८ जानेवारी पासून डायेट सुरू झाले (१ आठवड्यात एक पण केक घशाखाली उतरवला नाही.. खरच..वाढलेल्या वजनाची शप्पथ.. )त्यामुळे शीतकपाटातील पदार्थांची हालचाल मंद झाली, शीतकपाटात शिल्लक असलेली अंडी गेले २-३ दिवस सारखी वाकुल्या दाखवत होती.. शेवटी १५ जानेवारीला डायेटला १-२ दिवस विश्रांती द्यावी असा निर्णय मी आणि दिनेशनी एकमुखांने मंजूर केला.. आणि मसाला एग्स आणि ब्रेड बेत पक्का केला
चला तर मग साहित्य लिहून घ्या..
साहित्य:
सर्व साहित्य ४ माणसांना पुरेल ह्या हिशोबाने दिले आहे..
८ अंडी
३ मध्यम कांदे
१ मध्यम टोमॅटो
४-५ आमसुलं
१०-१२ कडीपत्याची पाने
१/२ टेबल चमचा काळा मसाला
२ टेबल चमचा कांदालसूण मसाला
लाल/हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार
मीठ, कोथिंबीर आवडीनुसार
जिरे पूड, धणे पूड, हळद, तेल (ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स. )
कृती :
अंडी कडकडीत उकडून बारीक काप करून घ्या.
कांदे उभे बारीक चिरून घ्या, टोमॅटो, मिरची, आमसूल, कोथिंबीर, चिरून घ्या
गॅसवर पॅनमध्ये आपल्या डायेट प्लॅन नुसार तेल घ्या, तेल थोडे गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरच्या आमसूल आणि कडीपत्ता घालून खरपूस परता.. (मी कडीपत्ता वाळवून तयार केलेला चुरा वापरला आहे.. ताज्या कडीपत्याने अजून खमंग चव येते)
कांदा परतून गुलाबी झाल्यावर त्यात अंड्याचे बारीक केलेले काप, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, धणे जिरे पूड आणि हळद घालून सर्व व्यवस्थित मिसळून पॅन वर झाकण घालून ५ मिनिटे शिजू द्या. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि दोन मिनिटे पुन्हा झाकण ठेवा..
ढॅंट ढॅन.. झाले मसाला एग्स तयार.. जोडीला ब्रेडचे स्लाइस..
सोमवारापासून परत डायेट सुरू :(
प्रतिक्रिया
16 Jan 2011 - 5:36 pm | गवि
छान दिसतंय..
उकडून अंडे घालण्याऐवजी कच्चे फोडून घातले तर ? भुर्जीसदृश होईल.
अर्थात अंडी ऑलरेडी उकडलेलीच असतील तर मग काय करणार.
उकडलेली अंडी आणखी परतू वगैरे गेले तर ती कोरडी (वाळकी) होतात असा अनुभव आला आहे पूर्वी.
हे करुन पाहतो.
16 Jan 2011 - 6:17 pm | नन्दादीप
(ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स. )
मंजे काय ले भावू...???
17 Jan 2011 - 3:26 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ह्याचे प्रमाण किती ते माहित नसेल तर आपण स्वयंपाकघरात पाय ठेवायच्या लायकीचे नाही असे समजावे.
काही महिन्यांपूर्वी मी पण हाच प्रश्न विचारला होता. :-)
17 Jan 2011 - 3:37 pm | नन्दादीप
हा हा हा,....लय भारी....
ठांकू हा म्हेंदळे काका....
16 Jan 2011 - 6:28 pm | बिपिन कार्यकर्ते
16 Jan 2011 - 8:18 pm | विलासराव
दिसतेय.
सोपी पण आहे मझ्यासारख्या आळशी लोकांना बनवण्याएवढी.
16 Jan 2011 - 8:56 pm | टारझन
कितपत आवडेल ह्या बाबद शंकाच आहे. पिबळा बलक तसाच ठेवलाय ? :) बघुनही खावीशी वाटत नाही. ! "मसाला" प्रकारात शक्यतो "मसाला"असतो :)
-(साधी अंडा भुर्जी-टपरी स्टाईल प्रेमी ) टारझन
16 Jan 2011 - 10:47 pm | चिंतामणी
पा.कृ. आणि फटु दोन्हिही छान.
पण "लाल/हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार" वाक्य वाचल्यावर विचारावेसे वाटले की जर्मनीत मिरची महाग आहे का?????
"तुमच्या ऐपती नुसार" हे वाक्य भारतात कांद्याविषयी म्हणले जाते. :(
16 Jan 2011 - 10:56 pm | गणपा
"तुमच्या ऐपती नुसार" हे वाक्य केसु खिश्याच्या/पाकिटाच्या संदर्भात नाय हो बोलले. =)) =))
16 Jan 2011 - 11:11 pm | चिंतामणी
फटुत एक डिश भरून चिरलेला कांदा दाखवल्याने प्राप्त परिस्थीत हेच डोक्यात येणार ना. :(
16 Jan 2011 - 11:11 pm | प्राजु
मसाला म्हणजे थोडंस.. वाटण -घाटण करून जास्ती छान लागेल असं वाटतं.
हा प्रकार थोडासा.. सोपी भुर्जी वळसा घालून केलेली वाटते आहे. (वाई वरून सातारा म्हणीप्रमाणे)
17 Jan 2011 - 6:30 pm | केशवसुमार
प्रतिसादाबद्दल धन्यवाद..मसाला एग्स आणि सोपी बुर्जी हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत आणि दोन्हीच्या चवी मध्ये ही खूप फरक आहे असे वाटते..
16 Jan 2011 - 11:16 pm | विलासराव
खाल्ली. फार आवडली नाही.
बरी होती.
कदाचीत आमचा हातगुण कारणीभुत असावा.
17 Jan 2011 - 6:35 pm | केशवसुमार
पाकॄ लगेच करून प्रतिसाद दिल्याबद्दल आभार..
(आभारी)केशवसुमार
फार आवडली नाही.. आपले परिश्रम वाया गेल्यामुळे खेद वाटला..
(दिलगीर)केशवसुमार
17 Jan 2011 - 10:58 pm | विलासराव
>>>>>>>>फार आवडली नाही.. आपले परिश्रम वाया गेल्यामुळे खेद वाटला..
(दिलगीर)केशवसुमार
असं नाही ओ मालक.
मी बनवली हेच खुप झालं कारण सोपी पाककृती तुम्ही दिली म्हणुन.
परीश्रम वाया नाय गेले कारण बनवले ते सर्व खाउन टाकले.
अन्न हे परब्रम्ह असं मानतो मी तेव्हा फिकर नॉट.
तुमचे आभार पाककॄती दिल्याबद्दल.
17 Jan 2011 - 10:58 am | स्वैर परी
पुणे - मुंबई एक्स्प्रेस हायवेवर खालापुर जवळच्या फूड मॉल मध्ये खास अंड्याच्या पदार्थांच एक दुकान अहे. तिथे हा प्रकार मिळतो. तिथे याला अंडा जंगली सॅन्डवीच असे म्हणतात. भुर्जी आणि ह्या प्रकारामध्ये फारच फरक आहे. वर दिलेला हा प्रकार खुप च चविष्ट लागतो!
17 Jan 2011 - 10:59 am | मृत्युन्जय
हे असले काही करणे जमणार नाई. फोटोत जेवढे कांदे दाखवले आहेत त्याच्या किमतीत सध्या भारतात एका माणसाचे महिनाभराचे राशन येते.
17 Jan 2011 - 12:28 pm | जागु
मस्त आहे रेसिपी.
17 Jan 2011 - 12:40 pm | कच्ची कैरी
छान छान छान!!!!!!!!!!!
17 Jan 2011 - 12:49 pm | परिकथेतील राजकुमार
जबर्या.
17 Jan 2011 - 12:54 pm | अवलिया
काही विशिष्ट लोकांनी काहीही कसेही लिहिले तरी ते चानच असते.
बिचारा गणपा मेहनत घेऊन करतो त्याला नावे ठेवली जातात.
21 Jan 2011 - 7:30 am | आमोद शिंदे
नाना,
१....२.....३...
पटकन घेऊन टाकं..
आजची खादाडी इतकीच..आराम पडेल!!
17 Jan 2011 - 2:24 pm | आजानुकर्ण
व्वा केशवराव,
संडे हो या मंडे, रोज खाओ मसाला अंडे
17 Jan 2011 - 6:42 pm | प्रियाली
अंड्यात आमसुले म्हणजे काहीतरी वेगळेच. करून बघायला हवे. फोटोवरून तरी फर्मास दिसते आहे.
18 Jan 2011 - 12:45 am | सुनील
काळा मसाला म्हणजेच गोडा मसाला असे समजून प्रतिसाद देत आहे.
गोडा मसाला + कांदा-लसूण मसाला हे कॉम्बिनेशन कसे लागेल याविषयी साशंक!
कांदा असलेल्या पदार्थात सहसा गोडा मसाला घालत नाहीत. (निदान मी तरी नाही).
कांदा-लसूण मसाला थेट घालण्याऐवजी थोडा परतून घेतला (तेल सुटेपर्यंत) तर चांगला लागतो.
तरीही प्रत्यक्ष करून बघायला हरकत नाही!
18 Jan 2011 - 12:52 am | प्रियाली
हे खरे आहे. वरणाला गोडा मसाला टाकून गोडी आमटी वगैरे बनवायचे असेल तर कांदा बरा नाही लागत परंतु वांग्याची भाजी मी कांद्या आणि गोड्या मसाल्यासकट करते. चांगली होते.
18 Jan 2011 - 1:02 am | चिंतामणी
मला वाटते इथेच चूक होत आहे. हा काळा मसाला विदर्भातला असावा. (सावजी फेम)
टॉपिक टाकणा-यांनी लौकर खूलासा करावा ही विनंती.
19 Jan 2011 - 5:14 am | केशवसुमार
प्रतिसादा बद्दल धन्यवाद..काळा मसाला म्हणजेच गोडा मसाला का ते मला माहिती नाही..सावजी मसाला मी कधी वापरलेला नाही ..हा काळा मसाला घरी बनवलेला आहे..आणि तो मी आमटीत ही वापरतो..
सुनिलशेठ,कांदा लसूण मसाला तुम्ही म्हणता तसा थोडा परतून वापरून बघेन..
19 Jan 2011 - 5:18 am | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार.
21 Jan 2011 - 6:48 am | गुंडोपंत
आपल्या विडंबनांची मसालेदार चव दाखवून त्याचे व्यसन लावले.
आणि आता अचानक अनेक महिने विडंबन न दिल्याबद्दल तुमचा जाहीर निषेध!
लवकरात लवकर विडंबन मालिका सुरु न झाल्यास सर्व प्रकारच्या कवितांना भरघोस प्रतिसाद देण्यात येतील!
अरे मसाला कविता करायच्या सोडून ही अंडी काय काय बसलात?