मुक्ती

पारा's picture
पारा in काथ्याकूट
2 Nov 2010 - 5:18 pm
गाभा: 

मुक्ती...शेकडो वर्षे ज्या विषयावर संशोधन चालू आहे त्यावर फारसा काही व्यासंग नसताना लिहिणे हे एक धाडसच म्हणावं लागेल.

माणसाने आजवरच्या आयुष्यात विविध क्षेत्रांमध्ये विलक्षण प्रगती केलेली आहे. भूकंप, ज्वालामुखी सारख्या निसर्गनिर्मित भयांमधील सत्यतेचा शोध त्याने लावला. ग्रहणांना घाबरणारा मानव ह्या सावल्यांच्या खेळांना मागे टाकून, मंगळ पादाक्रांत करायची स्वप्ने पाहू लागलेला आहे. या सर्व प्रगती मागे विज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. पण ज्याप्रमाणे लाकूड पोखरण्याची क्षमता असणारा भुंगा कमळाच्या पाकळीलाही भोक पाडू शकत नाही, त्याचप्रमाणे भौतिक जगात निसर्गाशी स्पर्धा करणारा माणूस अजूनही मृत्युनंतरच्या जगाबाबत अधिकारवाणीने बोलूही शकत नाही.

आत्तापर्यंत माणसासमोर आलेल्या प्रत्येक भयाबद्दलची सत्यता शोधण्याचा त्याने कसून प्रयत्न केला. त्यात तो बराचसा यशस्वी देखील झाला, पण मुक्ती अथवा मृत्युनंतर काय या भीतीला मात्र त्याच्याकडे उत्तर नाही.

मनुष्य ज्या गोष्टीला घाबरतो ती टाळण्यासाठी तो हरप्रकारे प्रयत्न करतो. अनेक गोष्टींबद्दल तर सत्य माहित असूनही आपल्याला भीती वाटते तर ज्या सीमेपलीकडील जगाबद्दल मुळीच माहित नाही अश्यांचा विचारही माणसाला प्रचंड घाबरवून सोडतो, आणि ज्या गोष्टींची आपल्याला भीती वाटते त्या समोर नतमस्तक होणे हा तर आपला मनुष्यस्वभावच आहे.

ह्याच भीतीचा आजवर अनेकांनी उपयोग करून घेतलेला आहे. आज आन ज्या अनेक गुरु आणि बुवांना पाहतो ते सर्व त्यांच्या भक्तांना मुक्तीचीच स्वप्ने दाखवताना दिसतात. मध्यंतरी एका गुरूच्या 'ठराविक काळात मृत्यू आल्यास स्वर्गप्राप्ती होईल, मुक्ती मिळेल' अश्या आश्वासनांना भुलून अनेक लोकांनी सामूहिक आत्महत्या केली होती. अश्या आश्वासनांना खोडून काढण्याची क्षमता आजच्या विज्ञानात नाही, त्यामुळे या सर्व स्वयंघोषित धर्मगुरुंच बरंच फावत आहे. भ्रामक समजुतींमुळे लोकांना फसवण्याचे धंदे जोरात चालू असलेले आपण पाहतोच.

मुक्तीविषयक संकल्पनांनी तर अनेक लेखकांना कल्पनाविस्तारासाठी मोठेच कुरण मोकळे करून दिले आहे. आज अनेक भयकथांचा गाभा आपल्याला मुक्ती आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या स्वर्ग, नरक, देव, राक्षस अश्या गोष्टींमध्ये सापडतो.

थोडा पुढे जाऊन विचार केला तर आजच्या सर्व प्रमुख धर्मांची मुळे आपल्याला ह्या मुक्ती मध्ये सापडतील. ईसाई आणि इस्लाम धर्मग्रंथांमध्ये ७० टक्के भाग हा अल्ला किंवा येशू न मानणार्यांची दयनीय अवस्था दाखवणारा आहे. हिंदू धर्म देखील ह्याला अपवाद नाही. हिंदू धर्मातील गरुड पुराणामध्ये नरकयातनांची भीती प्रत्येकाला दाखवलेली आहे. ह्या सर्वांपासून दूर जाऊन ज्यांनी निरीश्वरवादाचा पुरस्कार केलेला आहे त्यांनाही ह्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे कुठेच देता आलेली नाहीत.

आजचा प्रत्येक धर्म तुम्हाला स्वतः शोधण्याचे स्वातंत्र्य कधीच देत नाही. बालपणापासून 'विश्वास' ठेवण्यास आपल्याला शिकवले जाते. काहीजणांनी ह्या गृहीताकांनाच आव्हान दिलेले आहे. उदा. जर्मन विचारवंत फ्रेडरिक नित्शे (Friedrich Nietzsche) असा म्हणतो कि 'God is Dead and man is free' म्हणजे जे दिसते तेच सत्य, त्यालीकडे काही असेल ही शक्यताच त्याने फेटाळून लावलेली आहे. ह्या सर्व मतमतांतराचा जरी आपण विचार केला तरी आपण ह्या सर्व गोष्टी कधीच दुर्लक्षित करू शकत नाही. आपलं मन आपल्याला अनेकदा अश्याच गूढ आणि अगम्य गोष्टींची जाणीव करून देत असता, आणि तशाने आपली परिस्थिती अजूनच गोंधळाची बनत जाते.

खर्याखुर्या गोष्टींचा आकलन व्हायला कदाचित अजून बराच कालावधी जावा लागेल. त्या दिशेने विज्ञानाच्या काही शाखांमध्ये संशोधनही होत आहे. पारलौकिकशास्त्र (metaphysics) सारख्या शाखा ह्या विषयांना वाहून घेतलेल्या आहेत. पण खरच सत्याचा शोध लागण्याची गरज आहे का ?

आज ह्या भयाची सांगड सर्व धर्मसंस्थांनी फार सुरेख पद्धतीने नीतिमत्तेशी घातलेली आहे. सर्वांशी प्रेमाने वागल्यास, अडीअडचणीत असलेल्यांना सहाय्य केल्यास स्वर्ग प्राप्ती होईल या आणि अश्या अनेक संकल्पनांनी रानटी टोळ्यान्सारखे राहणाऱ्या माणसाला समाजप्रिय आणि सहकारी बनवलेलं आहे. न जाणो कुठलं सत्य यातून बाहेर पडेल तर माणसाचा जीवन सुखकर बनवणार्या या धर्मसंस्थाच कोलमडून पडतील. 'आज' साठी जगणारा माणूस स्वार्थासाठी नीती अनीतीचा विचार करणे सोडून देईल.

अज्ञानात सुख आहे ते म्हणतातच तेच खर.

....तीन वर्षांपूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वार्षिकात प्रदर्शित झालेला माझा लेख....

प्रतिक्रिया

शुचि's picture

2 Nov 2010 - 7:25 pm | शुचि

लिंडा गुडमनने तिच्या एका पुस्तकात एका विचित्र विरोधाभासाचे सुंदर वर्णन केले आहे. - चंद्रावरोहणानंतर संपूर्ण विज्ञानजगत हर्षोल्हासात बुडून गेलेले असताना, काही कवी मनाच्या लोकांना मात्र त्याच गर्दीत खूप एकटेपण जाणवत होतं. शब्दात पकडता येणार नाही अशी एकटेपणाची भावना त्यांना टोचत होती. निराशेच्या गर्तेमध्ये हे लोक हळूहळू बुडू पहात होते.

याचे एक कारण मला हे वाटते की चंद्राचे काव्यामध्ये असलेले अढळ स्थान आणि त्याला बसलेला धक्का.

तद्वतच मुक्ती, स्वर्ग, नरक या कल्पना देखील भ्रमाच्या भोपळ्याप्रमाणे रहाव्यात असे मला वाटते. त्यांची चीरफाड करून, वास्तव जाणून घ्यावेसे वाटत नाही.

अर्धवटराव's picture

2 Nov 2010 - 10:39 pm | अर्धवटराव

स्वर्ग, नरक, मुक्ती वगैरे शब्दांमागे ज्या भावना, जे विचार आहेत ते कोणि डिक्टेट केलेले, लादलेले नसुन मानवी मनाने, बुद्धीने एका मर्यादेपर्यंत जाउन त्यापलिकडे काय असावे याचा तो तर्क आहे... काहि जणांचा तो अनुभव आहे (असा त्यांचा दावा आहे). याविषयी सत्य जाणुन घ्यावे कि नाहि हा चॉईस माणासापुढे अजीबात नाहि, फक्त ते कधी जाणुन घ्यायचे याचा चॉईस आहे. तुम्ही कितिही टाळा, कधी ना कधी, कुठल्या तरी रुपात हे प्रश्न माणसापुढे उभे ठाकतातच. आणि तेंव्हा त्या प्रश्नांना फेस करण्यापलिकडे काहि पर्याय नसतो. याचं कारण एकच... ते म्हणजे "अस्तीत्व" या कंसेप्ट ची परिभाषा प्रत्येक जण आपपल्या परिने ठरवत असतो, आणि त्या परिभाषेची अपूर्णता त्याला कधी ना कधी जाणवतेच.

(परिभाशीक)अर्धवटराव