आमच्या त्सेंटा आजीला आता तुम्ही सगळे ओळखताच, मागच्या आठवड्यात तिने एका पुस्तकात ही रेशिपी वाचली आणि हे करुन पाहूच या असा धोशा लावला. ह्या वयातला तिचा उत्साह पाहून मी आणि आकिम आजोबा पण मदतीला लागलो.केक करताना तिने तिच्या ४० वर्षांच्या अनुभवातून जे बदल केले त्यामुळे तर केक उत्कृष्ट होण्यास मदतच झाली. अर्थातच केक अफाट, अफलातून इ. इ. झाला होता हे वेगळे सांगायला नकोच.
तेव्हा ही घ्या पाककृती:
साहित्य-१) पाक करुन घेण्यासाठी- ४ टेबल स्पून मध, ४ टेबल स्पून पाणी, टिन्ड अननसातला ३ टेबल स्पून पाक
२)बेससाठी- २५० ग्राम बटर, १५० ग्राम साखर, ५० ग्राम मध, १/२ चहाचा चमचा संत्र्याची किसलेली साले , २५० ग्राम मैदा, ५ अंडी, १५० ग्राम बदाम पावडर, पाव कप अननसाचा रस. तो नसेल तर ऑरेंज ज्यूस. ४ च. चमचे बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ, टिनमधील अननसाच्या चकत्या.
कृती-टिनमधील अननस चाळणीवर टाकून कोरडा करुन घ्या. पाकासाठीचे सर्व साहित्य म्हणजे मध, अननसाचा पाक आणि पाणी एकत्र करुन दाट करा व वेगळे ठेवून द्या.
प्रत्येक अंडे वेगळे फेटून घ्या आणि एका वाडग्यात जमा करा.
बटर भरपूर फेटा.साखर घालून फेटा, चिमूटभर मीठ आणि संत्र्याची किसलेली साले व ५० ग्राम मध घाला आणि फेटा.
ह्या मिश्रणात फेटलेली अंडी घाला आणि परत एकदा भरपूर फेटा.
मैदा+ बेकिंग पावडर+ बदाम पावडर एकत्र करा व ती वरील मिश्रणात घालून थोडे फेटून मिश्रण एकसारखे करा. आता यात अननसाचा किवा संत्र्याचा रस घाला.
टिनमधील अननस चकत्या केकमोल्डच्या तळाशी लावा, चकत्यांमधील भोकांत व उरलेल्या जागेत करुन ठेवलेला पाक घाला. ह्यावर केकचे मिश्रण पसरा.
१७० अंश से. वर अवन प्रिहिट करुन घ्या
१७० अंश से वर ६० ते ७० मिनिटे बेक करा.
केक झाला की नाही ते नेहमीप्रमाणेच विणायची सुई किवा सुरी खुपसून पहा.
अवनचे दार उघडून केक अवन मध्ये तसाच पाच मिनिटे ठेवा, नंतर बाहेर काढून अजून ५ मिनिटे तसाच ठेवा.
आता केक जाळीवर उलटा करुन काढा. म्हणजेच खालचा भाग वर येईल आणि अननस चकत्या पृष्ठभागावर राहतील.
केक पूर्ण थंड झाला की कापा आणि कापताना एका तुकड्यावर अननसाची अर्धी चकती येईल असे पहा.
व्हिप्ड क्रिम घालून खा.(आपण फारच हेवी खातो आहोत असे वाटले तर अपराधीपणाची भावना घालवण्यासाठी नंतर तासभर पळायला जा.)
प्रतिक्रिया
25 Jan 2011 - 3:40 pm | टारझन
आईच्यान .. !! खरा सुड उगवलाय !! आता माँजेनिज मधले ब्लॅक फॉरेस्ट न पायनॅपल केकही एवढे सुंदर दिसत नाहीत !!
खरोखर वाटीभर लाळ गळाली ..
आम्ही आपलं कँटिण च्या ब्लॅकफॉरेस्ट वर भागवुन घेऊ ..
-(अॅसिडिटी ग्रस्त) टार्झनो
25 Jan 2011 - 3:45 pm | मी_ओंकार
खतरनाक जीवघेणा फोटो.
25 Jan 2011 - 3:59 pm | परिकथेतील राजकुमार
अगदी अगदी !
फोटो पाहिला आणि निजधामाला पोचलो. खालचे काही वाचले नाही.
25 Jan 2011 - 3:48 pm | प्राजक्ता पवार
झक्कास . या विकांताचा मेनु :)
25 Jan 2011 - 3:55 pm | कच्ची कैरी
मिपापे ये तुमने कैसा केक डाला फोटोने इसके मुझे मार डाला ,मार डाला .
खरच खूपच मस्त!!!!!
25 Jan 2011 - 4:23 pm | मृत्युन्जय
हा आयडी बॅन करा राव. (आणि लगोलग त्या गणपाचा पण बॅन करा). काय कटकट आहे. सामनामधले लेख वाचा मग इथे पण वाचा. नाहीच पहायचे असा निश्चय करुन देखील मोह होणार. मग गोड पदार्थ पाहुन पण जळजळ होणार. छ्या हे काही खरे नाही. त्यामुळे यावेळेस ठरवुन मी फोटो नाही बघितले रेसिपी नाही वाचली. त्यामुळे मला त्या केकवरच्या ८ अननसाच्या फोडी पण नाही दिसल्या आणि तो पुर्ण केक तर नाहीच नाही दिसला. त्यामुळे तोंडाला पाणी सुटले, भुक चाळवली असे म्हणायला पण वाव नाही.
25 Jan 2011 - 5:05 pm | मेघवेडा
पैल्यांदा सांगावंसं वाटतंय की कृपया पाकृसोबत फोटो देणं बंद करावे!
खपलो!
26 Jan 2011 - 9:06 am | नंदन
मेव्याशी सहमत आहे. (शीर्षक वाचूनच धागा उघडायचा धीर होत नव्हता ;)). पाकृ तर भन्नाटच, पण फोटो पाहूनच खपलो. इथल्या कट्ट्याला हादडलेला पाईनॅप्पल केक आठवून अं. ह. झालो :D
25 Jan 2011 - 7:01 pm | रेवती
अगं, हा तर 'अप साईड डाऊन' केक!
मस्त दिसतोय. नेहमीपेक्षा मोठा केलाय का?
पाकृही छान आहे. मी कधी नाही करून बघितला पण ग्रोसरीतल्या बेकरी विभागात दिसतात हे केक.
ते इतके चांगले दिसत नाहीत. हा शोभिवंत दिसतोय. कापताना वाईट वाटले असेल.;)
25 Jan 2011 - 7:27 pm | स्वाती दिनेश
पाइनॅपल अपसाइड डाउन च्या अनेक रेसिप्या आहेत त्यातील ही एक.. मध आणि बदाम पावडर घालून केलेली..
खूप खरपूस आणि सुंदर लागतो, मधाचा वेगळाच फ्लेवर येतो.
जर्मन केक किंचित अगोड असतात, भारतीयांना कदाचित थोडी जास्त साखर चालेल..
केक कापताना वाईट तर वाटलेच, संपल्यावर अजून वाईट वाटले,:)
स्वाती
25 Jan 2011 - 9:16 pm | प्राजु
आई ग!!!
स्वातीताईला किडनॅक करून आणावे इकडे मँचेस्टर ला. :)
जहबहर्या!! :)
25 Jan 2011 - 9:37 pm | मुलूखावेगळी
फोटो १दम झकास्स्स्स्स्स्स्स्स
केक मस्त अप्रतीम असनारच
करुन बघेल आता लवकरच
25 Jan 2011 - 10:16 pm | वहिनी
छा न आ हे ?
25 Jan 2011 - 10:47 pm | मराठे
स्सही ! पायनॅप्पल अपसाईड डाउन केक मस्त..! !!
25 Jan 2011 - 11:01 pm | यशोधरा
अहा, स्सही !
26 Jan 2011 - 12:28 am | सद्दाम हुसैन
खुप छान आहे केक.
26 Jan 2011 - 12:44 am | सखी
पाइनॅपल अपसाइड डाउन केक माझाही आवडता. फोटु मस्तच दिसतोय स्वाती, आणि क्रमवार मार्गदर्शनही छान.
त्या फोर्कने पटकन एक तुकडा पळवता आला तर?
26 Jan 2011 - 8:16 am | स्पंदना
केक अपसाइड डाउन असो वा नसो मला मात्र 'अपसाइड डाउन ' होउन (उपड पडुन) खावासा वाटतोय.
27 Jan 2011 - 8:05 am | ५० फक्त
आय्ला लई भारी एक, आम्ही लहानपणी सत्यनारायणाच्या प्रसादाच्या मुदित खाली एक मनुका ठेवुन त्यावर शिरा भरायचो त्याची आठवण झाली,
अतिशय छान केक, एक मदत पाहिजे - तुम्ही ओवनची जी सेटिंग देत आहात ती मायक्रोव्हेव ओवनला पण चालतिल का ?
27 Jan 2011 - 11:13 am | स्वाती दिनेश
साध्या मायक्रोवेव मध्ये जर केक करायचाच असेल तर साधारण ४ ते ५ मिनिटे लागतात,कमी जास्त वॅटेजप्रमाणे.परंतु त्याला ब्राऊनिंग येत नाही आणि कधी कधी केक आतून होतो पण बाहेरुन सॉगी रहातो.(वाफ धरल्यामुळे)
मी स्वत: केक मायक्रोवेव मध्ये करणं प्रेफर करत नाही. मायक्रोवेव+कन्वेक्शन असेल तर गोष्ट निराळी..
मायक्रोवेव + कनव्हेक्शन असेल तर कन्वेक्शन मोड वर ठेवून साध्या अवन प्रमाणे वापरा.म्हणजेच साध्या अवन मध्ये जितका वेळ लागतो साधारण तितकाच वेळ त्यातही लागतो आणि केक उत्तम होतो, हे मी स्वतः करून पाहिले आहे.
स्वाती
27 Jan 2011 - 4:46 pm | स्वाती दिनेश
खवय्यांनो, सर्वांना धन्यवाद.
(मेव्या आणि नंदन, पुढची केकृ बिनाफोटोची आहे.. ;) )
स्वाती