पातंजल योगदर्शन

शरद's picture
शरद in काथ्याकूट
11 Dec 2010 - 11:27 am
गाभा: 

पातंजल योगदर्शन
योग ह्या विषयावर आलेल्या लेखाला चांगला वाचकवर्ग व प्रतिसाद मिळाला. खरे म्हणजे मागेच योगदर्शन या दर्शनाबद्दल लिहावयाचा विचार होता. पण त्यावेळी या विषय इतका आवडीचा असेल असे वाटले नव्हते म्हणून राहिले. असो. प्रथम त्या लेखावरील विषयांची काही माहिती घेऊन आपण योगदर्शनाकडे येऊ.
(१) योगासने : पाश्चात्य देशात "योग म्हणजे योगासने व काही प्रमाणात प्राणायाम" अशी समजुत झाली आहे असे वाटते. मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. भारतातील योगाचे साध्य वेगळे आहे व त्या मार्गात आसने व प्राणायाम ही साधने मानली गेली आहेत. हटयोगात आसनांना/ प्राणायामाला महत्व आहे तरी पण पातंजल योगशास्त्रात आसन हे शांतपणे बसता यावे, शरीराला रग लागून पुढील क्रीयांकडे लक्ष लागण्यात व्यत्यय येऊ नये एवढ्या पुरतेच महत्वाचे आहे. शरीर व मन या दोघांना सुख वाटेल व स्थिरता प्राप्त होईल असे पद्मासन,सिंहासन,भद्रासन, वीरासन इ. आसनातील एखादे साध्य करावे एवढीच अपेक्षा आहे. योगासनांनी आरोग्य सुधारत असेल वा रोगनिवारण होत असेल तर तो दुय्यम फायदा आहे. ते साध्य नव्हे. तीच गोष्ट प्राणायामाची. प्राणबुद्धीला स्थिरता आणणे व ती हळुहळु सूक्ष्म करणे हे प्राणायामाचे ध्येय आहे. दमा कमी करणे नव्हे.
(२) योगाभ्यासाची सुरवात वेदकालापासून झाली. अनेक उपनिषदांत त्याचे संदर्भ आहेत. स्वत: बुद्धाने योगाचा अभ्यास केला होता. त्याच्या नंतर बौद्ध आचार्यांनी योगक्रीयेत जास्त रस घेतला. पण याचा अर्थ बौद्ध योग म्हणजे काही "निराळा" मार्ग असे समजण्याचे कारण नाही. बौद्ध आचार्य अष्टांगांतील प्रत्याहार,ध्यान,प्राणायाम,धारणा व समाधी ही पाच आंगे मानतात. त्यांनी यम, नियम व आसन ही तीन अंगे वगळली आहेत. कोणत्याही पदार्थाचे अविच्छिन्न ध्यान म्हणजे अनुस्मृती. हे धरून बौद्ध योग षडंग.
पातंजल योगदर्शन
ध्येय : परमात्मा व जीवात्मा यांच्यात एकरुपता साधणे, चित्तवृत्ती व चित्तसंस्कार यांचा निरोध करून, ध्याता, ध्यान व ध्येय या त्रिपुटीपैकी ध्याता व ध्यान यांचा लोप होऊन फक्त ध्येयावरच चित्त एकाग्र होते, ती समाधी अवस्था प्राप्त करणे हे ध्येय. थोडक्यात अद्वैत हा बौद्धिक मार्ग आहे तर योग हा शारीरिक मार्ग आहे. (Theoroticle and Practical) कोणालाही अभ्यास करून ही अवस्था प्राप्त करून घेता येईल. सांख्य आणि योग ह्या दोन मार्गातील फरक दाखवतांना भगवंतांनी योगमार्ग हा कर्माचा तर सांख्यमार्ग हा संन्यासाचा असे म्हटले आहे.

निरनिराळे पंथ : राजयोग, हटयोग, भक्तीयोग, कुंडलिनीयोग, मंत्रयोग, लययोग असे नानाविध योग वरील ध्येयप्राप्तीकरिता नानाविध मार्ग सुचवितात. योगेश्वर कृष्णाने गीतेत सगळीकडे योगाचा उल्लेख केला आहे. पण गंमत म्हणजे या सर्व ठिकाणी योग याचा एकच अर्थ होत नाही."योग: कर्मसु कौशलम्" या सुलभ अर्थापासून तो बदलत बदलत जातो व वरवरची पायरी गाठतो. आज आपण दर्शनाचा विचार करणार आहोत, गीतेचा नाही म्हणून तो भाग सोडून देऊ. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोठेही योग शब्द आला की त्याचा संदर्भ काय हे जर स्पष्ट केले नसेल तर पुढील विवेचन निरर्थकच होते.

काळ, आचार्य आणि ग्रंथसंपदा : ऋग्वेद, ऐतरेय आरण्यक, कठोपनिषद,श्वेताश्वरोपनिषद,छांदोग्य,बृहदारण्यक, कौषीतकी उपनिषदांमध्ये योग हा प्राणविद्येशी संबंधित असल्याने व प्राणजय हा मोक्षाचा उपाय असल्याने योगाविषयी उल्लेख येतात. हे पुरातन तत्त्वज्ञान बुद्धपूर्व (इ.स.पूर्व६-७ शतक) मोठ्या प्रमाणात विकसित झाले. योगाने सांख्यांच्या तत्वांमध्ये ईश्वर हे नवीन तत्व मिळवले. या काळातील योगाचा गीतेत उल्लेख येतो.या काळातील एकही ग्रंथ सापडत नाही. इ.स.पूर्व दुसर्‍या शतकातील भ. पतंजलींचा "पातंजल योगसूत्रे" हा १९५ सूत्रांचा सर्वमान्य ग्रंथ. यावर व्यासांनी भाष्य लिहले (इ.स.३-४ शतक). हे व्यास म्हणजे बादरायण व्यास नव्हेत. व्यासभाष्यावर वाचस्पती मिश्रानी तत्त्ववैशारदी व विज्ञानभिक्षूने योगवार्तिक हे ग्रंथ रचले. यांशिवय. राघवानंद सरस्वती, भोज,भाषागणेश,रामानंदयती, अनंत पंडित,नागोजी भट्ट इत्यादींचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ऋषीतुल्य कै. कोल्हटकर यांचा "पातंजल योगदर्शन" हा मराठीतील अद्वितीय ग्रंथ. या ग्रंथामुळे केवळ मॅट्रीक पास कोल्हटकरांना पुणे विद्यापीठाने D.Lit पदवी अर्पण केली ! गुणाचा-अभ्यासाचा गौरव ! कै. कोल्हटकरांनी आपल्या ग्रंथास "भारतीय मानसशास्त्र" म्हटले आहे. योगदर्शनावर आपणास काही वाचावयाचे असेल तर हा एक ग्रंथ पुरेसा आहे.

भ. पतंजली योगाचे प्रणेते नव्हेत. पहिले सूत्र आहे "अथ योगानुशासनं" यावरून असे दिसते की त्यांनी योगाला व्यवस्थित आकार देणारे सूत्रकार आहेत.ग्रंथाचे चार विभाग आहेत.समाधीपाद (५१ सूत्रे), साधनपाद(५५ सूत्रे), विभूतीपाद(५५ सूत्रे) आणि कैवल्यपाद(३४ सूत्रे).

समाधीपाद : समाधीचे रूप व भेद, चित्त आणि त्याच्या वृत्ती.
साधनपाद : क्रियायोग,क्लेश व त्यचे भेद, क्लेश दूर करण्याचे साधन,हान, हानोपाय, अष्टांगे, इ.
विभूतिपाद : ध्यान, धारणा, समाधी यांचे स्वरूप,प्राप्त होणार्‍या सिद्धी.
कैवल्यपाद : समाधीसिद्धी, निर्माणचित्त, विज्ञानवादाचे निराकरण व कैवल्य.

योगव्याख्या : योगश्चित्तवृत्त्तिनिरोध: चित्तवृत्तीचा उपशम करणे याला योग म्हणतात. इथे चित्त म्हणजे मन, बुद्धी व अहंकार एतद्रूप असलेले अंत:करण होय. यानंतर चित्ताच्या पाच अवस्था व पाच वृत्ती यांचे वर्णन केले आहे.
समाधीचे भेद : चित्त जेव्हा अविचल आणि अक्षुब्ध अवस्थेत एकाग्र होऊन ध्येय वस्तूवर चिरकाल स्थिर राहते, तेव्हा त्या समाधीला सबीज
समाधी म्हणतात. .जेव्हा चित्ताच्या समस्त वृत्ती बंद होतात आणि कोणत्याही वृत्तीचे बीज राहत नाही, त्या अवस्थेला
निर्बीज समाधी म्हणतात.
.
क्लेश : क्लेश म्हणजे विकार. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष व अभिनिवेश हे पाच क्लेश. यांना दूर केल्याशिवाय योगमार्गावर प्रगती होणे शक्य
नाही. अभ्यास व वैराग्य यांनी क्लेशांवर मात करून साधकाला प्रगती साधता येते.
आठ अंगे : यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही अष्टांगे. यम, प्रत्याहार,धारणा, ध्यान व समाधी ही
अत्यंत महत्वाची. नियम, आसन व प्राणायाम यांचे अनुष्ठान प्रत्येकाने स्वत:च्या प्रकृतीनुसार यथाशक्ती करावे.
यम : अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यम: ! अहिंसा, सत्य, अस्तेय ( काया,वाचा आणि मन यांनी परद्रव्याच्या ठिकणी नि:स्पृह बुद्धी ठेवणे),ब्रह्मचर्य (विषयवासनेचा निग्रह करणे), अपरिग्रह (अनावश्यक साधनांचा संग्रह न करणे) यांना यम म्हणतात.
नियम : शौच (मन व शरीर शुद्ध ठेवणे), संतोष,तप, स्वाध्याय (उपास्य देवतेच्या मंत्रांचा जप, वेदांचा अभ्यास व शास्त्राभ्यास) व ईश्वरप्रणिधान (सर्व व्यापार फलेच्छा न ठेवता ईश्वरार्पण बुद्धीने करणे) हे नियम झाले.
आसन : शरीर ज्या स्थितीत राहिले असता मन व शरीर या दोघांना सुख वाटेल व स्थिरता प्राप्त होईल ते आसन.
प्राणायाम : (आसनावर विजय मिळवल्यावर) श्वास व प्रश्वास्यांच्या स्वाभाविक गतीचे नियंत्रण करणे याला प्राणायाम म्हणतात. रेचक, पुरक व कुंभक हे तीन प्रकार.
प्रत्याहार : इंद्रिये (व त्यांचे विषय) चित्ताच्या मागे धावत असतात. चित्त बहिर्मुख झाले की इंद्रियेही तशीच होतात. बाह्य निमित्त उत्पन्न झाले तरी चित्ताला तिकडे जाऊ न देण्याचा स्वतंत्र अभ्यास म्हणजे प्रत्याहार.

ही पाच अंगे बहिरंग साधने म्हणतात. ध्यान, धारणा व समाधी ही तीन अंतरंग साधने होत. त्यांनी चित्ताची एकाग्रता साक्षात साधावयाची असते.
धारणा : देशबंधश्चित्तस्य धारणा ! चित्ताच्या कोणत्यातरी स्थानावर (देशावर) जणु बांधून ठेवल्यासारखे चित्त स्थिर करणे म्हणजे धारणा. उदा. आसनावर बसून नासाग्री दृष्टी लावावी व ती तेथे स्थिर करून डोळे मिटून घ्यावेत. मग दृष्टी जेथे आहे तेथेच चित्त व प्राण एकत्रित झाले आहेत अशी कल्पना करावी. हळुहळु ही खाली नेऊन हृदयापाशी स्थिर करावी.इथे प्रत्याहाराचा फायदा होतो.
ध्यान : तत्र प्रत्ययैकतानता ध्यनम् ! ज्या वस्तूवर चित्ताची धारणा केली आहे, तिथेच त्याची एकतानता करणे म्हणजे ध्यान.
गुरूपरंपरेप्रमाणे सगुणध्यान, निर्गुणध्यान, स्थूलध्यान, सूक्ष्मध्यान,ज्योतिर्ध्यान असे अनेक मार्ग व पद्धती आहेत.
समाधी : तदेवर्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधी: ! ध्यानाच्या अवस्थेत ज्या क्षणी ध्यात्याला स्वत:ची विस्मृती होऊन फक्त ध्यानविषयावर प्रतीती येत राहते,त्या वेळी त्या अवस्थेला समाधी म्हणतात.
योगसिद्धी : समाधी साध्य झाल्यावर योग्याला अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. सिद्धी अनेक आहेत, किरकोळ व मोठ्या, अष्टमहासिद्धी :
(१) अणिमा ;- शरीर परमाणूप्रमाणे सूक्ष्म करता येणे.
(२) महिमा :- शरीर वाटेल तेवढे मोठे करता येणे.
(३) लघिमा :- शरीर कापसापेक्षाही हलके करता येणे.
(४) गरिमा :- शरीर अत्यंत वजनदार करता येणे.
(५) प्राप्ती :- बसल्या ठिकाणाहून दूरच्या वस्तूला स्पर्श करता येणे.
(६) प्राकाम्य :- मनातील इच्छा पूर्ण करून घेता येणे.
(७) ईशित्व :- सर्व सृष्ट्पदार्थांवर सत्ता चालविता येणे.
(८)वशित्व :- सर्व भूतमात्राला वश करून घेता येणे.

योगदर्शन हे मनाचे शास्त्र आहे. मन:सामर्थ्य कसे वाढवता येईल याचे मार्गदर्शन येथे केले आहे. काही गोष्टी कुणाला पटतील, कुणाला नाहीत.पण याची मोहिनी आज हजारो वर्षे भारतीयांवर पडली आहे यात शंका नाही. योगाचे साध्य मात्र अद्वैत हेच आहे. मात्र अद्वैतात नसलेला ईश्वर योगाने स्विकारला आहे. शंकराचार्यांसारखा अद्वैतीही निनांतसुंदर, ईश्वरभक्तीपर स्तोत्रे लिहतो, यावरून ईश्वर ही संकल्पना त्यांनीही मानलेली दिसते. इती.

विषय थोडा नाही, बराच अवघड आहे. ओळख करून देतांना चूका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर्‍य़ाच तांत्रिक शब्दांची सोप्या भाषेत माहिती देणेही गरजेचे होते. पण ते येथे शक्य नाही. आपणास जास्त माहिती करून घ्यावयाची असेल तर विवेकानंद, ओशो व कोल्हटकर वगैरेंची पुस्तके अभ्यासणे गरजेचे आहे.

शरद

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

11 Dec 2010 - 11:39 am | रणजित चितळे

मी तुमचा फॅन झालो. सुंदर माहीती आहे.

मागे सुद्धा आपण द्वैत अद्वैतावर लिहीले होतेत. मी एक पुस्तक वाचले होते बरेच आधी १८ सिद्ध ह्या बद्दलचे. मला त्याची आठवण आली. तमिळनाडु मध्ये फार पुर्वी ते होऊन गेले. वाचकांनी वाचावे.

शरद's picture

14 Dec 2010 - 7:11 am | शरद

सप्रेम नमस्कार.
प्रथम धन्यवाद. दर्शने हा विषय तसा किचकट असल्याने सांख्यदर्शन खरडवहीत लिहावयाचा विचार आहे. त्यावेळी आपणास कळवीनच.
शरद

परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2010 - 11:39 am | परिकथेतील राजकुमार

सुंदर परिचय.

पहिल्यांदा काही काही शब्द थोडेसे क्लिष्ट वाटल्याने वाचताना अवघडल्यासारखे झाले, पण नंतर मात्र सहजपणे वाचन सुकर झाले.

स्पा's picture

11 Dec 2010 - 12:41 pm | स्पा

+१

अवलिया's picture

11 Dec 2010 - 12:27 pm | अवलिया

उत्तम परिचय.

शरद's picture

12 Dec 2010 - 7:09 am | शरद

कै. कोल्हटकर यांचे पुस्तक के.भि.ढवळे यांनी प्रकाशित केले आहे. ओशो व विवेकानंदांची पुस्तके कुठल्याही धार्मिक पुस्तके विक्रेत्यांकडे मिळू शकतील.
शरद

मदनबाण's picture

12 Dec 2010 - 10:30 am | मदनबाण

वा... सुंदर लेखन.

पाश्चात्य देशात "योग म्हणजे योगासने व काही प्रमाणात प्राणायाम" अशी समजुत झाली आहे असे वाटते. मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.
सहमत...

स्वत: बुद्धाने योगाचा अभ्यास केला होता. त्याच्या नंतर बौद्ध आचार्यांनी योगक्रीयेत जास्त रस घेतला.
मध्यंतरी डिस्कव्हरी का कोणत्यातरी चॅनलवर हिमालयात राहणारे बौद्ध साधु दाखवले होते, जे बाहेर बर्फावर जाउन ( जिथे तपमान उणे आहे ) उघड्या अंगाने बसत, योगाच्या बळावर इतक्या थंडीमधे ते सहज वावर करु शकत होते. (बहुधा सुर्य भेदन प्राणायामाचा वापर ते करत असावेत.)

निरनिराळे पंथ : राजयोग, हटयोग, भक्तीयोग, कुंडलिनीयोग, मंत्रयोग, लययोग असे नानाविध योग वरील ध्येयप्राप्तीकरिता नानाविध मार्ग सुचवितात.
कुंडलिनीयोग या विषयावर अधिक लिहता आले तर जरुर लिहावे, असा आग्रह आपणास करावा वाटतो.

माझे विचार :---
योग तुमची स्वतः विषयची जाणीव (कल्पना) वाढवण्यामधे महत्वपूर्ण मदत करतो.योगाचे असे डिझाइन आहे की ज्याने तुम्ही तुमचे व्यक्तीमत्व शक्य त्या प्रत्येक दिशेने वाढवत नेउ शकता.परंतु व्यक्तीमत्व विकास (बाह्य) या पायरीवर येउन योग थांबत नाही तर तो तुमच्या शरीरांतर्गत जे व्यक्तिमत्व आहे त्याचा विकास करण्यास मदत करतो.

ज्या प्रमाणे तुमच्या शरिराला आगीचा स्पर्श होत नाही तो पर्यंत भाजणे या क्रियेची अनुभुती तुम्हाला घेताच येत नाही,पण शरीर आणि मन यांच्या पलीकडचे जर काही अनुभव असतील तर ते अनुभवण्यासाठी काय करावे ? यासाठी योग तुम्हाला मदत करतो असे वाटते.योग शरीर आणि मन या दोन्हींच्या पलिकडच्या ज्या अनुभवच्या कक्षा आहेत त्या रुंदावण्यात तुमची मदत करत असावा असे मला वाटते.

शरद's picture

14 Dec 2010 - 7:16 am | शरद

सप्रेम नमस्कार.
यावर लिहणे बरेच वेळकाढू होईल व किती लोकांना वाचनीय वाटेल याचीही शंका आहे. पण बघतो. दरम्यान सांख्यदर्शनावर
खरडवहीत लिहीत आहे, ते झाले की आपणास कळवीनच.
शरद

पुष्कर's picture

12 Dec 2010 - 1:06 pm | पुष्कर

अतिशय सुंदर.
परंतु योगदर्शन हे 'मनाचे शास्त्र; आहे - हे विधान पूर्णपणे पटले नाही. त्याच्या पहिल्या ४-५ अंगांमध्ये मनाची बहिर्गामी वृत्ती थांबवून तिला आतमधे वळवण्यासाठी काही उपाययोजना आहेत. पण मनाच्या सहाय्याने सर्व चित्तवृत्ती एका ठिकाणी केंद्रित केल्यानंतर जी तूर्यातीत अवस्था प्राप्त होते, तेव्हा योगी मनोमय कोष ओलांडून विज्ञानमय आणि पुढे आनंदमय कोषाची अनुभूती घेतो. तेथे मनही पोहोचू शकत नाही. अशी माझी समजूत आहे. ह्यावर निरनिराळ्या लोकांचे वेगवेगळे मत असू शकते. मी स्वामी विवेकानंदांच्या 'राजयोग' नामक पुस्तकाच्या पढतज्ञानाच्या आधारे सांगतो आहे, कदाचित माझे चुकतही असेल.

रोमना's picture

13 Dec 2010 - 10:33 am | रोमना

फारच छान !
परंतु सध्याची अवस्था पाहता, योग चा योगा झाला आहे.
गुरु अभावी योगींना योग न प्राप्त होता, भोग व वासना याकडे साधक आकृष्ट होतो.

कलियुगी देव नामस्मरण

मदनबाण's picture

13 Dec 2010 - 10:46 am | मदनबाण

कलियुगी देव नामस्मरण

सेंट परसेंट सहमत... :)

कलियुगी योग निषिद्ध आहे असे कुठेतरी वाचल्याचे आठवतय्...का ते कोणास ठावुक !!! असो.