फॅमिली फिक्शन - सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
19 Jan 2011 - 6:01 pm
गाभा: 

सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचं प्रदर्शन सध्या मुंबईत भरलेलं आहे. भारतीय कुटुंबव्यवस्थेतले काही समकालीन पैलू यात दिसतात. त्याचा थोडक्यात परिचय या लेखात करून दिलेला आहे.

नागरी जाणिवा व्यक्त करणारी ठाशीव व्यक्तिचित्रणं आणि समकालीन शहरी भूभाग निराळ्या नजरेतून दाखवणारे देखावे अशा गोष्टींसाठी मुंबईचे चित्रकार सुधीर पटवर्धन विख्यात आहेत. त्यांच्या नव्या चित्रांमध्ये ही वैशिष्ट्यं दिसतातच, पण शिवाय काही वेगळ्या जाणिवा उठून दिसतात.

Family Fiction - Sudhir Patwardhan

अनेक चित्रांत खिडक्या आणि त्याच्या आसपास माणसं दिसतात. कधी ती माणसं आत राहून बाहेरचं दृश्य पाहताना दिसतात, तर कधी बाहेर दिसणारं दृश्यच दिसत राहतं.

Family Fiction - Sudhir Patwardhan

बाहेरचं दृश्य पाहणाऱ्या नजरेत काहीशी हुरहूर जाणवते. कदाचित ती जाणाऱ्या माणसाविषयी असेल, कदाचित गेलेल्या दिवसांविषयी असेल. ते स्मरणरंजन वाटत नाही एवढं मात्र खरं.

काही चित्रांमध्ये बाहेरचं दृश्य आपल्याला दिसतं पण चित्रातल्या व्यक्तीला काही वेगळंच दिसत/जाणवत असतं.

Family fiction - Sudhir Patwardhan

झोपेत जी स्वप्नं दिसतात त्यांत आपल्या सुप्त इच्छा, स्मृती आणि जाणिवा यांचं अजब मिश्रण झालेलं असतं. यातूनही कशाचीतरी हुरहूर पण स्मरणरंजनाचा अभाव जाणवतात.

'पूर्ण वर्तुळ' या चित्रात काहीतरी वेगळी जाणीव होते.
Full Circle - Sudhir Patwardhan

आजारपण, त्यानं ग्रासलेलं घर, व्यक्तींमध्ये आलेला दुरावा किंवा संवादाचा अभाव अशा साध्या नित्यानेमाच्या, कुणाला न टळलेल्या गोष्टी चित्रकाराला वेगळ्या पध्दतीनं पकडता येतात.

'फॅमिली फिक्शन' या चित्रात कुटुंबाचा वेगळा पैलू दिसतो.
Family Fiction - Sudhir Patwardhan

'पल्प फिक्शन' या गाजलेल्या चित्रपटातल्या प्रतिमा वापरून कुटुंब आणि टीव्ही यांचं अनोखं, अपरिहार्य पण विचित्र नातं दाखवलं आहे असं दिसतं. यातही कष्ट करून थकलेल्या एका बाईचा एक निर्बुध्द कंटाळा, घरातल्या थोरल्या मुलाचा एक काहीसा त्रासिक कंटाळा आणि या सर्वावर उपाय म्हणून हिंसक अ‍ॅक्शन घरबसल्या पाहत राहणं दिसतं. त्यातला उदास सूर विलक्षण आहे. आपल्यात रमलेलं लहान मूल आणि आजोबा दोघांची पाठ असणं यातही एक विसंवाद, एकटेपण जाणवतं.

इतर चित्रांमध्येही अनेक वेगवेगळे पैलू दिसतात - कधी मुलगी आणि आई (किंवा सून आणि सासू) घराच्या बाल्कनीत एका भावविभोर मुद्रेत दिसतात, तर कधी बाळ नातवाच्या आगमनानंतर आजी-आजोबा काहीसे बाजूला राहून आपल्या मुला-सुनेला नवीन जिवात गुंगलेले पाहताना दिसतात. कधी वृध्द नवरा-बायको एकमेकांशी भांडताना दिसतात, तर कधी मुरलेल्या लोणच्याप्रमाणे ते सहजीवन जगत असावेत असं वाटतं. याशिवाय 'जॉगर', 'इमिग्रंट'सारख्या व्यक्तिचित्रांमध्ये कुटुंबाबाहेरच्या नागर व्यक्ती दिसतात.

समकालीन आशय व्यक्त करण्यासाठी चित्रकाराने साध्या, नेहमीच्या, परिचित गोष्टींचा आधार घेतला आहे. त्यामुळे चित्रकलेत विशेष गती नसतानाही सहज आस्वाद घेता येतील अशा या कलाकृती आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर प्रदर्शनाला भेट द्यावी अशी शिफारस करेन.

प्रदर्शन २७ जानेवारीपर्यंत आहे. वेळः सकाळी १० ते संध्याकाळी ६
स्थळः साक्षी गॅलरी, तन्ना हाऊस, नाथालाल पारेख मार्ग, कुलाबा
(रीगल सिनेमाजवळ; सहकार भंडार आणि कॅम्पिअन स्कूल यांच्या मध्ये)
संपर्कः साक्षी गॅलरी

प्रतिक्रिया

रामदास's picture

19 Jan 2011 - 7:44 pm | रामदास

डॉ.सुधीर पटवर्धनांना भेटण्याचा योग आला होता. त्यांना मी एक सिनीअर रेडीऑलॉजीस्ट म्हणून ओळखत होतो. त्यावेळी बोलण्याच्या ओघात त्यांनी प्रदर्शनाचा उल्लेख केला होता. मी त्यांना मिपाची माहीती देऊन लिहीण्याची विनंती केली होती.
चिंतातूरजंतूंनी एक सुरेख परीक्षण लिहीले आहे .(अर्थात ते नेहेमीच परीक्षणे चांगली लिहीतात,दाद द्यायची राहून जाते.)मला ह्या चित्रांपैकी फुल सर्कल आवडले.केर काढणार्‍या बाईचा फाटलेला भांग ,बाई केरवारे करते आहे म्हणून दारात थांबलेल्या कुणाचातरी हात , हातात रीमोट घेऊन थकलेला म्हातारा आणि खिशात हात घातलेला तरुण ...एकेका कॅरेक्टरला जिवंत करून चित्रकारानी समोर ठेवले आहे.
जंतूसाहेब धन्यवाद.

टारझन's picture

19 Jan 2011 - 7:53 pm | टारझन

अल्टि !! हेवा वाटला :)

आत्मशून्य's picture

19 Jan 2011 - 8:28 pm | आत्मशून्य

पण मी जाणकार नसल्याने त्याचे कलात्मक मूल्य वगैरेबाबत फार बोलू शकणार नाही , म्हणून माझ्या कूवतीनूसारच मत व्यक्त करतो.

शेवटचे चीत्र पाहताना खरच ऊमा थर्मनच प्रथम आठवली आणी तेव्हड्यात लगेच खाली ओळ वाचली" 'पल्प फिक्शन' या गाजलेल्या चित्रपटातल्या प्रतिमा वापरून ..........." तसे वरून दूसरे चीत्र पाहताना फर्स्ट पर्सन शूटर गेम मधे आहोत असे वाटले. बाकी चीत्रे छानच.

मुलूखावेगळी's picture

19 Jan 2011 - 9:42 pm | मुलूखावेगळी

खुप छान आणि वेगळीच चित्रे आहेत.

धन्यवाद जन्तु शेअर केल्याबदद्ल.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2011 - 9:45 pm | बिपिन कार्यकर्ते

छानच! चित्रकला कोणीतरी समजावून दिल्याशिवाय कळत नाही! :(

सहज's picture

20 Jan 2011 - 9:59 am | सहज

चिंतातूर जंतू यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.

अडगळ's picture

19 Jan 2011 - 9:46 pm | अडगळ

शेवटचे चित्र जाम भारी आहे. म्हणजे हे प्रतिमांची रचना या अर्थाने समजले. (दृश्य कलांबाबत घोर अज्ञानी आहे)बिनचेहर्‍याचा व्हेगा , काचेतला बुद्धाचा चेहरा आणि काचेवरचे आजोबांच्या चेहर्‍याचे प्रतिबिंब हे खास. त्या गृहिणीच्या साडीची रंगसंगती अशी आहे की कानात ते ढ्यँगचिक पार्श्वसंगीत वाजू लागले.
या चित्रांची आणि चित्रकाराची करुन दिलेली ओळख आवडली .अनेक धन्यवाद.

मुक्तसुनीत's picture

19 Jan 2011 - 10:02 pm | मुक्तसुनीत

शेवटच्या चित्रातली पलंगावरची स्त्री उमा थुर्मन आहे असे वाटतेय ! :-)

अडगळ's picture

19 Jan 2011 - 10:22 pm | अडगळ

मिया.

धनंजय's picture

19 Jan 2011 - 10:29 pm | धनंजय

अगदी-अगदी!

मेघवेडा's picture

24 Jan 2011 - 7:17 pm | मेघवेडा

म्हणूनच त्या चित्राला 'फॅमिली फिक्शन' असं नाव दिलं असावं!

धनंजय's picture

19 Jan 2011 - 10:27 pm | धनंजय

चित्रप्रदर्शनाबद्द्दल माहिती आवडली. चित्रेसुद्धा लक्षणीय.

शेवटच्या दोन चित्रांतल्या "समूहात एकलकोंड्या" चेहर्‍या मोहर्‍यांनी एडवर्ड हॉपरच्या चित्रांची आठवण आली.

(नाईटहॉक्स)
(हे चित्र भले मोठे आहे, आणि चेहर्‍यांवरती भाव चितारलेले आहेत, पण येथे कदाचित दिसत नसेल.

किंवा इथे दोघे इतके जवळ असून एकटे (ऑफिस नाइट):

शिवाय खिडकीतून दृश्य दाखवण्याची लकब, बाहेरील इमारतींची छते दाखवण्याची लकब बघूनही हॉपरची आठवण झाली.

प्राजु's picture

19 Jan 2011 - 10:31 pm | प्राजु

सुपर्ब!!

चिंतातुर जंतू's picture

20 Jan 2011 - 9:54 am | चिंतातुर जंतू

प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद. पटवर्धन बरीच वर्षं ठाणे-कल्याण परिसरात वैद्यकीय व्यवसाय करत होते. त्या काळातली त्यांची उल्हासनगर परिसरातली चित्रं गाजली होती. निसर्गचित्र म्हणताच लोकांना जे रम्य देखावे डोळ्यासमोर येतात त्याहून वेगळी, झपाट्याने नागरीकरण होणार्‍या भूभागाची अवहेलना आणि अवकळा दाखवणारी अशी काही चित्रं त्यात होती.

Town - Sudhir Patwardhan

Pokharan - Sudhir Patwardhan

Ulhasnagar - Sudhir Patwardhan

एडवर्ड हॉपरः ठळक, ठाशीव रंग आणि सुस्पष्ट रेखाटनांद्वारे नागरी एकटेपणा आणि हुरहूर दाखवण्याच्या बाबतीत पटवर्धन आणि हॉपर यांच्यात नक्कीच साम्य आहे. पटवर्धन त्या संवेदना खास भारतीय पध्दतीनं मांडतात. त्यांचे रंगही त्यानुसार बदलतात. त्यांची काही व्यक्तिचित्रणं मात्र पिकासोची आठवण करून देतात, तर काही फटकारे व्हॅन गॉघसारखे आहेत. प्रदर्शनातल्या इतर काही चित्रांत हे अधिक जाणवतं, पण त्या प्रतिमा जालावर सापडल्या नाहीत म्हणून लेखात देता आल्या नाहीत.

त्यांची इतर काही जुनी चित्रं या दुव्यावर पाहता येतील.

एक छोटीशी दुरुस्ती: 'पल्प फिक्शन'मधल्या त्या गाजलेल्या दृश्यात उमा थर्मन नसून मारिआ द मेदेरोस आहे. नुकत्याच पार पडलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'हिटलर इन हॉलिवूड' या गमतीशीर चित्रपटात ती पुन्हा दिसली होती. संदर्भासाठी हा दुवा पहावा.

मी_ओंकार's picture

20 Jan 2011 - 10:45 pm | मी_ओंकार

अर्थात इथे अवांतर :

पोस्टर मध्ये उमा थ्र्मन आहे. तुम्ही दिलेला दुवा हॉटेलच्या सीनचा आहे तिथे पोस्टर मधले चित्र वापरले आहे. चित्रपटात पोस्टर वरील दृश्य नाही. संदर्भ विकी.
http://en.wikipedia.org/wiki/Pulp_Fiction_(film)

यात कास्ट मध्ये त्याचा उल्लेख आहे

( पल्प फिक्शन काळजाच्या जवळचा चित्रपट असल्याने लिहीले)

त्याच मुळे फॅमिली फिक्शन हे चित्र जबरदस्त आवडले. बाकी चित्रंही छान. तुम्ही म्हणता तसे हुरहुर लावणारे नक्की आहे त्यात. याच धर्तीवर जर सध्याच्या आयटी आणि सॉफ्टवेअर मधल्या ऑफिसचे चित्र कसे असेल असाही विचार मनात डोकावला.

चित्रांबद्दल आणि लेखाबद्दल आभार.

- ओंकार.

स्वानन्द's picture

20 Jan 2011 - 10:07 am | स्वानन्द

मूळ धाग्यात दिलेली चित्रे फारशी आवडली नाहीत. प्रमाणब्द्ध वाटत नाहीत. शिवाय गिचमिडाट फार वाटतो.

त्यामानाने प्रतीसादात आलेली चित्रे जरा बरी वाटली. धनंजय यांनी दिलेली चित्रे जास्त आवडली. बाकी ती हुरहुर वगैरे काही झेपलं नाही. कदाचित मला त्यातली जाण नसेल. असो.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Jan 2011 - 10:16 am | llपुण्याचे पेशवेll

+१
चित्रे आणि त्याचे स्पष्टीकरण पटले नाही. किंवा ते भाव तसे जाणवले नाहीत चित्रात.
धनंजय यांनी डकवलेले दुसरे चित्र मात्र विलक्षण बोलके वाटते.

चिंतातुर जंतू's picture

20 Jan 2011 - 2:28 pm | चिंतातुर जंतू

चित्रं आवडली नाहीत अशा काही प्रतिक्रिया आल्या त्यावर काही भाष्य करणं योग्य होणार नाही कारण आवड-निवड व्यक्तिसापेक्ष असते. चित्रातले भाव (एकटेपणा, हुरहूर, संवादाचा अभाव वगैरे) यांविषयी थोडक्यात विवेचन -

खिडकीतून पाहणार्‍या माणसांच्या बाबतीत: पाहणार्‍यांचे चेहरे दिसत नाहीत. एकाची पाठ दिसते. त्या चित्रात बाहेरून दिसणारं दृश्य बकाल शहरातल्या चाळीचं आहे. चित्राची रंगसंगती प्रसन्न नाही; काळपट अंधारी आणि विटकी आहे. या सर्वांतून उदास भाव जाणवतात. पाहणारा मनुष्य वृध्द असल्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळची खिन्न हुरहूर त्यात जाणवते. दुसर्‍या चित्रात पाहणार्‍या माणसाचं शरीरही न दिसता नुसते खिडकीवर रेललेले हात दिसतात. बाहेरच्या दृश्याला अधिक उठाव देत असतानाच चित्रकाराने निव्वळ ते दृश्य न दाखवता रेललेले हात दाखवल्यामुळे यात आतलं वास्तव सोडून बाहेरच्या दृश्यात धाव घेण्याची आस, पण जाता येत नाही याची खंत जाणवते. ही काहीशी तुरुंगासारखी एक स्थिती वाटते. बाहेरच्या दृश्यात दिसणार्‍या व्यक्तीशी ही हुरहूर आणि खंत निगडीत असावी असं वाटतं (उदा: माहेरपणाला आलेली मुलगी परत जाते आहे). पाहणारी व्यक्ती आणि रिक्षात बसणारी व्यक्ती यांच्यात नजरानजर नाही (टाटा करणं, स्मित वगैरे) त्यामुळे मुलगी घरी यावी अशी केवळ इच्छा आहे आणि परक्या व्यक्तीस पाहून ती होते आहे अशीही एक शक्यता आहे. अशा शक्यतांमध्येही पुन्हा जे हवं आहे ते आपल्यापाशी नाही अशी खंत आहे. चित्रातले काळपट रंग आणि हिरवी साडी - गोरा वर्ण यांचा त्याला असणारा किंचित अपवाद ही आस/खंत गहिरी करतात. ज्याची आस आहे ते लक्षवेधी आहे पण ते दूर जाणारं आहे; आतलं आणि खिडकीबाहेरचं नित्याचं वास्तव काळपट आहे.

'पूर्ण वर्तुळ' चित्रातही खिडकीबाहेरचा प्रकाश आणि खिडकीवरची नक्षी या त्यातल्या त्यात प्रसन्न गोष्टी आहेत. दृश्याकडे पाठ करून खिडकीकडे पाहणार्‍या स्त्रीच्या मनात 'हे आजारपण संपून नित्याचं आयुष्य सुरू व्हावं अशी आस त्यामुळे जाणवते. या चित्रातली गिचमिड ही हेतुपुरस्सर आहे. सर्व घर आजारी माणसाभोवती फिरतं आहे यात एक घुसमट आहे. ती जाणवावी यासाठीची ती गच्च रचना आहे.

'फॅमिली फिक्शन'मधली गच्च रचना ही घरातल्या खिन्न वास्तवातली पोकळी टीव्हीद्वारे येणारा अवास्तव आणि हिंसक गदारोळ भरून काढतो आहे असं सुचवते आहे. दोन्ही चित्रांमध्ये इतकी माणसं असूनही कुणीच एकमेकांकडे पाहत नाही ही रचना संवादाचा अभाव सुचवते. ते समोर प्रेक्षकांकडेही पाहत नाहीत. ते स्वतःत आणि स्वतःच्या खिन्नतेतच दंग आहेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Jan 2011 - 3:34 pm | llपुण्याचे पेशवेll

धन्यवाद. चित्र १ व २ चे विवेचन आता वाचल्यावर त्यातले गहिरे रंग जाणवले. पुर्ण वर्तुळ ठीक वाटले. फॅमिली फिक्षन मात्र पटले नाही अजून. म्हणजे त्यात संवादाचा अभाव असेलच असे जाणवत नाही. उलट आपली कामे आटोपल्यावर जो तो विरंगुळा म्हणून आपापल्या दुनियेत मश्गुल आहे असे वाटले.
पुनश्च धन्यवाद.

अमोल केळकर's picture

20 Jan 2011 - 4:08 pm | अमोल केळकर

लेखातील तसेच प्रतिसादातील सर्व चित्रे आवडली

अमोल केळकर

चिंतातुर जंतू's picture

20 Jan 2011 - 7:27 pm | चिंतातुर जंतू

फॅमिली फिक्षन मात्र पटले नाही अजून. म्हणजे त्यात संवादाचा अभाव असेलच असे जाणवत नाही. उलट आपली कामे आटोपल्यावर जो तो विरंगुळा म्हणून आपापल्या दुनियेत मश्गुल आहे असे वाटले.

कुटुंबातल्या व्यक्तींच्या (आई आणि मुलगा) चेहर्‍यांवरचे भाव पहावेत अशी विनंती करेन. ते खरा रस घेऊन समोर चाललेले पाहत आहेत असं वाटण्यासारखे नाहीत तर हरवलेले वाटतात. त्यामुळे विरंगुळा म्हणून स्वतःच्या आवडीचं काहीतरी हेतुपुरस्सर टीव्हीवर पाहिलं जात आहे यापेक्षा निव्वळ वास्तवापासून दूर जाण्यासाठी जे समोर दिसेल ते एक प्रकारच्या निष्क्रीय, मद्दपणानं पाहिलं जात आहे असं वाटतं. समोरची नग्न स्त्री असंही सूचित करते की कदाचित ही पारंपरिक आई शुध्दीत असती तर हे त्या मुलाला पाहू न देती. म्हणजे दोन व्यक्ती एकच गोष्ट करत असून ते 'सह'जीवन नाही. आजोबांचं पुस्तकांचं कपाट हे टीव्हीच्या उलट्या बाजूला चित्रात आहे; वास्तवातही 'टीव्ही की वाचन' हे द्वंद्व अनेक घरात खेळलं जातं हे त्याविषयी वेळोवेळी होणार्‍या चर्चेतून आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे त्याला (या हरवलेपणानं टीव्ही पाहण्याच्या विरोधातलं) द्वंद्वात्मक मूल्य प्राप्त होतं. म्हणून या कुटुंबातल्या व्यक्ती परस्परांत संवाद नसणार्‍या, किंबहुना विसंवाद असणार्‍या असतील असंही वाटतं. म्हणजे शीर्षकातलं 'फिक्शन' हे कदाचित असंही सूचित करतं की कुटुंबातलं सहजीवन आणि परस्परसंवाद आणि त्यांतून मिळणारा आनंद यांच्या अभावामुळे कुटुंब हेच एक 'फिक्शन' बनलं आहे (ते प्रत्यक्षात, रुढ अर्थानं अस्तित्वात नाही).

स्वानन्द's picture

20 Jan 2011 - 10:04 pm | स्वानन्द

धन्यवाद. छान विवेचन केलं आपण.

वाहीदा's picture

24 Jan 2011 - 7:36 pm | वाहीदा

चिंजं नी खुप सुंदर विवेचन केले आहे नाहीतर फक्त बघणार्‍याला पूर्ण बोध घेता आला नसता

सुकामेवा's picture

20 Jan 2011 - 9:42 pm | सुकामेवा

प्रत्येक चित्र बोलके आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2011 - 9:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रत्येक चित्र बोलके आहे.

-दिलीप बिरुटे
[अबोल]

विकास's picture

20 Jan 2011 - 10:16 pm | विकास

प्रत्येक चित्र बोलके आहे.

पूर्ण सहमत.

चित्रा's picture

21 Jan 2011 - 1:51 am | चित्रा

चित्रे आवडली.