रविवारची मुखशुद्धी - पोच्ड पीचेस्

विंजिनेर's picture
विंजिनेर in पाककृती
28 Aug 2010 - 2:21 pm

वर्षातले ४-५ महिने कडाक्याची थंडी तुमच्या देशात पडत असेल तर कधी एकदा जून उजाडतोय आणि सोबत उन्हाळ्याची उबदार हवा कधी घेऊन येतोय याची तुम्ही नक्की वाट पाहत असणार.
उन्हाळा म्हणजे उंडारणं, पोहणं आणि मित्रमंडळींसोबत बागेत केलेले बार्बेक्यु!
मित्रपरिवारासोबत हसत खिदळत झालेल्या अशा पेटभर मेजवान्यांमधे अजून रंगत भरायची असेल तर पोच्ड पीचेसची चैनदार मुखशुद्धी हवीच!

मुळात पीच हे एक अति नाजूक आणि नखरेल फळ. गुलाबी-लालसर रंगाच्या नाजूक छटांच्या मखमली बाह्यरंगापासून वेडावून टाकणारा गंधासोबत, पूर्ण पिकलेलं, रसरशीत मधाळ अंतरंगापर्यंत - नजाकत कुठे म्हणून लपत नाही. त्याला वाईन आणि मधाची साजेशी, किंचित मादक जोड असेल तर मग जीभेवर स्वर्ग उतरायचाच बाकी राहतो !

चला तर मग झटपट साहित्य आणि कृती लिहून घ्या -
साहित्य

  1. पीचेस - ४ मध्यम आकाराची, पूर्ण पिकलेली (पण मऊ पडलेली नको)
  2. ड्राय व्हाईट वाईन - ४२५ मिली
  3. मध - पाव कप
  4. दालचिनी - १/२ इंच तुकडा
  5. लवंगा - १-२

कृती

  1. प्रथम पीचेस स्वच्छ धुवून, आतली बी काढून, अर्धे तुकडे करून घ्या
  2. एका जड बुडाच्या भांड्यात मध, वाईन, दालचिनी, लवंगा एकत्र करा आणि मोठ्या आचेवर ठेवा
  3. वरील मिश्रणाला उकळी फुटली की गॅस हळू करा आणि त्यात पीचचे तुकडे टाका.
  4. मंद आचेवर पीचचे तुकडे ह्या पाकात शिजूद्या(अंदाजे १०-१५ मि.). पीच शिजले पाहिजे पण अगदी लगदा होईस्तोवर थांबू नये.
  5. पीचचे तुकडे एका भांड्यात, पूर्ण गार होईस्तोवर काढून ठेवा. नंतर हवाबंद झाकण्याच्या डब्यात, फ्रिजमधे साठवा
  6. एकीकडे पाक आटवून निम्मा करा(अंदाजे १० मि.) व गॅसवरून उतरवा. पाक गार झाल्यानंतर गाळून, काचेच्या हवाबंद बरणीत - फ्रिजमधे साठवा. (अंदाजे एक दिवस आधी)
  7. पीचच्या फोडींवर थंडगार पाक घालून सर्व करा :)


टीपः

  • वाईनच्या ऐवजी पाणी सुद्धा वापरता येईल पण चवीत फरक पडतो .
  • मधाच्या ऐवजी साखर आणि प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करता येईल.
  • पीच हवाबंद डब्यात, फ्रिजमधे २-४ दिवस चांगले राहतात.

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

28 Aug 2010 - 2:25 pm | मेघवेडा

(तोंडाला पाणी सुटलेली स्मायली)

>> मुळात पीच हे एक अति नाजूक आणि नखरेल फळ. गुलाबी-लालसर रंगाच्या नाजूक छटांच्या मखमली बाह्यरंगापासून वेडावून टाकणारा गंधासोबत, पूर्ण पिकलेलं, रसरशीत मधाळ अंतरंगापर्यंत - नजाकत कुठे म्हणून लपत नाही. त्याला वाईन आणि मधाची साजेशी, किंचित मादक जोड असेल तर मग जीभेवर स्वर्ग उतरायचाच बाकी राहतो ! >>
र-सि-क!!! वर्णन

वाईन बाबा हौसेनी घरी बनवायचे तेव्हा थोडी टेस्ट केलेली. बाकी कधी मद्याला हात लावला नाही. पण हे पीच टेस्ट करावेसे वाटताहेत. फोटो अप्रतिम गोड.

चित्रा's picture

28 Aug 2010 - 7:55 pm | चित्रा

छान. मस्त रेसिपी. लिहीली पण रसिकपणे आहे.

मी असेच पेअरचे बेक करून करते (नासपती/नाशपती). नाशपतीबरोबर वाईनऐवजी थोडी रम घालायची. आणि आयस्क्रिम!

स्वाती दिनेश's picture

28 Aug 2010 - 8:26 pm | स्वाती दिनेश

मुळात पीच हे एक अति नाजूक आणि नखरेल फळ. गुलाबी-लालसर रंगाच्या नाजूक छटांच्या मखमली बाह्यरंगापासून वेडावून टाकणारा गंधासोबत, पूर्ण पिकलेलं, रसरशीत मधाळ अंतरंगापर्यंत - नजाकत कुठे म्हणून लपत नाही. त्याला वाईन आणि मधाची साजेशी, किंचित मादक जोड असेल तर मग जीभेवर स्वर्ग उतरायचाच बाकी राहतो !
क्लास वर्णन!
आणि पाकृ तर मस्तच...
स्वाती

दिपाली पाटिल's picture

29 Aug 2010 - 3:10 am | दिपाली पाटिल

मुळात पीच हे एक अति नाजूक आणि नखरेल फळ. गुलाबी-लालसर रंगाच्या नाजूक छटांच्या मखमली बाह्यरंगापासून वेडावून टाकणारा गंधासोबत, पूर्ण पिकलेलं, रसरशीत मधाळ अंतरंगापर्यंत - नजाकत कुठे म्हणून लपत नाही. त्याला वाईन आणि मधाची साजेशी, किंचित मादक जोड असेल तर मग जीभेवर स्वर्ग उतरायचाच बाकी राहतो...

सही वर्णन... पोच्ड पेअर बनवलं होतं पण पोच्ड पीचपण नक्की बनवून बघेन...

सहज's picture

29 Aug 2010 - 7:43 am | सहज

मुळात पीच हे एक अति नाजूक आणि नखरेल फळ. गुलाबी-लालसर रंगाच्या नाजूक छटांच्या मखमली बाह्यरंगापासून वेडावून टाकणारा गंधासोबत, पूर्ण पिकलेलं, रसरशीत मधाळ अंतरंगापर्यंत - नजाकत कुठे म्हणून लपत नाही. त्याला वाईन आणि मधाची साजेशी, किंचित मादक जोड असेल तर मग जीभेवर स्वर्ग उतरायचाच बाकी राहतो...

:-)

काही डीश वाचून आपणही ट्राय करायच्या असतात तर काही डिश बाहेर/हाटेलात खायला छान असतात तर काही डिश त्या डिश करणार्‍या लोकांकडे जाउन खास फर्माइश करुन लुफ्त लुटायच्या असतात (आणी हो, काही डिश नो थॅक्स म्हणुन पास करुन जायच्या असतात.)

उन्हाळा.. बार्बेक्यु! नाटक्याजी कुठे आहात? तेवढे 'सांग्रीया' बनवुन द्या की!

बेसनलाडू's picture

29 Aug 2010 - 10:35 am | बेसनलाडू

काही तासांत नाटक्याशेठ एका बार्बेक्यू कट्ट्यासाठी भेटणार आहेतच :)
(कट्टेकरी)बेसनलाडू
पोच्ड पीचेस आवडली. बायकोकडे करायच्या फर्माइशींच्या लिस्ट्मध्ये अ‍ॅड केली आहेत. तिला फोटोही दाखवला आणि कृतीसुद्धा पाठ करून घेतली.
(मास्तर)बेसनलाडू

पीचचे वर्णन छान .....आणि रेसिपीसुद्धा.....

रेवती's picture

29 Aug 2010 - 5:36 pm | रेवती

पीचचे वर्णन छान केले आहे.
फोटू तर भारीच आलाय!

विंजिनेर's picture

30 Aug 2010 - 8:14 am | विंजिनेर

प्रतिक्रियांसाठी ढन्यवादस् लोक्स!
(थ्यँकफूल) विंजिनेर

@ सहज - ही पाकृ कुठल्या कॅट्यागिरीत बसते ;) ?
(साळसूद)विंजिनेर

Shubhangi Pingale's picture

30 Aug 2010 - 10:54 am | Shubhangi Pingale

अतिशय उत्तम पाकृ आणि वर्णन

विसोबा खेचर's picture

30 Aug 2010 - 11:02 am | विसोबा खेचर

क्लास..!

स्वाती२'s picture

31 Aug 2010 - 6:59 pm | स्वाती२

व्वा! मस्त पाकृ !

यशोधरा's picture

31 Aug 2010 - 8:14 pm | यशोधरा

मस्त पा़कृ! फोटो दिसत नै :(