पानिपतच्या लढ्याला आता २५० वर्षं पूर्ण होतील. पानिपत आणि तिथं झालेला पराभव ही मराठी माणसाला सलणारी आणि सहज विसर न पडणारी अशी गोष्ट आहे. पण त्यामुळे 'पानिपत होणे' असा एक वाक्प्रचार मराठीला मिळाला. पानिपताविषयीची बखरींतली किंवा मौखिक परंपरेतली वर्णनं, पोवाडे वगैरेंमधून असे इतर काही शब्द मराठीला लाभले का? असतील तर ते कोणते याविषयी माहिती हवी आहे. एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती पानिपत-वाङ्मयाबाहेरचीही असू शकते, पण तो शब्द/वाक्प्रचार/म्हण मराठीत प्रचलित होण्यामागचं कारण पानिपत-वाङ्मय (लेखी/मौखिक) असलं तरीही चालेल.
यासंबंधात एक प्रश्नः मोहोरा गळणे, बांगडी पिचणे, चिल्लर-खुर्दा असे पानिपतावरच्या युध्दाच्या नतीजाचे वर्णन करणारे (बहुधा) भाऊसाहेबांच्या बखरीतले शब्द हे आधीपासून अस्तित्वात होते का? की त्या बखरीमुळे ते अनेकांच्या तोंडी गेले आणि मग मराठीत रुळले? म्हणजे हे शब्दही पानिपताची मराठी भाषेला देणगी मानता येतील का?
विकीपिडीआत 'पानिपतची तिसरी लढाई':'साहित्यात व दैनंदिन जीवनात' याखाली 'संक्रांत कोसळणे' हा वाक्प्रचारही पानिपताने मराठीला दिला असा उल्लेख आहे; पण तो त्रोटक आहे आणि संदर्भ म्हणून 'स्वामी' या रणजित देसाईंच्या अर्वाचीन कादंबरीचा उल्लेख केला आहे. हे फारसं विश्वासार्ह वाटलं नाही. याविषयीही अधिक संदर्भ मिळाले तर हवे आहेत.
विनंती: शक्य तिथे संदर्भ द्यावेत (कोणती बखर/पोवाडा, वगैरे). नाहीतर विकिपीडिआप्रमाणेच विश्वासार्हतेला मर्यादा पडतात.
प्रतिक्रिया
4 Jan 2011 - 7:23 pm | मृत्युन्जय
विश्वास पानिपतावर गेला ही म्हण रुढ झाली. :)
4 Jan 2011 - 7:33 pm | अविनाशकुलकर्णी
संक्रांतिला च दत्ताजी शिन्दे मारले गेले होते...
4 Jan 2011 - 7:37 pm | प्रियाली
ही चर्चा बघा म्हणजे तिथले सोडून काही नवे प्रतिसाद येतील.
5 Jan 2011 - 12:52 am | इन्द्र्राज पवार
चिंतातरजंतू यानी काढलेला हा असा धागा आहे की तो एकदोन ओळीच्या प्रतिसादांने पुरा होईल असे वाटत नाही. तरीही मूळ लेखापेक्षा प्रतिसादच मोठा होणार नाही याची (शक्य तितकी) काळजी घेऊन लिहित आहे.
पानिपतच्या तडाख्याने जे काही उध्वस्त वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाले त्याचे रोखठोक वर्णन बखरीत आले आणि त्यामुळे अनेकविध वाक्ये आणि समज सांप्रतदेशी रूढ झाले हेही तितकेच खरे आहे. 'सभासद बखरी' सारख्या चरित्रपर बखरी असो वा 'होळकरांच्या कैफियती' वा पेशव्यांच्या कारकिर्द रंगविणार्या बखरी असो तसेच 'हनुमंतस्वामींच्या' सांप्रदायिक बखरी असोत या सर्व बखरीतील वर्णन हे प्रत्यक्षदर्शी असल्याने त्याचे महत्व बेजोड आहे असा समज त्या काळी होता. वि.का.राजवाडे बखरींना 'इतिहासाचे साधनग्रंथ' म्हणून मान्यता जरी देत नसले तरी बखरीतून 'इतिहास' वजा होऊच शकत नाही. या सर्व बखरीत मान आहे तो 'भाऊसाहेबांच्या बखरी'ला, जिच्यात पानिपत पराभवाचे रोखठोक वर्णन केले आहे, आणि म्हणूनच यातील शब्दसंपदा आजही प्रमाणभूत मानली जाते. 'स्वामी', 'श्रीमान योगी' अशा ऐतिहासिक समजल्या गेलेल्या कादंबर्यातही विविध बखरींचा कृतज्ञतापूर्वक लेखकाने उल्लेख केलेला असल्याचे आढळते.
हा विषय फार विस्तृत प्रमाणावर चर्चिला पाहिजे, कारण निव्वळ बखरीतून मराठी भाषेत रूढ झालेले शब्द म्हणून वा इतपतच बखरींचे महत्व मानले तर खुद्द बखरीवर वा त्या लिहिणार्यांवर एक प्रकारे अन्याय केल्यासारखे होईल. तरीही धाग्याची मर्यादा पाहता निदान आतापुरते तरी त्या एका हेतूवरच लक्ष केन्द्रीत करावे लागेल.
"बांगड्या फुटल्या, चिल्लरखुर्दा, मोहरा, विश्वास गेला..." आदीबाबत वर्षानुवर्षे चर्चा होतच आल्या आहेत आणि अनेक साहित्यिकांनी वेळोवेळी या संज्ञा आपल्या लिखाणात बखरीतूनच घेतल्या आहेत. याशिवाय काही नवी वाटणारी वाक्ये आणि शब्द....जे मी 'भाऊसाहेबांच्या बखरी' तून इथे उदधृत करीत आहे :
१. "प्याद्याचा फर्जी जाहला" ~ अचानकच एखाद्या क्षुद्र व्यक्तीला कुठल्यातरी कारणाने महत्व प्राप्त होते, पण ते कारण लयास जरी गेले तरी ती व्यक्ती आपल्या मिशीला पिळ देतच राहते. अबदालीचा एक विश्वासू नोकर नजीबखान याच्याबाबतीत ही म्हण पडली होती.
२. "भाऊगर्दी होणे" ~ फाजील आत्मविश्वासात राहणे आणि संकट कोसळताच कारणमीमांसा न करता "सदाशिवरावभाऊंच्यावर हल्ला - गर्दी - झाला" म्हणून छाती बडवून घेणे. [आजही कॉन्ग्रेस पक्षाच्या तिकिट वाटपाच्यावेळी सोनिया गांधीच्या निवासस्थानी इच्छुकांची 'भाऊ़गर्दी' झाली असा वर्तमानपत्रे -म.टा.आणि लोकसत्तासह- उल्लेख करतात. या संज्ञेचा खरा अर्थ घ्यायचा झाल्यास 'सोनिया गांधी' वर उमेदवारांनी हल्ला केला असा होईल, पण काळाच्या ओघात या वाक्याला अर्थ उरला आहे तो 'एखाद्या कामासाठी एकापेक्षा अनेकजणांनी इच्छा दर्शविणे....असो.
३. मुंगीस पक्ष फुटले ~ मरण जवळ आले की मुंग्यांना पंख फुटतात असा समज आहे. हा भावार्थ मल्हाररावांचा मुलगा खंडेराव होळकर याच्यासंदर्भात बखरकारांनी लावला आहे. गरज नसताना खंडेराव आपले शूरत्व दाखविण्यासाठी मोर्च्याच्या अग्रभागी आला व त्यास अबदाली सैन्याकडून तोफेच्या गोळ्यास सामोरे जावे लागले.
४. "वानरी तेलाचा प्रकार नको आता..." ~ एखाद्या खर्या माकडास जखम झाल्यास कळपातील दुसरे अतिशहाणे माकड त्यावर तेल लावून उपचाराचा बहाणा करते, पण त्यामुळे मूळची जखम अधिकच फुलते....म्हणजेच त्रास कमी न करता हकनाक वाढविणे. ~ हा फटका राघोबादादा याना उद्देश्यून बखरीत वापरला आहे. नानासाहेबांनी त्याना उत्तरेत पाठविले ते होळकर, पवार आणि शिंदे यांच्यातील बेबनाव कमी करून खंडणी गोळा करण्यासाठी. मात्र दादासाहेबांनी स्वभावानुसार जे काही केले तो एक वानरी तेलाचाच प्रकार होता असे सिद्ध झाले.
५. "झाडास घेऊन जातील..." ~ मराठ्यांच्या कथीत पराक्रमाच्या कथावर उत्तरेतील राजपुतांचे हे उत्तर. बाजारबुणगे किती आणि हाडाचे सैनिक किती हा सवाल युध्द तोंडावर आले तरी सुटेना. त्यातही गनिमी काव्याबद्दल प्रसिद्ध असलेले मराठ्यातील एक सैनिक गट आणि राजपूर यांच्यात तुलना करता "रजपूत खर्या अर्थाने महापराक्रमी, शिरच्छेद झाला तरी त्याचे कबंध नाचते, तर इकडे आम्हाकडील आधीच गनीम यांचे कच्चे दिल...निसवले तरी झाझाल बांधले असता झाड घेऊन जातील..." अशी बखरीने दखल घेतली होती त्यावेळच्या पानिपतात असलेल्या मराठा सैन्याच्या मनःस्थितीची.
६. "मुरगी मारी, बच्चे दानादान..." ~ अर्थ स्पष्टच आहे. दत्ताजी शिंद्याला मारा म्हणजे त्याच्या अवतीभवती असलेले चिल्लर गनीम आपसूकच मारले जातील.
७. "अजगरका दाता राम..." ~ मराठीमध्ये एक म्हण आहे, ज्याने चोच दिली तो दाणाही देईलच. त्याच संदर्भात अजगराला खायला खूप लगते, पण त्याचीही व्यवस्था 'रामाने - परमेश्वराने' केलेली आहेच. पानिपतात शिंद्याजवळ प्रचंड फौज होती व तिच्या खर्चासाठी मोठी रक्कम त्याना निर्माण करावी लागत होती. युद्ध तोंडावर आले असतानाच बुंदीच्या राणीने शिंद्यांजवळ मदतीची याचना केला व त्याप्रित्यर्थ पाऊण कोट देऊ केले...."अजगरका दाता राम..." नियम सिद्ध झाला.
काही प्रभावी शब्दही आहेत, ते थोडक्यात असे :
क्रोड = कोट रुपये, सुतरनाल = उंटावरील तोफ, सीरची = डोक्यावरील, नामोस्की = अपकिर्ती, नामुष्की; सिपारस = प्रशंसा, इस्तकबील = प्रारंभ, जूग = युती; नरद = सोंगटी ~ जयाप्पा शिंदे याच्याबाबतीत नजीबखानने ही उपमा वापरली होती, फाजील = अधिकची रक्कम ['फाजील' हा फार्सी शब्द खरे तर पैशाच्या संदर्भात वापरला जातो, पण तो मराठी भाषेत त्याचा प्रवास 'आगाऊ, अतिशहाणा' अशा अधिकच्या अर्थाने कायमचा विराजमान झाला आहे.], सानकरोटी = अन्नाची शपथ [सान = मुस्लिमधर्मीय पिरास देत असलेला नैवेद्य...करोटी = भांडे, कटोरा या अर्थाने. ते हातात घेऊन स्वामीनिष्ठा दाखवायची...तिच शपथ]; बक्षीगिरी = सैन्याचे अधिपत्य...बक्षी = सरदार असाही आहे.
~ मला वाटते इतपत ठीक आहे. जर चिं.जं.ना प्रतिसाद ठीक वाटला तर पुढेही चर्चा करता येईल.
इन्द्रा
5 Jan 2011 - 2:46 am | मुक्तसुनीत
झकास प्रतिक्रिया ! :-)
5 Jan 2011 - 10:02 am | Nile
इंद्रराजरावभाउसाहेबांचा प्रतिसाद भारीच.
5 Jan 2011 - 5:56 pm | नंदन
जबरदस्त!
5 Jan 2011 - 6:33 pm | गणपा
असच म्हणतो.
5 Jan 2011 - 9:44 am | शैलेन्द्र
"३. मुंगीस पक्ष फुटले ~ मरण जवळ आले की मुंग्यांना पंख फुटतात असा समज आहे. हा भावार्थ मल्हाररावांचा मुलगा खंडेराव होळकर याच्यासंदर्भात बखरकारांनी लावला आहे. गरज नसताना खंडेराव आपले शूरत्व दाखविण्यासाठी मोर्च्याच्या अग्रभागी आला व त्यास अबदाली सैन्याकडून तोफेच्या गोळ्यास सामोरे जावे लागले."
छान प्रतिक्रिया, फक्त एक दुरुस्ती.
मल्हाररावांचा मुलगा खंडेराव होळकर हा पाणीपतावर नव्हे तर राजस्थानातील मोहिमेत ठार झाला, कुम्हेर(कुम्भार) गडाच्या त्या लढाईत, मला वाटत, १७५२-५४ च्या आसपास, सुरज्मल जाटाविरुध्द लढताना खंडेराव, तोफ्गोळा लागुन मरण पावला. या घटनेचे फार दुरोगामी परिणाम झाले, शिंदे- होळकरांतील सुप्त इर्षा पुढच्या काळातील राजकारणाने वैरात बदलली. पुढे याच सुरज्मल जाटाने, मरठ्यांना पाणिपतावर अनमोल मदत केली. राजकारन व युध्द विचीत्र असत हे खर.
5 Jan 2011 - 10:26 am | llपुण्याचे पेशवेll
+१
या कुंभेर(कुम्हेरच्या) लढाईवर दु.आ.तिवारी यांची कुंभेरीची भंबेरी ही कविताही प्रसिद्ध आहे. या खंडेरावाचा मृत्यू झाल्यावर मल्हाररावाने प्रतिज्ञा केली की कुंभेर किल्ल्याची माती खणून काढीन आणि यमुनेत आणून टाकेन नाहीतर नावाचा मल्हारी नाही. मग जाटराजाची भंबेरी उडाली व त्याने तह केला. हा खंडेराव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे भ्रतार होत.
5 Jan 2011 - 10:52 am | इन्द्र्राज पवार
श्री.शैलेन्द्र आणि श्री.पुण्याचे पेशवे....
~ दोन्ही प्रतिसाद वाचून परत "बखर" वाचत आहे....सविस्तर खुलासा थोड्या वेळात करेन. [पण तुम्हा दोघांची माहिती अचूक दिसतेच...कदाचित 'यमुने' मुळे मी पानिपत नजरेसमोर आणले असावे....वेट !]
इन्द्रा
5 Jan 2011 - 11:02 am | Nile
..
5 Jan 2011 - 3:06 pm | इन्द्र्राज पवार
होय शैलेन्द्र...तुमच्या सूचनेच्या अनुषंगाने परत थोडा अभ्यास केला. पानिपताच्या अगोदर रघुनाथराव (दादासाहेब) पेशव्यानी होळकर, जयाजी शिंदे, विठ्ठल शिवदेव, बुंदेले आणि यशवंतराव पवार यांच्यासहे नर्मदा पार करून माळवा, सोंदेवाडा, बुंदिकोट, उदेपूर, नरवर, ग्वालेर, झांशी आणि कालपी येथून खंडण्या गोळा करत चमेलीपार झाले तिथे तुम्ही उल्लेख केलेले सुरजमल जाट यांच्यात १ कोट की ४० लाख या प्रश्नावर बेबनाव झाला. सुरजमल हाही द्रव्य आणि फौज बळाने सामर्थ्यवान होता. कुंभेरीत तळ होता..."४० लाख खंडणी घ्यावे, नाही तरि युद्धास उभे राहावे.." अशी बखरीत नोंद आहे. राघोबादादांनी संतापाने कुंभेरीस मोर्चे लावले. दोन्ही बाजुनी जोरदार हल्ले-प्रतिहल्ले होत राहिले....सुमारे दीड महिन्याने अशा जयपराजयाच्या बेहोषीत मल्हाररावांचा मुलगा खंडेराव भोजन करून मोर्च्याच्या निशाणापाशी आला. त्यावेळी कुंभेरी किल्ल्यातून 'जेजालीची गोळी' (जेजाल = लांब नळीची तोफ) लागून गतप्राण झाला.
पुढे पुत्रशोकाचा विषाद मल्हाररावाना होऊन त्यानी प्रतिज्ञा केत्ली त्की, "सुरजमल जाट याचा सिरछेद करीन आणि कुंभेरीची माती यमुनेत टाकीन तरीच जन्मास आल्याचे सार्थक, नाही तर प्राणत्याग करीन..." वकिलामार्फत ही प्रतिज्ञा सुरजमलास कळताच, मल्हारराव जे बोलतील ते करतीलच हे माहित असल्याने पत्नी अनुसया हिच्या सल्ल्याने त्याने थेट शिंद्याशी संपर्क साधून खंडणी देण्याची कबुली देवून 'मला वाचवा' अशी गळ घातली. शिंद्याना मोठेपणा दाखविण्याची संधीच आली...'पगडीभाई जाहल्यावर पोटचे द्यावे पण पाठीचे देऊ नये, त्यास रक्षावे...असे धर्मशास्त्र सांगते...." ते वाक्य प्रमाण मानून त्यानी सुरजमल याच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आणि तिथूनच पेशव्यांच्या प्रमुख सरदारांमध्येच गृहकलह सुरू झाले. राघोबादादांनीही शिंदे-होळकर वादात ठामपणे कुणाचीच बाजू न घेता मिळालेली ६० लक्षाची खंडणी गोळा करून पुण्यास परतणे पसंद केले. पुढील इतिहास माहितच आहे.
इन्द्रा
6 Jan 2011 - 12:42 am | शैलेन्द्र
बरोबर, गम्मत म्हणजे, मल्हाररावांच्या आयुष्यातील सगळ्यात कठीन काळात, म्हणजे, पणिपतावरुन, ते मराठी राज स्त्रीयांना घेवुन परत येत असताना, याच सुरज्मल जाटाची त्यांना खुप मदत झाली.
5 Jan 2011 - 10:10 am | चिंतातुर जंतू
इंद्रा आणि इतर प्रतिसादकांचे आभार!
इंद्रा, याची काळजी अजिबात करू नका ही नम्र विनंती. मुळात मदत हवी आहे म्हणूनच धागा टाकला आहे. त्यामुळे कोण काय म्हणेल याचा विचार न करता खुशाल येऊ द्या तुमचे ('मेगाबाईटी' :-)) प्रतिसाद.
5 Jan 2011 - 10:21 am | बिपिन कार्यकर्ते
+१
5 Jan 2011 - 10:20 am | बिपिन कार्यकर्ते
च्यायला!!!
5 Jan 2011 - 10:32 am | इन्द्र्राज पवार
श्री.बि.का. यांच्या वरील आपुलकीच्या प्रतिक्रियेला 'बखरी' धर्तीवर उत्तर द्यायचे झाल्यास....
"....बि.का. खाविंदांची ही किताबत वाचून थोर आनंद जाहिला. लेखनावर पालखी अशीच आबादि असावी, जाबसाल विचारणा नाही. थोरले म्हाराज दर आसामीस शेर शेर सोन्याचे कडे देवू करतील..." अशी येईल.
आता यावर "...मायला !!..." असे येणार बहुधा...!!
इन्द्रा
5 Jan 2011 - 10:38 am | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा!!!
इंद्रा, तुझा प्रतिसाद वाचून अक्षरशः दोन मिनिटे तुझ्या डोक्यात नक्की काय आहे आणि मेंदू असेल तर किती आहेत याचा विचार करत होतो. असो.
ते सोन्याच्या कड्यांचं मात्र जरा मनावर घ्या!!! एक काय शंभर च्यायला फेकतो तुझ्यावर! ;)
5 Jan 2011 - 11:02 am | Nile
च्यायला!!! बिका, एक मीही फेकला तुमच्याकडे ह्याची नोंद ठेवा बरंका.
(इंद्रा, व्यनीतुन १५१ पाठवतोय)
5 Jan 2011 - 11:41 am | इन्द्र्राज पवार
"....१५१ पाठवतोय...!!"
~ अहो महाशय....१५१ मध्ये आजचा सोनार दुकानाची जाहिरातही वाचू देत नाही. २५,०००/- दहा ग्रामसाठी झाले आहेत....आणि बिका खाविंदाना शेरभर सोने द्यायचे आहेत.
इन्द्रा
5 Jan 2011 - 11:02 am | Nile
च्यायला!!! बिका, एक मीही फेकला तुमच्याकडे ह्याची नोंद ठेवा बरंका.
(इंद्रा, व्यनीतुन १५१ पाठवतोय)
6 Jan 2011 - 2:51 am | धनंजय
झकास
6 Jan 2011 - 10:01 am | Pain
१) जंबुरिया: बहुदा आधीपासून वापरात होता.
२) गिलचे
6 Jan 2011 - 11:28 am | नगरीनिरंजन
वा, इंद्रा, वा!
5 Jan 2011 - 10:15 am | पाषाणभेद
अतीशय उत्तम चर्चा चालू आहे. इंद्राचे वर्णन एकदम समर्पक आहे. अशा चर्चा नेहमी घडोत.
5 Jan 2011 - 8:08 pm | विकास
असेच म्हणतो.
5 Jan 2011 - 10:27 am | विजुभाऊ
इस्तकबील = प्रारंभ, जूग = युती
इस्तेकबाल असा शब्द हवा. त्या शब्दाचा अर्थ " स्वागत" असा होतो.
उदा : हम तहे दिलसे उनका इश्तेकबाल करते है.
जूग : यूग ....बर्याच भाषांमध्ये य चा ज होतो. उदा यादव : जादव.
कदाचित जूग = युती हा शब्द योग = जोग अशा अर्थाने युती म्हणून आला असावा
5 Jan 2011 - 8:24 pm | इन्द्र्राज पवार
"...इस्तेकबाल असा शब्द हवा..."
~ मूळ बखरीत 'इस्तकबील' असाच उल्लेख आहे.
बिजेसिंग याच्या मारवाड प्रांतातील अजमेर भागातील 'नागुरा' भोवती खंडणी प्रश्नावरून जयाजी शिंदे यानी वेढा घातला होता. पण बाराचौदा महिने झाले तरी मारवाडी दमास येईनात. दोन्ही मोहरे अस्तित्वासाठी इरेला पडले होते. इथे आता बखरीतील भाषा पाहा....
"....आसे चवदा महिने जाहले. लस्करात धारण इस्तकबीलपासून आठ शेर व वैरण, आसी महागाई. परंतु सरदार केवळ कुबेर. रोजमुरे व आजबाब ज्याजती पाहुन केला. धारण महाग आहे, असे कोणास सुचो दिले नाहे. फौजेत येक मनुष्य बेदिल नाही. होड की बिजेसिंगाचे पारपत्य करावे..."
या ठिकाणी "लष्करात धारण इस्तकबीलपासून आठ शेर व वैरण पुले..." या पूर्ण वाक्याचा अर्थ होतो...."साध्या सैनिकास प्रारंभापासून आठ शेर शिधा व घोड्यासाठी कशीबशी पुरेल अशी वैरण...अशी महागाई, पण सरदार मात्र कुबेर.
रोजमुरे = रोजचा पगार, आजबाब = इतर वस्तू.....'ज्याजती पाहून केला'...दर्जा पाहून दिला जात असे.
२. जूग = युती हा अर्थ बरोबर आहे.
जयाजी शिंदे यांना रणात वीरमरण आले. दत्ताजी शिंदे यांच्या सांत्वनासाठी मल्हारराव होळकरानी लिहिले "....आमचे जूग विस्कटतांच नरद ठार मेली..." इथे 'नरद = जयाजी शिंदे.
इन्द्रा
5 Jan 2011 - 5:31 pm | सागर
पानिपताच्या युद्धाचा विषय निघताच मला पहिले हे एकच वाक्य आठवते
कुतुबशहा (नजीबखानाचा गुरु) म्हणतो
"क्यों दत्ताजी और लडेंगे?"
त्यावर दत्ताजीने दिलेले उत्तर अंगावर अक्षरश: काटा आणते
"क्यों नही. बचेंगे तो और भी लडेंगे!!"
अर्थात हा प्रसंग पानिपत च्या युद्धाच्या अगोदरचा आहे. पण पानिपताच्या युद्धाशीच निगडीत आहे.
शाळेत याच प्रसंगावर धडा असल्यामुळे मनावर कोरला गेलेला असेल कदाचित. पण पानिपत म्हटले की मला पहिले आठवते ते दत्ताजी शिंदे याचे हे वाक्य.
दत्ताजीच्या उत्तरामुळे कुतुबशहाने (नजीबखानाचा गुरु) दत्ताजीचे मुंडके कापून भाल्यावर खोचून सैन्यात नाचवले होते.
हा प्रसंग रक्त पेटवणाराच आहे.
पानिपत झाले हा वाक्प्रचार एक शोकांतिका म्हणूनच कायमचा मराठी भाषेला आठवण करुन देईन
5 Jan 2011 - 5:45 pm | कानडाऊ योगेशु
"बचेंगे तो और भी लडेंगे!!" सारखेच आठवणारे वाक्य म्हणजे "आप मेला जग बुडाले आब्रु जाते वाचतो कोण"
दहावीच्या मराठीच्या पुस्तकात पहीलाच धडा होता.भाऊसाहेबांच्या बखरेवर आधारित त्यातील हे वाक्य आहे.
बाकी चर्चा मस्त चालु आहे. नवीन नवीन माहीती मिळते आहे.
5 Jan 2011 - 1:28 pm | मेघना भुस्कुटे
इंद्रा,
दणदणीत प्रतिसाद! मजा आली. :)
बाकी हे पानपताशी संबंधित नव्हे, पण मराठेशाहीशी आहे. 'ध चा मा करणे' विसरलात का?
5 Jan 2011 - 6:09 pm | सहज
माहीतीपूर्ण प्रतिसाद! छान धागा.
5 Jan 2011 - 6:22 pm | मेघवेडा
मस्त धागा! एकेक उत्तम प्रतिसाद!
अवांतर : तात्याराव सावरकरांचं 'उत्तरक्रिया' नाटक आठवलं. पानपतची उत्तरक्रिया!
6 Jan 2011 - 12:44 am | शरदिनी
अहाहा.. मजा आली...
कुठल्याशा ऐतिहासिक कादंबरीत सुतरनाल शब्द परत परत यायचा, मला हे म्हणजे काय ते आज कळाले...
6 Jan 2011 - 10:24 am | विजुभाऊ
कुठल्याशा ऐतिहासिक कादंबरीत सुतरनाल शब्द परत परत यायचा, मला हे म्हणजे काय ते आज कळाले...
एका रेशीपीच्या बुकात "सुतरफेणी" हा शब्द वाचला होता. त्या शब्दाचा काजू फेणी किंवा कोकोनट फेणी या शब्दाशी सुतराम संदर्भ नाही हे आज कळाले.
आणि डोळे पाणावले
इकडे गुजरात मध्ये सुतरफेणी मिळते काजू फेणी नाही
6 Jan 2011 - 11:26 am | इन्द्र्राज पवार
धागाकर्ते श्री.चिंतातुर जंतू यांचे आणि प्रतिसाद मान्य+पसंद केल्याबद्दल सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. वास्तविक माझ्या प्रतिसादातील ९०% पेक्षा जास्त शब्दरचना थेट 'भाऊसाहेबांची बखर' मधीलच असल्याने श्रेय त्या (अज्ञात) बखर लेखकासच जाते हे मान्य केले पाहिजे. मी फक्त काही वाक्यप्रचार, म्हणी आणि अनोखे शब्द यांचा अन्यत्र धांडोळा घेतला, इतकेच.
"अनोखे शब्द" वरून आठवले की, श्री.चिंजं यानी मौखिक परंपरेतील शब्दांचा केलेला उल्लेख तसेच काहीनी बखरीपूर्वीदेखील त्यातील शब्द अस्तित्वात होते असे जरी म्हटले असले तरी मी जाणीवपूर्वक (मला वाटलेले) काही कठीण तसेच नवखे वाटणारे शब्द इथे देत आहेत ज्यामुळे ते प्रथमच वाचणार्याला एक प्रकारचा आनंदही मिळू शकतो.
भाग-२
१. पानिपतच्या पराभवानंतर मराठी फौजेची जी 'हालत' झाली त्या अवस्थेचे बखरकाराने केलेले वर्णन ~
"....जिकडे वाट सापडली तिकडे पळत चालिले. कितीएक गाड्या व छकडे व बायका वगैरे अवसानरहित होते ते खंदकात पडले. त्यास निघावयास अवसान जाहाले नाही. गिलचे डोचकी कापीत होते. ती कापावयाची त्यानी मग सोडून दिली. कोठवर कापतील?....इकडे गिलचे खदकातील मालमत्ता लुटू लागले. बायका धरून नेल्या. कितीएक जीवे मारल्या. तीच गत पुरुषांची केली..."
२. त्र्यंबक बापूजींच्या पथकाचा दुराणीने पराभव केला, त्याची अवस्था ~
"...पंज्याब प्रांती त्रिंबक बापूजीचे पथक गेले होते ते दुराणीने बुडवून तमाम मनुष्याचा बंद धरून भोवतील राखणदार ठेविले. सायंकाली आदा शेर आन्न द्याचे. अंगावर वस्त्र नाही. दोन आडीच हजार माणूस नागवे उघडे माळावर. केवल मोठेमोठे सरदार होते; ते तर ओलखूं येईनात..."
[ आपण हिटलरच्या नाझी कॉन्स्न्ट्रेशन कॅम्पबाबत खूप काही वाचतो, चित्रपटातून, माहितीपटातून, मालिकांतून ती अंगावर शहारे आणणारी दृष्ये पाहतो....हे आधुनिक काळातील...पण २५० वर्षापूर्वी दुराणीने जी काही हालत केली ती नाझीसदृश्यच होती....मोकळ्या माळावर २५००+ सैनिक+सरदार नागव्या अवस्थेत हतबल अवस्थेत अन्नाच्या पाळीत उभे...]
आता त्या प्रसंगातील पुढील वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ पाहू या :
१. आकाशाची दोरी तुटणे = ईश्वरानेदेखील मदतीस येण्याचे नाकारले अशी सैन्याची अवस्था झाली. "कठीण समयी वरचा दाता तो त्राता होईल..." असे म्हटले जाते. पण पराभवामुळे 'देवाने आकाशाची दोरीच तोडून टाकली."
२. पोटात हरणाची कालजे सिरणे = घाबरगुंडी उडणे. गिलच्यानी डोकी उडविण्याचा जो सपाटा लावला होता तो पाहून अर्धमेले झालेले सैन्य अधिकच हतबल झाले.
३.' कालचा शेणामेणाचा झाला लोखंडाचा' = हे नजीबखान रोहिल्याच्या दिवसागणिक वाढत चाललेल्या ताकदीबद्दल दत्ताजी शिंद्यानी काढलेले उदगार. मराठे सरदार इकडे आपापसतील लहानथोरपणाच्या गोष्टी करत बसले तर त्या चार महिन्यात रोहिला मातब्बर झाला..."दिवसेदिवस ते शेणामेणाचे लोखंडाचे होत चालले, त्यास यत्न कोणता काय करावा?"
४. जैसे शालवाचे पीक कापिले = केवळ प्रचंड प्रमाणावर जीवितहानी नव्हे तर मुंडकी उडविण्यासाठी गिलच्यानी दाखविलेल्या रितीचे हे वर्णन. शेतकरी जसा विळ्याने सटसट शाळूचे पीक कापित जातो, तसे गिलचे निव्वळ पेशव्यांच्या सैनिकाना मारत नव्हते तर ते शीर तोडून स्वतःजवळ ठेवत होते...का? तर दुराणी आणि रोहिल्याने आपल्या सैनिकासाठी "मराठ्यांच्या एक मुंडक्यास पाच रुपये" हा दर जाहीर केला होता. ~~ "येकाने पुढे डोचके कापावे, येकाने मागे सैती मारावी व डोचके कापून न्यावे, ते सरकारात रुजू करावे. त्याणे इनाम दर सिरास पांच रुपये घेणे...".
५. "रानभरी जहाले..." = गारुड्याच्या मंत्राने ज्याप्रमाणे रानातील प्राणी भारावले जातात त्याप्रमाणे आमचे सैन्य वरील पध्दत पाहून दिङ्मूढ झाले.
काही शब्द :
तिमखहरामी = स्वामिद्रोह; करांचली = छोटी तलवार; माकूल = योग्य, कर्तृत्ववान; बबदल होऊन = द्रोह करून; वर्कड = इतर [सध्याच्या मराठीत इतर साठी 'वरकड' असा शब्द वापरला जातो, पण बखरीत 'वर्कड' असा उल्लेख आहे]; दिकत = आक्षेप; आडसांगड = कशाही प्रकारे ~ इथे उदा. जेवण करण्यासाठी आयुधे नाहीत, तर 'कारणे सांगू नका, आडसांगडीने करा..' असा अर्थ अभिप्रेत.... थोडक्यात एखाद्या ऑफिसमधील क्लार्कने बॉसला कामाच्या पूर्ततेबाबत कसलीही अडचण सांगायची नाही...बॉस म्हणणार, "आडसांगडीने करा...खरं करा !"; अनीन = लगाम [हा एक नवेच नाम सापडले, अगदी जीएंच्या विदूषक मधील वाटते.]; झोटधरणी = मरणाची झुंज; नरमीना = तलम वस्त्रासारखे ['नरम' शब्दामुळे असेल कदाचित... छान आहे शब्द]; उभाडा = उमाळा; मोडशी उतरली = खोड मोडली; पोळजत्रा = वाताहात; किलाफ = वैर; सरसाल = दरसाल; पायगुंता = लोढणे (हे आपल्या सैन्यासोबत असलेल्या आणि युद्धासाठी नव्हे तर उत्तरेत देवदेव करण्यासाठी आलेल्या बाजारबुणग्यांना उद्देश्यून.)
इन्द्रा
6 Jan 2011 - 11:54 am | परिकथेतील राजकुमार
सुंदर.
धाग्यामुळे अनेक सुंदर प्रतिसाद वाचावयास मिळाले व ज्ञानात भर पडली.
'इंद्रा द प्रतिसादक' नेहमीप्रमाणेच लाजवाब.
6 Jan 2011 - 12:02 pm | इन्द्र्राज पवार
व्वा.....प.रा. याना जर हे प्रतिसाद आवडले म्हणजे 'बेला'लाही आवडले असेच मी समजणार आणि त्यामुळे तिचा हसरा चेहरा नजरेसमोर आल्याने प्रतिसाद टंकण्याचे कष्ट विसरले जाणार.
थॅन्क्स !!
इन्द्रा
6 Jan 2011 - 1:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे
इंद्राभाऊ, उपरोल्लेखित बेला हे मिसळपाव वरील बेला उर्फ बेसनलाडू असतील तर तुमचा काहीतरी घोळ होतो आहे. बेलाशेट हा ती नसून तो आहेत. तरीही त्यांचा हसरा चेहरा नजरेसमोर येऊन तुम्ही कष्ट विसरू शकता. चेहरा कुणाचाही असेना, हसरा असल्यास कष्ट विसरायला होते हे खरे. पराला प्रतिसाद आवडला तर बेलाला आवडतो हे गृहीतक मात्र कळले नाही.
महत्त्वाचे :- तुमचे दोन्ही प्रतिसाद आवडले. तुम्हास माझ्यातर्फे "प्रतिसादक ऑफ द इयर" चे नामांकन देण्यात येत आहे. चेपू किंवा ओर्कुट वर "इंद्रराज पवार पंखा" कम्युनिटी स्थापन करावी म्हणतो.
6 Jan 2011 - 1:34 pm | मी ऋचा
अजून एक, इन्द्रदादा आपल्या मेंदूचा किती भाग वापरात आणतात ह्याबद्दल काही माहिती एखाद्या बखरीत मिळाली तर पहावी म्हणते...;)
6 Jan 2011 - 2:11 pm | इन्द्र्राज पवार
अगं बहिणाबाई....तुझ्या इन्द्रदादाच्या कवटीत मेंदू नावाचा भाग आहे की नाही याबद्दल त्याच्या घरातील ज्येष्ठांचा तसेच शिक्षकांचाही संशोधनाचा विषय आहे, वर्षानुवर्षाचा....त्यामुळे कुठल्याच बखरीत तुला त्याबद्दल काहीच सापडणार नाही....हे अगोदरच सांगून टाकतो..!
इन्द्रा
6 Jan 2011 - 2:07 pm | इन्द्र्राज पवार
"....उपरोल्लेखित बेला हे मिसळपाव वरील बेला उर्फ बेसनलाडू असतील तर तुमचा काहीतरी घोळ होतो आहे....."
~ नोप, नो चान्स ऑर प्लेस फॉर 'घोळ' विश्वनाथ जी. प.रां.च्या विशाल हृदयात एका 'बेला' ने पर्मनंट घर (म्हणजे मराठीत होम) केले आहे....आणि त्यामुळे मला अभिप्रेत असलेली 'बेला' ही 'शी' आहे 'ही' नाही.
[बेसनलाडू माझ्याही परिचयाचे आहेत...जरी ते कधी मला लाडू देत नसले तरी...]
बाकी 'कम्युनिटी' सूचनेबद्दल बद्दल काय लिहू? तेवढ्या पात्रतेचा तुम्ही मला समजता तितका मी नाहीच, पण तरीही अशा नारळातील पाण्यासारख्या निखळ भावनेबद्दल थॅन्क्सच लिहितो....
इन्द्रा
6 Jan 2011 - 1:28 pm | गणपा
इंद्रदाला एक प्रेमळ विनंती आहे की त्यानं या विषयावर एक लेख मालिका चालवावी.
सगळे प्रतिसाद संग्रहकरण्या जोगे आहेत.
6 Jan 2011 - 3:54 pm | गणेशा
खुप छान चर्चा झाली .. वाचुन छान वआटले ..
धागाकर्ते आणि इंद्राजी यांचे खुप आभार
6 Jan 2011 - 4:19 pm | पुष्करिणी
मस्त धागा आणि चर्चा..
इंद्रदेवांचे प्रतिसाद छानच!
6 Jan 2011 - 5:01 pm | देशपांडे१
+१
मस्त धागा आणि चर्चा..
इंद्रदेवांचे प्रतिसाद छानच!
6 Jan 2011 - 7:57 pm | विकास
इंद्रदेवांचे प्रतिसाद छानच!
7 Jan 2011 - 2:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत.
चिंजं आणि इंद्राचे आभार.
7 Jan 2011 - 2:54 am | चित्रा
इंद्रांचे भांडार संपतच नाही. धन्यवाद.
7 Jan 2011 - 3:46 am | बेसनलाडू
जंतूंचा धागा आणि पवारसाहेबांचे प्रतिसाद दोन्ही अत्युत्तम आणि पुनर्वाचनीय!
(वाचक)बेसनलाडू
15 Jan 2011 - 3:44 pm | अर्धवट
नेहेमीचंच म्हणतो.. इंद्रदेवांचा विजय असो