शनिवार रविवार म्हणजे मोक्षवार. सकाळी उठून आलेयुक्त चहासोबत दोन दोन लठ्ठ पेपर समोर दिसले की ब्रम्हानंद होतो हे पेपरप्रेमींना सांगणे नलगे.
आम्ही टायगर कडक पत्ती चहा (वाघासारख्या मर्दांसाठी..) वापरत नाही तरीही चहाचा पहिला घोट कडू होतो तो पेपर बघून.
नाय नाय..
"पेपरात बघावं तर काय? रोजचे खून, राजकारण, बलात्कार, बाई बाई गं..नको वाटतं अगदी"
..असले लेख खूप जुने झाले.
तसलं काही ल्हिवायचा विचार नाही. जे काय चाललंय ते व्याडेश्वरकृपेने उत्तम चालले आहे असे म्हणू..
..माझं डोकं जातंय ते अशासाठी की पेपरात वाचायला असा कायबी "मजकूर"च नाही.
(क्वालिटी नव्हे..क्वांटिटी....!!!!)
टी.व्ही.वर ब्रेक जास्ती आणि सिर्वल कमी अशी बोंब करता करता आमच्या हक्काचा पेपरही जाहिरातीनी भरलेला असला तर काय करायचं?
भरलेला म्हणजे किती हे आपण सगळे बघतोच. पण तरी आपल्याला अंदाज येत नाही की हे प्रमाण नेमकं किती आहे.
मी पेटून उठलो कुछ करिये कुछ करिये..म्हणत काहीतरी केलं..
हातातल्या फोनवर खटाखट त्या पेपरचे नग्न फोटो काढले.
मग त्या पेपरच्या मालकांनी किंवा इतर कोणी माझ्यावर काही कंटेंट चोरीचे भलते आक्षेप घेऊन मूळ मुद्दा बाजूला पडू नये म्हणून त्यातला मजकूर धूसर केला.
त्यानंतर त्यातला जाहिरातीचा एरिया मार्क करून घेतला आणि त्याला (रं*बाज गुलाबी शेडचा) कलर फासला.
ते फासकाम खाली देतोय. आणि मग काही प्रश्न उभे करणार आहे. चीड जबरदस्त आहे कारण या सर्वात माझा चहा दोनदा थंड झाला होता.
एका (लीडींग) दैनिकाच्या एका दिवशीच्या (शनिवार) एकाच इश्यूची ही पानं आहेत. सर्व प्रमुख पानं कव्हर केली आहेत. मूळ प्रत मजजवळ आहे. निम्ननिर्दिष्ट फोटो संपतात त्याखाली अजूनही महत्त्वाचा मजकूर आहे तो पूर्ण वाचावा अशी विनंती चरणी अर्पण करतो.
..बर्याच पानांची पूर्णच्या पूर्ण आख्खी थोबाडंच लाजेने गुलाबी झालेली दिसतील..
..........
ही समोरासमोरची दोन पाने आहेत..मुख्य मुखपृष्ठ पूर्ण पान जाहिरातीचंच होतं म्हणून आता हे आतलं पेज मुखपृष्ठ बनलंय. त्यातही सगळा आनंदच आहे. डावं पान पूर्ण जाहिराती. उजवं पान, जे खरोखरचं मुख्य पान असायचं तिथे तीन स्लॉट जाहिराती. एरव्ही याहूनही खूप जास्त असतात. हे एक चांगलं उदाहरण म्हणावं लागेल.
.....................................
ही सुद्धा समोरासमोरची दोन पाने आहेत..उगीच तेवढा बिचारा छोट्टासा चौकोन कशाला बातमीसाठी वाया घालवला..? की तीही पेड न्यूज?
......................................
इथे उजवं अर्ध्याहूनही कमी पान बातमीला दिलंय ते कोणत्या लाजेखातर ठाऊक नाही.
.......................................
खालच्या फोटोत वर हेडिंगला जो काही गुलाबी नसलेला भाग दिसतोय ती बातमी वगैरे नाही बरं का. नुसतं टायटल आहे पेपरचं.
हे एक सिंगल पान आहे..एकुलता सिंगल कॉलम सोडलाय बातमीसाठी..धन्यवाद..
..................................
..चक्क अर्धे पान भरुन बातमी लेख वगैरे..हे पूर्ण पेपरातलं सर्वाधिक मजकुराचं मानाचं पान असावं..
.....................................
ही दोन समोरासमोरची पाने आहेत..
...........................................
ही सुद्धा ही दोन समोरासमोरची पाने आहेत..
..........................................
हे एक सिंगल पान आहे..यावर तर एक शब्दही मजकूर नाही.
............................................
हा सर्व गुलाबी रंग बघून दिसली ना नेमकी किती जागा जाहिरातींना आहे आणि किती मजकुराला?
आता माझे मुद्दे.
१) हे मान्य की वर्तमानपत्रांचं प्रमुख उत्पन्न "जाहिराती"च आहे, वाचक स्टॉलवर देतात ते दोन अडीच रुपये नव्हे.
२) जाहिराती वाचकालाही उपयोगी असतातच.
३) जाहिराती कमी केल्या तर पेपराची किंमत अव्वाच्या सव्वा वाढून वाचकांवरच बोजा पडेल.
तरीही
१) वाचकाला वाचण्यासारख्या अश्या बातमी/लेखरूप मजकुराला दहा-वीस टक्के सुद्धा जागा नसावी का?
(...वर पुरावा दिला आहे आणि आपण कोणीही स्वहस्ते एक लीडिंग मराठी पेपर उचलून कमीजास्त फरकाने हे सिद्ध करु शकता.)
२) समजा जाहिरातींच्या बाहुल्यामुळे इतकीच केविलवाणी जागा मजकुराला उरत असेल तर पाने वाढवत का नाही?
३) ते ही शक्य नसेल तर निदान पेपर वाचकांना फुकट का देत नाही? आम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के जाहिरातींनी भरलेला पेपर स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करुन विकत घ्यावा लागणे ही फसवणूक नाही का?
४) तुम्ही, म्हणजे हे वाचणारे.. फुल पेज जाहिरात (अगदी मुखपृष्ठाऐवजीसुद्धा) बघून वैतागत नाही का?
५) जाहिरात देणार्या कंपनीने कितीही पैसे मोजले असले तरी, पेपरचे तोंडच मुळी (हेडलाईन ऐवजी) एका भल्या मोठ्या जाहिरातीच्या स्वरुपात दिसावे ही पेपरची मुस्कटदाबी नाही का?
प्रतिक्रिया
21 Dec 2010 - 4:56 pm | यकु
पब्लिक लई पेटलंय आज...!!!!!!
ज्योतिषांनी हे भाकीत कसं काय केलं नव्हतं..????
होऊन जाऊ द्या या निमित्ताने पेपरवाल्यांची बिनापाण्याने..
मला तर एक व्यंगचित्र नेहमी सुचतं पेपर वाचला की...
वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.. तर चार आधारस्तंभावर लोकशाही तरंगत असलेली दाखवायची आणि त्यातल्याच वृत्तपत्राच्या स्तंभाला भोक पाडून, त्यावर शेटजी छाप लोकांनी स्वतःच्या झोपड्या उभ्या केल्याचे दाखवाय्चे.. ;-)
21 Dec 2010 - 4:59 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त लेखन.
हे लेखन वाचुन परवाच आमचे परम मित्र श्री. दिपक ह्यांनी पाठवलेला हा फोटु आठवला.
21 Dec 2010 - 10:52 pm | आत्मशून्य
मग त्यानी पाहीला काय ? महासत्ता न्हवे चीत्रपट ?
21 Dec 2010 - 5:02 pm | छोटा डॉन
तुमची चीडचीड समजते आहे.
अहो तर तुमचे नशिब समजा जर पुणे, मुंबई, नाशिक एडिशन पहात असाल.
जर तुम्ही चुकुन ह्याच वृत्तपत्रांच्या ( इंग्रजी क्षमस्व ) सोलापुर, औरंगाबाद, कोल्हापुर ह्या एडिशन पाहिल्यात तर येडं लागेल !
अहो तुमच्याकडे जाहिराती तरी बर्या असतात ( म्हणजे मॉल्स, शुज, स्पोर्ट्स वेअर, कपडे आदी तत्सम ), इकडे तो ही चॉईस नाही, इकडे फक्त इथल्या 'लोकल टिनपाट नेत्यांचे' उगाच उठसुठं 'अभिनंदन, शुभेच्छा, कौतुक' अशाच जाहिराती असतात.
बाकी ह्यांना कोण आवरणार ?
कोणीच नाही , ते शक्यच नाही.
"११ रुपायात ४ माहिने ... , रोज १ रुपायाला ... " अशा स्कीममुळे भराभर सर्क्युलेशन वाढते.
पेपर फेमस होतो, जाहिरातीचे रेट्स आणि इच्छुकही वाढतात, मजकुर कमी होत जातो, जाहिराती वाढल्या की अजुन रेट्स ( पेपरचे मुल्य, जे आपण देतो ते ) कमी होतात, अजुन खप वाढतो .... हे चक्र चालु रहाते !
असो.
- छोटा डॉन
21 Dec 2010 - 5:03 pm | गणेशा
आपले मुद्दे तंतोतंत पटतात .. असेच मलाही वाटायचे ..
मुखपृष्ठ्च जाहिरीतींचे पाहुन तर रागच यायचा ..
आपण दिलेले वरील फोटो दिसले नाही .. पण माझे ही मत असेच आहे त्यावरुन कळाले कोणते फोटो असतील ते
21 Dec 2010 - 5:40 pm | इंटरनेटस्नेही
मी कोणत्याही पेपरचे नाव घेऊ इछित नाही.. पण असाच एक उभ्या महाराष्ट्राचा पेपर आहे त्यातल्या पोरींचे फोटो बघुन तर आम्हाल क्षणभर एका विशिष्ट याहु ग्रुपवर आलोय का असा प्रश्न पडतो.. हा तोच पेपेर ज्यांनी दक्षिण मुंबईतल्या 'त्या' गृहसंकुलाची पाठराखण करण्यार्या आणि त्यामुळे अडचणीत आलेल्या एका प्रमुख नेत्याची पेड न्युज छापली होती!
21 Dec 2010 - 6:08 pm | सूर्यपुत्र
दररोज सकाळी आजचा पेपर आणण्यापेक्षा कालचा पेपर आणावा... रद्दीच्या भावात तरी मिळेल. :D
21 Dec 2010 - 6:45 pm | नगरीनिरंजन
मुद्दे पटले आणि चीड पोचली. पेपर विकत न घेणे हाच एकमेव उपाय.
22 Dec 2010 - 10:33 am | मुलूखावेगळी
>>मुद्दे पटले आणि चीड पोचली. पेपर विकत न घेणे हाच एकमेव उपाय.
--१
अहो पण पेपर ही गोष्ट बहुपयोगी आहे त्यामुळे हा उपाय नाय पटत.
21 Dec 2010 - 7:09 pm | स्पा
मुद्दे पटले आणि चीड पोचली. पेपर विकत न घेणे हाच एकमेव उपाय
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
21 Dec 2010 - 7:04 pm | रेवती
त्यांच्या जाहिरातींसाठी आपण पैसे मोजायचे. किती जाहिराती आपल्याला उपयोगी असतात?
जालीय वृत्तपत्रातही अश्याच पान भरून जाहिराती असतात.
21 Dec 2010 - 10:59 pm | आत्मशून्य
.
21 Dec 2010 - 11:27 pm | डावखुरा
आत्म्शुन्य हे गम्तीत की गंभीर हे स्पष्ट करा राव..
21 Dec 2010 - 11:47 pm | आत्मशून्य
आगतीक...आगतीक...आगतीक...आगतीक...
22 Dec 2010 - 12:41 am | डावखुरा
आगतिक म्हण्जे गंभीर असा अर्थ घ्यावा का?
जर तसे असेल तर काय होणार आहे चेपु वर आंदोलुन?
22 Dec 2010 - 1:07 am | आत्मशून्य
जर तसे असेल तर काय होणार आहे चेपु वर आंदोलुन?
- सहमत
खरे तर काय्दाच पाहीजे प्रत्येक पानाच्या कीती % जागा जाहीरातीनी व्यापावी अथवा पेपर मोफत द्यावा, पण हे अथवा पेपर घेणे थांबवने शक्य नसल्याने आपण तूर्त ................................................................ समाधान मानूया.
मी मागच्या वर्शीच टा*स*फ*** बंद केला ह्याच कारणाने.
22 Dec 2010 - 1:15 am | डावखुरा
यासाठी प्रयत्न होउ शकतात ...
खरे तर काय्दाच पाहीजे प्रत्येक पानाच्या कीती % जागा जाहीरातीनी व्यापावी
21 Dec 2010 - 11:26 pm | डावखुरा
माफ करा गगनविहारी मला तर आवडतात बॉ जाहिराती पण माझा तुमच्या संतापाला विरोध नाही...
तुमचेही बरोबर आहे...खरंतर तुमचेच बरोबर आहे..
मी तर १५ ऑगष्ट,२६ जान. अशा विशिष्ट वेळी सगळे चांगले पेपर विकत आणतो फक्त जाहिरातींसाठी बरंका..
22 Dec 2010 - 5:58 am | गुंडोपंत
वा अगदी मनातले लिहिले आहे. मी ही हेच म्हणतो!
क्यामेरा असलेला फोनचा चांगला उपयोग केल्याबद्दल अभिनंदन.
हे फोटो आणि लेख त्या वर्तमानपत्राच्या संपादकालाही तसेच मालकाला पाठवा!
22 Dec 2010 - 10:47 am | गवि
त्यांना पाठवून काय उप्पेग? त्यांना काय माहीत नाही..
त्यांनीच खपून केलाय तो लेआउट डिझाईन. आणि रोजच करताहेत.
वाचकांना काय वाटते ते त्यांना कळत असेलच. तरी आपलाही पावशेर वाटा या निषेधात असावा म्हणून (माझ्या व्यक्तिगत) ब्लॉगपेजची लिंक पुरेसे प्रतिसाद आल्यावर (आले तर) त्यांच्याकडे पाठवीन.