१६व्या शतकातली ही डोनटसची जुनी रेसिपी बर्लिनमध्ये उगम पावली म्हणून नाव अर्थातच बर्लिनर! जर्मनीभर हे बर्लिनर फानकुकन, पुफेल, बर्लिनर बालन(म्हणजे बर्लिनचे चेंडू), क्रापन, क्रेपेल अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिध्द आहेत. जॅम घालून केलेला हा डोनट ताजाताजा खाण्यातच मजा!
६३ साली ह्या बर्लिनरनी एक धमाल उडवून दिली होती. प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी बर्लिनमध्ये आले असताना भाषणाची सुरुवात आणि शेवट त्यांनी झोकात जर्मन मध्ये केला. 'इष बिन बर्लिनर ' म्हणजे 'आय अॅम अ बर्लिनर' असे त्यांना म्हणायचे होते त्याऐवजी ते 'इष बिन आइन बर्लिनर' असे म्हणाले आणि एकच हशा उसळला कारण त्याचा अर्थ होता 'आय अॅम अ जेली डोनट (बर्लिनर)'!!!
असो..
आमचे आकिम आजोबा मूळचे बर्लिनचे,त्यांच्या वाढदिवसाला त्यांची आई हे बर्लिनर करत असे.युध्दकाळात रेशनिंगच्या दिवसातही मोठ्या कष्टाने तिने सारी सामग्री जमवून आजोबांच्या वाढदिवसासाठी ते केले होते. ती गेल्यानंतर आमची त्सेंटाआजी गेल्या वर्षापर्यंत आजोबांच्या वाढदिवसासाठी बर्लिनर करत असेच पण ह्या वर्षी मात्र तिने विकतचे बर्लिनर आणण्याचे ठरवल्यावर मला राहवले नाही आणि आम्ही त्यांना छोटेसे सरप्राइझ द्यायचे म्हणून ते करण्याचे ठरवले, त्याच सुमाराला केसुंचे येथे आगमन होणार आहे, असे समजल्याने त्यांच्या स्वागतार्थ बर्लिनर आणि राकलेटचा बेत आखला.
हाताशी भरपूर वेळ आणि शांतपणा असल्याशिवाय याच्या वाटेला जाऊ नये..
साहित्य-
५०० ग्राम मैदा, ६० ग्राम साखर, ६० ग्राम बटर, २ अंडी, १ कप कोमट दूध, १ चिमूट मीठ, तळणीसाठी तेल
२ वाट्या पीठीसाखर गार्निशिंगसाठी.
८० ग्राम फ्रेश यिस्ट ( जर्मनीत ४२ ग्रामचा एक फ्रेश यिस्ट क्यूब येतो तसे २ क्यूब्ज = ८४ ग्राम यिस्ट आजी घालते)
प्लम,चेरी,अॅप्रिकॉट कोणताही आवडीचा जॅम( ४५० ते ५०० ग्रामची बाटली.)
पेस्ट्री बॅग,२-३ स्वच्छ फडकी, २-३ मोठे ट्रे किवा ताटे, १वाटी
कृती-
कोमट दुधात साखर घालणे. त्यात यिस्ट घालून रवीने घुसळणे.मिश्रण एकजीव झाले पाहिजे.
मैद्यात चिमूटभर मीठ घालणे व त्यावर हे मिश्रण ओतणे व एखादे फडके घालून झाकून उबेशी १५ ते २० मिनिटे ठेवणे.
बटर पातळ करणे ते ह्या मिश्रणावर घालणे, २ अंडी त्यात फोडून घालणे आणि मळणे, भरपूर मळावे लागते. गोळा परातीत २,४ दा आपटणे. मऊसर गोळा झाला पाहिजे. हा गोळा परत फडक्याने झाकून उबेशी १५-२० मिनिटे ठेवणे.
पोळपाट /टेबल किवा प्लॅटफॉर्मवर मैदा भुरभुरणे, लाटण्यालाही मैदा चोळून घेणे. मिश्रण फरमेंट होऊन, हलके होऊन फुगले की त्यातील एक मोठा गोळा काढून घेणे आणि बाकीचे मिश्रण झाकून उबेशीच ठेवणे. हा गोळा परत एकदा पोळपाटावर आपटून जाडसर पोळी लाटणे. वाटीने त्याचे गोल आकार पाडणे व हे आकार एका ताटात अंतराअंतरावर ठेवून ते ताट झाकून उबेशी ठेवणे व दुसरी पोळी लाटणे व वाटीने डोनट्स कातणे.
एकीकडे तेल तापत ठेवणे व एका ताटलीत वाटीभर पिठीसाखर घालून ठेवणे. पेस्ट्रीबॅगेत जॅम भरुन त्यावर लहान टिप बसवा. तेल तापले की मध्यम आचेवर हे डोनट्स तळणे. गोल्डन ब्राउन झाले की टिश्यूपेपरवर घालणे व लगेचच पिठीसाखरेत घोळवणे, पेस्ट्रीबॅगेची टिप त्यात घुसवून जॅम भरणे.
डोनट गरम असतानाच जॅम आत भरला जातो व पिठीसाखरही त्यावर नीट बसते. त्यामुळे ही स्टेप वेळेत करणे महत्त्वाचे आहे.
असे सर्व डोनटस करणे व पोळ्यांच्या /फ्लॅट डब्यात भरुन ठेवणे.
प्रतिक्रिया
13 Dec 2010 - 2:04 pm | नंदन
केनेडींचा किस्सा आणि पाकृ (आणि त्यामागचं कारणही) मस्तच. अलीकडेच इथल्या सोल्वँग नामक छोट्या डॅनिश गावात गेलो होतो. तिथे याच बर्लिनरचं चुलत भावंड शोभावेत असे एबल्सिक्वर्स हादडता आले :)
अवांतर - वरच्या लेखात एकच फोटो दिसतोय. हे राकलेट प्रकरण काय असते बॉ? :p
13 Dec 2010 - 8:23 pm | प्राजु
हे घ्या राकलेट ! :)
13 Dec 2010 - 2:04 pm | गणपा
ईनोचा डब्बा घेउन बसलोय :)
13 Dec 2010 - 2:19 pm | प्राजक्ता पवार
पाकृ व केनेडींचा किस्सा दोन्ही छान .
राकलेट्ची पाकृदेखील द्या. :)
13 Dec 2010 - 2:49 pm | मस्त कलंदर
आहाहा.. मस्तच दिसतोय फोटो. स्वातीतै, ठाण्याला पुन्हा कधी येते आहेस? आधीपासून मदत करायलाच येईन म्हणजे तुला जास्त त्रास नको. कसें??
बाकी लिंकाळेंचा इंडेक्सिंग अल्गो आज गंडलेला दिसतोय. येऊन गेलेल्या इतका महत्वाचा धागा लक्षात नाही??? शिव शिव शिव!!!!
13 Dec 2010 - 2:52 pm | परिकथेतील राजकुमार
हायला काय जबर्या दिसतय !
केसु गुर्जी बोल्ले न्हाय तिकडे जाणारे म्हणुन :(
13 Dec 2010 - 4:52 pm | मस्त कलंदर
काही वेळापूर्वी मिपा गंडलं होतं. प्रतिसादच पोस्ट होत नव्ह्ता. असो.
![](http://farm4.static.flickr.com/3241/3085116904_e80aaa7acb.jpg?v=0)
ते राकलेट इथं आहे : http://www.misalpav.com/node/4988
बाकी, नुसतं पाहून काही कळालं नाही गं स्वातीताई.. जरा खायला घालून समजावून दे म्हणजे कळेल. ;-)
14 Dec 2010 - 12:10 am | चिंतामणी
शिवाय राकलेटच्या जोडणी बद्दल धन्यवाद.
13 Dec 2010 - 5:01 pm | मेघवेडा
केनेडींचा किस्सा भारीच! तसं बर्लिनर्सबाबतीत विशेष प्रेम आहेच हो! ;)
अवांतर : परवाच सणसणीत चीज ओतून राकलेटं हादडली तेव्हाच तुझी आठवण आली होती गं स्वातीतै!
13 Dec 2010 - 7:39 pm | केशवसुमार
:p परत कधी पिठ मळायला घेता सांगा? मी लाटायला आलोच ..दिनेश तळायला आहेच..
नाही तरी ऑरेंज बर्लायनर उधार आहेच.. ;)
16 Dec 2010 - 6:13 pm | छोटा डॉन
>>परत कधी पिठ मळायला घेता सांगा? मी लाटायला आलोच ..दिनेश तळायला आहेच..
+१, मी सहमत आणि खायला आहेच ;)
मला तसा एवढा सोस नाही पण उगाच तुमची मेहनत वाया जाऊ नये असे वाटते, बाकी काय नाही.
अवांतर : फोटो का दिसत नाहीये ? ;)
- छोटा डॉन
13 Dec 2010 - 8:18 pm | प्राजु
आई शपथ्थ!!!
तू ग्रेट आहे यार स्वातीताई!!
अफाट आहे पाकृ.
आवांतरः कॉफी केक ची रेसिपी एकदा सांग गं स्वातीताई!
13 Dec 2010 - 8:30 pm | सुनील
किस्सा आणि पाकृ छानच. मात्र डोनट हा प्रकार फारसा आवडत नसल्यामुळे मी सहसा त्याच्या वाटेला जात नाही!
13 Dec 2010 - 8:55 pm | रेवती
इनो, इनो, इनो,इनो!
फक्त केसूंना राकलेट आणि विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळते आहे.
केसूंचा निषेध!
पदार्थाचे फोटू देवून जळवल्याबद्दल स्वातीताईचा फार निषेध करता येत नाही, कारण आम्ही भ्रमणमंडळातर्फे गेल्यावर हा निषेध अंगलट येऊ शकतो याची कल्पना आहे.
उशिराने का होइना अकिम आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
अवांतर: या पदार्थाला आमच्या इथे मंचकिन्स म्हणत असावेत.
मुलांना (आणि मोठ्यांना) आवडणारा हा प्रकार फ्लू शॉट घेउन झाल्यावर (आमच्या मुलाच्या दवाखान्यात)बक्षिस म्हणून देतात.
13 Dec 2010 - 9:20 pm | निवेदिता-ताई
किस्सा आणि पाकृ छानच. .....................पण हे डोनेटस अंड्याशिवाय होतात का...???????
13 Dec 2010 - 10:07 pm | राजेश घासकडवी
तोंडाला पाणी सुटलं.
13 Dec 2010 - 11:42 pm | भानस
करावीच लागेल आता. :) किस्साही मस्तच. लगेच राकलेट ही पाहून घेतले. भारीच आहेत दोन्ही ही पाकृ.
13 Dec 2010 - 11:52 pm | लतिका धुमाळे
खरा पेशन्स आहे स्वाती तुला. मला अजिबात नाही. तुझ्या कडे आल्यावर खाईन्.पण फारच छान दिसत आहेत बर्लीनर.
लतिका धुमाळे
16 Dec 2010 - 8:05 am | इंटरनेटस्नेही
मस्त! टोन्डाला पाणी सुटले!