गाभा:
चर्चेच्या शिर्षकावरून असे सहज वाटू शकेल की ह्याचा संदर्भ अनिभा (अनिवासी भारतीय अथवा त्याहूनही अधिक अमेरिका निवासी भारतीय) असलेल्या व्यक्तींशी आहे म्हणून. पण तसा तो नाही तसेच तो कुठल्या धर्माशी संबंधीतही नाही. तर "हिरवा" रंग ज्याच्याशी समांतर मानला जातो त्या पर्यावरणाशी आणि त्यात काम करणार्या भारतातील पर्यावरणवादी संस्थांशी आहे.
आज हिंदूस्थान टाईम्स मधील "CAG sniffs scam in NGO funding" बातमी वाचली. थोडक्यात त्यातील मुद्दे असे:
- केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने इतक्या वर्षांमधे प्रथमच त्या मंत्रालयातून दिल्या गेलेल्या अनुदानांचा हिशेब (ऑडीट) केला.
- एकूण रू. ५९७ कोटी (फक्त) च्या दिल्या गेलेल्या अनुदानांमधे एकही खाते गेल्या २० वर्षांमधे नीट सांभाळले गेलेले नाही.
- ७,१९६ युटीलायझेशन सर्टीफिकेट्स, म्हणजे पैसा कसा वापरला गेला हे अधिकृतपणे सांगणे, केले गेलेले नाही. गेल्या दहा वर्षांमधे ४,७२३ केसेस आहेत ज्यांचे एकूण मुल्य रु. ४२६.८ कोटी (फक्त) इतके आहे.
- १९८१-८९ मधे अशा केसेस १७.५% इतक्या होत्या, ज्या गेल्या दहा वर्षांमधे ७१.५% इतक्या झाल्या आहेत.
- ९३% हून अधिक संख्येने वृ़क्षारोपण प्रकल्प अपयशी ठरले आहेत. याचा अर्थ ते कधी पूर्ण झाले नाहीत अथवा त्या पैशाचा गैरवापर/अयोग्य वापर केला गेला.
- हे खात्यांतर्गत मदत तसेच कुणाच्या संस्था आहेत (म्होरक्या कोण) यावर अवलंबून असावे असे देखील म्हणलेले आहे.
- हे गैरव्यवहार अथवा गैरवापर झाले त्यात अनेक संस्थांनी पहील्या हप्त्यानंतर परत कधी आल्याच नाहीत. (ह्याचा अर्थ एकतर त्यांना गैरव्यवहारच करायचे होते अथवा त्यांना त्यांच्या आदर्शाला प्रत्यक्षात आणण्यासंदर्भातील व्यावहारीक मर्यादा समजल्या. म्हणजे त्यातील काही भ्रष्टाचारी नसून अव्यवहारी असू शकतील).
तर आता काही प्रश्न पडतातः
- एकदम अचानक असा अहवाल आणि तो देखील एकाच मंत्रालयाकडून का केला गेला असावा? (यात पर्यावरणवादी संस्थांच्या बाजूने लिहीत नाही, म्हणूनच "हिरवा माज" म्हणले आहे.) का निव्वळ योगायोग आहे?
- आपल्यापैकी कोणी कधी कुठल्या पर्यावरणवादी चळवळीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधीत अथवा संपर्कात आले आहे का आणि आले असल्यास आपला अनुभव कसा आहे?
- पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी पर्यावरणवादी चळवळीच केवळ उपाय आहेत का इतर काही उपाय होऊ शकतो ज्याचा प्रभाव पडू शकेल?
- असे इतर क्षेत्रातील चळवळींच्या बाबतीत आणि अनुदानांच्या बाबतीतही वाटते का? त्यांचे ऑडीट होणे देखील महत्वाचे नाही का?
प्रतिक्रिया
1 Dec 2010 - 7:39 pm | गणपा
या विषयावर मी अजुन पर्यंत अधीक काही वाचलेलं नाही त्यामुळे जास्त बोलत नाही. पण असे घोटाळे नुसते उजेडात येउन काय उपयोग?
काही जण म्हणतील की पुर्वी तेवढ ही होत नव्हतं. आता निदान वाचातरी फुटतेय. पण नुसती वाचा फोडुन उपयोग नाही, जोवर संबंधीतांवर कडक कारवाई होत नाही.
अन्यथा असले प्रकार उजेडात आणणे हे लोकांच लक्ष एका घोटाळ्या कडुन दुसरी कडे विचलीत करण्यातलाच प्रकार वाटतो.
1 Dec 2010 - 7:42 pm | अवलिया
>>>> * एकदम अचानक असा अहवाल आणि तो देखील एकाच मंत्रालयाकडून का केला गेला असावा? (यात पर्यावरणवादी संस्थांच्या बाजूने लिहीत नाही, म्हणूनच "हिरवा माज" म्हणले आहे.) का निव्वळ योगायोग आहे?
सध्या अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत... नक्की सांगता येणे कठिण,
>>>> * आपल्यापैकी कोणी कधी कुठल्या पर्यावरणवादी चळवळीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधीत अथवा संपर्कात आले आहे का आणि आले असल्यास आपला अनुभव कसा आहे?
हॅ हॅ हॅ.
'सर, तेवढी बातमी आणि फोटो पाठवला आहे वृक्षारोपणाची.. कव्हरेज चांगल द्या.'
'बास का शेट तुमचं काम नाही करायचं तर कुणाचं? बर एक काम होतं'
'बोला...'
'आमच्या गावाकडच्या मित्राचा प्लॉट डेवलप करायचा आहे. तीन झाड आहेत दोन वडाची एक चिंचेच.. त्याला तेवढा आक्षेप नका घेऊ... उद्या पेपरात जाहिरात देत आहे. जाहिरात बारिकच आहे कोपर्यात टाकुन. मुद्दाम सरकारी नाव देत आहे एरियाचे.. कुणाला कळायला नको..'
'अरे काही काळजी नको.. प्लॉट डेव्हलप करा बांधकाम झालं की त्या रस्त्यावर वृक्षारोपण मोहीम काढुच'
'तुम्ही आहात म्हणुन झाडांची काळजी नाही आम्हाला'
'हा हा ठेवु?'
'येस्स सार'
>>> * पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी पर्यावरणवादी चळवळीच केवळ उपाय आहेत का इतर काही उपाय होऊ शकतो ज्याचा प्रभाव पडू शकेल?
अज्ञान. क्षमस्व.
>>> * असे इतर क्षेत्रातील चळवळींच्या बाबतीत आणि अनुदानांच्या बाबतीतही वाटते का? त्यांचे ऑडीट होणे देखील महत्वाचे नाही का?
व्हायलाच हवे.
1 Dec 2010 - 8:12 pm | मदनबाण
हिंदूस्थानात पर्यावरण वर्यावरण गोष्टींना महत्व दिलं जात नाही...किंवा त्याच्याकडे जितक जमेल तितक दुर्लक्षच केलं जातं.
कुठे २२ हजार कुठे २५ हजार तर कुठे ४४ हजार झाडे तोडण्यात आली !!! आता इतक्या मोठ्या संख्येने वॄक्ष तोड ज्या देशात चालते तिथे पर्यावरण वर्यावरण फाट्यावर मारले जाते हे सहज कळुन येइल.
संदर्भ :---- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4936605.cms
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6013177.cms
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=PuneEdition-4-4-20...
थोडक्यात झाडे तोडणे ही इथे अगदी सामान्य बाब झाली आहे...
जाता जाता :--- लवासाला पर्यावरण मंत्रालयाची नोटीस दिली गेली आहे म्हणे (संदर्भ :--- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6995786.cms
http://www.esakal.com/esakal/20101127/4751611878044922030.htm
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=117... )
आता लवासाचे बांधकाम काही नागरी वस्तीत तर झालेले नाहीये, मग कुठे झाले आहे हे बांधकाम? तर इथे :--- http://maps.google.com/maps/ms?ie=UTF8&t=h&oe=UTF8&msa=0&msid=1090982702...
आता मला सांगा इथे किती झाडं तोडली गेली असतील बरं?
1 Dec 2010 - 8:21 pm | विकास
म्हणूनच हा प्रश्न पडला आहे...
थोडक्यात झाडे तोडणे ही इथे अगदी सामान्य बाब झाली आहे...
झाडे तोडणे सामान्य बाब झाली आहे पण येथे झाडे लावली असे सांगुन आणि त्यासाठी अनुदान घेऊनही झाडे लावली गेलेली नाहीत हा मुद्दा आहे. तोडणारे डेव्हलपर्स/बिल्डर्स असतात त्यामुळे आश्चर्य नाही पण लावणारे स्वतःला पर्यावरणवादी म्हणवतात म्हणून हा प्रश्न पडला.
लवासाला पर्यावरण मंत्रालयाची नोटीस दिली गेली आहे म्हणे
हाच मुद्दा डोक्यात आला होता! लवासा, जैतपूर, नव्या मुंबईला आंतर्राष्ट्रीय विमानतळ अजून काही प्रकल्प देशात इतरत्र असणारच. मग एकीकडे "मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर" असे वागत दुसरीकडे "पर्यावरणवाद्यांना" काटशह देण्यातून देखील अचानक जाग आली का काय असे वाटले...
1 Dec 2010 - 8:30 pm | गणपा
शवेटी पर्यावरणवादी ही सुद्धा हाडामासाचीच माणस. मोह/लालसा/हाव कुणाला टाळता आली आहे?
मी त्या पर्यावरणवाद्यांच समर्थन करत नाहीये.
1 Dec 2010 - 8:41 pm | मदनबाण
"मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर" असे वागत दुसरीकडे "पर्यावरणवाद्यांना" काटशह देण्यातून देखील अचानक जाग आली का काय असे वाटले...
झोपेचे सोंग घेणार्यांना कसली जाग येणार आहे ?
आता निकोलसजी सरकोजीराव येनार हायेत नव्ह..मग आता परवानगी न देउन कसे चालेल बरं ?
आपल्या देशात फक्त पैसेवाल्यांच राज्य चालतं... तुम्हाला डोंगर गायब करायचा आहे ? तुम्हाला खाडीत भराव टाकायचा आहे ? तुम्हाला खारफुटीचे जंगल अॅसिड घालुन नष्ट करायचे आहे ? सर्व काही करता येइल. फक्त पैसा फेकायची तयारी हवी...
हे पर्यावरण बचाव वगरै फक्त दिखावा आहे बाकी काही नाही...
2 Dec 2010 - 8:23 am | नगरीनिरंजन
पुण्यात मी स्वतः पाहिलेला प्रकार. झाड तोडायला महापालिकेची परवानगी लागते पण झाड वाळलेले असेल तर परवानगीची गरज नसावी किंवा सहज मिळत असावी बहुतेक, म्हणून काही लोकांनी रात्रीतून झाडांच्या साली खरवडून टाकायचा उद्योग केलेला पाहिला. साल गेली की काही काळाने ते झाड वाळून जाते की मग तोडायचे.
2 Dec 2010 - 8:33 am | मदनबाण
पुण्यात एके काळी फिरताना अनेक वडांची डौलदार झाडे नजरेस पडायची... मध्यंतरी एकदा पुण्यात येणे झाले होते तेव्हा हेच ते मी पाहिलेले पुणे ? असा प्रश्न मनात आला होता... वडाची झाडे आता शोधावी लागतील असे वाटले.
अगदी हीच गोष्ट कोल्हापुरच्या रंकाळा परिसरात फिरताना जाणवली होती...
1 Dec 2010 - 9:14 pm | नगरीनिरंजन
मी काही तज्ज्ञ नाही या विषयातला पण तरीही माझी मते आणि तुटपुंजे अनुभव मांडतो आहे.
एकदम अचानक असा अहवाल आणि तो देखील एकाच मंत्रालयाकडून का केला गेला असावा? (यात पर्यावरणवादी संस्थांच्या बाजूने लिहीत नाही, म्हणूनच "हिरवा माज" म्हणले आहे.) का निव्वळ योगायोग आहे?
-श्री. जयराम रमेश हे पहिले पर्यावरण आणि वनमंत्री मी पाहिले जे त्यांच्या कामासंबंधी निर्णयांमुळे बातम्यांमध्ये आले. वाचलेल्या बातम्यांमधून तरी असंच वाटतंय की ते त्यांच्या कामाच्या बाबतीत गंभीर आहेत आणि तडजोड करण्यासाठी उत्सुक नाहीत. जरी त्यांनी ३२ अटी घालून मुंबईच्या नव्या विमानतळाला आणि ३५ अटी घालून जैतापूरच्या अण्विक ऊर्जा केंद्राला मान्यता दिली असली तरी ती खूप राजकीय दडपण आल्याने व त्यात पंतप्रधानांनीही साथ न दिल्याने ती त्यांना द्यावी लागली असे विश्लेषण मी वृत्तपत्रांतून वाचले. हा घोटाळा उघड करण्यामागे त्यांचेच काही प्रशासकीय निर्णय कारणीभूत असू शकतात.
आपल्यापैकी कोणी कधी कुठल्या पर्यावरणवादी चळवळीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधीत अथवा संपर्कात आले आहे का आणि आले असल्यास आपला अनुभव कसा आहे?
-मी पुण्यात असताना मला एका ग्रीन पीस नामक पर्यावरणरक्षक स्वयंसेवी संस्थेसाठी पैसे गोळा करणारा भाडोत्री कार्यकर्ता भेटला होता. त्याने मी त्याला पैसे दान करण्यासाठी एक भाषणच दिले. त्यांची संस्था अमेरिकेत किंवा आणखी कुठल्या देशात अमुक एक नदी वाचवण्यासाठी वगैरे कसे प्रयत्न करत आहेत त्याबद्दल तो बोलला. मी त्याला पुण्यात किंवा भारतात ते काय करतात ते विचारले पण तो ते सांगू शकला नाही. पुण्यात टेकडी म्हणून एक गट तयार झाला होता आणि वेताळ टेकडी आणि आसपासच्या परिसरातील झाडे वाचवण्यासाठी ते लोक प्रयत्नशील होते. पण अपुरे मनुष्यबळ आणि आर्थिक मदतीच्या अभावामुळे मी तिथे असे पर्यंत तरी उन्हाळ्यात टेकडीवर फिरायला जाताना झाडांसाठी पाणी घेऊन जाणे आणि अधुनमधुन काही झाडे लावणे इतपतच त्यांचे काम मर्यादित होते. याउप्पर आणखी कोणत्याही संस्थेचा अनुभव नाही.
पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी पर्यावरणवादी चळवळीच केवळ उपाय आहेत का इतर काही उपाय होऊ शकतो ज्याचा प्रभाव पडू शकेल?
-पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी संपूर्ण मानवजातीची जीवनसरणी बदलणे आवश्यक आहे असे माझे मत आहे (अर्थातच ते कधीच स्वखुशीने होणार नाही पण एक वा दोन शतकाअखेर नाईलाजाने होईल असे वाटतेय). पाणी वाचवा, कागद कमी वापरा, झाडे लावा पासून ते पार पृथ्वी वाचवा वगैरे घोषणा नुसत्या घोषणाच राहतात आणि जी काही अंमलबजावणी असते ती म्हणजे हात तुटलेल्या जागी डेटॉलचा बोळा लावण्यासारखी असते. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला नेहमीच गौण मानले जाते आणि जेव्हा त्याचे दुष्परिणाम लक्षात येतील, जाणवू लागतील तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.
असे इतर क्षेत्रातील चळवळींच्या बाबतीत आणि अनुदानांच्या बाबतीतही वाटते का? त्यांचे ऑडीट होणे देखील महत्वाचे नाही का?
आजकाल भूछत्रांसारख्या एनजीओज निघत आहेत कारण त्यात असणारा परदेशी आणि सरकारी अनुदानाचा पैसा. बहुतेक एनजीओज एड्स वगैरे सारख्या हायप्रोफाईल आणि ग्लॅमरस विषयावर काम करतात कारण बिल गेट्स सारख्या दानशूर लोकांनी दिलेला पैसा. नुसते बॅनर लावले, वेश्यावस्तीत जाऊन काँडोम्स वाटले की झालं त्यांचं काम. नगरला स्नेहालय म्हणून वेश्यांच्या मुलांसाठी आणि निराधार स्त्रियांसाठी काम करणारी एक चांगली संस्था आहे आणि त्यांच्या कामावर पुण्यात कॉलेजमध्ये असताना आम्ही एक प्रेझेंटेशन केले होते. त्या निमित्ताने त्या संस्थेच्या संस्थापकांपैकी एका व्यक्तीशी बोलताना त्याने सांगितलेले काही सरकारी अधिकारी, राजकारणी आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे अनुभव व्यथित करणारे होते. या शिवाय पुण्यात नोकरी करत असताना माझ्या सहकार्यांपैकी एकाने त्याच्या नात्यातल्या कोणीतरी एक एनजीओ काढली आणि त्याचं छान चाललंय अशा अर्थाचा एक किस्सा सांगितला होता. या सगळ्या संस्थांचे ऑडिट झालेच पाहिजे आणि त्याचा अहवाल सार्वजनिकरित्या उपलब्ध असले पाहिजेत.
2 Dec 2010 - 3:26 pm | निकित
प्रथम, एका दुर्लक्षित पण उत्तम विषयावर चर्चा सुरु केल्याबद्दल धन्यवाद.
माझ्या मते हे तर जयराम रमेश यांच्या कार्यक्षमतेचे आणि प्रस्थापित हितसंबंध मोडण्याचे चांगले लक्षण आहे.
होय. माझा अनेक चळवळींशी अतिशय जवळून संबंध आला आहे. माझ्या अनुभवाप्रमाणे पर्यावरणवादी चळवळीतील आर्थिक गैरप्रकार हे अतिशयच किरकोळ प्रकारचे असतात. परंतु अनेकदा तात्विक प्रश्न (एथिकल डीलेमा) पडतात.
उदा. दुर्दैवाने, पर्यावरणाला आपल्या विकास आणि उर्जा धोरणांत काहीच स्थान नसल्याने, पर्यावरणवाद्यांना अनेकदा "अलार्मिस्ट" भूमिका घ्यावी लागते - आणि मग पुढे तीच त्यांची ओळख होऊन बसते. मग पुढे या संस्थांच्या भूमिकेमधील आणि वर्तणुकीमधील विरोधाभासावारच सर्व वाद खेळले जातात - आणि पर्यावरणाचा मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे - ग्रीनपीस.
अर्थात, काही संस्थांना आणि चळवळींना त्यांच्या राजकीय गरजेपोटी टोकाच्या भूमिका घ्याव्या लागतात. जसे की - नर्मदा बचाव आदोंलन. असो.
जोपर्यन्त मुख्य विकास प्रक्रियेमध्ये पर्यावरणाचा अंतर्भाव होत नाही तोपर्यंत वृक्षारोपण वगैरे उपाय म्हणजे तात्पुरती मलमपट्टी ठरेल - अर्थात ही एक राजकीय प्रक्रिया आहे आणि म्हणूनच अत्यंत अवघड आहे. माझ्या मते बऱ्याच चळवळींचा मुद्दा हा तथाकथित विकासामधील पर्यावरणाच्या स्थानाबाद्द्लच असतो.
याचे उत्तर अवघड आहे. अनेकदा अशा माहितीचा उपयोग हा प्रस्थापित हितसंबंधाना बाधा आणणाऱ्या चांगल्या संस्थांना छळण्याकरीता केला जातो. उदा. एन्रॉन विरोधी चळवळीतील संस्था. किंवा माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांना देण्यात येणारा त्रास. परंतु काही प्रमाणात ऑडीट - आणि त्यामधून येणारं उत्तरदायित्व (accountability) आवश्यकच आहे.
2 Dec 2010 - 6:26 pm | यशोधरा
छान धागा.. बर्याच दिवसांनी.. वाचत आहे.