प्लीज व्होट फॉर मी - चिनी शाळेत लोकशाहीचा अंतर्मुख करणारा प्रयोग

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
1 Oct 2010 - 2:31 pm
गाभा: 

Please Vote For Me - Poster

आजच्या जगात ‘लोकशाही’ म्हणजे नक्की काय याचा उहापोह व्हावा यासाठी एका संस्थेनं २००७ मध्ये 'Why Democracy?' नावाचा एक प्रकल्प हाती घेतला. जगाच्या विविध कोपर्‍यांतल्या दहा देशांमधून एक तास लांबीचे दहा माहितीपट या प्रकल्पात बनले. त्यापैकी चीनमध्ये बनलेला 'Please Vote for Me' हा गमतीशीर चित्रपट नुकताच पाहायला मिळाला. चीन हा लोकशाही देश नसल्यामुळे लोकशाहीविषयीच्या चिनी कल्पनांविषयी कुतुहल होतं. जर लोकशाही असती तर चिनी लोकांनी काय केलं असतं याची एक झलक या माहितीपटातून मिळते.

एका शहरी प्राथमिक शाळेतल्या एका वर्गात मॉनिटर निवडण्यासाठी निवडणूक होणार असं वर्गशिक्षिका जाहीर करते. दोन मुलगे आणि एक मुलगी अशा तिघांची उमेदवारी जाहीर होते. तिथपासून ते निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतचा तीनही मुलांचा प्रवास माहितीपटात चित्रित केलेला आहे. तीन मुलं, त्यांचे पालक आणि त्यांच्या वर्गातली इतर मुलं (म्हणजे मतदार) यांचं वर्तन माहितीपटात आपल्याला दिसतं. त्या वर्तनातून मानवी स्वभावाचे गमतीदार पैलू समोर येतात. त्या बरोबरच लोकशाहीची काही वैशिष्ट्यं इतक्या छोट्या वयातही मुलांमध्ये प्रतिबिंबित होताना दिसतात.

एक मुलगा डांबरट आणि दांडगट आहे. तो सुरुवातीलाच आपल्या आई-वडिलांना सांगून टाकतो की मला अख्खा वर्ग माझ्या ताब्यात हवा आहे. त्यासाठी वाटेल त्या थराला जायची त्याची तयारी असते. वर्गातल्या इतर मुलांना कसल्याकसल्या पदभारांची आमिषं दाखवून तो त्यांना आपल्याकडे वळवायचा प्रयत्न करतो. उमेदवार मुलगी घटस्फोटित आईकडे एकटी वाढते आहे. ती हळवी, संवेदनशील आहे. तिन्ही उमेदवारांनी वर्गात विविधगुणदर्शन करायचं असतं. दांडगा मुलगा प्रतिस्पर्धींच्या गुणदर्शनाच्यावेळी सभा उधळून टाकायचा बेत रचतो. आधीच फितवलेल्या आपल्या साथीदारांना त्यासाठी आरडा-ओरडा करण्याचे आदेश तो देतो. गुणदर्शनावेळी बिचारी मुलगी मतदारांचा विध्वंसक मूड पाहाताच ओक्साबोक्शी रडू लागते. 'माझ्या मुलीला एकटीनं वाढवताना मी तिला इतरांच्यासारखी नॉर्मल वाढवण्यात अपयशी ठरते आहे' या भावनेनं वर्गाबाहेर बसलेली तिची आईही रडू लागते. पण लोकशाहीत अखेर बहुसंख्यांच्या चांगुलपणाचा विजय होतो. गरीब बिचार्‍या महिला उमेदवारावरच्या अन्यायामुळे तिला जनतेची सहानुभूती मिळते. तिला रडताना पाहून सगळा वर्गच रडू लागतो. दांडगा मुलगा आपल्या कृत्याचा परिणाम पाहून स्वतःच रडू लागतो आणि मुलीची माफी मागतो. अखेर सभा उधळली न जाता पार पडते.

मतदार जनतासुध्दा प्रातिनिधिक आहे. 'तुम्ही कोणाला मत देणार?' असं विचारल्यावर काहीजण ते सांगतात; काहीजण 'माहीत नाही' सांगतात, तर एकजण 'None of your business' म्हणून चाच(प)णीकर्त्याला आपली जागा दाखवून देते! वर हेही सांगते की तू मला एकेकाळी मारलं होतंस ना, मग आता कशाला माझ्याकडे भीक मागायला येतोस!

दुसरा उमेदवार मुलगा हुशार आहे. दादागिरी करणार्‍या मुलाच्या दादागिरीमागचं कारण तो ओळखून आहे. शाळेच्या मुतारीत दोघं शेजारीशेजारी आपापलं कार्य उरकत असताना तो दांडगटाला सांगतो की तू मुळात दुर्बळ आहेस. दोन पुरुषांनी एकमेकांच्या पौरुषाची तुलना करायच्या सनातन ठिकाणी हा संवाद घडतो, हेही मजेशीर आहे.

पालक ज्या पध्दतीनं आपापल्या मुलांना निवडणुकीसाठी तयार करतात तेही रंजक आणि उद्बोधक आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलाला स्पर्धेत जिंकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. डांबरट मुलाचे आईवडीलही डांबरट आहेत. पण दुसर्‍या मुलाचेही आईवडील काही कमी नाहीत. ते दोघंही पोलिसात आहेत. त्यामुळे मतदारांना 'इंप्रेस' करण्याचे त्यांचे उपायही तसे आहेत. सगळ्या वर्गाला ते फुकटात मोनोरेलची सफर घडवतात आणि त्याद्वारे 'शक्तीप्रदर्शन' करतात.

'तू मारकुटा आहेस', 'तू रडूबाई आहेस' अशा आरोप-प्रत्यारोपांचा सामना प्रत्येक उमेदवाराला करावा लागतो. आपल्या मुलाला ओळखून असणारे पालक त्याला कोणत्या मुद्द्यांचा प्रतिवाद करायला लागेल याची आखणी करतात. कोणत्या आरोपाला कसं उत्तर द्यायचं, प्रत्यारोप कुठे करायचा अशी तयारी ते आपापल्या मुलांकडून करून घेतात. दांडगट मुलाला भाषणं पाठ करायचा, एकंदरीत कष्ट घ्यायचा कंटाळा असतो. पण डोकं बाजूला ठेवून वागणार्‍या, भावनाप्रधान, गोलमटोल अशा त्या मुलात एक गोडवाही आहे. बिच्चारी वाटणारी मुलगी इतरांचे दोष हिरिरीनं टिपण्यात तरबेज असते आणि त्यांच्या आधारे नकारात्मक प्रचार करून आपणही काही कमी नाही हे दाखवते. पोलीस आई-बापांचा मुलगा कडक आणि शिस्तप्रिय आहे. वर्गाला वठणीवर आणण्यासाठी आणि शिस्तीत ठेवण्यासाठी अधूनमधून मुलांना मारही द्यावा लागतो असं सांगत तो स्वतःच्या मारकुटेपणाचं समर्थन करतो.

एका तासाच्या माहितीपटात मानवी स्वभावाच्या इतक्या कंगोर्‍यांचं दर्शन घडतं की हा सहज घडलेला माहितीपट नसून मुद्दाम घडवून आणलेला तर नाही ना, अशी शंका येते. पण तसं ते नाही; ही एक विलक्षण पण खरीच घडलेली कहाणी आहे. प्राथमिक शाळेतल्या मुलांच्या व्यक्तिमत्वांत हे कंगोरे दिसतात ही आणखी एक उल्लेखनीय बाब आहे. यशस्वी होण्यासाठी पालकांकडून मुलांवर येणारे जीवघेणे दबाव ही आपल्याकडच्या मध्यमवर्गीयांत दिसणारी गोष्ट इथेही दिसते. ज्या चीनमध्ये 'लोकशाही' हा शब्द निव्वळ गूगलवर शोधला तरीही सरकारची वक्र नजर पडते, त्या चीनमध्ये लोकशाहीतल्या विविध चांगल्यावाईट प्रवृत्ती शाळकरी मुलांमध्येही कशा अस्तित्वात आहेत हे दाखवणारा आणि म्हणूनच त्या वैश्विक आहेत हेही दाखवणारा माहितीपट बनला ही गोष्टही गमतीदार वाटते.

इतक्या लहान वयातही सत्ता आणि विशेष हक्क यांचं मुलांना किती आकर्षण वाटतं; ते मिळवण्यासाठी ती किती टोकाला जाऊ शकतात आणि किती डोकं लढवतात ही गोष्ट मात्र अंतर्मुख करते. या गोंडस दिसणार्‍या मुलांना कोणत्याच अर्थानं निरागस म्हणता येत नाही. ती जितकी मोठी होतील तितकी ती अधिक विधिनिषेधशून्य होतील;. ती ज्यात वाढताहेत ती समाजव्यवस्था आणि स्पर्धात्मक परिसर त्यांच्यातला असेल नसेल तो चांगुलपणा नष्ट करेल की काय अशी भीतीही वाटते.

चित्रपटाविषयी अधिक माहिती इथे मिळेल.

तूनळीवरची चित्रपटाची झलक:

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

1 Oct 2010 - 2:57 pm | ऋषिकेश

चित्रपटाची छान ओळख. चित्रपट इंग्रजीत आहे का?
लवकरच डाऊनलोडवीन म्हणतो.

त्याच बरोबर बाकीचे नऊ चित्रपटही जालावर मिळतील अशी अपेक्षा करतो :)

वा छान ओळख, ओळखीवरुन सिनेमा बघावासा वाटु लागला आहे. नशीबाने नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, बघण्याच्या यादीत टाकला आहे.

स्वप्निल..'s picture

4 Oct 2010 - 11:11 pm | स्वप्निल..

+ १

धन्यवाद रे नाइल्या .. मी पण बघण्याच्या यादीत टाकला :)

परि़क्षण मस्तच!!

यशोधरा's picture

1 Oct 2010 - 2:56 pm | यशोधरा

चित्रपट ओळख आवडली.

ज्ञानेश...'s picture

1 Oct 2010 - 3:09 pm | ज्ञानेश...

धन्यवाद, परिचय करून दिल्याबद्दल. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Oct 2010 - 3:39 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह छान ओळख करून दिलीत.

स्वाती२'s picture

1 Oct 2010 - 4:02 pm | स्वाती२

छान ओळख! मी इथे PBS वर बघितला होता. हा माहितीपट बघितल्यावर माझा मुलगा म्हणाला होता- ' so we are going to compete with these kids.'

मिसळभोक्ता's picture

1 Oct 2010 - 9:59 pm | मिसळभोक्ता

स्वातीतै,

तुमच्या चिरंजीवांनी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलाय.

धसका बसवणारीच गोष्ट आहे, नक्की.

>> इतक्या लहान वयातही सत्ता आणि विशेष हक्क यांचं मुलांना किती आकर्षण वाटतं; ते मिळवण्यासाठी ती किती टोकाला जाऊ शकतात आणि किती डोकं लढवतात ही गोष्ट मात्र अंतर्मुख करते. या गोंडस दिसणार्‍या मुलांना कोणत्याच अर्थानं निरागस म्हणता येत नाही. ती जितकी मोठी होतील तितकी ती अधिक विधिनिषेधशून्य होतील;. ती ज्यात वाढताहेत ती समाजव्यवस्था आणि स्पर्धात्मक परिसर त्यांच्यातला असेल नसेल तो चांगुलपणा नष्ट करेल की काय अशी भीतीही वाटते. >>
बापरे!!!
स्वाती यांची प्रतिक्रियादेखील पुरेशी बोलकी आहे.

शिल्पा ब's picture

1 Oct 2010 - 8:53 pm | शिल्पा ब

मस्त ओळख...आजच पाहुन टाकेन..

इतक्या लहान वयातही सत्ता आणि विशेष हक्क यांचं मुलांना किती आकर्षण वाटतं; ते मिळवण्यासाठी ती किती टोकाला जाऊ शकतात आणि किती डोकं लढवतात ही गोष्ट मात्र अंतर्मुख करते. या गोंडस दिसणार्‍या मुलांना कोणत्याच अर्थानं निरागस म्हणता येत नाही. ती जितकी मोठी होतील तितकी ती अधिक विधिनिषेधशून्य होतील;. ती ज्यात वाढताहेत ती समाजव्यवस्था आणि स्पर्धात्मक परिसर त्यांच्यातला असेल नसेल तो चांगुलपणा नष्ट करेल की काय अशी भीतीही वाटते.

जर चांगुलपणा ठेवायचा प्रयत्न केला तर ते स्वत: नष्ट होतील. दोन्हीपैकी एक निवडायचे आहे.
तिसरा मार्गही आहे पण तो सगळ्यांनाच उपलब्ध नसतो.

शिल्पा ब's picture

1 Oct 2010 - 11:50 pm | शिल्पा ब

पिच्चर आज बघेनच...पण हा एक पिच्चर आहे...त्यातील मते, संवाद, मांडणी वगैरे मोठ्यांचेच आहे...त्या लहान मुलांचे स्वतःचेच नाही म्हणजे नसावे...
त्यामुळे इतके गंभीर होण्यासारखे काही नाही..

चिंतातुर जंतू's picture

2 Oct 2010 - 10:59 am | चिंतातुर जंतू

पण हा एक पिच्चर आहे...त्यातील मते, संवाद, मांडणी वगैरे मोठ्यांचेच आहे...त्या लहान मुलांचे स्वतःचेच नाही म्हणजे नसावे...
त्यामुळे इतके गंभीर होण्यासारखे काही नाही..

हा एक माहितीपट आहे. शाळेत, मुलांच्या घरी आणि इतरत्र घडलेल्या खर्‍या घटनांचं ते प्रत्यक्ष चित्रण आहे. त्यामुळे पटकथा, संवाद वगैरेंसहित, अभिनेत्यांकडून सादर करण्यात येणारा, घडवून आणलेला कल्पित असा हा चित्रपट नाही. त्यातली मतं, संवाद वगैरे त्या त्या क्षणी त्या त्या खर्‍याखुर्‍या व्यक्तीच्याच तोंडचे आणि उत्स्फूर्त आहेत.

सहज's picture

2 Oct 2010 - 11:23 am | सहज

अजुन पाहीला नाही त्यामुळे चुभूदेघे पण मुलांची पार टॉयलेटमधे जाउनही शुटींग घेउ शकता अशी परवानगी बरी मिळवली माहीतीपट निर्मात्यांनी!!

नंदन's picture

2 Oct 2010 - 1:01 am | नंदन

चित्रपटाची ओळख आवडली. पाहण्याच्या यादीत या नावाची भर घातली आहे.

इतक्या लहान वयातही सत्ता आणि विशेष हक्क यांचं मुलांना किती आकर्षण वाटतं; ते मिळवण्यासाठी ती किती टोकाला जाऊ शकतात आणि किती डोकं लढवतात ही गोष्ट मात्र अंतर्मुख करते. या गोंडस दिसणार्‍या मुलांना कोणत्याच अर्थानं निरागस म्हणता येत नाही. ती जितकी मोठी होतील तितकी ती अधिक विधिनिषेधशून्य होतील;.

'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'ची आठवण झाली.

नेत्रेश's picture

2 Oct 2010 - 2:36 pm | नेत्रेश

प्रतिसादातले 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'नाव वाचुन मलापण त्याची आठवण झाली.

शुचि's picture

2 Oct 2010 - 3:23 am | शुचि

>>सत्ता आणि विशेष हक्क यांचं मुलांना किती आकर्षण वाटतं>>
यातही हा विचार मनात येतोच की "पॉवर फॉर द सेक ऑफ पॉवर" याचं आकर्षण मुलांना वाटतंय की पालकांच्या हव्यासातून ते मुलांच्या वागणूकीत प्रतिबिंबीत होतंय? कारण पालकांनी कौतुक करावं आणि आपल्या मित्रांना आपण आवडावं अशी जर त्यामागची प्रेरणा असेल तर ती बरीच निरागस आणि सहजप्रेरणा आहे. पण पालकच जर दिवसरात्र ब्रेनवॉशींग करत असतील तर मुलं अनैसर्गीक स्पर्धात्मक बनणं शक्य आहे.
अर्थात जरी वरीलपैकी कोणत्याही कारणामुळे मुलं स्पर्धात्मक झाली तरी इतकं टोकाला जाणं हे तसं अंतर्मुख करणारं आहेच म्हणा.

चिंज चांगली ओळख करुन दिली आहेत. माहितीपट बघायला हवा.

सत्ता आणि विशेषाधिकार ह्यांचे आकर्षण हे आपण कोणीतरी स्पेशल आहोत आणि चार लोक आपल्याला विचारणार एवढ्यापुरतेच आधी मर्यादित असावे, त्यांच्या वयामुळे. परंतु जसजसे वय वाढेल तसतशी ही स्पर्धा अधिक जीवघेणी, टोकदार आणि संवेदनारहित होत जाईल की काय ही भीती रास्त आहे.

चतुरंग

राजेश घासकडवी's picture

2 Oct 2010 - 4:09 am | राजेश घासकडवी

तुमचं विवेचन-विश्लेषण करणारं लेखन वाचायचं म्हणजे एक पर्वणी असते. तीन मुलांचं वर्णन वाचताना पात्रं प्रातिनिधिक पण तरीही चांगले वाईट अशी काळीपांढरी नाहीत हे दिसतं. त्यामुळे लेखकाबद्दल आदर वाढला. पण ही खरोखरच घडलेली घटना आहे हे वाचून जीवन हे (सुमार) कलाकृतींपेक्षा किती संपन्न असतं असंच मनात आलं.

उत्तम चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

नितिन थत्ते's picture

2 Oct 2010 - 8:40 pm | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

प्रियाली's picture

4 Oct 2010 - 5:21 pm | प्रियाली

असेच.

सहज's picture

2 Oct 2010 - 6:34 am | सहज

माहीतीपट पहायची उत्सुकता वाढली आहे.

सुधीर काळे's picture

2 Oct 2010 - 7:50 am | सुधीर काळे

जय हो! झक्कास!

परिकथेतील राजकुमार's picture

2 Oct 2010 - 2:49 pm | परिकथेतील राजकुमार

ओळख आवडली.
ह्या चित्रपटाचा टोरेंट कुठे उपलब्ध आहे का ?**

**विचारजंतांनी पायरसी वगैरेबद्दल गळे काढु नयेत. अन्यथा स्वखर्चाने ह्या चित्रपटाची सिडी आम्हाला पाठवुन द्यावी.

आमच्या कडे ये रे फुकट्या, तुला फ्री मध्ये दाखवतो. >)

चिंतातुर जंतू's picture

4 Oct 2010 - 1:35 pm | चिंतातुर जंतू

मुलांची पार टॉयलेटमधे जाउनही शुटींग घेउ शकता अशी परवानगी बरी मिळवली माहीतीपट निर्मात्यांनी!!

मलाही हाच प्रश्न पडला होता. थेट मुलांच्या घरी जाऊन, त्यांचेच पालक स्पर्धेसाठी त्यांची तयारी करून घेतानाचं चित्रण पाहतानाही हा प्रश्न पडला होता. या आर्थिक-सामाजिक वर्गातल्या मराठी पालकांचा विचार केला तर अशी परवानगी इतक्या सहजासहजी मिळाली असती असं वाटत नाही. दोन शक्यता मनात आल्या:

  1. याद्वारे आपल्या मुलाला जी प्रसिध्दी मिळेल तिच्या हव्यासापायी ही परवानगी दिली असेल. पीबीएस आणि त्यासारख्या देशोदेशींच्या प्रतिष्ठित वाहिन्यांवर आपलं मूल झळकणार असेल तर मग आपल्या खाजगीपणाला थोडी मुरड घालायला काय हरकत आहे? असा विचार असावा.
  2. मुळातच चीनमध्ये नागरिकांच्या इतक्या गोष्टींवर सरकारची नजर असते की खाजगीपणाची भावना आपण बाळगू शकत नाही हे नागरिकांच्या अंगवळणी पडलेलं असेल.
बिपिन कार्यकर्ते's picture

4 Oct 2010 - 5:19 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त. राजेशशी सहमत आहेच.