सध्याचे वाचन: पुरंदरचा तह ~~ पराभव की विजय??

बट्ट्याबोळ's picture
बट्ट्याबोळ in काथ्याकूट
16 Oct 2010 - 2:27 pm
गाभा: 

शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यातील "पुरंदरचा तह" ही घटना मी आजपर्यंत महाराजांच्या आयुष्यातील एक पराभव समजत होतो. किंबहुना इतिहासाच्या पुस्तकामधे आणि इतर अवांतर वाचनामधे या घटनेचे हेच स्वरूप लिहिलेले आहे. परंतु नुकतेच सारंग माडगुळकर यांनी लिहिलेले "किंग शिवाजी - अ स्पिरिच्युल क्वेस्ट" हे ई-बुक वाचनात आले. लेखकाने या घटनेचे एका वेगळ्याच द्रुष्टिकोनातून विश्लेषण केले आहे. लेखकाच्या या गरुडावलोकनामुळे "पुरंदरचा तह" ही घटना जरी "शॉर्ट टर्म" मधे पराभव वाटला तरी "लाँग टर्म" मधे महाराजांचाच विजय झाल्याचे दिसून येते !!

मिपा वरील इतिहास तज्ञांचे यावरील मत जाणून घ्यायला आवडेल.
ही घ्या लिंकः

ई बूक बद्दल लिहायचे झाल्यास खालील गोष्टी ध्यानात येतातः
१. हे ई बूक ब्राऊजर विंडो मधे चपखल बसते, त्यामुळे ते आधिक वाचनिय होते. (मला स्वतःला PDF वाचायचा कंटाळा येतो !)
२. लेखकाची शैली अत्यंत साधी आहे परंतु प्रवाही असल्याने आणि शुद्ध तर्कसंगत असल्याने पुस्तक कुठेही कंटाळवाणे होत नाही.
३. अत्यंत ऑब्जेक्टिव्ह विचारसरणी असल्याने उगाच "स्वतःचीच पाठ थोपटणे" अशी भावना जाणवत नाही.
४. विविध इतिहास तज्ञांना कॉन्ट्रॅडिक्ट करताना अत्यंत आदरपुर्वक त्यांची मते खोडून टाकताना लेखक दिसतो. त्यात इतिहास तज्ञांबद्दलचा जातीद्वेष/धर्मद्वेष मुळीच नाही. किंबहूना त्याच तज्ञांचे एखादे मत जर सुसंगत वाटले तर ते देखील प्रांजळपणे लेखक ससंदर्भ कबूल करतो.
५. इतिहास कसा लिहावा याचा आदर्शच हे पुस्तक घालून देते !!

प्रतिक्रिया

माननीय मिपासदस्य श्री नितीन थत्ते यांचा शिवाजी महाराजांवर गाढा अभ्यास आहे. महाराजांच्या राजकीय तसेच वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांची त्यांना अगदी नीट माहिती आहे. ते याविषयावर नक्कीच विवेचन करतील जे वाचनीय असेल.

छत्रपती शिवाजी महाराज की जय !!

(अवांतर - लिंक अजुन वाचली नाही. फुरसतीत वाचेल)

नितिन थत्ते's picture

16 Oct 2010 - 2:40 pm | नितिन थत्ते

नानाशी सहमत आहे.

नानाचा प्रतिसाद अजून वाचला नाही. सावकाश वाचेन.

प्रिया देशपांडे's picture

16 Oct 2010 - 4:57 pm | प्रिया देशपांडे

परमपूज्य माननिय अवलियाजी,
आपलाही महाराष्ट्राचा गाढा अभ्यास आहे. बर्‍याचवेळा आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादांमधून ते जाणवतेही.
आपणही माहितीत थोडी भर घालावी हीच नम्र विनंती.

शैलेन्द्र's picture

16 Oct 2010 - 7:39 pm | शैलेन्द्र

मीही हा लेख मागेच वाचला होता, शेवटी आज आपल्याला फक्त लिखीत पुराव्यांवरच अवलंबुन रहावे लागते त्यामुळे लेखकाचा प्रयत्न, ज्याचा मुख्य भर तार्कीक मांडणी करण्यावर आहे, हा पुराव्याने सिद्ध करता येत नाही. परंतु एखाद्या घटनेकडे एका वेगळ्या द्रुष्टीकोणातुन बघायचे समाधान नक्किच मिळते.

पुरंदरचा तह हा पराभव नसुन तह होता, आणि तह करताना कोणताही जीत राजा स्वःताचे अस्तित्व टिकवण्यासाठी तो करतो तर विजेता शत्रुचा पुर्ण बिमोड करणे शक्य नसल्याने करतो (किंवा पुर्वी करायचे, संयुक्त राष्ट्रसंघ वगैरे प्रकार तेंव्हा नव्हते). तहाचे पारडे यातील कोणत्या कारणात किती वजन आहे त्याबाजुला झुकायचे. पुरंदरच्या तहाचा अभ्यास केल्यास असे आढळते की ६०%-७०% राज्य महाराजांनी मोघलांना दीले, पण जर नीट पाहीले तर हेही लक्षात येते की या बदल्यात त्यांनी फौजेची व मुलुखाची नासाडी टाळली. पण जयसिंघाने हा तह का केला? याचे उत्तर पुरंदरच्या लढाईत मिळते. पुरंदर निसंशय मोठा किल्ला पण त्यामानाने बर्‍यापैकी सपाट मुलखात आहे. सैन्य हलवणे सोपे पडेल अशा भागात, ज्याला स्वराज्याचा गाभा म्हणता येइल असा हा भाग नव्हता. तो भाग होता, कोंढाण्याच्या पश्चीमेपासुन ते खाली पन्हाळ्याच्या थोडे खालपर्यंत. पण तरीही पुरंदरावर दिलेरखानाला कडवी लढाई लढावी लागली. मुरारबाजीने केलेला कडवा प्रतिकार मराठ्यांचा पीळ कीती आहे हे दाखवुन गेला. दिलेर हा ऐरागैरा सेनापती नव्हता. शेवटच्या सुलतानढव्यात दिलेरखानाने ५००० खासे खासे पठाण उतरवले पण मुरारबाजी पडूनही अखेर्पर्यंत गड मोघलांना मिळाला नव्हता. सैन्यहाणी टाळाण्यासाठी महाराजांनीच तो मोघलांना सुपुर्द केला. पुरंदरच्याच वकुबाचे १२-१५ किल्ले मराठ्यांकडे होते. म्हणजे मराठी किल्ले (राज्य नाही) पुर्ण नेस्तनाबुत करायला साधारण ५-७ वर्ष लागली असती. गम्म्त अशी होती कि इतकी मोठी लढाई लढायची तयारी दोघांचीही नव्हती.
थोडक्यात पुरंदरचा तह हा दोघाही पक्षांनी काढलेला तोडगा होता. राजांनी तो तह खुशीने केला असे अजीबात वाटत नाही. तसे असते तर शाहीस्तेखान किंवा अफजल्खानाशी लढनेही त्यांनी टाळले असते. पण त्या वेळी त्यांनी योग्य जोखीम घेतली व यशस्वी झाले तसेच ह्या तहातही अयोग्य जोखीम टाळुन यशस्वी झाले.

अनिल २७'s picture

19 Oct 2010 - 11:16 am | अनिल २७

अभ्यासपुर्ण..

-------------------------------------------------------------------------------------
आम्ही प्रतिसादांचे दही करून देतो.. विरजणाची गरज नाही,..

kamalakant samant's picture

18 Oct 2010 - 5:06 pm | kamalakant samant

आपण सा॑गीतलेले पुस्तक मी वाचलेले नाही , तरी मला असे वाटते की
हा जय अथवा पराजय नसून राजा॑च्या मुत्सद्देगिरीची परमसीमा होती.
इतिहासकारा॑नी यथोचित लक्ष न दिलेली ही घटना आहे असे वाटते.
खालील बाबी॑कडे लक्ष द्यावे असे वाटते.
१-जयसि॑गानी असा कोणताही भीमपराक्रम केला नव्हता की लगेच राजा॑नी तह करावा.
२-यापूर्वी व न॑तर अनेक मुगल सरदारा॑नी अनेक किल्ले घेतले होते तरी अशा स्वरुपाचा तह राजा॑नी केला नव्हता.
३-राजपूत सैनिक जास्त असल्याकारणाने दोन्ही बाजू॑कडून हि॑दु॑चीच हानी होणार
४-शत्रू अनेक होते पण जयसी॑गाकडून आदीलशहाला चाप लावता आला तर?
५-आपण उत्तरेत गेल्यावर परिस्थिती बिघडू नये म्हनून स्वराज्याची चोख व्यवस्था केली.
६-नेताजी पालकर यास जयसि॑गाबरोबर देवून आदिलशाहवर पाठ्वीले.याला पुरावा म्हणजे जयसि॑ग विरुध आदिलशहामध्ये जयसि॑गाचे पारडे जड झाल्यावर नेतजी आदिलशहाला मिळाला.
व दोन्ही बाजू तुल्यबळ केल्या.जेणेकरुन जयसि॑गाला स्वराज्याकडे पहाण्यास फुरसद मिळू नये.
७-उत्तरेकडे आपले लोक आधीच पाठवीले होते.
८-छ्त्रसाल्,गोवि॑दसि॑ग,अयोध्येतील बैराग्या॑ची लढाइ या॑चा काही स॑ब॑ध?
थोड्क्यात काय तर दोन बलाढ्य शक्ती हि॑दुस्तानात होत्या व त्या दोन्ही एकमेका॑ना स॑पविण्याच्या मागे होत्या.
तू दक्षिणेत येत नाही तर मी उत्तरेत येतो असा द्रुश्टिकोन राजा॑चा असावा.
राजे असेपर्यत और॑गजेब दक्षिणेत आला नाही.
हा फार मोठा राजकीय व युद्धशास्त्रीय डाव होता यात श॑का नाही.

शैलेन्द्र's picture

20 Oct 2010 - 1:47 pm | शैलेन्द्र

प्रतिक्रिया आवडली पण काही गोष्टी पटल्या नाही, जसे,

"जयसि॑गानी असा कोणताही भीमपराक्रम केला नव्हता की लगेच राजा॑नी तह करावा."

तह केला याचे कारण भीमपराक्रम नसुन जयसिंगाने आखलेली उत्क्रुष्ट योजना होती. जयसिंग हा कसलेला सेनापती होता. वायव्य सरहद्द प्रांत,अफगानीस्तान यासारख्या कठीण भागात त्याने कित्येक मोहीमा केल्या होत्या. सह्याद्री त्याच्यासाठी अशक्य नव्हता. म्हणुनच सुरवातीला किल्ल्यांच्या जास्त मागे न लागता त्याने शिवाजी महाराजांचा महसुली प्रदेश तुडवायला सुरवात केली. यात धारणा अशी होती की एकदा शेतकरी आणी प्रजा स्वराज्यापासुन विलग झाले की राजांचा लोकाधार संपेल. जयसिंगाबरोबर प्रचंड फौजफाटा, व मुख्य म्हणजे भारी तोफखाना होता. त्याचा परीणाम पुरंदरच्या लढाईत दीसला. राजांनी तह केला तो लढा देता येत नाही म्हणुन नव्हे तर त्याने होणारी हाणी टाळण्यासाठी.

"२-यापूर्वी व न॑तर अनेक मुगल सरदारा॑नी अनेक किल्ले घेतले होते तरी अशा स्वरुपाचा तह राजा॑नी केला नव्हता."

याचेही ऊत्तर वरिल्प्रमाणेच. शिवाय, जयसिंगानंतर कोणाही शत्रुला राजांनी इतके आत येवुच दीले नाही, बहुतेक सार्‍या मोठ्या लढाया, बागलाण (आजचे नाशिक व त्याच्या ऊत्तरेचा भाग) व कोल्हापुरच्या खाली झाल्या.

"३-राजपूत सैनिक जास्त असल्याकारणाने दोन्ही बाजू॑कडून हि॑दु॑चीच हानी होणार"
उम्म्म... मला नाही वाटत. सगळ्याच मोहीमांत बरेच राजपुत सैनीक मोगलांकडुन लढले, इतकच काय, आदीलशाहाकडुन लढणारे बहुतेक सैनीक तर मराठे होते, तेंव्हा राजांनी विचार का नाही केला?

"४-शत्रू अनेक होते पण जयसी॑गाकडून आदीलशहाला चाप लावता आला तर?"
असु शकेल, पण आदील्शाही नष्ट करणॅ हे ऊद्दिष्ट नव्हते.

"७-उत्तरेकडे आपले लोक आधीच पाठवीले होते."
कशासाठी? मलातरी वाटते फक्त दील्लीला जाणे ही एक मोठी जोखीम आहे हे राजे जाणत होते. आणी म्हणुनच ते याला सहज तयार नव्हते. जयसिंगाकडुन वचन घेतल्यावरच त्यांनी हे मान्य केले. आणी तिकडे पाठवलेले लोक हे फक्त प्रवासाची सोय करणे व काही धोका झालाच तर मदत/ माहीती मिळावी म्हणुन पाठवले होते.

८-छ्त्रसाल्,गोवि॑दसि॑ग,अयोध्येतील बैराग्या॑ची लढाइ या॑चा काही स॑ब॑ध?
हे सगळे खुप नंतर झाले.

"थोड्क्यात काय तर दोन बलाढ्य शक्ती हि॑दुस्तानात होत्या व त्या दोन्ही एकमेका॑ना स॑पविण्याच्या मागे होत्या.
तू दक्षिणेत येत नाही तर मी उत्तरेत येतो असा द्रुश्टिकोन राजा॑चा असावा."

औरंगजेबाच्या तुलनेत राजांना बलाढ्य किंवा तुल्यबळ म्हणने हा औरंगजेबाच्या शक्तीचा व राजांच्या कर्तुत्वाचा अपमान आहे.

अतिशय अभ्यासपुर्वक प्रतिक्रिया...

सुनील's picture

20 Oct 2010 - 8:58 pm | सुनील

म्हणुनच सुरवातीला किल्ल्यांच्या जास्त मागे न लागता त्याने शिवाजी महाराजांचा महसुली प्रदेश तुडवायला सुरवात केली. यात धारणा अशी होती की एकदा शेतकरी आणी प्रजा स्वराज्यापासुन विलग झाले की राजांचा लोकाधार संपेल. जयसिंगाबरोबर प्रचंड फौजफाटा, व मुख्य म्हणजे भारी तोफखाना होता. त्याचा परीणाम पुरंदरच्या लढाईत दीसला. राजांनी तह केला तो लढा देता येत नाही म्हणुन नव्हे तर त्याने होणारी हाणी टाळण्यासाठी

माझ्या मते, इतर कोणत्याही कारणापेक्षा हे कारण अधिक महत्त्वाचे आहे.

सामान्य जनतेला स्थैर्य आणि शांतता हवी असते. आपल्या सैन्याने पराक्रम गाजवावा पण तो सीमेपलीकडे अशी तिची धारणा असते. आणि हे लोकांची नस बरोबर ओळखणार्‍या महाराजांना नक्कीच ठाऊक होते.

अवांतर वाटेल पण १८५७ च्या बंडाची कहाणी काय सांगते? आपापली खालसा होऊ घातलेली संस्थाने वाचवण्यासाठी बंडात सामील झालेल्या संस्थानिकानी संस्थांनाची धूळधाण उडवली. त्यांच्या प्रजेला अतोनात हालपेष्टांना तोंड द्यावे लागले. आणि हे सगळे का तर, स्वतःची गादी वाचवण्यासाठी! जनतेला हे रुचले नाही. त्यांची संस्थाने तर खालसा झालीच पण जनतेच्या मनातूनही ते उतरले. जवळपास कुणाचाच मागमूस त्यांच्या संस्थानात राहिला नाही. गोडसे भटजींच्या माझा प्रवास ह्या पुस्तकात ह्याचे सुरेख वर्णन केले आहे.

याउलट, ज्यांनी ब्रिटिशांशी समझोत करून प्रजेचे हाल होऊ दिले नाहीत, त्यांची संस्थानेही राहिली आणि जनतेत स्थानही.
काही अपवाद असतील पण कमी.

शैलेन्द्र's picture

20 Oct 2010 - 9:11 pm | शैलेन्द्र

"सामान्य जनतेला स्थैर्य आणि शांतता हवी असते. आपल्या सैन्याने पराक्रम गाजवावा पण तो सीमेपलीकडे अशी तिची धारणा असते. आणि हे लोकांची नस बरोबर ओळखणार्‍या महाराजांना नक्कीच ठाऊक होते."

बरोबर, शिवाय शेती हेच महसुलाचे मुख्य साधन असणार्‍या त्या काळात, पिकाचे नुकसान म्हनजे संपुर्ण वर्ष ऊपासमारीला आमंत्रण. राज्याचा सारा(शेतकी कर, तेंव्हा होता आता नाही) बुडतो ते वेगळेच.

सुनील's picture

20 Oct 2010 - 9:27 pm | सुनील

राज्याचा सारा(शेतकी कर, तेंव्हा होता आता नाही)
सध्या शेतीवरील उत्पन्नावर प्राप्तीकर नाही पण शेतसारा (लेवी) आहेच की.

बाकी, प्रजेला त्रासापासून तसेच राज्याला उत्पन्नाच्या नुकसानीपासून राजांनी वाचवले, हे खरे.

मिसळभोक्ता's picture

20 Oct 2010 - 10:36 pm | मिसळभोक्ता

सामान्य जनतेला स्थैर्य आणि शांतता हवी असते. आपल्या सैन्याने पराक्रम गाजवावा पण तो सीमेपलीकडे अशी तिची धारणा असते. आणि हे लोकांची नस बरोबर ओळखणार्‍या महाराजांना नक्कीच ठाऊक होते."

हे महाराजांना नक्की कधी कळले ? कारण अफझलखानाला त्यांनी जावळीपर्यंत येऊ दिले. शाहिस्तेखानाला पुण्यात मुक्काम ठोकू दिला. जौहराला पन्हाळ्यापर्यंत येऊ दिले. सामान्य जनतेच्या स्थैर्यासाठी ह्या कुणाशीच तह केला नाही.

अवलिया आणि थत्तेंच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे.

शैलेन्द्र's picture

20 Oct 2010 - 11:20 pm | शैलेन्द्र

"हे महाराजांना नक्की कधी कळले ? कारण अफझलखानाला त्यांनी जावळीपर्यंत येऊ दिले. शाहिस्तेखानाला पुण्यात मुक्काम ठोकू दिला. जौहराला पन्हाळ्यापर्यंत येऊ दिले. सामान्य जनतेच्या स्थैर्यासाठी ह्या कुणाशीच तह केला नाही."

अतिशय चांगला प्रश्न, जर सभसदाच्या बखरीतील अफजल्खानाच्या स्वारीचा भाग वाचला तर लक्षात येते की सुरवातीची योजना तहाचीच होती पण अफजल्खान वैयक्तीकरीत्या स्वता:ला व स्वराज्याला नेस्तनाबुतच करायला आलाय हे लक्षात घेवुन महाराजानी त्याच्याशी भेट घेवुन त्याला संपवायचे ठरवले.(त्या भेटीत कुणीतरी एक जण संपणारच होता. पहीला वार खानाने केला हा निव्वळ योगायोग) दुसरे म्हणजे जावळी हे तेंव्हा स्वराज्याचे टोकच होते. खानाचा वरवंटा जरी तुळजापुर/ पंढरपुरवर फिरला तरी खरतर तो आदिल्शाहीचाच भाग होता. इतकेच काय, प्रतापगडापलीकडची वाई ही खानाची जहागिर होती. म्हणजे प्रताप्गडावर भेट घेवुन राजांनी दोन गोष्टी साध्य केल्या, एकतर, स्वता:च्या सोयीची जागा लढाईसाठी निवडली व दुसरे, जरी त्या भेटीत काहीही झाले तरी खानाची फौज सहजासहजी परतही जावु शकणार नाही याची तजवीज केली.
खानाच्या वधानंतर अवघ्या १५-२० दिवसात राजांनी-नेताजीने प्रतापगडापासुन ते करवीरपर्यंतचा मुलुख(पन्हाळ्यासकट) जिंकला. खानाच्या वधानंतर जौहर पन्हाळ्याला वेढा घालुन बसला, तीही स्वराज्याची सीमाच होती. जौहरचे उद्दिष्टही शिवरायांना अटक करणे हेच होते. त्यामुळेच वेढा ढीला होइल असे काहीही त्याने केले नाही.

शाहिस्तेखानाची गोष्ट वेगळी होती, केवळ स्वता:वर शारिरीक हल्ला झाला म्हणुन मोहीम सोडुन निघुन गेलेला सेनापती इतिहासात दुसरा नसावा. यावरुनच स्वता: शायस्ताखान या मोहीमेबाबत किती गंभीर होता ते ल़क्षात येते. येथेही, पुणे ही स्वराज्याची सीमाच होती. पुण्यापर्यंत येताणा खानाला केवळ चाकणची गढी जिंकावी लागली. खान अधुनमधुन आसपासच्या खेड्यांवर छापे मारायचा पण राजांनी आपल्या अमंलदारांस रयतेच्या रक्षणाची योग्य तजवीज करायचे हुकुम दिले होते(तसे त्यांचे पत्र उपलब्ध आहेत).खानाने राजांच्या मुलखात शिरायचा केवळ एकदाच जोरकस प्रयत्न केला, तोही स्वतः नाही, कारतलब्खानाला २०००० सैन्य देवुन खानाने कोकण जिंकायला सोडले. लोहगडाखालच्या उंबरखिंडीत अवघ्या १००० सैन्यासह राजांनी त्याचा असा पराभव केला की शस्त्र तर सोडाच पण मोगलांच्या अंगावरील कपडेही मराठ्यांनी हिसकावुन घेतले(युध्द-व्यवस्थापन शास्त्राचे ही लढाई म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे, त्याविषयी परत कधीतरी .) इतक्या लेच्यापेच्या व्यक्तीमत्वाच्या सेनापतीसमोर शिवराय तहाला बसतील हे अशक्यच होते.

मिसळभोक्ता's picture

20 Oct 2010 - 11:44 pm | मिसळभोक्ता

शाहिस्तेखान....इतक्या लेच्यापेच्या व्यक्तीमत्वाच्या सेनापतीसमोर शिवराय तहाला बसतील हे अशक्यच होते.

ह्याचाच अर्थ जयसिंग हा लेचापेचा नव्हता, म्हणून शिवाजीराजांनी त्याच्याशी तह केला, असा घ्यावा का ?

जयसिंग हा हिंदू होता, त्याचा काही परिणाम झाला का ?

शैलेन्द्र's picture

21 Oct 2010 - 9:09 am | शैलेन्द्र

जयसिंग हा लेचापेचा सोडाच, पण मोगल साम्राज्याचा एक प्रमुख आधारवट होता, तुलनाच करायची झाली तर निजामशाहीतील मलिक अंबर किंवा मराठेशाहीतील महादजी शिंदेंच्या स्थानाशी करता येइल. मिर्झाराजे हा किताब इतिहासात बहुदा फक्त दोन रजपुतांना मिळाला, एक राजा मानसिंग(जयसिंगाचे आजोबा) व दुसरे जयसिंग. असं म्हणतात कि जयसिंगाने जर वारशाच्या लढाईत औंरंगजेबाऐवजी दारा शुकोहची बाजु घेतली असती तर तोच सम्राट झाला असता.
जयसिंगाचा औरंगजेबावर किती प्रभाव होता हे पुरंदरच्या तहावरुनच लक्षात येते. या तहाची सारी कलमे जयसिंगाने ठरवली व औरंगजेबाने त्याला सहमती दीली. शिवाजीचा तात्काळ खुन झाला नाही याचे कारण जयसिंगाने घेतलेला जामीन. अगदी आग्र्याहुन सुटुन येतानाही रामसिंगाला आपल्या जामीनातुन मोकळे करायला शिवराय विसरले नाही.
अजुन एक गोष्ट नोंद करण्यासारखी आहे, या मोहिमेनंतर जयसिंग औरंगजेबाच्या मर्जीतुन ऊतरला, आणि बहुदा औंरंगजेबाने, जयसिंगाच्या विश्वासु सेवकाकरवीच त्याचा खुन केला. जयसिंगाच्या म्रुत्युनंतर औरंगजेबाच्या धर्मवेडाने उचल खाल्ली. जिझिया कर, काशी विश्वनाथ, मथुरा येथील विध्वंस हे सगळे त्या नंतरचे प्रकार. जयसिंग असेपर्यंत औरंगजेबाने हे सगळे टाळले. जयसिंगाचा दरारा व प्रभाव हे त्याचे कारण असु शकते.

"जयसिंग हा हिंदू होता, त्याचा काही परिणाम झाला का ?"
माहीत नाही, पण जयसिंग "जयसिंग" होता आणि शिवाजी "शिवाजी" होता याचा नक्किच झाला. दोघांनाही एकमेकांच्या कर्तुत्वाबद्दल आदर होता(शिवराय जयसिंगाच्या मुलाच्या वयाचे होते त्यामुळे आदरापेक्षाही कौतुक जास्त असावे). शिवाजीने मोघलांना मिळावे असे जयसिंगाला मनापासुन वाटत होते, हा सगळा खटाटोप त्याने त्यासाठीच केला, पण ते राजकारण नासले, जयसिंगाचे मोठे आर्थीक नुकसान झाले . मोगलांच्या विश्वासघातकी वागण्याचे शल्य मनात ठेवुनच जयसिंग मरण पावला. दुर्दैवाने राजे व जयसिंग परत कधीच भेटले नाही, ती भेट झाली असती तर काय झाले असते हा एक मोठा कुतुहलाचा प्रश्न आहे.

मिसळभोक्ता's picture

21 Oct 2010 - 10:27 pm | मिसळभोक्ता

आपल्या प्रतिसादावरून, जयसिंगाचे सामर्थ्य हेच पुरंदरच्या तहाचे प्रमुख कारण होते, असे दिसून येते.

(स्वराज्यातील जनतेचे स्थैर्य हा दुय्यम मुद्दा असावा. किंवा, मुद्दाच नसावा. कारण शाहिस्तेखानाने पुणे परिसरात धुमाकूळ घातला होता, तरी तह झाला नाही.)

शैलेन्द्र's picture

21 Oct 2010 - 11:21 pm | शैलेन्द्र

मिभोकाका, परत ऊचकवताय मला... हेहेहे....

आता मात्र कापणी जोडनी करतो...

"तह करताना कोणताही जीत राजा स्वःताचे अस्तित्व टिकवण्यासाठी तो करतो तर विजेता शत्रुचा पुर्ण बिमोड करणे शक्य नसल्याने करतो (किंवा पुर्वी करायचे, संयुक्त राष्ट्रसंघ वगैरे प्रकार तेंव्हा नव्हते). तहाचे पारडे यातील कोणत्या कारणात किती वजन आहे त्याबाजुला झुकायचे. पुरंदरच्या तहाचा अभ्यास केल्यास असे आढळते की ६०%-७०% राज्य महाराजांनी मोघलांना दीले, पण जर नीट पाहीले तर हेही लक्षात येते की या बदल्यात त्यांनी फौजेची व मुलुखाची नासाडी टाळली"

"सुरवातीला किल्ल्यांच्या जास्त मागे न लागता त्याने शिवाजी महाराजांचा महसुली प्रदेश तुडवायला सुरवात केली. यात धारणा अशी होती की एकदा शेतकरी आणी प्रजा स्वराज्यापासुन विलग झाले की राजांचा लोकाधार संपेल. जयसिंगाबरोबर प्रचंड फौजफाटा, व मुख्य म्हणजे भारी तोफखाना होता. त्याचा परीणाम पुरंदरच्या लढाईत दीसला. राजांनी तह केला तो लढा देता येत नाही म्हणुन नव्हे तर त्याने होणारी हाणी टाळण्यासाठी."

"खान अधुनमधुन आसपासच्या खेड्यांवर छापे मारायचा पण राजांनी आपल्या अमंलदारांस रयतेच्या रक्षणाची योग्य तजवीज करायचे हुकुम दिले होते(तसे त्यांचे पत्र उपलब्ध आहेत"

"जयसिंग हा लेचापेचा सोडाच, पण मोगल साम्राज्याचा एक प्रमुख आधारवट होता, तुलनाच करायची झाली तर निजामशाहीतील मलिक अंबर किंवा मराठेशाहीतील महादजी शिंदेंच्या स्थानाशी करता येइल."

थोडक्यात, राजा जयसिंग सामर्थ्यवान व कसलेला सेनापती होता, त्याच्याशी किल्ल्यांच्या साह्याने लढणे एक वेळेस शक्य होते पण प्रजेला त्याच्यामुळे होणारा त्रास टाळणे अशक्य होते. अशा परिस्थीतीत "तह" हा सर्वोत्तम उपाय आहे असे राजांना वाटले असेल.

"स्वराज्यातील जनतेचे स्थैर्य हा दुय्यम मुद्दा असावा. किंवा, मुद्दाच नसावा." स्वराज्याचे व त्यातील जनतेचे स्थैर्य दोन नाही हे कोणताही शहाणा राजा जाणतो.

मिसळभोक्ता's picture

20 Oct 2010 - 11:44 pm | मिसळभोक्ता

शाहिस्तेखान....इतक्या लेच्यापेच्या व्यक्तीमत्वाच्या सेनापतीसमोर शिवराय तहाला बसतील हे अशक्यच होते.

ह्याचाच अर्थ जयसिंग हा लेचापेचा नव्हता, म्हणून शिवाजीराजांनी त्याच्याशी तह केला, असा घ्यावा का ?

जयसिंग हा हिंदू होता, त्याचा काही परिणाम झाला का ?

सुनील's picture

21 Oct 2010 - 12:52 am | सुनील

ह्याचाच अर्थ जयसिंग हा लेचापेचा नव्हता, म्हणून शिवाजीराजांनी त्याच्याशी तह केला, असा घ्यावा का ?
ते एक (एकमेव नव्हे) कारण.

जयसिंग हा हिंदू होता, त्याचा काही परिणाम झाला का ?
नसावा. जयसिंग हिंदू असला तरी तो मुघलांचेच प्रतिनिधित्व करीत होता.

बट्ट्याबोळ's picture

19 Oct 2010 - 8:51 am | बट्ट्याबोळ

@शैलेन्द्र , @ सामंत,

चांगली प्रतिक्रिया !!

kamalakant samant's picture

11 Nov 2010 - 12:39 pm | kamalakant samant

वेळ मिळाला नाही म्हणून उशिरा का होइना पण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
जयसि॑ग व दिलेरखान या॑नी पराभूत केले नसताना राजे आग्र्यास जाण्याचे का ठरवितात ?
उलट जयसि॑गास राष्ट्रधर्मासाठी प्रव्रुत्त करण्याचा प्रयत्न करतात.
जयसि॑गाच्या सर्व अटी मान्य करतात्.अगदी क्षुल्लक प॑चहजारी सुद्धा स्वीकारतात. हा महावीर काही जबरदस्त मनसुबा
असल्याशिवाय हे स्विकारणार नाही.
और॑गजेबानी आयत्यावेळी दरबारात नि:शस्त्र येण्यास सा॑गितले व आपणापसून दूर उभे केले.
और॑गजेब पाताळय॑त्री असल्याने त्याने हे केले.पर॑तू बरोबरीच्या नात्याने त्यानी भेट घेतली असती तर ?
और॑गजेबानी अनेक क्रुर क्रुत्ये केलेली असताना व ती जगजाहीर असतानाही म्हणजे माहीत असूनही राजे आग्र्याला गेले.
और॑गजेबावर विश्वास , सदा सावध असे राजे कधीतरी ठेवणे शक्य आहे का ?
या आग्रा प्रकरणाबाबत लेखी पुरावा उपलब्ध नसल्याने केवळ तर्कावर अवल॑बून रहावे लागते.
और॑गजेबाची काळी कारकीर्द पहाता राजा॑ची भेट घेण्यामागे त्याचा काय उद्देश असेल याबद्दल तर्क करता येतो.
तसेच राजा॑ची अफजलखान्,शाइस्तेखान्,प्रकरणातून और॑गजेबाची भेट घेण्यामागे काय उद्देश असेल याचा तर्क करता येतो.
महसुली मुलूख ताब्यात घेतल्यामुळे वा रयत नागविली जाउ नये म्हणून राजा॑नी तह केला हे तितकेसे पटत नाही.
राजा॑च्या पश्चात स्वतः और॑गजेब दक्षिणेत आला त्यावेळी त्याने मुलूख बडविला होता तरीही स्वराज्य झुकले नव्हते तर
राजे स्वतः असताना ते झुकेल हे अस॑भवनीय.
राजा॑नी जयसि॑गाला लिहीलेल्या पत्रावरुन काहीच बोध घ्यायचा नाही का ?
आम्ही फक्त जयसि॑ग व शाइस्तेखान या॑ची तुलना करत बसणार का?
आग्रा भेटीमागील रहस्यमय हेतू शोधण्याचा प्रयत्न जारीने केला पाहीजे.
हा परमप्रतापी नरसि॑ह कोणत्याही क्षुल्लक हेतूसाठी और॑गजेबाच्या भेटीला जाणार नाही.तसेच पुर॑दरच्या तहाला कोणतेही
सबळ कारण नाही.म्हणूनच तर्काने असे म्हणावे लागते की-----
राजा॑चा स॑पूर्ण हि॑दुस्तान्चे भविष्य बदलण्याचा प्रयत्न असावा.

शैलेन्द्र's picture

27 Nov 2010 - 12:31 am | शैलेन्द्र

"राजा॑चा स॑पूर्ण हि॑दुस्तान्चे भविष्य बदलण्याचा प्रयत्न असावा."
हे भविष्य कसं बदलनार होतं?

kamalakant samant's picture

27 Nov 2010 - 10:09 am | kamalakant samant

और॑गजेबाला स॑पवून.

शैलेन्द्र's picture

27 Nov 2010 - 2:24 pm | शैलेन्द्र

महाराज राजकारणात इतके बाळबोध नव्हते. हे म्हणजे संसदेवर हल्ला करुन भारताला जिंकण्यासारखे आहे. औरंगझेब तेंव्हा पन्नाशीच्या पुढचा होता. मोगल साम्राज्य सुस्थीर होते. औरंगझेबावर एकास एक हल्ला करुन तो १००% यशस्वी होइल ही शक्यता ५% सुद्धा नव्हती. जरी झाला असता, तरी मोगल साम्राज्य संपल नसत, स्वराज्याचा मात्र नक्किच गर्भपात झाला असता.

नितिन थत्ते's picture

27 Nov 2010 - 2:37 pm | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

(महाराजांचे औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार वक्तव्यसुद्धा काल्पनिक असावे).

क्लिंटन's picture

27 Nov 2010 - 3:29 pm | क्लिंटन

(महाराजांचे औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार वक्तव्यसुद्धा काल्पनिक असावे).

आततायीपणे मनाचा तोल घालवून काहीतरी करून बसले आणि नंतर पश्चात्ताप करायची वेळ आली अशी इतर एकही घटना महाराजांच्या चरित्रात नाही. अफझलखानाने महाराजांच्या तुळजाभवानीवर हातोडे घालायची वेळ आली तरी शत्रूच्या सामर्थ्यापुढे आपले सामर्थ्य काहीच नाही तेव्हा खुल्या मैदानात त्याच्यावर हल्ला करण्यापेक्षा स्वतःला अनुकूल असलेल्या प्रदेशात त्याला आणावे आणि मग त्याच्याशी झुंज घ्यावी हा विचार करण्यासाठी लागणारा विवेक त्यांच्याकडे होता.आपले हात दगडाखाली अडकलेले असताना काहीही झाले तरी आततायीपणा न करता शांत बसावे पण दगडाखालील हात निघताच तोच दगड उचलून शत्रूच्या डोक्यात घालावा अशी महाराजांची निती होती. असे असताना आग्र्याच्या दरबारात वरकरणी बाणेदारपणा वाटणारा आततायीपणा महाराज करतील हे जरा अशक्यच वाटते. आपल्या बलाढ्य शत्रूच्या दरबारात मूठभर लोकांना बरोबर घेऊन शत्रूलाच आव्हान देण्यात असलेला धोका महाराजांनी ओळखला नसेल असे वाटत नाही.तेव्हा कदाचित दरबारातील प्रसंगही काल्पनिकच असावा असे मलाही वाटते.

क्लिंटन

शैलेन्द्र's picture

27 Nov 2010 - 3:39 pm | शैलेन्द्र

अगदी बरोबर, कदाचीत महाराजांच्या अटकेचे स्पष्टीकरण देण्यासाठी मोगल किंवा इतर कागद्पत्रात हा प्रसंग घुसडला गेला असावा.