खूप पूर्वी मनात आलेलं आणि लिहिलेलं काही आज पुन्हा दिसलं आणि आणि त्यातले काही पॉईंट्स उचलून चर्चेला आणावेसे वाटले म्हणून.. खाली जे काही लिहिलंय ते आडपडदा न ठेवता किंवा मुद्दाम "न्यूट्रल" राहण्याचा कोणताही प्रयत्न न करता "ज्याचे अनेक (जवळ जवळ सर्वच) रोजच्या कट्ट्यावरचे मित्र परदेशात गेले आहेत आणि कायमचे राहिले आहेत" अशा भारतात "उरलेल्या" म्हणा किंवा "राहिलेल्या" म्हणा, माणसाच्या मनातून हे लिहिलं आहे :
--------------------------
जो कोणी अमेरिकेला (किंवा यू.के. वगैरेला) जातो.. तो "आयुष्यातून" जातो..
तिकडे गेलेल्यांचा पहिला पहिला संपर्क हा (अगदी नॅचरली) भारून गेलेला आणि आपलं तिथलं जीवन कसं वेगळं आणि समृद्ध आहे हे इकडच्या भारतीयांना भरभरून सांगण्यासाठी असतो. तास तासभर आय एस डी चालतोच.
तिथे कॅसिनोत गेलो, नग्न नृत्य पाहिलं, रस्ते स्वच्छ, सगळ्या घरांत वॉशिंग मशीन,ए.सी. डिशवॉशर, ओव्हन, वॉल टू वॉल कार्पेट, वगैरे असतं हे सांगितलं जातं.. आणि बेसिनला पिण्याइतकं स्वच्छ पाणी येतं हे ही. .. एखाद दोन महिन्यातच "कार घेतली" चे आवर्जून फोन ई-मेलवर फोटो येतात.
इकडचे सगळं खूप ऐकतात वाचतात. (पुन्हा वरच्याप्रमाणेच हेही अगदी नॅचरली..)वेळोवेळी "जळतात" ही "तिकडच्यां"च्या नशिबावर..
पण वारंवार सतत कौतुक केलं जातंच असं नाही. एकतर आता इथेही बर्याच गोष्टी मिळत असल्या तरी एक नैसर्गिक हेवा असतो आणि पुन्हा आपल्या "इकडच्या" रोजच्या रहाटगाडग्याशी जुळणारं असं "तिकडच्यां"च्या बोलण्यात काही सापडत नसल्याने नुसतंच ऐकायचं आणि "वा..आयला..सही" असे उद्गार काढायचे याला बहुधा "इकडचे नंतर कंटाळत असावेत.
आपल्या "इकडच्या" आयुष्यात मात्र "तिकडच्यां"ना नवीन वाटेल अशा नवीन डेली घटना फारशा नसतात. म्हणून शेवटी "मग तुझं काय चाललंय?" या तिकडून येणार्या प्रश्नाला फार दीर्घ उत्तर देता येत नाही.. "चाललंय आपलं, नेहमीचंच.." म्हणून इकडचे नंतर नंतर गप्प बसतात.
"तिकडच्यांना"ही इकडून भरभरून रिस्पॉन्स मिळत नाही असं लक्षात येऊन तेही सांगणं कमी करत जातात.
तिकडचे झालेले अनेकजण "भारतीय सिस्टिम" ला सकारण नावं ठेवतात.. करप्शन, पोल्युशन वगैरे मुद्दे जेन्युइनही असतात.
त्यावर उत्तर किंवा बचाव म्हणून "इकडचे" कधीकधी आपल्या देशाचे गोडवे गातात..(असेना का करप्शन वगैरे..संस्कृती बघा..)
असं म्हणणार्यांमधे मनापासून दुखावल्याने म्हणणारेही असतात आणि आपल्याला "तिकडे" जाता येत नाही (कर्तबगारीत कमी पडल्याने) याची खंत असलेलेही अनेक असतात.
म्हणून कधीकधी अशा ठिकाणी आपल्या देशाचा अभिमानही "डिफेन्सिव्ह मोड", बचावात्मक पवित्र्यात बाळगला जातो की काय असं वाटतं.
तशी (उदा.) अमेरिकासुद्धा अजिबात "कमी" नाही.. ..कोणताच देश कमीजास्त नाहीच..
पण पैशाच्या, डॉलरच्या शक्तीच्या खेळामधे आपण सगळे क्षुद्र ठरतो..
मी बर्याचदा बघितलंय :
"तिकडचे" इकडे आले की सगळ्यांनी त्यांना भेटायला गावोगावाहून यायचं.. काही परफ्यूम,चोकलेट्स वगैरे आणली असतील ती घ्यायला जाण्याचाच "इकडच्यां"चा उत्साह जास्त दिसतो..
तिकडचे आलेले स्वत:हून इकडच्यांना घरी भेटायला क्वचित येतात..(कारण सामान घेऊन फिरणं अवघड जातं इ.इ.).. एकदम एअरपोर्ट ते गाव...गाव ते एअरपोर्ट..व्हिसा रिन्युअल किंवा इतर कारणांनीही मुंबईला खूपदा येतील पण बोरिवली, ठाणे , डोंबिवली अशा आडबाजूच्या मित्रांकडे केवळ भेटायला कितीजण येतात, शंका आहे.
"इकडचे" त्यांना खास देशी बेत, पिठलं भाकरी वगैरे बनवून जेवायला बोलावतात ..किंवा पुरणपोळी..
यात काही वेगळं घडलं तर "यांचा" "त्यांना" अपमान..आणि कधी "त्यांचा" "यांना"..अशा घटना भारतभेटीनंतर कटुता ठेवतातच..
विचारण्याचा मुद्दा असा आहे की मनुष्य अंतराने दूर गेल्यावर त्याच्यात आणि आपल्यात काहीच (आर्थिक, रोजच्या घटना, वातावरण इ.इ.इ) "सिमिलर" राहात नाही. आणि त्याच्या परदेशातल्या "नाविन्या"पेक्षा आपापल्या देशांत आणि आपल्याच गावात "उरलेल्या" देशी मित्रांसोबत "सिमिलॅरिटीच्या" बेसिस वर आपलं नातं जास्त दृढ होत जातं आणि परदेशी मित्र मागे मागे पडत जातात. .. असं सगळ्यांच्या बाबतीत होतं का?
परदेशी गेलेला मित्र..त्यासोबतचं नातं तुटत जातं..मधेच ते आले की भेट जमवून आणली तरी आणि होऊ नाही शकली तरी ते नातं नुसतंच ढवळलं जातं.. अवघड सिच्युएशन होते..
आणि ही झाली इकडे बसून लिहिलेली एकतर्फी बाजू..
"तिकडे" गेलेल्याचंही काय? तिकडचं कष्टाने कमावलेलं वैभव बघायला आणि कौतुक करायला जोपर्यंत इकडचे कोणी येत नाही तोपर्यंत त्यांनाही काय वाटत असेल ?
कारणं काही असोत.. योग्य किंवा अयोग्य..
पण शेवटी "इकडचे" आणि "तिकडचे" ही दरी पडतेच आणि वाढत जातेच..
बरोबर आहे का मी म्हणतो ते? इथे इकडचे आणि तिकडचे दोन्हीकडचे खूप मिपाकर आहेत. कोणीही प्लीज पर्सनली घेऊ नये ही विनंती. आपल्यातले काहीजण (इकडचे आणि तिकडचे दोन्हीही) असे वागत नसतीलही..मागे असंच माझ्या ब्लॉगवर लिहिलं तेव्हा "आपण नक्की कोणाकडे पाहून टीका करत आहात. मी स्वतःहून भारतात सगळ्यांना भेटायला जातो" अशा स्वरुपाच्या नाराज प्रतिक्रिया आल्या.
हे सार्वत्रिक आहे का एवढंच बघायचंय.
मला वाटतं नीट जमत नसूनही माझा मुद्दा मी पुरेसा मांडलाय..!!
तरी मत मांडायला एक ठाम मूळ मुद्दा हवाच म्हणून खाली एका वाक्यात लिहितोय..:
मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ?
प्रतिक्रिया
10 Dec 2010 - 3:01 pm | छोटा डॉन
उत्तम चर्चाविषय...
ह्यावर मी मिभोकाका, अदिती, अवलिया, थत्तेचाचा, परा, तात्या, टारु, शिल्पा, घासकडवी गुर्जी, विजुभाऊ ह्यांचे मत वाचायला उत्सुक आहे. धागा बुकमार्क केला आहेच. :)
चर्चा पुढे सरकेल तशी भर घालत जाईन :)
- छोटा डॉन
10 Dec 2010 - 3:37 pm | टारझन
डाणराव ... आपण नवसंपादक आहात तसेच जर्मणीला जाऊन आलेला आहात त्या न्यायाने आमचा नेता तुम्ही आहात .. तेंव्हा फटाक्याची वात तुम्हीच पेटवावी , असे सुचवु इच्छितो :)
(काय म्हणालात ? फक्त वातंच आहे ? )
बाकी आमच्या अफ्रिकेतल्या नद्या फारंच सुंदर ! पोरी तर त्याहुन सुंदर !! काय त्यांचे छाण छाण स्वभाव आणि केवढं ते विशाल मन !! नाही तर तुमच्या भारतातल्या पोरी .. !! च्छ्या .. संकुचित स्वभाव आणि खडुस मनाच्या ... थोडा भाव दिला की लागल्या लगेच स्वतःला शिला समजायला !!
मी अफ्रिकन मी इंडियन
मी माणुस मी स्वच्छंदी
मी असा असा मी
पृथ्वीवरचा !
(च्यायला जमलं की )
- निदान मुक्काम पोष्ठ अफ्रिका
10 Dec 2010 - 3:43 pm | गवि
जेनपती टारझनराव,
:) हेहेहे. जाम हसवलंत..
10 Dec 2010 - 3:44 pm | छोटा डॉन
छे छे, अहो टारबा आमचा लायकीच नाही बघा अशा विषयावर मत द्यायची.
मी आत्ताच आमच्या अॅडमिनकडुन १०० पानी वही घेतली आहे, टिपणं काढुन घेईन एकेक सुंदर प्रतिसादातुन.
असो, श्रीगणेशा तुमच्या प्रतिसादातुनच झाला.
१. आफ्रीकन मुली सुंदर, छान छान स्वभावाच्या आणि विशाल मनाच्या असतात हे समजले.
पुढे वाचतो आहेच :)
अवांतर : 'इकडच्यां'बद्दल नंतर सवडीने ;)
- छोटा डॉन
10 Dec 2010 - 5:01 pm | नरेशकुमार
काय त्यांचे छाण छाण स्वभाव आणि केवढं ते विशाल मन !!
तुला काय फकस्त इशाल मनच दिस्लं का व्हय रं ? दुरद्रुश्टी नाय लेका तुला
10 Dec 2010 - 4:12 pm | परिकथेतील राजकुमार
"इकडचे" आणि "तिकडचे" आमचे सर्वच मित्र भिकारचोट आहेत अशी भावना व्यक्त करुन मी आपली रजा घेतो.
10 Dec 2010 - 5:20 pm | अवलिया
+१
हेच बोल्तो आणि रजा घेतो.
10 Dec 2010 - 5:42 pm | कुंदन
परत कधी भांडवल मागा लेकोहो तुम्ही. ;-)
10 Dec 2010 - 5:44 pm | अवलिया
आधी दिलेले मिळाले का?
10 Dec 2010 - 5:46 pm | परिकथेतील राजकुमार
मागुन मागुन थकलो पण हातात घंटा काही पडले नाही आश्वासनांशिवाय. मग आता आम्ही 'भिकारचोटच' म्हणणार ना?
संतप्त
10 Dec 2010 - 10:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मिभोकाका, अदिती, अवलिया, हा नावांचा क्रम वाचून हा प्रतिसाद गंभीरतेने घेतल्याचा पस्तावा होत आहे. ;-)
10 Dec 2010 - 3:22 pm | मेघवेडा
आयला मी म्हटलं सध्या चाललेल्या खाद्ययात्रेत आणखी एका धाग्याची भर पडली की काय! छान लिहिलंय गवि. डान्यासारखंच म्हणतो. उत्तम चर्चाविषय.
10 Dec 2010 - 3:27 pm | स्पा
लेख आवडला
शतकी धाग्यासाठी "आगाऊ " शुभेच्चा
बाकी पोकोर्ण ( मक्याच्या कणसांचे बर्र का ) घेऊन झाडावर बसलेलो आहे....
10 Dec 2010 - 3:53 pm | टारझन
मला हल्ली 'को' दिसत नाही रे ... आणि त्या नंतर पांढरी शाई ... :) घ्या पोकोर्ण घेऊन बसा .. आणि ल्ह्या पांढर्या शाईत !
बाकी तुमच्या सहीत
कार्यकारी अध्यक्ष च्या आधी "स्वयंघोषित" लिह्याचं राहिलंय ... शुधारणा करणे !
10 Dec 2010 - 4:05 pm | स्पा
कार्यकारी अध्यक्ष च्या आधी "स्वयंघोषित" लिह्याचं राहिलंय ... शुधारणा करणे !
no comments !!!
10 Dec 2010 - 4:46 pm | इंटरनेटस्नेही
-
10 Dec 2010 - 4:14 pm | इंटरनेटस्नेही
तिकडचे झालेले अनेकजण "भारतीय सिस्टिम" ला सकारण नावं ठेवतात.. करप्शन, पोल्युशन वगैरे मुद्दे जेन्युइनही असतात.
+१ या मुद्द्याला.. भारतात बरयाच गोष्टी नाव ठेवण्यासारख्या आहेत, आणि सत्य कधीही लपवु नका, ते खोटेच आहे असे सिद्ध करा असे आपली संस्कृती सांगत देखील नाही. अन्य प्रगत देशांच्या मानाने आपण निदान ५० वर्षे तरी मागे आहोत, आणि ही परिस्थीती सुधरायची तर आपण आधी आपल्यात समस्या आहेत हे मान्य केले पाहिजे.. उगाच खोट्या गैरसमजात रहाण्यापेक्षा वास्तववादी राहिलेलं बरं म्हणजे कधी ना कधी सुधारणा करता येते स्वत: मध्ये.
-
ऋषिकेशकुमार इंट्या,
मुंबई प्रदेश अध्यक्ष, मिसळपाव दुर्लक्षित पँथर.
ता. क. : अमेरिकेत 'कणसांचं' पीक सगळ्यात जास्त होतं म्हणतात!
10 Dec 2010 - 3:57 pm | सूड
>>असं म्हणणार्यांमधे मनापासून दुखावल्याने म्हणणारेही असतात आणि आपल्याला "तिकडे" जाता येत नाही (कर्तबगारीत कमी पडल्याने) याची खंत असलेलेही अनेक असतात.
'कर्तबगारीत कमी पडल्याने' हे खटकलं, बर्याचदा केपेबल व्यक्तीसुद्धा वगळल्या जातात. विशेषतः दक्षिण भारतीयांचे आधिक्य असलेल्या, आणि असे लोक 'तिकडे' असलेल्या प्रोजेक्ट्स मध्ये अशा गोष्टी सर्रास घडतात.
डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत म्हणून लिहावंसं वाटलं. असो.
10 Dec 2010 - 4:06 pm | गवि
"कर्तबगारीत कमी पडल्याने म्हणा किंवा अन्य काही कारणाने म्हणा"
अशी काही उदाहरणादाखल कारणं द्यायची होती.. राहिलं..पण तिथे तसं वाचावं अशी विनंती..
शिवाय एकूण जाऊ न शकणं म्हणजे कर्तबगारीत कमी पडणं अशी जनरल (गैर?!)समजूत आहेच..ती स्वतःची स्वतःशी सुद्धा असू शकते.
10 Dec 2010 - 4:10 pm | llपुण्याचे पेशवेll
+१
अनेक वेळेला कर्तृत्व आणि संधी असतानाही म्हातार्या आईवडीलांकडे आपल्या पश्चात कोण बघेल या काळजीने थांबलेले लोकही असतात.
किंवा काहींना स्वदेश अधिक प्रिय असतो म्हणून 'तिकडे' जाऊनही तिकडे रमत नाहीत.
10 Dec 2010 - 4:45 pm | गवि
अनेक वेळेला कर्तृत्व आणि संधी असतानाही म्हातार्या आईवडीलांकडे आपल्या पश्चात कोण बघेल या काळजीने थांबलेले लोकही असतात.
किंवा काहींना स्वदेश अधिक प्रिय असतो म्हणून 'तिकडे' जाऊनही तिकडे रमत नाहीत.
पैकी बोल्ड केलेल्या भागाचा अनुभव आहे.
म्हणूनच पुन्हा बोल्डमधे म्हणतो..
"कर्तबगारी नसल्याने" हे "कर्तबगारी नसल्याने किंवा अन्य काही कारणाने असे वाचावे.."
केवळ फास्ट लिहिण्यात उथळपणे / चुकीने सुटलेला मुद्दा आहे तो.
मजबूरी, स्वतःचा विचारपूर्वक घेतलेला निर्णय अशी अनेक कारणं असू शकतात.
अजून एक पैलू.. जे आपल्या म्हातार्या आईवडिलांना इथे ठेवून जातात त्यांच्यावर खूप छद्मी दोषारोप होतात. आई वडील कोणी आजारी असले /वारले की "बघा..शेवटच्या क्षणी बापाच्या तोंडात पाणी घालता आलं नाही..डॉलर काय चाटायचेत ?..इ.इ. " या अशा ताशेर्यांमधेही एक साठलेला असूयेतून आलेला राग असावा की काय? असा मला संशय आहे.
त्यांनाही तिथे छातीवर दगड ठेवावा लागत असेलच की..
10 Dec 2010 - 4:05 pm | स्पा
.
10 Dec 2010 - 4:25 pm | रणजित चितळे
मला वाटते, ऑऊट ऑफ साईट इज ऑऊट ऑफ माईंड ही इंग्रजीतील म्हण यतार्थ आहे.
इकडे काय किंवा तिकडे काय - ह्या जगात तोच मनुष्य यशस्वी गणला जातो ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे.
आपण इकडचे (प्रसन्नतेने व आनंदाने जगणारे) आहात का तिकडचे (मरगळलेले व दुःखी) आहात. म्हणुनच इकडे राहुन काही तिकडचे आहेत व तिकड राहुन काही इकडचे आहेत.
10 Dec 2010 - 4:44 pm | गांधीवादी
'असे बर्यान्चदा होतेच' असे म्हणेन.
आमच्या कामावर जे कोणी कामानिमित्त अमेरिकेत, ऑस्ट्रेलिया , युरोप येथे जातात त्यातील बरीचशी तिथल्या तिथेच नवीन नोकरी बघून तिथेच कायमस्वरूपी स्थायिक झालेली आहेत. त्यातील बरीच जण चांगली मित्र आहेत (आता होती असे म्हणावे लागेल), गेली त्यानंतर काही महिने gtalk, skype वरून गप्पा व्हायच्या, पण हळू हळू ते सर्व बंद होत गेले. उरले ते केवळ Happy new Year आणि Happy dipawali च्या शुभेच्छा. नंतर त्यांना इथे यावेसे वाटत नाहीत. वर्षातून एकदा का दोनदा त्यांच्या भारतातल्या घरी येतात. तेव्हा भेटण्याचा निरोप ठेवतात. भेटणे होते. नंतर दोन तीन वर्षांनी ते सुद्धा बंद.
भारताला नावे ठेवण्यासाठी देखील कोणाशी बोलणे होत नाही.
जे गेले, ते गेले. विसरून जायचे.
अवांतर : त्यांना बघून इकडे* सुद्धा तिकडचे वेध लागतात. ते आवरणे खूप कठीण जाते.
* इकडे म्हणजे नक्की कोण हे सुज्ञास सांगणे न लगे
10 Dec 2010 - 4:52 pm | Nile
तुम्ही मांडलेली बरीचशी निरीक्षणं जेनेरीक नाहीत इतकेच बोलुन थांबतो.
-फुल्या फुल्या कुणीकडचा.
10 Dec 2010 - 4:58 pm | गवि
म्हणजे:
मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ?
याचं उत्तर तुमच्यामते नाही असं आहे.. बरोबर ना?
आणि मुद्दे खूप मांडलेत मी पण मुख्य वाद कम प्रश्नः
मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ?
यावरच आहे.
10 Dec 2010 - 5:04 pm | Nile
आयुष्यभरात ठराविकच मित्र असतात का? ते मित्र होण्याच्या आधीच्या मित्रांचं काय झालं? दोन मित्र दुरावले की त्यांचे आयुष्यचं उद्ध्वस्त झाले का?
उगाच मैत्री-फित्री, नाते-गोते, दुर्घटना असले इमोशनल शब्द वापरुन मेलोड्रामा करण्यात काय पाँईट आहे?
10 Dec 2010 - 5:16 pm | गवि
आयुष्यभरात ठराविकच मित्र असतात का? ते मित्र होण्याच्या आधीच्या मित्रांचं काय झालं? दोन मित्र दुरावले की त्यांचे आयुष्यचं उद्ध्वस्त झाले का?
:) नवे प्रश्न..
नवीन मित्र मिळतात.. नव्या मैत्रिणीही मिळतात.. ("फिर हमारे मुहल्ले में हेमा आयी"..इति मुन्नाभाई.) सर्व होतच राहतं. अगदी मेलेल्या माणसाचीही जागा कोणीतरी घेतं. कायमचं उध्वस्त वगैरे काही होत नाही..सगळं सगळं ठीक.
शब्द दुसरे वापरुन मेलोड्रामा (एव्हीएम पिच्चर्स, मड्रास..) टाळता येईल..
पण म्हणजेच कमी मेलोड्रामॅटिक शब्दात समजा मैत्री संपते का ?असं म्हटलं तर : "हो ती बहुतेक वेळा संपते..पण त्याचा मोठा इश्यू करण्याची गरज नाही.." असं आपल्याला म्हणायचंय असं मी समजतो.
धन्यवाद..
10 Dec 2010 - 5:20 pm | Nile
मैत्रीची वाख्या करा, म्ह़णजे यावर सविस्तर निष्कर्ष काढता येईल.
10 Dec 2010 - 5:32 pm | गवि
कदाचित मैत्री, प्रेम या "व्याख्या करायच्या" गोष्टी नसून फक्त "करायच्या" गोष्टी असाव्यात असं वाटतं. गहन आहे व्याख्या करण्याचा विषय्..पण करतो एक प्रयत्न..
स्वतःच्या लग्नापूर्वी:
ज्यांना भेटायला ठरलेल्या वेळी ठरलेल्या पुलावर, हाटेलात, चौकात तुम्ही कितीही थकलेले असलात तरी पाय ओढत जाता आणि त्यांच्या आणि आपल्या आयुष्यात जे काही चाललंय ते एकमेकांशी आसुसून बोलून बोलून दुखरं तोंड घेऊन पण थकवा घालवून घरी परत येता ते मित्र.
लग्नानंतर: ज्यांना पूर्वीसारखं भेटता येत नाही म्हणून सर्वात जास्त वाईट वाटतं पण तरीही एकाच गावात / दुसर्या राज्यात / दुसर्या देशात / जगात कुठेही राहात असलात तरी एकमेकांशी काहीही शेअर करण्याची तीव्र इच्छा आपल्याला होते ते मित्र.
कोणाशीतरी हे (काहीही) शेअर केलं पाहिजे म्हणजे मज्जा/आनंद्/समाधान लाभेल ही तीव्र इच्छा म्हणजे मैत्री..
ती टिकते का हा प्रश्न्.. ती संपण्याला "दुर्घटना" म्हणू किंवा आणखी काही..
इतरांच्या व्याख्या ऐकायला आवडेल.
10 Dec 2010 - 7:13 pm | Nile
तर वरही जी काही उत्कट (फील्मी?) व्याख्या तुम्ही दिली आहे ती खरी मानली तर तुम्हीच स्वतःला काँट्रॅडिक्ट केलंत असं वाटत नाही का तुम्हाला?
थोडक्यात जी अतुट असते ती मैत्री असे म्हणता वर फक्त तिकडे गेल्याने मात्र ती तुटली असे म्हणता. मग काय? ती मैत्री नव्हतीच बहुदा? कींवा अतुट मैत्री वगैरे हे सगळे फील्मी विचार आहेत?
10 Dec 2010 - 7:29 pm | गवि
ठीक..
Tee phakt vyakhya hoti.
अतूट वगैरे मी काही म्हटलं नाहीये. तशी टिकते का नाही आणि इन बोथ केसेस 'का?' असा प्रश्न कुटण्यास उपस्थित केला. पण तुम्ही म्हणता ते योग्य आहे.मल गैरफ़िल्मी बोलता येत नाहीये.त्यामुळे पुढे बोलू शकेनसं वाटत नाही.आपला पॉईंट वेगळा अतएव आवडेश.
(फ़िल्मी) गवि.
10 Dec 2010 - 6:01 pm | रन्गराव
गवि, दोन प्रकारच्या लिखानामधून गैरसमज होण्याची शक्यता असते. एक तुम्ही किचकट काही तरी लिहिता किंवा फारच थोड्क्यात लिहिता. आणि दुसरं तुम्ही खूप सोपं करण्याचा प्रयत्न करता. पहिल्यामध्ये काही गोष्टी न समजल्यामुळे गैरसमज होतो. दुसर्यामध्ये सोपं करण्याच्या नादात गैरसमज करून घ्यायला वाव ठेवला जातो. तुमचा लेख दुसर्या प्रकारात मोडला. तुम्ही जो जनरीक शब्द वापरला त्याचा इथला अर्थ "Statistically Significant" असा आहे. पण पंचाइत आहे राव. "जनरीक" म्हंट्ला तर फारच जनरीक होतं ;) आणि "Statistically Significant" म्हंटल की वाचणार्यांची पंचाईत होते. लॉंग स्टोरी शॉर्ट - " एवढ सोपं करूनही गैरसमज होत असतील तर त्याला तुम्ही काहीही करू शकत नाही. प्रत्यक कमेंट मनावर घेवू नका"
10 Dec 2010 - 6:07 pm | गवि
चांगलं बोललात, मनावर घेत नाहीये हो..असंच चर्चा करतोय.
याच तर त्या कट्ट्यावरच्या दोस्तांशी गप्पा आहेत. :)
बादवे..
सरजी....मैं मूळ काथ्याकूटमें "जनरिक" नाही वापर्या.."सार्वत्रिक" वापर्या...!!
10 Dec 2010 - 6:13 pm | परिकथेतील राजकुमार
गवी ह्यांनी धाग्याची पुन्हा एकदा यशस्वी खरडवही केलेली आहे ;) त्यामुळे त्यांच्या पुढच्या धाग्यावर आम्ही त्यांना एक अतिशय हिणकस प्रतिक्रीयेच्या पुरस्काराने संन्मानित करणार आहोत.
10 Dec 2010 - 6:16 pm | धमाल मुलगा
हा काथ्याकूट आहे. कथा/ललित वगैरे नाही. जसा इतरांना आपलं मत मांडण्याचा हक्क आहे तसा धागा प्रवर्तकालाही तितकाच आहे की.
10 Dec 2010 - 6:20 pm | परिकथेतील राजकुमार
हे असे फसवे उत्तेजन देउन नंतर झाडावार जाउन बसणार्या मित्रांचा आम्हाला तिटकारा आहे. उगाच आम्ही वरती 'भिकारचोट' हा शब्द वापरलेला नाही ;)
गवी मी तुम्हाला पुरस्कार देणार म्हणजे देणार.
10 Dec 2010 - 6:31 pm | धमाल मुलगा
आम्हाला मात्र नुसत्या पिंका टाकणार्या मित्रांचा मुळीच तिटकारा नाही. असतो एकेकाचा स्वभाव. त्याला सांभाळुन घेतलं तरच मैत्री ना. ;)
आम्हाला उगाच 'भिकारचोट' हा शब्द वापरायची गरजच पडली नाही. :P
10 Dec 2010 - 6:21 pm | गवि
आम्ही पुढचा धागा न टाकता एकदम त्याच्या पुढचा टाकणार आहोत.. :)
10 Dec 2010 - 6:22 pm | परिकथेतील राजकुमार
त्या धाग्यासाठी तर पेश्शल पुरस्कार आहे ;)
10 Dec 2010 - 6:27 pm | गवि
स्वतः राजकुमारांनी जातीने या धाग्यावर चार्पाच वेळा उपस्थिती लावून शोभा वाढवली आणि हा माझा धागा सुखाचा केला.
त्यामुळे पुढच्या सर्व धाग्यांवर पुरस्कार दिलात तरी "एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे" म्हणत आम्ही शंभर धागे दु:ख सोशीत टाकू.
एकशे एकाव्या धाग्यावर मात्र आपली कौतुकाची प्रतिक्रिया येईल या आशेवर..
10 Dec 2010 - 6:32 pm | धमाल मुलगा
य्ये हुई ना बात! :)
ह्याला म्हणतात जिंदादिली. :D
10 Dec 2010 - 6:19 pm | रन्गराव
>>सरजी....मैं मूळ काथ्याकूटमें "जनरिक" नाही वापर्या.."सार्वत्रिक" वापर्या...!!
येइच पराब्लेम है तेरा, थोडा अवघड करकू लिख त्यो. सबकू सब समज्या त्यो मजा नाय आता! ;)
अऐ अगलीबार बागवानीमे लिख त्यो, ऐशा मजा आता मालूम :)
10 Dec 2010 - 5:50 pm | कानडाऊ योगेशु
माझ्यामते हा प्रश्न फक्त "इकडचे- तिकडचे" ह्या कन्सेप्टशीच संबंधित नसावा.
आयुष्यात जसजशी स्थित्यंतरे होत जातात तसतसे मित्र हा गोतावळा फार विरळ होत जातो.
लग्नानंतर/जबाबदार्या वाढल्यानंतर एका शहरात असणार्या दोन मित्रांनाही एकमेकांना भेटणे दुरापास्त होऊन जाते.
मला आठवतेय शिक्षण संपल्यावर पहीली नोकरी करत असताना जेव्हा कधी पुन्हा सोलापूरला जायचो तेव्हा घरी आल्या आल्या पहीला फोन सोलापूरात त्यावेळी असणार्या मित्रांना करत असे. नंतर मग घरच्यांशी गप्पाटप्पा होत असत.आज जेव्हा जातो तेव्हा क्वचितच फोन करतो.
थोडक्यात एकेकाळी असणारी मित्रांची अतोनात गरज आज तितकीशी वाटत नसावी.
त्यामुळे केवळ मित्र परदेशी जाणे ह्यापेक्षा प्रत्येकाचे आयुष्य स्वकेंद्रीत होणे ही गोष्टही मैत्रीत आणणारा दुरावा असु शकते.
10 Dec 2010 - 5:58 pm | गवि
मस्त..
मी म्हटलेला आणि उपस्थित केलेला "देश ते परदेश" लेव्हलचा इफेक्ट "गाव ते शहर" मधेही माईल्ड असतोच.
10 Dec 2010 - 6:24 pm | निनाद मुक्काम प...
सध्या सासर्या बरोबर सौना बाथला जात आहे .मग अपेयपान वैगैरे सोपस्कार पार पडले कि ह्या विषयावर भले मोठ्ठी प्रतिक्रिया (मनातील भावना )व्यक्त करीन
माझ्या मताशी कोणी सहमत असेलच असे नाही कदाचित टीका होईन (टीका होण्यासाठी सुद्धा भाग्य लागते .)
पण एक सांगतो मी ६ वर्षापूर्वी जेव्हा परदेशात गेलो लंडनमधील खेड्यातून सुरु झालेला प्रवास मग लंडन /अबू धाबी (ह्यात दुबई आलेच ) मग कलोन /फ्रांक फ्रुट (सध्या ) नवीन वर्षी म्युनिक येथे जाणार आहे .जेव्हा जेव्हा मुंबईत पुण्यात आलो . तेव्हा मला नेहमीच एक सकारात्मक बदल दिसला आहे .उदा आम्ही पदवीधर झालो तेव्हा नोकरी देता का नोकरी (घर देता का कुणी घर ह्या चालीवर ) त्यामुळे स्वप्ने /महत्त्वाकांक्षा
ह्यापेक्षा विवंचना जास्त असायची .आजची पदवीधर मूळ नोकरी मिळेस्तोवर कॉल सेंटर / बिपिओ /आणि बरेच ...त्यामुळे हातात पैसा खुळखुळतो त्याचा एक अभिमान तर त्यांच्यात असतो .पण कुठेतरी एक खमकेपणा असतो .(माज हा संयुक्तिक शब्द पण ह्या वयात तो शोभून दिसतो .) ह्याचे कौतुक वाटते .उगवत्या महासत्तेचे भावी वारसदार शोभतात. (उगवती महासत्ता ह्या सदरात आपले २०% मध्यमवर्गीय व मिपा वरील बरेच सदस्य असल्याने वापरत आहे .)कारण हे २० % मध्यमवर्गीय संख्येने कोणत्याही प्रगत राष्ट्रांच्या लोकसंख्ये इतके आहे किंबहुना कितीतरी जास्त आहेत . कारण हॉलंड ह्या देशाची लोकसंख्या मुंबईच्या लोक्संख्येयेवढी आहे .तर भारताचे २०% हे एकूण लोकसंखेच्या ........
बाकी इतर मान्यवरांच्या (असे म्हणण्याची पध्धत आहे )प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक आहे .
च्याव ( असा निरोप घेताना म्हणायची पध्धत आहे .आमचे भारतातील तरुण चुलते /मावस /आते युवा भावंडे भारतात न चुकता म्हणतात . भारतात बाकी बरिश्ता ची कोल्ड कॉफी व सिसिडीचे सांद्विच हे अमेरिकन स्टार बक्स किंवा इटालियन केफे नेगोला भारी .तर किंगफिशर जगातील एकमेव पंचतारांकित हवाई सेवा हे बिरूढ सार्थ ठरवते .(म्हातार्या आजी बाई हवाई सुंदर्या फक्त एअर इंडियाचा मक्ता नसून बिए / लुफ्तांजा हे सुध्धा स्पर्ध्धेत आहेत .
10 Dec 2010 - 6:59 pm | मदनबाण
ह्म्म्म...छान लिहलं आहे, परवाच या विषयावर एका व्यक्तीशी बोलणं झालं व्हतं.
परदेशस्थ लोकांच्या भावना जाणुन घ्यायला आवडेल...
जाता जाता :--- ही जाहिरात मात्र नक्की पहा.
http://www.youtube.com/watch?v=PDqKaMH5fcI
आणि हे गाणं (जिंगल) नक्की ऐका...
10 Dec 2010 - 6:29 pm | धमाल मुलगा
गगनविहारींच्या मतांशी बर्याच अंशी सहमत आहे.
काथ्याकुटात म्हणलंय तसं होतं खरं.
आधी एक शिग्रेट चार जणात फिरवून मारणारे दोस्त, आपल्यातला एखादा परदेशी चाललाय म्हणताना, त्याच्यापेक्षा जास्त खुष होतात. अभिनंदन, पार्ट्या...सगळे सोपस्कार उत्साहात पार पडतात. पुढे नियमित होणारे चॅट्स, मेल्स हळुहळू कमी होत जातात. आणि भेटींअंतीदेखील, पुर्वीसारख्या कट्ट्यावरच्या मनमोकळ्या गप्पांऐवजी थोडंसं अवघडलेपण घेऊनच भेटी होतात.
पण मला असं वाटतं, की हे असं होत असावं ते फ्रेम ऑफ रेफरन्समुळं. म्हणजे असं बघा, की समजा तुम्ही आणि मी कुठेतरी भेटलो, तर कदाचित आपण बर्याच गप्पा मारु शकू. अगदी नवपरिचितांनी एकमेकांशी बोलायला सुरुवात करतानाच्या हवापाणी-राजकारण-क्रिकेट-नाटक-सिनेमा वगैरेंचे दोघांचे रेफरन्सेस सारखे असतात. त्यावर आपण गप्पा मारायला सुरु करु शकतो आणि पुढे गप्पा रंगत जातात.
आता हेच जर तुम्ही परदेशात (कायम वास्तव्य) आहात आणि मी भारतात. तुम्ही बर्याच काळानं भेटायला आलात..मस्त आपण मोठ्या हौसेनं भेटलो, गप्पा सुरु केल्या तर त्या तितक्याशा रंगत नाहीत. का? समान धागा असतो तो कट्ट्यावरच्या आठवणी, शाळेतले/कॉलेजातले मास्तर, लाईन मारलेल्या पोरी, सोबत घातलेला दंगा ह्या सगळ्यांच्या आठवणी. पण त्यावर कितीवेळ बोलणार? वर्तमानात आल्यावर समजा, मी तुम्हाला जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या भानगडींबद्दल बोलायला लागलो तर तुम्हाला संदर्भ तितकेसे खोलवर ठाऊक नसल्यानं कंटाळा येणार. तुम्ही तुमच्या गव्हर्नराच्या निवडणुकीच्या गप्पा सांगितल्या तर मला त्यातलं काय डोंबल ठाऊक नसल्यानं मला कटाळा येणार. (राजकारणाचा हा मुद्दा उदाहरणादाखल घेतला आहे.) असंच करता करता दोघांच्या 'फ्रेम ऑफ रेफरन्स' वेगळ्या होऊन गेल्यानं ते तसं वाटत असावं.
हे झालं माझ्या अल्पमतीनुसार वाटणारं स्पष्टीकरण.
मुळ प्रश्न जो तुम्ही विचारला आहे त्याचं उत्तर माझ्या दृष्टीनं होकारार्थी आहे. त्यामागे कारणं संदर्भ काही असतील, पण 'फायनल आउटकम' काय तर तेच. असं माझं वैयक्तिक मत आहे.
नवे मित्र मिळणे हा जो प्रश्न इथे आला, त्याबद्दल मला असं वाटतं, की ती प्रक्रिया तर इकडच्या अन तिकडच्या दोघांकडेही घडतच असते. पण जुनी मैत्री जी कालपर्यंत एव्हढी घट्ट होती ती अशी मुठीत धरलेल्या वाळूसारखी का वाटतेय असा प्रश्न पडणं स्वाभाविक असावं.
10 Dec 2010 - 6:37 pm | रन्गराव
>>पण जुनी मैत्री जी कालपर्यंत एव्हढी घट्ट होती ती अशी मुठीत धरलेल्या वाळूसारखी का वाटतेय असा प्रश्न पडणं स्वाभाविक असावं.
असा अवघड प्रश्न विचारून पंचाईत करताय राव तुम्ही :(
10 Dec 2010 - 6:44 pm | धमाल मुलगा
सामोरे जाण्याशिवाय पर्याय काय असतो? :(
10 Dec 2010 - 9:43 pm | रन्गराव
पर्याय नसतो हे खरं आहे. पण तरीही असा प्रश्न पडला नाही तर सगळ व्यवस्थित चालू आहे, आपण आणि आपले मित्र बिझी आहेत अशा खोट्या समजुती काढून वेळ मारून नेता येते. असा प्रश्न पडला की समोर आरसा दिसतो, त्यात आपल्या कपाळावर लिहिलेलं असतं " स्वार्थी आणि स्वकेंद्रित". असो कधी ना कधी तर होणार असतेच हे. आज झालं काय आन उद्या झालं काय?
10 Dec 2010 - 6:51 pm | अवलिया
>>>पण जुनी मैत्री जी कालपर्यंत एव्हढी घट्ट होती ती अशी मुठीत धरलेल्या वाळूसारखी का वाटतेय असा प्रश्न पडणं स्वाभाविक असावं.
याला जीवन ऐसे नाव. सतत बदल घडत असतो. घडावा.
10 Dec 2010 - 7:36 pm | मेघवेडा
फ्रेम ऑफ रेफरन्सच्या मुद्द्याबाबत खंप्लीट सहमती. आणखी एक गोष्ट म्हणजे जिथं अपेक्षा आल्या तिथंच प्रॉब्लेम्स होतात. 'नो कंप्लेंट्स, नो डिमाण्ड्स' असं क्लीयरकट तत्व असलं की प्रॉब्लेम्स येत नाहीत. म्हणजे आता मी इतक्या लांबून आलोय इकडं इतक्या काळानंतर. त्यानं/तिनं मला भेटायला इकडे यायला हवं असं धरून बसलो तर कसं चालेल. कोणतीही गोष्ट टिकवायची म्हटली की काही स्पेशल एफर्ट्स हे घ्यावेच लागतात. मैत्रीही याला अपवाद नसावी. तेव्हा जर आपणच कुठलेही आढेवेढे न घेता मित्राला भेटायला गेलो तर त्याला किती सुखद धक्का बसेल! हा विचार करत नसावं पब्लिक म्हणून तुम्ही म्हणता तशा दर्या आढळून येतात. बर्याच जणांना हे जमत नाही, त्यांचा 'मी' आड येतो आणि तिथंच सगळं अडत. जरा आपला 'मी' जरा बाजूला ठेवून भेटीगाठी केल्या तर काही विशेष प्रॉब्लेम येत नाही हा माझा स्वतःचा अनुभव! पण फ्रेम ऑफ रेफरन्स सारखी नसली की गप्पाही एका ठिकाणी येऊन थांबू शकतात हेही खरंच. परवाचा भानसताईंचा मोरपिसे! हा सुंदर लेख याचंच उदाहरण!
बाकी
>>जुनी मैत्री जी कालपर्यंत एव्हढी घट्ट होती ती अशी मुठीत धरलेल्या वाळूसारखी का वाटतेय असा प्रश्न पडणं स्वाभाविक असावं.
खरंय.. हे व्हायचंच रे धम्या. ती वाळू हातातून कधी ना कधी सुटणारच असते की रे. वाईट वाटून घ्यायचं नाही झालं. नाना म्हणतो तसं "बदल सतत घडत असतो, घडावा!"
10 Dec 2010 - 9:39 pm | प्राजु
छान उत्तर!
धमु चे अभिनंदन!
धीस इज लाईफ! इट हॅज टू मूव्ह ऑन!
जुने मित्र जरी मागे पडले तरी तितकेच नवे मित्रही जोडले जातात. याचा अर्थ असा होत नाही की, जुने मित्र , मित्र रहातच नाहीत. भलेही तुम्ही त्याला भेटल्या भेटल्या भूतकाळातल्या गप्पा लगेच संपतील.. पण वरचे वर जर एकमेकांच्या संपर्कात राहिलात तर भेटल्यावर नेमके काय बोलायचे हा प्रश्न पडू नये.
माझा अनुभव असा आहे, की.. परदेशात आल्यानंतर मला उलट जुन्या मैत्रीणी इंटरनेटच्या माध्यमातून पुन्हा मिळाल्या. ज्या भारतात असताना कुठे आहेत, काय करताहेत काहीच माहिती नव्हते. वरचेवर चँटींग , फोन मुळे भारतात भेटल्यावर काय बोलावं हा प्रश्न नाही पडला.
आणि राहता राहिला प्रश्न.. इकडचे तिकडे गेल्यावर आपणहून जात नाहीत नाते वाईकांना भेटायला.. इ.इ.
पण.. कोणी काहीही म्हणो.. ती फॅक्ट आहे.. वेळ कमी आणि कामे जास्ती हा प्रकार असतोच असतो. वर्ष्-दोन वर्ष तुंबलेली कामे..(सरकारी/खाजगी/घराच्या संदर्भात इ.इ.) असतातच आणि गेल्या गेल्या काम झाले आहे अशी परिस्थिती भारतात अजूनतरी नाहीये. त्यामुळे सगळ्यांना भेटायची इच्छा खूप असते.. सगळ्यांकडे जायचेही असते.. पण नाही जमत. त्यामुळे आपणच घरी एक मोठ्ठी पार्टी अरेंज करावी आणि सगळ्यांना बोलवावे.. हाच एक पर्याय असतो. शिवाय असंही असतंच.. की, आपण भलेही कोणाकडे जायला निघालो.. तर ज्याच्याकडे जायचे आहे त्यालाही वेळ हवा ना! सगळीच मूठ वळायची अवघड असते.. मग कुठेतरी कधीतरी तो योग जुळून येतो आणि मग गेलेले दिवस परत येतात. आणि हे चक्र चालूच असतं अशाप्रकारे.
संबंधांवर थोडी धूळ बसते.. ती साफ करावीच लागते अधूनमधून. :)
11 Dec 2010 - 10:38 am | चिगो
बरोबर बोलतोय धमुभौ... "फ्रेम ऑफ रेफरन्स" अतिशय महत्त्वाची असते.. मी माझ्या शाळेतल्या मित्रांसोबत (दहावीपर्यंतच्या) गप्पा मारतांना जी धमाल केली त्यावर वारंवार बोलू शकतो. पण त्याच मित्रांनी मी तिथून गेल्यावर अकरावी-बारावीत ज्या मस्त्या केल्या, त्यांच्याशी मला रिलेट करता येत नाही.. सेम कॉलेजच्या मित्रांबद्दल. आता कलिग्स आणि नोकरीतल्या मित्रांशी जे बोलतो तसंच शाळेतल्या मित्रांशी नाही बोलू शकत..
त्यामुळे मित्र बदलतात, त्यामुळे मैत्रीही बदलते...
बाकी गवि... लगे रहो.. :-)
11 Dec 2010 - 10:56 am | प्रभो
@धम्या: ही फ्रेम ऑफ रेफरंस 'ब्लेंडर्स' च्या आधीची का नंतरची?? ;)
10 Dec 2010 - 6:30 pm | निनाद मुक्काम प...
@आयुष्यभरात ठराविकच मित्र असतात का? ते मित्र होण्याच्या आधीच्या मित्रांचं काय झालं? दोन मित्र दुरावले की त्यांचे आयुष्यचं उद्ध्वस्त झाले का?
तुम्ही जगाच्या कोपर्यात कुठेही राहा प्रिय मैत्रिणीच्या आयुष्यात नवरा नामक शुद्र कीटक आला कि तिची तुमची ताटातूट पक्की मग .
10 Dec 2010 - 7:15 pm | Nile
तुमच्या साठी ती एक अत्यंत प्रिय मैत्रीण असेल पण तिला तुमच्या पेक्षा प्रिय मित्र मिळाला असा याच अर्थ होत नाही याबद्दल तुम्हाला खात्री आहे का?
किंवा, तुमच्या शब्दात, तिच्या जीवना तुम्ही शुद्र किटक होतात पण मग तिला तो भेटला.
10 Dec 2010 - 6:47 pm | यकु
मला मुळात इकडंच आणि तिकडचं असा फारसा फरक वाटत नाही. दोस्त ते दोस्तच! हां, तिकडे राहात असल्यावर/ जाऊन आल्यावर थोडे थिजून गप्प होतात, पहिल्यासारखे मोकळेढाकळे राहात नाहीत एवढं मात्र अनुभवलंय. थोड्याशा गफ्फा केल्या की पुन्हा पहिल्यासारखे मोकळेढाकळे होतातच!
आणि इकडं राहूनही तिकडे डोळे लाऊन बसलेले आणि
तिकडं राहूनही इकडं डोळे लाऊन बसलेले पण अनेक जण असतात (ब्लॉग वगैरेंमुळे तर हे स्पष्टपणे दिसतं). तिकडच्याला कंटाळले की इकडे आणि इकड्च्याला कंटाळले की तिकडे.
10 Dec 2010 - 7:39 pm | छोटा डॉन
आमचं एक मत अतिशय चिंतनीय आहे ;)
"ह्या जगात कुणी कुणाचा मित्र वगैरे नसतो, अगदीच जर फार प्रेम वगैरे असेल तर फार्फार तर हितचिंतक असु शकतो"
सच्चा मित्र एकच .... आपण स्वत: "
- ( सर्वांचा हितचिंतक ) छोटा डॉन
10 Dec 2010 - 8:34 pm | ईन्टरफेल
व्वा?
10 Dec 2010 - 7:55 pm | असुर
आयच्या गावात! मैत्रीत कसली आलीये दुर्घटना?? मैत्री तर कुठेही असा कायमच राहते असा आपला कायमचा अनुभव आहे. कुणी परदेशी गेला तर काय झालं? च्यायला, असल्या गोष्टी आयुष्यात होतच राहतात, त्यांना प्रत्येक वेळी दुर्घटना म्हटलं तर आयुष्यभर नुसती फ्रॅक्चर आणि मलमपट्ट्या मोजायला लागतील! एखादा मित्र/एखादी मैत्रीण दूर जातो/जाते, पूर्वीसारखा वेळ देऊ शकत नाही तर हे बाकी मित्रांनीदेखील समजून घेतलं पाहीजे. बर्याच वेळ देऊ शकत नाही याचं कारण टाईमझोनचा फरक हेही (रादर हेच) असतं. दर वेळी दुर्घटनाच असेल असं नाही!
माझा वैयक्तिक अनुभव या बाबतीत फार चांगला आहे. माझे मित्र आणि मी आजही फोनवरून तासनतास गफ्फा मारतो. मी परत गेलो होतो तेव्हाही कुणालाही असं वाटलं नाही की मी काय फार दिवसांनी उगवलो वगैरे. सगळं अगदी मागच्या पानावरुन पुढे सुरु झालं. यात सर्व क्रेडीट माझ्या मित्रांचं आहे. त्यांनी मला या काळात खूप सांभाळून आणि समजून घेतलं!
मला मिपावरुन मिळालेले मित्र, ज्यांच्याशी परदेशात असताना इंटरनेटवरुन मैत्री झाली आणि नंतर जे मला भारतात भेटले, त्यांच्याशीसुद्धा आजही चांगला काँटॅक्ट आहे. थँक्स टु मिपा आणि माझे मित्र!!
मग हा दुर्घटनेचा रुल कुठे लागू झाला? कुठेही नाही! आणि जसं मी म्हणतोय तसंच थोड्याफार फरकाने बाकीचेदेखील म्हणतील. मग हे जेनेरिकदेखील नाहीये ना! गवि, तुमचं दुर्घटनेचं लॉजिक लावलं ना, तर मित्र/मैत्रीणी दुरावण्याचा सर्वात मोठा अॅक्सिडेंट तर 'लग्न' म्हणावा लागेल.
--असुर
10 Dec 2010 - 8:08 pm | आनंद घारे
तिकडे राहणारे बहुतेक लोक तिथे सुध्दा इकडच्यासारखेच राहतात आणि आपापल्या घरात आपापला भारत किंवा महाराष्ट्र निर्माण करतात असेच मला दिसले आहे.
काही वेळा तिकडे जाऊन परत इकडे आलेला.
10 Dec 2010 - 9:03 pm | उपास
छे, मी तर उलट म्हणतो गेल्या दहा-वीस वर्षात जग खूप जवळ आलय.. आता तर मी केव्हाही कुठल्याही मित्राला फोन करुन हवं तितकं बोलू शकतो.. त्यांचेही फोन येतात.. वेब कॅम तर अस्तातच.. बरेचदा मी इथून कित्येकांशी तासन तास बोलतो पण मुंबईतल्या मुंबईत त्यांना भेटायला होत नाही महिन्यामहिन्यात.. कुठेतरी एखाद्या लग्नात सगळे भेटतात (ते सुद्धा पोराबाळांच्या तब्येती ठीक असतील तर आणि मेगाब्लॉक नसेल तर..) तिकडे गेलो तर मात्र सगळेच प्रयत्न करतो एकत्र येण्याचा इन्फॅक्ट इथले दोघ तीघ एकदम जाण्याचं जमवू शकलो तर मात्र सगळेच हातातलं जे आहे ते टाकून येतातच..
तात्पर्यः मित्र बदलत राहातातच पण जुने मित्र तुटत नाहीच, जग पुढे चाल्लेय.. ऑरकट, फेसबुक मुळे तर We are always there, just a scrap away.. ;) आणि अडल्या नडल्याला प्रत्यक्ष उपस्थितीत मदत नसली तरी मोरली आणि आर्थिक मदतीचा हात असतोच असतो... शिवाय माझ्या अनुपस्थितीत घरच्यांना काही हवं नको असेल तर बघायला विश्व्वासाने मित्रमंडळी असतातच.. एकंदर जे आहे त्यात चांगली बाजूही आहेच खूप सारी!
10 Dec 2010 - 9:14 pm | शुचि
मी गरोदर असताना माझ्या ३ मैत्रिणींनी माझी खूप काळजी घेतली कारण मी एकटी होते. नवरा जहाजावर होता. अर्थात ही काळजी आठव्या महीन्यात खाणं-पीणं सांभाळणं यापासून ते मन प्रसन्न ठेवनं , फोन करणं, मॉरल सपोर्ट देणं व अनेक प्रकारची होती. (नवव्या महीन्यात मी आईबाबांकडे पुण्याला गेले)
तीघींनाही सोडून अमेरीकेला जाताना खूप वाईट वाटलं. तीघींनाही मी "आई" नावाचं कवितांचं पुस्तक भेट दिलं. त्यांनी मला इकडे (अमेरीकेत) खायला मिळणार नाही म्हणून ईडली, डोसा,पाणीपुरी स्वतः करून खाऊ घातली. मला खूप शुभेच्छा दिल्या.
तीघींनी माझ्या आत्म्याला अपार संतुष्टी दिली, मला माया दिली. ज्योतिष शस्त्रात चवथं घर असतं जे - आई, अन्न, मन, भावना , संवेदनशीलता यांचहं कारक असतं. अतिशय प्रेमाने वाढलेल्या अन्नाने फक्त शरीर पोसले जात नसते तर आत्मा तोषत असतो.
या तीघीजणी माझ्या पासून दुरावल्या ही दुर्घटनाच होती.
10 Dec 2010 - 9:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
डॉन्रावांनी माझं नाव पहिल्याच प्रतिसादात टाकल्यामुळे...
लहानपणापासून मित्र-मैत्रिणी जोडायचा आणि पुढे गेल्यावर नवीन मैत्र जोडताना मागच्यांशी संपर्क राहिला नसेल तर मुद्दाम न करण्याचा माझा स्वभावच असावा. दोन शाळा, दोन कॉलेजेस, दोन विद्यापीठं, शिवाय हौशी खगोलाभ्यासकांचा ग्रूप, एक नोकरी आणि आता मिपा अशा नऊ ठिकाणीतरी मी बर्यापैकी वेळ घालवला (?) आहे. या बर्याचशा ठिकाणचे मित्र-मैत्रिणी म्युचुअली एक्सक्लुझिव्ह (मराठी शब्द?) आहेत. यातलं एकाच ठिकाण परदेशात असलं तरीही बहुतेकशा जुन्या मित्रांशी* माझे फारसे संबंध राहिले नाहीत. जे कोणी इंटरनेटवर आहेत त्यांच्याशी संबंध टिकले, काही लोकं माझ्यासारखेच आहेत त्यामुळे सहा महिन्यांनी संपर्क झाला तरीही कालच एकत्र जेवल्यासारखे आम्ही गप्पा मारतो, सुखदु:ख शेअर करतो.
तस्मात परदेशगमन हीच गोष्ट माझ्यासाठी मैत्रीत बाधा आणणारी ठरलेली नाही.
("क्षीण प्रयत्नांच्या" आरोपाचा दोष स्वीकारत...) आज बरोब्बर एक आठवडा झाला, आयुष्यात अमेरिकेत पहिल्यांदा पाऊल ठेवल्याला! इथे येऊन २४ तास पूर्ण झाले नाहीत तर "कशी काय वाटली अमेरीका, ऑस्टीन", "भेटलीस, बोललीस का अमक्या तमक्यांशी?" वगैरे प्रश्नांना खरी उत्तरं द्यावीत का खोटी हा प्रश्न मला पडला. बरं हे प्रश्न विचारणारे इथले आणि तिथले दोन्हीकडचे आहेत. अमेरिका कशी वाटली या प्रश्नाचं उत्तर एका शहराचा तुकडा पाहून मला तरी देता येणार नाही आणि "ऑस्टीन आवडलं का" या प्रश्नाचं उत्तर एका आठवड्यात कसं देणार?
नवीन गाडी घेणे**, मोठमोठे मॉल्स असणे, घरात स्वच्छ पाणी असणे (डोंबिवलीकर असाल तरीही), शहरातले काही रस्तेतरी प्रशस्त असणे, महागडे परफ्यूम्स, चॉकलेट्स दुकानात उपलब्ध असणे, या गोष्टी काही फक्त पाश्चात्य देशापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. कदाचित मला या गोष्टींचं खूप जास्त आकर्षण नसल्यामुळेही असेल. उलट परदेशातच थालिपीठाची भाजणी, पोहे, साबुदाणे इ. गोष्टी मिळत नाहीत म्हणून तिथेच मलातरी जास्त वाईट वाटतं. आपल्याकडे 'टॉब्लरॉन' येऊन अनेक वर्ष झाली, हल्ली 'लिंड्ट' वगैरेही चॉकलेट्स मिळतात तर बेडेकरांचा गोडा मसाला मँचेस्टरमधे का मिळत नाही?
कदाचित "एका परदेशात" तीन वर्ष रहाण्याचा अनुभव असेल म्हणूनही असेल पण घरी, भारतातल्या लोकांशी गप्पा झाल्या की काल काय खाल्लं, अमुक एक गोष्ट करताना कशी माझी गंमत झाली, तो अमका-ढमका भेटला आणि काय-काय गप्पा झाल्या अशाच गप्पा फोन, चॅट, स्काईपवर होतात. या अशाच गप्पा ठाण्या-पुण्यात असतानाही होत होत्या.
अमेरिकेत असंच आहे आणि भारतात कसं काय वाईट आहे अशाच गप्पा मारण्यापुरती ओळख असेल तर त्याला खरंच मैत्री म्हणता येईल का? काही नवीन दिसलं तर ते सांगावंसं वाटणं वेगळं आणि फक्त तिथेच गाडी अडकणं वेगळं! अशी 'मैत्री' मुळात खरोखरच होती का याचा कधी विचार झाला आहे का? हा प्रतिसाद लिहीण्याआधीच एका आंतरजालीय मैत्रिणीशी गप्पा संपल्या, तेव्हा आधी "अमेरिकेतले माझे अनुभव" सांगून झाल्यावर शेवटी गाडी आपले अमक्या विषयांवर विचार किती जुळतात यावर येऊन स्थिरावली.
वाढतं अंतर म्हणाल तर आपण कोणत्या लोकांना भेटतो, काय वाचन करतो त्यातूनही वाढू शकतो. एकेकाळी ज्याची आणि मतं अगदी सारखी होती तो माझा सख्ख्या भाऊ आता मला विचारांनी जवळ आहे असं वाटत नाही, असावा अशी अपेक्षाही नाही. असं नाही म्हणूनही समविचारी मित्र सहज जोडले जाऊ शकतात.
संधी मिळत नाही, आईवडील आहेत याबरोबर आणखीही एक कारण असू शकतं भारतात परत येण्याचं! आपल्या देशाची सवय झालेली असते. एखाद वर्ष बाहेर एकटं राहून कंटाळा येतो, आपले लोक हवेसे वाटतात. दहा वर्षांपूर्वीपेक्षा भारतात आज बर्याच जास्त प्रमाणात सोयी, सुविधा उपलब्ध आहेतही, कर्तबगार लोकांना चांगल्या पगारांच्या नोकर्या मिळून स्टँडर्ड ऑफ लाईफ फार न बदलता भारतातही रहाता येतं.
बाकी नायल्या म्हणतो तसं, अनेक लोकं असे वागतही असतील. पण माझ्या बघण्यात असे लोकं नाहीत. मी इथली आणि तिथली असतानाही मूळ लेखात लिहील्याप्रमाणे अशी वागले/वागते असं मला वाटत नाही. सामान्यीकरण करणं आवश्यक असल्यास बहुसंख्य जनता कदाचित अशी असेलही, पण माझा संपर्कमात्र "अल्पसंख्यांकां"शीच आला आहे.
*मित्र = मित्र-मैत्रिणी या अर्थाने वाचणे.
** गेल्याच महिन्यात फेसबुकावर आमच्या एका 'इथल्या' जालीय मित्राने जुन्या विकलेल्या आणि नव्याकोर्या गाड्यांचे फोटो टाकले होते त्याची आठवण झाली.
अवांतरः डाण्राव प्रतिसादाची लांबी पाहून बहुदा पुन्हा प्रतिसाद लिहीण्याची 'विनंती' करणार नाही. ;-)
14 Dec 2010 - 11:18 am | विजुभाऊ
घरात स्वच्छ पाणी असणे (डोंबिवलीकर असाल तरीही),
ठाणेकरानी डोंबिवलीकराना असे सिंगल आउट करण्याचा हा प्रयत्न आहे.
डोंबिवली ही भारताचे आद्य स्लीपिंग टाऊन. कामासाठी सकाळी गाव गाव सोडायचे आणि सम्ध्याकाळी झोपण्यापुरते घरी यायचे ही रीत कष्टाळु डोंबिवलीकरांच्या अम्गवळणी पडली आहे.
त्या डोंबिवलीकरांना से सिम्गलाऔट केल्याच्या प्रकाराचा एका पार्लेकराकडुन निषेध
14 Dec 2010 - 1:38 pm | स्पा
एक डोम्बिवलीकर ............
11 Dec 2010 - 7:26 am | अरुण मनोहर
काही प्रश्न पडले आहेत.
एका झाडावर मधमाशांची दोन पोळी आहेत. त्यातल्या मधमाशा एकमेकांच्या पोळ्यात (चुकून किंवा मुद्दाम) जात असतील का?
आणि जर जात असतील तर,
--कोणाच्या लक्षात ही गोष्ट येतही नसेल, की,
---इकडचे आणि तिकडचे ह्या विषयावर त्यांच्यात गुणगुण होत असेल की,
---डसडस होत असेल की,
--- आणखी काही?
11 Dec 2010 - 7:55 am | नंदन
विषय. चर्चा आणि प्रतिसाद वाचण्यास उत्सुक आहे. या निमित्ताने काही जुने प्रतिसाद आठवले.
तूर्तास Getcha Popcorn Ready :)
11 Dec 2010 - 8:01 am | प्रियाली
आमचा लै आवडता खेळाडू हाये! एकदम झक्कास!!
बाकी, दोन टायमाची भाकरी मिळवण्यात व्यग्र असल्याने फार लिहू शकत नाही. चालू द्या!
11 Dec 2010 - 9:54 am | पिवळा डांबिस
मूळ धागा वाचून अभिप्राय लिहिणार होतो....
पण इथे येता येता बाकीचे अभिप्राय वाचून मला काय लिहायचंय ते विसरूनच गेलो...
आठवलं की परत इथे येईन.....
बाकी,
मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ?
असहमत!!!!
खर्या निरपेक्ष मैत्रीमध्ये अंतराचा अडथळा येत नाही, हे स्वानुभवावरून!!!
11 Dec 2010 - 12:17 pm | बेसनलाडू
मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ?
असहमत!!!!
खर्या निरपेक्ष मैत्रीमध्ये अंतराचा अडथळा येत नाही, हे स्वानुभवावरून!!!
(सहमत)बेसनलाडू
11 Dec 2010 - 10:15 am | मनीषा
मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ?
केवळ परदेशी जाण्यामुळे किंवा न जाण्यामुळे मैत्री चे नातं संपत असेल तर त्या मैत्रीची मर्यादाच तेव्ह्ढी होती असे समजावे..
तसही रोजची व्यग्रता, अनेक समस्या आणि जबाबदार्या यातुन आपण किती वेळ आपल्या अगदी परदेशी न गेलेल्या मित्र - मैत्रीणिंना देउ शकतो?
नात्यांमधे दुरावा येण्यासाठी आणि तो वाढत जाण्यासाठी परदेशी जाणे हे कारण असू शकत नाही .
11 Dec 2010 - 10:34 am | शिल्पा ब
हल्लीच कुठेशी वाचलं कि राजाला अन बायकांना मित्र मैत्रिणी असत नाहीत म्हणून...
12 Dec 2010 - 2:38 am | निनाद मुक्काम प...
मी एक अनिवासी ह्या नात्याने माझे मत मांडतो .
अमेरिकेत अथवा युकेत अथवा आणि कुठेही ३० ते २० ते १५ अगदी १० वर्षापासून परदेशात राहिलेले अनिवासी असतात ,ते एकतर उच्च शिक्षण च्या निमितान्ने तेथे गेले असतात किंवा उच्च शिक्षणाच्या जोरावर नोकर्या घेऊन घेलेले असतात (हा लेख मी महाराष्ट्रीयन अनिवासी एवढ्याच समूहा ला लक्षात घेऊन लिहित आहे. ) त्यांची परदेश गमनाची मुख्य कारण त्यावेळी भारतात असणारी बेरोजगारी /महागाई /समाजात बुद्धिवंतांना असलेली किंमत /अडाणी व विवेकशून्य लालची लोकांकडे असलेले समाजाचे पर्यायाने देशाचे नेतृत्व (ह्यामुळे भ्रष्टाचाराला मिळालेली प्रतिष्ठा ) व त्याचवेळी समोर अमेरिकन वा एखाद्या परदेशी प्रगत देशाचे मनोरम्य चित्र .म्हणून काही संधी मिळाली तर काहींनी संधी मिळवून अनिवासी झाले .ह्या लोकांना तेथील कायदा सुव्यवस्था /सुब्बता /आधुनिक जीवनशैली(ह्यात मला प्रक्टिकल विचारसरणी ठेवून जगणारी विचारसरणी ज्यात ५ दिवस काम व दोन दिवस आराम (ह्या दोन दिवसात मग आजूबाजूची मराठी डोकी हुडकणे /त्यांनी एकत्र येऊन पार्ट्या करणे /हातात बाटली असणे. अश्या नवीन अनिवासी संस्कृती बद्दल म्हणायचे होते . .पण मराठी साहित्य व परंपरा ह्यांच्यात रमलेला त्यांचा मनातील एका कप्पा उदास होता . व त्याची खुशामत करण्याची मंडले (ह्यांचे उदिष्टे फक्त आपल्या आयुष्यातील गतकाळ आठवणे त्यासाठी मग जुनी गाणी शास्त्रीय गाणी /मराठी नाटके व मराठी सण व परंपरा सांभाळणे ह्या सर्व गोष्टी हिरारीने (काहीश्या जिद्दीने ) सुरु झाले .कारण होते .ह्या परदेशात परकीयांनी जाणते /अजाणते पणी ह्यांना परकीय असल्याची जाणीव करून देणे होय .प्रत्येक वेळी टोमणे व शेलके शेरेच काही गोर्यांकडून नको ऐकायला .पण त्यांची जीवन शैली व मूल्य कितीही झाली तरी ह्या अनिवासी लोकंना पूर्णपणे स्वीकारता नाही आली .आजही ५ मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन एकच भाषा /खाद्य पदार्थ /एकच विषय (तो एकतर भारता संबंधी राजकारण अथवा सिनेजगतावर वा सद्यस्थितीतील कोणत्याही सामाजिक असामाजिक प्रश्नावर असो किंवा अमेरिकेत स्थिरावताना येणारे दैनंदिन आयुष्यातील प्रश्न जसे मुलांचे शिक्षण / एखादी नवी गोष्ट जसे कार व जागा घ्याची असेल तर सल्ला ह्या विषयांवर जे मेतकुट जमते ते इतर गोर्यांबरोबर होऊच शकत नाही .) मग येथे स्थिरावल्यावर भारतात काय होतंय ह्यांची कल्पना नसल्याने (त्याकाळी सोशल नेटवर्क प्रगत नसल्याने भारतात फोन म्हणजे चैनीची गोष्ट (लांब लचक फोन कॉल) ह्यामुळे भारतात घडणारी सामाजिक स्थित्यंतर ह्यांच्यापासून लपून राहिली .बरे येथे स्तःयिक आहोत .व आता गाडी /घर व आपल्या कर्तबगारीमुळे व बचत व योग्य प्लानिंग मुले अमेरिकन ड्रीम व त्याहून जास्त कमावून बसलेल्या अनिवासी भारतीयांना समाजात एक ओळख हवी होती. ती अमेरिकन समाजात शोधणे शक्य नव्हते .(उद्या एखादा भय्या समजा म्हणजे उदाहरण द्यायचे म्हणून जेष्ठ नेते कृपाशंकर सिंग हे मुंबईत पैसा व्यापार आपल्या सचोटीने कमावून गब्बर झाले म्हणून ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नाही बनणार (त्यांचा जीव रमणार हि नाही ) मुंबईच्या उच्चभ्रू टाटा गोदरेज व हिरा व शेअर मध्ये डील करणार्या मुंबईच्या बड्या लोकांमध्ये सुध्धा सामील होऊ शकत नाही .त्यांना खरा मान हा त्यांचा मूळ गावी .(आज मुंबईत काम करतो ह्या एका शब्दावर ह्या लोकंना त्यांच्या राज्यात सुंदर स्थळ मिळते) तर मग आपल्या कर्तबगार अनिवासी भारतीयांनी महार्ष्ट्रातून लेखक /नाटककार / व अनेक नामवंत मंडळीचा आपल्या कडे बोलावून पाहुणचार करू लागले /हेतू एकच आपल्या आयुष्याचे रसभरीत वर्णन कळू दे मायदेशी .दुसरा हेतू म्हणजे थोरा मोठ्यांचे पाय लागुदे आपल्या घराला. पण ह्यात कुठेतरी महाराष्टार्तील मित्र व अनिवासी भारतीय मधील दुरावा व विचार करण्याची प्रवृत्ती बदलते .भारतात आल्यावर ह्या अनिवासी भारतीयांना येथील उणीवा प्रकर्षाने जाणवतात त्यावर प्रखर भाष्य ते करतात .त्यामुळे कुठेतरी एक शीत युद्ध सुरु होते .बाकी काही वर्षापूर्वी परदेशातून आल्यावर खाऊ म्हणून चोकालेत आणणे (आमच्या लहानपणी आम्हाला क्वचित पेन वा अश्या गोष्टी मिळत हॉलीवूड मधून पाहिलेले परदेश वास्तवात काही प्रमाणात फोटोत पाहायला मिळणे )ह्यामुळे परदेशातून कोणी येणार म्हणून पूर्ण गल्लीत दवंडी असायची .अनेक दूरदूरचे नातेवाईक येऊन कौतुक सोहळे व्हायचे .पण खुपदा माझ्या पाहण्यात असे आले आहे कि हि लोक अजूनही आपला भूतकाळ जगण्यासाठी त्याकाळातील गाणी अथवा इतर विषय हेच अजेंड्यावर ठेवतात . . हीच लोक कार्यकारणीवर असतात .त्यामुळे नवीन आलेले अनिवासी वा विद्यार्थी त्यांच्याशी समरस होऊ शकत नाहीत( १०० % मराठी कलावंत ज्यात श्रेयस /पुष्कर /भारती अचार्केकर /किशोर प्रधान /विजू खोटे /क्रांती रेडेकर असलेले नाटक लेखन व निर्माते दाभोळकर ह्यांचे नाटक युरोपात दौरे होत असतांना महारष्ट्र मंडळात लंडन मध्ये होऊ दिले नाही .कारण नाटक इंग्लिश मध्ये होते .(खरे तर ह्यांची तरुण पिढीला हे मराठी व हिंदी फ्युजन असलेले नाटक अधिक आवडले असते कारण ह्याच्या बोलीभाषेत अर्धे शब्द मराठी तर अर्धे इंग्लिश असतात . .२ ,)मध्ये मी माझ्या पिढीला अंतर्भूत करेन .जे ५ ते७ वर्षापूर्वी अनिवासी झाले .आम्ही जेव्हा भारत सोडला तेव्हा नेट संस्कृती आपल्या इथे बाळसे धरू लागली होती .जागतीकरणामुळे महासत्ता बनण्याची चाहूल लागली होती (आपण त्या भाग्यवान २० % मध्याम्वार्गीयात मोडतो ज्यासाठी परकीय व स्वकीय बहुराष्ट्र कंपन्या त्यांचे जगातील अद्यावत सामुग्री अत्यंत आकर्षक स्वरुपात आपल्यासाठी उपलब्ध केली आहे .उदा भारतातील मोबाईल कंपन्याचे टेरिफ सध्या जगात सर्वात आकर्षक व स्वत आहेत .) त्यामुळे भारत वियोग आम्हाला याहू व आदी मेसेंजर मूळे जाणवला नाही . अवंतिका मध्ये काय झाले हे आठवड्याचे संशिप्त वृत्तांत एका chat मध्ये कळत होते मराठी पेपर वाचता येत होते .अर्थात २००० नन्तर जेव्हा जेव्हा भारतात आलो मुंबई व पुण्यात ५ वर्षापूर्वीची बेरोजगारी कमी व सुब्बता दिसत होती .किंबहुना आमच्या मित्र मंडळीत आम्ही तुमच्या पेक्षा कमी नाही हि दाखवायची अहमिका होती .(हे पाहून एक भारतीय म्हणून मला तरी खूप बरे वाटले .दृष्टीकोन हा बराच व्यापक आणि प्रक्टिकल होता .(ह्या पिढीत एखाद्या मुलीसाठी देवदास होणे माझ्यामते ओल्ड फेशन होते .त्यापेक्षा दिल चाहता हे मधील किंवा तू नही तो कोई और सही अर्थात पहिले लगीन करियरचे असा व्यवहारी दृष्टीकोन दिसला .) आता यु ट्यूब मूळे झी मराठी व इतर मराठी संस्थालामुळे मराठी शो व पुरस्कार सोहळे पाहता येतात .फु बाई फु मध्ये कोण चाबूक काम करते ह्यावर चर्चा व इंटर नेट मधील torent मूळे अमेरिकन व जगातील गाजलेल्या टीवी मालिका व सिनेमे चकट फु पाहायला मिळत असल्याने भारतीय व अनिवासी भारतीय ह्यात फारसा फरक दिसत नाही आहे ,
किंबहुना अनिवासिपेक्षा भारतीयच फार्म विले वर जास्त सापडतील .ओर्कुट व फेसबुक ने आपणास एका समान फेस दिले आहे असे मला वाटते .आम्ही नोकरी व घर ह्यामधील प्रवासात वाचणारा वेळ मिपा व आदी मराठी संस्थळावर घालवतो . .काही आधुनिक अनिवासी परकीय बिग ब्रदर मध्ये काय आहे आमच्या डॉली ची सर आहे का कुणाला ? म्हणून देशी अवतार चवीने पाहतात. म्हणून यु ट्यूब जिंदाबाद.
आम्ही खुपते तिथे गुप्ते काही आठवड्याने का होईना उशिरा पाहतो (आखातामध्ये सर्व भारतीय वाहिन्या दिसतात हेच लोण तमाम जगभरात पोहचेल .किंवा काही वर्षात नेट टीवी बाळसे धरेल .आज भारतीय लहान मुलांना ( मुंबईतील)माझ्या पाहणीतील हेना मोन्तेना माहित असते .पण मुग्धा सुध्धा माहित असते .ते टिंग्या पाहून हळहळत नाहीत कारण हि संस्कृती त्यांना व अनिवासी शिशु पिढीला सारखीच नवीन असते .. आहे .भावी पिढीतील भारतीय व अनिवासी भारतीय ह्यांच्यात माझ्या मते वैचारिक दृष्ट्या विशेष फरक राहणार नाही आहे .पण अनिवासी भारतीयांनी आपली थोडी मानसिकता बदलायला हवी ( आय मीन स्वताच्या भाव विश्वातून बाहेर येऊन सत्य स्वीकारले पाहिजे .एक उदाहरण द्यायचे त अमेरिकेतील साहित्य संमेलन/ वक्ता अविनाश धरमाधिकारी /.ते जेव्हा भाषणात म्हणाले कि सिलीकोन VALLEY ची दुसरी भाषा मराठी आहे (प्रचंड टाळ्या व सहमती )पण मग म्हणाले त्यांनी येथील ओपेरा वा नाटक पहिली त्यातील टेक्निकल प्रगती पाहता आपली नाटक काहीच नाही .तेव्हा मात्र साप दिसल्यागत शांतता (आम्ही सत्य स्वीकारत नाही .आज भिकार डेली सोप मुळे मराठी तरुण पिढी जर नेट वरून इंग्लिश मालिका पहायला लागले डिस्ने वा हॉलीवूड सिनेमे पहिले तर मग दोष कोणाचा ?
हि पिढी मग परदेशात आल्यावर ते महारष्ट्र मंडळात एकरूप होत नाही कारण तेथे अजूनही २० वर्षापूर्वीचे महार्ष्ट्रीय सांस्कृतिक उपक्रम होतात . मग समवयस्क नवे अनिवासी भारतीय एकत्र येऊन स्वताची नवीन संस्कृती निर्माण करतात .(ते राज ठाकरे किंवा इतर मराठी विषयाला वाहिलेल्या कम्युनिटीवर असतात .व आधुनिकता व पारंपरिकता ह्याचा मेळ घालायचा प्रयत्नात असतात .त्यांना भारतात आल्यावर अजिबात परके वाटत नाही .किंबहुना भारतात येतांना मुंबईतील सागरी सेतूवरून फिरायची मनीषा असते .थोडे हिरवे पैसे खिशात असल्याने भारतीय नव चंगळवादी संस्कृती भोगण्याचा प्रयत्न असतो .व परदेशात भारताविषयी स्तुती सुमने एकूण सुखावत असतो .ते आपल्या भारतीय असण्याचा माज दाखवतो परदेशात .(शायनिंग इंडिया वा उगवत्या महासत्तेचे वारसदार म्हणूनच परदेशात जगतात . .)आपल्या मातीशी परदेशात गेल्यावरच महती कळते .कारण घरकी मुर्गी दाल बराबर .
12 Dec 2010 - 4:03 am | प्राजु
एक स्वतंत्र लेखच लिही ना.. :)
बाकी आमच्या डान्रावांना मागे टाकलंस! ;)
12 Dec 2010 - 2:33 pm | विंजिनेर
म्हणजे प्राजूतै तुला उत्तराच्या (मुद्द्यांना धरून्/सोडून लिहायच्या) स्टाईलमुळे असं वाटतंय का उत्तराच्या लांबीमुळे? ;)
12 Dec 2010 - 2:42 pm | Nile
धरुन?? खरंच???
12 Dec 2010 - 2:48 pm | विंजिनेर
नायल्या, नायल्या, अरे आंजावर काही शब्दांची पेरणी "पॉलिटिकल करेक्टनेस" दाखवण्यासाठीच असते हे का आता तुला सांगायला हवं?
इथे लिहिणार्याबरोबर वाचणार्याचं मन सुद्धा दुखावलं जाऊ नये ह्याची जाणीव आहे बरं मला! ;)
12 Dec 2010 - 3:39 pm | Nile
च्यायला, ह्या आंजावरील अनुभवी लोकांना नक्की झालंय तरी काय! काहीतरी विपरीतच बोलुन राह्यलेत. परवा तो नंदन सुद्धा असंच काहीतरी बोलत होता.
12 Dec 2010 - 3:05 am | राजेश घासकडवी
कॉलेजमध्ये असताना कमी जबाबदारी असते, भरपूर वेळ असतो, मैत्री होण्यासाठी वाव भरपूर असतो, आणि एकंदरीतच धमाल खूप असते. त्यामुळे त्या काळात मैत्री बळकट ठेवणं सहज सोपं असतं. ती तशी ठेवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात हेच नंतर समजतं. ते दिवस संपले की अनेक कारणांमुळे हे नातं बदलतं. माझ्या मते इकडचे-तिकडचे हे 'एखाद्या नात्यात फरक पडणे' या सर्वसाधारण घडणाऱ्या गोष्टीच्या अनेक कारणांपैकी एक आहे. इतर कारणं (बऱ्याच लोकांनी लिहिलेली आहेत)
- लग्न
- नवीन नोकरी
- नवीन ठिकाण
- संसाराच्या जबाबदाऱ्या
- संपर्काची साधनं
- स्वभावातील बदल
- मुळातच नाती भक्कम ठेवण्याचा त्या नात्यातल्या दोहोंचा स्वभाव, गरज, इच्छा
- मुळातला त्या नात्याचा घट्टपणा
यापैकी काही परिस्थितीजन्य आहेत, काही व्यक्तिगत आहेत. नवीन पिढ्यांना संपर्काच्या साधनांचा काहीच प्रश्न नाही. इंटरनेट, टीव्ही, फोन मुळे आमूलाग्र क्रांती झालेली आहे. पण आपल्या कक्षा रुंदावतात, फोकस बदलतो हे मुख्य कारण अजून आहेच. तेव्हा मुळात मैत्री किती जिवाभावाची होती, व ती समुद्रापल्याडही जपून ठेवावीशी किती वाटतात हेच शेवटी महत्त्वाचं.
माझा व्यक्तिगत अनुभव हा अशी नाती जोपासण्याचे कष्ट न घेतल्यामुळे व थोड्याफार प्रमाणात माझ्या विसराळू स्वभावामुळे हातातून गळून गेलेल्या वाळूचा आहे. इकडचे-तिकडचे मधलं अंतर कारणीभूत ठरलं पण ते ओलांडण्याचे कष्ट घेतले असते तर हातात बरंच काही शिल्लक राहिलं असतं.
12 Dec 2010 - 12:03 pm | तिमा
आम्ही तरुणपणी आमची कर्तबगारी (२०० अर्ज पाठवण्याची चिकाटी)) कमी पडल्यामुळे 'तिकडे' जाऊ नाही शकलो. आणि आता म्हातारपणी पण मुलीचे घर बघायला जाताना व्हिसा मिळण्यात ज्या अडचणी आल्या (स्पेशल स्क्रुटिनी), त्या आमच्या कर्तबगारीमुळेच.(रसायनशास्त्रातली उच्च पदवी मिळवल्याचे पातक केल्यामुळे)
13 Dec 2010 - 3:27 pm | स्मिता.
मूळ लेख आणि सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्यात.
त्यातल्या धमू यांच्या एकंदरीत आणि अदिती आणि मेवे यांच्या प्रतिक्रियेतील काही भागांशी सहमत आहे.
माझ्या मते मैत्रीमध्ये दुर्घटना होण्यासाठी 'तिकडे' जाण्याचीच गरज आहे असे नाही. जरा लहानपणापासूनचा आढावा घेतला तरी लक्षात येतं की आपण एकाच शहरात, एकाच शाळा/कॉलेजात असूनही कालांतराने मित्रमैत्रिणी बदलतात. तसेच धमू म्हणतात तसे 'फ्रेम ऑफ रेफरंस' वेगळ्या झाल्याने शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने शहर बदलल्यावर जुन्या मित्रांसोबत गप्पा तेवढ्या रंगत नाहीत.
मुळात केवळ रोज कट्ट्यावर भेटून २-४ तास मनसोक्त गप्पा मारणे, कुठेतरी फिरायला जाणे, इ. गोष्टी म्हणजेच मैत्री असते का? आणि खरं तर या गोष्टीसुद्धा एका 'फ्रेम ऑफ रेफरंस' मध्ये राहूनच शक्य होतात.
बहुतेक लोक लग्नापूर्वी मित्रांसोबत तासन् तास गप्पा मारतात. मात्र लग्न झाल्यावर मनातले सुख-दु:ख सांगायला, विचारविनिमय करायला, जबाबदारी वाटून घ्यायला कोणीतरी असल्यावर 'सो कॉल्ड' मित्रांची आठवण कमीच येते. त्यामुळे केव्हातरी समोर आल्यावर या मित्रांसोबत एक अवघडलेपणा असतोच.
अदिती म्हणतात त्याप्रमाणे कधी-कधी असंही होतं की १-२ वर्षांनी भेटलेल्या मित्रांसोबतही अगदी काल एका ताटात जेवल्याप्रमाणे मोकळ्या गप्पा होतात. मधला संपर्क नसलेला काळ कुणाच्याही लक्षात येत नाही. तेथे कुठलीही दुर्घटना जाणवत नाही.
एकूण काय, तर 'मैत्रीमधील दुर्घटना' ही फक्त 'तिकडे' जाण्यावरच अवलंबून नसून त्या मैत्रीवरच अवलंबून असते... 'तिकडे' जाणे हे एक कारण असू शकते.
-------------------------------------------------------------------------------------------
अवांतर : पुण्याला शिकायला आल्यानंतर माझ्या शाळेतल्या बहुतेक मैत्रिणी दुरावल्या होत्या. नंतर नोकरीच्या निमित्ताने मी बंगलोरला असताना त्यातल्या एकीचे लग्न होवून ती बंगलोरला आली. आम्ही दोघी १२वी पर्यंत कायम सोबत असायचो. रिकाम्या वेळात एकमेकींकडे जाऊन गप्पा मारत बसत असू. ती मला बंगलोरात भेटल्यावर, मधली ४-५ वर्ष काहीही संपर्क नसताना (मला तिच्या लग्नाचं आमंत्रण देखील नव्हतं! ), आम्ही पुन्हा तेवढ्याच मोकळेपणाने गप्पा मारल्या. कुठेही, कसलाही अवघडलेपणा नव्हता. अर्थात, आम्हा दोघींमध्ये कोणीही तिकडे गेलेले नव्हते :प
14 Dec 2010 - 10:05 am | आंसमा शख्स
नातेवाईक विसरला का?
आमचा एक मित्र तिकडे गेला तर त्याला पैसा मागून मागून जीव नकोसा केला सगळ्या नातेवाईकांनी. आता तर तो आई बापाचाही फोन घेत नाही कारण ते पण तेच करतात. अब्बाजानला चढवायचा अजून एक मजला घरावर. हा पोरगा झाला त्याचा एटीएम. फक्त आम्मीला फोन करतो तीचा जीव तुटतो त्याच्यासाटी.
पण आता बंद झाले सगळे. शिव्या देतात तिकडे गेला आन बदलला म्हणून. पण आधी केलेली मदत विसरले सगळे.
15 Dec 2010 - 6:18 am | गांधीवादी
तिकडे गेल्यामुळे स्वभाव बदलने(?), हा मला वाटते एक स्वतंत्र विचार करण्याचा मुद्दा आहे.
खूप पैलू आहेत आपल्या एकाच प्रतिसादात. अश्या दृष्टीने एक नवीन चर्चा सुरु व्हावी अशी अपेक्षा आहे.
जसे,
तिकडे गेलेल्यांना इकडून कोणते कटू-गोड अनुभव आले, त्यातून ते काय शिकले ?
हजारो मैलावरून आपापली नाती जपत असताना कसे वागले गेले पाहिजे ?
आदी.