
ह्यात घडते ती सरळ सोपी कथा व नैसर्गिक रित्या अभिनय करणारी (जो अभिनय वाटतच नाही ) पात्रे. मुळात हे सिनेमे इटली /स्पेन ह्या युरोपियन देशातील त्यावेळचे सामाजिक जीवन जसेश्या तसे उभे करायचे .
माल गुडी डेज ह्याच पठडीत मोडले जाईन.'
हे अगदी माझ्या मनातले बोल! यामुळेच बहुदा युरोपीय चित्रपट पाहण्याची गोडी लागत गेली.
तसेच इंद्रराज पवार यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत आहेच.

भारतीय चित्रपट क्षेत्रात प्रमुख (मेनस्ट्रीम) अभिनेते घेऊन असे वेगळे प्रयोग होत आहेत हे पाहून खुप आनंद वाटतो आहे.