चर्चा दिवाळी अंकाची

बाबुराव's picture
बाबुराव in काथ्याकूट
5 Nov 2010 - 8:55 am
गाभा: 

राम राम मंडळी. दिवाली आली म्हणल्यावर त्याच्यामागं दिवाळी अंकबी याला सुरवात होते. ऑनलाइन दिवाळी अंक आन छापील दिवाळी अंक यायची आता लय रेलचेल होऊन राह्यली. आता सारं वाचाच म्हणल्यावर पुढली दिवाळी येईन. तव्हा ह्यो धागा दिवाळी अंकातलं काय आवडलं. कोणते लेखन वाचाला पाह्यजेन यासाठी धागा काढला आहे. तव्हा कोणकोणते दिवाळी अंक प्रकाशित झाले त्याचीबी माहिती या धाग्यात द्यावी ही नम्र इनंती.

मायबोली,पुस्तकविश्व, उपक्रम,मनोगत,मोगरा फुलला,दीपज्योती अशा अजून जे असतीन त्या सर्वाची इथे चर्चा अपेक्षीत हाये.

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

5 Nov 2010 - 4:43 pm | इंटरनेटस्नेही

एका 'क्ष' ग्रुपचा देखील आज अंक आलेला आहे!

पुस्तकविश्व मधील काही लेख वाचले. येथे २ लेख नमूद करू इच्छिते.

चिंतांनी "जाँ पॉल सार्त्र" या फ्रेन्च लेखक आणि तत्वज्ञाच्या "ले मोट्स" (शब्द) पुस्तकातील निवडक उतार्‍यांचं भाषांतर केलं आहे. या लेखाचं नाव आहे "ग्रंथालयातील भटकंती - जाँ पॉल सार्त्र". भाषांतर केलं आहे असं वाटतच नाहे इतकं ते भाषांतर लीलया साधलं गेलं आहे. उतार्‍याची निवड चिंतांनी मानसशास्त्र या विषयाला धरून केलेली असावी हे लक्षात येतं. कारण हा उतारा जाँ पॉल सार्त्र या लेखकाच्या बालपणीची पुस्तकांच्या आवडीसंदर्भातील मानसशास्त्रीय जडणघडण दाखविणारा आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे त्या उतार्‍यातून व्यवस्थित अधोरेखीत होते.

पुस्तकविश्वमधील मला अतोनात आवडलेला दुसरा लेख आहे आदितीचा. लेखाचे नाव आहे "सांगावेसे वाटले म्हणून". "सांगावेसे वाटले म्हणून" या शांताबाईंच्या ललीतलेखसंग्रहाची ओळख आदितीने अत्यंत रसाळ रीतीने करून दिली आहे. या लेखात मधेमधे कुठे मजेशीर प्रसंग पेरले आहेत तर कुठे चित्रपटातील वाक्यांचा दाखला दिला आहे. इतकं रोचक झालेलं आहे वर्णन की हा लेख वाचणं हीच वाचकांकरता पर्वणी आहे. परत इतकं होऊन मूळ मुद्द्यापासून लेख भरकटला आहे का? तर नाही. शेवटी वाचक ही खूणगाठ मनाशी बांधतोच की शांताबाईंचा संग्रह वाचायचाच. आणि ही खूणगाठ हे या लेखाचे श्रेय आहे.

आजानुकर्ण's picture

6 Nov 2010 - 10:08 am | आजानुकर्ण

हा लेख फारच सुंदर आहे. शांताबाईंच्या सुबोध, रसाळ मराठीची ओळख तितक्याच ताकदीच्या शब्दांतून सुंदरपणे करून दिली आहे.

चित्रलेखा,
धनंजय,
(पाटकरांचा) आवाज,
(मेनका प्रकाशनाचा) जत्रा,
हे अंक नेहेमीप्रमाणेच या वर्षीही उत्तम आहेत.

(मेनका प्रकाशनाचा) "जत्रा" या वर्षीच्या २०१० च्या दिवाळी अंकात आपले मिसळपावचे "विसोबा खेचर" (तात्या) यांचे विनोदी प्रहसन छापून आले आहे.
एकदम छान आहे.
नांव : बिनुत्तराचा प्रश्न!
त्यांचे अभिनंदन...

आजानुकर्ण's picture

5 Nov 2010 - 7:26 pm | आजानुकर्ण

तो लेख मिसळपावच्या विसोबा खेचरांचा असण्याबाबत शंका वाटते. विसोबा खेचर या नावाने अनेक लेखक सध्या लिहीत आहेत.

आजानुकर्ण's picture

5 Nov 2010 - 7:20 pm | आजानुकर्ण

मनोगताचा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. नेहमीप्रमाणेच सुंदर. अवश्य वाचावा असा.

मीरा फाटक यांची अनुवादित कथा आणि प्रदीप कुलकर्णी यांची कविता वाचली. दोन्ही फार आवडल्या.

मुक्तसुनीत's picture

5 Nov 2010 - 8:30 pm | मुक्तसुनीत

मायबोली दिवाळी : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2010/

निवेदिता-ताई's picture

5 Nov 2010 - 11:10 pm | निवेदिता-ताई

तनिष्का दिवाळी अंक सुंदर आहे..
विसोबा खेचर यांचा लेख छान आहे. आवडला.

पुस्तकविश्व हा सर्वांगसुंदर अंक आहे.

वर (सकाळी) मी दोनच लेखांचा उल्लेख केला कारण २च वाचले होते. आत्ताच "नंदन" यांचा परत परत पारायण करावा असा "पुनर्वाचनाय च" हा इतका सुरेख लेख वाचला अक्षरक्षः अंगावर रोमांच उभे राहीले आहेत.

पुस्तकविश्वमधील सगळेच लेख एकाहून एक सरस दिसत आहेत.

बाबुराव's picture

6 Nov 2010 - 9:02 am | बाबुराव

'नाही कसे म्हणू तुला म्हणते रे गीत' या आरती प्रभूंच्या वळींची
आठवण धनंजय वैद्यांचा लेख वाचतांना झाली.

'नाही' शब्दात अर्थाच्या बाबतीत कशी संधिग्धता हाये
त्याबाबतचा एक येगळा आन सुंदर लेक.

उपक्रमचे मुख्यपृष्ठ, अंकात असलेले चित्र आन संकीर्ण लय भारी.
अजून उपक्रमाचे लेक वाचाचे बाकी हायेत वाचल्यावर डिट्टेल लिव्हतो.

वाचावा असाच अंक.

बाबुराव :)

सहज's picture

6 Nov 2010 - 9:06 am | सहज

उपक्रमाचा अंकही वाचनीय!

कलकत्ता कॅलेडोस्कोप, जपानी भाषा शिकताना, व्यंगचित्रे, विवेक वेलणकर व अश्विनी कुलकर्णी या दोघांच्या मुलाखती वाचनीय.

देखणे मुखपृष्ठ!

अश्विनी कुलकर्णी या दोघांच्या मुलाखती वाचनीय.
+१

अश्विनी कुलकर्णी यायच्या प्रगती अभियानाची माहिती.
माहितीअधिकाराचा उपयोग करुन रोहयो आन रेशन
यात त्यायनी केलेलं काम कौतुकास्पदच हाये.
चांगल्या मुलाखतीबद्दल मुसुचे आभार.

निवडक प्रश्न आन भर्पूर उत्तर या मुलाखतीचं हे विशेष.
एक गोष्ट अश्विनी कुलकर्णी यायची पटण्यासारखी नाय
ती म्हंजी रेशन, रोहयो किंवा विकास योजना
त्यायच्या अभियानातून लोकांपर्यंत पोहचायच्या.
ते जर व्यवस्थेत आले तर प्रगती अभियानाला ब्रेक
लागन. त्यायनी व्यवस्थेत पारदर्शकता यावा यासाठी
बाहेर राहूनच लढलं पाहिजं असा इचार मनात आला.

बाबुराव :)

बाबुराव's picture

6 Nov 2010 - 9:53 pm | बाबुराव

केसरीचा छापील दिवाळी अंक लय भारी हाये. नुस्त्या कथासंग्रहाचा ह्यो अंक.
कन्नड,तेलगु,मल्याळम,उडिया,बंगाली,हिंदी या भाषामधल्या
नामवंत लेखकांच्या मराठीत अनुवाद केलेल्या कथांचा अंक म्हंजी
केसरीचा अंक. आन अंकाची किम्मत किती हाय म्हैती का. फक्त दहा रुपये.
हा जरशीक माशिकासारखा वाटतो पर वाचाचं म्हणल्यावर काय बी चालतं नाय का.
मल्याळम कथा 'कृष्ण कौमुदी' ही एस.के. पोट्टेकाट यायची कथा वाचाला
सुरुवात केली हाये. अंक कसा वाटला ते डिट्टेल लवकरच लिव्हतो.

बाबुराव :)

मनोगतावरील "जुने घर" हा सन्जोप रावांचा लेख मला आवडलेल्या लेखांपैकी एक.
वाड्याचे व्यक्तीचित्र समर्थपणे वाचकांच्या डोळ्यासमोर साकार करणारा हा लेख - ठेप, हुंबपण, गदळ, भुक्की,ढेलजी, धुमुस, धबाळ, बुरकुंडे, तुरकाट्या आदि अनवट अनोख्या शब्दसंपत्तीने समृद्ध आहे. लेखकाच्या बालमनाला वाटणारी न्हाणीघराची गूढ भीती , थोडीशी नैसर्गीक किळस या भावना अनुक्रमे ताईबाई आणि किळसवाण्या लठ्ठ बेडक्या या रुपकांमधून फार समर्पक रीतीने व्यक्त झाल्या आहेत.लेखकाच्या बालमनाने घातलेली आजोबा आणि गुरुचरीत्राची सांगड, आजोबांचा दानशूरपणा या साध्या साध्या प्रसंगातून लेख फुलत जातो. पारीजातक तर बालमित्रच जणू, लहानपणीचा सखाच. परसाचा मोकळा सुगंधी श्वास पारीजातकामधून, कुठे माडीवरचा आंब्यांचा घमघमाट ही सारी त्या त्या जागेची वलये रुपकांमधून सहज साकार केली आहेत. वाड्यात खाल्लेले दोन साधे घास लेखकाला साक्षात परब्रम्हाची त्रैमूर्तीची आठवण करून देतात यातच त्याच्या मर्मबंधातील वाड्याचे स्थान कळून येते. हा या लेखाचा परमोच्च बिंदू आहे.
______________________________________________________

बरं "रेषेवरची अक्षरे" मधला "क्लोज एन्काऊंटर्स ऑफ चाईनीज काईंड" हा चिमण यांचा लेख वाचलात का? अतिशय खुसखुशीत लेख आहे. वाक्यावाक्याला हशा, टाळ्या. या विनोदी लेखाची भट्टी एकदम अफलातून जमली आहे. फार मजा आली वाचायला. ज्यांना हलकेफुलके लेख आवडतात त्यांच्याकरता "अ मस्ट रीड" लेख.
______________________________________________________
मनोगतावरील "माझा बाप" ही कैलास वाघ यांची कविता अक्षरक्षः हृदय पिळवटून टाकणारी आहे. विलक्षण कारुण्याने ओथंबलेले बापाचे समर्थ शब्दचित्र म्हणजे ही कविता.