कथा गाजराच्या हलव्याची

यकु's picture
यकु in पाककृती
9 Jan 2011 - 7:29 pm

हा गाजराचा हलवा अगदी स्पेशल आहे. यात अनेक प्रकारचे अनुभव मिळतील, त्यामुळे ही पाककृती काळजीपूर्वक वाचावी.
आज काही काम नव्हतं आणि घरीही कुणी नव्हतं. सहज चहा प्यायला बाहेर पडलो तर बाजारात लालबुंद गाजरं विकायला आलेली दिसली. शेजारीच काजू, बदाम, किसमीस वगैरे ड्रायफ्रूटही विकायला ठेवले होते. गाजराचा हलवा करून पाहाण्याची चांगलीच संधी होती. मग एक किलो गाजरं, प्रत्येकी पन्नास ग्रॅम काजू, किसमीस आणि बदाम आणि साताठ विलायची, लिटरभर दूध असं जय्यत सामान घेऊन घरी आलो.
गाजराचा हलवा आजपर्यंत कितीही वेळा खाल्ला असला तरी, प्रत्यक्ष करून पाहाण्याची पहिलीच वेळ होती. मिपाच्या समृध्द दालनातून शोधली असती तर गाजराच्या हलव्याची एखादी फक्कड पाककृती सहज मिळाली असती. पण गाजरं खिसण्याच्या घाईगडबडीत ते लक्षात आलं नाही. तर आम्ही (हो, म्हणजे आमचे दोस्त वगैरेही सोबत होते.. फक्त सोबतच होते.. ते काही करू लागत नव्हते..) केलेली कृती अशी :-
१. सर्वप्रथम गाजरं खिसून घेतली. पण घरात आयत्या वेळी नेहमीची खिसणी मिळाली नाही. कुठे ठेवलीय म्हणून मातोश्रींना फोन करावा म्हटलं तर "उंटावरून शेळ्या" हाकण्याच्या नावानं उद्धार होणार ही शक्यता होती, त्यामुळं ते टाळलं. चिप्स करायची खिसणी हाती लागली आणि तिच्यावरच गाजरांची खिसखिस सुरू केली. त्यातून बटाट्याच्या चिप्ससारखे गाजराचे चिप्स बाहेर पडू लागले.. मग खिसणी नीट धरून खिसायला सुरू केल्यावर एकदाचा बाकायदा गाजरांचा कीस बाहेर पडला!

२. आता गहन प्रश्न असा होता की खिसलेल्या गाजराच्या किसाची रवानगी नेमकी कशा पध्दतीने कढईत करायची? आधी कीस कढईत टाकायचा की आधी दूध तापवून घेऊन मग सगळा मसाला आत सोडायचा? दूध तापवून त्यात सगळा मसाला सोडण्याचा मार्ग उत्तम वाटला. म्हणून कढईत दूध तापवायला ठेऊन दिले. आणि काजू, किसमीस, बदाम आणि विलायची या सर्व वस्तू बारीक करून घेतल्या.

३. तिकडे दूधाला उकळी फुटली होती, त्यामुळं त्यात एक वाडगाभर साखर सोडून दिली आणि दूध ढवळण्याच्या उद्योगाला लागलो. साखर विरघळली असेल नसेल तेवड्यात गॅसच्या बर्नरमधून गुड्गुड्गुड असा आवाज झाला आणि कोणतीही पूर्वसूचना न देता, आम्हाला धर्मसंकटात ढकलून गॅसने शेवटचा आचका दिला!! पण मी अशी सहज हार मानणारा नव्हतो. गॅसच्या टाकीला गदागदा हालवून शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न केला - ती बिचारी पाच दहा मिनीटांसाठी शुध्दीवर आली आणि पुन्हा एकदा तिनं कायमचे डोळे मिटले! इथून पुढे खरी संकंटांची मालिका सुरू होणार होती.

गॅसची एजन्सी जवळच होती. गॅस आणण्याशिवाय पर्याय नव्हता कारण दुसरी टाकी नव्हती. आता हवे होते गॅसचे कार्ड! ते कुठे असते? सगळे किचन पालथे घालून झाले.. आत.. सगळी ड्रॉवर्स उघडून झाली.. शेवटी आईसाहेबांना फोनवर शरण जाण्याशिवाय मार्ग राहिला नाही.. फोन लावला तर मागच्या वेळी गॅस कुणी आणला होता इथपासून जाबजबाब सुरू झाले.. तो आणला होता लहान भावाने.. तो कुठे आहे .. तर आत्ता गावातल्या मैदानावर खेळायला गेला आहे.. हे राम!!! आणि तसंही गॅसचं कार्ड मिळवून काही फायदा नाही - कारण आज रविवार आहे, रविवारी गॅसची एजन्सी बंद असते. मातोश्रींनी माहितीत भर घातली.
किसलेली गाजरं, बारीक केलेले काजू, बदाम, किसमीस, विलायची आणि निवत चाललेले दूध यांच्याकडे हताशपणे पाहाण्याशिवाय काही हातात नव्हते. बैठकीत जमलेल्या मित्रांमध्ये ख्या:ख्या:ख्या:.. खि:खी:खी: सुरू झाली.. एकही जण गॅस कसा उत्पन्न करावा याबद्दल न बोलता या न झालेल्या हलव्याची चव घेऊन चर्चा करू लागला.. हरकत नाय... हम भी कुछ कम नहीं... गॅस नाही तर नाही...
रॉकेल शोधण्याचा आणि आता हर्षवायू होऊन पडलेल्या मित्रांना हलवा तयार झाल्यावर त्यातला एकही घास न देण्याचा निर्णय मी जाहीर केला..
मग काही कार्यकर्ते उठले आणि गॅस शोधायला बाहेर पडले.. मी रॉकेल शोधायला बाहेर पडलो...
अधिक चौकशी करता कळले की -
रॉकेल असं ब्लॅकने मिळत नाही.. तिथंही कार्ड आणि वर्कींग डे असायला पाहिजे... रविवारी कुठे मिळणार रॉकेल??
मी घरी परत आलो. गॅस शोधायला गेलेले इतर मित्रही हात हलवत परत आले.. त्यांचाही गॅस संपला होता..
शेवटी गरम झालेले दूध पीतपीत गाजरांचा कीस आणि काजूबदाम वगैरे चघळण्याची आयडीया निघाली...
काहींनी सगळा मालमसाला फ्रीजमध्ये ठेवण्याची आणि उद्या गॅस आल्यावर हलवा करण्याचे मार्गदर्शन केले..
... तर काहींनी "करायला सांगितलेत कुणी नस्ते धंदे.. नसता सुलेमानी कीडा आहे..उगं गप हॉटेलात जाऊन जेऊ नये का" वगैरे समालोचन केले..
पण मी हार मानणारा नव्हतो.. मी शेवटचा पर्याय वापरण्याचा निर्णय घेतला.. शेजारी!!!!! यस्स!!!!! शेजारी इन नीड इज शेजारी इन्डीड !!!!
कधीच शेजार्‍यांकडे न जाणारा मी त्यांच्या दाराची बेल वाजवल्याने काकू घाबरून गेल्या.. मग त्यांना इत्थंभूत कथा..
".. म्हणजे काकू.. हलवा मध्येच सोडून आमचा गॅस संपलाय.. तर प्लीज.. सगळं रेडी आहे..."

अर्ध्या पाऊण तासाने हलवा तयार झाल्याची वार्ता गल्लीत दरवळलेल्या सुंगधातूनच आमच्या नाकाने कळवली..
शेजारच्या काकूंचा सौरभ हलवा घेऊन आला..

तेव्हा तो हलवा विजेत्याच्या थाटात उचलताना..

कथा गाजराच्या हलव्याची सुफल संपूर्ण...

मॉरल ऑफ दी स्टोरी: १. गॅस शिल्लक आहे की नाही ते न तपासताच गाजराचा हलवा करायला घेऊ नये
२. बॅचलर्सनी रवीवारी कसलाही वेळ खाणारा पदार्थ घरात शिजवू नये.. जीवनावश्यक वस्तूंचा त्यादिवशी कर्फ्यू असतो..
३. घरात कुठ्ल्या वस्तू कुठे ठेवल्या जातात याची इत्थंभूत माहीती ठेवावी..
४. पाककृत्या करून त्या मिसळपावच्या पाकृ विभागात टाकणे येड्यागबाळ्याचे काम नाही; तस्मात कानाला खडा लावावा

प्रतिक्रिया

धन्य आहात तुम्ही आणि तो गाजर हलवा.

हलवा करताना प्रथम तुपात गाजर अथ्वा जे काही असेल त्याचा किस आधी तुपात भाजा मग त्यातच दुध घालावे
किस शिजला व आटल्या नतर त्यात साखर व सुका मेवा घालावा
हलवा तयार

अडचणीतून मार्ग काढल्याबद्दल यकुंचे अभिनंदन!
मदत केल्याबद्दल शेजार्‍यांचेही (त्यांच्या सौरभचे) आभार!;)

प्राजु's picture

10 Jan 2011 - 2:15 am | प्राजु

अभिनंदन!! :)
कोणीतरी माझ्या पंक्तीतले आहे याचा आनंद झाला.

कथा स्वरूपातील पाक कृती आवडली ..

..... आता हर्षवायू होऊन पडलेल्या मित्रांना हलवा तयार झाल्यावर त्यातला एकही घास न देण्याचा निर्णय मी जाहीर केला..

या वरून एक बोध घेतला. कुणाची पाककृती बिघडत असेल अथवा अयशस्वी होण्याची शक्यता असेल तरी त्याची चेष्टा करू नये .. न जाणो काही हिकमती वापरून त्याने / तीने ती पाकृ. यशस्वी केली तर आपल्याला त्यात वाटा मिळण्याची शक्यता संपलेली असायची .

:)

आपल्याला त्यात वाटा मिळण्याची शक्यता
शेजार्‍यांना त्यांचा वाटा मिळाला की नाही हे यकुंनी प्रामाणिकपणे सांगायला हवे.;)
शेजारच्या काकूच नाही तर त्यांच्या सौरभनेही मदत केली होती. साखर आणि दूध तळाला न लागता (दुसर्‍यांचा) हलवा ढवळत राहणे तोही आपले इंधन खर्चून? खरे शेजारी म्हणायला हवे.;)

साखर आणि दूध तळाला न लागता (दुसर्‍यांचा) हलवा ढवळत राहणे

सहमत! यात दुसर्‍यांचा हा अतिशय महत्वाचा शब्द आहे..
उच्च प्रतिचा शेजारधर्म . ग्रेट !!

रेवतीताई.. शेजार्यांना अगदी मुबलकपणे त्यांच्या घरी हलव्याच्या डिशेस देण्यात आल्या..
आणि सौरभलाही मुद्दाम हलवा खायला सोबत बसवून घेण्यात आले.. ते लिहायचे राहून गेले होते..

शिल्पा ब's picture

10 Jan 2011 - 4:24 am | शिल्पा ब

कथावस्तु आकर्षक आहे.

सहज's picture

10 Jan 2011 - 7:11 am | सहज

जय हो!

;-)

पहिलीच वेळ आहे ना !! मला आठवतं हौस म्हणून मी एकदा रसगुल्ले बनवायला घेतले (अर्थात घरात कोणी नसताना) त्या पुस्तकात लिहिलं होतं १ वाटी पनीरसाठी १ चमचा मैदा घ्यावा. आणि मी घाईघाईत पनीर आणि मैदा १:१ घेतला. ते रसगुल्ले तयार झाले तेव्हा रबरी बॉल सारखे टणक झाले होते. पण हार मानायची नाही हे खरं !! :D

गवि's picture

10 Jan 2011 - 10:28 am | गवि

काय रे हे यशवंता....

पियुशाने माझ्याकडे गाजर हलव्याची रेसिपी मागितली होती. आणि मलाही करायचाच होता म्हणून मी परवा गाजर हलवा केला. आज टाकणार होते इथे आणि अचानक ह्या धाग्यावर लक्ष गेल. म्हणून इथेच टाकते आहे. खास पियुशासाठी .

१ किलो लाल भडक गाजर (गाजर हलव्यासाठी गाजर घेताना लालबुंद आणि थोडे जाडे घ्यावेत. पण त्यात मध्ये जास्त पांढरट भाग नसावा)

२०० ग्रॅम मावा
अर्धी वाटी दुध
लवंग २-३
आवडीचे ड्रायफ्रूट्सचे तुकडे
वेलची पावडर
साखर पाव किलो किंवा तुमच्या गोडाच्या आवडीनुसार.
२ चमचे तुप.

कृती:
गाजराची साल स्क्रॅपरने काढुन गाजरं किसुन घ्यायची.

गरम भांडयात तुप टाकुन त्यावर लवंग टाकायची

नंतर गाजराचा किस टाकायचा व झाकण ठेउन मिडियम गॅसवर किस थोडा तसाच शिजु द्यायचा.

नंतर त्यात साखर व दुध घालायचे. जरा ढवळून मावा, वेलची पावडर व ड्राय फ्रूट्स घालायचे

हलवा चांगला आटवुन घ्यायचा पण करपवायचा नाही. मध्ये मध्ये ढवळायचे.

झाला हलवा तयार. अगदी सोपा प्रकार आहे हा.

अधिक टिप :
दुध न घालता नुसत्या माव्याचाही गाजर हलवा छान होतो. मी दुधी हलवा आणि गाजर हलवा दोन्ही नुसत्या माव्यातच करते.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jan 2011 - 1:13 pm | परिकथेतील राजकुमार

पियुशाने माझ्याकडे गाजर हलव्याची रेसिपी मागितली होती.

अरे वा ! आजकाल प्रतिक्रीया सोडून पाकक्रिया मागायला लागली ? प्रगती आहे.

यशुबाबा ह्या धाग्याला खरेतर 'हलव्यासाठी दाही दिशा' असे शिर्षक द्यायचे ना ;)

@ पर्या
तुझ्या का पोटात दुखतय रे?
परादादा

येश्वंता झकास लेख...
काय काय किडे करता रे तुम्ही :)

आजकाल प्रतिक्रीया सोडून पाकक्रिया मागायला लागली ? प्रगती आहे.

पियुशा's picture

10 Jan 2011 - 1:16 pm | पियुशा

खुप खुप धन्यवाद जागु ताइ :)

नगरीनिरंजन's picture

10 Jan 2011 - 2:00 pm | नगरीनिरंजन

वा डब्बल मजा एकाच धाग्यात. जागुतैंच्या हायजॅकने मजा वाढली.
दुधी हलव्याची कृतीही अशीच आहे का हो जागुतै?

प्रभो's picture

10 Jan 2011 - 10:03 pm | प्रभो

हा घ्या दुधी हलवा..

जागूताई ही पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद..
या पध्दतीनेही करून पाहीन..
बहुतेक आई या पध्दतीनेच करते.. पण मला आयत्यावेळी तुपाच्या जागी दूध सुचले..

डावखुरा's picture

10 Jan 2011 - 2:25 pm | डावखुरा

मी पण एकदा आई घरी नसताना धीरडे केले होते...(तहान लागल्यावर विहिर खणणे म्हणतात ना तसे भिक लागल्यावर करायला घेतले भुक लागुन ते कोकणारे कावळे दुसरीकडे उडण्याच्या तयारीत असताना मला १-२ कच्चे पक्के पण एकही अखंड नसलेले..तुकडे झालेले धीरडे परत तव्यावर चिकट ले ते वेग़ळे..त्यामुळे आईचा झालेला हास्य मिश्रीत संताप्,हास्य मिश्रीत माझ्या फजितीमुळेबरं का..त्यानंतर खाल्लेला ओरडा... नुसती धमाल..)

मुलूखावेगळी's picture

10 Jan 2011 - 2:54 pm | मुलूखावेगळी

छान हलवा अनि इश्टोरी
मस्त!!!
प्रयत्नान्ती गाजर हलवा

नगरीनिरंजन दुधी हलवाही असाच करतात. पण दुधीचे पाणी खुप निघते कधी कधी मग आटायला वेळ जातो म्हणून ते जास्तीचे पाणी काढुन चपातिच्या पिठात वगैरे घालायचे किंवा नुसते प्यायचे. दुधीच्या रसाने चरबी कमी होते.

खिखिखि... काय राव जरा बघायचं ना ग्यास संपला.. की स्वःतच ग्यासवर बसायची वेळ येते... बाकी हलवा पुराण मस्त...

- पिंगू