यावेळी दलिया जरा जास्तच आणला गेला. दलियाची खिचडी घरात कोणाला विशेष आवडत नाही. आणि गोड तरी किती करून खाणार. म्हणुन जालावर दलियाच्या रेसिपी शोधताना दलिया इडली सापडली. दोन तीन ठिकाणच्या रेसिपी एकत्र करून तयार झालेली ही दलिया इडली ! ज्यांना तांदूळ कमी खायचा आहे किंवा चालतच नाही अशा खवैय्यांसाठी ही एक मस्त रेसिपी आहे. ट्राय करा !
सामग्री :
१ कप दलिया
अर्धा कप उडीद किंवा मुगाची डाळ
१०-१२ मेथी दाणे
अर्धा कप दही
जिरे मोहरी, कढीपत्ता, हिंग, तेल वगैरे फोडणीचे साहित्य
१ मोठा चमचा चणा डाळ
अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा
मीठ
दलिया आणि डाळ ७-८ तास वेगवेगळे भिजत घाला. दलियामध्ये भिजवताना भरपूर पाणी घाला. कारण ते जास्त शोषले जाते. मेथी दाणेही भिजत घाला.
मग एकत्र वाटून घ्या. साधारण नेहमीचे इडलीचे पीठ असते तेवढे बारीक नि पातळ मिश्रण तयार करून घ्या.
एका कढईत तेल तापवून जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग नि चणा डाळ घालून फोडणी तयार करा. ती वरच्या मिश्रणात मिसळा.
आता त्यात दही, मीठ आणि खायचा सोडा घाला. चांगले फेटून घ्या. इडलीपात्राला तेलाचा हात लावुन त्याच्या इडल्या लावा. १५ मि इडल्या वाफवुन झाल्या की इडलीपात्र न उघडता तसेच बाजूला ठेवा. त्या इडल्या गार झाल्यावर काढायला जास्त सोप्या जातात.
मग गरम गरम सांबार आणि चटणीसोबत खायला घ्या.
इडली केली की आई दोसा पण करते याची सवय असल्याने लेकीने आजही दोशाचा हट्ट धरला. मग काय ! याच पिठाचा मस्त दोसा तयार झाला.
दलियाच्या इडल्या तांदळाच्या इडल्यांएवढ्या फुगत नाहीत आणि गरम खाणार असाल तर थोड्या चिकट पण वाटतात.
फर्मेंट करण्यासाठीचा वेळ यात वाचतो.
या प्रमाणात साधारण मध्यम आकाराच्या २०-२२ इडल्या होतात.
प्रतिक्रिया
1 Feb 2011 - 1:33 am | रेवती
वेगळीच पाकृ आहे.
इडली सांबाराचा फोटू भारी आलाय.
सध्या आमच्याकडच्या थंडीमुळे इडलीचे पीठ नीट फर्मेंट होत नाहीये.
दोश्याचा फोटूही चांगला आलाय.
चव माहीत नसल्याने त्याबद्दल काय सांगणार?;)
1 Feb 2011 - 1:56 am | धनंजय
पौष्टिक आहेच, आणि सजावट पण छानच.
1 Feb 2011 - 11:09 am | सहज
पौष्टिक आहार!
इडल्या अंमळ उप्पीटसदृश दिसत असल्याने बाद, डोसा कम घावन पर्याय आवडला.
1 Feb 2011 - 8:45 pm | सखी
पौष्टिक आहेच आणि जरा वेगळा प्रकारही आहे. नक्की करुन बघेन. स्वाती म्हणाली तसे खीरही बरेच दिवसांपासुन करायची आहे :)
1 Feb 2011 - 3:44 am | प्राजु
वा! प्रकार नविन दिसतो आहे.
1 Feb 2011 - 4:09 am | शुचि
ए काय ग असे फोटो टाकतेस? :(
दक्षीण भारतीय खाणे म्हणजे ...... आय सिंप्ली कॅनॉट रेझिस्ट!!!!
1 Feb 2011 - 9:06 am | चिंतामणी
सकाळी सकाळी असे भन्नाट फोटो टाकुन आमची भूक वाढवल्याबद्दल निषेध.
बाकी रेसिपी ट्राय करून बघीतली पाहीजे.
1 Feb 2011 - 9:43 am | निवेदिता-ताई
मस्त आहे नविन प्रकार...
रेवती.............
सध्या आमच्याकडच्या थंडीमुळे इडलीचे पीठ नीट फर्मेंट होत नाहीये.
अग पुर्ण एक दिवस भिजवावे ईडली पिठ...म्हणजे छान फर्मेंट होते....
1 Feb 2011 - 6:58 pm | रेवती
पीठ वाटून अव्हनमध्ये ठेवते आणि अव्हनचा फक्त लाईट चालू ठेवते.
त्यामुळे अव्हन किंचित उबदार होतो.
यावेळी काही उपयोग झाला नाही. काल -११फॅ तापमान होते.
याशिवाय अर्धा कांदा कापून पिठात बुडवून ठेवायचे. त्याचाही काही उपयोग नाही झाला.
शिवाय घरही उबदार असतेच. इडल्यांची 'पत्रिका' बघायला हवी.;)
1 Feb 2011 - 8:39 pm | मितान
रेवतीतै, या दलियाच्या इडल्यांना पीठ फर्मेंट होण्याची गरज नाही. वाटून झाले की लगेच करता येतात.
बाकी नेहमीच्या इडल्या करायच्या असल्या की मी पीठ वाटून झाल्यावर त्यावर एक प्लास्टिक टाकुन बाहेर थंडीत घालायचे ओव्हरकोट स्टँडऐवजी या भांड्यावर रात्रभर टाकुन ठेवते ;) मस्त फुगते पीठ !
1 Feb 2011 - 10:18 am | मुलूखावेगळी
छान आहे नवा प्रकार
करुन बघते
पन आता आज इडली खावी लागेल त्यचे काय?
1 Feb 2011 - 10:38 am | स्वाती दिनेश
मस्त दिसत आहेत, नवी पाकृ..
दलियाची गूळ,नारळाचे दूध घालून केलेली खीर म्हणजे विकपॉइंट..खूप म्हणजे, खूपच दिवसात केली नाहीये.. आता तू आठवण करुन दिलीच आहेस तर.. :)
स्वाती
1 Feb 2011 - 10:40 am | डावखुरा
फोटो काढुन ठेवा आणि लगेच येउ द्या मिपा वर....
खाद्यलालसा...
1 Feb 2011 - 10:38 am | डावखुरा
मितान एक नवीन प्रकार जिभेसाठी सादर केल्याबद्दल आभार...
बाकी आत्ताच आवडीचा नाष्टा झाला नाहीतर मीही चिंतुकाकाशी सहमत ह्या कॅटेगरीत मोडलो असतो.. ;)
1 Feb 2011 - 2:06 pm | आजानुकर्ण
ती लालसा की तो लाल-सा?
2 Feb 2011 - 12:39 am | चिंतामणी
लालसा भौ. अजून तु सं.मं.ला व्यनी केलेला दिसत नाही. :(
1 Feb 2011 - 10:57 am | कच्ची कैरी
करुन बघायला हरकत नाही छान वाटतेय ईडली .
1 Feb 2011 - 11:50 am | पर्नल नेने मराठे
मितान सुरेख ग !!! भुक लागली बघ आता.
1 Feb 2011 - 1:19 pm | गणपा
सहमत.
कुठे सकळी सकाळी हा धागा उघडायची दुर्बुद्धी झाली.
1 Feb 2011 - 1:24 pm | स्पा
एकदम झाकास्स
1 Feb 2011 - 1:57 pm | परिकथेतील राजकुमार
ख ल्ला स !!
फोटु + वर्णन = इमोशनल अत्याचार :(
1 Feb 2011 - 2:32 pm | धमाल मुलगा
व्वा!
कधी येऊ हादडायला? :)
1 Feb 2011 - 2:32 pm | माझीही शॅम्पेन
बोले तो सोल्लड ! :)
1 Feb 2011 - 8:54 pm | सूड
फोटो वैगरे मस्तच !! पण दलिया म्हंजे काय ???
2 Feb 2011 - 12:43 am | चिंतामणी
:-S
:-&
8-|
:-q
2 Feb 2011 - 11:01 am | सूड
अस्सं होय !! पण ह्याच्या कशा करणार इड्ल्या ??
2 Feb 2011 - 12:47 pm | मितान
सु दे,
दलिया म्हणजे गव्हाचा जाड रवा, कण्या, यालाच ' ब्रोकन व्हीट ' असेही म्हणतात. त्याची खीर, शिरा, उप्पीट, खिचडी असे बरेच प्रकार करता येतात. पौष्टीक असतो दलिया.
1 Feb 2011 - 10:48 pm | ५० फक्त
मितान, इडली म्ह़णजे मी आणि माझा लेक दोघेही कधीही तयार असतो अगदी पोटभर जेवुन सुद्धा, त्यामु़ळे आवडेश.
आमच्या घरी इडली हा पदार्थ सकाळ ९ ते रात्री ९ असा फुल डे मेन्यु असतो, त्या दिवशी लागली भुक घाल इड्ली आणि खा. आणि जर चुकुन इडल्या उरल्याच तर दुस-या दिवशी इडली फ्राय आहेच.
हर्षद.