न पटणारे शब्द.....
मला हे शब्द बाजीप्रभुंचे असतील असं वाटत नाही, अगदी कितीही काव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला तरी सुद्धा.
सरणार कधी रण प्रभो तरी हे
कुठ्वर साहु घाव शिरी
बाजीप्रभुंचा इतिहास पुन्हा लिहावा ह्याची गरज नाही,त्या महात्म्याला माझे कोटि कोटि दंडवत. महाराजांना विशाळगडाकडे पाठ्वुन दिल्यानंतर मागुन येणा-या विजापुरी सेनेचा नायनाट करण्यासाठी घोडखिंडीसारख्या अतिशय अवघड ठिकाणाची निवड करणा-या त्या सेनानीच्या मनात असे विचार येणंच शक्य नाही. त्या रात्रिच्या त्या गोंधळात या अशा ठिकाणाची माहीती डोक्यात ठेवुन आणि तिचा असा योग्य वापर करण्याची बुद्धिमत्ता असणारी व्यक्ति असा पळपुटा विचार करणंच शक्य नाही.
पन्हाळ्याच्या वेढ्यातुन निघाल्यावर घोडखिंडितुन महाराजांना पुढे पाठवायचा निर्णय जेंव्हा बाजीप्रभुंनी घेतला असेल, तेंव्हाच त्यांना व बरोबर असलेल्या बांदल सेनेला आपले भविष्य माहित होतंच. ही लढाई अनपेक्षित नव्हतीच, जाणुन बुजुन समजुन उमजुन अंगावर घेतलेले हे रण होतं.
महाराज घोडखिंडीतुन निघाल्या पासुन ते विजापुरी सेना तेथे पोहोचेपर्यंत कितिसा वेळ मिळाला असेल त्या महाविरांना विचार करायला, आणि जो मिळाला असेल त्यात त्यांची एकच विचार केला असेल, आज माझ्या तलवारीनं किती मुंडकी उडवेन, किती हात पाय तोडेन. त्यातच काही जुनी वॆरं पण असतीलच. इथं काही मुत्सद्दीपणा वगॆरे पणाला लागायचाच नव्हता. काही दिवसांपुर्वी प्रतापगडाच्या पायथ्याला जे महानाट्य घडलं होतं ते आता मागं पडलं होतं, आज फक्त होणार होता तो रणमर्दिनी महिषासुरमर्दिनीला प्रसन्न करण्यासाठी शतमुंड किंवा सहस्त्रमुंड अभिषेक. होतं ते फक्त एकच ध्येय येणारा गनिम कापुन ठेवायचा.
माझा राजा सुरक्षित होईपर्यंत लढत राहायचं होतं पण ते झाल्यावर सुद्धा जिवंत राहण्याची शक्यता नव्हतीच, छे तो विचार नव्हताच कोणाच्या मनांत. उभा राहिलेली प्रत्येकजण दहा विस जणांना मारुन मरण्यासाठीच उभा होती. फक्त वाट पहात होते ते त्या विजापुरी सेनेची. गनिम आला की तोडायचा बास एवढेच, आपण तुटेपर्यंत त्याला तोडायचा. एकच ध्यास एकच आज्ञा होती मारा मारा आणि मारा. तो हरामखोर सुडाने पेटुन उठलेला गनिम या जागेच्या पुढे जाता कामा नये.
अफजलखानाच्या वधानंतर विजापुर दरबार सुद्धा पेटुन उठला होता, त्यांची ही शक्ती काही कमी नव्हती, जेवढी विरता मर्द मराठ्य़ांत होती तेवढीच त्यांच्यात पण होती. येणा-या लाटा या वादळीच असणार होत्या. आपल्या एका मोठ्या सरदारचा कत्ल आणि आता पन्हाळ्याचा वेढा या अशा पावसाळी रात्री तोड्णे ह्यांचं आश्चर्य ओसरेपर्यंत त्या विजापुरी सेनेला एक मोठा दिलासा मिळाला होता, या सगळ्यामागचा म्होरक्या सिवाजी पकडला गेला होता, पण हाय रे कंबख्त हे काय तो पण नकली. आणि हे समजल्यावर ते शांत थोडेच बसणार होते. शत्रुला नेस्तनाबुन करण्याच्या भावनेपेक्षा पुन्हा पुन्हा होणा-या या अपमानांचा बदला त्या सेनेला घ्यायचा होता. अपमान आणि सुडानं पेटलेली विजापुरी सेना आपल्यावर चालुन येणार आहे याची पुर्ण कल्पना बाजीप्रभुंना व त्यांच्या बरोबरीच्या मावळ्यांना होतिच.
मारु आणि नंतर मरु ही तयारी बाजीप्रभुंनी आपल्या साथिदारांची करुन घेतलीच असेल त्या मिळालेल्या थोड्याश्या वेळांत. मग तोच महाप्रतापी लढवय्या हे असं म्हणेल का ? नाही कधीच नाही.
क्रमश :
प्रतिक्रिया
15 Dec 2010 - 11:44 am | मृत्युन्जय
हर्षद साहेब पुर्वी देखील या विषयावर चर्चा झालेली आहे.
http://misalpav.com/node/10031
15 Dec 2010 - 11:59 am | रणजित चितळे
पण तरी सुद्धा मला वाटते ह्यात एक शिवाजी बद्दलची काळजी व्यक्त झाली आहे.
बाजीप्रभु ला असे तर म्हणायचे नाही ना की - तो जिवंत असे पर्यंत शिवाजी शक्यतो लांब जाईल व पोहोचेल विशाळगडावर. व हे लवकर होऊदे. जेवढे पटकन होईल तेवढे छान. रणांगणात कधी कोणाचे पार्डे जड होईल हे सांगता येत नाही.
15 Dec 2010 - 12:11 pm | विजुभाऊ
बाजी प्रभू जवळजवळ २० तास लढत होते. अंगावर झेललेल्या घावानी रक्त वाहून ते थकले होते
सरणार कधी रण प्रभो तरी हे
कुठ्वर साहु घाव शिरी
हे वाक्ये ही एक कवीकल्पना आहे. बाजीप्रभूनी अशी वाक्ये मनात आणली असतील ती केवळ माझा राजा सूखरूप पोहोचू देत. बाजी प्रभूनी देवाला आलवले आहे. माझ्या शरीरात प्राण आहे तोवर मी लढेन आणि शत्रू ला थोपवेन. फक्त रयतेचा राजा सूखरूप पोहोचू देत हीच विनवणी बाजी प्रभू देवाला करत असतील. हे देवा लवकरात लवकर राजा गडावर पोहोचू देत आणि माझी लढाई संपू दे. राजा सूखरूप पोहोचल्यानन्तर कर्तव्य पूर्तीच्या आनन्दात मी मरेन.
अजून कुठवर शरीरावर घाव सोसायचे. वेदनानी व्याकूळ झालेल्या जीवाला मुक्ती हवी होती ती देखील कर्तव्य पूर्तीनन्तरच.
15 Dec 2010 - 12:23 pm | गवि
त्या जखमी स्थितीतही त्यांच्यावर वीररसाने स्फुरत राहण्याची सक्ती कशाला.
वाटले असेल तसे..त्या वेदनाव्याकुळ अवस्थेत पोचल्यावर.
शिवाय वर इतरांनी म्हटल्याप्रमाणे "हे लवकर संपू दे..राजा सुरक्षित पोहोचू दे.." अशी भावना असेलच.
कदाचित "राजा सुरक्षित पोचला आणि तोही वेळेतच तर त्याच्या पुढील सेवेसाठी जिवंत राहायची संधीही कदाचित मिळेल" अशी आशाही असेलच. जीव द्यायची तयारी आहे पण वाचला तरी हवे आहे, अशीच स्थिती नैसर्गिक नाही का?
असेच घाव अजून खूप काळ झेलत राहावे तर अंत नक्की हे दिसल्यावरही माणसाची कामाविषयीची "पॅशन" तितकीच धगधगती राहावी असे कसे म्हणावे?
माकडिणीच्या गोष्टीप्रमाणे मनुष्यप्राण्यातली आई आणि पिल्लू वाढत्या पाण्यात बुडत आहेत. मातृत्वाच्या भावनेने आईने बाळाला डोक्यावर धरून वाचवण्याची शर्थ चालवली आहे. तिच्या नाकाशी पाणी आले तरी तिने बाळाला वर धरले आहे. अशा स्थितीत तिने
"आता तरी पाणी लवकर ओसरावे बुवा",
"किती वेळ असे मरणाची वाट पाहात उभे राहायचे. आणि किती वेळ आपण बाळाला वाचवून उंच धरु शकू",
"आपण जिवंत राहिलो तरच बाळाला वाचवणार ना?"
"लवकर पाणी ओसरले तर आपण दोघेही जिवंत राहू नशिबाच्या कृपेने.."
वगैरे.... अशी काळजी व्यक्त करणे म्हणजे मातृत्वाला आणि तिच्या "जिगर"ला न शोभणारे विचार नव्हेत.
15 Dec 2010 - 5:34 pm | शैलेन्द्र
एका चर्चेत मीच असा विचार मांडला होता... मला सगळ्यांनी झोडपुन काढले, पण माझे मत अजुनही कायम आहे...
हे जिवन-मरणावरच रुपक आहे... पावण्खिंडीचे रुपक वापरुन कवीने आयुष्यावर कवीता केलिय...
आज कुणितरी वेगळा विचार करणारा भेटला याचे समाधान आहे.
(परत भांडायला तयार)
शैलेन्द्र
15 Dec 2010 - 7:34 pm | मेघवेडा
>> मला हे शब्द बाजीप्रभुंचे असतील असं वाटत नाही, अगदी कितीही काव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला तरी सुद्धा.
कुसुमाग्रजांचे शब्द आहेत, बाजीप्रभूंचे नाहीतच! ;) गंमत जाऊदे पण अहो कविकल्पना आहे ती. कुसुमाग्रजांनी अथक झुंजणार्या एका योद्ध्याची भावनिक स्थिती मांडायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे आपण आपापल्या कुवतीनुसार आकलन करायचे. मग कुणाला त्यात जीवन-मरणाचे रूपक दिसते तर कुणी म्हणतं महाराजांच्या काळजीनं त्यांच्या मनात असे विचार येत असावेत. एक सांगा, आता या कवितेत "पावन खिंडीत पाऊल रोवून" ऐवजी 'दुसर्या कुठल्याही खिंडीत पाऊल रोवून शरीर पिंजेतो रण केले' असा उल्लेख असता तर आपल्या मनात हे प्रश्न आले असते का? तेवढा एक उल्लेख सोडला तर इतर कुणाही जीवाची पर्वा न करता लढणार्या योद्ध्याची मनःस्थिती या कवितेतून व्यवस्थित चित्रित होईलच. पण बाजीप्रभूंच्या बाबतीत कुसुमाग्रजांनी असं म्हटलं म्हणून "बाजींनी असा विचार केलाच नसता. हे शब्द बाजींचे असूच शकत नाहीत." असा नाही होत काही. :)
>> हे जिवन-मरणावरच रुपक आहे... पावण्खिंडीचे रुपक वापरुन कवीने आयुष्यावर कवीता केलिय.
हे मस्तच. मी वर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही कवितेचे आपल्या कुवतीप्रमाणे आकलन करावे. सर्वांना समान आकलन झालेच पाहिजे असा काही दंडक नाही. उदा. शाळेत "जरि तुझिया सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही, मी फूल तृणातील इवले उमलणार तरीही नाही" ही कविता शिकलो होतो. या कवितेतून मला शिवाजी महाराजच दिसायचे! :)
15 Dec 2010 - 7:37 pm | यशोधरा
मेवे, उत्तम प्रतिसाद.
15 Dec 2010 - 9:04 pm | शैलेन्द्र
"मी वर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही कवितेचे आपल्या कुवतीप्रमाणे आकलन करावे. "
थोड वेगळ्या शब्दात, कोणती कविता कोणत्या वेळी किंवा कुणाला कशी भिडेल ते नाही सांगता येत, त्याचे काही नियमही नसतात. म्हणुनच, कवितेचा अर्थ असा काही सांगायच्या भानगडीत पडु नये अस वाटत.
शरदीनी काकुंच्या कविता म्हणुनच कित्येकदा मनाला भिडतात.
16 Dec 2010 - 3:57 am | राजेश घासकडवी
सहमत. देहरूपी खिंडीत सापडलेला आत्मा नश्वर संसाराची दुःख सोसत, तरीही निष्ठेने प्राण पणाला लावून आपलं कर्म करत असताना परमात्म्याच्या मीलनाची, सुटका होण्याची वाट पाहातो व ती तळमळ व्यक्त करतो असा अर्थ मी लावला. बाजीप्रभू हा केवळ निष्ठेचं प्रतीक, घोर संकटं आली तरी पराक्रमाची शर्थ करणारं व्यक्तिमत्व म्हणून येतं. कुसुमाग्रजांनी आपल्या प्रतिभेने या समरप्रसंगाला व्यापक रूप दिलेलं आहे. असं असताना बाजीप्रभूने अमुकच केलं असतं, व तमुकच केलं असतं या चर्चेला तितकासा अर्थ राहात नाही. कविता वेगळी व इतिहासाचं पुस्तक वेगळं.
15 Dec 2010 - 7:59 pm | आत्मशून्य
पेक्षा चांगला चित्रपट नीघू शकेल ह्या सत्यकथेवर