सोसायटीचा आदर्श

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in काथ्याकूट
4 Nov 2010 - 11:50 am
गाभा: 

आदर्श सोसायटी च्या घोटाळ्यावर भरपुर सध्या लिहुन येत आहे. मी स्वतः सैन्यात आधिकारी आहे व आज पर्यंत मला स्वतःला आभिमान होता की सैन्य हे सरकारी लाचखोर व पैसाचोरी ह्या पासुन ब-यापैकी दुर आहे. आज मला स्वतःला शरम येत आहे हे सांगण्याची.

ज्यांच्या कडे कौशल्य, कर्तब, शक्ती किंवा बुद्धी असते, आणि परिश्रम करण्याची तयारी असते, तो मनुष्य आपल्या कर्तबगारीवर पैसे मिळवतो. स्वतःचे इमान व स्वतःचा धर्म विकुन नव्हे. थोड्याशा पैशासाठी, आत्मा विकुन आपल्या स्वतःला व आपल्या घरच्या लोकांना सामोरं जाता येणार नाही. प्रत्येक लाचखोर माणसापाठीमागे नेहमी त्याचे हवरट कुटूंबं असते. लाचखोरी करुन कोणाला असे म्हणुन टाळता पण येत नाही की दुस-यानी त्याला लाच घ्यायला लावली - कारण लाच घ्यायची का नाही हे ठरवणारे शेवटी आपण स्वतःच असतो व हा निर्णय आपला स्वतःचा वैयक्तीक असतो. जो लाच खातो व देतो तो आपल्या राष्ट्राचा शत्रू ठरतो, मग तो किती का इतरवेळेला राष्ट्रप्रेमाचा आव आणुदे. जो लाच घेतो, लाच देतो व भ्रष्टाचार करतो तो पापी व राष्ट्रद्रोही असतो. तो देशभक्त असुच शकत नाही. ह्याच साठी जे स्वतःला देश भक्त समजतात त्यांनी राष्ट्रव्रत (http://rashtravrat.blogspot.com/2010_05_01_archive.html , किंवा http://rashtrarpan.blogspot.com/2010/10/blog-post_29.html किंवा http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html )घेतले पाहीजे.

असल्या घोटाळ्यांनी देशा पुढील महत्वाचे प्रश्न - काश्मीर व त्यावर अरुंधती रॉय ह्यांचे व्यक्तव्य, नक्सल कारवाया, अतीरेकी कारवाया व बाकीचे प्रश्न आपोआपच नजरेआड होतात. हे प्रश्न सोडवायला आपल्याला एका शिवाजीची गरज आहे.

आज आपल्याला एका परशुरामाची गरज आहे. जो सा-या भ्रष्टाचारी लोकांचा निप्पात करेल (भारतात मग किती लोकं उरतील? कोण जाणे – का उरणारच नाही? – मध्यम वर्ग सोडला तर). आदर्श ह्याचा इंग्रजी शब्दार्थ Role model असा आहे. छान आदर्श ठेवले जात आहेत नविन पिढी पुढे.

आज आपल्याला एका परशुरामाची व एका शिवाजीची गरज आहे. कोण आहे आपल्यातला असा?

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

4 Nov 2010 - 3:50 pm | गांधीवादी

आपली चीड आणि तळमळ ज्या पद्धतीने ह्या इथे खुल्या व्यासपीठावर व्यक्त झालेली आहे ती बघून आज सर्व सामान्य काय तर सैनिकांचे हि धैर्य डगमगणार असे वाटते. एका ठिकाणी फाटले तर शिवता येईल पण जिथे भराभर चिंध्या ह्या देशाच्या झाल्या आहेत त्या शिवायला एक शिवाजी आणि एक महात्मा अपुरा पडेल हे सांगायची गरज नाही.

शेकडो शिवाजी आणि हजोर महात्म्यांचा बळी देऊन सुद्धा हे भ्रष्ट पद्धती आज आपण बदलू शकणार नाही, हेच सत्य. कर्क रोगाच्या शेवटच्या टप्प्यावर कोणीही आशा ठेवणे हे मूर्खपणाचे. हे ज्यांना समजले ते अगोदरच हा देश सोडून पळाले, आणि जे इथे आहेत ते केवळ संधी मिळण्याची वाट बघत आहेत. इतिहासातील महान देश असा पांढऱ्या दहशत वाद्यांच्या तावडीतून तर आता ब्रम्हदेव सुद्धा वाचवून शकणार नाही. घटना आणि कायदा यांचा वापर एखाद्या वेश्येप्रमाणे करून हे परत गंगा न्हाऊन सफेद पांढरी खादी वस्त्रे अंगावर चढवून मतांचा जोगवा मागायला दरी येतात. कुठे काही खट्टू झाले कि एक समिती नेमायची मग अहवाल, मुदत वाढ हे खेळ खेळत बसायचे. या व्यतिरिक्त काही होत नाही हे सगळ्यांना माहित आहे. अशा मध्ये जे कोणी कुठे आवाज उठवू पाहतात त्यांच्या नरड्यावर सुरी फिरवून त्यांना मार्गातून वेगळे केले जाते. त्यामुळे कोणी पुढे येण्याचे धैर्य देखील दाखवू शकत नाही.

आपण सैनिक आहात, प्रसंगी गुंडांशी चार हात करू शकत, पण जिथे सामान्य आहेत कि नुसते त्यांच्या शब्दांनी घाबरून हप्ते, मते, द्यायला राजी होतात, बदल्यात एक रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र पदरी पडते, आणि पुढेमागे कधीतरी लाकडाच्या ठोकलेल्या झोपडीला प्रमाण पत्र मिळते, हि व्यथा आहे पुण्यातील जनता वसाहतीतील. आणि आपण इथे प्रगतीच्या गप्पा मारत असतो.

एका महात्म्याला मारायला एक गोळी आणि दोन मिनिटे पुरतात, पण एक दहशतवाद्याला फाशी द्यायला आपल्या इथे २५ वर्षे लागू शकतात, हीच ती मोठी हार.

जे देश्यासाठी निधड्या छातीने लढायला जातात त्यांची तुलना रिस्क घेऊन काम करणाऱ्या लोकांशी केली जाते हे पाहून आपल्या इथे सैनिकांना काही जन किती मान देतात हे बघून भारताचे भविष्यातील चित्र डोळ्यासमोर आले.

राजकारणी विरुद्ध लष्कर हा वादच चुकीचा आहे. जे असा वाद करू इच्छितात त्यांना केवळ एकाचे समर्थन करायचे असते म्हणून दुसर्याकडे बोट दाखवितात. भ्रष्टाचारी मग तो कुठलाही असो, लष्कर, राजकारणी, कि सरकारी नोकर, त्यांना भर चौकार उघडे करून फटके दिले जात नाहीत तो पर्यंत काही बदल होणार नाही, पण त्यांना पाठीशी घालणारे ते तसं होऊन देत नाहीत. मग पुन्हा तो समिती, अहवालाचा खेळ चालू होतो. CWG, आदर्श, 2G, तेलगी, आणि न उघडकीस आलेले हजारो घोटाळे पचवून ते परत उजळ माथ्याने हिंडणार हे नक्की. आणि रोज नवीन वाढलेले घोटाळ्याचे आकडे पाहून सामन्यांचे डोळे दिपणार.

आजकाल भ्रष्टाचाराचे तर एक नवीन सूत्र तयार होऊ पाहत आहे, जे काही करायचे त्याला देशभक्तीचा मुलामा द्यायचा. भारत मातेचे जगात सगळीकडे धिंडवडे उडालेले असतानाही मग भोळी भाबडी जनता १०१ पदकांचे तुकडे मिळाले म्हणून उर बडवून घेते.

रणजित चितळे's picture

5 Nov 2010 - 9:50 am | रणजित चितळे

तुमचे लिखाण मलो नेहमीच (येथे जेव्हा पासुन मी वाचायला लागलो तेव्हा पासुन) आवडते. तुम्ही उगाच काही तरी उत्तर द्यायचे म्हणुन (जे येथे कधी कधी पहायला मिळते) कधीच नसते व म्हणुनच मला आवडते. तुमचे विचार परखड व बरोबर असतात. पटणारे विचार असतात. मला स्वतःला सावरकर आवडतात व त्यांचे सर्व वाङमय वाचले आहे पण म्हणुन गांधींवर राग नाही. त्यावेळेस टिळकांनंतर - मास मुव्हमेंट - सुरु करणारा गांधीच होता.
मला दुःख होते ते भ्रष्टाचार आहे म्हणुन. पण ह्या पेक्षाही दुःख होते लोकांचा हल्ली भ्रष्टाचाराकडे बघण्याकडे जो दृष्टी कोण आहे त्याचा. लोकांच्या संवेदना बधीर झाल्यात. कधी कधी तर भ्रष्टाचार विरोध करणा-यां लोकांचा उपहास (प्रॅक्टीकल नाहीत म्हणुन) सुद्धा होऊ लागला आहे. हि गंभीर बाब आहे.

चितळेसाहेब.. ठरविलेत तर आपणच शिवाजी अन आपणच परशुराम होऊ शकतो.. तुमच्या लिखाणातून तळमळ जाणवतेच आहे, पण ह्या तळमळीबरोबर जबरदस्त ईच्छाशक्तीचीही गरज आहे. आज कुणी एक मनुष्य शिवाजी अथवा परशुराम होऊ शकणार नाही.. लोकांनीच एकत्र येऊन स्वतःमधील शिवाजी जागृत करण्याची गरज आहे... तरच हि परिस्थिती बदलेल..

बाकी लष्कराबाबत बोलायचं तर ऊडदामाजी काळे-गोरे असणारच.. पण लष्कराविषयीचा सामान्य जनतेत असणारा आदर व अभिमान असल्या गोष्टींनी कमी होणार नाही ही खात्री आहे..

नितिन थत्ते's picture

4 Nov 2010 - 12:23 pm | नितिन थत्ते

>>आज आपल्याला एका परशुरामाची गरज आहे. जो सा-या भ्रष्टाचारी लोकांचा निप्पात करेल (भारतात मग किती लोकं उरतील? कोण जाणे – का उरणारच नाही? – मध्यम वर्ग सोडला तर

या वाक्यातला शेवटचा भाग कळला नाही. मध्यमवर्ग शिल्लक राहील असे लेखकास वाटते म्हणजे मध्यमवर्ग भ्रष्टाचार करीत नाही असे लेखकास वाटत आहे की काय?
वाटत असेलही. लष्करी अधिकारी भ्रष्ट नसतात असे लेखकास 'आत्ता'पर्यंत वाटत होते असे लेखक म्हणतच आहेत.

पण मग मध्यम वर्ग म्हणजे नक्की कोण कुणास ठाऊक?

सैन्यातले सुद्धा मध्यम वर्गीयच. पण मध्यम वर्गात भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी आढळते (ऑपॉर्चुनीटी मिळत नाही भ्रष्टाचार करायला असे काहिंचे मत पडते. ).

५० फक्त's picture

4 Nov 2010 - 12:23 pm | ५० फक्त

सविस्तर प्रक्रियेसाठी जागा राखीव

चिरोटा's picture

4 Nov 2010 - 12:30 pm | चिरोटा

पण लष्कराविषयीचा सामान्य जनतेत असणारा आदर व अभिमान असल्या गोष्टींनी कमी होणार नाही ही खात्री आहे..

तहलकाने घोटाळा उघडकीला आणल्या नंतर तो कधीच कमी झाला आहे. असे घोटाळे व्हायच्या आधीपासूनच प्रश्न पडायचा- आजी/माजी नौदल्/वायुदल प्रमुख वगैरे उच्च्/सर्वोच्च अधिकार्‍यांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता कशी काय असते?बेंगळूरमधले काही माजी उच्च सेनाधिकार्‍यांचे अवाढव्य बंगले बघितलेत तर आपणही सैन्यात जायला पाहिजे होते असे वाटेल्.!!असो.
आज आपल्याला एका परशुरामाची व एका शिवाजीची गरज आहे
सध्या असे अनेक असतीलही पण लोकांनाच ते नको आहेत तर काय करणार?

कापूसकोन्ड्या's picture

4 Nov 2010 - 12:46 pm | कापूसकोन्ड्या

आज आपल्याला एका परशुरामाची व एका शिवाजीची गरज आहे.
---- शिवाजी नेहमी शेजारच्याच घरी व्हावा अशी अपेक्षा का?
तुम्ही स्वतःला कमीपणा मानून घेउ नका. सैन्यामध्ये असणारे लोक सुद्धा माणसेच असतात. सर्व समाजाचे प्रतिबिंब सैन्यात पडणारच..
१) सैनिक रिस्क घेतात म्हणून कवतिक करण्यात चूक आहे. तसे उंच इमारतीवर रंग काम करणारा पण रिस्क घेत असतोच.
२) माननीय मुख्यमंत्री सहापैकी दोन फ्लॅट परत द्यायला तयार आहेत तसेच आणि काही लोक पण परत देतीलच्.तेव्हा विषयावर पड्दा पडेलच.
२) समोर भगवा दहशतवाद पसरत असताना हे सर्व अर्थिक मुद्दे गैर लागू आहेत.
३) आदर्श सोसायटी मधील सदस्यांची नावे पहा. एक ही अल्पसंख्य नाही. म्हणजे हे "परिवार'' चे षडयंत्र असणार.

--अजमेर वर चे लक्ष उडविण्यासाठी एका संस्थेने केलेले हे प्रताप आहेत. नाहीतर आत्ताच सि डब्ल्यूगी, राजा चे टूजी आणि आदर्श चे प्रकरण येणे हा योगायोग कसा??

अवांतर ------
धागा काढलाच आहे तर "झक मारली नी धागा काढला " असा विचार करण्याची तयारी ठेवा.
आपले मिपा कुटुंबीय या विषयावर्ची चर्चा शेवटी ब्राह्मण-मराठा,संघ- कौंग्रेज, दैववादी-अंनिस, किंवा खात्रीचा विषय म्हणजे पुणे-अपुणे अशा वादावर येउन ठेवतीलच . एक आपली सूचना केली.

रणजित चितळे's picture

4 Nov 2010 - 12:58 pm | रणजित चितळे

तुमचे मत वाचले

आज आपल्याला एका परशुरामाची व एका शिवाजीची गरज आहे.
---- शिवाजी नेहमी शेजारच्याच घरी व्हावा अशी अपेक्षा का?


बरोबर आहे - शिवाजी प्रत्येक घरात असला पाहीजे पण शिवाजीच्या काळी पण तसे नव्हते झाले. पण मावळे मात्र आपण ठरवले तर होऊ शकतो राष्ट्रव्रत घेतले तर व हेच राष्ट्रव्रत ह्या लेखात प्रतिपादले आहे.


आदर्श सोसायटी मधील सदस्यांची नावे पहा. एक ही अल्पसंख्य नाही. म्हणजे हे "परिवार'' चे षडयंत्र असणार


हे षडयंत्र जरुर आहे पण सैन्य, सरकारी अधिकारी व राजनेते ह्या मध्ये फक्त पैशां साठी भ्रष्टाचार. स्वतःची तुमडी भरण्याचा उद्दोग.

रणजित चितळे's picture

4 Nov 2010 - 1:04 pm | रणजित चितळे

धागा ह्या साठी काढला की लोकांची मते बघावित म्हणुन.

शैलेन्द्र's picture

4 Nov 2010 - 1:20 pm | शैलेन्द्र

"मी स्वतः सैन्यात आधिकारी आहे व आज पर्यंत मला स्वतःला आभिमान होता की सैन्य हे सरकारी लाचखोर व पैसाचोरी ह्या पासुन ब-यापैकी दुर आहे. "

वाईट वाटु देवु नका, पण तुमच्या अपेक्षा व लिखान जरा भाबडे वाटले. सैन्याइतका भ्रष्टाचार कदाचीत कोणत्याच खात्यात नसेल. आणी मी हे सांगु शकतो कारण यातील बर्‍याच खात्यांशी माझा संबंध येतो. बाकी शिवाजी वगैरे सगळ ठीक आहे, पण शेवटी प्रत्येक व्यक्ती ही त्या काळाचे अपत्य असते. भ्रष्टाचार कमी असलेल्या देशांकडुन आपण आज आदर्श घेतले पाहिजे. आपल्यातिलच काही लोक ज्यांनी व्यवस्थेत राहुनही ती बदलली त्यांच्याकडुन शिकले पाहिजे, शेवटी कोणतीही मानवी समाजव्यवस्था सतत स्वताला सुधारत असते, आणी कदाचीत सुधारणेसाठी एक स्टिम्युलस म्हणुन सतत बिघडत असते (निदान मी तरी या तत्वावर विश्वास ठेवतो). म्हणुनच सगळच जाळनार्‍या क्रांतीपेक्षा उत्क्रांती चांगली.

रणजित चितळे's picture

4 Nov 2010 - 1:57 pm | रणजित चितळे

आपल्या देशाची चाललेली लुट पाहुन वाईट वाटते. कलीयुग असेच असते असे म्हणुन तंगड्यांवर तंगडे टाकुन बसायचे का. सैन्यात भ्रष्टाचार नाहीच असे म्हटले नव्हते - कमी प्रमाण असे वैयक्तीक मत. पण भ्रष्टाचार करायचा व सरकारी नोकर, सैन्य अधिकारी व राजनेते ह्यांचे साटेलोटे व त्यावरुन कारगील मध्ये मेलेल्यांच्या नावावर स्वतःसाठी पैसे ओरपायचे म्हणजे मनाला पटत नाही.

शैलेन्द्र's picture

4 Nov 2010 - 3:01 pm | शैलेन्द्र

मनाला न पटुन काय करणार?

रणजित चितळे's picture

5 Nov 2010 - 9:55 am | रणजित चितळे

गांधीवाद्यी यांचे लिखाण मला नेहमीच (येथे जेव्हा पासुन मी वाचायला लागलो तेव्हा पासुन) आवडते. तुम्ही उगाच काही तरी उत्तर द्यायचे म्हणुन (जे येथे कधी कधी पहायला मिळते) कधीच नसते व म्हणुनच मला आवडते. तुमचे विचार परखड व बरोबर असतात. पटणारे विचार असतात. मला स्वतःला सावरकर आवडतात व त्यांचे सर्व वाङमय वाचले आहे पण म्हणुन गांधींवर राग नाही. त्यावेळेस टिळकांनंतर - मास मुव्हमेंट - सुरु करणारा गांधीच होता.
मला दुःख होते ते भ्रष्टाचार आहे म्हणुन. पण ह्या पेक्षाही दुःख होते लोकांचा हल्ली भ्रष्टाचाराकडे बघण्याकडे जो दृष्टी कोण आहे त्याचा. लोकांच्या संवेदना बधीर झाल्यात. कधी कधी तर भ्रष्टाचार विरोध करणा-यां लोकांचा उपहास (प्रॅक्टीकल नाहीत म्हणुन) सुद्धा होऊ लागला आहे. हि गंभीर बाब आहे.

इंटरनेटस्नेही's picture

5 Nov 2010 - 2:45 pm | इंटरनेटस्नेही

ऐसे बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती ही रहती है!