'ग्रँटा'मध्ये पाकिस्तानच्या वेगवेगळ्या वास्तवांचं चित्रण

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
11 Oct 2010 - 7:00 pm
गाभा: 

Plane and clothes

ग्रँटा या साहित्यविषयक इंग्रजी मासिकाचा नवीन अंक समकालीन पाकिस्तानी साहित्याला वाहिलेला आहे. वर्तमानपत्राच्या बातम्यांमधून आणि आपल्या पूर्वग्रहांच्या पडद्यांतून आपल्यापर्यंत सहसा न पोचणारं पाकिस्तान त्यातून दिसतं.

काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या मुहम्मद हनीफ यांच्या 'अ केस ऑफ एक्स्प्लोडिंग मँगोज' या कादंबरीमध्ये झिआ-उल-हक यांच्या विमानाला झालेल्या अपघाताचा (खरा) प्रसंग घेऊन त्याभोवतीच्या कट-कारस्थानाची कहाणी रचली होती आणि त्याद्वारे झिआंच्या जुलमी राजवटीवर विखारी विनोदाचे कडक ताशेरे ओढले होते. झिआंच्या पोटात जंत होतात हा त्यातला प्रसंग हलकट विनोदाचा चांगला नमुना म्हणता येईल. हनीफ यांच्या 'बट अँड भट्टी' या ताज्या कादंबरीतला एक भाग ग्रँटाच्या अंकात वाचता येईल. प्रेम आणि हिंसा यांना वेगळं न करू शकणार्‍या पुरुषाचं या प्रेमकथेत चित्रण आहे. हनीफ पाकिस्तान बी.बी.सी.साठी काम करतात. लेखकाची छोटी मुलाखत इथे वाचता येईल.

नदीम अस्लम यांच्या 'लैला इन द विल्डरनेस' या कथेत पुरुषप्रधान, धर्मांध समाजव्यवस्थेत मुलीच्या जन्माविषयी असणारी परिस्थिती चित्रित केली आहे. त्यातला काही भाग इथे वाचता येईल.

जमील अहमद यांच्या 'द सिन्स ऑफ द मदर'मध्ये कुटुंबापासून दूर जाऊ पाहणार्‍या एका जोडप्याची शोकांतिका आहे. कमीला शम्सी यांच्या 'पॉप आयडॉल्स' या ललित निबंधामध्ये कराचीत पाश्चिमात्य संस्कृतीच्या सान्निध्यात लहानाचं मोठं होण्याचे अनुभव आहेत. पाकिस्तानातून पश्चिमेत स्थलांतरित झालेल्यांच्याही कहाण्या या अंकात आहेत. याशिवाय मोहसीन हमीद ('द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट' या गाजलेल्या कादंबरीचे लेखक), डॅनिएल मुईनुद्दीन अशा काही गाजलेल्या आणि नव्या लेखकांचं लिखाणही अंकात वाचता येईल.

समकालीन पाकिस्तानी कलाकारांच्या कलाकृतीही अंकात वापरलेल्या आहेत. लेखाच्या सुरुवातीची प्रतिमा तिथूनच घेतलेली आहे.

ओळखपत्रावरचं छायाचित्र, मुघल लघुचित्रं, कंपनी शैलीतली चित्रं आणि युरोपिअन शैलीतली चित्रं यांच्या एकत्रीकरणातून उभं केलेलं, वेगवेगळ्या काळांतल्या जगांत मिसळलेल्या आधुनिकोत्तर वास्तवातल्या अस्मितांचं चित्रण भासणारं 'तुम्ही इथं इतिहास शोधायला आलात का?' हे नुस्रा लतीफ कुरेशी यांचं चित्र पाहा:

Looking for History?

जगाला ज्यानं भिववून सोडलं आहे अशा हिंसा आणि धर्मांधतेकडे दुर्लक्ष न करणारं, गुलाबी अतिरंजित वास्तव न दाखवणारं, पण पाकिस्तानी लोकांचं माणूसपणही दाखवणारं अशा प्रकारचं लिखाण या निमित्तानं पाकिस्तानाबाहेरच्या जगासमोर येतं आहे ही महत्त्वाची बाब आहे.

अधिक तपशील न्यू यॉर्क टाईम्स आणि गार्डिअन मधल्या लेखांत वाचायला मिळेल.

Artwork

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

11 Oct 2010 - 7:55 pm | मुक्तसुनीत

पुन्हा एकदा माहितीपूर्ण लिखाणाबद्दल आभार. सविस्तर प्रतिसाद वाचनाअंती.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Oct 2010 - 7:58 pm | बिपिन कार्यकर्ते

छान!!! या विषयावर अजून तपशीलवार वाचायला आवडेल.

आजानुकर्ण's picture

14 Oct 2010 - 7:52 pm | आजानुकर्ण

उत्तम लेख

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 8:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्रं खूपच आवडलं.

हेच म्हणते.
माहितीपूर्ण आहे लेख. यावर आणखी लिहा.. वाचायला आवडेल.

स्वाती२'s picture

11 Oct 2010 - 9:05 pm | स्वाती२

धन्यवाद!

धनंजय's picture

11 Oct 2010 - 9:09 pm | धनंजय

उद्धृत केलेली दोन्ही चित्रे कल्पक आणि भन्नाट आहेत.

हळूहळू कादंबर्‍यांमधील अश वाचेन.

अविनाश कदम's picture

12 Oct 2010 - 2:42 am | अविनाश कदम

धन्यवाद !

मिडनाईटस् अदर चिल्ड्रेन वाचलं. बाकी नंतर वाचू

पण पाकीस्तानविषयी येवढ्या आस्थेने ही सर्व माहीती दिल्यावद्दल खास अभिनंदंन आणि आभार.

आपल्या शेजारच्या राष्ट्रातील सामान्य माणसे आणि लेखक, कलाकार यांच्याविषयी भारतीयांचे खूप गैरसमज असं काही पुर्वग्रह न ठेवता वाचल तर दूर होतील. मग त्यांच्या कलाकारांना बंदी घालण्याचं तरी आपण सोडून देऊ.

नंदन's picture

12 Oct 2010 - 4:16 am | नंदन

विशेषांकाचा परिचय आवडला. न्यू यॉर्क टाईम्समधला भारतावरील ग्रँटाच्या विशेषांकाशी तुलना करणारा लेख पुरेसा वस्तुस्थितिनिदर्शक आहे.

सहज's picture

12 Oct 2010 - 7:05 am | सहज

रवंथ करायला मस्तच!!

चिंतातुर जंतू's picture

12 Oct 2010 - 2:29 pm | चिंतातुर जंतू

आपल्या शेजारच्या राष्ट्रातील सामान्य माणसे आणि लेखक, कलाकार यांच्याविषयी भारतीयांचे खूप गैरसमज असं काही पुर्वग्रह न ठेवता वाचल तर दूर होतील. मग त्यांच्या कलाकारांना बंदी घालण्याचं तरी आपण सोडून देऊ.

हे म्हटल्याबद्दल धन्यवाद. अनेकदा असं लक्षात येतं की 'आपण' 'त्यां'ना ज्या गोष्टींबद्दल शिव्या घालतो त्याच गोष्टींबद्दल 'त्यां'चे कलाकार वेगवेगळ्या माध्यमांतून आवाज उठवत असतात, आणि त्यापायी त्रासही सहत असतात. पण हे आपल्यापर्यंत पोहोचण्याचे मार्गच दुर्लभ झालेले आहेत. पाकिस्तानातली कला मी पाश्चिमात्य देशांत जेवढी पाहिलेली आहे त्याच्या एक शतांशही इथे (दिल्लीसारखे किंचित अपवाद वगळता) पाहायला मिळत नाही. अशाच एका प्रदर्शनाविषयीचा हा दुवा पाहा.

यशोधरा's picture

12 Oct 2010 - 2:43 pm | यशोधरा

करुन दिलेला परिचय आवडला. तुम्ही जेह्वा दुवे देता, तेह्वा ते ठळक कराल का? पटकन लक्षात येत नाहीत व नजरेतून सुटायची शक्यता.

हरकाम्या's picture

13 Oct 2010 - 12:34 pm | हरकाम्या

तुम्हाला या पाकिस्तानी लोकांबद्दल एवढा कळवळा का? मरेनात का ती हरामी माणसे. जो देश आपल्याला त्रास देतो त्या देशाविषयी व तेथल्या नागरिकांबद्दल एवढा कळवळा येण्याची काही गरज नाही. आणि हे पाकिस्तानी कलाकार कोणी स्वर्गातुन खाली आलेले नाहीत. ह्या कलाकारांनी त्यांची " अत्युच्च " कला पाकिस्तानातच ठेवावी. या मताचा मी आहे,
या देशात एवढे कलाकार मिळत असताना. उगीच त्या पाकिस्तानी कलाकारांना गुळ देउन आमंत्रण देण्याची काही आवश्यकता नाही.

अविनाश कदम's picture

14 Oct 2010 - 1:18 am | अविनाश कदम

पाकीस्तानाली सर्वसामान्य जनता आणि तिथले राज्यावर असलेले सत्ताधारी यांच्यात फरक करायला हवा.
भारतात खूप कलाकार आहेत पण पाकीस्तानातले जे कलाकार त्यांच्या तोडीचे वा वरचढ आहेत तेच इथे लोकप्रीय आहेत. उदा..बॉलीवूड मध्ये सीनेसंगीताच्या क्षेत्रात खूप स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत कुणाविषयी कळवळा वा दया यांना स्थान नाही. कित्येक पाकीस्तानी गायक इथे यशस्वी व लोकप्रीय झालेत ते त्यांच्यातील गुणवत्तेमुळे.
कलेची कदर करतांना ती त्या क्षेत्रातील गुणवत्तेच्या निकषावर व्हायला हवी आपल्या इतर राजकीय पुर्वग्रहांच्या आधारे होता कामा नये. सुदैवाने अशी कदर करणारे लोक भारतात जास्त आहेत. पाकीस्तानातही आहेत म्हणून तिथे तिथल्या सिनेमांपेक्षा बॉलीवूडचे सिनेमे जास्त लोकप्रीय आहेत.

हरकाम्या's picture

16 Oct 2010 - 9:56 pm | हरकाम्या

पाकिस्तानी गायक इथे लोकप्रिय झालेत ते त्यांच्या गुणवत्तेमुळे हे म्हणणे तितकेसे पटत नाही. मुळात इथे गुणवत्ता प्रचंड
प्रमाणात उपलब्ध असताना शेजारी शोधण्याची गरज नाही. इथली गुणवत्ता नजरेआड टाकुन. शेजारच्या शत्रुराष्ट्रात शोधणे
म्हणजे शुध्द मुर्खपणा आहे. बॉलीवुडच्या सिनेमांना तेथे लोकप्रियता आहे असे म्हटले तर पाकीस्तान ही हिंदी सिनेमासाठी
मोठी बाजारपेठ आहे असे वाटत नाही. मुळात हा दरिद्री देश. दुसर्याच्या पैशांवर जगणारा. आणि या देशात बॉलिवुड
लोकप्रिय म्हणणे हे सयुक्तिक वाटत नाही. आपल्या कलाकारांनी व आपण हा एक "गोड " गैरसमज करुन घेतलेला आहे
बॉलिवुडच्या सिनेमांना तेथे भारतापेक्षा जास्त उत्पन्न कधीच मिळेल असे वाटत नाही. आपण या गैरसमजाची
झापडेकधी दूर करु हेच समजत नाही. आणि जोपर्यन्त ही झापडे डोळ्यावर आहेत तोपर्यन्त आपण पाकीस्तानी कलाकारांची
भलावण करणार हे खरे.

अविनाश कदम's picture

17 Oct 2010 - 2:23 am | अविनाश कदम

बॉलीवूडच्या संगीतात पाकिस्तानी गायक भारतात लोकप्रीय आहेत ही वस्तूस्थिती आहे. ते जर त्यांच्या गुणवत्तेमुळे नसेल तर याचा अर्थ ज्या लोकांमध्ये ते प्रीय आहेत ते लोक देशद्रोही असले पाहीजेत. त्यांनी पाकीस्तानी गायकांवर प्रेम करणे सोडावे वा पाकिस्तानात चालते व्हावे असा फतवा लगेच काढून टाका !

बॉलीवूडचा सिनेमा पाकिस्तानात लोकप्रीय आहे म्हणजे तिथे भारतापेक्षा चांगले उत्पन्न मिळते असे नव्हे. भारतीय सिनेमांना भारतातच चांगले उत्पन्न मिळणार हे शेंबड्या पोरालाही समजते. डोळ्याला झापडं आहेत तशी कानाला झापडं नाहीत हे भारतातल्या माणसांचं दुर्दैवं की सुदैवं?

स्व. श्रीकांतजी ठाकरे हे उत्तम संगीतकार होते. त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल?

चिंतातुर जंतू's picture

13 Oct 2010 - 1:20 pm | चिंतातुर जंतू

तुम्हाला या पाकिस्तानी लोकांबद्दल एवढा कळवळा का? मरेनात का ती हरामी माणसे.

मुळात देश आणि त्यातले लोक यांत फरक करावा असं वाटतं. विष्ठा आणि पान-तंबाखूच्या पिंका यांनी भारतातले रस्ते भरलेले असतात; म्हणून 'भारताचा प्रत्येक नागरिक रस्त्यावर विष्ठा करतो आणि पिंक टाकतो' असं मानणार्‍या एखाद्या अमेरिकन माणसानं तुमचाच तर्क लावून तुमच्याचविषयी घृणा व्यक्त केलेली तुम्हाला आवडेल का?

शिवाय तुम्ही माझा वरचा प्रतिसाद वाचलेला दिसत नाही:

'आपण' 'त्यां'ना ज्या गोष्टींबद्दल शिव्या घालतो त्याच गोष्टींबद्दल 'त्यां'चे कलाकार वेगवेगळ्या माध्यमांतून आवाज उठवत असतात, आणि त्यापायी त्रासही सहत असतात.

पाकिस्तानात राहून तिथल्या धर्म/समाजव्यवस्थेवर टीका करणार्‍यांना भारतात राहून तीच टीका करणार्‍यांनी प्रोत्साहन देणं हे तार्किक असतं असंही वाटतं.

सुनील's picture

14 Oct 2010 - 6:57 pm | सुनील

छान माहिती.

अवांतर - हे वाचा. मराठी लेखिका सानिया (मिर्झा नव्हे!) ह्यांच्या पकिस्तान भेटीवर डॉन ह्या वृत्तपत्रात ३० नोव्हेंबर २००४ रोजी आलेले स्फुट.