नाताळचा फराळ!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
24 Dec 2010 - 1:59 pm

याआधी-
नाताळची चाहूल!
फ्रोह वाइनाख्टन!

आपल्याकडे दिवाळीच्या आधी एखादा आठवडा घराघरातून लाडवासाठी बेसन भाजल्याचे, चकली, कडबोळ्यांच्या तळणीचे, चिवड्याच्या खमंग फोडण्यांचे वास यायला लागतात आणि 'दिवाळी जवळ आली' ही वार्ता त्या दरवळाबरोबर पसरते. जर्मनीमध्ये नाताळासाठी असा फराळ करायची पद्धत आहे. वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे नाताळफराळ म्हणून केली जातात. त्यातल्याच काही पाककृती-

१) बुटरप्लेटझन- लोणीयुक्त बिस्किटे. आमच्या आकिमआजोबांच्या आईची ही कृती. आपण कसे अगदी जरी सगळ्या फराळाची 'आर्डर' दिली तरी निदान करंज्या घरी करतो, तशी ही बिस्किटे तरी आजीकडे नाताळात हवीतच.
साहित्य- ३०० ग्राम मैदा, २०० ग्राम बटर/लोणी/मार्गारिन, १०० ग्राम साखर, १ चिमूट मीठ, १ चहाचा चमचा बेकिंग पावडर
कृती- बटर चांगले भरपूर फेटणे‌. त्यात साखर घालून पुन्हा फेटणे. मैदा+बेकिंग पावडर+ मीठ एकत्र करणे. लोणी+साखरेचे फेटलेले मिश्रण त्यात घालणे व चांगले मळणे.प्लास्टीक फॉईल मध्ये गुंडाळून ४० ते ४५ मिनिटे फ्रिज मध्ये ठेवणे. नंतर बाहेर काढून पोळीसाठी घेतो त्याहून थोडा मोठा गोळा घेणे व जाडसर पोळी लाटणे. हव्या त्या आकारांच्या साच्यांनी बिस्किटे कातणे. साचा नसेल तर लहान वाटीने गोल आकाराची बिस्किटे कातणे. कातून उरलेल्या भागाची परत पोळी लाटून परत बिस्किटे कातून घेणे. असे सर्व गोळा संपेपर्यंत करणे. बेकिंगट्रेमध्ये बेकिंग पेपर घालून त्यावर ही बिस्किटे थोडे अंतर राखून ठेवणे.
१८० अंश से. वर १५ ते २० मिनिटे बेक करणे.

२) श्नेवाल्ड प्लेटझन- हिमवनातली बिस्किटे.
साहित्य- १४० ग्राम बटर, ७० ग्राम साखर, ३५० ग्राम मैदा, २ अंड्यातील फक्त पिवळे बलक - यातील पांढरे पुढच्या कृतीसाठी वेगळे ठेवणे. थोडे दूध(साधारण १/४ कप), १ चिमूट मीठ, आवडीचा कोणताही जाम, किवा २, ३ प्रकारचे जाम.
कृती-बटर भरपूर फेटणे. साखर घालून फेटणे. अंड्याचा पिवळा बलक घालून फेटणे. मैद्यात चिमूटभर मीठ घालणे. थोडा थोडा मैदा घालत फेटणे. दूधाचा हात लावून नंतर चांगले मळणे. ह्या गोळ्याचे चपटे पेढ्यासारखे गोळे करणे आणि प्रत्येक गोळ्याला मध्ये मोठा खळगा करणे. १६० अंश से वर ही बिस्किटे २० -२५ मिनिटे मंद बेक करणे. गार झाली की त्यातील खळग्यात हवे ते मार्मालेड/जाम भरणे आणि एका ताटात लावून ठेवणे. ५/६ तासांनी जाम सेट झाला की चपट्या डब्यात भरणे.

३) गेव्युर्झ लेबकुकन- मसाला बिस्किटे. दक्षिण जर्मनी, विशेषतः म्युनिकमधील खासियत असलेली ही बिस्किटे. आमची त्सेंटाआजी म्युनिकजवळच्या वालरस्टाईन ह्या खेड्यातली असल्याने नाताळात ही बिस्किटे सुद्धा हवीतच.
साहित्य- ७५ ग्राम बटर, २५० ग्राम साखर,४ चहाचे चमचे दालचिनी पावडर, १/२ चहाचा चमचा लवंग पावडर, १/२ चहाचा चमचा जायफळ पावडर, १०० ग्राम वाळवलेल्या लिंबे व संत्र्याच्या सालांची पावडर, १२५ ग्राम हेझलनटपावडर किवा बदामपावडर, ३७५ ग्राम मैदा, ३ चहाचे चमचे बेकिंग पावडर, १/४ कप दूध, १ चिमूट मीठ व २ अंड्यातील पांढरे (हिमवन बिस्किटातले उरलेले पांढरे घेता येईल)
कृती- बटर भरपूर फेटणे‌. साखर घालून फेटणे. अंड्यातील पांढरे घालून फेटणे. वरील सर्व मसाला घालणे व फेटणे. लिंब व संत्र्याच्या सालीची पूड घालून फेटणे. दूध घालून सारखे करणे. हेझलनट किवा बदाम पावडर घालणे व सारखे करणे. मैदा+बेकिंग पावडर+मीठ एकत्र करून वरील मिश्रणात घालणे व फेटणे. बेकिंग ट्रेमध्ये बेकिंगपेपर ठेवून त्यावर अंतराअंतरावर त्या मिश्रणाचे सांडगे घालणे.
१८० अंश से. वर १२ ते १५ मिनिटे बेक करणे.

४) नुस मार्कोनन- नट्स बिस्किटे
साहित्य- २०० ग्राम साखर, २ चमचे वॅनिला अर्क, १२५ ग्राम कुकिंग चॉकलेटचा कीस किंवा कोको पावडर, २५० ग्राम बदाम पावडर, १ चिमूट मीठ, ३ अंड्यातील पांढरे (यातील पिवळे बलक पुढील पाककृतीसाठी वापरता येते.)
कृती- अंड्यातील पांढऱ्यात चिमूटभर मीठ आणि असेल तर लिंबाचा रस चमचाभर घालणे आणि भरपूर फेटणे, इतके की त्याचा पांढरा घट्ट फोम तयार होतो. हा हिमाप्रमाणे दिसतो त्यामुळे त्याला आयश्ने (अंड्याचे हिम) म्हणतात.
साखरेत व वॅनिला अर्क ह्या आयश्नेमध्ये घालणे व भरपूर फेटणे. कोको पावडर किवा चॉकलेटकीस घालून फेटणे. मग बदाम पावडर घालून एकत्र करणे.
बेकिंग ट्रेमध्ये बेकिंग पेपर घेऊन त्यावर ह्या मिश्रणाचे सांडगे घालणे.
१३० ते १५० अंश से वर २५ मिनिटे बेक करणे.

५) शिंगांची बिस्किटे आणि चांदण्या
साहित्य-२०० ग्राम बटर, ३०० ग्राम साखर, ३७५ ग्राम मैदा, ३ अंड्यातले पिवळे बलक. (वरील नटस बिस्किटातील अंड्यांमधील पिवळे बलक इथे वापरता येते)
कृती- बटर भरपूर फेटणे नंतर साखर घालून भरपूर फेटणे. अंड्याचा पिवळा बलक घालून फेटणे. मैदा घालून फेटणे. तयार झालेया गोळ्याचे २ भाग करणे.

प्रकार १ : शिंगांची बिस्किटे
वरील गोळ्यांपैकी एक भाग गोळा घेणे. त्यात १०० ग्राम बदाम पावडर व १ चमचा वॅनिला अर्क घालणे. चांगले मळणे. आता ह्या गोळ्याचे छोटे छोटे शिंगांसारखे/ अर्धचंद्राकृती आकार तयार करणे.
बेकिंग ट्रेमध्ये बेकिंग पेपर ठेवून त्यावर ही बिस्किटे ठेवणे आणि १७५ अंश से वर १५ ते २० मिनिटे बेक करणे.

प्रकार २: शोकोस्टेर्न- चॉकलेटच्या चांदण्या
गोळ्यातला उरलेला भाग घेणे, त्यात ७५ ग्राम कोको व ५० ग्राम हेझलनट पावडर किवा बदाम पावडर मिसळणे. चांगले मळणे. जाड पोळी लाटून चांदणीच्या आकाराने कातणे, अथवा हवे त्या आकाराने बिस्किटे कातणे. नाताळातले चांदणीचे महत्त्व लक्षात घेता किरिस्तावमंडळी चांदणी आकारात बिस्किटे काततात आणि म्हणूनच त्याला चॉकलेट चांदण्या म्हणतात.
१७५ अंश से वर १२ -१५ मिनिटे बेक करणे.

नाताळच्या मेजवान्या सुरू झाल्या की ह्यातील अनेक प्रकारची बिस्किटे घरी बनवून मेजवानीसाठी खास आणणारे आमचे बरेच मित्रमैत्रिणी आहेत. आपण जसा फराळ एकमेकांकडे देतो तसं ही मंडळीही नाताळ फराळाच्या पुड्या नातलगांना, मित्रमैत्रिणीना देतात. आमच्या आजोबांचे मित्र विमेलमान आजीआजोबांकडून त्यांनी स्वतः बनवलेली फराळपुडी आम्हालाही दरवर्षी भेट येतेच.
फ्रोह वाइनाख्टन! मेरी ख्रिसमस!!!

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2010 - 2:04 pm | परिकथेतील राजकुमार

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Dec 2010 - 7:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

भूक लागली ...

स्वातीताईंनी रिकामा लेख कसा काय टाकला ब्वॉ? काहीच दिसत नाहीए. असो, बरंच झालं. ;-)

सहज's picture

24 Dec 2010 - 2:06 pm | सहज

इतके गोड म्हणल्यावर काहीतरी तिखटामिठाचे पदार्थ पाहीजे आहेत :-)

यशोधरा's picture

24 Dec 2010 - 2:16 pm | यशोधरा

मला पाकृंचे फोटो दिसत नाहीयेत, पण भन्नाटच असतील! :)
मस्त आहेत पाकृ :) कधीतरी खाऊही घाल ;)

कच्ची कैरी's picture

24 Dec 2010 - 3:07 pm | कच्ची कैरी

मग उद्याच येते खायला ,कारण तोंडाला पाणी सुटले आहे फोटो बघुन.

गणपा's picture

24 Dec 2010 - 3:53 pm | गणपा

खपलो........ वारलो..... मेलो.........

प्राजक्ता पवार's picture

24 Dec 2010 - 4:04 pm | प्राजक्ता पवार

छान :)

सुनील's picture

24 Dec 2010 - 4:19 pm | सुनील

बिस्कुटांच्या पाकृ मस्तच पण वर सहजराव म्हणतात तसे फक्त गोडाच्याच पाकृ का? एखादी तिखटमिठाचीदेखिल येऊदे!

फिदा.. बिस्कुटांच्या कैच्याकै पाककृती पाहून मनात बिस्कुटे खायची इच्छा जागृत झाली आहे...

- पिंगू

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Dec 2010 - 10:10 pm | निनाद मुक्काम प...

मुद्देसूद व सविस्तर माहिती दिली आहे .
बाकी परत एकदा अनिता (माझ्या सासूच्या हातचा फराळाचे फोटो देण्याचा मोह होत आहे .)
खाल्या साखरेला सुध्धा जागावे लागते .

सगळी बिस्किटे आवडली.
यावेळी फोटूंना बॉर्डरी लावल्यात, त्या लेससारख्या दिसतायत.

विलासराव's picture

24 Dec 2010 - 9:32 pm | विलासराव

माझा पत्ता देउ का?
परत परत सांगायला नको.
नवीन काही बनवलं की द्या पाठवुन.

प्राजु's picture

24 Dec 2010 - 10:07 pm | प्राजु

.....................................
........................
.........................

संपलं!!

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Dec 2010 - 10:24 pm | बिपिन कार्यकर्ते

निवेदिता-ताई's picture

25 Dec 2010 - 2:35 pm | निवेदिता-ताई

सुंदर..............झकास.................अशी सोप्पी बिस्किटे....करुन पाहिलीच पाहिजेत..

स्वाती२'s picture

25 Dec 2010 - 5:55 pm | स्वाती२

मस्त!

स्वाती दिनेश's picture

29 Dec 2010 - 4:36 pm | स्वाती दिनेश

खवय्यांनो, धन्यवाद.
ह्या नाताळ फराळात तिखटामीठाचे पदार्थ फारसे नसतातच,सगळेच गोडाळ गोडाळ..:)
म्हणूनच मग आजी आजोबा खार्‍या शंकरपाळ्यांची, ढोकळा, भजी अशा चटकमटक पदार्थांची मागणी करतात.
अशीच एखादी चटकदार पाकृ लवकरच देते.
स्वाती

छोटा डॉन's picture

29 Dec 2010 - 4:46 pm | छोटा डॉन

>>म्हणूनच मग आजी आजोबा खार्‍या शंकरपाळ्यांची, ढोकळा, भजी अशा चटकमटक पदार्थांची मागणी करतात.
अशीच एखादी चटकदार पाकृ लवकरच देते.

हो हो, येऊदेत लवकर.

नाहीतरी मला 'गोड पदार्थ' आवडत नाहीतच, कशाला उगाच चरबी वाढवुन घ्यायची. ;)
लोकं कशी खातात ते त्यांच त्यांना माहित.

ती चटकदार पाकृ ( आणि आम्हाला पार्सल ) लवकर येऊदेत :)

- छोटा डॉन

विलासराव's picture

2 Jan 2011 - 9:43 pm | विलासराव

पार्सल पाहिजे म्हण्जे पाहिजे.